विकल्प हा दोष अत्यंत गंभीर...
ज्याप्रमाणे
माणसाच्या हातून आपल्या आरोग्याला हानिकारक अशा अनेक चुका घडतात परंतु डॉक्टरांच्या
सल्ल्याने मनुष्य आपल्या चुकांमध्ये सुधारणा करून पहिल्यासारखे निरामय आरोग्य प्राप्त
करू शकतो पण त्यात काही चुका अशा असतात की त्या कधीही बऱ्या होत नाहीत त्यामुळे लागलेले
असाध्य रोग मरेपर्यंत मनुष्याच्या शरीरातून नाहीसे होत नाही आणि त्या रोगांमुळे माणसाचा
मृत्यूही होतो.
त्याच प्रमाणे
भगवंताची एकनिष्ठ भक्ती करत असताना मोक्षदायक अशा परधर्माचे आचरण करत असताना अनेक वेळा
आपल्या हातून जाणून-बुजून किंवा नकळत चुका घडतात त्यामुळे आपल्या भक्तीमार्गात खंड
पडतो कधीकधी पूर्णच देवधर्म बुडतो, मन अविधींनी भरले जाते. त्या चुकांमुळे परमेश्वरावरील श्रद्धा डळमळीत होते श्रद्धाभाव
नाहीसा होऊ लागतो.
पण यावरही उपाय
असतात ते उपाय केले असता पुन्हा आपण भक्ती करण्यास सक्षम होतो विकार, हिंसा, विपरीतबुद्धी, कथन, मन दुखावणे, वर्मस्पर्श करणे इत्यादी सगळ्या दोषांवर प्रायश्चित आहे. पण
विकल्प दोष उपसाहण्यात पडत नाही त्यावर प्रायश्चित्त हि नाही ज्याला विकल्प दोष घडला
तो प्रायश्चित करत नाही. विकल्प म्हणजे सर्वशक्तिमान अशा परमेश्वराला सोडून इतर देवी
देवतांची भक्ती करणे.
विकल्प दोष कोणाला
घडतो?
एखाद्या जीवाला परमेश्वराने ज्ञान दिले होते परमेश्वर एकच आहे.
इतर सगळ्या देवता आहेत परमेश्वरच मोक्ष देऊ शकतो, इतर देवता मोक्ष देऊ शकत नाहीत इत्यादी सर्व ज्ञान असून तो जर परमेश्वराची भक्ती
सोडून इतर देवी-देवतांची भक्ती करील तर त्याला विकल्प प्रमादिया असे म्हटले जाते.
ब्रम्हविद्या शास्त्रात विकल्प तीन प्रकारचा सांगितलेला
आहे:-
१) ज्ञान असूनही देवतांची भक्ती करणे
२) स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजणे. या विकल्पा मुळे प्रित
देह नावाचे नरक होतात.
३) विचिकित्सा करणे म्हणजे हा पवित्र तो अपवित्र आणखी जात पवित्र, तमकी जात अपवित्र. हे घान हे चांगले असे छी छी थू थू करणे. या
विकल्पा मुळे प्रेतदेह नावाचे नरक होतात.
ज्ञानी पुरुषाकडून दुसर्या
आणि तिसर्या प्रकारचा विकल्प दोष घडला. पण त्याने त्याचे प्रायश्चित केले दुःख केले
देवाजवळ क्षमा मागितली तर त्या दोषाची क्षमा होते.
पण पहिला प्रकार
जो आहे देवतांची भक्ती करणे त्या विकल्प दोषाची मात्र क्षमा होत नाही.
म्हणून ज्याला
परमेश्वर भक्तीचे ज्ञान झाले आहे. अशा पुरुषाने किंवा स्त्रियांनी देवतांची भक्ती करणे
देवतांची स्तुती करणे देवतेच्या अन्य साधकांची स्तुती करणे देवतेच्या तीर्थक्षेत्रांची
स्तुती करणे इत्यादी सर्व प्रकार सावधानतेने टाळले पाहिजेत. इत्यादी प्रकार जर आपल्या
कडून घडले तर परमेश्वराला थोर खंती येते.
अन्य देवतांची पुस्तके वाचणे अन्य, शास्त्र, अभ्यासणे हा देखील विकल्पच आहे.
आज-काल बरेच
परमेश्वर मार्गाचे साधनवंत अन्य शास्त्र अभ्यासताना दिसतात व्याकरण ज्योतिष अभ्यासतांना
दिसतात. हे ही अत्यंत चुकीचे आहे. स्थळ पोथीकारांनी अर्थात सूत्र भाष्यकारांनी ज्योतिष
शास्त्र अभ्यासणे हा फार मोठा विकल्प दोष मानला आहे.
पण या गोष्टी आपण कोणालाही म्हणू शकत नाही की, असे करू नका कारण तसे केले तर परमप्रीती संपते, चांगले संबंध खराब होतात.
पंचतंत्रातल्या माकडासारखी गोष्ट बऱ्याच वेळा अनुभवाला येते.
एका अरण्यामध्ये
वडाचे फार मोठे झाड होते त्यावर सुगरण पक्षाचे घरटे होते पावसाळ्याचे दिवस होते एकेदिवशी
धो धो पाऊस पडत होता. तो सुगरण पक्षी सुखेच आपल्या घरट्यात बसून होता. जवळच एक माकड
पावसामध्ये बसून कुडकुडत होते. सुगरण पक्षाने त्याला म्हटले-
द्वय हस्तं द्वय पादं दिससि मनुष्याकृति ।
शितोष्ण परिहारार्थ मन्दिरं किं न करिष्यसि ।।
“अरे माकडा ! तुला दोन हात आहेत दोन पाय आहेत तुझे देहयष्टीही
मनुष्यासारखी आहे. मग तू या पावसाळ्यासाठी किंवा उन्हाळ्यात उन्हापासून विसावा मिळावा
यासाठी स्वतः चे घरटे का बांधत नाही?”
सुगरण पक्षाने फक्त इतके म्हटल्यावर त्या माकडाला खूप राग आला
व तो रागानेच म्हणाला “तू आली मोठी शहाणी
मला शिकवतेस” म्हणून क्रोधात येऊन तिचे घरटे
मोडून नदीमध्ये फेकून दिले.
आपले पूर्वज
थोर महानुभाव जसा आचार करीत होते तसा आचार आपल्याला घडत नाही. त्यामानाने आपला आचार
अत्यंत नगण्य आहे. पण आपण इतरांना हे म्हणू शकत नाही. आपण आपला आचार करावा. इतरांना
शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, नाहीतर त्या सुगरण
पक्षाला सारखी गत होते. देवाने ही म्हटले आहे जो आज जर तो त्याचाच धर्म इतरांच्या गुणा
दोषांकडे लक्ष देण्याचे आपल्याला काही कारण नाही.
सांगण्याची
इतकेच तात्पर्य होते की, परमेश्वर भक्तांनी
विकल्प दोष अत्यंत कटाक्षाने टाळला पाहिजे यासाठी हा लेखन प्रपंच.
परमेश्वराची
भक्ती अनन्य आणि अव्यभिचारी असावी. त्यात कुठल्याही प्रकारचा व्यभिचार नसावा. कितीही
दुःख प्राप्त झाले कितीही संकट कोसळले तरी परमेश्वरा व्यतिरिक्त इतरांना शरण जाऊ नये.
अनन्य भक्ती
आणि अव्यभिचारी भक्ती करणाऱ्या भक्ताविषयी देवतांनाही आदर वाटतो व देवताही त्याच्या
दुःखाची तीव्रता कमी करतात. त्याला वेळोवेळी साह्य करतात.
धर्म बंधुंनो! एक गोष्ट लक्षात घ्या, की सूर्याची किरणे कितीही तीव्र
असली तरी ते कोरडे गवत जाळू शकत नाहीत. आणि त्याच किरणांसमोर बहिर्वक्र भिंग धरले आणि गवतावर
तोच प्रकाशझोत केंद्रित केला, तर गवत ओले असले
तरी त्याला आग लागते. त्याचप्रमाणे, जोपर्यंत तुमची श्रद्धा एका परमेश्वरावर टिकत नाही, तोपर्यंत तुमच्या अनंत जन्मात केलेल्या कर्मांचे गवत कसे जळणार?
माझ्या धर्म बंधुंनो!
मी कोण?
माझा जन्म का झाला? माझ्या जन्माचे ध्येय काय? खरा परमेश्वर कोण
आहे?
हे यथार्थ कळल्याशिवाय अध्यात्माची एकनिष्ठ भक्तीची वाट सुकर
होत नाही.
बुद्धीचे दोन प्रकार आहेत, १) सदाचारी आणि २) व्यभिचारी.
जो सर्व देवांची आराधना करतो त्याला संत ज्ञानेश्वरांनी १३ व्या
अध्यायात एका ओवीत अहेव म्हणजे वेश्या असे म्हटलेले आहे.
ऐसा अखंड भजन करी। उगा नोहे क्षणभरी।
अवघेनी गाव द्वारी । अहेव जैसी ।। (ज्ञानेश्वरी अ. १३)
संत मीरा बाई म्हणते
"मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई"
म्हणून अनन्य भक्तीचे असाधारण महत्त्व समजून घ्या.
एकाचीच भक्ती करणे
हे परमार्थात नाहीतर व्यवहारातही अत्यंत महत्त्वाचे आहे जो एकाच मालकाशी प्रामाणिक
राहतो त्याच्या व्यतिरिक्त इतर मालकांकडे जात नाही इतरांची कामे करीत नाही फक्त आपल्या
मालकाचीच कामे करतो. असा नोकर त्या मालकाला अत्यंत आवडतो. पण जो सगळीकडे फिरतो, सगळीकडे डोके टेकतो त्याला समाजात हीन मानले जाते त्याची काहीही
किंमत नसते. राजकारणातही एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जास्त महत्त्व दिले जाते हे आपणा
सर्वांना ठाऊकच आहे. म्हणून परमेश्वराची भक्ती ही एक निष्ठ असावी.
देव एकच आहे, हे निर्विवाद सत्य
आहे. देवी देवता त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या दासी, सेवक आहेत.
अर्जुनदेवाला
विश्वरूप दाखवल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत गीतेत अकराव्या अध्यायात म्हणतात-
सुदर्दर्शमिदं
रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा
अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः ।। (गीता.११/५२)
अर्थात हे अर्जुना!
जें माझे रूप तूं पाहिले आहेस ते हे रूप दिसणे अतिशय कठिण आहे. सर्व देवी देवतासुद्धा
नेहमी या रूपाच्या दर्शनाची आकांक्षा करीत असतात. तात्पर्य या देवाच्या वचनावरून हाच
भावार्थ निष्पन्न होतो की देवता परमेश्वरस्वरूपाच्या दर्शनाची आकांक्षा करीत असतात.
पण त्यांना परमेश्वरू स्वरूपाचे दर्शन मागे कधीच झाले नाही आणि होणे शक्यही नाही. यावरून
हेच सिद्ध होते की देवता आणि परमेश्वर भिन्न आहेत.
ब्रम्हा विष्णु
महादेव हे त्रिदेव सदा कर्मांनी बद्ध आहेत असे शिवपुराणात लिहिले आहे.
ब्रम्हा
विष्णुरहं देवि बद्धाः स्म कर्मणा सदा ।
कामक्रोधादिभिर्दोषैः
तस्मात्सर्वे अनीश्वराः ।।
अर्थ :- महादेव पार्वतीला सांगतात की हे देवी आम्ही ब्रम्हा विष्णू महादेव तिन्ही देव कर्मांनी बांधलेले आहोत कामक्रोधादी दोषांनी जखडलेले आहोत तस्मात् म्हणजे म्हणून आम्ही ईश्वर नाहीत.
म्हणून सर्व
धर्मबंधुनी खरा परमेश्वर ओळखून विकल्प दोषापासून अत्यंत सावध राहायला पाहिजे.