भाग 006
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha mahabharat kahani)
कीचकाची सैरंधीविषयीं आसक्ति !
सुदेष्णेचे सन्निधानी । दुःख तें सुख मानूनि मनीं ।
वर्तत असतां याज्ञ सेनी । विपरीत कांहीं वर्तलें ॥
विराटाचा सेनापती । कीचकनामा पापमूर्ती ।
सुदेष्णेचा बंधू कुमती । भगिनीगृहा पातला. ॥
कृष्णा अवलोकितां नयनीं । हृदय भेदिलें पंचबाणीं ।
म्हणे, 'ऐसी लावण्यखाणी । तुज कोठूनि लाधली ? ॥
अयोग्यस्थळीं कल्पलतिका । बदरीनिकट कर्दळिंका । देखोनी म्हैसा मारी थडका । माजोनियां ज्यापरी ॥
अमृतवल्ली फळली फळीं । वनांत वांढैली निराळी ।
पांथीक क्षुधेचिया काळीं । कौष्टिका ताडिती निर्धारें ॥
तेंवी सुंदर सुगुण वनिता । आप्ता वेगळी परगृह वसतां ।
कामिकमेळ भोंवे भोंवता । हें आश्चर्य तव नव्हे. ॥
भगिनीलागि बोले वचनी । ये प्रमदेचा अवलोकनी ।
विरहताप उदैला मनी । तो जाळील देहाते ।।
पांडव हे मत्स्यराज - विराटाच्या नगरांत रहात असतां त्या महारथींचे दहा महिने अगदी गुप्तपणांत निघून गेले. जिची इतरांकडून सेवा व्हावयाची, ती याज्ञसेनी सुदेष्णेची सेवा करीत मोठ्या कष्टाने दिवस लोटीत होती. ती सुदेष्णेच्या महालांत मोठ्या कष्टाने रहात होती, तथापि तिने आपल्या वागणुकीने सुदेष्णेला व अंतःपुरांतील इतर स्त्रियांसही संतुष्ट करून त्यांची मर्जी संपादन केली. असो; याप्रमाणे ते अज्ञातवासाचे वर्ष बहुतेक निघून गेल्यावर एकदा द्रौपदी सहज कीचकाच्या दृष्टीस पडली.
कीचक हा विराटाचा सेनापति असून मोठा बलाढ्य होता जिची अंगकांति देवांगनेप्रमाणे आहे अशी ती द्रौपदी देवतेसारखी चमकतांना पाहून कीचक मदनशरांनी अगदी विव्हल झाला आणि मनामध्ये तिच्या प्राप्तीची इच्छा करू लागला. मग कामाग्निनें होरपळून गेलेला तो मुढमति सेनापति सुदेष्णेजवळ जाऊन तिला हसत हसत म्हणाला,
“येथें विराटाच्या राजवाड्यांत ही सुंदरी पूर्वी कधीच माझ्या नजरेस पडली नाही. ही तरुण स्त्री मदिरेप्रमाणे । आपल्या अंगाच्या परिमळाने व मोहकरूपानें मला फारच उन्माद आणीत आहे. ताई, हे कल्याणी, ही देवांगणेसारखी सुंदर व हृदयंगम स्त्री कोणाची कोण? व येथे कोठून आली? ते मला सांग. माझ्या मनाची अगदी चलबिचल करून ही मला आपल्या अंकित करीत आहे. यामुळे अशा वेळीं माझें मन स्थिर होण्यास हिच्या प्राप्ती वांचून येथे मला दुसरें काहीच औषध दिसत नाहीं.
ताई ! काय? ही सुंदरी तुझी परिचारिका आहे? पण मला तर हिचे स्वरूप केवळ दिव्य भासत आहे! खरोखर ही तुझी सेवा करीत आहे हे हिच्यासाठी केवळ अनुचित आहे. यापेक्षा हिनें पाहिजे तर माझ्यावर आणि जे जे माझ्या मालकीचे आहे त्या सर्वावर आपली सत्ता चालवावी; आणि जेथें पुष्कळ रथ, घोडे व हत्ती झुलताहेत, असंख्य सेवक राबत आहेत, सर्व प्रकारची अगदी परिपूर्णता आहे, नानाप्रकारचे पेय व भोज्य पदार्थ सिद्ध आहेत, आणि जे मुवर्णाच्या चित्र विचित्र अलंकारांनी भूषविले आहे, असें हे माझें भव्य व मनोहर मंदिर हिनें मुशोभित करावें !”
सुदेष्णा राणीने त्याला सैरंध्रीपासून लांब रहा, ती परस्त्री आहे. तिचे गंधर्व पती तिचे गुप्तपणे रक्षण करीत असतात. पण कामातुर किचकाचे सुदेष्णेच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते, तो सारखा द्रौपदीकडेच पाहत होता. नंतर सुदेष्णेजवळ कांहीं मसलत करून तो त्या राजकन्येजवळ गेला; आणि वनांत कोल्ह्याने सिंहकन्येचें मन वळावण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे तो तिची मनधरणी करू लागला.
तो तिला आश्वासन देऊन म्हणाला, " हे कल्याणि, तूं कोण व कोणाची आहेस, आणि त्याचप्रमाणे या विराटनगरांत कोठून आलीस हे मला खरें खरें सांग. हे शुभांगि, तुझें हें उत्कृष्ट सौंदर्य, तशीच कांति व सुकुमारपणाही केवळ अप्रतिम आहे ! याहून अधिक सौंदर्य तर राहोच, पण, हे नितंबिनी, तुझ्यासारखी रूपवती स्त्री या भूतलावर दुसरी कोणीच आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेली नाही ! तू कोण कमलनिवासिनी लक्ष्मी आहेस? की प्रत्यक्ष ऐश्वर्याची देवता आहेस? अथवा लज्जा, श्री, कीर्ति किंवा कांति यांपैकी कोणी आहेस? हे चंद्रानने, तू आहेस तरी कोण? तू मदनाच्या अंगावर लोळणारी अत्यंत सुंदर रती तर नाही ना?
पुढे तो मुढमति म्हणाला, हे सुभगे, चंद्राच्या उत्कृष्ट प्रभेप्रमाणे तू अतिशयच चमकत आहेस ! डोळ्यांच्या पापण्या किंचित् उघडल्यामुळे स्मित ज्योत्स्नेप्रमाणे आल्हादकारक, प्रसन्न, दिव्य तेज किरणांनीं परिवेष्ठित, दिव्य कांतीमुळे मनोरम आणि अनुपम शोभायमान असा हा तुझा मुखचंद्र अवलोकन करून या संपूर्ण जगांतील कोणता पुरुष कामवश होणार नाही बरे? हे तुझे दोन्ही स्तन अत्यंत सुंदर, उन्नत, शोभिवंत, पुष्ट, वर्तुळाकार व एकमेकांस अगदी लागलेले असून खरोखर हार वगैरे अलंकार धारण करण्यास योग्य आहेत; आणि, हे सुहास्यवदने, तुझे हे कमलकुंडलाकार पयोधर जणूकाही कामाच्या चाबकांसारखे मला दुःख देत आहेत.
तुझ्या भिवया कमानदार असून कटी (कंबर) अगदी बारीक म्हणजे केवळ टीचभर आहे आणि ती स्तनभारानें किंचित वांकली असून घळ्या पडल्यामुळे विशेष खुलत आहे.
हे भामिनि, नदीच्या वाळवंटाप्रमाणे प्रशस्त असा हा तुझा कटिपश्चाद्भाग (नितंब) पाहून तर असाध्य कामरोग मला ग्रासून टाकीत आहे. निर्दय मदनाग्निने वणव्याप्रमाणे पेट घेतला आहे आणि तुझ्या संगमाविषयीच्या इच्छेनें तो विशेष भडकून मला अगदी जाळून टाकीत आहे ! तेव्हा, हे प्रिये, तू आत्मप्रदानरूप वृष्टीने व संगमरूपी मेघाने हा पेटलेला मन्मथाग्नि विझवून टाक.
हे शशिवदने, माझ्या चित्ताला उन्माद आणणारे व त्वत्संगमाची आशारूपी दगडावर घासलेले मदनाचे तीक्ष्ण शरसमुदाय माझे शरीर विदारून अतिशय वेगाने माझ्या हृदयांत शिरले आहेत ! हे अतिशय प्रचंड, प्रखर दारुण असून अत्यंत उन्माद उत्पन्न करणारे आहेत आणि माझ्या अंतःरकणांत प्रीतिक्षोभ उत्पन्न करीत आहेत !
तेव्हा अशा वेळी आत्मदानाच्या योगाने व संभोगाच्या योगाने मला या दुःस्थितीतून बाहेर काढणे हेच तुला योग्य आहे ! हे विलासिनि, चित्रविचित्र फुले व वस्त्रे धारण करून व सर्व अलंकारांनी सुशोभित होऊन मजसमागमें येथे मनमुराद कामोपभोग घे. खरोखर या जगात तू दुःखी असावेस हे योग्य नाही. तू सुखालाच योग्य आहेस; परंतु सांप्रत तर तुला कसलेच सुख नाही ! तेव्हा, हे मत्तगामिनि, तू मजपासून अनुपम सौख्य प्राप्त करून घे. नाना प्रकारची स्वादिष्ट, मनोहर व अमृततुल्य पेये प्राशन करून तू मनसोक्त जगण्याचा आनंद घे ! त्याच प्रमाणे, हे महाभाग्यवंते, नानाप्रकारचे भोगोपचार व अत्युत्तम सौभाग्य यांचा तू उपभोग घे; आणि सर्वोत्कृष्ट व सुंदर भोगांबरोबरच उत्तम प्रकारचे पेय प्राशन कर.
हे रूपवति, तुझे हें अलौकिक सौंदर्य आज केवळ व्यर्थ झालेले आहे; आणि, सुंदरी, तू स्वतः अतिशय रूपवती असतांही केवळ अनाथ असल्यामुळे तितकी खुलतही नाहीस ज्याप्रमाणे एखादी स्वच्छ व उत्कृष्ट माळ वापरण्यांत नसली म्हणजे मलिन दिसते, त्याप्रमाणे तुझी स्थिति झालेली आहे ! हे चारु सुंदर हासिनि, माझ्या ज्या पूर्वीच्या बायका आहेत, त्या सर्व मी टाकून देईन. अथवा त्या तुझ्या दासीच होतील म्हणजे झाले ! शिवाय, हे सुंदरी, मीही तुझा दास होऊन सदोदीत तुझ्या आज्ञेत राहीन !"
किचकाचे व्यर्थ वायफळ बोलणे ऐकून द्रौपदी म्हणाली :- हे सूतपुत्रा ! तू मला सन्मान देत आहेस खरा, परंतु मी त्या सन्मानाला मुळीच योग्य नाही. दुसऱ्याने इच्छा धरावी अशी माझी स्थिति मुळीच नाही. मी सैरंधी अगदी हलक्या जातीची व केवळ वेणीफणी करणारी ओबडधोबड दासी आहे; आणि तशात मी विवाहित आहे. तेव्हा सांप्रत मी तुझ्यासाठी मुळीच योग्य नाही.
तुझे कल्याण असो. स्त्रिया ह्या प्राणिमात्रास प्रियच वाटतात, परंतु, तू काही धर्माधर्मविचार कर. अरे, परदारेवर, दुसऱ्याच्या स्त्रीवर तू कदापि बिलकूल वासना. ठेवू नयेस. जी अकार्ये असतील ती सोडून देणे हेच सत्पुरुष म्हणविणाऱ्यांचें व्रत होय. जो दुरात्मा व मूढ पुरुष अप्राप्य वस्तूविषयी व्यर्थ इच्छा करितो, त्याची भयंकर अपकीर्ति होते अथवा तो प्राण संकटांतही सांपडतो !
द्रौपदीचे मार्मिक बोलणे ऐकून तो काममोहित झालेला अतिनिच बुद्धीचा कीचक परदाराभिलाषांत पुष्कळ दोष आहेत, ते प्राणांचेही हरण करतात व सर्व लोक त्यांची निंदा करतात हे जाणूनही, मन स्वाधीन न राहिल्यामुळे अति नीचपणानें द्रौपदीशी असे बोलू लागला, हे दिव्यानने, हे वरानने, तुला पाहून मी कामातुर झालो आहे, तेव्हा माझा असा अव्हेर करणे तुला योग्य नाही ! हे चारुहासिनि माझे बोलणे ऐक, अगं भित्रे, मी तुझ्या अंकित होऊन अगदी आवडीची गोष्ट बोलत असताना तू माझा धिःकार करीत आहेस;
परंतु, हे सुलोचने, या गोष्टीचा तू पुढें खात्रीने पश्चाताप करशील ! हे सुभगे, मी या संपूर्ण राज्याचा स्वामी आहे. या राज्याचे अस्तित्व माझ्यावर अवलंबून आहे आणि पराक्रमामध्ये तर मी पृथ्वीत अप्रतिम आहे ! रूप, तारुण्य, सुभगता आणि उत्कृष्ट उत्कृष्ट सुंदर भोग या गोष्टीमध्ये माझी बरोबर करणारा पुरुष या पृथ्वीच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही ! हे कल्याणि, सर्व मनोरथ परिपूर्ण करणारे अनुपम भोग भोगावयाचे सोडून तुं दासीपणांत कशी बरे गुंग झाली आहेस? हे सुमुखि, मी हे राज्य तुला अर्पण केले. आतां तूं याची मालकीण आहेस. हे सुंदरी, मला पदरांत घे आणि उत्तमोत्तम विलासी वृत्तीने विषय भोग ! "
याप्रमाणे कीचक त्या साध्वीला अशुभ भाषण बोलला, तेव्हां त्याच्या त्या भाषणाचा उप हास करून तिने त्याला असे प्रत्युत्तर दिले.
ऐकोनी पापिष्टाची वाणी । द्रौपदी बोटे घाली कानीं ।
म्हणे, 'त्राही चक्र पाणी!। संकष्ट हरीं समर्था !' ॥
मग म्हणे, 'रे! मंदमती!। पंच गंधर्व माझे पती ।
तव रंक्षा करुनी हातीं। गंगोदकीं टाकितील. ॥
पंगु झेपावे शशिमंडळा । बाळक इच्छी गगनफळा ।
तेंवी पवित्राची वाळा । केंवि लाधेल तव करीं ? ॥
चालवीं सैरंध्रीचें कर्म । परि तपें शरीर जालें चर्म ।
ऐसियेचा अभिलाप अधम ।
तूं एक धरिसी भोगावया ॥
मणी देखोनी झगमगितू । व्याळविवरीं घालितां हातू । वस्तू न मिळे परि मृत्यू । तत्काळिक पाविजे ॥
सैरंध्री ह्मणाली : - सूतपुत्रा, अरे, असा बहकून जाऊ नको. आणि आजच आपल्या जिवास मुकू नको. पाच घोर पुरुष माझे नित्य रक्षण करीत आहेस, समजलास ! मी तुला कधीही प्राप्त होणार नाही ! कारण माझे पति गंधर्व आहेत, ते रागावले तर तुला तेव्हाच ठार करतील. यासाठी, बाबा, हा मूर्खपणाचा नाद पुरे कर. उगाच को नाश पाठवतोस? अरे, ज्याप्रमाणे चलनवलन करण्यासही असमर्थ असा एखादा मूर्ख मुलगा नदीच्या एका तीरावर बसला असता पलीकडच्या तीरावर पोहून जाण्याचे मनांत आणतो, तुही त्याप्रमाणे करण्यासाठी सरसावला आहे, अग्निशी खेळत आहेस.
आणि पुरुषमात्रास केवळ अगम्य अशा मार्गाने जाण्याचे मनात आणीत आहेस ! अरे, माझा अपराध करून तू पृथ्वीच्या पोटात दडून बसलास, अथवा आकाशांत उडून गेलास, किंवा समुद्राच्या पार पळालास, तथापि त्यांच्या हातून काही सुटणार नाहीस. कारण, गंधर्व मोठे बलाढ्य व आकाशांतून संचार करणारे आहेत ! कीचका, एखादा मरणोन्मुख मनुष्य कालरात्रीची मार्गप्रतीक्षा करितो त्याप्रमाणे आज तू माझी इतकी प्रार्थना का करीत आहेस बरे? अरे, मातेच्या अंकावर पडलेला शिशु चंद्र घेण्याची इच्छा करतो त्याप्रमाणे तू माझी इच्छा आहेस. परंतु तो चंद्र त्या मुलास मिळणे जितके अशक्य आहे, तितकेच तुला मी मिळणे अशक्य आहे !
अरे, माझे पाच गंधर्व पती, त्यांच्या प्रियेचा व अभिलाष करणाऱ्या तुला या पृथ्वीवरच काय, पण स्वर्गात जाऊनही थारा मिळावयाचा नाही, हे कीचका, म्हणून स्वतःची दृष्टी चांगली ठेव, जेणेकरून तुझे प्राण हरण होणार नाही, अशा प्रकारची चांगली दृष्टिच तुझ्या ठिकाणीं नाहीं !”
क्रमशः
पुढची कथा पुढिल सातव्या भागात
भाग 007 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग एक 001👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html
भाग पाच 005
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html