भाग 015 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 015 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 015

विराटपर्व कथासार मराठी

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 

याप्रमाणे राजकुमार उत्तराला सारथी करून अर्जुनाने त्या शमी वृक्षाला प्रदक्षिणा केली व सर्व आयुधे घेऊन तो तेथून निघाला परंतु त्याने जाता जाता आपल्या रथावरील सिंह ध्वज उतरवून शमी वृक्षाच्या मुळाशी ठेवला व नंतर तो रथावर आरूढ चालू लागला. मग अर्जुनाने वानर चिन्हाने युक्त अशा आपल्या पीत वर्ण ध्वजाचे मनामध्ये चिंतन केले. अर्जुनाच्या रथावरील तो ध्वज म्हणजे ब्रह्मदेवाची विचित्र माया होती त्या ध्वजाचे पुच्छ ही दृग्गोचर झाले तरी शत्रू सैन्याची अगदी त्रेधा उडून जाई. 

नंतर त्या महारथी अर्जुनाने अग्नीदेवतेच्या प्रसादाने प्राप्त झालेले आपल्या रथाचे ध्यान केले. तेव्हा अग्नि देवतेने तात्काळ तो रथ व ध्वज अर्जुनास प्राप्त व्हावा म्हणून त्या त्या भूतांना आज्ञा केली व लगेच ध्वजयुक्त रथ आकाशातून एकदम खाली भूमीवर आला. त्या रथावरील तयारी अद्भुत होती. सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे सज्ज असा तो रथ विलक्षण सामर्थ्य नियुक्त होता आणि दिव्य व मनोहर दिसणारा तो रथ आपल्याकडे येत आहे हे पाहून अर्जुनाच फार आनंद झाला व त्याने लगेच त्या रथाला प्रदिक्षणा करून त्यावर आरूढ झाला आणि धनुष्य धारण करून राजकुमार उत्तराला उत्तर दिशेस रथ नेण्यास सांगितले. तिकडे जाताना त्याने आपला देवदत्त नामक प्रचंड शंख जोराने वाजवला. तेव्हा त्याचा तो भयंकर ध्वनी श्रवण करून गौरव सैन्याचे देह रोमांचित झाले त्यावेळी तो हृदय विदारक शंखध्वनी ऐकून कौरवांची भीतीने गाळण उडाली.

आणि त्या अग्नीदत्त रथाच्या वेगवान अश्वांनी ही गुडघे टेकले व राजकुमार उत्तर भयभीत होऊन खालीच बसला. तेव्हा अर्जुनाने स्वतः लगाम हातात घेऊन चारही घोडे सावरले. व उत्तराला पोटाशी धरून धीर दिला अर्जुन म्हणाला, “हे राजपुत्रा भिऊ नकोस. तू क्षत्रिय आहेस हे ध्यानात घे. अशा या प्रसंगी घाबरून जाणे तुला अजिबात शोभत नाही. अरे तू शंखांचे आणि युद्ध वाद्यांचे पुष्कळ शब्द ऐकलेले आहेत. त्याचप्रमाणे सैन्यामध्ये सज्ज असलेल्या पुष्कळ हत्तींच्या गर्जनाही तू ऐकलेल्या आहेत. 

मग या शंखाच्या ध्वनीने तू असा इतका का बरं घाबरून गेलास? व सामान्य जनांप्रमाणे तुझी मुद्रा अगदी निस्तेज का बरं झाली? यावर उत्तर म्हणाला, हे अर्जुना सैन्यात सज्ज असलेल्या हत्तींचे शंकांचे किंवा नगाऱ्यांचे ध्वनी मी आजपर्यंत पुष्कळ ऐकलेले आहेत, परंतु आता श्रवण केलेल्या शंख ध्वनीप्रमाणे शंखध्वनी मी अद्याप कधीही ऐकलेला नाही. 

अशा प्रकारचा ध्वज मी आज प्रथमच पाहत आहे. व धनुष्याचा असा टनत्कारही आज पहिल्यांदाच माझ्या कानी पडत आहे. त्यामुळे या शंखाच्या ध्वनीने धनुष्याच्या टणत्काराने रथाच्या घोषाने आणि ध्वजावर अधिष्ठित असलेल्या हनुमानाच्या अमानुष गर्जनेने मी अगदी गांगरून गेलेलो आहे. मला आता दिशांचे ज्ञान होत नाही, माझे मन गोंधळलेले आहे. हृदय धडधडू लागले आहे व शंखध्वनीने कानठळ्या बसलेल्या आहेत. अशाही स्थितीत काही मार्गक्रमण केल्यावर अर्जुन म्हणाला, “उत्तरा! रथावर मोठ्या सावधगिरीने बस अगदी सुस्थिर ठेव आसवांचे लगाम चांगले बळकट धर मी आता पुन्हा शंख फुंकीत आहे.” 

याप्रमाणे उत्तराला म्हणून अर्जुनाने पुन्हा शंख वाजवला त्याबरोबर जणू पर्वतांचा चुराळाच होईल असे वाटू लागले. पर्वतांच्या गुहा पर्वत व दिशा हे सर्व दणाणून गेले व उत्तराची ही पुन्हा मुरकुंडी वळली. त्या शंखाच्या ध्वनीने, रथाच्या आवाजाने आणि गांडीवाच्या टणत्काराने पृथ्वी थरथर कापू लागली. अखेरीस अर्जुनाला उत्तरास पुन्हा सावध करावे लागले. 

इकडे कौरव सैन्यात द्रोणाचार्य म्हणाले, “कौरव विरांनो ! पहा ज्याअर्थी रथाचा गडगडाट होत आहे. आकाशात मेघ जमा होत आहे. व पृथ्वी थरथर कापत आहे त्याअर्थी आपल्याकडे येणारा हा वीर अर्जुनाशिवाय दुसरा कोणीच नाही. देवदत्त शंखाचा ध्वनी आपल्या सर्वांच्या कानी पडलेला आहे. या महारथी अर्जुनाच्या आगमनाने आपल्या शस्त्रांचे जणू काही तेच नष्ट झालेले आहे. घोड्यांची मुद्रा बदलली आहे. आणि अग्नीमध्ये इंधन घातले तरी तो पेटत नाहीये. तेव्हा हे काही शुभ लक्षण नाही. मृगांचे कळप सूर्याकडे तोंड करून भयंकर शब्द करीत आहेत व कावळे आमच्या ध्वजांवर बसत आहेत हे लक्षण अत्यंत अशुभ आहे.

हे पहा पक्षी आमच्या डाव्या बाजूने जात आहेत तसाच हा कोल्हाही त्यास कोणी मारले नसताना सैन्यातून रडत रडत जात आहे. यावरून आमच्यावर काहीतरी भयंकर अरिष्ट येणार आहे हे उघड होते. हे विरांनो ! तुमची स्वतःची स्थितीही भयभीत झालेली आहे. ही पहा तुमची गात्रे रोमांचित झालेली असून त्यावरून युद्धात लवकरच क्षत्रियांचा मोठा संहार होणार यात काही शंका नाही. 

हे पहा आकाशातील तारे निस्तेज झाले आहेत प्राणी व पक्षी केविलवाणे शब्द करू लागले आहेत. तेव्हा या उत्पातावरून क्षत्रियांच्या संहाराशिवाय दुसरा तर्क मलाच स्फुरत नाहीये. हे प्रजापालका दुर्योधना ! हे पहा तुझ्या सैन्यावर प्रदीर्घ उल्कापतन पावत आहे. रथ घोडे हत्ती हे सर्व खिन्न होऊन रडत आहेत आणि तुझ्या सैन्यावर चोहीकडून गिधाडे येऊन बसत आहेत यावरून अर्जुनाच्या बाणांनी आपल्या सैन्यास पिडा झाल्याबद्दल हळहळ बसण्याचा तुझ्यावर प्रसंग नक्कीच येणार आहे. 

हे पहा तुझे सर्व सैन्य पराजय पावल्यासारखे भयभीत दिसत आहे. यातील कोणीही वीर युद्ध करण्यास तयार नाही सर्वांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे तुला एक मोलाचा सल्ला देतो की विराटाच्या गायी परत पाठवून दे व युद्धाची सर्व सिद्धता यथास्थितपणे करून सर्वांनी मोठ्या तयारीने सावध राहावे. हेच मला उचित दिसते. 


द्रोणाचार्यांचे बोलणे ऐकून हस्तिनापूरचा राजा दुर्योधन म्हणाला द्रोणाचार्य कृपाचार्य हो! तुम्हाला मी व कर्णानेही गोष्ट अनेक वेळा सांगितलेली आहे. आणि पुन्हा तुम्हाला आठवण करून देऊन तीच गोष्ट पुन्हा सांगतो, की द्युतामध्ये पराजीत झालेल्या पांडवांनी उघडपणे बारा वर्षेपर्यंत वनवासात रहावे आणि एक वर्षपर्यंत कोणत्या तरी देशात अज्ञातवास करावा. असा त्यांचा आमच्याशी करार झालेला आहे. 

अजून पांडवांनी तो पन सिद्धीस नेला नाही. अद्यापि अज्ञातवासाचे ते एक वर्ष संपलेले नाही आणि अशा स्थितीत अर्जुन आमच्याशी युद्ध करण्यास आलेला आहे. तेव्हा पांडवांनी पुन्हा बारा वर्षेपर्यंत वनवास करायला पाहिजे आता राज्य लोभाने अंध झाल्यामुळे जर त्यांना हे भान राहिले नसेल किंवा कालगणनेविषयी आमचीच समजूत चुकत असेल, तर यात जे काही न्युनाधिक झाले असेल ते जाणण्यास पितामह भीष्म समर्थ आहेत. 

जर पांडवांचा अज्ञातवासाचा काळ अजून समाप्त झालेला नसेल तर प्रस्तुत प्रसंगी आपण विजयी झालोच. पण जर कदाचित तो काळ समाप्त झाला असला तरीही पांडवांनी अकस्मात युद्धार्थ सिद्ध व्हावे हाही त्यांचा दोष होय. कोणत्याही गोष्टीविषयी जेव्हा दोन प्रकारची अनुमान निघत असतात, तेव्हा आपल्या मनात जे अनुमान असते त्याच्याविरुद्ध कधीकधी वस्तुस्थिती असते. त्यामुळे प्रस्तुत समयी कोणाची काय चूक होत आहे? याचा नीट विचार व्हावा. 

आता अर्जुनास प्रकट व्हावे लागत आहे. याचा आमच्याकडे काही एक दोष आहे का? यात आमची काय चुक? आम्ही उत्तर दिशेकडील गाई हरण केल्यामुळे आमचे व मत्स्य देशातील वीरांचे जर युद्ध सुरू झाले तर त्यात अर्जुनाने मध्ये का यावे? असे करण्यास कोणत्या पांडूपुत्रांचा आमच्या हातून अपराध झाला बरं? अहो आम्ही येथे त्रिगर्त राजा सुशर्म्याकरता युद्ध करण्यास आलो आहोत. त्याने मत्स्य देशांच्या वीरांकडून आपणास फार पीडा झाली म्हणून मत्स्य सैन्याचा नाश करण्याची आम्ही प्रतिज्ञा केली. हे उचितच होते. 

विराट राजाच्या गाई हरण करण्याची कल्पना देखील सुशर्म्याचीच होती. विराट राजाचे गोधन सप्तमीच्या दिवशी तिसऱ्या प्रहरी हरण करण्याची कल्पना त्यांचीच होती आणि तिकडे विराट राजा त्या गायीच्या मागून त्रिगर्तांबरोबर युद्ध करण्यास गेला म्हणजे आम्ही इकडे अष्टमीच्या दिवशी सूर्योदय होताच उत्तरेकडील गाई हरण कराव्यात. म्हणून आम्ही विचार ठरवला होता. तेव्हा या सर्व योजनेत आमचा काहिही दोष नाही हे उघड आहे. आता तिकडे ते त्रिगर्त विराटाच्या धेनु हरण करतील, कदाचित त्यांचा पराजय होईल, अथवा कदाचित आमच्याशी दगा करून तो विराट राजाशी तह करील, त्याने जरी काहीही केले तरी आमची प्रतिज्ञा आम्ही परिपूर्ण केली पाहिजे. 

आता आमच्याशी युद्ध करण्यास स्वतः विराट राजा येवो किंवा अर्जुन येवो अथवा दूसरा कोणी वीर येवो, आम्हाला युद्ध हे केलेच पाहिजे. वीर हो! , या प्रसंगी आपल्याशी युद्ध करण्यास कदाचित् विराट राजाही येण्याचा संभव आहे. विराटाचे ते दिखाऊ सैन्य त्रिगर्तांसमोर जर टिकाव धरेनासे झाले, तर विराट राजा त्रिगर्तांचा पाठलाग करण्याच नाद सोडून देऊन आपल्या सैन्यासहीत रात्री माघारी वळून आता इकडे आला असेल. 

असो, आपल्याला युद्ध करणे हे कर्तव्यच आहे. आपण केलेल्या प्रतिज्ञेकडे आपल्याला पाठ कशी करता येईल ! त्यामुळे शुरवीरहो, अस औदासीन्य धरून घाबरणे उपयोगी नाही. आपण सर्वांनी मोठ्या निकराने लढले पाहिजे. अहो, भीष्म, द्रोण, कृप. विकर्ण, अश्वत्थामा अशा एवं महान् महान् योद्धे जर अशावेळेस असे गोंधळून गेले, तर पुढे काय होणार? युद्धावांचून गति नाही, त्यामुळे सर्वांनी चित्ताचे स्वास्थ्य करावें. 

शुरवीरांनो! या प्रसंगात यमराज किंवा स्वर्गाचा राजा देवराज इंद्र जरी या गाई आपल्याकडून हिरावून नेण्याकरता युद्धास आले. तरी आम्ही माघार घेऊन हस्तिनापुरास जाणार नाही. या वेळी आम्ही सर्व धारातीर्थी पडलो तरी चालेल, पण आपली प्रतिज्ञा ही शेवटास नेलीच पाहिजे ! अहो, आपल्या या बाणांच्या तडक्यातून या रणभूमीवर शत्रुपक्षाकडील कोणीही पायदळ वीर जिवत राहू शकेल असं वाटत नाहीं; यदाकदाचित् जिवंत राहिले तर घोडेस्वार मात्र पळून जातील तर जिवंत राहतील ! "

अधम दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून राधेय कर्ण त्याला म्हणाला, “दुर्योधना, द्रोणाचार्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता, आपण जशी मसलत पूर्वी ठरविली आहे, तसे करण्यात यावे. राजा, द्रोणाचार्यांचे मन कसे आहे हे तुला माहीतच आहे. यांची त्या अर्जुनावर अधिक प्रीति असल्यामुळे यांना अर्जुनाची प्रशंसा करणे व आपला तेजोभंग करणे हे मनापासून आवडते ! राजा, या प्रसंगी आपल्या सैन्याची फांकाकांक होणार नाही याविषयी आपण विशेष दक्षता ठेवली पाहिजे. अरे, जरा एखादा घोडा किंकाळला की द्रोणाचार्याचे धैर्य गळालेच म्हणून समजावें ! 

त्यामुळे या ग्रीष्म ऋतूमध्ये महान् अरण्यात कोणी नायक नाही म्हणून आपल्या सैन्याची दाणादाण होऊन ते शत्रूच्या स्वाधीन होणार नाही अशी व्यवस्था झाली पाहिजे. राजा, नेहमी द्रोणाचार्यांचे विशेष प्रेम त्या पांडवांवर आहे. त्या स्वार्थसाधु पांडवांनी त्यांना आपल्याकडे ठेवले आहे. यामुळेच ते स्वतः पांडवांची प्रशंसा करीत असतात. असे नसते तर केवळ अश्वांच्या खिंकाळण्याने त्यांनी पांडवांच्या स्तुतीला आरंभ केला असता काय ? 

अरे, घोडे हे ठाणावर असतांना किंवा वाट चालतांना नेहमीच खिंकाळतात; वारेही नेहमींच वाहतात; देवेंद्राकडून पर्जन्याची वृष्टिही पाहिजे तेव्हां होते; मेघांची गर्जनाही अनेक वेळां ऐकू येते; तेव्हा त्यात अर्जुनाचे कर्तृत्व ते कोणते? आणि त्याबद्दल त्याची प्रशंसा काय म्हणून करावी ! असे करण्यांत द्रोणाचार्याचे पांडवांविषयी प्रेम व आमच्याविषयीचा द्वेष किंवा केवळ आमच्याविषयीं संताप हेच कारण असले पाहिजे ! 

अरे, आचार्य म्हटले म्हणजे ते कीवेने भरलेले व ज्ञानी असून त्यांच्या मनाला हिंसा वगैरे पापबुद्धी कधीच ही रुचत नाही. तेव्हा महान् या संकटाच्या वेळी याचा हा सल्ला काहीच उपयोगाचा नाही : असले हे ज्ञानी पुरुष मोठमोठ्या देवालयांमध्ये, गोष्टींच्या आखाड्यांमध्ये किंवा बागबगीच्यांमध्ये चांगले शोभतील यांनी तिथे चित्रविचित्र गोष्टी सांगाव्या. अथवा विनोद करून लोकांना रंजवावें ! 

अरे असल्या या पंडितांने यज्ञयागादि कमे करण्यात किंवा ती कशी करावी हे सांगण्यात आपला जन्म घालवावा.  दुसऱ्याच्या शिष्यांची व्यंगे शोधण्यात  किंवा मनुष्यांच्या आचरणांतील दोष हुडकण्यात यांचा हातखंडा आहे ! तसेच हत्ती. घोडे, किंवा रथावर आरूढ होऊन फिरणे, किंवा गर्दभ, उंट, मेष त्यांची चिकित्सा करणे यात हे चांगले पटाईत आहेत. त्याप्रमाणेच गाई, रस्ते, नगरवारे, अन्नगुण अन्नदोष इत्यादिकांची चर्चा करणे झाल्यास यांचा मोठा उपयोग होईल ! परंतु प्रस्तुत सारख्या युद्धप्रसंगाच्या वेळी यांचा काहीच उपयोग नाही. याकरिता, शत्रुची प्रशंसा करणाऱ्या या पंडिताच्या नाही न लागता. ज्या शत्रुचा विनाश कसा करता येईल,  त्याविषयी मसलत करावी ! आता सभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवून गाई हकलणे करा व सैन्याचं. व्यवस्थित रचना करून युद्धास सज्ज व्हा !

कारण पहा सर्व योद्धे भयभीत होऊन घाबरून गेल्या सारखे दिसत आहेत. व सर्वांचे मन चंचल झालं असून युद्ध करण्यास कोणी खुशीत दिसत नाही; त्यामुळे हा समोर आपणाशी युद्ध करण्यासाठी आलेला मत्स्याधिपति विराट राजा असो किंवा अर्जुन असो, त्याचे मी निवारण करतो. राजा, समुद्रप्रिय असला तरी त्यास त्याची मर्यादा जशी पुढे येऊ देत नाहीं, तसा मी त्या विराटास किंवा अर्जुनास पुढे येऊ देणार नाही. राजा, माझ्या धनुष्यापासून सुटलेले अणकुचीदार बाण एकदा सर्पाप्रमाणे सरसर जाऊ लागले म्हणज शत्रुचा नाश केल्याशिवाय कधीही हरणार नाहीत ! हे पहा आता माझे  विष लावलेले जलाल बाण मी इतक्या हस्तलाघवाने सांडतो की, वृक्षास छावून सोडणाऱ्या टोळधाडीप्रमाणे ते या अर्जुनाला झोडून काढतील ! 

ज्यांचे विसारे बळकट बसले आहेत, अशा माझ्या बाणांचे मोठमोठे प्रहार झाले म्हणजे असा मोठा ध्वनि होईल की, जणुकाही पर्वतांचा चुराडा होत आहे असे वाटेल! आज समोर असलेला अर्जुन युद्ध करण्याविषयी अगदी उत्सुक झालेला असेल, व तो त्या युद्धामध्ये माझ्यावर प्रहार करील प्रांत संदेह नाही; पण सत्पात्र ब्राह्मणाप्रमाणे गुणवान अशा त्या अर्जुनावर मी सहस्त्रावधी बाणांची दृष्टि करीन! राजा, या महाधनुधारी अर्जुनाची त्र्यैलोक्यात ख्याती आहे, पण मीही या श्रेष्ठ योद्ध्यापेक्षा अणुमात्र कमी नाही! पहा मी आज आपल्या तीक्ष्ण बाणांची सर्वत्र इतकी वृष्टी करतो की, अंतरिक्षात सर्वत्र बाणांचे ढगच आहेत असे भासेय ! दुर्योधना, आज मी अर्जुनाला या युद्धात मारून पूर्वी कबूल केलेल्या तुझ्या अक्षय्य ऋणांतून मुक्त होतों ! 

दुर्योधना, आज आकाशात मध्यंतरी तुटून इकडेतिकडे जाऊं लागलेल्या बाणांची अशी कांहीं गर्दी उसळलेली दिसेल कीं, जणू शलभांचे थवेच्या थवे अंतरिक्षांत संचार करीत आहेत ! वज्राप्रमाणें ज्याचा स्पर्श कठीण व इंद्राप्रमाणे ज्याचा पराक्रम लोकोत्तर, अशा त्या अर्जुनाला मी इतका पीडित करीन कीं, उल्कापातात गजच सांपडला आहे असे वाटेल ! 

मित्रा, ज्याप्रमाणे गरुड हा सापांना ओढून घेतो, त्याप्रमाणे मी आज त्या सर्व शस्त्रास्त्रविद अतिरथी अर्जुनाला जर्जर करून रथावरून ओढून घेईन! दुर्योधना, खड्ग, शक्ति व बाण या इंधनांनी चेतविलेल्या व शत्रुस जाळण्यास उद्युक्त झालेल्या त्या दुर्धर पांडवरूपी अग्नी अश्ववेगरूप पूर्व दिशेचा वायु रक्षघोष गर्जना, व महान जलधारा यांनी युक्त असलेला मी मोठा मेघ शांत करून टाकतो ! ज्याप्रमाणे सर्प वारुळात प्रवेश कारतात, त्याप्रमाणे माझ्या धनुष्यापासून सुटलेले सर्पतुल्य भयंकर बाण पार्थाच्या शरीरात घुसतील! 

दुर्योधना, कर्णिकारांनी जमा पर्वत आच्छादुन जावा तसा आज अर्जुन माझ्या पाणीदार, रुक्मपुंख, अणकुचीदार व झगझगीत बाणांनी आच्छातून जाईल ! अरे, आज माझ्या पराक्रमाची अगदी पराकाष्ठा होईल. जमदग्नीपुत्र ऋषिश्रेष्ठ परशुरामापासून प्राप्त झालेल्या वीर्यवान् बाणाने मी आज इंद्राशी देखील युद्ध करीन ! अरे अर्जुनाच्या ध्वजावर अधिष्ठित असलेला वानर माझ्या भल्ल बाणांच्या प्रहाराने व्याकूळ होऊन भयंकर आक्रोश करीत भूमीवर कोसळेल, आणि शत्रूच्या ध्वजाघर असलेल्या भूतांची अशी काही त्रेधा उडेल की, ती दशदिशांस पळ काढतील ! व पळताना जो ध्वनी होईल तो अगदी स्वर्गापर्यंत ऐकू जाईल ! 

मी आज रथातून अर्जुनाला खाली पाडले म्हणजे तुझ्या हृदयांत फार दिवस खुपत असलेले शल्य कायमचे निघून जाईल ! कौरव हो, आज पराक्रमाचा हर्ष बाळगणाऱ्या अर्जुनाच्या रथाचे घोडे मारून त्यास मी विरथ केले म्हणजे तो सर्पाप्रमाणे मुस्कारे टाकीत आहे असे तुमच्या दृष्टीस पडेल! वीर हो, आज तुम्ही खुशाल गोधने घेऊन चालते व्हा, अथवा रथावर स्वस्थ उभे राहून माझे युद्ध पहा! अशाप्रकारे कर्णाने स्वतःची बढाई मारली. परंतू पुढे हाच बढाई मारणारा हा पळपुटा कर्ण याच युद्धात अर्जुनाला भिऊन पळून गेला. 


कर्णाची आत्मप्रौढी ऐकून कृपाचार्य म्हणाले - हे राधेया, युद्धासंबंधित तुझे मत नेहमीच क्रूरपणाचे असते. अरे, कोणत्याही कार्याचं स्वरूप व त्यामुळे होणारा परिणाम या कडे तू मुळीच लक्ष देत नाहीस ! बा कर्णा, शास्त्रामध्ये अनेक उपाय श्रेयस्कर म्हणून सांगितले आहेत, परंतु त्या सर्वामध्ये युद्ध हा उपाय अत्यंत कनिष्ठ व पापकारक म्हणून पुराणवंत्यांचा अभिप्राय आहे. 

अरे भल्या माणसा! काळ देश परिस्थितीची अनुकूलता असेल तर युद्धापासून हित होतें, पण ती अनुकूलता नसल्यास त्या पासून हानी झाल्याशिवाय राहत नाही. कर्णा, कार्यामध्ये यश मिळणे हे कार्याच्या साधनांपेक्षा काळ व देशाच्या स्थितीवरच विशेष अवलंबून असते. पहा-रथकाराने (सुताराने) एक बळकट रथ तयार केला, तर तेवढ्यावरच विसंबून राहून आपल्याला विजय मिळेल असे शहाण्यास वाटेल काय? त्यामुळे केवळ तुझ्या सिमित शौर्यावर (किंवा तुझ्या या निरर्थक वल्गनांवर) भिस्त न ठेवतां सध्यांच्या ह्या ग्रीष्म कालामध्ये अर्जुनाशी युद्ध करण्यास उद्युक्त होणें हें सर्वथा अयोग्य आहे. यासाठी, कर्णा, सर्व वस्तुस्थितीचा विचार करून पहातां प्रस्तुत प्रसंगीं अर्जुनाशी युद्धप्रसंग करणे उचित नाही, असे मला वाटते. 

अरे, या अर्जुनाच्या सामर्थ्याचा नीट विचार करणे आवश्यक आहे. हा पहा एकटा कौरवांवर चाल करून आलेला आहे; या एकट्यानेंच खांडववनामध्यें अग्नीची तृप्ति केली; या एकट्यानेच पांच वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य आचरलें; ह्या एकट्यानेच सुभद्रेला रथांत घालून द्वैरथ युद्धासाठीं बलरामाला पाचारले ; या एकट्यानेच किरातरूपधारी शंकराशी युद्ध केले ; या एकट्यानेच या वनामध्ये जयद्रथाने हरण करून नेलेल्या द्रौपदीस परत जिंकून आणिलें; या एकट्यानेच पांच वर्षेपर्यंत इंद्रसदनीं वास करून त्याच्यापासून अस्त्रविद्या संपादिली; या एकट्यानेंच शत्रुना जिंकून कौरवांचें नाव राखिलें; या एकट्यानेच मोठ्या पराक्रमानें अवाढव्य सेनेचा पराजय करून गंधर्वराज चित्रसेनाला जिंकले ; आणि त्या गंधर्व युद्धात दुर्योधनाला गंधर्वांनी कैद केले होते. तेव्हा तू त्यांना भिऊन पळून गेला होतास, या गोष्टीचा तुला विसर पडला का? तेव्हा या अर्जुनानेच दुर्योधनाला सोडवले होते. 

आणि देवांना दुर्जेय झालेल्या निवात कवच व कालखंज दानवांस या एकट्यानेंच युद्धात पाडले ! कर्णा, या प्रकारचा अद्वितीय पराक्रम त्या अर्जुनाचा आहे, हे नीट लक्षात घे. अरे, पांडवांपैकी प्रत्येक या अर्जुनासारखा पराक्रमी आहे! त्यांतील एकेकट्याने जसे राजे जिंकिले आहेत, तसे कोणकोणते राजे तू एकट्याने जिंकले आहेत ते सांग पाहू? अरे, अर्जुनाचा पराक्रम काय वर्णावा? समरभूमीवर अर्जुनाशीं युद्ध करण्यास प्रत्यक्ष इंद्रही समर्थ नाहीं ! ह्याकरितां, जो त्या अर्जुनाशी युद्ध करण्याची इच्छा करीत असेल, त्याचे मस्तक ताळ्यावर आणण्यास कांही तरी औषध उपचार केले पाहिजेत !

कर्णा, उजवा हात वर करून अर्जुनाशी युद्ध करण्याविषयीं तू बोट दाखवीत आहेस, पण तू हा चवताळलेल्या सर्पाच्या तोंडात बोट घालून त्याची दाढ उपटण्याचाच विचार करीत आहेस ! अथवा मदोन्मत्त झालेला हत्ती एकटा वनांत फिरत असतां अंकुश जवळ न घेतां त्यावर आरूढ होऊन तू नगरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेस ! किंवा प्रज्वलित केलेल्या अग्नि मध्यें घृत, मेद व वसा त्यांच्या आहुति देऊन त्या अग्नीच्या ज्वाला झपाट्याने वर चालल्या असतां तू आपल्या अंगाभोवती तुपात भिजवलेले वस्त्र गुंडाळून त्या अग्नितून चालत जाण्याची इच्छा करीत आहेस ! परंतु, कर्णा, स्वतःला बांधून घेऊन व गळ्यांत मोठा दगड अडकवून बाहुबलानें समुद्र तरून जाण्याची कोणी तरी इच्छा करील काय ! व असे करण्यात पराक्रम तो कोणता बरें ! 

कर्णा, अर्जुनासारख्या अस्त्रविद्यानिपुण पराक्रमी वीराशीं जो अस्त्रविद्याहीन व दुर्बळ पुरुष युद्ध करण्यास तयार होईल, तो दुर्मति होय यात संदेह नाही ! अरे, आपण तेरा वर्षेपर्यंत घालवून दिलेला हा पुरुषसिंह पाशांतून मुक्त होऊन येथे आला आहे, त्यामुळे हा आता आपल्याला पूर्णपणे पराभूत करणार ! अरे, कूपात असलेल्या अग्निप्रमाणे गुप्तरूपाने राहणाऱ्या या अर्जुनाशी आज अवचित प्रसंग पडल्यामुळे आपल्यावर घोर संकट ओढवले आहे ! याकरता, कर्णा, एकट्याने लढण्याचा जो बावळटपणाचा विचार तुझ्या डोक्यात आला आहे, तो तू काढून टाक ; आपण सर्व मिळून त्या रणमस्त वीराशी युद्ध करूं ! आता सर्व सैन्याची मोठ्या तयारीने व्यूहरचना करून शत्रूशीं तोंड देण्यास सिद्ध व्हावें ! 

कर्णा, आता तू निरर्थक साहस करूं नको; भीष्म, दुर्योधन, द्रोण, अश्वत्थामा, तुं व मी असे सर्व आपण पार्थाशीं गाठ घालूं ! अरे, वज्रधारी इंद्राप्रमाणे युद्धार्थ सिद्ध झालेल्या पायाशी आपण सहाही महान् वीर एकत्र होऊन लढलों तरच आपला टिकाव लागेल ! याकरतां सैन्यांची व्यवस्थित रचना करा ; महान् महान धनुर्धर सज्ज व्हा; म्हणजे देवेंद्राशी लढण्यास जसे दानव समर्थ झाले, तसे आपण अर्जुनाशी लढण्यास समर्थ होऊं !

द्रोणाचार्याविषयी असे उद्गार काढले म्हणून अश्वत्थामा कर्णावर चिडला व म्हणाला - कर्णा, अरे, बढाई मारण्यासारखे ते तू आतापर्यंत काय केले आहे बरे ! गाई तर अजून जिंकल्याही नाहीत, किंवा त्या अजून विराट राज्याच्या सिमेपलिकडे नेल्या नाहींत ! त्या हस्तिनापुरास पोचण्याची तर गोष्ट लांबच आहे! आणि अशा स्थितीत तू मुढ मनुष्य आत्मस्तुती करीत सुटला आहेस, याला काय म्हणावें ! कर्णा, थोर पुरुषांची रीत अगदी निराळी असते. त्यांनी अनेक लढाया जिंकिल्या व पुष्कळ धन मिळवलें, आणि मोठी प्रबळ सेना हस्तगत करून घेतली, तरी ते आपल्या पराक्रमाची प्रौढी मिरवीत नाहीत ! 

अग्नि काहीएक वल्गना न करतां दहन क्रिया करतो सूर्य शांतपणे प्रकाश पाडतो, आणि पृथ्वीही निमूटपणे चराचर वस्तूंना धारण करते !

कर्णा, ब्रह्मदेवानें चतुवर्णाची कर्मे कोणती ती सांगितली आहेत. तदनुसार ज्याचें जे विहित कर्म असेल, ते केले असतां त्याच्या हातून चुकी होत नाहीं. भलत्याचें कर्म भलत्याने केले की असले हे प्रकार व्हावयाचेच !

अरे, ज्याने धन मिळवावे म्हणून शास्त्राज्ञा असेल त्याने धनच मिळवावें. ब्राह्मणाने वेदा. ध्ययन करून यजन व याजन हे करावे ; क्षत्रियाने धनुर्विद्येचे अध्ययन करून फक्त यजन मात्र करावें, याजन करूं नये; वैश्याने द्रव्य संपादन ब्रह्मकर्में करवावीं; आणि शूद्रानें मोठ्या नम्रतेने आज्ञापरिपालन करून ब्राह्मणादिक पहिल्या तीन वर्णांची नेहमी शुश्रूषा करावी. कर्णा, यथाशास्त्र वर्तन करणाऱ्या महाभाग्यवान् पुरुषांना ही अखिल पृथ्वी प्राप्त झाली तरी ते मर्यादेचे उल्लंघन करीत नाहीत. ते महात्मे आपल्या गुणरहित गुरूचा देखील अवमान न करता उलटा त्यांचा सत्कार करत असतात ! 

कर्णा, द्युतात राज्य मिळविणारा क्षत्रिय स्तुतीस कसा बरें पात्र होईल? परंतु हा दुर्योधन अशा प्रकारचा दुष्ट व दुराचारी आहे ! अरे, कपटाने दुसऱ्याचा घात करणाऱ्या पारध्याप्रमाणे संपत्ति मिळवून कोणत्या विचारी पुरुषास त्याबद्दल पुरुषार्थ वाटेलच कसा!

क्रमशः 

पुढची कथा पुढिल सोळाव्या भागात

भाग 16👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/016-virat-parva-marathi-katha.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post