श्रीकृष्ण चरित्र भाग 06 - महाबळ उर्फ श्रीधर ब्राम्हणाची फजिती shreekrishna charitra marathi

श्रीकृष्ण चरित्र भाग 06 - महाबळ उर्फ श्रीधर ब्राम्हणाची फजिती shreekrishna charitra marathi

श्रीकृष्ण चरित्र भाग 06 

महाबळ उर्फ श्रीधर ब्राम्हणाची फजिती 


महाबळ ब्राम्हणाची फजिती 

वसुदेवराजे श्रीकृष्ण भगवंतांना गोकुळात घेऊन आले. यशोदा मातेला पुत्र झाला म्हणून गोकुळात फार मोठा आनंदोत्सव साजरा झाला. हे आपण मागील भागांत पाहिले आहे. अष्टमीच्याच रात्री नंदराजांना पुत्र झाला ही बातमी कंसाच्या गुप्तहेरांनी कंसाकडे पोहोचवली. आणि यशोदा मातेच्या मायावी कन्येने कंसाला म्हटले होते. "तुझा काळ गोकुळात अवतरला आहे." म्हणून कंसाला शंका आली की नंदाचा पुत्रच आपला शत्रू तर नाही! 

म्हणून त्याने तपास करण्यासाठी महाबळ नावाच्या ब्राह्मणाला गोकुळात पाठवण्याची योजना केली. या महाबळ ब्राम्हणाचे नाव इतरत्र 'श्रीधर' असे आले आहे. हा जन्माने ब्राह्मण जरी असला तरी त्याची वृत्ती राक्षसी होती. त्याला कुवीद्या अवगत होती. त्या कुविद्येने त्याने अनेक लोकांना त्रास दिला होता. 

पौराणिक कथा :- महाबळ पुर्वील जन्मी सतानीक नावाचा ब्राह्मण होता. तो ऋषी लोकांची चेष्टा करायचा ऋषी लोकांशी खोटे बोलायचा, त्यांचा द्वेष करायचा, कखाय भोगायचा. एकदा एका ऋषीने क्रुद्ध होऊन त्याला शाप दिला. “पापी माणसा! तू आमच्याशी असे वागतोस पुढे तू देवद्रोही राजाचा पुरोहित होशील. आणि ब्रह्मराक्षसाचा जन्म पाठवशील.” या शापामुळे तो दुर्मल्ल राक्षसाच्या (कंसाचा पिता) नगरीत ब्रह्मराक्षस होऊन जन्मला आणि कंसाचा पुरोहित झाला.

हा महाबळ स्वतःला शुक्राचार्याचा शिष्य म्हणवत असे. शुक्राचार्य हे दैत्यगुरु होते. देवतांच्या विरोधात लढणाऱ्या दैत्यांना मदत करणे हेच शुक्राचार्यांचे काम होते. त्या शुक्राचार्याला हा महाबळ गुरु मानत होता. अर्थातच ज्याची ज्याच्यावर श्रद्धा असते तो त्याच्यासारखाच होऊन जातो. या महाबळाची वृत्तीही राक्षसांना मदत करण्याची होती. महाबळ हा कंसाच्या पदरी होता. कंसाने त्याला पाचारले आणि मागील सर्व वृत्तांत सांगितला. आणि विचारले की “आता काय केले पाहिजे?” 

महाबळ ब्राह्मण म्हणाला “अष्टमीच्या रात्री गोकुळात अनेक स्त्रिया प्रसवल्या आहेत. अनेकांना पुत्र झाले आहेत त्यात तुमचा शत्रू कसा बरे ओळखावा?” 

कंस म्हणाला, “म्हणूनच तर तुम्हाला पाठवत आहे काहीही करून शोध घ्या, आकाशवाणीनुसार तो गोकुळातच आहे. त्याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. नंदाच्या घरीही पुत्र जन्माला आलेला आहे तिथेही तपास करा.” 

महाबळ म्हणाला, “राजे हो! तुम्ही निश्चिंत रहा तुमचा शत्रू तो माझा शत्रू. त्या बाळकाला शोधल्यानंतर मी ते बाळक यमुनेत टाकण्यासाठी आई बापाला सांगेन, आई बापाने ते बाळक टाकून द्यावे यासाठी शर्तीचे प्रयत्न करीन. तुम्ही काळजी करू नका तुमच्या शत्रू नाहीसा झाला असेच समजा.”

अशाप्रकारे कंसाने महाबळाला गोकुळात पाठवले. महाबळ गोकुळात आला. आल्यावर सुखेच नांदणारी गोकुळ नगरी पाहून महाबळाने विचार केला की आधी  गोकुळाच्या राजा नंदाच्या घरी जावे. त्याचे बाळही अष्टमीला जन्मले आहे. आधी त्या बाळाला त्यांना यमुनेत टाकायला लावू मग इतर घरांमध्ये जाऊ. असा विचार करून तो नंदराजांच्या घरी आला.

दारी आलेल्या ब्राह्मणाला पाहून नंदराजे सामोरे आले. व चांगल्या प्रकारे आदर सत्कार करून महाबळाला चौरंगावर बसवले. महाबळाने नंदराजांना तिथीवार सांगितला. आणि विचारले “तुमच्या घरी पुत्र जन्माला असे ऐकतो, तू कोण्या दिवशी कोण्या तिथीला जन्माला आहे हे सांगा?” नंदराजांनी म्हटले, “अष्टमीच्या मध्यरात्री” 

महाबळाने बरोबर आणलेले पंचांगाचे चोपडे विचारपूर्वक पाहिल्याचे नाटक केले आणि चेहरा अत्यंत गंभीर करून नंदराजांना म्हणाला की, “अष्टमीच्या रात्री जेवढी मुले जन्मली आहेत ती सगळी मूळ नक्षत्रात जन्मलेली आहेत. ती सर्व मुले तुम्ही यमुना नदीत प्रवाहित करा. नाहीतर तुमच्या घरासहित संपूर्ण गोकुळ नगरीचा नाश होणार.” 

नंदराजांना आश्चर्य वाटले आणि रागही आला की, 'हा ब्राम्हण एवढे अविचार पूर्वक कसे बोलत आहे?' तरीही नंदराजांनी सामंजस्याने विचार केला की हा ब्राह्मण खोटं बोलणारा वाटत नाही, सर्वांशी या विषयावर बोलले पाहिजे म्हणून त्यांनी सर्व गवळ्यांना बोलावले आणि महाबळाचे बोलणे सांगितले. सर्व गवळी म्हणाले की, “लहान बाळकांना असे कसे प्रवाहित करायचे! यावर काही उपाय असेल तर विचारा आपण तो करू.” 

नंदराजे महाबळाला म्हणाले “लहान मुलांना असे प्रवाहित करणे आम्हाला योग्य वाटत नाही, आणि व्यवहारिक दृष्ट्या ते अजिबात योग्य नाही, म्हणून यावर दुसरा काही उपाय असेल तर आपण सांगा, तो आम्ही करू” 

महाबळ म्हणाला, “नंदराजे! आणा बरं तुमचा पुत्र, आधी त्याची लक्षणे पाहू आणि मग इतर मुलांची पाहू.” 

आणि यशोदा मातेच्या सेविकांनी मोठा चौरंग आणला त्यावर श्रीकृष्ण देवाला झोपवले. देव स्मित हास्य करत महाबळाकडे अवलोकत श्रीकर, श्रीचरण हालवीत होते. महाबळाने श्रीमूर्तीकडे पाहून आपली वायफळ बडबड करण्यास सुरुवात केली, “हे बाळक तुमच्या संपूर्ण गोकुळ नगरीच्या मुळावर आलेले आहे हा तुमच्या सर्व गवळ्यांच्या नाश करील याला तुम्ही अरण्यात सोडून द्या.”

असे महाबळ म्हणाला आणि जवळ ठेवलेला पाट आपोआप उडाला आणि महाबळाच्या डोक्यावर आपटला. लगेच चौरंग उडाला आणि महाबळाच्या डोक्यावर बसणारच पण लगेच नंदाने तो चौरंग पकडला. अशा एकेक करून घरातल्या सगळ्या निर्जीव वस्तू आपोआप उडून महाबळावर हल्ला करू लागल्या. तो खूप घाबरला आणि घाईघाईने घराबाहेर पळाला. त्याची कुविद्याही अजिबात काम करत नव्हती. 

नंदराजा यशोदा माता रोहिणी माता आणि इतरही गवळी लोक यांना आश्चर्य वाटले की 'हे असं कसे होत आहे!' महाबळ नंदराजांच्या वाडा बाहेर निघाला आणि गोकुळातल्या सर्व निर्जीव वस्तू आकाशात उडून त्याच्या शरीरावर येऊन आदळू लागल्या. त्याने मथुरेच्या रस्त्याने धाव घेतली. परंतु गोकुळातील पाट, चौरंग, मुसळ, लहान उखळ्या इत्यादी सर्व वस्तू त्याच्या पाठीमागे लागल्या. महाबळाच्या पाठीवर, डोक्यावर जबरदस्त घाव बसत होते. संपूर्ण गोकुळातील गोप-गोपिका आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. 

कसाबसा धावत अडखडत, महाबळ गोकुळाबाहेर निघाला आणि रानातली आऊते, वखर, नागर इत्यादी शेतीची अवजारे त्याला झोडपायला लागली. धावताना तो अडखळून पडला त्याचे गुडघे कोपर फुटले असा अत्यंत कासावीस झाला. तो मनात खूप भेदरला की, 'हे सगळे काय चालले आहे.' धावत धावत यमुना नदी जवळ आला आणि नदीत प्रवेशला. तेव्हा त्या सगळ्या निर्जीव वस्तूंनी त्याला झोपणे थांबवले. 

महाबळ ब्राह्मण पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. तसाच तो यमुनेच्या पाण्यात उतरला. कसाबसा पैल तीरावर पोहोचला. तो जन्माने ब्राह्मण होता म्हणून त्याचा मृत्यू झाला नाही. इतर कोणी असता तर तिथेच मेला असता. श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रवृत्तीने गोकुळ नगरी अधिष्ठात्री देवतेने त्याला चांगलीच अद्दल घडवली होती. 

महाबळ ब्राह्मण घरी गेला व संपूर्ण अंग स्वच्छ धुऊन. जखमांना औषधी लावून पाटे बांधून कंसाजवळ आला. आणि कंसाला रडत कुंथत म्हणाला, “राजे हो, गोकुळात नंदाच्या घरी सुंदर पुत्र जन्माला आला आहे. त्याच्याजवळ परहस्तक नावाची विद्या आहे. त्या विद्येचा प्रयोग करून त्याने सर्व निर्जीव वस्तू माझ्या पाठीमागे लावल्या आणि मला चांगलेच झोडपून काढले. त्या नंदाने चौरंग धरला म्हणून मी वाचलो नाही तर तिथेच मेलो असतो.”

कंस चिडून म्हणाला, “तुम्हाला त्या बाळकाने मारले की नंदाने मारले?” 

महाबळ म्हणाला, “ ना नंदाने मारले, ना बाळकाने मारले, पाट, चौरंग, मुसळ, इत्यादी निर्जीव वस्तू एकाएकीच हवेत उडून माझ्या डोक्यावर, पाठीवर हल्ला करत होत्या. ते कोण करत होते याची मला काहीही कल्पना नाही. माझे दैव बलवत्तर होते म्हणून वाचलो आणि तुझे दर्शन झाले, तो पुत्र खूप मायावी आहे तू त्याच्यापासून स्वतःचे रक्षण चांगल्या प्रकारे कर.” असे म्हणून तो आपल्या घरी गेला. 

असा चमत्कार कंस पहिल्यांदाच ऐकत होता. महाबळाचे बोलणे ऐकून तो अधिकच भयभीत झाला. आता तर त्याची पूर्ण खात्री झाली होती की आपला शत्रू नंदाचा पुत्रच आहे.

रिठासूर वध 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/08-rithhasur-vadh-shreekrishnacharitram.html

यशोदा मातेस श्रीमुखात विश्वरूप दाखवणे 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/07.html

पुतना वध लीळा

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/03.html

तृणावर्त राक्षसाचा वध 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/05-shreekrishna-lila-marathi.html

ब्राह्मणांना विक्राळ रूप दाखवणे 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/09-shreekrishna-charitra-09-marathi.html

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post