देवता आणि
परमेश्वर भिन्न -
भगवान श्रीकृष्ण हे लीला
पूरूषोत्तम आहेत. श्रीकृष्ण हे पुर्णावतार असल्यामुळे अमर्याद अलौकीक व सर्व
आकर्षक असे ऐश्वर्यवान अवतार आहेत. म्हणून ते भगवंत आहेत. भगवान आहेत. भग म्हणजे
ऐश्वर्य. असे हे सहा प्रकारचे ऐश्वर्य आहे. १) संपत्ती, २) शक्ती,
३) यश, ४) सौदर्य, ५)
ज्ञान आणि ६) त्याग. 'हे षड् ऐश्वर्य ज्यांच्या ठिकाणी
अमर्याद स्वरूपात आहे, असे सच्चिदानंदघन परमेश्वर स्वरूपातून
अवतीर्ण झालेले अवतार हेच भगवान आहेत असे भगवंताचे लक्षण पराशर मुनीद्वारा वर्णीत
केल्या गेले आहे. ब्रह्मसंहिते मध्ये सांगीतले आहे की सच्चिदानंदघन विग्रह (अवतार)
श्रीकृष्णच परमेश्वर आहेत. सर्व वस्तुंचे मुळ कारण आणि सर्व कारणांचे कारण तेच
आहेत. (ब्रह्मसंहीता ५१ )
‘‘
एकं शास्त्र देवकी पूत्र गीतम् । एको देवो देवकीपुत्र एव । एको मंत्रस्तस्य नामानियानी । कर्माप्यकं तस्य देवस्य सेवा ।।’’ या श्रीगीता महात्म्याच्या श्लोकात व्यास महर्षीनी स्पष्टपणे सांगीतले आहे की या जगात एकच शास्त्र आहे. ते म्हणजे देवकीपुत्र भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेली गीता. एकच देव आहे. तो म्हणजे देवकीपुत्र भगवान श्रीकृष्ण. मंत्र सुद्धा एकच आहे. तो म्हणजे त्या श्रीकृष्णाचे नाम आणि कर्मसुद्धा एकच आहे. ते म्हणजे त्या श्रीकृष्ण देवाची सेवा.चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराण या सर्वांचा सांगोपान विचार करून व्यास महर्षीनी या श्लोकात महत्वाचा सार सांगीतला. स्वतः भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेत स्वतःची ओळख देतात. त्याद्वारा ही श्रीकृष्ण भगवान पूर्ण परब्रह्म परमेश्वर आहे हे कळून येते. '
तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात् । अहं आदि देवानाम् महर्षिनांच सर्वशः। अहम् ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच।' कालोऽस्मि लोक.इत्यादी महत्त्वाच्या अनेक निवेदना वरून भगवान श्रीकृष्ण हे पुर्ण परब्रह्म परमेश्वर उभयदृश्या अवतार आहेत या बद्दल संशय रहात नाही. त्याचप्रमाणे परमेश्वर अवतार भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सुद्धा पूर्णपरब्रह्म परमेश्वराचे अवतार सांगत असतांना म्हाईंभटांना सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाचे नाव सांगीतले आहे. 'परमेश्वरे परमेश्वर जानीजे' या सिद्धांतानुसार परमेश्वर अवताराने स्वतः बद्दलचे ज्ञान श्रीमद्भगत्गीतेत दिलेले दिसून येते. तसेच स्वामी श्रीचक्रधर प्रभूंनी आपल्या निरूपणातून दिलेले दिसून येते. त्यानूसार महानुभाव संप्रदाया मध्ये भगवान श्रीकृष्ण हे पूर्णपरब्रह्म परमेश्वर अवतार म्हणून त्यांची उपासना केल्या जाते. वरील सर्व सिद्धातांचा विचार केला तर तेच यथार्थ ज्ञान आहे हे आकलनात येते.
भगवान श्रीकृष्ण हे
जगत्वंद्य परमेश्वर अवतार आहेत. अनेक लोक भगवान श्रीकृष्णाची अत्यंत श्रद्धा
भक्तीभावाने उपासना करतात. पण परमेश्वर कोण ? आणि देवता कोण ? हे यथार्थ ज्ञान त्यांना नसल्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे विष्णुचे अवतार
आहेत असेही काही लोक मानतात आणि त्याप्रमाणे भक्ती करतात. काही लोक इतर कुठल्या
तरी प्रतिमेलाच श्रीकृष्ण रूप समजून तेथेच आपली श्रद्धा अर्पण करतात. परंतु
त्यांची ती भक्ती अविधीपुर्वक आहे असे भगवंत सांगतात. तसेच देवता शक्ती या
परमेश्वराच्या अनंत शक्तीपैकी चेतना शक्ती आहेत. दहाव्या अध्यायामधे भगवान
श्रीकृष्णांनी आपल्या अनेक शक्तींच अर्थात विभूतींच वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये 'आदित्यानाम् अहं विष्णू :' म्हणजे विष्णू ही अनेक विभूतीतील माझी
एक विभूती आहे असे स्पष्ट केले आहे. विष्णू ही एक विभूती असतांना त्या विभूतीचे
अवतार श्रीकृष्ण कसे ठरतील? विभूती म्हणजे एक शक्ती, अशा अनंत शक्तीने युक्त परमेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत.
म्हणून श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत असे म्हणणे चुकीचे आहे हे असे लक्षात येते. श्रीमद्भगत्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी देवता शक्तीं सबंधी अनेक ठिकाणी निरूपण केले आहे. त्याचप्रमाणे देवतांचे फळ आणि परमेश्वराचे परमधाम हे वेगवेगळे असल्या बद्दलचेही उल्लेख आलेले आहेत. तसेच देवतांचे फळ हे, पुनरावर्तीशील, नाशवान आहे. व परमेश्वराचे परमधाम हे शाश्वत आहे. ते पुनरावर्तीशील नाही. ते नित्यमुक्ती देणारे आहे.
आब्रह्म भूवनाल्लोका पुनरावर्तिनोर्जुन । मामुप्येत्येतुकौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ' ।।श्री गीता।।अर्थात आब्रह्म म्हणजे ॐ, ब्रह्म, चैतन्य माया येथ पर्यंत जी काही ८१ कोटी सव्वा लक्ष दहा देवतांची फळे आहेत तेथून पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात जीवात्म्याला यावेच लागते. पुण्य आहे तो पर्यंत त्या देवतांच्या फळी जीवात्मा सुख भोगतो. पुण्य संपताच त्या देवता फळातून जीवात्म्याला काढून टाकल्या जाते व त्याच्या कर्मानुसार दुसऱ्या कुठल्या तरी योनीत त्यास जन्माला घातल्या जाते. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू अशा जन्म मृत्यूच्या चक्रात जीवात्म्याचे अखंड परिभ्रमण सुरूच राहाते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात 'हे अर्जुना जो मला प्राप्त होतो तो कधीच पतन होत नाही.' हाच खरा जीवाचा आत्यंतीक मोक्ष आहे. असा मोक्ष देवता देऊ शकत नाहीत. परमेश्वरच मोक्ष देऊ शकतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास खात्री पुर्वक आणि आग्रह पूर्वक उपदेश करतात. की,
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिश्यामि मा शुचः । “सर्वधर्मांचा त्यागकरून मला एकाला शरण ये. मी तुला सर्व पापापासुन मुक्त करीन शोक करू नकोस." या भगवंताच्या वचनात किती स्पष्टता आहे हे पहिले म्हणजे श्रीकृष्ण हे भगवान आहेत, पूर्ण परब्रह्म परमेश्वर आहेत हे प्रत्ययास येते. देवतांचे फळ नाशवान आहे हे इतर संतानी सुद्धा सांगितलेले आहे. संत रामदास, दासबोध दशक ४/ समास १० मध्ये सांगतात.
वैकुंठनाम विष्णु शृंगाचे । सत्यलोकनाम ब्रह्म शृंगाचे । अमरावती इंद्राचे । स्थळ खालते ।। १३ ।। सुकृत आहे तो भोगिती। सुकृत सरतांच ढकलून देती । आपण देव ते असती। जैसे तैसे ।। २६ ।। ब्रह्मांड नासेल कल्पांती। पर्वतासहित जळेल क्षिती । तेव्हा अवघेच देव जाती। मां मुक्ती केंच्या तेथ ।।२८।।
यावरूनही विष्णु
ब्रह्मादिदेवतांचे स्थान नाशिवंत असल्याचे समजून येते. संत तुकारामांनीही म्हटले
आहे. ‘मागो जरी पद वैकुंठ ते तव एकदेशी करंटे’ (तु.गा.जोग प्रत
२५२१) पण भगवान श्रीकृष्ण मात्र सांगतात की, ‘‘यद्गत्वा
न निवर्तने तद्धामपरमं मम ।।’’ जेथे गेल्यानंतर
पुन्हा वापस यावे लागत नाही ते माझे परमधाम आहे. त्या माझ्या धामाला चंद्रसूर्य
अग्नि सुद्धा प्रकाशित करू शकत नाही. 'नतद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः।' असे
परमेश्वराचे आनंदधन कैवल्य धाम परमेश्वराच्याच कृपेने जीवास प्राप्त होते. म्हणून
भगवंत अर्जुनास भक्त बनण्याची आज्ञा करतात. परमेश्वर आपल्या भक्तांवर कृपा करतो
आणि सर्वतोपरी साहय करून त्याचे साधन चरित करतो व शेवटी परमधामाला मोक्षाला नेतो.
देवता फळातून पतन आहे. वैकुंठस्थानाहून जय विजय यांना पतन झाले व ते दैत्य योनीत अवतरले असे पुराणकारांनी सांगितले आहे. तसेच मूळस्तंभाच्या ६ व्या अध्यायात ‘‘वैकुंठी सरली पुण्याची सामुग्री । मग टाकीती मृत्यू लोकां भीतरी । मागुता जन्म मरणाची येरझारी । न चुके संसारी पाप पुण्ये ।।३२।।’’
अशा अनेक उदाहरणांवरून
परमेश्वर भीन्न,
देवता भीन्न असून श्रीकृष्ण भगवंत हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर तर
विष्णू ही देवता आहे हे लक्षात येते. श्रीकृष्ण मोक्ष देतात नित्य मुक्त करतात. तर
विष्णु आदी देवता शक्तींच्या फळातून पतन आहे. हा बोध सहज होतो आणि श्रीकृष्ण व
विष्णू ही भिन्न आहे हे कळते.
असे हे असीम अमर्याद लीला
पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्ण, जीवोद्धारार्थ, मानव
मात्रांना उपदेश करण्यासाठी, द्वापर युगात, शेवटचे चरणी, वसुदेव देवकीच्या उदरी अवर्तीर्ण झाले.
निराकार निर्गुण परमेश्वर, सावयव साकार झाले. जन्मताच आई
वडीलांचे दुःख दूर केले. गोकुळात येऊन अनेक लीळा क्रिडा केल्या. नंदयशोदा गोप
गोपीका व गोपाळांना आनंदीत केले. पुतना, तृणावर्त, वत्सासूर बकासूर, अघासूर, धेनुकासूर,
प्रलम्बासूरादि दैत्यांचा नाश केला. महाबळभटाची फटफजीती केली.
ब्रह्मदेव, इंद्राचा गर्वहरण केला. गोवर्धन करांगुळीवर उचलून
सात अहोरात्र गाईवासरे गोप गोपींचे रक्षण केले. कालीयामर्दन करून त्याच्या फणांवर
नृत्यकरीत पाण्यावर आले आणि गोकुळातील जनांना आनंदीत केले रासक्रिडा करून व
वेणुच्या नादाने सर्वांना मोहीत करून वेध लावला.
गोकुळात अनेक लीळा
क्रीडाकरून शेवटी कंसवध करून वसुदेव देवकी उग्रसेन यांना बंदीवासातून मुक्त केले
प्रजाननास आनंद झाला. उग्रसेनास राज्य देऊन संदिपाणी ब्राह्मणाकडे उज्जैन येथे
विद्याभ्यासार्थ प्रयाण केले. तेथे गुरूदक्षिणा म्हणून गुरूच्या मृतपुत्रास पुनः
यम सदनातून वापस आणून दिले. उद्धवास प्रेमदान देऊन गोपिकांच्या सात्वना साठी
गोकुळात पाठविले व विरह व्यथीत गोपीकांना शांत केले. मथुरेवर स्वारी करून आलेल्या
जरासंघास सतरावेळ पराजित केले. अठराव्यावेळी कालयवनाचा नाश करण्यासाठी रणांगणातून
पळून जाऊन मुचकुंदाच्या गुहेत गेले तेथे कालयवन मुचकुंदाकडून भस्म केला व
मुचकुंदास मोक्ष दिला.
मथुरेच्या राज्याचा त्याग
करून स्वतः द्वारकानगरीची रचना विश्वकर्म्याकरवी करवून घेतली आणि वडील बंधु बलराम
वसुदेव देवकी यादवांसह द्वारकेत राज्य केले. प्रेमीभक्त रूक्मिणीची हाक ऐकून
कौडण्यपुरी धाऊन गेले. तेथून रूक्मिणीचे हरण करून अनेक राजांना पराजित केले.
सोळाहजार शंभर स्त्रियांना भौमासूराच्या बंदीवसातून मुक्त करून त्या निराश्रित
अबला त्यांचे बरोबर विवाह केला व त्यांना आश्रय दिला. सोळा हजार एकशे आठ राण्यांसह
सर्वांना सुखी केले सर्वांमध्ये राहून स्वतः मात्र अलीप्तच राहिले याचा प्रत्यय दुर्वास
महर्षिच्या निराहारीत्वावरून सर्व राण्यांना आणून दिला पद्मपत्राप्रमाणे भगवान
श्रीकृष्ण सर्वात असून अलीप्त होते. महाभारताचे युद्धात अर्जुनास दिव्य उपदेश देऊन
मोहमुक्त केले. तो दिव्य उपदेश म्हणजे 'श्रीमद्भगवद्गीता' आहे. ५००० वर्षापासून हा भगवंताचा दिव्य उपदेश मानव मात्रास मार्गदर्शन
करीत आहे.
भगवान श्रीकृष्णांनी केवळ
तत्वज्ञानच सांगितले नाही तर भक्ताचे पदोपदी रक्षणही केले. पांडवांचे
लाक्षागृहातून कुशलता पुर्वक रक्षण करणे, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी नानापरीचे
वस्त्र पुरवून लज्जा रक्षण करून भक्त कैवारी हे ब्रिद सत्य करणे, मध्यरात्री दुर्वासमुनी भोजन मागण्यास अट्ठयांसी सहस्रऋषीसह आले असता
द्रौपदीने धावा करताच धाऊन येणे आणि द्रौपदीच्या हातचे भाजीचे पान स्विकारून
अट्ठाशी सहस्रऋषींना आपल्या विज्ञान शक्तीने भोजन देणे, 'न धरी शस्त्र करी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' अशी प्रतिज्ञा केली असताही अर्जुनासाठी
प्रतिज्ञा मोडणे व हाती चक्र धारण करणे, जयद्रथ वधाचे वेळी
सुदर्शन चक्र सूर्या आड करून 'हा सूर्य हा जयद्रथ' दाखवून अर्जुनाला वाचविणे इत्यादि लीळांमधून महाभारताचे युद्धात पदोपदी
पांडवांना युक्ती प्रयुक्तीने सहाय्य करून युद्धात विजय मिळवून देणे, दुष्टांचे निर्दाळन व सज्जनांचे रक्षण करून धर्माची संस्थापना करणे हा तर
भगवान श्रीकृष्ण अवताराचा महत्वपुर्ण उद्देशच होता. हे दिसून येते.
दुर्योधनाच्या पंचपक्वानाचा अव्हेर करून विदूराच्या घरी अपार प्रीतीने कण्या स्विकार करणारा भक्त वत्सल भगवान श्रीकृष्ण, सुदामाचे पोहे स्विकार करून सुवर्ण नगरी प्रदान करणारे जगातील एकमेव औदार्यवान् अवतार दिसून येतात त्यांच्या ठायी असलेले शड्ऐश्वर्य हे असीम अमर्याद स्वरूपात दिसून येते. संपत्तीचे अलौकीकत्व त्यांच्या ठायी पाहीले तर त्यांची द्वारकानगरीच सुवर्णाची रत्नजडीत होती. शक्ती सबंधी विचार केला तर अलौकीक व अनंत शक्तींच कार्य त्यांच्या अवतार कार्यात दिसून येते. तिसरे ऐश्वर्य म्हणजे यश या यशाची धवल पताका आजही सर्वत्र फडकत आहे. 'श्रीकृष्णं वंदे जगद्गुरूम्' असे विचारवंतांनी तत्वचिंतनकांनी भगवान श्रीकृष्णाचे महत्व जानले आहे. सौंदर्य तर अपूर्व असे स्विकारले होते. बत्तीस लक्षणी मनोवेधक मोहक अशी भगवान श्रीकृष्णांची श्रीमुर्ती होती.
ज्ञान हे ऐश्वर्य सुद्धा असीम व
अमर्याद होते. त्यांनी सांगितलेली श्रीमद्भगद्गीता म्हणजे ज्ञानाचा महान असा सागरच
आहे त्यांच्या अवतार कार्यातून त्यांच्या ठायी असलेल्या सर्वज्ञतेचा जागजागी
प्रत्यय येतो. आणि त्याग हे ऐश्वर्य तर भगवान श्रीकृष्णांच्या लीळाचरित्रात
सर्वत्र दिसून येते. मथुरेच राज्य कंस वधानंतर उग्रसेनाला प्रदान करणे. द्वारका
नगरी रचून स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे कुठल्याही मोहात आसक्तीत गुंतून
न राहाता त्यागमय जीवनाचा एक आदर्शच श्रीकृष्ण चरीत्रातून दिसून येतो. जेवढया
सहजतेने त्यांनी द्वारकानगरी निर्माण केली तेवढयाच सहजतेने द्वारकानगरी समुद्रात
बुडविली हा त्यागाचा परमोच्च आदर्शच होय. अशाप्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या अवताराच
ध्यान चिंतन त्यांनी दिलेल्या उपदेशाच मनन चिंतन आजही आत्मोद्धारासाठी तथा
समाजोद्धारासाठी करणे आवश्यक आहे. त्या श्रीकृष्ण भक्तीने आजही भक्तांना
परमेश्वराचे सहाय्य प्राप्त होते. आणि मोक्षमार्गाची वाटचाल सुकर होते.