वाणीची किमया आणि शब्दांचे सामर्थ्य
वाणी दुःखाची कारण । वाणी सुखाचे साधन ।
वाणीने जग जिंकून । घ्यावे मनुष्ये ।।
शब्द सम्भाले बोलिए, शब्द को हाथ न पाँव ।
एक शब्द करे भलाई, दुजा करता घाव ॥
मराठी वर्णमालेत बावन अक्षरे आहेत. त्या बावन अक्षरांच्या ह्या मायाजाळाने, शब्दांच्या हेराफेरीने जो अर्थाचा अनर्थ, समज गैरसमज तयार होतो तो बराच मनोरंजक आहे. शब्दांची फेक मायाळू व प्रेमळ असली की, सख्य जोडले जाते. परंतु असभ्य शब्द मने जर्जर करतात, नाती तोडतात, अनादर होतो. कोकिळा गोड शब्दाने जगाला आपलेसे करते तर कावळा आपल्या कर्कश वर्तनाने जगाला अप्रिय होतो. तिळसंक्रातीला तिळगुळ देऊन गोड-गोड बोलण्याचा आग्रह केला जातो. हा प्रघात म्हणजे स्नेहाची मिलन-भेट होय.
प्रिय बोलणारे बरेच असतात, परंतु प्रसंगी कडु औषधाप्रमाणे अप्रिय बोलणारे पण ज्यात 'हीत' दडले असेल असे बोलणारे मात्र 'दुर्मिळ' असतात. वाल्मिकी रामायणात या अर्थाचा श्लोक आहे-
सुलभा पुरुषा राजन सतातं प्रियवादिनः ।
अप्रियास्य च पथ्यस्य वचन श्रोता च दुर्लभः ।।
शूर्पणखेचे या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीता हरणाचा विचार करणाऱ्या रावणाला मारीच नावाचा राक्षस सीता हरण न करण्यासाठी प्रार्थना करतो व हा विचार मनातून काढावा असे सुचवतो. रावणाला त्याच्या बोलण्याचा राग येतो तेव्हा मारीच हा श्लोक म्हणतो की हे राजा! तुला प्रिय असलेले तुझ्या मनाप्रमाणे बोलणारे लोक तुला सहज मिळतील पण तुला योग्य सल्ला देणारे तुझ्यासाठी हितावह असलेले पथ्यकारक बोलणारे वक्ता दुर्लभ असेल हे लक्षात ठेव.
“अधजल गगरी छलकत जाय।” अर्ध्या हळकुंडांने पिवळे झालेले अर्धवट ज्ञानी मुर्खासारखे बडबड करतात. परंतु पूर्ण ज्ञानी मौनच पसंत करतात, मितभाषी पुरुष मानसिक शांती अनुभवतो.
बसुनि उपवनी या जोवरी कावळा हा ।
करीत कटकटीने लोककर्णास दाहा ।
बस निमुट शुका तू तोवरी स्वस्थ कोेठे ।
कमिपण गुणवंता काय मौनांत मोठे ।।
या अन्योक्तीत एखादा निर्बुद्ध मनुष्य सभेत किंवा चावडीवर वायफळ बडबड करत असला तेथे शहाण्या माणसाने मौन असावे हे सांगितले आहे.
सुभाषितांमध्ये थोड्या शब्दातच रहस्य दडले असते, तोच 'मंत्र' असतो. महात्मा गांधीना मिळालेल्या तीन माकडांच्या मूर्ती होत्या. अशुभ बोलू नका, अशुभ पाहू नका व अशुभ ऐकू नका. कमी बोला, मधुर बोला व मोजून मापून बोला असा दिव्य संदेश ह्या मूर्तीनी जगाला दिला. आपल्याला हिर्याशी संबंध ठेवायचा असतो. कोळसा कितीही स्वच्छ केला तरी त्याचा रंग बदलणारा नसतो. 'वाणी' हे बौद्धिक दर्जा, शिस्त, शारीरिक संयम याचे मोजमाप करते. 'वाणी' योग्य की अयोग्य हे ऐकणाऱ्याच्या चेहऱ्याचे हावभावावरून कळून येते.
संतांची वाणी ऐकण्यास भक्त लोक 'तरसत' असतात. त्यांचा शब्द न शब्द परीसाप्रमाणे भक्तांच्या जीवनाचे सोने करीत असतो. त्या शब्दाला पावित्र्य फेक येते. त्या शब्दांची पूजा होते. आहार समतोल, शुध्द व संयमित घेण्यान्यास तर्जर आजार होत नसतो. तसेच मितभाषी परंतु 'सत्यवचन' बोलणारे भांडणे ओढवून घेत नसतात म्हणूनच म्हणतात. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले"
'सत्य' हेच ईश्वर होय. सत्यवचन, सत्यवाणी आपले जीवन मधूर बनवून आपल्याला सतत मधूर रसात तरंगत ठेवते, तारत असते. 'वाणी' हे प्रिय मनुष्याचे सामर्थ्यशाली साधन आहे. परंतु ते हितकारक मात्र असावयास हवे. वाणीचा उपयोग कसा काय करतो, यावरच मनुष्याचे जीवन अवलंबून असते. सतसंग व संतवाङमय हे मनुष्याची आत्मिक उन्नती करणारे साधन आहे.
संतसंगात संतांची वाणी म्हणजे अमृतमय कारंजेच होत, त्या 'धारा' चाखणे हे जीवन रहस्य उलगडणे व जीवनाचा आनंद लुटणे होय, मौन धारणाने अनर्थ तीन टळतात. परंतु संयमित वाणीही अनर्थ टाळू शकतात. अशुभ वाणीद्वारे दुसऱ्याच्या ऐकू मनाला घरे पाडणे ही एक प्रकारे अप्रत्यक्ष हिंसाच होय, तेव्हा मनस्ताप नाहीसा करण्यास 'मौन' हे जालीम औषध आहे.
'इन्साफ का मंदीर है ये, भगवानका घर है।' प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर वास करतो. शब्द-वाणी हे एक धारदार शस्त्र आहे. त्या शस्त्राने दुसऱ्याचे मन घायाळ करणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरावरच विश्वास न ठेवण्यासारखे होईल. धनुष्यातून बाण सुटतो किंवा मुखातून शब्द निघतो त्या ठिकाणी खुणगाठ अशी काही राहत नाही. परंतु बाण लागतो तेथे खोल जखम होते. ती जखम भरून येण्यास बराच अवधी लागतो खरा, परंतु जखमेची ती खुण, बाणाची सतत आठवण करून देत असते. म्हणूनच-
“शब्द बराबर धन नहीं, जो कोइ जाने बोल।
हीरा तो दामों मिले, शब्दहिं मोल न तोल ॥”
हिऱ्याची खरेदी-विक्री होऊ शकते परंतु उत्तम शब्दाला तोल-मोल नाही. ‘सत्यवाणी' ही अमर आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम् शरणम् व्रज ।
“हे अर्जुना, मलाच शरण ये”
आम्ही प्रेमाने म्हणावे....
'तूच कर्ता आणि करवितां....
शरण तुला भगवंता, मी....'
ही प्रेमाची आर्त वाणी चुंबकाप्रमाणे आहे. चुंबक लोह्याला आपल्याकडे ओढते अर्थात मायाजाळातून सत्याकडे ओढून आणते. पोपटाप्रमाणे केवळ पाठ केलेला शब्द, प्रसंगी आपला घात करतो. परंतु 'सत्यवचन' व 'सदाचरण' आपला जीव 'भवसागर' पार पाडावयास मदतच करतो, नव्हे, परमेश्वरालाच भक्ताच्या भेटीची आतुरता वाटते.
केवढी ही शब्द-वाणीची किमया !
दुर्जनांच्या वाणी अत्यंत विषयुक्त असते दुर्जन लोक त्यांच्या विषारी बोलण्याने सज्जनांना घायाळ करत असतात म्हणून त्यांच्या समोर पूर्ण मारून राहणे व मुकाट्याने सहन करणे हेही योग्य नाही म्हणून पंचोपाख्यानात एक गोष्ट आलेली आहे ती पुढीलप्रमाणे-
गंगदत्त नावाचा एक साप होता. तो वयस्कर होता. नदीकाठी रस्त्याच्या कडेला, तो आपले ठाणे मांडून राहत असे. तो अंगाने धष्ठपुष्ठ व काळाभोर दिसत होता. जाणारे-येणारे त्याचे जवळ जाण्याचे धाडस करीत नसत. कारण तो दंश करीत असे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले होते.
एके दिवशी नारदमुनी 'नारायण... नारायण...' करीत अगदी त्याचे जवळ गेले. सापाचा कुणालाही दंश करणे हा धर्मच आहे. त्यामुळे नारदमुनीलाही त्या सापाने सोडले नव्हते. परंतु नारदजी सापापासून सावधच होते. ते दंश करणाऱ्या, त्या सापापासून लगेच दूर झालेत. सापाला आश्चर्य वाटले. नारदजींच्या चेहऱ्यावर तेज चमकत होते. नारदासारखीच तेजस्वी व्यक्ती त्याने कधीच पाहिली नव्हती. साप तेथेच थबकला. नारदाला तो न्याहाळू लागला. नारदाच्या तेजस्वी कांतीमुळे तो बराच नरमला होता.
आता करायचे काय? हे सापाला कळत नव्हते. त्याच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. नारदानेच सापाला बोलते केले. नारद म्हणाले, “गंगदत्ता, तू निरपराधी, गरीब लोकांना कां छळतोस बरे! त्यांना दंश का करतोस? त्यांचा चावा कां घेतोस?” याचे उत्तर काही केल्या गंगदत्त देऊ शकत नव्हता. त्याला काहीच सुचत नव्हते. नारद मुलींच्या बोलण्याचा परिणाम त्यांच्यावर झाला होता नारद मुनींची ती मधुर स्नेहमय वाणी ऐकून त्याचे हृदय पालटले व गंगदत्त सर्प नारदमुनींना शरण गेला. गंगदत्त आता नारदमुनींचा शिष्य बनला.
नारदमुनींनी गंगदत्तास आजपासून कोणासही दंश न करण्याचा उपदेश केला. गंगदत्तामध्ये बरेच परिवर्तन झाले होते. तो आता साधुवत् झाला होता. आपला दंश करण्याचा स्वभाव विसरला होता. वैराग्य त्याच्या अंगात संचारले होते. त्याच्या स्वभावात एकाएकी परिवर्तन झालेले पाहून लोकांस आश्यर्च वाटू लागले. दुरून जाणारे लोक आता सापाच्या अगदी जवळून जावयास लागले. गंगदत्ताने लोकांना खरोखरच आश्चर्यचकितच केले होते.
आता मात्र लोकांनी गंगदत्त सापाची चेष्टा करण्यास सुरूवात केली. लोक त्यांच्या अंगावर दगड, माती, काठ्या मारू लागलीत. परंतु गंगदत्त त्यावर काहीच हालचाल करीत नव्हता. लोकांची भीती आत अजिबातच नाहिसी झाली होती. त्यामुळे लोक विनाकारणच त्याच्यावर मोठमोठाली दगडे जोराने मारून फेकत होती. गंगदत्त सर्वकाही मुकाट्याने सहन करीत होता. तो बराच रक्तबंबाळ झाला होता. त्याचे शरीर जर्जर झाले होते. तो हे सर्व सहन करीत होता. केवढे हे आश्चर्य! केवढे हे परितर्वतन ! आश्चर्यच आश्चर्य ...
एके दिवशी पुन्हा नारदजी “नारायण... नारायण...” करीत गंगदत्ताकडे, आपल्या शिष्याकडे आले. गंगदत्ताचा तो अवतार बघून नारद भयंकर आश्चर्यचकित झाले. नारदाने रक्तबंबाळ होण्याचे कारण गंगदत्तास विचारले. तेव्हा गंगदत्ताने त्यांचे गुरू नारदजींनी केलेल्या उपदेशाचा हा परिणाम आहे, असे कथन केले. तेव्हा नारदमुनींना आपला शिष्य पूर्ण आज्ञाधारक आहे ह्याबद्दल तर अभिमान वाटला परंतु त्याच्यात असलेल्या मुर्खपणामुळे वाईटही वाटले. नारद गंगदत्तास म्हणाले, “बेटा गंगदत्ता ! मी तुला जाणाऱ्या-येणाऱ्यांना विनाकारण दंश न करण्याचे बजावले होते. परंतु वेळप्रसंगी दुर्बुध्द व अविचारी एक लोकांवर रागाऊनही नकोस, असे काही म्हटले नव्हते. म्हणून त्रास देणाऱ्या लोकांना तू निदान फणा तरी दाखवायला पाहिजे होतास जेणेकरून ते तुझ्या जवळही आले नसते व तुला असा त्रास झाला नसता.
आपण विनाकारण कोणाला त्रास देवू नये. ईजा पोहचवू नये हे खरे ! परंतु निर्बुध्द, अविचारी अहितकारी लोकांना काबूत ठेवण्याकरिता, त्यांना धडा शिकविण्याकरिता, त्यांचे वर प्रसंगी कडू औषधाप्रमाणे रागावणेही आवश्यक असते. त्यांचे हीत लक्षात घेऊन रागावणे, हा सुध्दा धर्मच ठरत असतो. तेव्हापासून साप सावध झाला.