संस्कृत सुभाषित रसग्रहण
संस्कृत सुवचनानि
आजची लोकोक्ती - शीलं पृच्छस्व मा कुलम् ।
गुणं पृच्छस्व मा रूपं शीलं पृच्छस्व मा कुलम् ।
सिद्धिं पृच्छस्व मा विद्यां सौख्यं पृच्छस्व मा धनम् ॥
अर्थ :- गुण विचारा (पहा), रूप नव्हे. चरित्र, शील विचारा (जाणा), कुल नव्हे. सिद्धी (कार्य) विचारा, विद्या नव्हे. सुख विचारा, धनसंपत्ती नव्हे. कोणाचीही फाजील चौकशी करणे, विनाकारण दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणे चांगले नव्हेच, पण नतद्रष्ट आणि विघ्नसंतोषी लोकांना मात्र यातच अधिक आनंद मिळतो.
वरील सुभाषित एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीमध्ये काय पाहावे आणि काय पाहू नये हे व्यवच्छेदकपणे सांगते. माणसाच्या रुपापेक्षा त्याचे गुण पाहावेत. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच कुल पाहाण्यापेक्षा माणसाचे चरित्र (आचरण) कसे आहे ते पाहावे, माणूस किती शिकलाय हे पहाण्यापेक्षा त्या शिक्षणातून त्याने काय प्राप्त केलंय किंवा कोणते कार्य पुर्णत्वास नेलंय हे पाहाणे उत्तम होय. त्याच्याकडे 'किती धनसंपदा आहे?' याची चौकशी करण्यापेक्षा तो त्यात 'सुखी आहे का?' हे पाहाणे योग्य.
माणूस वरवर दिसणाऱ्या रूप, कूळ, संपत्तीकडे पहातो पण समोरच्याचे गुण, चरित्र, सुखदुःख जाणायचा प्रयत्न करत नाही. वस्तुतः वरवर दिसणाऱ्या ऐहिक गोष्टींवरून माणसाच्या आत्मिक संपदेचे मूल्यमापन करणे अयोग्यच होय. माणूस खरा काय आहे ते त्याचे आत्मनिष्ठ गुण, चरित्र, आचरण यावर जोखणे उत्तम होय.
संतानीही हेच तर सांगितले आहे. संत चोखा मेळा यांचा अभंग सर्वश्रृतच आहे,
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा।
काय भुललासी वरलीया रंगा॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा।
काय भुललासी वरलीया रंगा॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें।
काय भुललासी वरलिया रंगें॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा॥
वरवरचे रूप किंवा आकार पाहून वस्तूची ओळख करून घेऊ नये. तिचे रुपाच्या पलिकडील गुणही पहावेत. कुळ पाहू नये शील, वर्तन पहावे असे संत तुकोबाराय सांगतात,
कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल त्या ॥१॥
आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥
काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥
फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥३॥
तुका ह्मणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥४॥
अहो कस्तुरीमृग पहा इतर हरिणांपेक्षा त्याचे रूप बेढब दिसते, पण त्याच्या नाभीतील कस्तूरीला भरपूर मोल मिळते. चंदनाची झाडे दिसायला इतर झाडांसारखीच, पण सुगंधामुळे त्यांचे मोल वाढते. परिस हा एक प्रकारचा दगड पण त्याने लोह धातूला स्पर्श केला की त्याधातूचे मोल शतपटीने वाढवतो. पोलादाची फिरंगी तलवार आटवून मिळणाऱ्या धातूला बारा रुके (रुके तुकारामांच्या काळातील खूप कमी किंमतीचे चलन) येतात पण त्याच धातूच्या फिरंगीचे (तलवारीचे) मूल्य मात्र हजारो रुक्यांएवढे असते. तुकाराम म्हणतात म्हणूनच जातीने कोणी उच्चनीच होत नाही. आचरणाला व गुणाला महत्त्व आहे. भगवंताचे नाम ज्याच्या अंतरी सदैव आहे तो धन्य होय.
भट्ट नारायणाने लिहिलेल्या वेणिसंहार नाटकामध्ये कर्णाच्या आणि अश्वत्थामा संवादात कर्ण आपले कर्तृत्व आणि महत्व सांगताना म्हणतो की,
दैवायत्तं कुले जन्मः मदायत्तं तु पौरुषम्।
चांगल्या कुळात जन्म होणे जा नशिबाचा भाग असेल पण कर्तृत्व, पुरुषार्थ मात्र स्वपराक्रमावर ठरतो.
कबिरदास म्हणतात,
शीलवन्त सबसे बड़ा, सब रतनन की खान ।
तीन लोक की सम्पदा, रही शील में आन ॥
चांगले चारित्र्य, सच्छीलता, सदाचरण हे सर्वश्रेष्ठ होय तिन्ही लोकांची संपत्ती एकत्र करूनही त्याबदल्यात चारित्र्य मिळू शकत नाही.
शीलं पृच्छस्व मा कुलम्।
लेखक चिंतन :- अभिजीत काळे सर