आजचे सुभाषित रसग्रहण
संस्कृत सुवचनानि
आजची लोकोक्ती - दर्पभूताभिभूतस्य विद्या मौर्ख्यशतायते ।
वैरायते सुहृद्भावः प्रदानं हरणायते ।
दर्पभूताभिभूतस्य विद्या मौर्ख्यशतायते ॥
-१.३४, दर्पदलनम्, क्षेमेन्द्र.
अर्थ :- जो दर्पाने (खोट्या अहंकाराने) भरलेला आहे, त्याचा स्नेहभाव (मैत्री) वैरासारखा (शत्रुत्व) असतो, त्याच्याकडून दिले गेलेले दान चोरी केल्यासारखे असते, आणि त्याच्याकडे असलेली विद्या देखील मूर्खपणाच्या शंभरपटी सारखी असते.
थोडक्यात काय तर ज्यांच्यात दर्प, अहंपणा ठासून असतो ते कितीही दानी, ज्ञानी असले तरी ते ज्ञान व्यर्थच होय. कारण अशा माणसांची मैत्रीही किरकोळ मुद्यावरून कधी शत्रुत्वात परिवर्तीत होईल हे सांगता येत नाही. दान देऊन तो कधी चोरीचा आरोप करेल हे ही सांगता येत नाही. अशा माणसाकडील ज्ञानही व्यर्थच कारण त्या ज्ञानाचा विवेकी उपयोग झाला नाही तर ती मूर्खताच होय.
संत तुकोबारायांनी म्हटलेच आहे,
हीन माझी याति । वरी स्तुती केली संती ॥
अंगी वसू पाहे गर्व । माझे हरावया सर्व ॥
मी एक जाणता । ऐसे वाटतसे चित्ता ॥
राख रोख गेलो वाया । तुका म्हणे श्रीकृष्णाच्या ॥
संत म्हणतात की हे देवा श्रीकृष्णा! मी हीन जातीचा असून संतजन आता माझी स्तुती करू लागले आहेत, परंतु त्यामुळे माझ्या अंगी अहंभाव वसू पाहतोय. जगातील सर्व ज्ञान मलाच आहे की काय असा दंभ मनास शिवतोय. हे विठूराया आता तरी माझ्यावर कृपा कर आणि माझ्या अहंकारापासून माझे रक्षण कर.
दुसऱ्या एका अभंगात तुकोबाराय म्हणतात,
बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥
भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥
विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥
सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥
गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥
तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥
दंभ, दर्प, अभिमानामुळे वरील श्लोकाप्रमाणे अवस्था होऊ नये याची काळजी तुकारामांसारखे संत स्वतः घेतात व इतरेजनांसाठी स्वतःच्या माध्यमातून त्याचे विपरीत परिणाम काय आहे ते सांगतात.
रामदास पंतांनीही दासबोधामध्ये लिहिलं आहे,
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन ।
हे अज्ञानाचे लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥
भगवद्गीतेतील दैवासुरसंपद्विभागयोग या अध्यायातील श्लोक प्रसिद्धच आहे.
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् ॥
~ १६.४, श्रीमद्भगवद्गीता.
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की दंभ (खोटेपणा, लबाडी, लोकांनी चांगले म्हणावे यासाठी फक्त चांगुलपणाचा दिखावा करणे) ; दर्प (अतिगर्विष्ठपणा, अनाठायी गर्व, माज); अभिमान (अहंपणा); क्रोध (इच्छित वासनेची वा कामनेचीपूर्ती न झाल्याने येणारी प्रतिक्रिया.) ; पारूष्य (दुसऱ्याला दुखावतील असे कठिण बोल); ह्या सर्व गोष्टी अज्ञानाची लक्षणे आहेत. हीच आसुरी संपत्ती होय.
दर्पभूताभिभूतस्य विद्या मौर्ख्यशतायते । हा श्लोक काश्मीरमध्ये अकराव्या शतकात होऊन गेलेल्या क्षेमेंद्र या कवीच्या दर्पदलनम् या नितीकाव्यातील आहे. क्षेमेंद्राची ग्रंथसंपदा विपुल आहे. 'रामायणमञ्जरी', 'भारतमञ्जरी', 'बृहत्कथामञ्जरी' हे क्षेमेंद्राने लिहिलेले ग्रंथ आहेत. 'औचित्यविचारचर्चा', 'कविकण्ठाभरण', 'सुवृत्ततिलक' हे काव्यग्रंथ, याशिवाय 'नीतिकल्पतरु', "दर्पदलनम्' ही नीतीकाव्ये तसेच 'देशोपदेश', 'नर्ममाला' हे तत्कालीनच नव्हे तर सार्वकालिक समाजप्रवृत्तीदोषांवर उपहासात्मक लिहिलेले ग्रंथ आहेत.
दर्पभूताभिभूतस्य विद्या मौर्ख्यशतायते। ह्या लोकोक्ती नुसार अतिप्रमाणात अहंगंड असणाऱ्या व्यक्तिकडे असलेली विद्या त्याला शतपटीनेही आसुरी किंवा मूर्ख करते. रावण, हिरण्यकश्यपू हे तर राक्षस होते पण अनेक पुराणे आणि चरित्रकथांमधून प्रचंड वेदाभ्यास केलेले प्रकांडपंडितही अहंकार आणि ज्ञानदर्पाने आंधळे होऊन 'मला वादविवादात हरवू शकेल असा जगात कोणीच नाही' ह्या भ्रमात देशोदेशी वादविवाद करत स्वतःच्या ज्ञानाचा टेंभा मिरवत फिरताना दिसतात. गुरुचरित्रातील जयपत्राचा आध्याय वाचला असेल तर हे सहज लक्षात येईल. हे सगळेच दर्पभूताभिभूतस्य विद्या मौर्ख्यशतायते । ह्या कोटीतलेच म्हणायला हवेत.
अहंकारी मनुष्याने केलेला वेदाभ्यास असो वा मिळविलेले ज्ञान असो काहीच उपयोगाचे नसते कारण त्या विद्येचा विनियोगच मुळी सत्कार्यासाठी होत नाही. हाच संदेश क्षेमेंद्राला वरील श्लोकातून द्यायचा आहे.
लेखक :- अभिजीत काळे