आधी स्वतःला ओळखायला शिका -
SEE YOUR STRENGTH
यशाचे रहस्य
ज्यांना आपलं वैशिष्ट्य, वेगळेपण कळत नाही, ते सर्व नकारात्मक गोष्टींना आश्रयदेखील देतात.
यशासाठी आधी स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे. आपल्या ग्रहमालिकेतील सर्व ग्रहापेक्षा पृथ्वीला खास मान दिलाय. कारण तिने विविध प्रकारच्या जीवांना आश्रय दिला आहे. सर्व जीवमात्रांमध्ये मानव हा खास मानाचा आहे. कारण तो ज्ञानाला आश्रय देऊ शकतो. सर्व ज्ञानीजनांत तुम्ही खास मानाचे आहात. का ते ओळखा ? ज्यांना आपलं वैशिष्ट्य, वेगळेपण कळत नाही ते स्वतःला कमी दर्जाचे मानतात. ते सर्व नकारात्मक गोष्टींना आश्रयदेखील देतात, पुनःपुन्हा लक्षात ठेवा, तुम्हीच शांती आहात, तुम्हीच प्रेम आहात, तुम्हीच आनंद आहात आणि तुम्हीच आहात आश्रयदाते.
तुम्ही आश्रयदाते आहात, याची जाण नसल्यास तुम्ही चुकीचे जगत आहात. पक्षी त्यांच्या घराकडे परततात, तसं वारंवार तुमच्या मूळ तत्त्वाकडे परत या, तिथंच तुम्हाला जाणीव होईल की, तुम्ही दिव्यत्वास आसरा दिला आहे. यश मिळवण्यासाठी याची नितांत गरज असते. अनंताचे विविध गुण आहेत आणि विशेष गुणानुसार ते विविध नामे धारण करतात. तुमच्याच परमात्म्याची किरणे, तुमचेच विस्तारित हात. तुम्ही जेव्हा एकाग्र होता, त्यावेळी ते तुमच्याच सेवेत राहतात.
एका अंकुरलेल्या बीजातून मूळ शाखा, पालवी फुटतात. त्याचप्रमाणं तुम्ही केंद्रित झाल्यावर तुमच्या आयुष्यात सर्व देवदेवतांचं प्रकटीकरण होतं.. सूर्याच्या उज्वल प्रकाशात ज्याप्रमाणं सर्व रंग समाविष्ट होऊन राहतात, त्याचप्रमाणे सकल देवता तुमच्या विशुद्ध शरिरामध्ये सामावलेल्या आहेत. सुख हा त्यांचा श्वास आहे; तर वैराग्य हे त्यांचे निवासस्थान आहे. याची माहिती प्रत्येकाला असतेच असे नाही. योग्य ध्यानधारणेतून ती नक्कीच मिळते. यासाठी स्वतःशी शांतपणे संवाद साधा. सध्याच्या जगात मानवाचा सर्वांशी संवाद होतो; पण स्वतःशीच तो नसतो. त्यातून आपण काय करत आहोत, कशासाठी करत आहोत याचेच भान अनेकदा राहात नाही. त्यामुळे आपण मूळ जगणेच सोडून देतो आणि दुसऱ्याच कामांत स्वतःला गुरफटून घेतो. यातून जगण्याचे सार काही केल्या गवसत नाही.
रोजचा दिवस सर्वोत्तम बनवा आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असला पाहिजे, कारण तुमच्याकडे आणखी एका दिवसाचा अनुभव आहे. कालचा दिवस हा आजच्यापेक्षा चांगला होता, तर याचा आपण जीवन जगत नाही आहोत, आपण मृत्यूच्या जवळ जात आहोत. एखादी गोष्ट जिवंत असण्यापेक्षा मृत असलेली चांगली वाटत असेल, तर ते काही चांगले नाही. काल हा मेला आहे. जर मृत गोष्टी तुमच्यासाठी जिवंत गोष्टींपेक्षा चांगल्या वाटत असतील तर याचा अर्थ आपण आपले जीवन गचाळ पद्धतीने जगत आहोत. हे लोक किंवा ते लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. फक्त आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनवा. उद्या जिवंत असू याची तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी काही गॅरंटी आहे का ?
आपल्याला जगायचे आहे, परंतु अशी कोणतीच हमी नाहीये. तर मग आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनवणे हे फार महत्त्वाचे नाही का ? प्रत्येक दिवस जर तुम्ही असा सर्वोत्तमरित्या घडवत राहिलात, तर पंचवीस वर्षात बघा लोक तुम्हाला महान माणूस म्हणू लागतील. प्रत्येकाला तुमच्या सहवासात
राहावेसे वाटेल. सध्याच्या जगात कुणी भविष्याचा विचार करत आहेत, कुणी भूतकाळाचा विचार करत आहेत, इथे वर्तमान काळात कुणीच नाहीये, असे वाटते! तुम्ही जरा वयस्कर लोकांशी बोलून पाहिले पाहिजे, ते म्हणतील, अरे, मी शाळेत असताना...... कॉलेजमध्ये असताना.... वगैरे. जेव्हा ते मागे वळून पाहतात आणि त्यांना दिसून येते, की त्यांनी त्यांचे आयुष्य किती गचाळ बनवले आहे, तर अचानकपणे त्यांना त्यांचे शालेय जीवन विलक्षण वाटू लागते.
तुम्ही नेहमी हा विचार करत असाल, की तुमचा भूतकाळ चांगला होता, तर याचा अर्थ सध्या तुमचे आयुष्य चांगले घडत नाहीये. कालचा दिवस सर्वोत्तम नसावा. आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असला पाहिजे, कारण तुमच्याकडे आणखी एका दिवसाचा अनुभव आहे. तर मग, हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस तुम्ही बनवला नाही पाहिजे का ? तुमचे जीवन असे घडवा की आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वो त्तम दिवस असला पाहिजे.