महानुभाव साहित्य दर्शन
श्रीरवळोव्यासकृत सह्याद्रिवर्णन
साती ग्रंथातील स्थळवर्णनपर लीळा सांगणारा ग्रंथ म्हणजे
रवळोबासाचे सह्याद्रिवर्णन होय, सातीग्रंथातील हे पाचवे काव्य आहे आणि सातीग्रंथांपेक्षा थोडे वेगळे
म्हणजे पंचकृष्णांतील श्रीदत्तात्रेयप्रभूंविषयीचे हे काव्य आहे. श्रीदत्तावतार हा
महानुभाव पंथात स्वतंत्र अवतार आहे. “सह्याद्रिवर्णन” म्हणजे सह्याद्रीच्या
परिसरात विहरण करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांच्या चरित्रांचे लीळावर्णन होय. “सैह्याद्रमाहात्म्य”
म्हणूनही हा ग्रंथ ओळखला जातो. श्रीरवळोबास किंवा राघोपाध्याय पाथरीकर
असे लेखकाचे नाव आहे. श्रीहिराइसांच्या परंपरेतील हे कवी असून त्यांनी हिराइसांना
गुरु मानले होते. आणि त्यांचे नाव काव्यात गुंफले होते.
तिए हिरांबिकेचा सुतु । राम एणे नामे विख्यात ।
तेणे हा निर्मिला ग्रंथु । वितरागासी ।।५१६।।
ऐसेया ग्रंथाते जे पाठ करिती ।
तया भावपूर्वक आइकती ।
ते याचकही मंगळरुप होती।
म्हणताए रामु ।।५१७।।
महानुभाव
संप्रदायात स्नेहाची, गूरुभक्तीची खूण म्हणून अशाप्रकारे आपला ग्रंथ दुसऱ्याच्या नावावर रुजू
करण्याची प्रथा होती. श्रीकेशराजबास आणि श्रीदामोदर पंडित यांच्या स्नेहासाठी “वछाहरण”
काव्यात म्हणे मुनि केशिराजु असा दामोदरपंडितांनी उल्लेख केलेला आहे. त्याप्रमाणे
गुरुशिष्याची आत्यंतिक आस्था प्रगट करण्यासाठी रवळोबासांनी “हिरांबिकेचासुत”
असे म्हटले आहे.
सातीग्रंथांत शिशुपालवध' आणि सह्याद्रिवर्णन' यांचे स्थान
सांप्रदायिकांनी आणि अभ्यासकांनीही पुढे मागे असे केलेले आहे. त्यासाठी
कालक्रमानुसार या ग्रंथांचे स्थान निश्चित केले पाहिजे. 'सह्याद्रिवर्णन'
च्या प्रस्तावनेत डॉ. कोलते यांनी सहा ग्रंथ संपादित झाले आहेत
म्हणून शेवटचा ग्रंथ 'सह्याद्रिवर्णन' आहे
असे नोंदवून या काव्यास सातवे स्थान दिलेले आहे. यावरून सातीग्रंथांच्या
स्थानाविषयी एककाव्यता नाही असे दिसून येते.
रुक्मिणीस्वयंवर शके १२१४
शिशुपालवध शके १२३४,
उद्धवगीता १२३५,
वछाहरण शके १२३८,
सह्याद्रिवर्णन शके १२७५
ज्ञानप्रबोध शके १३४०,
ऋद्धिपूर वर्णन शके १३४०,
असा काळाप्रमाणे अनुक्रम लावला पाहिजे. सातीग्रंथातील पहिले चार ग्रंथ श्रीकृष्ण भगवंतांच्या जीवनाशी अनुबंधित आहेत. सह्याद्रिवर्णन आणि ऋद्धिपूरवर्णन स्थळमाहत्म्य प्रतिपादन कणारे आहेत आणि ज्ञानप्रबोध श्रीगीतेतील १३व्या अध्यायातील ज्ञानलक्षणांची मीमांसा करणारा ग्रंथ आहे. म्हणजे सातीग्रंथांपैकी पाच ग्रंथ श्रीकृष्णमाहात्म्य सांगणारे व दोनग्रंथ स्थळमहात्म्य सांगणारे असे आहेत. रवळोबासांनी लिपी तयार केली असून तिला ‘सकळलीपी’ असे म्हणतात. तिला नागरलिपी असेही म्हटले आहे. ‘श्रीरवळोबासी सह्याद्रि ग्रंथ केला आन नामाचे दहा ठाय आन नागरलीपी ऐसे केले (अन्वयस्थळ)
सकळिका लिपी रवळोबासी केली असे दत्तमुनी दुतोंडे यांनी म्हटले आहे. रवळोबासांनी सकळी लिपी तयार करण्यात अभ्यासकांनी अनेकप्रकारांनी मतभेद दर्शविले आहेत. ब्रम्हविद्या शास्त्राचे रहस्य ठेवावे अशी स्वामींची आज्ञा म्हणून महानुभाव लिप्यांचा जन्म झाला आहे. यासंदर्भात अन्वयस्थळकार नोंद करतात की “एकदिस रवळोबासी अटणविशेषे मालोबासासी भेटावया पाटुकलेसि गेले. तेथ धर्म गोष्ट करिता मालोबासी म्हणितले : हे काळबोध खरडे इतरांच्या हाती पडतील : शास्त्र भ्रंसेल आणि रहस्य जाईल : तरी बरवी एक लीप करून लिहावी : मग रवळोबासी लीपी केली, तयाचे खर्डे घेऊनि आपलेया लिपीवरी लिहिले.”
बाळबोध देवनागरी
लिपीतील वर्णांचे संकेत बदलून उलटसुलट करून या लिप्या तयार करण्यात आलेल्या आहेत. Code
language and local script अशा दोन्ही पद्धतींनी पुढच्या काळात अंक,
सुंदरी, मनोहर, वज्र
लिपी अशाप्रकारच्या गुप्तलिप्या महानुभावांनी निर्माण केल्या तरीही त्यात आजही
उपलब्ध होणाऱ्या हस्तलिखितांत सकळ लिपीतील हस्तलिखितांची संख्या जास्त आहे. यावरून
सकळी लिपी ही अधिक लोकमान्य आणि लोकप्रिय असली पाहिजे. नागरीलिपीचे महानुभाव संकेत
उलगडले की संहिता संपादनासाठी अडचण पडत नाही. असे प्रयत्न सर्वप्रथम वि. का.
राजवाडे आणि वि. ल. भावे यांनी केले आणि महानुभाव साहित्याचा खजिना मराठीच्या मूळ
प्रवाहात सामावला गेला. अक्षर सकेत, शब्दसंकेत, जोडाक्षरसंकेत, स्वरसंकेत, व्यंजनसंकेतचे
संकेत, संयुक्त व्यंजनांचे संकेत, यांची
उकल करून घेऊन मूळ संहिता डॉ. कोलते यांनी संपादित केलेल्या आहेत. ‘सह्याद्रिवर्णन’ या ग्रंथाच्या संपादनात मूळ
सकळलिपीचे पृष्ठ आणि त्याचे देवनागरीतील लिप्यंतर दिलेले आहे. 'सह्याद्रिवर्णनाच्या पाचशे सतरा ओव्या ही संख्या डॉ. कोलते यांनी विविध
पुराव्यांसह सिद्ध केलेली आहे व या काव्यावरील टीपग्रंथही उपलब्ध करून दिलेला आहे.
श्रीदत्तराज मराठे महानुभाव यांच्या तिसऱ्या शोधणीच्या टीपग्रंथातील समाप्तिलेखात
एका संस्कृत श्लोकात सातीग्रंथांचा उल्लेख आलेला आहे.
‘‘वत्साहरण अग्रेकादशत्रयं सैह्याद्रसवर्णनं पौरं ऋद्धपूरवर्णनं गुढमहत् ज्ञानप्रबोध ज्ञेयं अये ग्रंथ नरेंद्र पालनशिष्य सप्तंच कृष्णान्वयं’’
ऐसे हे सातही ग्रंथाचे शोधणे केले बहुत प्रयत्न करूनी : एवं सातही ग्रंथाचा शोधनीचा टीप संपूर्ण शुभं भवतु १४ व्या शतकातील हा टीपग्रंथ आहे. ‘सह्याद्रिवर्णन’ या ग्रंथात सह्याद्रीवर वास्तव्य करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांचे चित्रण आलेले आहे.
महानुभाव संप्रदायात पंचकृष्णांची चरित्रे गायिली गेली आहेत. श्रीकृष्ण आणि श्रीदत्तात्रेयांचा अवतार सर्वच भारतीय सांप्रदायिकांनी स्वीकारला आहे देवता म्हणून किंवा ईश्वरीरूप म्हणून. महानुभाव पंथातील श्रीदत्तमूर्ती एकमुखी अशी आहे.
‘सह्याद्रिवर्णन’ या काव्यात श्रीदत्तावताराच्या सह्याद्री परिसरातील विहरणाच्या गुणलीळा वर्णन करण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. सातीग्रंथात एक साम्य असे आढळते की चरित्रलीळा कुण्याही अवताराच्या असल्या तरी त्या वर्णनाची परिणती श्रीचक्रधरमाहात्म्य वर्णनाशी येऊन पोहोचते. श्रीकृष्णकथा असो, श्रीदत्तकथा असो, तत्त्वज्ञान विचार असो किंवा स्थळमाहत्म्य असो, सर्व कथेचा प्रवाह आणि वर्णनाचा ओघ श्रीचक्रधरमहात्म्याशी येऊन पोहोचतो इतका मोठा प्रभाव श्रीचक्रधरस्वामींच्या व्यक्तित्वाचा आणि विचारसरणीचा सर्वच महानुभाव साहित्यात दिसून येतो. अर्थात याला कारणेही अनेक आहेत एकतर श्रीचक्रधरांनी पंथाची स्थापना करून तत्त्वज्ञानाची मांडणी व आचारधर्माची साधना पंथीयांना दिली. ते स्वतः विचारवंत कार्यकर्ते होते व सतत अटणविजन करीत असत. त्यांचे विचार कर्मकाण्डात्मक नसून अधिक पुरोगामी आणि स्त्रीपुरुष समान अधिकार स्वीकारणारे असे होते. गीतेला अनुसरतांनाही द्वैतवादाचा पुरस्कार करून स्वतंत्र ‘दर्शन’ त्यांनी मांडून दाखविले. मराठी बोलीभाषेला धर्मभाषेचे स्थान दिले व तसे लेखन पंथीयांकडून करून घेतले. आचार आणि विचार यांमध्ये सामंजस्य निर्माण केले. देशीयतेचा पुरस्कार केला.
या सर्व बाबींचा खोलवर परिणाम समाजमानसावर झाला आणि पंडितवर्गासह स्त्रियाही
या पंथाकडे आकृष्ट झालेल्या होत्या. पुनः काळाच्या जवळचा अवतार असल्यामुळे
पंचकृष्णांपैकी इतर अवतारांपेक्षा श्रीचक्रधरस्वामींचा प्रभाव मनस्वी ठरला.
श्रीचांगदेवराउळांचा आत्मा, हरिपाळदेवाचे शरीर आणि
श्रीगुंडमराऊळांचे शिष्य असे त्यांच्या व्यक्तित्वाचे स्वरूप असल्यामुळे लोकमानसात
त्यांची प्रतिमा पंचकृष्णरूप घेऊनच अवतरली. त्यामुळे सर्व महानुभाव साहित्यात
पंचकृष्णांसह श्रीचक्रधरस्वामींचे गुणवर्णन केले गेले. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची
म्हणजे श्रीदत्तात्रेयांना निमित्त करून श्रीचक्रपाणिं महाराजांनी ज्ञानशक्ती
प्रकट केली व श्रीचक्रपाणिं महाराजांपासून श्रीगोविंदप्रभुंनी शक्ति प्रकट केली. व
श्रीगोविंदप्रभुबाबांना निमित्त करून सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी शक्तिस्वीकार
केला. असा विशेष संबंध पंथामध्ये आहे.
‘‘तुमचेनि प्रसादे पवित्रे । बोलैन श्रीदत्ताची चरित्रे’’
हे प्रयोजन घेऊनच
सह्याद्रिवर्णनाची निर्मिती झालेली आहे. पंचकृष्णविषयक चिंतन म्हणजे महानुभाव
गद्यपद्य साहित्य होय. आणि त्या साहित्याने अर्थ निर्णयन, चिकित्सा,
सिद्धान्तन म्हणजे स्थळबंदग्रंथांसारखे शास्त्रीय परिभाषा सिद्ध
करणारे आणि मांडणी करणारे ग्रंथ होत. त्यामुळे पंचकृष्णांपैकी पहिला अवतार
श्रीदत्तात्रेयाचा असूनही 'सह्याद्रिवर्णनाचे लेखन
रुक्मिणस्वयंवर, शिशुपालवध, उद्धवगीता
आणि 'वछाहरण' या ग्रंथानंतर झालेले
आहे. पुनः सातीग्रंथांतील ग्रंथशीर्षके त्याचा ग्रंथाचा आशय स्पष्ट करणारे असे
आहेत. त्याही दृष्टीने ‘सह्याद्रिवर्णन’ हे शीर्षक वेगळे ठरते. श्रीदत्तात्रेयांचे क्रीडास्थान म्हणून ‘सह्याद्रिवर्णन’ असे दिसून येते. माहूरचा परिसर हा
'सह्याद्रिवर्णन' काव्याचा आणि श्रीदत्तात्रेय
क्रीडेचा परिसर आहे. रेणुकामंदिरापासून जवळच महानुभाव मठ आजही भक्तांचे स्वागत
करतो. याच गडावर दत्तमंदिरही आहे. यावरून दैवतांच्या पूजनातील स्वातंत्र्य,
पंथीय स्वातंत्र्य आणि आराधनेचे स्वातंत्र्य लक्षात येते.
‘सह्याद्रिवर्णन’ काव्य
श्रीदत्तचरित्रलीळा सांगणारे असले आणि स्थळमाहात्म्य सांगणारे असले तरी या काव्यात
श्रीचक्रधरस्वामीनिष्ठा अतिशय प्रभावी झालेली आहे. लीळाचरित्रात सैह्याद्रिलीळा
म्हणून ज्या लीळा असलेल्या आहेत त्यांचा आधार या काव्यापाठीमागे आहे आणि स्वतः
कवीनेच -
म्हणे तुमचेनि प्रसादे पवित्रे । बोलैन श्रीदत्ताची चरित्रे
जयाचेनि श्रवणी मात्रे। जीव चोखाळती (२०)
असे म्हटले असले तरी कविमनाची ओढ विशेषत्वाने श्रीचक्रधरगुणवर्णनपरतेकडे असलेली दिसते आणि कवीची आत्मनिष्ठाही या काव्यात प्रभावी ठरलेली आहे. म्हणजे श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र + परिसरदर्शन + श्रीचक्रधरप्रभू अवतार दर्शन + आत्मनिष्ठपातळीवरील अनुभूती यांमधून सह्याद्रिवर्णन हे काव्य आकारास आलेल आहे. सातीग्रंथातील इतर काव्यातून अशी आत्मनिष्ठा दिसत नाही त्यामुळे ही आत्मनिष्ठा हे या काव्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कारण त्या अनुभूतीतून कविप्रतिभा आणि त्याची सौंदर्यदृष्टी, जीवनदृष्टी यांचा पडताळा येतो आणि भक्तिविचारात आत्मपरता मिसळून जाते. डॉ. कोलते यांनी म्हणूनच या काव्याला 'आत्मनैपदी' असे संबोधिले आहे.
श्रीचक्रधरस्वामींनी श्रीदत्तात्रेयांविषयी जी चार सूत्रे सांगितली त्यातील एक म्हणजे या मोक्षमार्गास श्रीदत्तात्रेयप्रभु आदिकारण आहेत. श्रीदत्तात्रेयप्रभु हा चतुर्युगीचा अवतार आहे. म्हणजे त्रेतायुगात तो असून नंतरही विद्यमान अवतार म्हणून पंथाने मान्य केलेला आहे. आणि त्यांचे अमोघ दर्शन आहे असे श्रीचक्रधरस्वामींनी म्हटले आहे आणि असे दर्शन ज्यांना घडते त्यांची तापचक्रे नष्ट होतात. अळर्कराजाचे ताप अशाप्रकारे नष्ट झाले होते. श्रीदत्तात्रेयदेवाची वाणी अमृतवर्षिणी अशी आहे. रवळोबासांनी या सूत्रांचा परिचय करून दिलेला आहे.
ऐसेया श्रीदत्ता सुवेषा : मार्गादिकारणा विशेषा
प्रवृत्ति जाली परेशा : उभय शक्तिदानाची (१८२)
माहूरचा डोंगर म्हणजे सह्याद्रीचा कडा असून तेथे
श्रीदत्तात्रेयप्रभूंचा निवास आहे व तेच पंथाचे आदिकारण पहिला अवतार होत. माहूर
मातापूर-रेणुकापूर कधी उत्पत्ती पंथ मानत नाही. वास्तविक देवीच साडेतीनपीठांपैकी
एक अत्यंत महत्त्वाचे पीठ म्हणजे मातापूर माहूर आहे. त्यामुळे जे देवीभक्त आहेत
किंवा रेणुकाभक्त आहेत ते रेणुका परशुराम वास्तव्याने पवित्र झालेले क्षेत्र
मानतात आणि जे महानुभाव पंथीय भक्त आहेत ते मातापूर म्हणजे दत्तमातेचे पूर अशी
उत्पत्ती सांगतात कारण सह्याद्रिवर्णनातही ती आलेली आहे.
जीवा जननी श्रीदत्तमाता : तीएचा हेतु क्रिडा
करीता
निक्षेपिला जेथ तत्त्वता : ते मातापूर बोलिजे
(१६७)
मातापूर म्हणजे दत्तमातापूर असे का? रेणुकामातपूर असे का नाही?
तर
सकळ स्नेहाचा निधि दातारू :
म्हणौनिचि माता म्हणितले ईश्वरू :
तरी प्राकृतेचा निर्धारू : पृथ्वी रेणु जैणा (१६५)
रवळोबासांनी ईश्वररूमाता (श्रीदत्तमाता) आणि प्राकृतारेणु
(रेणुका) असा भेद केलेला दिसतो. प्राकृतांची म्हणजे सर्व सामान्यांची देवता असा
घेता येईल. महानुभाव पंथाचे आदिकरण श्रीदत्तात्रेयप्रभू आणि श्रीदत्तसंप्रदायातील
गुरुचरितात वर्णिलेली श्रीदत्तात्रेय देवता या एकाच स्वरूपाच्या नाहीत त्यात वेगळेपणा आहे. तो डॉ. वि. भि. कोलते यांनी अनेकवेळा स्पष्ट केलेला आहे. महाराष्ट्रात
पाच संप्रदायात श्रीदत्तसंप्रदायाला फार महत्त्वाचे स्थान आहे आणि एकनाथांनी
श्रीदत्तसंप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केलेला होता.
विविध संप्रदायांच्या अभ्यासातून तत्कालीन सांस्कृतिक आणि धार्मिक परिवर्तनाची
दिशा स्पष्ट होत जाते. श्रीदत्तसंप्रदायातील दत्त त्रिमुखी आहे.
महानुभावपंथातील श्रीदत्त एकमुखी आहे. ‘सह्याद्रिवर्णना’त श्रीदत्तात्रेयाच्या
लीळाचरित्राचे भक्तिमूळ अंतःकरणाने केलेल गायन आहे. आणि त्यात
श्रीचक्रधरप्रभूमहिमा आणि वर्णनपरता मिसळून गेलेली आहे. याच काव्याच्या
शीर्षकावरून सातीग्रंथातील अखेरचा ग्रंथ ‘ऋद्धिपूर वर्णन’
असा तयार झालेला आहे. वर्णन म्हणत असता भक्तियुक्त मनाने केलेले
ऐसपैस चिंतन आणि ‘सह्याद्रि’ म्हणजे
एकमुखी आदिकरण असलेल्या श्रीदत्तावताराचे विहरण झालेले स्थळ
त्यांचे केलेले चिंतन म्हणजे सह्याद्रिलीळा चरित्रवर्णन होय. सातीग्रंथात म्हणून
हे काव्य वेगळे ठरते.
'सह्याद्रिवर्णन' या काव्याच्या संपादकीयात पृष्ठ ४४ वर डॉ.
कोलते यांनी 'सह्याद्रिवर्णन : श्रीदत्तसंप्रदायाचा पहिला
ग्रंथ' असे शीर्षक देऊन मीमांसा केलेली आहे.
सह्याद्रिवर्णनात श्रीदत्तात्रेय प्रभुवर्णन आणि माहात्म्य वर्णिले आहे तसेच
श्रीचक्रधरस्वामींच्या अवताराचे विशेष सांगितलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात
प्रभावी असलेल्या दत्तसंप्रदायाशी नाते नसले तरी अवतारवर्णन म्हणजे संप्रदायग्रंथ
ठरू शकतो का? महानुभाव संप्रदायात पंचकृष्णांतही
श्रीदत्तात्रेयप्रभू आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्याशीच पुढील तीन अवतार म्हणजे
श्रीचक्रधरप्रभू श्रीगोविंदप्रभू आणि श्रीचक्रधरप्रभू अनुबंधित आहेत. आणि
श्रीचक्रधरस्वामींनी खुद्द 'श्रीदत्तात्रेयप्रभु आदिकरण'
असे म्हटलेले आहे त्यामुळे प्रस्तुत काव्याच्या आशयाचे अनुभवाचे आणि
आविष्कारचे मूलबंध तपासले असता हा काव्यग्रंथ महानुभाव तत्त्वज्ञान आणि आचारधर्म
सांगणारा असाच ग्रंथ ठरतो त्यात श्रीदत्तात्रेयप्रभू अवताराचे लीळादर्शन घडलेले
आहे.
सह्याद्रिवर्णनाच्या
ओव्या ७२९ की ५१७ यावर विचार केला पाहिजे. पाठसंशोधनात प्रक्षेप आणि अवक्षेप
यामुळे ग्रंथारंभी किंवा ग्रंथाच्या अखेरीस अशा गफलती होतात. नकलनविस आपल्या ओव्या
त्यात मिसळून टाकतो. कधी ओव्यांच्या धावत्या आकड्यांमध्ये घोटाळा होऊ शकतो आणि
त्यामुळे संख्या बदलू शकते. परंतु सातीग्रंथांची उपलब्धी साधारणतः एका एका पोथीत
एकामागे एक अशी झालेली आढळून येते. सह्याद्रिवर्णन' आणि
'सह्याद्रिमहात्म्य' यामधील ओव्यांचा तौलनिक
तक्ता देऊन डॉ. कोलते योनी जास्तीच्या ओव्यांची मीमांसा केलेली आहे. त्यासाठी
त्यांना सात पोथ्या उपलब्ध झालेल्या होत्या. त्यावरून त्यांनी 'सह्याद्रिवर्णना'ची प्रमाणप्रत सिद्ध केलेली आहे.
तिच्याही अखेरीस 'एवं सैह्याद्र महात्म्य समाप्तमगमत्त'
असे म्हटल्यावरही चार ओव्या जास्तीच्या दिलेल्या आहेत त्यावरून
पोथीचा स्थळकाळ आणि नकलकाळ याचा संदर्भ मिळतो.
पहिल्या वीस ओव्यात मंगलाचरण आलेल आहे. नंतर १६८ ओव्यातून श्रीदत्तात्रेय चरित्रलीळावर्णन आलेले आहे. श्रीचक्रधरमूर्तीचे वर्णन, त्यांची वेधशक्ती, बोधशक्ती, प्राप्तीसाधने, मार्ग अशा जवळ जवळ साडेतीनशे ओव्या श्रीचक्रधरविषयक आहेत. त्यापुढे स्वदोषांपुळे उद्धार होत नाही म्हणून दोषविरहित होऊन उद्धार करण्याविषयीची अपेक्षा व्यक्त झालेली आहे. आणि अखेरीस फलश्रुती सांगितली आहे. यावरून या काव्याचे सरळ दोन भाग करता येतात. पूर्वाध हा वस्तुविवेचनात्मक असा आहे आणि उत्तरार्ध स्वोद्धारार्थ केलेले आत्मनिवेदन आहे. श्रीदत्तात्रयप्रभूंच्या लीळावर्णनाच्या निमित्ते एकूणच सांप्रदायिक म्हणून आलेली अनुभूती रवळोबासांनी व्यक्त केली आहे. पंचकृष्णांविषयी आणि विशेषतः श्रीचक्रधरांविषयी सर्वपंथीय लेखकांना आदरभाव तर होताच पण ते कृतज्ञही झालेले होते. श्रीचक्रपाणी महाराज, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्रीचक्रधरस्वामी ते अशी पंचकृष्णांपैकीच्या अवतारांची उत्कट चित्रणे रवळोवास करतो. डॉ. तुळपुळे यांनी मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड १ यांत श्रीदत्तचरित्रलीळावर्णन लौकर संपल्यामुळे रवळाबसाने काव्य वृद्धीसाठी श्रीचक्रधरप्रभू चिंतन केलेल असावे अशी शंका उपस्थित केलेली आहे (पृष्ठ ३८८). वस्तुस्थिती तशी नाही. एकूणच महानुभाव साहित्यातून प्रगट होणारे महानुभाव मन लक्षात घेतले तर दिसून येते की सर्व पंचावतारात श्रीचक्रधरस्वामी यांचा अवतार पंथीय वाङ्मयातील कंठमणी आहे त्यामुळे उलट श्रीदत्तचरित्रलीळवर्णनाशी श्रीचक्रधरभक्ती कवीने जुळवून घेतलेली दिसते. संपूर्ण काव्यात आपण श्रीदत्तचरित्रवर्णन करीत आहोत ही भूमिका कवी पुनः पुन्हा सांगतो त्या अनुषंगाने श्रीचक्रधरचिंतन कसे एकात्म, आत्मरूप आहे यावरही भर देतांना दिसतो. हे त्यांचे कसब लक्षात घेतले पाहिजे व कवीची भावावस्था कशी श्रीचक्रधरचिंतनाकडे ओढ घेते हे बघितले पाहिजे.
श्रीदत्तात्रेयमूर्तिवर्णन आणि श्रीचक्रधरमूर्तिवर्णन यात साधर्म्य आले आहे ते याच भूमिकेतून कल्पनाविलास साधल्यामुळेच! आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 'नामाचे दहाठाय' आणि 'सह्याद्रिवर्णन' या दोनच रचना रवळोबासाच्या नावावर आहे. त्याच्यासमोर भास्करभट्ट, दामोदर पंडित, वारकरी संप्रदायाचे कवी होते. तो प्रतिभावंत असल्यामुळे 'सह्याद्रिवर्णन' हे काव्यलेखन त्याने केले पण त्यात महानुभाव काव्याची जी नमनाची परंपरा आहे ती त्याने अनुसरलेली नाही. सुरवातीच्या पाच ओव्यात श्रीचक्रपाणी चिंतन व प्रार्थना तो करतो. परंपरेपेक्षा वेगळ्या दिशेने जाण्याचा हा प्रयत्न ठरतो. श्रीचक्रपाणी नमनात सूर्याची उपमा दिलेली आहे.
ज्ञानेश्वरी तशी निवृत्तिनाथांना
चित्त्सूर्याची उपमा दिलेली आहे. श्रीचक्रपाणीही स्वयंप्रकाशी, नित्यतेज अधिष्ठाता असे आहेत. सूर्य उगवल्याने अंधार नाहिसा होतो तसा
श्रीचक्रपाणी आनंदसविता उदयाला येताच जीव आणि पशू यांचे मोहंधकाररूपी बंध तोडून
टाकतो. उपासकांना परमलभ मिळवून देतो. तो 'दैवी सूंदर्ये बरवा'
आहे अशा श्रीचक्रपाणीच्या कृपाप्रसादाने मी श्रीदत्तात्रयाचे
मूर्तिलीळा वर्णन करतो. ज्या श्रीदत्तात्रयाचे नुसते नामस्मरण केले तरी संसार
शत्रूसमूह पराभूत होतो. ब्रह्मादिक त्याचे वर्णन करू शकत नाही 'परा' ही वाणीही आश्चर्यचकित होते तेथे माझ्या
प्राकृत बोलीचा काय अभिमान धरावा. तरीही माझी बोली वेधून घेतली गेली आहे. म्हणून
श्रीमूर्तिवर्णनात माझी रसना 'कवतीकैली' अशी झाली. ग्रंथाच्या निमित्ताने मी परमेश्वराचे रात्रंदिवस स्मरण करीन.
अशापद्धतीने श्रीचक्रधरप्रभू , श्रीकृष्ण भगवंत, श्रीनागार्जुन, यांचे स्मरण कवीने केलेले आहे. आणि
या सर्वांच्या कृपाप्रसादामुळे मी पवित्र असे श्रीदत्तात्रयचरित्र मी गात आहे. आणि
त्याच्या श्रवणाने जीवांचा उद्धार होतो.
श्रीदत्तात्रेयाची
मूर्ती कशी आहे हे सांगण्यापूर्वीी कवीने प्रास्ताविक मंगलाचरण पूर्ण केले आहे.
श्रीभास्करभट्ट, श्रीदामोदरपंडित, श्रीनरेंद्र
या कवींवर संस्कृत महाकाव्यांचा जसा प्रभाव आहे आणि तो प्रभाव मंगलाचरणातून स्पष्ट
होतो तसा प्रभाव सह्याद्रिवर्णनाच्या प्रास्ताविक मंगलाचरणावर नाही.
श्रीदत्तात्रेयाची मूर्ती म्हणजे दिव्यप्रभेचा पुतळा, सुखाचा
एकवळा, चैतन्य कनकाचा लामण दिवा, आनंद
मृगांक अशी आहे.
जऱ्हीं संध्यारागाचे सदा : काले दिगेती दूनदा
तेही ते आंगकांतीसी कदा : उपमू नए ।।३१।।
कनकगीरीचा गाभा सोलूनी । वरि सूर्यप्रभा संचरौनि
वोप सारिजैल घोटाळुनि । तऱ्हीं उपमा नव्हे ।।३२।।
श्रीदत्तात्रयाचे मूर्तिवर्णन अशाप्रकारे मस्तकापासून
चरणांपर्यंत कविने सुंदर पद्धतीने केलेले आहे. संस्कृतमहाकाव्यातील वर्णनांच्या
धर्तीवर ही रसोत्कटता कवीने साधलेली दिसते पण तिच्या पाठीमागचे उद्दिष्ट मात्र 'जन्मजीवितजावो' हे असून भक्तियुक्त अंतःकरणाने आपल्या इष्ट अवतारांचे स्मरण कवीने केलेले
आहे. यावर्णनात आणि पुढेही स्मरणभक्तीचा परमोच्च झालेला आढळून येतो पण त्याच बरोबर
हे काव्य मी निर्माण करीत नसून हिराहसा (हिरांबा) हिने रचले आहे अशी कृतज्ञता
श्रीदामोदरपंडित, श्रीकेसोबास यांच्याप्रमाणे
श्रीरवळोबासांनीही व्यक्त केली आहे.
ते करील हीरांबा सुंदरी । हा ग्रंथ झंकार (१९)
तो सांगैन मंगळावसरू । हीरांबिका म्हणे (१८३)
अल्पज्ञान करीन वाचे । हीरांबिका म्हणे (३९२)
हे आइकै वीनती पुरुषोत्तमा । हिरांबिका म्हणे
(५१५)
यावरून आपल्या ग्रंथझंकाराचे, ग्रंथमाळेचे, वाक्पुष्पांचे
कर्तृत्त्व माझे नसून हिरांबिकेचे आहे असे कवी म्हणतो. ग्रंथ महिमा सांगतांनाही
अखेरीस हीच भावना कवी व्यक्त करतो.
तिए हिरंबिकेचा सुत। राम एणे नामे विख्यातु
तेणे हा निर्मिला ग्रंथु । वितरागासी (५१६)
रवळोबासांची गुरुपरंपरा जनार्दन (जानोपाध्ये)- कमळांबा- हिरांबिका राम (रवळोबास). कविमुद्रा म्हणून राम ५१६-५१७ या ओव्यांमधून ही मुद्रा आलेली आहे. गुरुभक्तीचा परमोच्च कवि कर्तृत्त्व मुद्रा देऊन रवळोबासाने सह्याद्रिवर्णनाचे श्रेय श्रीहिरांबिकेला दिलेले आहे. ‘हिराइसाचे शिष्य रवळोबास’ अशी कवीची पंथामध्ये ख्याती आहे. श्रीचक्रपाणिनमन, श्रीदत्तात्रेयनमन, मंगळाचरण, श्रीकृष्णनमन, श्रीनागार्जुन नमन अशी प्रास्ताविक करून श्रीमूर्तिवर्णना (श्रीदत्तात्रेयप्रभू) कडे कवीने लक्ष पुरविले आहे.
घेऊनि माणिकांचे तेज । काढुनि संध्यारागाचे निज
एकत्र केले तर्ही करांबुज । अधिक दिसे ।।९८।।
कैसी दश आंगुळिया यूक्त । नखे सांगो क्षणोक्ती
निर्मळ तेजिठे आरक्ते । जेहि चंद्र जिंतीला ।।९९।।
कैवल्य दुर्गासारखे स्कंध, सुकुमार श्रीअधर,
त्रीरेषा कंठ, परमानंदीप्रभा असलेला
श्रीमुखचंद्र, आनंदाची खोटी असली हनुवटी, दर्शनप्रभा व्यक्त करणारी वोष्टपुटी, लावण्याचे सार
असलेली नासिका, पद्मपत्रवत कर्णभूषण, सर्गकप्यची
भृकुटीद्वय, देवळाच्या कळसाप्रमाणे असलेला श्रीमुकुट,
असा श्रीदत्तात्रेय अत्रीनंदन असून तो उत्तम लोकरूप आहे. तो
सह्याद्रिमुकुटावार राज्य करतो. आणि श्रीनागार्जुनाचा स्वामी असलेला
श्रीदत्तात्रेय कृपादृष्टीने सर्वांचा उद्धार करतो. त्याने अलर्काला उपदेश केलेला
आहे. सहस्रार्जुनाला वरप्रदान आणि देवतांची व्यावृती केलेली आहे. त्याचा महिमा कसा
वर्णन करावा.
ज्या सह्याद्रिवर
परशुरामाला श्रीदत्तदर्शन घडले तो परिसर कसा आहे याचे कल्पनापूरित रसोत्कट
शब्दचित्र कवीने रेखाटले आहे. कैलास आणि वैकुंठही फिके पडावे असा तो
सह्याद्रिवर्णन आहे.
काय सांगो तेथिची झाडे । तीए पाहुनि सुरतरु
बापुडे ।
तया फळभोगु जोडे । श्रीदत्तदर्शने ।।१५५।।
कल्पतरूसी स्पर्धा करीत । तैसे दिसती गगन चुंबीत
।
ते विजकुळी सेविजत । साए म्हणौनि ।।१५६।।
मयूरांचिया केका । षट्पदांचे झंकारु आहका ।
पंचमाळापु सुकसारिका । कोकिळांचे ।।१५७।।
जेथ सरोवरी बहुवस । चक्रवाक राजहंस ।
तयांचे कळरव सुरस । काइ सांगो ।।१५८।।
ऐसे पंचमाळापी निरंतर । गाजतारा अंबर ।
ते जैसे स्तुति करिते द्वीजवर। श्रीदत्तात्रयाची
।।१५९।।
अशा रम्य पसिरात परशरामाला दत्तदर्शन घडलेले आहे.
श्रीदत्तात्रयाची मूर्ती जशी अलौकिक आहे तशीच श्रीचक्रधरस्वामींची आहे. ते
परमदैवाचा आनंदरसाचा पुतळा आहेत. श्रीमूर्ती चांपेगोरटी आहे. त्यांची अंगकाती
टवटवीत सुवर्णकमळाप्रमाणे कुंकुमरस आणि अरुणरंग यांची पाखाळलेली अशी तेजः पुज आहे.
श्रीदत्तात्रयाचे मूर्तिवर्णन आणि श्रीचक्रधरस्वामींचे मूर्तिवर्णन एकसारखे आहे
असा आक्षेप डॉ. कोलते यांनी सह्याद्रिवर्णनाच्या प्रस्तावनेत घेतलेला आहे (पहा
पृष्ठ ५६-५७). परंतु हे वर्णन पंचकृष्णांपैकी पहिला अवतार व पाचवा अवतार यांचे आहे
त्यामुळे तोडीसतोड होण्याची गरज कवी म्हणून रवळोबासाला जाणवली असली पाहिजे.
श्रीदत्तात्रयांचे चरणांपासून मस्तकापर्यंत अनुक्रमाने वर्णन आलेले आहे तसे श्रीचक्रधरस्वामींचे
नाही याच्या आधाराने या सारखेपणाची चिकित्सा करता येते. संस्कृत साहित्यशास्त्रात
महाकाव्याची जी लक्षणे मानलेली आहेत त्यांची ओळख कवीला आहे. त्याप्रमाणे सांगरूपक, उपमांच्या मालिका, अतिशयोक्ती अन्वय व्यतिरेकात्मकता यांची पेरणी कवीने केलेली आहे.
श्रीदत्तात्रेय आणि श्रीचक्रधर यांचा महिमा त्यांच्यापासून प्रात झालेली वेधशक्ती,
तापत्रयांचा विनाश, संतमहंतांचे
ऐश्वर्यभक्तिमार्गाचा महिमा वर्णन करून कवीने आपले भक्तिमूल मन मोकळे केलेले आहे.
आणि या ग्रंथाची फलश्रुती सांगितली आहे. यावरून कवीचे काव्यलेखनामागील उद्दिष्ट
स्पष्ट होते.
ऐसेया ग्रंथाते जे पाठ करिती ।
तथा भावपूर्वक आइकती
ते वाचकही मंगळरूप होती । म्हणताए रामू ।।५१७।।
यावरून कवीचे काव्यप्रयोजन स्पष्ट होते. कवीचा दृष्टिकोण
पंथीय स्वरूपाचा असला तरी त्याला अभिजातकाव्याचे निकष परिचित आहेत. त्यामुळे नायकाचे
धीरोदात्तवर्णन आणि भक्ति मूळक असे भक्तीशी असलेले संबंध श्रीदत्तात्रय आणि
श्रीचक्रधर यांच्या मूर्तिलीळावर्णनातून विरुक्त झालेल्या आहेत त्यापाठी पंथनिष्ठा
प्रभावी ठरली आहे.
'रुक्मिणीस्वयंवर', 'शिशुपालवध' आणि 'वछाहरण'
या सातीग्रंथातील काव्यापेक्षा सह्याद्रिवर्णना या काव्याचे पोत
वेगळे आहे. काथात्मकता, नाट्यपूर्णता, संवादचातुर्य,
शैलीविन्यास आणि वर्णनपरता या पंचांगांपैकी सह्याद्रिवर्णनात फक्त
वर्णनपरता आणि रसोत्कट कल्पनाविलास आलेला आहे. त्यामुळे या काव्याला आख्यानकाव्या
किंवा कथाकाव्य यांचा दर्जा देता येणार नाही तर हे एक एकपोती सरलोक्ती करणारे आणि
अवतार माहात्म्य सांगून त्या अवताराला शरण जाणाऱ्या कवी मनाचे हृद्गत आहे.
ईश्वरलीळागुणवर्णनात तल्लिन झाला असताही आपण किती सामान्य हीनदीन आहोत याची खंत
कवी वारंवार व्यक्त करतो. संस्कृत महाकाव्याच्या संस्कारातून काव्याची मांडणी
करण्याचा प्रयत्न कवीने कलेला आहे. त्यातून त्याच्या अन्तःकरणातील भक्तीच्या
उभडांची कल्पना येते. वारकरी संप्रदायातील कवींनी जसा करुणापूर्ण आत्मसंवाद केलेला
आहे. तसाच याही काव्यात दिसून येतो. पण पंथीय प्रखरता आणि द्वैत तत्त्वज्ञानाची
बांधणी यामुळे हे काव्य वाचनीय आणि श्रवणीय फारसे होत नाही; याचीही
कल्पना कवीला असलेली स्पष्ट दिसते. त्यामुळे अलंकरांचा मूर्तिवर्णनाचा भव्यदिव्य
आणि उदात्त आविष्कार त्यातून घडतो. सुरवातीला वर सांगितलेल्या काव्यात संघर्षपूर्ण
जीवनचित्रण आहे, गोळीबंद कथानक आहे, हर्षामर्षाचे
डावपेच आहेत, व्यक्तिदर्शनाचे कौशल्य आहे खळदुर्जनांचा
नायनाट आणि सत्पक्षाचा विजय अशी कथेची रेखीव वीण घातलेली आहे. विनोदीप्रसंगांची
पेरणी आहे. त्यामुळे ती काव्ये अधिक लोकप्रिय ठरणे स्वाभाविकच होते तशी लोकप्रियता
मात्र 'सह्याद्रिवर्णन' या
काव्याला मिळालेली नाही. विदग्ध काव्यनिर्मितीचा प्रयत्न म्हणून या काव्याला
महत्त्व मिळते. कवीची सौंदर्यदृष्टी त्याचा अलंकरण योजनेतून आणि मूर्तिवर्णनातून
प्रत्ययाला येते. काव्याचा उपक्रम, उपसंहार परंपरेनुसार करून
अखेरीस फलश्रुती सांगितली आहे. तसे हे काव्य ‘रुक्मिणीसवयंवर', 'शिशुपालवध' आणि 'वछाहरण'
यांच्या प्रमाणे अनेकपदरी सूक्ष्मसखोल असे नाही तर त्यातील आशय सरळ
एकरेषी मूर्तिवर्णनपर असे आहे. तरीही त्यातवेगळेपणाचे कौशल्य दिसून येते. भावपरता,
आत्मानुभूती आणि रसोत्कट कल्पनाविलास हे या काव्याचे विशेष आहेत.
श्रीदत्तात्रेय आणि श्रीचक्रधर या दोन्ही अवतारांचे मूर्तिवर्णन प्रस्तुत काव्यात
आलेले असल्यामुळे या काव्याला 'सातीग्रंथात स्थान मिळाले
असावे.
‘सह्याद्रिवर्णन' या काव्याची दखल पंथीयात घेतलेली दिसते. 'चरित्रआबाब' या ग्रंथात 'सुंदरलीपी सैह्याद्रवर्णनः
रवळोबासाने संबंधीले' किंवा कृष्णमुनीच्या अन्वयस्थळात ‘हिराइसाशिष्यः रवळोबास व्युत्पन्नः सह्याद्रवर्णनः ग्रंथ केला' रवळोबास भक्तिमार्गाचे अनन्य उपासक असले तरी डॉ. अ. ना. देशपांडे म्हणतात
त्याप्रमाणे त्यांची कवीची भूमिका नव्हती असे म्हणून चालणार नाही. त्यांनी केलेली
रूपकरचना, प्रतिमा, प्रतीके, उपमादृष्टान्त, वर्णनपरता बघितली तर लक्षात येते की
कृष्णमुनी म्हणतात त्याप्रमाणे रवळोबास व्युत्पन्न होते. आणि प्रखर पंथनिष्ठ हे
त्यांचे वैशिष्ट्य होते.
ईश्वरगुणवर्णन हा या काव्याच्या प्रयोजनाचा प्रमुख घटक आहे.
तयाचे नामादि सद्गुण । अहर्निशी मी स्मरेन ।
अमोघा लीळाही वर्णिन। मिषे ग्रंथाचेनि ।।१०।।
असे ईश्वरगुण संकीर्तन करतांना माणूस परिपूर्ण नसतो
त्याच्या ठिकाणी अपूर्णता असते उणीवा असतात.
कां ते उणीव किती सांघावी । परिवर्णवा ऐसे उपजत असे
जीवी ।
बोलता सुख होत असे ते केवी । सांघो जाणिजे ।।२०२।।
उणीवा कितीही
असल्या तरी मनात मात्र ईश्वरगुणवर्णनाची इच्छा प्रभावी असते. तसे केले की त्यामुळे
होणारे सुख अपरंपार असते. असा स्पष्ट प्रयोजन विचार कवीने मांडलेला आहे.
'महानुभावपंथ आणि
त्याचे वाङ्मय' या डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या ग्रंथात
महानुभावीय वाङ्मयाचे सर्वसमावेशक असे वर्गीकरण लेखकाने केलेले आहे. त्यात एकूण ११
प्रकारचे वेगळे पण स्पष्ट केले आहे पैकी चरित्रग्रंथ आणि सूत्रग्रंथ यांच्या
पाठोपाठ सातीकाव्यग्रंथाना स्थान दिलेले आहे यावरून अभ्यासकांनाही पंथीयांप्रमाणे
सातीग्रंथाचे वेगळेपण सांगावेसे वाटते.
सातीग्रंथांच्या
कर्तृत्त्वाविषयी संशोधकात मतभेद नाहीत परंतु त्याच्या क्रमवारीत आणि स्थळकाळसंबधी
विविध मतमतांतरे निर्माण झालेली आहे. ग्रंथकाळ वीसपंचवीस वर्षांनी पुढेमागे खेचला
जातो. आज ज्यावेळी २१व्या शतकात या ग्रंथांचे मूल्यमापन होते त्यावेळी
काळनिश्चितीपेक्षा त्या काव्यातील सौंदर्यघटकांचे सादरीकरण महत्त्वाचे ठरत नाही का?
सातीग्रंथांचा अनुक्रम आणि वर्गवारी यांमध्येही एकवाक्यता नाही.
सातवा ग्रंथ ऋद्धिपूरवर्णन या काव्याविषयी वाद नाही पण
सातीग्रंथातील पहिले काव्य कोणते? याविषयी मतैक्य नाही. डॉ.
तुळपुळे यांनी रुक्मिणीस्वयंवर, शिशुपालवध, उद्धवगीता, वछाहरण (वच्छहरण) सह्याद्रिवर्णन,
ज्ञानप्रबोध आणि ऋद्धिपूरवर्णन असा अनुक्रम लावलेला आहे. डॉ. अ.ना.
देशपांडे यांनी आपल्या इतिहास ग्रंथात (पृष्ठ ४३६) शिशुपालवध, उद्धवगीता, वछाहरण, रुक्मिणीस्वयंवर,
सह्याद्रिवर्णन, ज्ञानप्रबोध आणि
ऋद्धिपूरवर्णन असा अनुक्रम स्वीकारला आहे. डॉ. ल. रा. नसिराबादकर यांनी प्राचीन
मराठी वाङ्मयाचा इतिहास या ग्रंथात (पृष्ठ २८) रुक्मिणीस्वयंवर, शिशुपालवध, उद्धवगीता, वछाहरण,
ज्ञानप्रबोध, सह्याद्रिवर्णन आणि
ऋद्धिपूरवर्णन अशा क्रम दिलला आहे. डॉ. य. खु. देशपांडे यांनी शिशुपालवध, उद्धवगीता, वत्सहरण, रुक्मिणीस्वयंवर,
सह्याद्रिवर्णन ज्ञानप्रबोध, ऋद्धिपूरवर्णन
असा अनुक्रम दिलेला आहे. (यशोधन, संपादकः राम शेवाळकर पृष्ठ
९९) वि. ल. भावे यांचा आणखी वेगळा पक्ष आहे. यावरून गेल्या शंभर वर्षात महानुभाव
साहित्याची उपलब्धी, संशोधन, संपादन व
इतिहासलेखन झाले त्यात अजूनही एकवाक्यता आलेली नाही असे दिसून येते. तेराव्या
चौदाव्या शतकातील हे वाङ्मय असल्यामुळे स्थळकाळनिश्चिती करणे अवघड जाते. विपुल
हस्तलिखित आपल्यापरीने परिपूर्ण असते त्यामुळे ग्रंथ जितके लोकप्रिय तितके ते
मूळसंहितास्वरूप राहणे अवघड बनते. प्रत्येक नकलनवीन आपली भर आणि श्रद्धा त्या
संहितेत बिंबवित असतो त्यामुळे प्रक्षेप अवक्षेपांचा प्रश्न निर्माण होतो.
सातीग्रंथांची हस्तलिखिते सर्वसाधारणपणे एकाच पोथीत उपलब्ध होतात, असे डॉ. कोलते यांचे अवलोकन आहे, यावरून घराघरांतून
आणि गावागावांतून या लोकप्रिय काव्यग्रंथांच्या पोथ्या सिद्ध झाल्या असल्या
पाहिजेत. त्यावरून याग्रंथांची लोकप्रियता पंथीयांमध्ये किती उच्चकोटीची होती हे
लक्षात येईल.
श्रीदत्तात्रेय
आदिकारण असलेल्या महानुभावपंथात श्रीकृष्णभक्ती आणि श्रीचक्रधरनिष्ठा ही परिपूर्ण
स्वरूपात आढळते. महानुभाव पंथाचा प्रत्येक ग्रंथ त्यांच्याशी निगडित असतो त्यामुळे
त्यावर विपुल वाङ्मय निर्मिती झाली पण श्रीदत्तात्रय श्रीचक्रपाणी आणि श्रीचक्रधर
यांना एकरूप करून घेऊन 'सह्याद्रिवर्णन' काव्य रवळोबासाने सिद्ध केले व त्यात
आत्मपरताही आणली. महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचे स्वरूप भिन्न आहे. महानुभाव
पंथात आदिकारण दत्तात्रेय असून पंचकृष्णांपैकी एक अवतार स्वरूप आहे म्हणून त्या
पंथाला दत्तसंप्रदाय म्हणावे का? हा विचार झाला पाहिजे!
‘सह्याद्रिवर्णन’
याच काव्याला सह्याद्रिमाहात्म्य म्हणायचे का हाही एक प्रश्न
निर्माण होतो. 'सह्याद्रिवर्णन या काव्यात दत्तात्रेयाचे
गुणवर्णन आलेले आहे तरीही ग्रंथाचे नाव 'सह्याद्रिवर्णन'
असे का? चरित्रअबाब आणि अन्वयस्थकाळात
'सह्याद्रिवर्णन' अशीच संकल्पना आलेली आहे.
महानुभाव पंथातील ग्रंथपरंपरेप्रमाणे चरित्र अवताराचे चरित्र ज्या भागात घडले असेल
त्या ठिकाणाचे नाव ग्रंथात दिले जाते यादृष्टीने सह्याद्रि येथे क्रीडा करणाऱ्या
श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य या ग्रंथात चित्रित केलले आहे. अशी अनेक उदाहरणे
दाखवता येतात (ऋद्धिपूरचरित्र, द्वारावतीलीळा, प्रतिष्ठानवर्णन इ.) पंथाचे आदिकरण श्रीदत्तात्रय असून श्रीकृष्ण, श्रीचक्रपाणी, श्रीगोविंदप्रभू आणि श्रीचक्रधर हे
नंतरचे अवतार होत. पैकी श्रीदत्तात्रेयांकडून श्रीचक्रपाणींनी शक्तिस्वीकार केलेला
होता व त्यांच्यापासून श्रीगोविंदप्रभुंना व श्रीगोविंदप्रभूकडून श्रीचक्रधरस्वामी
यांना मिळाली आहे या अर्थाने 'या मोक्षमार्गासी
श्रीदत्तात्रेयप्रभु आदिकारण आहे (विचारबंद २८५) या
श्रीचक्रधरांच्या वचनात श्रीदत्तात्रेय अवताराचे महत्त्व लक्षात येते.
श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप देवतारूप नसून अवतार स्वरूप आहे. एकमुखी असा महानुभाव
पंथातील दत्तावतार आहे. ब्रह्माविष्णुमहेश असे त्रिमुखीरूप त्याचे नाही. तर परब्रह्म
परमेश्वराचा तो साक्षात अवतार समजला गेलेला आहे. सह्याद्रिवर्णनात लीळाचरित्रात
आलेल्या सह्याद्रिलीळांचा आधार घेऊन कवीने सह्याद्रिवर्णन हे काव्य लिहिले आहे.
महानुभाव
सातीग्रंथावर तीन टीपग्रंथ लिहून शोधणी झालेली आहे. पैकी पहिल्या शोधणीचा काळ मिळत
नाही. हे टीपग्रंथ कसे मौलिक आहे हे डॉ. कोलते यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या संपादकीय
प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. या टीपग्रंथांमुळे मळ शब्दार्थ, तत्त्वज्ञान आणि श्रीचक्रधर यांना अभिप्रेत असलेला अन्वय, संकल्पनांचे स्पष्टीकरण, अलंकारशास्त्र, साहित्यशास्त्र यांच्या दृष्टीने विवेचन केलेले आढळते. टीपग्रंथाची
द्वितीय शोधणी शके १६८१ व तृतीय शोधणरी त्यापुढच्या काळात झालेली दिसते.
वा.ना.देशपांडे, य.खु.देशपांडे, ह.ना.नेने
यांनी टीपग्रंथांचे महत्त्व विशद केलेले आहेच. कै. नेने यांना उपलब्ध झालेल्या
पोथ्यांचे नाव 'सह्याद्रिमाहात्म्य' असे
असून उपाध्ये आम्नायाच्या अन्वयस्थळात 'सह्याद्रिमाहात्म्य'
असा उल्लेख येतो. सह्याद्रिमाहात्म्य (७२७) आणि सह्याद्रिवर्णन
(५१७) अशा ओव्या असून सह्याद्रिमाहात्म्य म्हणजे सह्याद्रिवर्णनात पडलेली भर आणि
झालेली वाढ आहे. रवळोबासने 'सह्याद्रिवर्णन' काव्यात एका ओवीत सैह्याद्रीचे महात्म्य (५०६) असा उल्लेख केलेला आहे. डॉ.
सुरेश डोळके यांनी या ओवीचा आधार घेऊन, उपाध्ये आन्मायाच्या
अन्वयस्थळाचा आधार घेऊन या काव्याचे शीर्षक 'सह्याद्रिमहात्म्य'च आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. (पहाः संशोधन समीक्षा पृष्ठ
६६-६७). डॉ. कोलते यांनी आपल्या संपादनाच्या परिशिष्टात विस्तृत ऊहापोह केलेला आहे
(पृ. २७५ ते ३०६) तो जिज्ञासूंनी बघावा. मूळ कोणत्या आहे, सैह्याद्रिस्थाने
कोणती आहेत हेही विस्ताराने डॉ. कोलते यांनी दाखवून दिलेले आहे.
डॉ. सुरेश डोळके
यांनी सातीग्रंथांचे वर्णन असे केले आहे. 'प्राचीन मराठी
काव्याच्या नभांगनात महानुभावांचे 'सातीग्रंथ आपल्या तेजाने
सौंदर्याने आणि गंभीर्याने सप्तर्षींसारखे चमकतात. लक्षावधी तारकांची नीरांजने
आकाशात तेवत असली तरी तेज आणि पावित्र्य या दृष्टीने सप्तर्षींनाच जसे महत्त्व
असते, तसेच महत्त्व महानुभाव वाङ्मयाच्या नक्षत्रमालिकेत
त्यांच्या सातीग्रंथा' ना आहे. या सातपैकी सहा ग्रंथाचे
संपादन डॉ. कोलते यांनी केले आहे (संशोधन समीक्षा पृष्ठ ५९). सातीग्रंथात 'सह्याद्रिवर्णन' आणि 'ऋद्धिपूरवर्णन'
असे दोन 'वर्णन' ग्रंथ
किंवा स्थळदर्शन घडविणारे ग्रंथ आहेत. बाकी सातीग्रंथात कृष्णचरित्रपर दर्शन
घडविले आहे.
महानुभाव पंथात
'सातीग्रंथ ही संकल्पना आणि सातीकाव्यग्रंथ अतिशय लोकप्रिय आहेत.
काव्य आणि द्वैत तत्त्वज्ञान यांचा समन्वय सातीग्रंथात झालेला आहे. 'सह्याद्रिवर्णनात पंथनिष्ठा अतिशय प्रखर असली तरी काव्यनिकषांची समज
त्याच्या काव्यातून व्यक्त होते. श्रीगोविंदप्रभू, श्रीचक्रपाणी,
श्रीदत्तात्रय, श्रीचक्रधर यांच्या विषयीची
श्रद्धा आणि स्वतः विषयीचा अनन्यभाव, ईश्वरभेटी ची तळमळ
यांचे एकरूपत्व 'सह्याद्रिवर्णना'तून
दिसून येते.
डॉ० उषा देशमुख