महानुभाव पंथीय इतिहास श्रृंखला
पूर्वजाचा पवित्र पावन इतिहास
पंडित श्रीनरेंद्रव्यास
कवीरत्न विख्यात श्रीनरेन्द्र ज्ञानी ।
पहाकाव्य निर्माण केले ज्यांनी ।
स्मृतीग्रंथ देतो तयाचा पुरावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥
महानुभाव पंथिय आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य यांचे शिष्य श्री पंडित श्रीनरेन्द्रव्यास हे रामदेवराजाच्या दरबारातील थोर पंडित! व राजकवि होते. या महान पुरुषाचे पांडित्य व त्यांचे वर्तन जसे होते तसेच त्यांचे नावही होते. नर + इंद्र ते नरेन्द्र म्हणजे नरातील इंद्र ! जसे देवातील इंद्राला कोणाचीही भीति नाही तसे या नरातील इंद्राला कोणाचीही भीति नव्हती. काव्याचा अभंग मागणाऱ्या म्हणजे हे काव्याच्या शेवटी तुम्ही माझे नाव टाका व प्रत्येक वोवीला एक आसु(आजचे ५० हजार रूपये) घ्या असे म्हणणाऱ्या रामदेव राजालाही त्याने भीक घातली नाही. असे हे श्रीनरेन्द्रबास !
श्रीनरेन्द्रबासांना आचार्याजवळून धर्म श्रवण होते. एकदा श्रीनागदेवआचार्यांची आणि त्यांची भेट झाली काही शास्त्र चर्चा झाल्यानंतर त्यांनी धर्मोपदेश घेतला. व वासनिक धर्माने वर्तू लागले. संसाराविषयी वैराग्य निर्माण झाले सर्वसंग परित्याग करून परमेश्वरास अनुसरावे अशी उत्कट इच्छा त्यांच्या मनात होती पण राजाच्या पदरी असल्यामुळे त्याग करणे सहजच शक्य होईल असे वाटत नव्हते. त्याग करण्याविषयी रोज असते देवाला प्रार्थना करीत असत.
श्रीनरेंद्रबासांना दोन बंधू होते. एकाचे नाव नृसिंह कवि दुसरा सालकवि असे तिघे बंधू कवि होते. एकदा नृसिंह कविने नलोपाख्यान नावाचे काव्य केले व साल कविने रामायणावर काव्यरचना केली. आणि ते दोघे रामदेवराजाच्या दरबारी गेले. त्यांच्या बरोबर श्रीनरेन्द्रबासही होते. सालकवि व नृसिंह कवि या दोघांनी आपापले काव्य रामदेवराजाला वाचून दाखविले. राजाने त्यांच्या कवित्वाची स्तुती केली. व काही बक्षिसही दिले.
श्रीनरेंद्रबासही ते काव्य ऐकत होते. संपूर्ण काव्य ऐकल्यावर श्रीनरेंद्रबास म्हणाले, असे वर्णन जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या राम हाटाचे केले असते तरी तुमची पापे नष्ट झाली असती. (रामहाट म्हणजे सामान्यस्त्रीयांचा बाजार त्यांचे म्हणण्याचे तात्पर्य की श्रीकृष्ण भगवंताच्या द्वारकेतील सामान्यस्त्रिया देखील इतक्या पवित्र आहेत की त्यांचे वर्णन केल्याने तुमची पापे नष्ट होतील.) पुढे श्रीनरेन्द्रबास म्हणाले, हे काव्य करून तुम्हाला काहीच लाभ नाही. कारण देवतेची किंवा जीवांची किती जरी स्तुती केली तरी त्यामुळे काहीएक लाभ होत नाही. खरा लाभ तो परमेश्वराची किंवा परमेश्वरभक्तांची स्तुती केल्यानेच होतो.”
अशा प्रकारे त्यांच्या कर्तृत्वाची त्यांनी देवगिरीच्या रामदेव राजासमोर उपेक्षा केली. यामुळे त्या दोन्ही बंधूंना अपमान वाटला. व ते इर्षेने म्हणाले, “असं ! मग तुम्ही एखादे श्रीकृष्ण भगवंताच्या लीळावर्णनाचे काव्य रचून दाखवा ! मग तुमचे बुद्धि चातुर्य, काव्यरचनेचे सामर्थ्य पाहू ! काव्यरचना करणे हे काही साधारण मनुष्याचे काम नाही. त्याला काव्यदर्पणाचे ज्ञान, आणि शब्दांचा विपुल साठा पाहिजे. तरच रसाळ काव्यरचना करता येते.”
श्रीनरेंद्रबासांना आपल्यासारखी काव्यरचना करता येणार नाही म्हणून त्यांनी असे खोचक शब्द वापरले. मग श्रीनरेंद्रबासांनी त्या या दोन्ही बंधूंचे आव्हान स्वीकारून इर्ष्येनेे आठराशे (१८००) ओवींचा “ऋक्मिणी स्वयंवर” नावाचा ग्रंथ रचला आणि राजदरबारी या दोघां बंधूसमोर रामदेव राजांला वाचून दाखविला. या ग्रंथाची प्रत्येक ओवी उपमा अलंकारांनी भरलेली आहे. आणि शब्दलालित्य अतिशय रसाळ आहे, श्रीनरेंद्रबास ग्रंथातील एकेक ओवी वाचून दाखवत होते. सालकवि नृसिंहकवि आ'वासून पाहत होते. श्रीनरेंद्रबास एवढे सुंदर काव्य करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
ओव्या वाचताना ते एका ओवीजवळ आले,
'देवाचिया दादुलेपणाचा उबारा ।
न सहावेचि साताही सागरा।
भेणे ओसरोनि राजभरा ।
दीधली द्वारावती ।।
अर्थ :- श्रीकृष्ण भगवंतांच्या ऐश्वर्याची उब सातही समुद्र सहन करू शकले नाही आणि घाबरून त्यांनी मागे सरकून द्वारकेसाठी जागा दिली.
ही ओवी ऐकून रामदेवराजा खुप प्रसन्न झाला. व म्हणाला, “या ग्रंथाच्या शेवटी कवि म्हणून माझे नाव घाला. मग जेतुकिया ओवीया तेतुके सोनटके आणि चौथरीया आसू ओवाळणी घालीन.” यावर श्रीनरेन्द्रबासांनी राजाच्या मागणीला नकार दिला. व ते म्हणाले, 'ना राजे हो, आमचेया कविकुळा बोलू लागैल.'
राजा ग्रंथातील प्रत्येक ओवीला साधारणतः तोळाभर सोने देत होता. तरीहि श्रीनरेंद्रबासांनी आपले कवित्व विकण्याचा कलंक आपल्यावर लागेल व सर्व कविकुळाला गालबोट लागेल म्हणून त्यांनी सुवर्णदानाला लाथ मारली ही त्यांची केवढी निस्पृहता ! कविची ही निस्पृहता पाहून राजाला फार आश्चर्य वाटले, आणि श्रीनरेन्द्रबासांनी रचलेले काव्य त्यांच्या दोन्ही बंधूंनी ऐकल्यावर त्यांचा गर्व नाहीसा झाला.
श्रीनरेन्द्रबासांनी मी कवित्वाचा अभंग देत नाही असे राजास सांगितले, तेव्हा रामदेव राजाने “हा ऋक्मिणीस्वयंवर ग्रंथ आमच्याकडेच राहू द्या !” असे म्हटले. यानंतर श्रीनरेन्द्र पंडितांनी ही प्रत थोडी अशुद्ध आहे. उद्या सकाळी शुद्ध करून आणून देतो असे राजाला सांगितले व राजदरबारातून निघून आपल्या निवासस्थानी गेले.
उद्या राजा सैन्य पाठवून जबरदस्तीने ग्रंथ घेऊन जाणार हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. म्हणून श्री नरेंद्र भासांनी आपल्या दोन्ही भावांजवळ आपली भीती व्यक्त केली. भावानाही ती गोष्ट पटली आणि एका रात्रीतून तिघा भावांनी तीनशे तीनशे ओव्या लिहून काढल्या. बाकीच्या ओव्या लिहाव्या परंतु सूर्य उगवल्यामुळे त्यांना तेथेच लिखाण थांबवावे लागले. मग तो समग्र १८०० ओव्यांचा मुळ ग्रंथ राजास नेऊन द्यावा लागला. कारण जर नसता दिला तर अनायासेच प्राणसंकट आलेच असते.
पण या घटनेनंतर नरेंद्रबासांच्या मनावर गंभीर परिणाम झाला त्यांची संसाराविषयीची विरक्ती अत्यंत वाढली व ती उदास राहू लागले. मग एके दिवशी त्यांनी अनुसरणाचा निश्चय केला. राजाकडे जाऊन आपल्या राजकवी पदाचा राजीनामा दिला. व घर सोडले.
गृहत्याग करताना श्रीनरेंद्रपंडितांनी लिहून घेतलेला नऊशे ओवीचा अपुर्ण ग्रंथ घेवून ते आचार्यांजवळ आले. आणि त्याच काळात म्हणजे शके १२१३ अथवा १२१५ मध्ये त्यांनी श्रीआचार्यांच्या नावे संन्यास घेतला. श्रीनरेंद्रबास खूप मोठे विद्वान होते असे त्यांच्या ऋक्मिणीस्वयंवराच्या ग्रंथ कर्तृत्वावरून समजते.
काही महानुभावांचे मत आहे की रामदेव राजाकडे गेलेला १८०० ओव्यांचा ग्रंथ तोही काही काळानंतर परमार्गांकडे आला. श्रीनरेंद्रपंडिताच्या कवितेची बरोबरी बोरीकर भानुभटांची म्हणजेच श्रीकवीश्वरबासांची कविता करू शकते. अन्य तेराव्या शतकातील कोणतीही मराठी कविता त्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची बरोबरी करू शकणार नाही असेच त्याचे काव्य सौंदर्यप्रधान व त्यात अविट रस भरलेला दिसून येतो.
पुढे श्री नरेंद्रबास परमेश्वर वियोगात अटन विजन करीत असत. अटनातच त्यांनी आपले देह क्षेपले आणि परमेश्वर प्राप्तीला गेले.
श्रीनरेंद्रबासांनी आचार्यांच्या सान्निध्यात असताना आचार्यांचा आचार-विचाराचे अनुकरण करताना आचार्यांचे चरित्र म्हणून “स्मृतिस्थळ” नावाचा गद्य ग्रंथ लिहिला. हेच पंथातील पहिले स्मृतीस्थळ होते. त्यात ८०० स्मृती होत्या. पण पुढे तुर्कांच्या धाडीत तो ग्रंथ नामशेष झाला. पण आधी त्या स्मृती स्थळावरूनच बऱ्याच पंथिय साधकांनी स्मृति पाठांतर केलेले होते. नंतर श्रीपरशुरामबासांनी पाचशे स्मृतीचा ग्रंथ आठवून लिहिला.
असे हे श्रीनरेन्द्रबास महापंडित विद्वान होते. अशा थोर विद्वान आचारवंतास माझा साष्टांग दंडवत प्रणाम !!
महानुभाव पंथीय इतिहास श्रृंखला