mahanubhav Panth Bhajan with lyrics
कैसा प्रभु भेटेल ?
कैसा प्रभु भेटेल?
दुर्लभ लाभला मनुष्य जन्म । न कळे इष्टानिष्ट कर्म ॥
सदा करीतसे दुष्कर्म । कैसा प्रभु भेटेल? ॥ १ ॥
अर्थ :- हे प्रभो! महाराजा ! आपण मला कशी भेट द्याल? या दुर्लभ अशा मनुष्य जन्मात येऊनही मी दुष्कर्मच जास्त करीत आहे मला इष्ट अनिष्ट कळत नाही. आपण सांगितलेले विधी मी आचरत नाही. मग मला आपण भेट कशी द्याल?
करीतसे विपुल असे धन संपत्ति । परि सर्व व्यसने व्यापिला चित्ती ।
जैसा असे मदोन्मत हस्ति । कैसा प्रभु भेटेल? ॥२॥
अर्थ :- माझ्याकडे पूर्वकर्माने जोडलेली विपुल अशी धनसंपत्ती आहे. पण मी ती दानधर्मात खर्च करायची सोडून सप्त व्यसनांमध्ये आसक्त होऊन विषय पदार्थांमध्ये लोळत राहिलो. आणि धन संपत्तीचा माज येऊन मदोन्मत्त हत्त्यासारखा उन्मत्त होऊन इतरांनाही लेखत राहिलो अशा मज अधमाला आपण कसे दर्शन द्याल?
गरिबावरी ठेवी सुरी । श्रीमंतीची घमेंड भारी ।
नास्तिक बनला पापाचारी । कैसा प्रभु भेटेल? ॥ ३ ॥
अर्थ :- मी गरीब लोकांना शस्त्राने धमकावतो त्यांचे द्रव्य लुबाळतो. श्रीमंतीची मला अत्यंत घमंड आहे. द्रव्याच्या अतिआहारी गेल्यामुळे मी नास्तिक पापाचारी बनलेलो आहे. सुखोपभोगांनाच सर्वस्व मानून ईश्वरांचे अस्तित्व नाकारणाऱ्या अशा पाप्याला आपण कसे दर्शन द्याल?
साधुची करी टिंगल । वेश्येचा करी गोंधळ ।
बोले असत्य जोखटे वाचाळ । कैसा प्रभु भेटेल? ॥४॥
अर्थ :- मी सर्व संगपरित्याग केलेल्या, देवाला अनुसरलेल्या देवाच्या भक्तांची, साधूसंतांची टिंगल करतो. आणि स्वतः मात्र वेश्यागमन करतो. सर्वांशी असत्य बोलतो शिव्या शाप देतो. अशा निरर्थक बोलणाऱ्या वाचाळाला परमेश्वर कसा बरं भेटेल?
भारतीय संस्कृति सोडिली । पाश्चात्य संस्कृति स्विकारिली ।।
स्वयंपरायण वृत्ति बनली । कैसा प्रभु भेटेल ? ।।५॥
अर्थ :- मी भोगवादी बनलेलो आहे. भारतीय संस्कृती प्रमाणे वर्तन करण्याचे सोडून पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेलो आहे. आणि परमेश्वर परायण होण्याचे सोडून स्वयंपरायण म्हणजे स्वतःलाच समर्थ समजणे अशी हिन वृत्ती माझ्या ठिकाणी बानलेली आहे. असा अहंकारी, पाप्याला, दुराचाऱ्याला परमेश्वर कसा बरे भेटेल?
संतासी बोले, वर्मरुप । क्रोधमुखी जैसा साप ॥
बापाला ही न म्हणे बाप । कैसा प्रभु भेटेल ? ॥६॥
अर्थ :- मी साधू संतांचे किंवा सात्विक वाचनिकांचे नामधारकांचे वर्म काढतो. किंचितसा अपराध असता अत्यंत क्रोधायमान होऊन त्यांना भलते-सलते बोलतो. सापासारखा दुःख धरून बदला घ्यावा म्हणतो. सर्वांचा पिता तो परमपिता परमेश्वर त्याला मी आपला मानत नाही अशा मज अद्धमाला परमेश्वर कसा बरे भेटेल?
न करी शास्त्राचा शोध । न घेई सत्पुरुषाचा बोध ।
बनला पाखण्डी अबुद्ध । कैसा प्रभु भेटेल ? ॥७॥
अर्थ :- ज्ञान असूनही मी शास्त्रात काय सांगितलेले आहे हे कधीही शोधण्याचा अभ्यासण्याचा प्रयत्न करीत नाही. आणि सत्पुरुषांनी केलेले निरूपण त्यातून काही शिकावे असे मला कधीही वाटत नाही. मी पाखंडी आहे लोकांना दाखवण्यासाठी थोडाफार देवधर्म करण्याचा आव आणतो. स्वतःला फार मोठा धार्मिक समजतो अशा पाप्याला मला परमेश्वर कसा बरे भेटेल?
ईश्वर निर्मित सिद्धांत त्यागीले । कपोल कल्पित सारे धरिले ॥
लोकां म्हणे येणेची होय भले । कैसा प्रभु भेटेल ? ॥८॥
अर्थ :- मी अन्यथा ज्ञानाच्या अधीन होऊन परमेश्वराने निर्मिलेले ब्रह्मविद्याचे सिद्धांत अभ्यासले नाही, किंवा अभ्यासलेले टाकून दिले आणि कपोलकल्पित शास्त्र निर्माण करून लोकांमध्ये पसवूरून याच्यानेच भले होणार आहे असे प्रतिपादन केले. असा मी प्रतारक आहे. नामधारक वासनिकांना ब्रह्मविद्येत सांगितलेल्या आचारावरची बुद्धी काढून स्वोक्तीच्या आचारावर बुद्धी आणून परधर्मावरून काढले अशा माझे पाप्याला परमेश्वर कसा बरे भेटेल?
उर्मटपणा अंगी फार । फोफावला अहंकार ॥
मी मी करीतसे वारंवार । कैसा प्रभु भेटेल ? ॥ ९ ॥
अर्थ :- माझ्या अंगी फार उर्मटपणा आहे थोड्या मोठ्यांना मी तृणाप्रमाणे कस्पट लेखतो. अहंकाराची वेली माझ्या अंतःकरणात खूप फोफावली आहे, त्या अहंकाराने मी कोणाचीही ऐकत नाही. अहंकारामुळे मी जो आचार करीत आहे तोच श्रेष्ठ आहे असे मानून वारंवार तोच आचार करून देवाला अत्यंत दुखविले. अशा मज देवद्रोहियाला, पाप्याला तो परमेश्वर कसा बरे भेटेल?
सकळांसी म्हणे मी ब्रम्हज्ञानी । परी अंगी कसायाची करणी ॥
नाही क्षमा शांति मनीं । कैसा प्रभु भेटेल ? ॥१०॥
अर्थ :- नूतन अनुसरलेल्या नामधारकांना मी फार ब्रह्मज्ञानी आहे असे सांगत सुटतो आणि नादी लावून घेतो. स्वतःला म्हणवतो ब्रह्मज्ञानी पण माझी करणी कसायाची आहे. माझ्या मनात क्षमा नाही, शांती नाही. उदरभरणातच माझा सर्वकाळ जातो. मी अनुसरलेला असून कधीच हिंसेचा परिच्छेद करीत नाही अशा मज हिंसकाला परमेश्वर कसा बरे भेटेल?
क्षण ही न करी प्रार्थना । सदा हांके जण बैल घाणा ॥
मनुष्य जन्माचा केला विगाणा । कैसा प्रभु भेटेल ? ॥११॥
अर्थ :- हे परमेश्वरा ! मी आपली क्षणभरही प्रार्थना करीत नाही. आणि जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा काहीतरी मागण्यासाठीच प्रार्थना करतो निष्काम भावनेने प्रार्थना करीत नाही. अष्टौप्रहर घाण्याच्या बैलासारखा संसारिक कामांमध्ये व्यापारत राहतो. परमेश्वराला एक क्षणही मी आठवत नाही. मी मनुष्य जन्म निर्फळ केला. देव जोडता नरकच जोडून घेतले. अशा मज आज्ञा भंगियाला परमेश्वर कसा बरं भेटेल?
जो साक्षात् जगदीश्वर । सर्वज्ञ श्री चक्रधर ॥
तयासी म्हणतसे संत थोर । कैसा प्रभु भेटेल ? ।।१२॥
अर्थ :- मोक्षमार्गाची संस्थापना करण्यासाठी युगान् युगी अवतरणारा परमेश्वर श्रीचक्रधरप्रभूंच्या रूपाने साक्षात परब्रम्ह परमेश्वर जगदीश्वर अवतरलेला आहे. आणि मी अज्ञानाने अन्यथा ज्ञानाने त्या परमेश्वराला परमेश्वर न मानून थोर संत पुरुष समजतो. अशा मज अज्ञानाला अन्यथाज्ञानियाला परमेश्वर कसा बरे भेटेल?
कवि :- कै. महन्त श्री लखपति महानुभाव कवीश्वर मनोहर चौक, चांदुर बाजार
------------