फलटण रंगशिळा मंदिर इतिहास - महानुभाव पंथाची दक्षिण काशी महात्म्य
१००० वर्षांपूर्वी फलटण येथे परब्रम्ह परमेश्वर अवतरले. जनक नायक नावाचा ब्राह्मण होते. त्याची जनकाईसा नावाची पत्नी होती. जनकाईसा मातेच्या उदरी परब्रम्ह परमेश्वराने अवतार घेतला. जनकनायकांचा वाडा आता जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. रंभाईसाचे आवार तथा आबासाहेब मंदिरापासून दक्षिणेस दोन पांडाच्या अंतरावर असलेल्या रंगनाथाच्या मंदिरातील रंगनाथाच्या मुर्तीपुढे जवळजवळ ४ ते ५ फूट लांब व ३ फूट रुंद तिच्यावर गोल पैलू आकार असलेली अशी एक पाषाणाची कोरीव नक्षीकाम केलेली शिळा होती. परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीचक्रपाणी राऊळ रंभाईसाच्या आवारी असताना बालपणी या शिळेवर बसून वेद अभ्यास करत असत. त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली शिळा ही स्त्रीलिंगी असल्यामुळे तिला रंगशिळा किंवा रंगूबाई असे भक्त लोक आजही म्हणतात.
कालप्रवाहाच्या ओघात सत्ताबदल झाला व राजेशाही राज्यव्यवस्था निर्माण झाली. इ.स. १७व्या शतकातील तत्कालीन राजे श्रीमंत बजाजी राजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजवाड्याचे बांधकाम करत असताना राजवाड्याच्या मुख्य दरवाजावर अजाणतेपणे ही शिळा बसविली होती. (हल्लीचे राममंदिर विभागात असलेले मांडलीक रंगशिळा मंदिर. या मंदिराच्या बाजूलाच राजवाडा होता) याची इतिहासाने नोंद घेतली आहे.
६ जून १६७४ साली छत्रपती शिवाजी राजाना रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्या स्वराज्याची घडी नीट बसावी, राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी राजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये सरसेनापती पद हे हंबीरराव मोहीते यांच्याकडे सोपविले होते. हे हंबीरराव मोहिते महानुभाव पंथाचे उपासक होते. अनुयायी होते. त्यांना महानुभाव पंथाचा चांगला अभ्यास होता. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाप्रमाणे ते गृहस्थाच्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करत होते.
सरसेनापती पद असल्यामुळे ते पूर्ण स्वराज्यात सैन्य सोबत घेऊन मोहीमेवर जात असते. असेच एकदा ते सातारा या स्वराज्याच्या प्रांतात मोहिमेवर आले होते. तेव्हा त्यांना स्वप्नात एक दृष्टांत झाला. 'मला येथून काढ' पण या स्वप्नातील दृष्टांताचा त्यांना काही बोध होत नव्हता. म्हणून त्यांनी या गोष्टीवर फारसा काही विचार केला नाही. पुन्हा नंतर काही दिवसांनी हाच दृष्टांत झाला. पण या आताच्या दृष्टांतात स्पष्टपणे जागा दर्शवत "फलठणाच्या राजवाड्याच्या दरवाजावर मी आहे तेथून मला काढा”. असा स्पष्ट दृष्टांत दिल्यामूळे त्यांना पूर्ण बोध झाला.
स्वप्नात अशा प्रकारे दृष्टांत होताच हंबीरराव मोहीते हे फलटणला आले. त्यावेळेस फलटण या संस्थानावर श्रीमंत बजाजीराजे नाईक निंबाहकर हे मराठी राजे राज्य करत होते. हंबीरराव मोहित्यांनी त्यांची भेट घेतली.
स्वप्नातील दृष्टांत त्यांना सांगितला व राजवाड्याच्या दरवाजावरील सर्वज्ञ श्रीचक्रपाणी राऊळांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या त्या शिळेची मागणी केली. ही मागणी श्रीमंत बजाजीराजे नाईक निंबाळकरांनी बिनशर्त मान्य केली. मग हंबीरराव मोहीते यांनी दरवाजा समोर नवीन मोठ्या देववस्त्राची गादी अंथरली व त्या शिळेची विधीपूर्वक पंथीय पद्धतीनुसार पूजा द्रव्य अर्पण करून पूजा केली, व दंडवत घालत असताना 'आपण प्रगट व्हावे' असे म्हणून परमेश्वरास मनोभावे प्रार्थना केली.
अशी प्रार्थना करताच एका क्षणामध्ये काय चमत्कार! ती नमस्कारी शिळा दरवाजावरून आपोआप हळूहळू सरकून खाली अंथरलेल्या देववस्त्राच्या गादीवर येऊन पडली. पडताक्षणी या अखंड शिळेचे पाच विभागात विभागणी झाली. हा चमत्कार पाहून राजवाड्याचे मालक श्रीमंत बजाजी राजे नाईक निंबाळकरांना त्या शिळेचा मोह निर्माण झाला. त्यांनी हंबीरराव मोहित्यांकडे शिळेची मागणी केली. या पाच विभागापेकी दोन विभाग हंबीररावांनी प्रसन्न होऊन दिले आणि विनंती करत म्हणाले,
"राजे हो, या शिळा सामान्य शिळा नाहीत. त्या परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रपाणी राऊळांच्या संबंधाने पवित्र झालेल्या आहेत. यांची विधीवत मंदिरात स्थापना करावी व त्यांची दररोज त्रिकाळ पूजा-विधी करण्याची व्यवस्था करावी. या शिळेचे पावित्र्य राखावे."
हंबीरराव मोहित्यांची विनंती ऐकून श्रीमंत बजाजी राजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजवाड्याजवळच मंदिर बांधून त्या मंदिरात या दोन शिळा विभागांची विधीवत स्थापना केली. (हल्लीचे राम मंदिर परिसरातील रंगशिळा मंदिर). धूप, दिप, उटी, उपहार इत्यादी व्यवस्थापनासाठी काही शेत जमीन इनाम म्हणून या देवस्थानाच्या नावावर करून दिली होती.
राहिलेल्या रंगशिळेच्या तीन विभागांपैकी पूर्वीच्या रंगनाथाच्या मंदिरात एक भाग, रंभाईसाच्या आवारातील आबासाहेब मंदिरात एक भागाची स्थापना सरसेनापती हंबीररराव मोहित्यांनी केली व राहिलेला एक भाग त्यांनी हत्तीवर अंबारीत ठेऊन मोठ्या आनंदाने सातारा परिसरात घेऊन आले. राजे शिवछत्रपतीनी हंबीररावांना आश्वासन दिल्याप्रमाणे राजे यांनी परळी भागात (हल्लीचे पोगरवाडी) जाहीरनामा सोडला की, आमचा हत्ती ज्या भागात फिरेल त्याच्या आतील जमीन या पवित्र शिळेच्या मंदिर निर्माण व व्यवस्थापनासाठी कायमची दिली जाईल. जाहीरनाम्याप्रमाणे हत्तीच्या फिरण्याच्या भागामधील पाच चाहूर जमीन परळी (पोगरवाडी) गावाजवळचा सर्व भाग शिवछत्रपती राजांनी सरसेनापती सरदार हंबीरराव मोहिते यांच्या रंगशिळा देवस्थानाला अर्पण केली.
सरसेनापती सरदार हंबीरराव मोहित्यांनी विधीपूर्वक मंदिराची निर्मिती करून त्यात रंगशिळेची प्राणप्रतिष्ठा केली तसेच मंदिरात महानुभाव पंथाचे पहिले कृष्ण श्रीकृष्ण महाराजांची मूर्तीची पण प्राणप्रतिष्ठा केली. हे मंदिर ज्या भागात आहे त्या भागाला आजही मोहीतेवाडी (हंबीरराव मोहितेच्या नावावरून पडलेले नाव) किंवा रंगुबाई वाडी असे म्हणतात. या देवस्थानाची व्यवस्था, कारभार, कामाची जबाबदारी महानुभावाकडे दिल्याची नोंद इतिहासाने केली आहे. या मंदिराची निर्मिती शिवराज्याभिषेकानंतर इ. स. १६७५ च्या दरम्यान झाली असे मोहित्यांच्या इतिहसावरून दिसून येते. नंतर इ. स. १६८८ मध्ये सरदार हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू झाला..