पाकिस्तानात गेलेली महानुभावांची मठमंदिरें व मराठी वाङ्मय - pakisthan mahanubhavpanth mandir

पाकिस्तानात गेलेली महानुभावांची मठमंदिरें व मराठी वाङ्मय - pakisthan mahanubhavpanth mandir

पाकिस्तानात गेलेली महानुभावांची मठमंदिरें व मराठी वाङ्मय 

लेखक :- कै. महंत श्री शामसुन्दर उपनाम गोपिराजबाबा महानुभाव ऋद्धिपुर (लेखन :- इ. स. १९६४)

भारत देशाच्या फाळणीमुळे पाकिस्थानांत असलेल्या महानुभावीय मठांचा व त्याचबरोबर मराठी वाङ्मयाचा केवढा कल्पनातीत विध्वंस झाला आहे याची फारच थोड्या पंथिय लोकांना कल्पना असेल ! या फाळणीमुळे महानुभावीय मठांप्रमाणेच मराठीचेहि नष्टचर्य ओढवले आहे, याचा हृदयस्पर्शी तपशील प्रस्तुत लेखात वाचकांना वाचायला मिळेल.

एका हिन्दुस्थानचे १९४७ साली भारत आणि पाकिस्थान हे दोन देश झाल्यामुळे कल्पनातीत अनर्थ ओढवले. असंख्य माणसांचा संहार आणि वस्तुविनाश घडून आला. बेवारशी व पोरके झालेले लाखों लोक कोठेतरी आणि कसे तरी निकृष्ट जीवन कंठू लागले. या फाळणीचा दुष्परिणाम किती क्षेत्रांवर झाला, याबद्दल कोणालाच पुरती कल्पना येणार नाही.

या अपरंपार संकटात आपले मराठी वाङ्मय आणि मराठी भाषी अभ्यासक सांपडले होते हे सांगून खरेंहि वाटणार नाही अशी भयानक परिस्थिती भारतावर ओढविलेली होती. बाराव्या शतकांत महाराष्ट्रांत सत्य सनातन महानुभाव पंथ स्थापन झाला. महानुभाव पंथातील विद्वान महांतांनी पंडित पुरुषांनी पुढे उत्तरेकडे व विशेषतः पंजाबांत आपले प्रचारकार्य जोराने चालविलें व काबूल कंदाहारपर्यंत श्रीकृष्णमंदिरें आणि मराठी नेऊन एक प्रकारें सांस्कृतिक मुलुखगिरीच केली, असें म्हणण्यास कांहीच हरकत नाहीं !

मराठ्यांचे राजकीय साम्राज्य अटकेपर्यंत गेले ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे. या उलट मराठीचें साम्राज्य अटके पर्यंतच नव्हेतर थेट इराणपर्यंत जाऊन पोहचले होते. ही किती अभिमानाची व पराक्रमाची गोष्ट आहे, हे आपण सर्व भाषाभिमानी सहज जाणूं शकतात! मात्र हा पराक्रम गाजविला त्या महानुभाव पंथाविषयी आपण कितपत आदर वागविता हा आढावा जर घेतला तर आपला कृतघ्नपणाच याबाबतीत अधिक दिसून येईल. 

पूर्वी पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांत यांतून महानुभाव पंथाचे संन्यासी उपदेशी कित्येक लाख लोक होते. मोठमोठे धनाढ्य व आणि सत्ताधारी लोकहि या पंचाचे अनुयायी असत. पण एकदम आकाशाच्या कुऱ्हाडी प्रमाणें देश विच्छेदनानंतर परधर्मीय विच्छेदनाचा अनर्थ या पंथावर ओढवला व त्याची जणुं पाळेमुळेंच खणून निघाली ! त्यामुळे आपल्या मराठी साहित्यावर व साहित्यिकांवरहि मोठे संकट ओढवले यांची आपल्याला आतांपर्यंत जाणीवहि नसावी, असे आम्हाला वाटते. ही जाणीव ऋध्दिपूरच्या श्रीगोपीराज मठाचे ब्रह्मीभूत महंत गोपीराज बाबा महानुभाव यांच्या खाली लिहिलेल्या कामगीरी वरून आपणास होईल.

महंत गोपीराज यांच्याविषयीं शेवटी दिलेली माहिती त्यांच्या निरलस निरपेक्ष कामगिरीची साक्ष देणारी आहे. सत्तरी उलटून गेली असतांहि त्यांचा उत्साह व प्रचाराची आस्था कायम आहे, आपली परंपरा चालवून महानुभाव साहित्याचा अभ्यास वाढवितील अशा विद्वानांच्या हाती आपले साहित्य धन देण्याची त्यांची फार इच्छा आहे. जिवाचे रान करून जें धन पाकिस्तानांतून जतन करून इकडे आणले तें या पुढे तरी अखंड सुरक्षित. राहावें ही त्यांची शेवटची इच्छा अत्यंत स्पृहणीय अशीच असून ती पुरी करणे आपल्या विद्वानांच्या हाती आहे. हरीपूर हे पंजाबांतील महानुभावियांचें एक मोठे केंद्र होते. हे गांव वायव्य सरहद्द प्रांतांत हजारा जिल्ह्यांतील अवदाबाद तहसिल मध्ये आहे. महानुभावलोक येथे फार दिवसा पासून स्थायिक झाले होते. 

येथे एक संस्कृत महाविद्यालयहि त्यांनी चालविलें यांत चातुर्वर्णीय विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होती. मराठीत असणाऱ्या महानुभाव तत्वज्ञानाचा या विद्यालयांत चांगला अभ्यास होत असे. इमारतीला ६०,००० रु. चे वर खर्च लागला असून आंत मोठे व्यवस्थित ग्रंथालयहि होते. ग्रंथांची किंमत दहा हजार रूपयावर तरी सहज भरेल इतके ग्रंथ तिथे होते. महंत गोपीराज यांनी १९१६ मध्ये हे ग्रंथालय स्थापन केलें. हरीपूर मठांत 'जें 'गोपाल मंदिर' होतें त्यांत श्रीकृष्णाची पांढऱ्या जयपुरी संगमरवरी दगडाची एक मूर्ति होती. मूर्तिवर छत्र चामरे नित्य ढाळली जात असून तिच्या अंगावर भारी अलंकारहि होते बहुतेक उपकरणी चांदीची होती.

हजारा जिल्ह्यांत 'हवेलिया' 'नवाशहर' 'मानसेरा' 'फुल्लडा' 'गढी' या सारख्या लहान मोठ्या गांवांतून अनेक महानुभावीय मठ होते. सहानी आडनांवाच्या लोकांचे मोठे प्राबल्य असे. हजारा-रजोई- हा गांव डोंगराच्या पायथ्याशी आहे. येथे गोपीराज शाखेचा मठ होता. १९१५ सालीच श्री मयंकराज महान भावांनी पन्नास हजार रुपये खर्चून या मठाचा जीर्णोद्धार केला होता. यांत पोथ्यांचा फार मोठा संग्रह होता. !

'होतीमर्दान- या गांवांत सेठीया आडनांवाच्या महानुभावांचे बरेच प्राबल्य होते, मठ फार रम्य होता. 

पेशावर - येथील गोपाल मंदिर मागे अंदर शहर जळल्यानंतर एका माहूरकर महंतांनी चाळीस हजार रुपये खर्चून बांधले होते. मंदिराच्या खर्चासाठी तिने हवेल्या भाड्याकरिता बांधून दिल्या. जमीन जुमलाहि दिला होता. याठिकाणी बरेच मराठी आणि संस्कृत ग्रंथ असलेले एक मोठे पुस्तकालय होते. पोथ्यां चाहि संग्रह बराच होता, मंदिरांतील गोपालमूर्ति अडीच फूट उंचीची व जयपुरी होती. ती मात्र मोठ्या प्रयासाने हलविण्यांत आली व आता युक्त प्रांतांत गाझियाबाद येथे नवें मंदिर बांधून त्यात ती ठेवण्यात आली आहे. एवढीच एक. मोठी मूर्ति पाकिस्तानांतून आणता आली कै. श्रीबाळकृष्ण शास्त्री माहोरकर यांनी या कामांत फार परिश्रम घेतले.

पेशावरांत शहरांतील आणखी एक श्रीकृष्ण मंदिर जळाले होते. ते बाळराज ब्रह्मचारी वाइंदेशकर यांनी पस्तीस हजार रुपये खर्चून पुन्हा बांधून दिले. बाळराजांचे शिष्य पं. साधेराज महानुभाव ( जयकृष्णी) हे संस्कृताचे पंडित व षट्दर्शनाचार्य होते. मठांत मोठी देवमूर्ति व कैवल्य दीपीका 'भास्करी' पांचविध इ. महाभाष्ये वगैरे अनेक मराठी ग्रंथ होते.

रावळपिंडी- नानकऱ्यांत जें कृष्णमंदिर होतें ते फार सुंदर व नव्या पद्धतीचे असून तेथे सर्व सोयींनी समृद्ध होते, मंदिरातील मूर्ति तीन फूट उंच व ८०० रु. किमतीची होती. येथे मठांत तपस्वींद्र शास्त्रींनी एक महाविद्यालय चालविलें होते. मोठा ग्रंथसंग्रहहि इथे होता व सामानसुमानहि अगणित होते. अनेक महंतांचा ग्रंथसंग्रह व वस्तूं या ठिकाणी होत्या. हा मठ गेल्याने पंथाचे फारच नुकसान झाले !

लई नदीच्या काठीं दूसरे एक गोपाल मंदिर होतें. आंत दोन बन्सीधर मूर्ति व घटसिद्धनाथ हि शिवलिंग होते. याच सिद्धनाथाला श्रीचक्रधर स्वामीनी विडा वाहिला होता. तेथील शिवलिंग ८ मण वजनाचे होते. तेएका महानुभावांनी रावळपिंडी येथील मंदिरात नेले होते. 

कंधेलपूर विभागांत पुढील मठांची नासधूस झाली.

नाडा येथील सेठी मंडळींनी मठातील सामान सुमान मोठ्या प्रयासाने वाचून रात्री नदीतून चालविले असतां दुर्दैवाने तेही सर्व वाहून गेले.

तलागंग गावीं ‘तळेगांवकरांचा' प्रेक्षणीय मठ होता. यातील मोठ्या मूर्ति व पोथ्या सर्व नाश पावल्यात. आजूबाजूच्या पन्नास गांवचे आहे. लोक येथे आश्रयास येऊन राहिले असतां पोलिस अधिकाऱ्यांच्याच फितुरीमुळे सातशे हिंदु मारले गले.

धौलर मठांत श्रीचक्रधर स्वामींच्या संबंधीची 'वडाप्रसाद' म्हणून देवपूजा असे. आजूबाजूचे लोक नवस करून दर्शनास येत. तो देवपूजा-प्रसाद जागच्या जागीं राहून प्राण घेऊन पळत जाणाऱ्या स्त्री पुरुषांची गांवच्या सीमेवर लांडगे तोड झाली ! मठांतील मूर्ति कमालपूर छिन्नस्थळी पाषाणाची असून श्रीचक्रधर संबंधी होती, पंथीयाचे हेहि दुर्देव कांही कमी नव्हे !

ढेरमोंड गांवी सुमारे शंभर हिंदूवर महानुभावी उपदेशी लोकाचे छत्र होते. हे पंथाचे एक महत्वाचे स्थान होते. येथे दोन मठ होते. येथील १०० वर महानुभावी संन्यासी जीव वाचवून महाराष्ट्रांत अहमदनगर भागांत जाऊन राहिले. विघड, बन्हार इलिया अकवाल, झाटला, इ. गांवातील लोक तलागंग येथे आश्रयास गेले असतां त्यांची फसवणूक झाली व ते लबाडले जाऊन त्यांतील बरेच मारलेहि गेले. पुढे भारत सरकारने उरलेल्या लोकांस अंबाला कँपमधे नेले. तेवढे मात्र सुरक्षित राहिले.

बसाल, पिडोघे, मोगला, या गांवीहि कृष्णमंदिरें होती. मोगला मठांत गोपीराजबाबांचा मोठा ग्रंथ संग्रह असे. इकडील सर्व हिंदु लोक महानुभावी पंथाचे अनुयायी होते. हे एक येथील वैशिष्ठ्य होय.

सिद्धर, कर्ताल, चावली, भगवाल, रूपवाल, या धनचौऱ्यांशी प्रांतांतील पांच गावी गोपीराजीय मठ होते. सामान सुमान व पोथ्या यांचा बराच नाश झाला असला तरी मूर्ति मात्र शहाबाद मारकंडा येथे सुरक्षितपणे आणण्यात आली.

चक्रवाल मठातील मूर्ती वृंदावन येथून आणलेली होती व एक एक आणा भिक्षामिळवून, एक लाख आण्यांच्या रकमेतून येथील देऊळ बांधले होते. असा या मठाचा इतिहास आहे. 

रावलपिडीं विभागांतील झेलम या प्रसिद्ध गांवी झेलम नदीच्या कांठी श्रीसांवलीमूर्ति मंदीर होते, मूर्ति महाराष्ट्रांतून आलेली व श्रीचक्रधरस्वामींच्या सान्निध्यांतील असावी अशा श्रद्धेने अनेक भाविक लोक यास नवस करीत. हे एक पंजाबातील हिंदूचें तीर्थस्थानच बनले होते. तीन मजली सुंदर इमारत महंत श्रीसारंगधर यांनी बांधून देऊन आपल्या गुरुच्या नांवान एक श्री राजधर महानुभाव लायब्ररी सुद्धा इव उघडली होती. या ग्रंथालयांत अनेक चांगल्या पोष्या होत्या. त्यावरुन कित्येक विद्वान् नकला करुन घेत असत.

सराय गांवांत गोपीराज मठ होता. येथील महानुभावी उपदेशी लोक फार धनाढ्य होते. मराठीचा अभ्यास मठांत चांगल्या तऱ्हेने होत असे.

लालामूसा गांवचा मठ महंत बाळेराजजींनी बांधला असून त्याचे शिष्य प्रभाकर शास्त्री येथील महंत होते. ते आजूबाजूच्या भागांत धर्मप्रचार करीत. ब्रह्मवाणी नांवाचें उर्दु मासिक संपादक असत.

मेरा आणि वजीराबाद येथील भावी मठ फार जुने होते, जलालपूर प्रमाण झेलम नदी कांठी असणाऱ्या वीस गांवांतून मराठीचे पठण व पाठन करणारे महानुभाव होते. 'गुजरात' गांवच्या कृष्णमंदिरांतील मोठी मूर्ति व पोथ्या तशाच मागे राहिल्या त्याचे काय झाले देव जाणे.

शादीवाल :- गुजरात जिल्ह्यांतील या गांवी कृष्ण मंदीराखरोज माहौरची दत्तमूर्ति होती. या दा ला नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर येथी क्षेत्राप्रमाणे भूतप्रेतपीडा घालविण्यासाठी शेकडो लोकं धरणे धरित अनेकांना गुणही येई येथील मठातील पोथ्या तीनशे वर्षांपूर्वी सिन्नरहून आणल्या होत्या असे सांगतात.

भाडेवाल याच गुजरात जिल्ह्यांतील मठांत फुलेराज नांवाचा महंत देवपूजेत असता मारला गेला व मठ जाळण्यांत आला! हा मठ धर्माच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. तसेच 'जुजरानवाला' आणि' शेखपुरा' येथील मठहि मुरारमालकीच्या घराण्यांतील होते. शेखपुत्र्यांस दहा हजार लोकांची कत्तल झाल्याची बातमी होती.

लाहोर या मोठ्या राजधानीच्या शहरांत 'हीरामंडी' 'सुतरमंडी' 'मच्छी हठा' वगैरे मठ प्रख्यात होते. मच्छीठा मठास 'वायाचा मठ' म्हणतात, महाराणा रणजितसिंगाच्या वेळी बाईसाहेब नावाची एक तपस्विनी या मठांत राहत असे. मठाला रणजितसिंगाकडून देणग्या होत्या. हीरामंडीच्या नंदलाल मंदिरांत मथुरा वृंदावनाप्रमाणे हिंदोळचा मोठा उत्सव होत असे. लो. टिळक, वासुकाका जोशी, प्रभाते इ. महाराष्ट्रीय पुढारी मंडळी लाहोरच्या काँग्रेसला गेल्या वेळीं या मठांत येऊन गेली होतो, त्यांनी या पंजाबी महानुभावियांच्या मराठी भाषेचे मोठे कौतुक केलें या मठांत पुष्कळ मौल्यवान सामान व पुस्तकें होती.

मोची दरवाज्या जवळील कृष्णमंदिर अगदी भर मुसलमान वस्तीत होते. ते भस्मसात झाल्याचे सांगणे नकोच ! या मठाचा जीर्णोद्वार मागे पन्नास हजार रु. खर्चून आराध्ये महानुभावांनी केला होता. येथील कांही जळक्या पोथ्या गोपीराज यांनी आणल्या आहेत. महाराष्ट्रांतून तिकडे गेलेल्या पोथ्यातून कांही वाचवून महानुभावीय महंतांनी परत महाराष्ट्रांत आणल्या आहेत. हे त्याच महाराष्ट्रावर उपकारच समजलें पाहिजे.

या सत्कार्यात ऋद्धिपूर येथील श्री गोपीराज मठाचे महंत गोपीराज यांनी फार मोठा भाग घेतला आहे. गोपीराज यांचा जन्म पंजाबात कसल गावी सन १८८० मध्ये झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी यांना महानुभाव पंथीय संन्यासदीक्षा मिळाली, तेव्हांपासून मराठीचा अभ्यास सुरू करून सर्व महानुभावीय मराठी ग्रंथांचे पठण आणि पाठण केलें.

त्यांनी वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब, महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्र या भागांत धर्मप्रचार हे करून ग्रंथ जमा केले. महानुभावीय ग्रंथाचे संशोधन व अध्ययन व्हावे ही इच्छा मनांत धरून त्यांनी पंथाबाहेरील विद्वानांना हे ग्रंथ उपलब्ध करून दिले व ते समजण्यास मदतहि केली. कै. विनायकराव भावे, इतिहासाचार्य राजवाडे, डॉ. भांडारकर यांच्यापासून ते वऱ्हाडांतील सर्वश्री यशवंत खुशाल देशपांडे, हरिभाऊ नेने, डॉ. कोलते प्रभृति या अलिकडील महानुभावी साहित्याच्या पंडिता पावेतो सर्वच अभ्यासकांना महंत गोपीराज यांचे फार साहाय्य झाले. आमच्या कोश संपादनांत हि त्यांची चांगली मदत होत असे. १९२७ साली भरलेल्या महानुभावी धर्मोन्नति परिषदेने त्यांना 'महानुभावदि वाङ्मय संशोधक' अशी पदवीहि अर्पण केली होती. ऋद्धिपूर येथे आपल्या गोपी- मंदिरांत श्री गोपीराज महानुभाव ग्रंथ संग्रहाल याची आणि वाचनालयाची त्यांनी स्थापना करून त्यांत ५,००० चे वर ग्रंथ ठेवले आहेत व जुनी ऐतिहासिक कागद पत्राहि संग्रहित केली आहेत.

महंत गोपीराज हे बहुतेक पंजाबात हरिपूर येथे राहून खंबर घाटापर्यंतच्या सर्व पश्चिम भागांत प्रचार करीत फिरत असत. पाकिस्तान झाल्यावेळी ते तिकडेच होते व त्यांनी आपल्या पंथाच्या मठांची नासधूस व पंथीयांची कत्तल डोळयांनी पाहिली आहे! जेवढे जीव आणि वाङ्मय वाचविता येईल. तेवढे वाचवून त्यांनी वन्हाड आणि महाराष्ट्र यांत आणून सोडले. यापुढे तरी महानुभावी वाङ्मयाचा जास्त चांगला अभ्यास इकडे व्हावा व ग्रंथांचे आणि मठांचे नोट संरक्षण व्हावे ही त्यांची अंतिम तळमळ आहे. तेव्हा सर्व साहित्यिकांनी आणि संशोधन संस्थांनी त्यांच्याशी सहकार्य करून या प्राचीन मराठी वाङ्मयाला उर्जितावस्था आणली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीची विशालता याप्रमाण अधिक विशाल बनविली पाहिजे.

~ १९६४



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post