अध्यात्मिक कथा - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता
परमेश्वर हृदयात येण्यासाठी निर्दोष आणि रिकाम्या मनाची गरज असते
माणसाचा सर्वात मोठा अवगुण काय आहे? अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा अवगुण आणि कमजोरी आहे. आणि जो जितका जास्त अहंकाराने भरलेला असतो, तितकाच तो कमजोर, दुर्बल असतो. आणि आपण सर्व अहंकाराने भरलेले आहोत. आपण सर्व अहंकाराने दृढ आहोत. आपण अहंकाराने इतके भरलेले आहोत की आपल्या मनात परमेश्वराचा प्रवेश होण्याची शक्यताच नाही.
अहंकाराने भरलेल्या माणसाला सत्य कळू शकत नाही, यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. कारण यथार्थ ज्ञानासाठी नम्रता धारण करावी लागते. परमेश्वर हृदयात येण्यासाठी निर्दोष आणि रिकाम्या मनाची गरज असते. आणि जो अहंकाराने भरलेला असतो तो अजिबात रिकामा नसतो, तिथे परमात्म्याचे स्मरण नसते, तिथे परमेश्वर प्रवेशत नाही, माणसाला मुक्तीमार्गात अहंकाराशिवाय दुसरा कोणताही अडथळा नाही.
आज महानुभाव पंथात काय आणि इतरत्र काय वावरताना बरेच जण आपल्याला असे दिसतात की त्यांना आपल्या कर्तुत्वाचा अहंकार आलेला असतो. हे सर्व मी करतो आहे माझ्यामुळे होत आहे असे त्यांना मनातून तर वाटत असतेच पण कधी कधी आपल्या वागण्याने बोलण्यानेही ते इतरांना द्योतवीत असतात. परंतु ते हे विसरतात की आपण कर्मांच्या देवतांच्या अधीन आहोत. आपल्या कर्मामुळे देवता हे आपल्याला देत आहे.
आणि दैवरहाटीत जो जो विधी अनुसरला साधक आचरतो त्या त्या प्रत्येक विधीत साधकाला देवाचे साह्य असते. देवाच्या साह्याशिवाय काहीही होत नाही. पण साधकाला जर आपल्या कर्तृत्वाचा अहंकार आला तर तो हे सगळे मीच करत आहे असे लोकांमध्ये गाजावाजा करून सांगतो आणि ईश्वरी प्रसन्नता गमावून कर्मांची फळे भोगत असतो. आणि मी देवाच्या म्हणण्यानुसार करीत आहे. असे मानून देवाने सांगितलेले निषेधही आचरतो.
देव मात्र त्याचे कोणतेही कर्तृत्व स्वीकारत नाही. कारण जे देवाने सांगितले नाही त्याचे आचरण करून फळाची अपेक्षा करणाऱ्या जीवास देव का आपले फळ देईल! त्याला देवताच फळ देतील. "मी” “माझे” “मी केले” “माझ्यामुळे झाले” हेच तर जीवाला सुटत नाही मग तो निर्हेतूक क्रिया कशा करणार! आणि सहेतुक क्रियेचा स्वीकार परमेश्वर करत नाही. प्रसिद्धीपरायण असलेल्या साधूच्या ठिकाणी कुठलाच धर्म नसतो. कारण किर्तीकठियाला देव होत नाही. किर्तीचेच फळ होते.
"मी” “माझे” “मी केले” “माझ्यामुळे झाले” असा अहंकार आजकाल कमी जास्त फरकाने प्रत्येकाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही साधुसंत तर आमच्यामुळेच पंथाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असा उदो उदो करून नामधारकांची वासनिकांची फसवणूक करून आपल्या नादी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. "मी” “माझे” “मी केले” “माझ्यामुळे झाले” या विषयाला धरून एक सुंदर बोधकथा आपण येथे पाहूया!
प्राचीन काळात उत्तर देशात पद्मावती नावाचे एक सुंदर विशाल नगर होते. त्या राज्याचा वीरभद्र नावाचा राजा आपल्या शुरत्व, वीरता, औदार्य, प्रतिभा, आस्तिकता, सुशासन, काव्य रसिकता, विद्वत्ता या गुणांमुळे राज्यातील लोकांत प्रसिद्ध होता. सर्व नगरजण त्याच्यावर खूप प्रेम करत असत. तो आपल्या प्रजेची खूप काळजी घेत असे.
एकदा तो नगरात, राज्यात आपल्या गुरुसोबत फेरफटका मारायला गेला. प्रवास करत असताना राज्याची सुबत्ता आणि भरभराटी पाहून त्याच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली आणि त्याने अति उत्साहाने गुरुंजवळ बोलून दाखवले की, “पहा गुरुवर खरोखर मी जाणता राजा आहे, मी माझ्या प्रजेची किती योग्य काळजी घेत आहे माझ्या राज्यात काहीही कमी नाही, कुणीही दुःखी नाही!"
गुरू ज्ञानी होते, त्यांनी ताबडतोब आपल्या शिष्याच्या अहंकारयुक्त भावना समजून घेतल्या आणि लगेचच त्यांना सुधारण्याचा निर्णय घेतला. कारण हा अहंकार वाढला तर याच्या राज्याच्या भरभराटीला ओहटी आल्याशिवाय राहणार नाही. याला आत्ताच अहंकाराचा त्याग करायला भाग पाडले पाहिजे असे काहीतरी केले पाहिजे म्हणून गुरु विचार करत होते तेवढ्यात त्यांना वाटेत एक मोठा दगड पडलेला दिसला , गुरुजींनी शिपायांना तो दगड तोडण्याची सूचना केली.
सैनिकांनी घण छिन्नी आणून त्या दगडाचे दोन तुकडे करताच एक अविश्वसनीय, अद्भुत दृश्य राजाला दिसले, दगडाच्या मध्यभागी पोकळी होती आणि त्यात थोडेसे पाणी होते आणि त्या पाण्यात एक छोटासा बेडूक राहत होता. दगड फोडताच तो तेथून मुक्त झाला आणि पळून गेला. सगळे आश्चर्यचकित झाले होते. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की, दगडाच्या मध्यभागी हा बेडूक असा कैद झालाच कसा! आणि या बंदिस्त अवस्थेत तो जिवंत कसा राहिला?
आता गुरु राजाकडे वळले आणि विचारले, “तुला असे वाटत असेल की या राज्यात तू सर्वांची काळजी घेत आहेस, तर मला सांगा की दगडामध्ये अडकलेल्या त्या बेडकाची काळजी तू घेत होतास का? कोण घेत होतं? मला सांगा कोण या बेळकाचे रक्षण करत होते? या बेडकाचा पाळक कोण आहे? म्हणून तू जे अहंकाराने विचार करत आहेस तू चुकीचा आहे. सर्व जीवांचा पालक परमपिता परमेश्वरच आहे.”
हेही वाचा 👉 इषणात्रयाचा त्याग करण्यासाठी काय करावे?
राजा पश्चातापदग्ध झाला. राजाला आपली चूक कळली होती, त्याला आपल्या अभिमानाचा पश्चाताप होऊ लागला होता, गुरूंच्या मेहरबानीने त्याला कळून चुकले होते की, प्रत्येक जीवाचा पालनकर्ता आणि सर्वांची काळजी घेणारा देवच आहे सर्वांचे रक्षण करणारा देवच आहे. आपण उगाच अहंकाराने फुगत आहोत. प्रत्येकाला आपल्या पुण्यकर्मामुळे सुख मिळत असते.
या गोष्टीपासून आपल्याला ही जाणिव होते की, मित्रांनो, पुष्कळ वेळा चांगले काम केल्यामुळे मिळणारी प्रसिद्धी मिळते, लोक वाह! वा! करतात. आणि त्या प्रसिद्धीमुळे लोकांच्या मनात अहंकार निर्माण होतो आणि शेवटी तो अहंकारच त्यांच्या अधःपतनाला आणि दुःखाला कारण बनतो. म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की या जीवनात आपण कुठेही वरच्या स्तरावर पोहोचलो तरी मनात कधीही अभिमान बाळगू नये आणि आपल्या अर्थपूर्ण जीवनासाठी त्या सर्वशक्तिमान देवाचे नेहमी कृतज्ञ रहावे.
म्हणून माणसाने मनामध्ये कधीही अहंकार येऊ देऊ नये आपण जे करतो ते इतरही करू शकतात असे मानून चालावे. जीवन आपल्याला अनेक धडे शिकवते, जर तुमच्यात अहंकार जन्माला आला तर विश्वास ठेवा, तो अहंकार तुमचे ज्ञान, शहाणपण आणि संपत्ती तर संपवेलच, पण तुम्हाला नरकाच्या दुःखाच्या खड्ड्यात ढकलल्याशिवाय राहणार नाही.
स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची भावना म्हणजे अहंकार होय.
मी मोठा आहे, मी सुंदर आहे, मी सर्वात योग्य आहे, मी सर्वात प्रामाणिक आहे, प्रत्येकजण माझा आदर करतो, प्रत्येकजण मला घाबरतो, प्रत्येकाला मला आवडतो, माझ्या क्षमतेमुळे लोक माझा हेवा करतात, असली भावना त्यालाच अहंकार म्हणावे अहंकार हा परमेश्वरप्राप्तीत सर्वात मोठा अडथळा आहे जो आपल्याला आनंद, समाधान, नातेसंबंध आणि आदर हिरावून घेऊन आपले संपूर्ण आयुष्य नरकमय बनवतो. म्हणूनच हा अहंकार कोणत्या रूपात मनात राहतो ते आधी ओळखा आणि मग त्याला फेकून द्या.
जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अहंकार आहे तोपर्यंत आपल्या मनातील अज्ञाना अन्यथाज्ञानाचा अंधार नाहीसा होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत दु:खापासून, अशांततेपासून मुक्ती मिळू शकत नाही. ज्या दिवशी 'आपण काहीतरी असण्याच्या अहंकारापासून, सर्व प्रकारच्या अहंकारापासून मुक्त होऊ, त्या दिवसापासून आपले दुःख संपण्यास सुरुवात होईल. आपण आनंदीच असू.
अहंकार टाका नेहमी आनंदी राहा - जे मिळाले ते पुरेसे आहे. ज्याचे मन आनंदी आहे - त्याच्याकडे सर्व काही आहे.
हेही वाचा 👉 इषणात्रयाचा त्याग करण्यासाठी काय करावे?