संस्कृत सुभाषित सरिता
Subhashit sarita
लोकोक्ती - एकोऽपि गुणवान् पुत्रो निर्गुणैश्च शतैर्वरः।
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्हीलोकी झेंडा
एकोऽपि गुणवान्पुत्रो निर्गुणैश्च शतैर्वरः।
एकश्चन्द्रस्तमो हन्ति न च ताराः सहस्रशः॥ ~ चाणक्यनीती.
अर्थ :- ज्याप्रकारे रात्री आकाशात हजारो तारका, नक्षत्रे असूनही अंधार दूर करू शकत नाहीत पण फक्त एकटा चंद्रच रात्रीचा अंधार दूर करतो, त्याच प्रकारे एकच गुणी पुत्र आपल्या घराण्याचं नाव उज्वल करू शकतो. शेकडो पुत्र असूनही ते काही कामाचे नसतील तर काय उपयोग?
टीप - हाच श्लोक पाठभेदासह सुभाषितरत्नाकरामध्येही समाविष्ट आहे. तो असा,
एकोऽपि गुणवान्पुत्रो निर्गुणैः किं शतैरपि।
एकश्चन्द्रो जगच्चक्षुर्नक्षत्रैः किं प्रयोजनम्॥
गुणहीन शंभर पुत्र असण्यापेक्षा एकच गुणवान पुत्र असावा. रात्रीच्या आकाशातला एकटा चंर्र जगाच्या डोळ्यांना प्रकाश देत असेल तर फक्त आकाशाला शोभा आणणार्या इतर तारका नक्षत्रांचं प्रयोजनच काय? त्या थोड्याच उजेड पाडतात! पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीन्ही लोकी झेंडा अशी मराठीमध्येही याच अर्थाने एक म्हण प्रचलित आहे. हिंदी कवी वृंद आपल्या एका दोह्यातून हेच सांगतो.
एकहिं भले सुपुत्र तें, सब कुल भलो कहात।
सरस सुबासित बिरछ तें, ज्यों बन सकल बसात।
एक सुपुत्र असेल तर संपूर्ण कुळाचं नाव होतं अहो केवळ एक सरस सुगंध असलेला वृक्ष असेल तर संपूर्ण वन सुगंधात दरवळतं. वरील सुभाषितं आणि दोहा वगैरे कालसापेक्षत्वानुसार जेव्हा पुत्र असण्याला महत्व होतं त्या काळात रचलं गेलेलं आहे. आजच्या मुलगा-मुलगी समानतेच्या काळात एकच मुलगा असला काय अथवा एकच मुलगी असली काय? दोन्ही सारखचं. कारण वर्तमान काळात मुलगा किंवा मुलगी दोहोंपैकी कोणीही घराण्याचं नाव विविध क्षेत्रात उज्वल करत आहेत. याची उदाहरणंही आपणास सर्वत्र दिसून येतात.
म्हणूनच मराठीतील म्हण अजून पुढे जाऊन असे म्हणते,
पुत्र व्हावा ऐसा गुंडा। त्याचा तिन्ही लोकी झेंडा।
कन्या ऐसी व्हावी। जैसी मिरा मुक्ताबाई॥
-----------
सुभाषित सरिता
धैर्यं यस्य पिता क्षमा च जननी शान्तिश्चिरं गेहिनी!
सत्यं सूनुरयं दया च भगिनी भ्राता मन:संयम:!
शय्या भूमितलं दिशोsपि वसनं ज्ञानामृतं भोजनम्!
एते यस्य कुटुम्बिनो वद सखे कस्मा्द्भयं योगिन:!!
यस्य ( ज्याचा )
पिता (वडिल) धैर्य आहे,
क्षमा ही जननी (आई),
चिरं ( अनेक काळची)
शांती ही गेहिनी ( पत्नी),
सत्य हा सूनु: ( मुलगा, son),
दया ही भगिनी ( बहिण),
मन:संयम ( मनावरचा संयम)
हा भ्राता ( भाऊ) आहे;
भूमितल हीच शय्या ( बिछाना),
दिश: अपि (दिशा हे)
वसनम् ( वस्त्र),
ज्ञानामृतं ( ज्ञानरूपी अमृत )
हे भोजन .
एते ( हे)
ज्याचे कुटुम्बिन: ( कुटुम्बीय) आहेत अशा योग्याना
कस्मात् ( कशापासून)
भयं ( भीती असेल)
सखे(मित्रा)
वद(सांग बरं)?
योग्यामधील मानसिक गुण हेच त्याचे कुटुंबीय आहेत अशी कल्पना केली आहे. कुटुंबीय जसे सतत आजूबाजूला वावरत असतात तसेच हे गुण योग्याच्या जवळ असतात. अत्यल्प गरजा आणि हे मानसिक गुण जर असतील तर कशापासून ही भीती रहात नाही.