बोधकथा : शहाण्याने अहंकाराचा त्याग करावा - bodhkatha abhimanacha tyag knowledgepandit

बोधकथा : शहाण्याने अहंकाराचा त्याग करावा - bodhkatha abhimanacha tyag knowledgepandit

बोधकथा : शहाण्याने अहंकाराचा त्याग करावा

    अहंकार भल्या भल्या विद्वानांना जाणत्यांना नितीमत्तेपासून ढाळणारा एक लक्षात न येणारा दोष. ज्याला अहंकार मद, माज चढला त्याला कळतच नाही की माझं चुकत आहे. मग हळुहळु धर्मापासून पतन पावतो. अहंकारामुळे अधर्मालाही धर्म मानणारे लोक असतात. पक्षाभिमानाने धर्माला दुषण ठेवणारे लोक असतात. आणि पक्षाभिमानाने अधर्माची बाजू घेतात. व स्वतः धर्मापासून कायमचे पतीत होतात.

    एका राज्याच्या राजाने त्याचे वाढते वय पाहून राज्यव्यवस्थेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आणि अरण्यात जाऊन संन्यास घेऊन तप करण्याचे ठरवले. पण त्याला मुलगा नव्हता की ज्याच्या हाती राज्य सोपवून तो एवढ्या मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाला असता. आणि राजाला एक मुलगी होती तिचे लग्नही करण्याचे राजाने ठरवले होते. मग त्याने विचार केला की, मुलीचे लग्न एका तरुणाशी लावावे आणि त्यालाच राजसिंहासनावर बसवावे. राजा करावे. आणि देवाच्या भरवश्यावर सोडावे.

    म्हणून त्याने तात्काळ आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून सांगितले की, उद्या सकाळी या आपल्या नगरात जो पहिला प्रवेश करील. त्याला या राज्याचा राजा म्हणून नियुक्त केले जाईल आणि माझ्या मुलीचे लग्नही त्याच्याशी होईल. मंत्र्यांना आश्चर्य वाटते पण त्यांच्या समोरही काही पर्याय नव्हता. 

दुसऱ्या दिवशी राज्याच्या सैनिकांनी नगराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष ठेवले. सकाळी सकाळी फाटक्या कपड्यातील एका तरुण सैनिकांना येताना दिसला. तरुण तेजस्वी होता. त्याचे ते बाणेदार डोळे, पाहून तो कुणी क्षत्रिय वंशातला असावा असे पाहणाऱ्यांना वाटत होते. पण तो एक गरीब तरुण होता. पोटाची खळगी भरण्यासाठी राजधानीला आला होता. त्या सैनिकांनी थांबवले. व पकडून राजासमोर सादर करण्यात आले.

    राजाने तरुणाकडे पाहिले व परमेश्वराचे आभार मानले. आणि राजाने सर्वांसमोर ऐलान केले की हा तरुण इथून पुढे या राज्याचा राजा म्हणून सर्वांनी यास मानावे. तरुणाला आश्चर्य वाटले. पुर्ण हकीकत कळल्यावर त्यानेही देवाचे आभार मानले. तो आपल्या नशिबावर खुप खुष झाला. काही दिवसातच राजाने आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी करून सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवून राजा स्वतः संन्यासी होऊन तप करण्यासाठी जंगलात निघून गेला. हळूहळू काळ पुढे सरकत होता. 

आणि तो हुशार तरुण राज्याची सूत्रे हाती घेऊन चांगल्या राजाप्रमाणे राज्याच्या सेवेत गुंतला. व काही दिवसातच राजनितीत चांगला तरबेज झाला. जनताही त्याच्यावर खुप प्रसन्न होती. त्या नवीन राजाने त्याच्या महालात एक छोटीशी कोठडी बनवली होती. त्या कोठडीची चावी तो राजा नेहमी कमरेला लटकवून ठेवत असे. त्या खोलीत येण्याची परवाणगी कुणालाही नव्हती. आठवड्यातून एकदा तो त्या कोठडीत जायचा.. अर्धा तास आत राहायचा आणि बाहेर जाऊन त्या खोलीला मोठं कुलूप लावायचा आणि इतर राजकामात व्यस्त व्हायचा.

    अशा रीतीने राजा वारंवार त्या खोलीत जाताना पाहून प्रधानाला आणि सेनापतीला आश्चर्य वाटले, राज्याचा सर्व खजिना सर्व माणिक मोती रत्न हिरे दागिने खजिनदाराकडे आहेत. सैन्याच्या शस्त्रागाराच्या चाव्या माझ्याकडे आहेत आणि इतर मौल्यवान कागदपत्रांच्या चाव्या मंत्र्याकडे आहेत. मग या छोट्याशा कोठडीत काय आहे की दर आठवड्याला राजा इथे दाखल होतो. आणि थोड्या वेळाने तो बाहेर येतो. राजा या खोलीत का जातो? आणि या खोलीची चावी तो इतरांना देतही नाही. कुणाला या खोलीकडे फिरकूही देत नाही. हे पाहून सेनापतीला आश्चर्य वाटले.

    सेनापतीला या गोष्टीचा छडा लावावाच असे वाटू लागले. त्याला चैन पडेना. शेवटी त्याने धैर्याने राजाला विचारले ‘‘राजन जर तुम्ही माफ कराल तर एक विचारतो, मला सांगा, त्या खोलीत काय आहे ज्याच्या सुरक्षेची तुम्हाला इतकी काळजी आहे?’’

    राजा रागाने म्हणाला ‘‘सेनापती हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचा काही अधिकार नाही, हा प्रश्न पुन्हा विचारू नका.’’ आता मात्र सेनापतीचा संशय अधिकच वाढला. हळूहळू मंत्री आणि पार्षदांनीही राजाला विचारण्याचा प्रयत्न केला. पण राजाने त्या खोलीचे रहस्य कोणालाही सांगितले नाही. शेवटीहे प्रकरण राणीपर्यंत पोहोचले. राणीनेही हट्ट धरला. आणि स्त्री च्या हट्टापुढे कुणीही टिकत नाही, ‘याचे रहस्य मला कळलेच पाहिजे, ते मला सांगात तरच मी अन्न पाणी घेईन’, म्हणून राणीने खाणेपिणे सोडून दिले आणि त्या खोलीचे सत्य जाणून घेण्याचा आग्रह धरला.

    शेवटी मजबूर होऊन राजा सेनापती आणि इतर सदस्यांसह कोठडीत गेला आणि दरवाजा उघडला. खोलीचे दार उघडले असता भिंतीला टांगलेल्या फाटक्या कपड्याशिवाय आत काहीही नव्हते. मंत्र्याने विचारले ‘‘महाराज इथे तर काही नाही ?’’ ते फाटलेले कापड हातात घेऊन राजा दुःखी स्वरात म्हणाला ‘‘हे माझे सर्वस्व आहे. जेव्हा जेव्हा मला थोडेसा अहंकार येतो. 

मी राजा असल्याचा गर्व उत्पन्न होतो, तेव्हा तेव्हा मी येथे येऊन हे कपडे पाहतो. आणि मला आठवते की मी जेव्हा इथे आलो तेव्हा या फाटक्या अवस्थेत आलो, तेव्हा माझ्याकडे या फाटलेल्या कपड्याशिवाय काहीही नव्हते. आणि मग माझे मन शांत होते आणि माझा अभिमान, अहंकार संपतो.  मग मी परत बाहेर येतो.’’ एवढ्या चांगल्या मनाच्या आपल्या राजावर आपण संशय घेतला म्हणून सर्वांना खुप वाईट वाटले. सर्वांनी राजाची क्षमा मागितली.

तर मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य असे की, अहंकार हा अग्नीसारखा आहे जो माणसाला स्वतःच्या उष्णतेने भस्म करतो. तसेच जो माणूस खरोखर मोठा असतो तो अहंकारासारखे दोष स्वतःपासून दूर ठेवतो. म्हणून कितीही उच्च पदावर पोहचले असाल तर अहंकार येऊ देऊ नये. आपण जन्मलो तेव्हा काहीच बरोबर घेऊन आलेलो नाहीत. आणि जाणार तेव्हाही काहीच बरोबर घेऊन जाणार नाही. मग अहंकार कशाचा करायचा?

एक हिंदी शायर म्हणतो :-

तू यहाँ मुसाफ़िर है ये सराये फ़ानी है ।

चार रोज की मेहमां तेरी ज़िन्दगानी है ।।

भल्या माणसा तू इथे पाहुना आहेस, हे वैभव वगैरे सगळं एक दिवस नष्ट होणार आहे. फक्त चार दिवसाच्या जगण्यासाठी एवढी मर मर का करतोस?

ज़र ज़मीं ज़र ज़ेवर कुछ ना साथ जायेगा ।

खाली हाथ आया है खाली हाथ जायेगा ।।

    हे तुझे दागिणे सोने, जमीन, काहीच सोबत जाणार नाही. तू रिकाम्या हाताने आलायेस, रिकाम्या हातानेच जाणार.

    अहंकाराविषयी शायर म्हणतो :- भल्या माणसा !!

मौत ने ज़माने को ये समा दिखा डाला ।

कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला ।।

    मृत्यूने या जगाला केवढी मोठी शिकवण दिली आहे की, मोठे मोठे शुरवीर मातीत मिळाले. काळाच्या ओखात नामशेष झाले.

कल जो तनके चलते थे अपनी शान-ओ-शौकत पर ।

शमा तक नही जलती आज उनकी क़ुरबत पर ।।

  कालपर्यंत जे आपल्या संपत्तीने मदोन्मत्त होऊन छाती पुढे करून वर मान करून या समाजात वावरत होते त्यांच्या कबरीवर आज दिवा जाळायला देखिल कुणी नाही. त्यांची कुणाला आठवणही नाही. म्हणून काळ हा सर्वात मोठा भस्मासुर आहे. तो सर्वांना खाऊन टाकतो. तो माणसालाच खात नाहीतर त्याच्या प्रसिद्धीला, नावाला, त्याच्या संपत्तीला, मानवाशी संबंधीत सर्वच गोष्टीना काळ गडप करतो. मग अहंकार तो कशाचा? 

कुणी एक प्राणी, मनुष्य हे सर्व काळाच्या कठपुतळ्या आहेत तो नाचवेल तसे सर्व प्राणीमात्र नाचतात. आणि आपापल्या कर्मानुसार सुख दुःख प्राप्त करतात, आणि  ‘माझ्यामुळे झाले, मी केले’ असा खुळा निरर्थक वायफळ अभिमान बाळगतात. जाणत्याने एकच लक्षात घ्यावे. सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता’ सुख आणि दुःख हे स्वतंत्रपणे कुणीच कुणाला देत नाही, देऊ शकत नाही. कर्मात, प्रारब्धात जोडले  असेल तरच सुख मिळते, आणि पाप कर्मांचे फळ म्हणून दुःख मिळते. मग यावर अहंकार करून काय उपयोग?

परमेश्वर हृदयात येण्यासाठी निर्दोष आणि रिकाम्या मनाची गरज असते बोधकथा वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/blog-post_29.html

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post