शास्त्रात सांगितलेली सेवकाची लक्षणे
कुग्रामवास कुलहिन सेवा ।
अशांची संगत नको रे देवा ।।
सेवा कुणाची करावी? सद्गुरुंची, सत्पात्रांची सेवा करावी.
कष्टाधिका नीचजनस्य सेवा हिन माणसाची सेवा करणे हे अत्यंत कष्टदायक आणि काहीच फायदा न देणारे असते. हिन मनुष्य म्ह. जो दोषांनी, अवगुणांनी भरलेला आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो वागत नाही. अशांची सेवा केल्याने आपल्याला पुण्य मिळणे तर दुरच पण आपल्या ठिकाणी असलेले गुणही नष्ट होतात.
गुरु कसे असावे?
शिष्यासि न लविती साधन ।
न करविती देहदमण ।
ऐसे गुरु अडक्याचे तीन ।
मिळाले तरी त्यजावे ।।
अर्थात :- जो संन्यासी स्वतःला गुरु म्हणवतो. आणि आपल्या शिष्यांना किर्ती मान्यतेच्या नादी लावतो. देहदमण, इंद्रियदमण, मनोदमण करायला सांगत नाही. परमेश्वराच्या वियोगात देशाच्या सेवटी झाडाखाली जन्म क्षेपण्यास प्रवृत्त करत नाही. वैराग्य करायला सांगत नाही. स्वतःही आचरण करत नाही. किमान अटन विजन भिक्षा भोजन हे विधी आचरवून घेत नाही. असे गुरु अडक्याचे तीन जरी मिळाले तरी त्यांना गुरु करू नये. (अडका म्ह. जुण्या काळातले सर्वात लहान नाणे)
असा सेवक नसावा-
आहारे वडवानलश्च शयने य: कुम्भकर्णायते ।
सन्देशे बधिर: पलायनविधौ सिंह: श्रृगालो रणे ।
अन्धो वस्तुनिरीक्षणेऽयं खञ्ज: पटु: कन्दने
भाग्येनैव हि लभ्यते पुनरसौ सर्वोत्तम: सेवक: ।।
अर्थ
-
१)
खाण्याच्या बाबतीत वडवानलाप्रमाणे खुप खातो. वेळप्रसंगी गुरुच्या
ताटातलेही खातो, गुरुसाठी मालकासाठी ठेवलेलेही खातो.
२)
आणि झोपा काढण्याच्या बाबतीत कुंभकर्णाप्रमाणे २४ तासातून
१६ तास झोपत झोपाच काढतो.
३)
निरोप सांगितला की त्यावेळेपुरता बहिरा होऊन जातो. किंवा काम
करतो पण खुप संथगतीने करतो. लवकर करत नाही, आळसाने करतो. अनेक वेळा सांगितल्यानंतर
करतो.
४)
मालकावर
संकट आले असता, किंवा गुरुवर संकट आले की, पळून जाण्याच्या बाबतीत
सिंहाची गती असलेला.
५)
रणांगणात (शौर्य दाखवण्याच्या बाबतीत) कोल्ह्यासारखा (पळपुटा),
६)
वस्तु निरीक्षणाच्या बाबतीत आंधळा. बाजाराला पाठवले तर चांगली
वस्तू खरेदी करण्याचे ज्ञान नाही.
७)
चालतांना लंगडा, जलदगतीने न चालणारा.
८)
आक्रोश करण्यात पटाईत, कुभांड करण्यात पटाईत.
ही आठ लक्षणे सेवकाच्या ठिकाणी नसावी. असा सेवक दुर्भाग्यानेच मिळत असतो.
चलेषु स्वामिवित्तेषु सुलभे पिशुने जने ।
यदि जीवत्यहो चित्रं क्षणमप्युपजीविनः ।।
अर्थ :- मालकाचे मन विचलित झाले असता व दुष्ट मनुष्यांचा सुकाळ असता जर एक क्षणभर देखिल नोकर जिवंत रहात असेल तर ते केवढे आश्चर्यकारक आहे ?
तावज्जन्मातिदुःखाय ततो दुर्गतता सदा ।
तत्रापि सेवया वृत्तिरहो दुःखपरम्परा ।।
अर्थ - मुळात मनुष्यजन्म अतिशय दुःखदायक आहे. पावलापावला तेथे नेहेमी दुर्गतीच असते. तेथे सुद्धा इतरांची सेवा, नोकरी-चाकरी करून उपजीविका करावी लागावी ही केवढी दुःखपरंपरा! : गृहस्थाश्रमात दुःखच दुःख आहे. संन्यास धर्म दुःख परंपरेपासून अलिप्त आहे.
नाश्नाति सेवयौत्सुक्यात् विनिद्रः न प्रबुध्यते ।
न नि:शङ्कं वचो ब्रूते सेवकोऽप्यत्र जीवति ।।२६-४।।
अर्थ :- सेवक सेवा-धर्माच्या औत्सुक्यामुळे नीट खाऊ शकत नाही, अत्यंत सेवाभाव असल्यामुळे झोपू शकत नाही की धड जागा राहू शकत नाही. निःशंकपणे बोलूही शकत नाही, तरीही तो सेवेच्या सामर्थ्यामुळे येथे जिवंत रहातो. लक्ष्मण रामाची सेवा करताना १४ वर्षे वनवासी होता.
प्रणमत्युन्नतिहेतोर्जीवितहेतोः विमुञ्चति प्राणान् ।
दु:खीयति सुखहेतोः को मूढः सेवकादन्यः ।।
अर्थ :- आपली स्वतःची उन्नत्ती व्हावी म्हणून गुरुला दंडवत प्रणाम करतो. जिवंत रहाण्याच्या इच्छेने प्राणही सोडतो, सुख मिळवण्याच्या इच्छेने दु:ख भोगतो. असा हा मूर्ख सेवकाशिवाय अन्य कोण असणार? गुरुकडून काही मिळावे याच अभिलाषेने सेवा करणारे असेही शिष्य असतात. असे शिष्यत्व काही कामाचे नाही.
सत्येन शुध्यते वाणी, मनो ज्ञानेन शुध्यति ।
गुरुशुश्रूषया काया, शुध्दिरेषा सनातनी ।।
अर्थात - १) वाणी सत्य बोलण्याने शुद्ध होते. २) ज्ञान अभ्यासल्याने अंतःकरण शुद्ध होते. का भगवंतांनी गीतेत म्हटलेले आहे. न हि ज्ञानेन सदृशं प्रवित्रमिह विद्यते । आणि ३) शरीर गुरुंच्या, साधु संतांच्या सेवेने शुद्ध होते. म्हणून साधुसंतांची सेवा अवश्य केली पाहिजे. आणि मन वाणी देहाची होणारी शुद्धी सनातन म्ह. नित्य आहे. ती कधीच नाश पावत नाही.
गुरु लागा तब जानिये मिटै मोह तन ताप ।
हरख सोग दाझै नहीं तउ हरि आपही आप ।।
अर्थ - धर्मगुरूच्या सेवेत ऋजु झाल्यावर मनाचा मोह हळुहळु
कमी होतो. व शरीरात असलेल्या रोगव्याधीही दूर होतात. जेव्हा
या मनात सुख दुःख सम होतील. दिर्घकाळ गुरुजनांच्या राहिल्यामुळे हर्ष व शोक तुला
जाळणार नाहीत तेव्हाच भगवंत आपल्या हृदयात प्रगट होतील.
गुरु शुश्रूषया विद्या - विद्या ही गुरुंची सेवा केल्यानेच प्राप्त होते. पुस्तकी
ज्ञान वाचून कुणीही विद्वान होत नाही. त्यासाठी गुरुंची जवळीक करावी लागते. सेवा करावी
लागते. मगच तो पुरुष विद्यावान् होतो.
यादृशैः सन्निविशते
यादृशांश्चोपसेवते ।
यादृगिच्छेच्च भवितुं
तादृग्भवति पूरुषः ।।
अर्थात - मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांसोबत राहातो, मग ते चांगले असो की वाईट, ज्या लोकांची सेवा करतो किंवा ज्यांच्यासारखं होण्याची इच्छा बाळगतो तसाच तो बनतो म्हणून आपण चांगल्या उत्तम गुरुचीच जवळीक करावी. जो गुरु धर्माचरण करीत नाही. तो स्वतःही परमेश्वरापर्यंत पोहचत नाही मग आपण त्यांच्या संगतीने कसे पोहचणार? सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी लाडाचिये बासीचा दृष्टांत निरूपण केला आहे. तेणेन्याये आपणही त्याच्या संगतीने नरकाच्याच वाटेला जाऊ. म्हणून धर्माचरण करणाऱ्या गुरुंचीच सेवा करवी. व त्यांच्या संगतीत राहावे.
यथा खनित्वा खनित्रेण भूतले वारि विन्दति ।
तथा गुरुगतां विद्यां शुश्रुषुरधिगच्छति ।।
अर्थ :- जसे कुदळी फावडे घेऊन खोदकाम करून जमीतले पाणी काढले जाते. किंवा खोदकाम करून जमिनतले धन काढले जाते त्याप्रमाणे गुरुंच्या सेवेत राहून, दिर्घकाळ सेवा करून सर्व प्रकारचे कष्ट सहन करून गुरुंजवळ असलेली विद्या अभ्यासली जाते.
सेवस्व विद्वज्जनम् - विद्वांनांचीच सेवा सेवा करावी.
मौनान्मूकः प्रवचनपटुर्वाचको जल्पको वा ।
धृष्टः पार्श्वे प्रभवति तदा दूरतश्चाप्रगल्भः ।।
क्षान्त्या भीरुर्यदि न सहते प्रायशो नाऽभिजातः ।
सेवाधर्मः परम गहनो योगिनामप्यगम्यः ।।
सेवा धर्म हा अतिगहण आहे. तो योग्यांना
देखिल कळत नाही. एखादा सेवक मौन असला तर त्याला लोक मुका म्हणतात. आणि प्रवचन करणारा
चांगले गोड बोलणारा असेल तर त्याला हा वाचाळ आहे असं म्हणतात. एखादा सर्व कामांमध्ये
पुढे असला तर ‘हा जास्तीच पुढे पुढे करतो.’ असे म्हणतात. आणि एखादा मागे राहतो तर याला
काही स्फुर्ती नाही असे म्हणतात. एखादा दुर दुर राहतो तर याला काही ज्ञान नाही. हा
अप्रगल्भ आहे असं म्हणतात. एखादा सेवक सर्व सहन करतो तर त्याला भित्रा म्हणून चिडवतात.
आणि एखादा निर्भय होऊन सेवा करतो तर त्याला ‘जास्तीचा धीट आहे’ असं म्हणतात. असा हा
सेवा धर्म अत्यंत अवघड आहे.