आश्रमाकडून आतिथ्य घेणे कितपत योग्य?
Mahanubhav aachar dharam
आठ दिवसांपूर्वीच आम्ही मित्रांसह एका आश्रमाच्या भेटीला गेलो. आश्रमाची भेट होईल, साधुसंताचे दर्शन होईल, देवपूजा वंदन होईल हा उदात्त हेतू आम्हा सर्वांचा होता.
गेल्यानंतर तिथल्या मुख्य बाबांना भेटलो. नारळ वगैरे भेट केली. बाबा म्हणाले, “जेवण करून जा”
“हो बाबा” म्हणून आम्ही बाहेर आलो.
देवपूजा वगैरे केली दंडवत घातले. आरतीची तयारी सुरू होती. मार्गातील मुलं पूजावसर म्हणत होते. आम्ही तिथे टाकलेल्या चटईवर बसलो. आपल्याला गाठ्या काढून स्मरण करू लागलो. ज्यांची त्यादिवशी तिथे पंगत होती ते यजमान आपल्या नातेवाईकांसह तिथे आलेले होते. आणि आणखीही भरपूर गृहस्थ मंडळी मार्गाच्या भेटीला आली होती.
काही भाविक यजमान स्त्रियांनी आपल्या घरून भाजी, चपाती, भात, वरण इत्यादी भिक्षा आणली होती. साधुसंत येऊन त्यांच्याजवळून भिक्षा घेऊन जात होते. आणि देवाला दृष्टीपूत करत होते. मला त्या यजमान भगिनींचे कौतुक वाटले. त्यांच्याबद्दल खुप आदरही वाटला आणि आपल्याला असे काहीच स्फुरले नाही या स्वतःच्या मालिन्याबद्दल खेदही वाटला.
तेवढ्यात एक दादा आमच्याजवळ आले व म्हणाले, “भाऊ जरा व्यापार आहे, येता का?”
“मी व माझे सेवाभावी मित्र लगेच तत्परतेने उठले.”
किराणा, भाजी, इत्यादी बाजाराची गाडी खाली करण्याचा व्यापार होता. आम्ही सर्वांनी गाडी खाली केली. भाजी पोहचविण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो. तिथे बऱ्याच तपस्विनी आई स्वयंपाक करत होत्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, वरून पत्रेवजा शेड चांगलेच तापत होते, चुलीतल्या अग्निचा शेक त्यामुळे त्या आयांना होणारा त्रास, त्यात नुकताच पाऊस पडलेला असल्याने लाकडं ओली झालेली. म्हणून धूर खुप होत होता. त्यांचे डोळेही धुराने भरलेले होते. हे सर्व पाहून मला खुप वाईट वाटले.
मनात विचार आला की या आया मार्गासाठी जसं अन्न निष्पन्न करत आहेत. तसेच बाहेरून आलेल्या आपल्यासारख्याच शेकडो गृहस्थांसाठीही अन्न निष्पन्न करत आहेत. रोजच करतात. साधुसंत तर देवाची ध्यानधारणा करतात म्हणून मार्गाची सेवा या आईंची पुर्ण लेखी लागेल यात काही शंका नाही, पण आपण जेवण करून निघून जाऊ, आणि आपल्यामुळे या आईंना एवढा त्रास झाला, यामुळे आपल्याला काय निष्पन्न होईल? असा विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला?
आपण तर मार्गाची सेवा करायला पाहिजे आणि आपण भेटीला येऊन मार्गाचीच सेवा घेत आहोत. मी माझ्या मित्रांजवळ हे बोलून दाखवले. मित्र म्हणाले, “हो रे या पण आता काय करणार! मुख्य बाबांनी म्हटले आहे, जेवण करून जा, म्हणून प्रसाद म्हणून आपण काहीतरी जेवण करूनच जाऊ”
“ अरे पण तुम्ही पाहिले नाही का स्वयंपाक घरात त्या आयांना कसले श्रम होत होते आणि ते अन्न आपण कसं खायचं? आपण हे पाप कुठं फेडणार?”
मित्रांनाही माझी गोष्ट पटली. आणि आम्ही सर्वांनी विचार केला की, मार्गाचा प्रसाद 'ती बोटा सामाये' इतका घेऊ आणि जाताना एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करू. थोड्या वेळाने आरती सुरू झाली. आरती पुन्हा देव पूजा करून आम्ही मार्गातल्या साधुसंतांना दंडवत प्रणाम करून निघालो. तेव्हा ज्या बाबांनी आम्हाला सेवेसाठी बोलावले होते ते म्हणाले “भाऊ कुठे निघाले जेवण करून जा”
मी म्हणालो, “नाही बाबा आम्ही थोडासा प्रसाद घेऊ आणि निघतो आम्ही”
“ अरे जेवणाची वेळ आहे आणि अशा वेळेला तुम्ही न जेवता कसे जात आहात? असे जाऊ नये, जेवण करून जा”
शेवटी मी बाबांच्या जवळ जाऊन म्हणालो, “बाबा माफ करा आम्ही जेवण करण्याच्या दृष्टीनेच आलो होतो, पण स्वयंपाक घरात त्या तपस्विनी आईंचे कष्ट श्रम पाहून असे वाटते की, ते अन्न आम्हाला कधीच पचणार नाही, ते आमच्यासाठी लोखंडाच्या चण्यांसारखे आहे, म्हणून आम्ही फक्त थोडासा प्रसाद घेऊन निघून जाण्याचे ठरविले.”
ते बाबा म्हणाले, “ भाऊ तुमचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे यात काही शंका नाही की तपस्विनी आईंच्या हातून अन्न निष्पन्न करून घेणे आणि ते अन्न गृहस्थ धर्मीयाने खाणे हा दोष आहे, पण यालाही उपाय आहेच. मार्गात आल्यावर काहीतरी मार्गाची सेवा करणे किंवा येताना मार्गासाठी काहीतरी भिक्षा वगैरे घेऊन येणे हे प्रत्येक गृहस्थाचे कर्तव्य असायला पाहिजे त्यामुळे मार्गाचे अन्न आपण प्रसाद म्हणून जेवढे तर फारसा दोष लागत नाही. आणि तुम्ही सेवा केलेलीच आहे तर तुम्ही जेवण करू शकता काही हरकत नाही, म्हणून जेवण करूनच जा, मी म्हणतो म्हणून करा”
बाबांचा आग्रहाखातर आम्ही अनिच्छेनेच थांबलो. जेवण केले पण ते मार्गाचे पवित्र अन्न अमृतासमान चवी असलेले अन्न आम्हाला गोड लागले नाही. प्रत्येक घास घेताना ते स्वयंपाक घरचा आम्हाला आठवत होते. शेवटी निघताना मुख्य बाबांना दंडवत करून मनातच त्यांची क्षमा मागून आम्ही निघालो.
पंथीय वासनिक बंधू-भगिनींनो! आपल्या हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत. विविध संप्रदाय आहेत. त्या सर्वांमध्ये आपला महानुभाव पंथ सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो ज्ञानमार्ग आहे. आपला आचार-विचार ज्ञानाधिष्ठित आहे. इतर पंथांमध्ये आचार हा विषयच नाही आणि विचाराचा पत्ताच नाही. आपल्याकडे साधनवंतांची एक विशिष्ट आचारसंहिता आहे. तिलाच आपण असतिपरी म्हणतो.
वासनिकाची असतिपरी वेगळी. संन्याशाची वेगळी. त्या असतिपरीतील काही नियम ते वासनिक असो की संन्यासी असो, सर्वांसाठी सारखेच आहेत. इतर पंथियांच्या तुलनेत आपल्या महानुभाव पंथीय अनुयायांची संख्या अत्यल्प आहे. तोकडी आहे. परंतु तरीही आपल्याला आपल्या पंथाचा सार्थ अभिमान आहे कारण आपले आचरण सर्वांपेक्षा उजवे आहे.
अशा या आपल्या गौरवशाली महानुभाव पंथात जेव्हा वरील घटनेमध्ये मांडलेल्या काही धर्मबाह्य गोष्टी पाहायला मिळतात तेव्हा खंत वाटते.
असेच एका छोट्याशा मार्गातल्या बाबांशी बोलताना अशीच गोष्ट कळली. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याखाली आच्छादलेले छिन्नस्थळीचे स्थान सध्याच्या काळात उघडे पडले आहे. स्थानवंदनासाठी गाड्या भरभरून लोक येत आहेत. दुरून येणार्या त्या गाडीतील उपदेशी मंडळींना डोमेग्रामची सर्व स्थाने नमस करून त्याच दिवशी परतायचे नसेल तर एखाद्या आश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. मग सर्वांची व्यवस्था डोमेग्रामातच होईल असे नाही. मग डोमेग्राम परिसरातील एखाद्या आश्रमात आपला मुक्काम ठोकावा लागतो.
तिथे गाडी पोहचली की त्या गाडीतील गृहस्थांना जणू काही आपण एखाद्या हॉटेलमध्ये आलो आहोत, असे वाटते. अर्थात हॉटेलातले वर्तन वेगळे. इथले वर्तन वेगळे. एवढी हुशारी तर सर्वांनाच येत असते. आश्रमात आश्रमाच्या नियमानुसार वागायचे, हे तर सगळ्यांना कळते. त्यानुसार देवपूजा वगैरे करून आपण किती भाविक आहोत, सश्रद्ध आहोत. त्याचे प्रदर्शन मांडून झाल्यावर मग संध्याकाळी आपण भोजनाला बसतो. त्यानंतर निद्रेची व्यवस्था असतेच. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा वगैरे करून काही लोक निघतात. माझ्यासारखेच काही लोक दुपारच्या भोजनावर ताव मारून निघतात. पण या आपल्या वागण्यात काही चुकते आहे का हे पहायला कोणाला फुरसत नसते.
दुपारच्या भोजनावर आपण ताव मारून निघतो. पण या आपल्या वागण्यात काही चुकते आहे का हे पहायला कोणाला फुरसत नसते. इथे या आश्रमात आपली एक गाडी आली. पण त्यापूर्वी रोजच हा कार्यक्रम चालू असेल तर तिथल्या तपस्विनींवर कामाचा किती ताण येत असेल, याचा आपण विचार करतो का?
डोमेग्राम हे फक्त उदाहरणार्थ सांगितले आपली असे अनेक महास्थाने आहेत आणि त्या महास्थानांच्या गावी आपल्या महानुभाव पंथाचे अनेक लहान मोठे आश्रम आहेत. त्या सर्वांनाच आपला नकळत किती त्रास होतो याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. साधुसंत कधीही त्रास बोलून दाखवत नाहीत. ते उलट आनंदानेच आपले स्वागत करीत असतात, आग्रहाने जेवू घालीत असतात पण आपले इष्ट अनिष्ट आपल्याला कळायला नको का?
देवधर्मासाठी ज्या तपस्विनी आयांनी घरादाराचा त्याग केला. सारी सांसारिक सुखे सोडून आश्रमात आल्या. त्यांच्या हातून सेवा घेताना आपण वरवडे दिलगिरी व्यक्त करतो. पण आपल्याला या वागण्याचे मनापासून दुःख असते तर आपण असे वागलोच का असतो?
जर एखाद्या ठिकाणी एखाद दुसरा मुक्काम होणार असेल तर आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करून निघणे कधीही चांगले.
प्रवासात असणाऱ्या आपल्या सर्वांना एकदोन दिवस पुरेल एवढी शिदोरी घेऊन निघालो तर मुक्कामाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी असलेले आश्रम तुमचे सहर्ष स्वागतच करतील. एरवीही सर्व आश्रम तुमचे हसतमुखाने स्वागत करतातच. पण कधी तरी त्यांच्या व्यथा जाणून घ्या.
स्थानांजवळ असणाऱ्या सर्वच आश्रमांची हीच कैफियत आहे. तिथे असणाऱ्या तपस्विनींना "रांधा, वाढा, उष्टी काढा. या व्यतिरिक्त इतरही काही कर्तव्ये आहेत, याचे आपल्याला भान असावे.
हा विषय मी एका धर्मबंधू कडे मांडला तेव्हा तो म्हणाला, "आमचं काय! आम्ही वर्षातून एकदाच जातो. कधी कधी तर दोन वर्षातून एकदा योग येतो. रोज रोज थोडीच तिथे जातो. आणि गेलो तरी एक वेळ पंगत करतोच. पंगतीला नंबर लागत नसेल तर तिथल्या बुवांच्या हाती पंगतीचे पैसे तरी देतो."
अशाच प्रकारच्या सबबी थोड्याफार फरकाने आपल्या प्रत्येकाकडे तयार आहेत. पण एवढी विषयव्यवस्था करून स्वतःची प्रतारणा करण्यापेक्षा स्वतःची शिदोरी घेऊन जा. मग त्या आश्रमात मुक्काम करा. निघताना काही अन्नदानासाठी, वस्त्र दानासाठी पैसे द्या. तर मानू की आपण खरंच या ज्ञानमार्गाचे उपदेशी आहोत. नाही तर हॉटेलमधल्या सुविधांसारख्या इथल्या सुविधा उपदेश्यांचे मुखवटे लावून आश्रमस्थांकडून आपण घेत आहोत, साधू संतांकडून सेवा घेत आहोत हे कबुल करा.
या एका विषयावर बोलण्यासारखे भरपूर आहे. आचारस्थळातील 187 क्रमांकाचे वचन हाच सर्व आचार थोडक्यात सांगते. पण "त' म्हटल्यावर "तपेलं' समजण्याची योग्यता नसणाऱ्यासाठी इतकं सविस्तर लिहावे लागते.
असो, हा लेख नुसता वाचून बाजूला ठेवण्यापेक्षा याची लिंक सर्व उपदेशी बांधवांपर्यंत पाठवा. निदान त्यांच्याकडून तरी अशा प्रकारची अकुशळता होणार नाही. हा लेख वाचून एका गाडीतील लोकांनी जरी यातील सूचनेचे पालन केले तरी या लेखाचे सार्थक होईल. साधनदाता सर्वज्ञ सर्वांना सन्मती देवो, हीच प्रभुपदी शुभकामना.
दंडवत प्रणाम.
पुढे लेख वाचा साधुअव्हेरणाचा दुष्परिणाम 👇लेख
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/blog-post_12.html
अगदी यथार्थ आहे. मी महीलांना घेऊन जाते होईल तेवढी मदत करतो कारण काही ठिकाणी टाळले तरी तेथील मदत घ्यावी लागते व खरोखरच मनापासुन या गोष्टी चा खेद वाटतो
ReplyDeleteदंडवत प्रणाम 🙏 प्रत्येक वासनिकांनी आपण सेवा करता तसेच वर्तन केले पाहिजे.
Deleteअगदी बरोबर आहे, आपण आपल्या स्वभावात बघायला पाहिजे, सर्व साधारण पणे आपण महानुभाव पंथाचे असलेल्या अहंपणात कळतच नाही की थोरांकडे जाऊन सुधारणा करून घेण्याऐवजी उपकारच केल्यासारखे वागतो. धर्म बंधु आपणास माझा सहृदय विनम्र दंडवत प्रणाम आहे
ReplyDelete