पंडित श्रीआनेराजव्यास
श्रीआनेराज योगीन्द्र हा तत्त्ववेत्ता।
असे ब्रह्मविद्येवरी पूर्ण सत्ता।
तशा ज्ञानचंद्रा किती आठवावा ।।
नमस्कार या थोर महानुभावा ।।
श्रीआनेराज व्यास उर्फ गोपाळपंडीत
या महान संस्कृत विद्वानाचे मूळ नांव गोपाळ पंडित होते. श्रीआनेराज (गोपाळ पंडित) हे पैठण जवळील ब्राह्मणी गावचे रहाणारे होते. त्यांच्या आजोबांचे नाव सारंगपाणिभट होते आणि वडिलांचे नाव चक्रपाणीभट आणि आईचे नांव कामाइसा होते. या भक्तीवान आणि श्रद्धावान दांपत्याच्या पोटी गोपाळपंडिताचा उर्फ आनोबासांचा जन्म शके १९९२ व्या आश्विन मासात झाला असे लीळाचरित्राच्या कालगणनेवरून वाटते.
एकदा परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी गंगातीरी क्रिडा करत भ्रमत घट सिद्धनाथ येथे आले.
एके दिवशी बाइसा त्यांच्या घरी भिक्षेला गेल्या. तेव्हा आनोबास आईच्या मांडीवर खेळत होते. बाईसांनी विचारले, “हा वो याचे डोळे लावलेले का आहेत? हे डोळे का उघडत नाही?” “आई हे साता मासां जन्मले : अपुरेया दिवसाचे आहे म्हणून डोळे उघडत नाही.” आई म्हणाली.
बाईसा म्हणाल्या, “ आमच्या बाबांच्या दर्शनाला याला घेऊन ये मग याचे डोळे उघडतील”
मग कामाईसाने सारंगपाणिभटांना म्हटले, “घट सिद्धनाथला जे पुरुष आलेले आहेत ते थोर सामर्थ्यवंत आहेत ईश्वर आहेत असे सर्व म्हणतात, तर गोपाळाला त्यांच्याकडे घेऊन जावे याचे डोळे उघडतील”
दुसऱ्या दिवशी सारंगपाणिभट सहा महिन्याच्या गोपाळ पंडितांना घेवून घटसिद्धनाथाच्या देवळात आले. सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू घटसिद्धनाथाच्या बाहेरील कठड्यावर आसनस्थ होते. सारंगपाणिभटांनी आपल्या नातवाला लहानशा गोपाळाला श्रीचक्रधर प्रभुंच्या मांडीवर ठेवून दंडवत घातले श्रीचरणांवर नमस्कार केला.
श्रीचक्रधर प्रभुंनी गोपाळ पंडिताकडे कृपादृष्टीने अवलोकन करून म्हटले, “हा आमचाच तर आहे, याचे चर्म चक्षु जातील, दिव्य चक्षु येतील, ज्ञानचक्षु होतील, हा जे पाहील ते कोणीच पाहणार नाही.” असे भविष्य सांगितले आणि त्यांच्या चेहऱ्यावर श्रीकर फिरवला. आणि गोपाळाचे डोळे उघडले. ते श्रीचक्रधर स्वामींच्या श्रीमुखाकडे टकमका पाहू लागले. सारंगपाणि भटांना आनंद झाला.
यानंतर सारंगपाणि भट थोडा वेळ थांबून आपल्या नातवास घेवून ते घरी गेले. नंतरही ते अधून मधून श्रीचक्रधरस्वामींच्या दर्शनाला येत असत. पुढे गोपाळ पंडित हळुहळु मोठे होऊ लागले. उच्च कुलिन ब्राह्मण घराणे असल्याने चहु वेदांचा अभ्यास, सहाही शास्त्राचा अभ्यास करवला गेला. संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित झाले.
पण इकडे तेवढ्या काळात श्रीचक्रधरप्रभू उत्तरापथी गेले. आचार्य श्रीनागदेवभटांना आचार्य पदी स्थापून भगवंत निघून गेले. व नंतर श्रीगोविंदप्रभू महाराजही निजधामास गेले. गोपाळपंडितांना परमेश्वराचे दर्शन होते. त्यामुळे त्यांना भटमार्गाची म्हणजेच महानुभाव पंथाची ओळख झाली होतीच. गोपाळपंडित अधूनमधूनच्या श्रीनागदेवाचार्यांच्या भेटीस येऊन ज्ञान चर्चा करीत असत.
स्वामीच्या वचनाप्रमाणे गोपाळपंडितांना आचार्यांकडून बोध झाला. व ते वासनिक धर्माचे आचरण करीत ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास करू लागले. ब्रह्मविद्या शास्त्राचे जाणते पंडित झाले. पुढे घरीच असताना कर्मरहाटीच्या राजकीय परिचयामुळे ते देवगिरीच्या रामदेव राजाच्या दरबारी पंडित म्हणून प्रसिद्ध झाले. ते दरबारी शास्त्रचर्चा करून इतर पंडितांचा शास्त्र चर्चेत पराभव करीत असत. अशी शास्त्र चर्चा ऐकण्यासाठी रामदेवराजाची राणी कामाईसा हीसुद्धा बसायची.
गोपाळ पंडितांचे शास्त्रज्ञान पाहून राणी कामाइसाने एकदा विचारले “भटो एवढा अभ्यास तुम्ही कधी केला? शास्त्राची इतकी प्रगाढ जाणीव तुमच्या ठिकाणी कशी आली?” यावर गोपाळ पंडित म्हणाले “हे सर्व आमच्या गुरूंचे ज्ञान आहे त्यांच्यामुळेच मला एवढी जाणीव आहे.”
“पंडित हो ! तुमचे गुरु कोण? ते कुठे असतात?” यावर गोपाळपंडित म्हणाले “आमचे गुरू ते निंबा येथे असतात, ते भट मार्गाचे अर्थात महानुभाव पंथाचे आद्य आचार्य होत, ते वेधवंती श्रीनागदेवभट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रसन्नतेने मला इतके शास्त्रज्ञान आहे.”
कामाइसाने आचार्यांची प्रसिद्धी ऐकलीच होती पुढे राणी कामाइसा श्रीनागदेवाचार्यांच्या दर्शनाला निंबा या गावी आली आणि महानुभाव पंथाचा उपदेश घेतला. देवता भक्ती सोडून परमेश्वर भक्त झाली.
गोपाळपंडितांना आपल्या गुरुंविषयी थोर आवडी होती. एकदा गोपाळ पंडित आचार्यांच्या भेटीसाठी आलेले होते. आचार्य भिक्षेला निघाले. गोपाळ पंडितही झोळी घेऊन आचार्यांसोबत निघाले. गावात भिक्षा करत असताना एक महाप्रचंड वसो म्हणजेच बैल, सांड तो आचार्यांवर धावून आला, तो शिंगे मारणार तेवढ्यात गोपाळपंडितांनी त्याची दोन्ही शिंगे धरून त्याला पुर्ण ताकदीने मागे ढकलले. तू सांग जमिन हुंगत हुंगत चालला गेला. तेव्हा आचार्य म्हणाले “गोपाळा आज माझ्या अभिमानियाने तुझे रक्षण केले.” गोपाळपंडित समजून गेले. कारण एवढ्या ताकदीचा बैल त्यांनी सहजपणे मागे ढकललाच कसा? याचे त्यांना खुप आश्चर्य वाटत होते. आचार्यांच्या शुभ चिंतनाने देवानेच तो बैल मागे ढकलण्यासाठी आपल्याला साहाय्य केले म्हणून त्यांनी देवाचे वारंवार आभार मानले. याच प्रसंगी गोपाळ पंडितांना सर्व श्रेष्ठ प्रेमोपाय म्हणजेच ओडवन घडली होती.
एकदा असेच गोपाळ पंडित आचार्यांच्या भेटीला आले होते. मुक्कामी राहिले होते. मध्यरात्री आचार्यांना तहान लागली. आचार्यांचे उदक पात्र रिकामे होते. आचार्य उठून रांजणाजवळ गेले तर रांजणही रिकामाच होता. आचार्यांच्या उठल्याने अनोबासही उठले, रांजणात पाणी नव्हते. म्हणून आचार्य आपल्या शयन स्थानावर येऊन निवांत बसले. गोपाळ पंडितांनी ते पाहिले व हंडा घेऊन गंगेवर गेले पाणी भरून आणले आणि आचार्यांना म्हणाले “भटो उदक घ्या.” आचार्यांनी पाणी घेतले व उरलेले पाणी गोपाळ पंडितांनी रांजणात घातले. व आचार्यांना विचारले “भटो अजून पाणी आणू का? ” यावर आचार्य काहीच बोलले नाहीत.
मग गोपाळ पंडित पुन्हा हंडा घेऊन गंगेवर गेले पुन्हा पाणी आणून रांजणात रिचवले. पुन्हा आचार्यांकडे पाहिले. पण आचार्यांनी त्यांच्याकडे लक्षही दिले नाही. ते पाहून गोपाळपंडित पुन्हा गंगेवर गेले. पुन्हा हंडा भरून आणला. असे करत करत संपूर्ण रांजण पाण्याने भरला. तेव्हा आचार्य म्हणाले आता झोप, आता तुझा विधी पूर्ण झाला. अशा थोर थोर अडनिच्या सेवा गोपाळ पंडितांना नेहमी घडत असत.
गोपाळ पंडित उर्फ अनोबास राजदरबारातील विद्वान पंडित होते, परंतु गुरुसेवेसाठी त्यांनी यत्किंचितही लज्जा बाळगली नाही. ते श्रीगुरूच्या भेटीला गेले म्हणजे तेथे भोजन न करता गावातून भिक्षा मागून जेवण करीत असत. आपल्या भोजनाची श्रीगुरुंना वेगळी व्यवस्था करावी लागेल हा त्यांना एक प्रकारे त्रास देणे होय. अशी त्यांची भावना होती. एवढा मोठा राज पंडित गुरूंच्या सान्निध्यात आला म्हणजे भिक्षा मागून जेवत असे ही सर्वश्रेष्ठ निराभिमानता त्यांच्या ठिकाणी होती. यावर आपल्या सर्व वासनिकांचे कर्तव्य आहे की कोणत्याही मार्गात गेल्यानंतर तेथील अन्न काहीतरी सेवा केल्याशिवाय खाऊ नये. सेवा न करता तसेच खाल्ल्यास फार मोठा दोष लागतो कारण ते अन्न साधुसंतांनी निष्पन्न केलेले असते.
गोपाळपंडितांना श्रीनागदेवाचार्यांकडून परमेश्वराचा बोध झाला होता तरी त्यांच्या विद्यमान काळात त्यांनी संन्यास घेतला नव्हता. श्रीनागदेवाचार्य यांचे देहावसान झाल्यावर त्यांच्या पश्चात पंथाचे द्वितीय आचार्य श्रीबाइदेवव्यासाकडून त्यांनी श्रीनागदेवाचार्यांच्या नावे संन्यास घेतला. यावेळी त्याचे “आनोबास” हे नाव ठेवण्यात आले. संन्यास घेतल्यानंतर ते नेहमी अटन करीत असत. “आचार हाच प्रचार” अशीच त्यांची वृत्ती होती. पुढे अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास केला. त्यांचे सर्व शिष्य गुरु सारखेच आचरणशील व ज्ञानी पंडित होते. वैराग्य केल्याशिवाय ज्ञान हे व्यर्थ आहे याची त्यांना चांगलीच जाणीव होती.
नेराज पंडितांच्या आचरणात सेवाभाव, नम्रता असल्यामुळे ते सर्वांना प्रिय होते. ते अतिशय प्रेमळ, स्नेहल होते. ते सर्वांशी समरस होत असत. तहानलेल्यास पाणी पाजावे. श्रमलेल्या अतिथिचे पाय धुवावे. त्यास जेवू घालावे. असे प्रेमळ व भाविक भक्तिचे पुरुष होत. हे सर्व गुण त्यांच्या चरित्रावरून प्रत्ययास येतात.
पुढे श्रीआनेराज पंडितानी १२ प्रकरणाचा अन्वय लावला आणि संस्कृत, मराठी काव्य करून साहित्यात भर घातली. त्यांनी ३२ शास्त्र लक्षणांचा संस्कृत बंध लिहिला. त्यांनी सुभाषित अंत्याक्षरी या नावाचे ३४ श्लोकांचे बोधपर काव्यही केले आहे. हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे कार्य आहे.
आचार्यांच्या प्रमुख तेरा शिष्यांपासून १३ आम्नाय झाले. त्यात पारमांडल्य आम्नायाचे मूळ पुरुष आचार्य म्हणून गोपाळ पंडित उर्फ आनोबास प्रख्यात होते. श्रीआनेराज पंडितांना स्वामीनी मांडीवर स्वामींनी त्यांना वर दिला म्हणून त्यांना पारमांडल्य असे नाव झाले. पारमांडल्य म्हणजे ब्रम्हविद्येचे सुक्ष्मातिसुक्ष्म ज्ञान जाणणारा महापंडित.
अशा या महान विभुती श्रीआनेराजव्यासांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏