प्रेरणादायी बोधकथा
क्रोधावर नियंत्रण कसे करावे
एखाद्या कारणावरून किंवा प्रसंगावरून तुम्हाला राग, क्रोध आला तमतम झाली तर समजून जा की राग, क्रोध अजूनही तुमच्या अंतःकरणात वास करत आहे. क्रोध अंतरात असतो पण त्याचे कारण बाहेरून असते. कोणीही आपल्याला चिडवू शकतो. क्रोध येईल असे वागू शकतो, आणि आपण जर चिडलो रागावलो क्रोधित झालो तर याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही तुमच्या मनाचे मालक नाही, मालक दुसरा कोणीतरी आहे, आणि त्याच्यात तुम्हाला नियंत्रण करण्याची क्षमता आहे. तुमच्या सुख दुःखाचा स्वीच त्याच्या हातात आहे. तुमचा राग ही कृती नसून ती प्रतिक्रिया आहे.
पण काय करणार? आपण कितीही प्रयत्न केला तरी रागावर नियंत्रण करणे कठिण होऊन बसते. कारण समाजात अशी माणसे आहेत ज्यांचा जिभेवर ताबा नाही. त्यामुळे क्रोध उत्पन्न होतोच. मग जर तुम्ही स्वतः तुमच्या मनाचे मालक असाल तर तुम्हाला डिवचणाऱ्या माणसाच्या मूर्खपणाची दया येईल. म्हणून प्रतिक्रिया देणे टाळावे.
पण प्रतिक्रिया म्हणून राग काढणे हा गेल्या काही वर्षांपासूनचा प्रघातच झाला आहे. सहिष्णुता असणारे लोक खुप कमी आहेत. म्हणूनच क्रोध बाहेर येतो. पण क्रोधाच्या वेळी आपण शांत राहणे राग राग न करणे अत्यंत चांगले आहे. आणि जर आपला आपल्या मनावर ताबा असेल तर त्याचे आपण साक्षीदार व्हा. हा ध्यानाचा पुढचा टप्पा आहे. क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी ध्यान साधणे, परमेश्वराचे नामस्मरण करणे खुप आवश्यक आहे.
एकदा त्यांच्या आश्रमात एक महात्माजी परमेश्वराचे ध्यान करत आसनस्थ होते. तेवढ्यात त्यांचा एक उपदेशी शिष्य त्यांच्या भेटीला आला. तो शिष्य स्वभावाने थोडा चिडचिडा होता. त्याला प्रत्येक गोष्टीचा पटकन राग येत असे. आणि रागात येऊन तो पुढच्याला वाटेल ते बोलून जात असे नंतर त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप वाटायचा. पण नेमके क्रोधाचा वेळी त्याच्याकडून मन नियंत्रण होत नव्हते. यावर गुरूंना काही उपाय विचारावा म्हणून तो गुरूबांच्या भेटीला आला. नारळ विडा देऊन भेटला पाच दंडवत घातले. आश्रमातील देवपूजा केली आणि पुन्हा गुरुंजवळ येऊन बसला. गुरुंनी त्याला क्षेम कुशल विचारले.
तो म्हणाला - बाबा, सर्व ठीक आहे, आपल्या प्रसन्नतेने व देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित चाललेले आहे.” मग थोड्या वेळाने त्याने बाबांना विचारले, “बाबा तुमचे वागणे इतके मधुर आहे, आपल्या पायाजवळ आल्याबरोबर मन शांत होते. तुमची वाचा किती मधाळ गोड आहे, जणूकाही जिभेवर मध आहे, आपण किती गोड बोलता, कुणी कितीही कसलाही प्रश्न विचारला तरी त्याच्याशी संवाद साधता? क्रोध येईल अशा प्रसंगीही तुम्ही शांत राहता, ना कुणावर रागावता ना कुणाला वाईट बोलता? तुमच्या चांगल्या वागण्याचे रहस्य सांगा का? क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी काय करायला पाहिजे? माझ्या अंगी खूप क्रोध आहे. मला क्रोधावर नियंत्रण करणे अजिबात जमत नाहीये. माझ्या या क्रोधामुळे माझ्याकडून माझे अनेक नातेवाईक दुखावले गेलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा मला पश्चातापही होतो पण वेळेवर क्रोधावर नियंत्रण होत नाही. मी काय करू? मला काहीतरी उपाय सांगा?
बाबा म्हणाले - "ते माझे रहस्य मी तुला नंतर सांगेन, परंतु तूर्त मला तुझे एक रहस्य माहित आहे!
"माझे रहस्य ! ते गुरुजी काय?? शिष्याने आश्चर्याने विचारले.
गुरु दुःखी व गंभीर होऊन म्हणाले, "घाबरू नको, मला सांगायला वाईट वाटते आहे पण तरीही सांगतो की, पुढच्या आठवड्यात तू मरणार आहेस!"
शिष्याने हे ऐकले तोही गंभीर झाला. गंभीर होण्याचे कारणही तसेच होते हेच जर दुसरे कोणी बोलले असते तर शिष्याने गंमतीने टाळून त्याचे बोलणे हसण्यावारी नेले असते. पण स्वतः गुरुजींच्या तोंडून निघालेले शब्द कोणी कसे काय खोटे असू शकतील? या विचाराने तो अतिशय चिंतामग्न झाला. त्यांनी गुरूंना विनंती केली की, “मी आता काय करू?” त्यावर गुरुबा म्हणाले, “मृत्यू समीप असताना काय करायला पाहिजे? हे तुला चांगले माहित आहे.” गुरूंचा आशीर्वाद घेऊन शिष्य दुःखी अंतःकरणाने निघून गेला.
परंतु त्या भविष्यावाणीचा त्याच्यावर सकारात्मक परिणाम झाला. तेव्हापासून त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला. त्याने चिडचिड करणे सोडले. तो सर्वांशी प्रेमाने बोलायला लागला. त्याने सर्वांची आपुलकीने विचारपूस करायला सुरूवात केली. त्यानंतर तो कधीही कोणावर रागावला नाही. आणि त्याने जास्तीत जास्त वेळ ध्यान आणि उपासनेत घालवायला सुरूवात केली.
ज्यांच्याशी त्याने गैरवर्तन केले, ज्यांना दुखावले त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफीही मागीतली. लवकरच गुरुंची भविष्यवाणी पूर्ण होण्याचा दिवस उगवला. शिष्याने विचार केला, चला गुरूंचे शेवटचे दर्शन घेऊ आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ. तो गुरुंच्या भेटीला आला. आणि म्हणाला- गुरुजी, माझी वेळ संपणार आहे, मला आशीर्वाद द्या!, माझ्यासाठी देवाला प्रार्थना करा” “माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा. बरं, मला सांग, तुझे मागचे गेले सात दिवस कसे गेले? तु पूर्वीसारखा लोकांवर रागावला का? चिडचिड केली का? त्यांना शिव्या दिल्या का? गुरुजींनी प्रश्न विचारला.
शिष्य म्हणाला, "नाही बाबा, अजिबात नाही. माझ्याकडे फक्त सात दिवसाचे आयुष्य होते, ते मी फालतू बोलण्यात कसे वाया घालवेन? मी सर्वांना प्रेमाने भेटलो, आणि ज्यांना मी एकदा दुखावले होते त्यांची माफीही मागितली. आणि जास्तीत जास्त वेळ देवा धर्मात खर्च केला.”
गुरू हसले आणि म्हणाले, "हेच माझ्या चांगल्या वर्तनाचे रहस्य आहे. मला माहित आहे की मी कधीही मरू शकतो, म्हणून मी सर्वांशी प्रेमाने वागतो आणि हे माझ्या चांगल्या वागण्याचे मधुर वाणीचे रहस्य आहे. आणि घाबरू नकोस तु आज मरणार नाहीस. पण इथून पुढे असेच वर्तन कर जेणेकरून तुला सुख लाभेल”
शिष्याला समजले की गुरुजींनी त्याला जीवनाचा धडा शिकवण्यासाठीच त्याला मृत्यूची भीती दाखवली होती. मित्रांनो! या कथेतून आपल्याला प्रेरणा मिळते की, खरं तर, आपल्याकडेही फक्त सातच दिवस उरले आहेत. रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि, आठवा दिवस अजिबात नाही. तर मग चला बदल सुरू करूया. आणि उर्वरीत आयुष्य आनंददायी बनवू या.
दंडवत प्रणाम