स्थानपोथीतील देवता आणि तत्कालीन शिलालेख
श्रीचक्रधरस्वामींच्या संदर्भामध्ये विविध पद्धतीने अभ्यासकांनी नोंदी घेतल्या आहेत. स्थानपोथीतून नोंदवण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या विषयीची माहिती पाहणे सुद्धा आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक इतिहासाचा मागोवा घेत असतांना अशी माहिती उद्बोधक ठरते. स्थानपोथीत एकूण १५३ देवदेवतांची माहिती आली आहे. यांतील कित्येक नावे एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत. अशी देवतांची एक यादी डॉ. वि. भि. कोलते यांनी संपादित केलेल्या स्थानपोथीच्या परिशिष्टात दिली आहे. या देवतांची वर्गवारी करतांना शक्तिदेवता, विष्णु ज्याला वैष्णवदेवता असे म्हणता येईल व शैव देवता असे तीन प्रधान गट करता येतात. स्वामींचा काल हा प्रामुख्याने यादवकाल आहे. याचवेळी महाराष्ट्राच्या काही भागात शिलाहार, उत्तरचालुक्य आणि राष्ट्रकुटांचे शेवटचे मांडलीक म्हणून राज्य करीत होते. या राजांनी दिलेल्या विविध दानलेखांतून तत्कालीन महाराष्ट्रात रूढ असलेल्या देवदेवतांची नोंद पाहावयास मिळते. स्थानपोथीतून आलेल्या देवता आणि अभिलेखातील किंवा ताम्र-शिलाशासनातील देवता यांचा तौलनिक अभ्यास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा
शक्तिदेवता
महालक्ष्मी भारतीय मूर्तिशास्त्रामध्ये एक शक्तिदेवता म्हणून हीचे स्थान आहे. गजान्तलक्ष्मी हे शिल्प राष्ट्रकुटांनी कोरलेल्या कैलास लेणीमध्ये अतिशय प्रभावीपणे दाखविले आहे. स्थानपोथीमध्ये एकूण २८ वेळा महालक्ष्मीची नोंद आली आहे. अनेक ठिकाणी महालक्ष्मीचे स्थान हे गावातील मुख्य दैवत म्हणून नोंदवले आहे. स्थानपोथीच्या संदर्भामध्ये विचार केल्यास कडेठाण (जि. औरंगाबाद) येथे महालक्ष्मीचे प्रशस्त असे मंदिर असून हे मंदिर प्राकारयुक्त आहे. मंदिरातील विहिरीची नोंदही स्थानपोथीत आली आहे (स्थानपोथी पृ. २०). कडेठाण या ग्रामनामातील 'ठाण' हा शब्द 'पीठ' या अर्थी येतो. यादव कालात शक्तीउपासना मोठ्या प्रमाणात होत होती. बीड (जि. बीड) येथे महालक्ष्मीच्या देवळात मातीचे चांदोवे करून त्यावर बेगड लावून लटकवले असल्याची नोंद लीळाचरित्रात आली आहे. पैठण (जि. औरंगाबाद) व अन्य ठिकाणी सुद्धा मुख्य शक्तिपीठ म्हणून याची नोंद पाहावयास मिळते. डॉ.शं.गो. तुळपुळे यांनी संपादित केलेल्या 'प्राचीन मराठी कोरीव लेख' या ग्रंथात महालक्ष्मी या देवतेविषयी व अन्य तत्कालीन देवदेवतांविषयी नोंदी पाहावयास मिळतात. शिलाहार राजा केशीदेव याचा शके ९३४ चा अक्षी शिलालेख (क्र १ ओ.८), यादव राजा कृष्णदेव याचा शके ११७८ चा कवलापूर शिलालेख (क्र: ३०, ओ. १५), विजयनगरचा राजा संगमदेवराय प्रथम याचा बांदोडे शिलालेख शके १३३५, या व अशा लेखातून या देवतेविषयी नोंद आढळते. शिलाहार राजांच्या काळात निर्माण करण्यात आलेले कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे स्थान प्रसिद्ध आहे.
महालक्ष्मीचे धाबे : महालक्ष्मीचे धाबे पूर्वाभिमुख (स्थानपोथी पृ. ४७) अशी नोंद देऊन भाटापुरी या स्थानासंदर्भात महालक्ष्मीचे देऊळ असा स्वतंत्र निर्देश आहे. तसेच गावाच्या दक्षिणेस मळ्यामध्ये महालक्ष्मीचे धाबे अशी स्वतंत्र नोंद आहे. येथे देऊळ व धाबे यांत थोडा फरक जाणवतो. धाबे हा शब्द मातीच्या पेंढांचे आच्छादन असलेले माळवद किंवा घर या अर्थाने येतो. मळ्यामध्ये गावाच्या बाहेर महालक्ष्मीचे असे जे स्थान आहे ते मात्र स्थानिक ग्रामदेवता 'मरीआई' अशा संदर्भात असावे. हिचे महत्त्व आषाढ महिन्यामध्ये अधिक मानले जाते.
अंबा: अंबा देवतेची नोंद स्थानपोथीत येते. तसेच कदंब राजा मरूडदेव याच्या सावरगांव येथील शके १०८६ मध्ये शिलालेखातही आली आहे. अंबादेवीच्या देवळासाठी मळ्यातील उत्पन्नाचा विसावा भाग दान दिल्याची नोंद आहे. (शं. गो. तुळपुळे, लेख क्र. १३, ओ. ५)
चंडिका : या देवतेची नोंद स्थानपोथीत पाहावयास मिळते. मंगळवेढा येथील चंडिकाईचा शिलालेख शके १२०४ (सन-१२८२) मध्ये सिद्धनाथाने कवठे हे मुख्य गाव धरून त्या लगतची सहा गावे चंडिकेप्रीत्यर्थ दान दिली आहेत. तुळपुळे यांनी नोंदवले आहे की, या दानलेखाच्या पूर्वी मूळ मंदिर अस्तित्वात असावे (तुळपुळे, क्र. ३८, ओ. ४).
अन्य शक्तिस्थाने: स्थानपोथीत आलेला महालक्ष्मीचा उल्लेख हा वैष्णवी देवता म्हणून मानला तर एकविरा, काळीका, अंबिका, चंडिका, महाकाळी, जोगेश्वरी या देवता पार्वतीची विविध रूपे किंवा नावे असल्याने त्यांचा समावेश शैव देवतांच्यामध्ये करावा लागेल. याशिवाय येणाऱ्या अन्य देवतांच्यामध्ये ईश्वरपार्वती, कमळदा, कामाक्षा, कोकनाओ, पोल्हेरी, पोळाए, चाणाक्षी, विंचाए, सुडजे, जाखीण, जोगलादेवी, डोंबार, देवद्रोणी, पिंगळा, पिठजे, फुलसरा, भिंगारा, मरगजा, मांगजे, म्हाल्हारदेवी, मात्राकवळी, म्हाळसा, राजलादेवी, रेणुका, वरदेवी, वडजंबा, वाधिका, वाळजादेवी, सत्यादेवी, सराळादेवी, सिंधिका, सीता, सुरए आदि प्रमुख नावे येतात. याशिवाय अष्टमहासिद्धी, सप्तमातृका या नोंदी उल्लेखनीय आहेत. सप्तमात्रा हे सप्तमातृका याअर्थी आले आहे. वेरूळच्या राष्ट्रकुलीन कालीन कैलास लेण्यात सप्तमातृकेचा शिल्पपट आहे. सप्तमातृकांची नावे व वाहने अशी ब्राह्मी (हंस वाहन), माहेश्वरी (नंदी वाहन), वैष्णवी (गरूड वाहन), वारही (रेडा), इंद्रीणी (हत्ती), कौमारी (मोर), चामुण्डा (प्रेत). वर नोंदवलेल्या बहुतेक देवता त्या त्या ठिकाणच्या स्थानदेवता किंवा ग्रामदेवता आहेत. त्यांना मिळालेली नावे ही सभोवतालच्या परिसरावरून मिळाली असावीत. उदाहरणार्थ वनदेवी, वाटीका, देवद्रोणी इ. स्थानावरून देवतांची नावे रूढ होणे तसेच जमातीवरून नाव मिळणे असाही प्रकार दिसतो. उदा. वाळजादेवी, जोगलादेवी, डोंबाई, कोळाए, सुराए इ. स्थानपोथीतील नोंदवलेली नावेही मूळ देवतेला
स्थानिक परिसरात ज्या नावाने संबोधले गेले ती आहेत. स्वभावतः रूढ बोलीभाषा व उच्चारपद्धती यांचा परिणाम या नावांवर जाणवतो. विचाए हे नाव कदाचित् भैरवीचे असू शकते. भैरवी या मूर्तिशिल्पात पोटावर विंचू धारण करणारी काहीशी उग्रदेवता आहे. बऱ्याचदा मूळ शास्त्रीय नाव लुप्त होऊन प्रथमदर्शनी दिसणाऱ्या ठळक लक्षणांवरून किंवा परिसरावरून अशी नावे रूढ होतांना दिसतात.
आदित्य : आदित्य हे सूर्याचे नाव. याविषयी एकूण २९ वेळा उल्लेख आला आहे. आज सूर्यमंदिर महाराष्ट्रात अभावानेच उपलब्ध आहे. यावरून यादवकाळापर्यंत सूर्याची उपासना बऱ्याच मोठ्या प्रमाणात रूढ होती असे दिसते. भिंगार (जि. अहमदनगर) येथे आदित्याचे मोठे मंदिर होते. अशी नोंद उपलब्ध आहे. याशिवाय अवलगाव, नागमठाण, सांगवखेड, पालीमैराळ, संवत्सर, खातेगाव, नोंदोर, विंझुगा, चिंचोली, बेलापूर, चास, सुरेगाव, नांदोर, इ. गावातून आदित्याच्या मंदिराविषयीची नोंद आहे. तत्कालीन शिलालेखात सुद्धा आदित्य देवतेची नोंद अभावानेच आढळते. विशेषतः सूर्यदेवतेची उपासना स्वतंत्रपणे न होता पंचायतन पूजेत त्याचा समावेश झाला असल्याचे दिसते. स्थानपोथीत आलेली आदित्य मंदिरे कदाचित् प्रारंभीक यादवकाळातील किंवा त्याहीपूर्वीची असावीत. सूर्यकांत अशी सूर्यदेवतीची स्पष्ट नोंद स्थानपोथीत आढळते.
याशिवाय आदित्य हा प्रत्यय लावून आलेली देवतानावेसुद्धा उल्लेखनीय आहेत. उदा. उग्रादैत्य, मूढादैत्य, लिंबादैत्य. ही तिन्ही पैठणला होती व याविषयीची नोंद येथील शिलालेखात उपलब्ध आहे. पुरादैत्य (नेवासा) व दैत्यसूदन (ही नोंद १२ वेळा आली आहे) भोगादित्यदेव अशी आदित्यविषयक उपपदे लावून नोंद आल्याचे दिसते. अशी एक नोंद अंबाजोगाई येथील कलचुरी सिंघणदेव याच्या अंबेशिलालेखात शके १११० (सन ११८८) मध्ये आली आहे. सूर्यपूजा ही यादवकाळात मल्हारीमार्तंडाच्या पूजाअर्चेत समाविष्ट झाली असे मत 'यादवकालीन महाराष्ट्र' या पुस्तकात मु. ग. पानसे नोंदवतात.
भैरव:
स्थानपोथीतून भैरवाची २१ वेळा नोंद आली आहे. याशिवाय पिंपळभैरव असे एक स्थान नोंदवले आहे. यावरून यादवकाळात भैरवाची उपासना मोठ्याप्रमाणात होत असावी. तत्कालीन अभिलेखातूनपण याविषयी नोंद मिळते. सामंत नागदेव याचा पल्लीका ताम्रपट के १२७४ (सन १३५२) भैरवदेव हा नागदेवाचे कुलदैवत असून त्याच्या नावापुढे नागदेवाने राणे हे उपपद जोडले आहे (तुळपुळे ले. क्र. ५४, ओ. ३१). स्थानपोथीतील भोगराम या रामटेक येथील मंदिराच्या उल्लेखाबरोबरच जवळील बैरवाची देऊळी पटिसाळ: ॥ (स्थानपोथी पृ. ४) अशी नोंद येते. या स्थानाची नोंद यादवकालीन शिलालेखात महाभैरव अशी आली आहे. रामटेक विषयीचे सिंधुगिरी महात्म्य यातही या स्थानाची नोंद आहे असे वा. वि. मिराशी या स्थानाची नोंद घेताना नोंदवतात सध्या भैरव दरवाजाजवळ ही मूर्ती असून स्थानपोथीत म्हटल्याप्रमाणे भोगराम मंदिराजवळ ती दिसत नाही.
वैष्णवीदेवता
नृसिंह: नरसिंहाची नोंद स्थानपोथीत एकूण १२ वेळा आली आहे. रामटेक येथे असलेले नृसिंह मंदिर हे अगदी वाकाटककालीन म्हणजे चौथ्या-पाचव्या शतकातील असल्याचे आता नव्याने झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तत्कालीन शिलालेखांतून या स्थानाची नोंद आली असून हा नृसिंह रामचंद्र यादवाच्या लक्ष्मण मंदिरातील शिलालेखात नोंदवला गेला. रामटेक येथील या स्थानाचे व अन्य स्थानांचे वर्णन याच लेखात आहे. गोदावरीच्या काठावर राहेर (जि. नांदेड) येथे यादवकाळात उभारण्यात आलेली नृसिंहाची दोन मोठी मंदिरे आहेत. यादवराजा कृष्णदेव याच्या काळातील कान्हेगाव लेखात (शके ११८०) 'आनंदनृसिंहदेव' असा उल्लेख मिळतो. विशेष म्हणजे या लेखावर नृसिंहाचे शिल्प कोरलेले आहे (तुळपुळे, ले. क्र ३१, ओ. २५-२६).
राजमठ आणि नृसिंह मंदिर:
वरील प्रकारच्या नोंदीतून हे स्पष्ट होते की किमान चौथ्या शतकापासून नृसिंहाची मूर्ती व मंदिरे महाराष्ट्रामध्ये आढळतात. विष्णूचा एक अवतार मानलेल्या नृसिंह मंदिरामध्ये श्रीचक्रधरस्वामी थांबल्याचे उल्लेख महानुभाव साहित्यातून मिळतात. या नोंदींच्याविषयी अभ्यासकांनी काही मते व्यक्त केली आहेत. रा. चिं. ढेरे यांनी 'आपल्या लोकसंस्कृतीची क्षितिजे' या ग्रंथात नोंदवले आहे, “राजमठ ही संज्ञा केवळ रिधपूर येथील नृसिंह मंदिरापुरती मर्यादित नाही. महानुभाव पंथामध्ये कोणतेही नृसिंह मंदिर राजमठ म्हणून ओळखले जाते. नृसिंहमठाला राजमठ ही संज्ञा देण्याचा प्रघात आहे." य. खु. देशपांडे असेच मत नोंदवतात. वि. भि. कोलते यांनी स्पष्ट केले आहे की, महानुभाव पंथीयांनी त्यांचे ईश्वरी अवतार विशेषतः श्रीगोविंदप्रभु आणि श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या नृसिंह मंदिरांत राहिले ती सर्वच नृसिंह मंदिरे राजमठ या संज्ञेने ओळखली जातात. हिवरळी (जि. जालना) या स्थानाबाबत नोंद अशी, "दुर्गा दक्षिणे गावांतु नरसींह मठू तयाचे महानुभावी नाव ठेवीले राजमठू" (कोलते, स्थानपोथी पृ. ४६). वरील उल्लेख योग्य असला तरी नृसिंह मंदिरांचा प्रत्यक्ष शोध घेत असताना असे स्पष्ट होते की, सर्वच नृसिंह मंदिरे राजमठ म्हणून नोंदवली जात नव्हती. स्थानपोथीमध्ये नांदेड, राहेर, पैठण, त्र्यंबकेश्वर, निफाड (येथे दोन नृहिंस मंदिरे आहेत), सराळे, रावसगाव, बादाठाणा, देऊळवाडा, वाडेगाव, हतनुर, भंडारा, संगमेश्वर, छिन्नस्थळी, खडकुली हुमनदेवी इ. गावांमधून नृसिंह मठांची नोंद आहे. राजमठ या संदर्भामध्ये ब्रह्मानंद देशपांडे व अरविंद श्री. कुरुंदकर यांनीही अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. येथे एका मर्यादेत नृसिंह या देवतेची नोंद घेतली आहे.
नारायण
नारायण हे विष्णुचे एक नाव होय. या देवतेची नोंद ६ वेळा स्थानपोथीतून आली आहे. नारायण या मुख्य देवतेला अन्य विशेषणे लावली आहेत. जसे गर्गनारायण, तिकवनारायण, भोगनारायण, लक्ष्मीनारायण, सिंहनारायण, सुंदरनारायण अशी नावे येतात. नारायण या देवतेची नोंद तत्कालीन अभिलेखातून येते. भांदक येथील नागनाथाच्या देवळातील शके १०६८ (सन १९४६) चा शिलालेख यात चांगदेवाचा तिसरा मुलगा जाननायक याने नारायणाची प्रतिष्ठापना केली [तुळपुळे, ले. क्र ६ व ३ तसेच वृतुरे येथील सोमेश्वराच्या देवळातील शिलालेख शके १०७७ (सन १९५५) ]व शिलाहार राजा मल्लिकार्जुन याचा चिपळूण शिलालेख यातून नारायणाविषयी नोंद आली आहे. अर्थात हा शब्द व्यक्ती या अर्थाने आला आहे.
भोगनारायण :
पैठण येथील सोमेश्वर देवाचा शिलालेख या यादवकालीन लेखात सोमेश्वर स्वामीची जगती अशी नोंद असून अन्य देवता परिवाराची नोंद आहे. यात सोढलनारायणाच्या देवस्थानासाठी काही उत्पन्न करून दिले आहे ते असे- सोढलनारायण, वेसूनारायण, म्हातूनारायण अर्थात वरील तीन व्यक्तींनी स्थापन केलेल्या नारायण मंदिराविषयीचे हे उल्लेख असावेत. डॉ. शं. गो. तुळपुळे नोंदवतात, स्थानपोथीतील भोगनारायण म्हणजे प्रस्तुत लेखातील सोढल (भोग) नारायण असून हा उल्लेख सोमेश्वरस्वामींच्या प्राकारामध्ये असलेल्या देवतास्थानापैकी एक आहे. या लेखाचा काळ श्रीचक्रधरपूर्वकाळ असावा (तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीवलेख क्र. ७०, पृ. ३६७-६८). हा लेख ज्या ठिकाणी उपलब्ध झाला तेथेच स्वामींनी स्पर्श केलेले स्थान असून भोगनारायण मंदिर या नावाने हे स्थान ओळखले जाते (स्थानपोथी पृ. १३). याचप्रमाणे लक्ष्मीनारायण अशी नोंद शिलाहार राजा केशीदेव द्वितीय याचा मांडवी शिलालेख शके ११२५ ( सन १२०३) यात असलेल्या नोंदीवरून कळते की, शिलाहाराचा महामात्य लक्ष्मीधर याने स्थापन केलेल्या श्रीलक्ष्मीनारायणाच्या साक्षीने काही दान दिले. मांडवी या गावात हे दैवत आहे (तुळपुळे, ले. क्र. १९, ओ. ५).
भोगराम हे स्थान नागूपर जिल्ह्यातील रामटेक येथे आहे. याविषयीची नोंद रामचंद्र यादवांच्या शिलालेखात आली आहे. (मिराशी वा. वि., विदर्भ संशोधन मंडळ, ग्रंथमाला क्र. ११८, पृ. ८९, ओ. ५३) स्थानपोथीमध्ये या मंदिराचे सविस्तर वर्णन आले असून सध्या श्रीचक्रधरमंदिर प्रसिद्ध आहे. येथे विष्णूची चतुर्भूज मूर्ती असून शंख, अक्षमाला, चक्र व गदाह धारण केलेली आहे. ही वास्तू वाकाटककालीन असल्याचे नव्याने स्पष्ट झाले आहे.
गुप्तराम स्थानपोथीत आलेले भोगराम मंदिरालगत असलेले दुसरे मंदिर हे गुपितराम याचे आहे याला गुप्तभैरव असेही म्हणतात. राम-लक्ष्मण मंदिर रामटेक येथे असलेली व स्थानपोथीत पण आलेली ही मंदिरे 'रामाचे देऊळ पूर्वाभिमुख रामाचिया देवळापुढे लक्ष्मणाचे देऊळ पूर्वाभिमूख अशी नोंद आली आहे. रामटेक शिवाय नाशिक येथील पंचवटीजवळील रामाचा उल्लेख पण स्थानपोथीत येतो. राम-लक्ष्मणाची प्राचीनता सर्वज्ञात आहे. असे असले तरी रामटेक येथील या मंदिरांची नोंद जशी स्थानपोथीत आहे तशी ती 'सिंधुगिरी महात्म्य' व 'यादव शिलालेखात' आहे. या स्थानविषयीचे स्थलमहात्म्य याचा स्वतंत्रपणे उल्लेख व तपशील पुढे आपण पाहणार आहोत. रामटेक येथील सर्वच स्थाने ही वाकाटककालीन असल्याचे दिसते. यादवकाळात त्याचा जीर्णोद्धार झाला. आणि आजही ती स्थाने उभी आहेत. वरील उल्लेखाशिवाय वैष्णव देवतांचे जे उल्लेख स्थानपोथीत आली आहे. त्यात केशव, गदाधर, गोपाळ, गोवर्धन, चक्रपाणी, छय्यागोपाळ, जनार्दन, जगत्तुंग, त्रिपुरुष, दामोधर, प्रागमाधव, वराहदेव, सारंगधर यासारखी नावे आली आहेत.
गरुडाचे साजे यासारखी नोंद स्थानपोथीत येते. वेरूळ येथील जयतुंगाचे स्थान व त्यालगत असलेली अग्निष्ठिका यांची नोंद आली आहे. जयत्तुंग जगत्तुंग असा एक जलाशय राष्ट्रकूटराजा कृष्ण तिसरा याने कंधार येथे निर्माण केला. तर अमोघवर्षा प्रथम याने जयत्तुंगदेव असे बिरुद धारण केल्याची नोंद मिळते. जळसेन या देवतेची नोंद वेरूळ व नाशिक या स्थानाशी संबंधित आहे. अपवादात्मक ठिकाणी श्रीदत्तात्रेयाविषयीची नोंद स्थानपोथीतून येते. वर उल्लेख केलेल्या देवता या वैष्णवी देवता आहेत.
शैवदेवता: स्थानपोथीत आलेली सर्वाधिक नावे ही शैव-शिव विषयक आहेत. यातील काही नावे तत्कालीन शिलालेखातून आली आहेत.
लिंगाची देवळी : स्थानपोधीतून एकूण देवतांच्या उल्लेखांपैकी सर्वाधिक जास्त ५४ ठिकाणी लिंगाची देवळी असा उल्लेख येतो. रा. चि. ढेरे याविषयी लिहितात, “ज्यांना विवक्षित नाव नाही असे लिंगदेव कोकणात अजूनही गावोगाव असल्याचे मी स्वतः पाहिले आहे. या लिंगांना शाळुंका नसते वरवंटयासारखे कमीजास्त उंचीचे ओबडधोबड उभे पाषाण लिंग या सामान्य नावाने ओळखले जातात आणि पुजिले जातात. अशा स्थानांची नोंद चक्रधराच्या भ्रमणामुळे लीळाचरित्रात आली आहे. तेव्हा ही स्थाने शिवमंदिरे नसावीत तर अशी लिंगरुपी देवतांची आयातणे असावीत असे वाटते" (ढेरे, लज्जागौरी पृ. १३९). वरील विधानांप्रमाणे लिंगाची दवेळी म्हणजे नेहमीच अशी आयातण स्वरूपात आढळणारी स्थाने नसावीत अशी लिंग देवळी एखाद्या मुख्य मंदिरामध्येच असल्याचे दिसते. उदा. अरण्यग्राम येथे नागनाथाच्या मंदिरात जगतीच्या आत वायव्यकोनी लिंगाची देवळी आहे. स्थानपोथीत याप्रमाणे हिवरळी येथील स्थानाविषयी नोंद येते. नृसिंह मठाच्या अंगणात वृंदावन व लिंगाची देवळी आहे. काही अपवादात्मक ठिकाणी लिंगाची देवळी हा उल्लेख स्वतंत्र प्राकारयुक्त अशा शिवमंदिराबाबत आला आहे. भंडारा येथे तळ्याच्या पाळीवर असलेले प्राचीन शिवमंदिर अशा पद्धतीने नोंदवले असावे असे वाटते. सर्वसामान्यपणे एकगर्भी छोटेखाणी देऊळ बांधलेले असावे असे दिसते. स्थानपोथीतील लिंगदेवाचा शोध घेताना असे लक्षात येते की बहुतांश स्थाने ही एखाद्या मोठ्या दवेतेच्या आवारात किंवा गावाच्या बाहेर शिवलिंग या रूढ अर्थाने स्थापन केलेले दिसते. लिंगाची देवळी याला आणखी एक अर्थ अभिप्रेत असावा असे वाटते. तत्कालीन समाधी-स्थानाच्या संदर्भात हा उल्लेख असावा. मुगूट (जि. नांदेड) येथे यादवकालीन एकगर्भी मंदिर या बाबीकडे संकेत करतात.
विज्ञानेश्वर : श्रीवंकनाथ आपेगाव येथील महादेवाचे हे नाव असून विज्ञानेश्वर मंदिर - म्हणून ज्ञात असलेल्या या स्थानाची नोंद स्थानपोथीतून आली आहे. याच मंदिरात शके ११०० (सन ११७८) चा यादवकालीन शिलालेख उपलब्ध असून, शं. गो. तुळपुळे यांनी त्याचे संपादन केले आहे. त्यांनी नोंदविल्याप्रमाणे स्थानपोथीतील श्रीवंकनाथ हाच विज्ञानेश्वर आहे. लीळाचरित्र व स्थानपोथीच्या निर्मितीपूर्वी साधारण एक शतक आधी या मंदिराची वास्तू निर्माण झाली. (खेईदेवाने) हे श्रीवंकनाथाने देवालय बांधले हे काहीसे विचित्र वाटणारे नाव लुप्त होऊन त्या जागी विज्ञानेश्वर हे सुसंस्कृत व प्रतिष्ठित नाव रूढ झाले असावे असे वाटते (तुळपुळे, ले. क्र. ७४, ओ. १). एकूण श्रीचक्रधरस्वामीनी या स्थानाला भेट देण्यापूर्वी हे मंदिर विज्ञानेश्वर या नावाने रूढ झाले ही वास्तू प्रारंभिक यादवकालीन आहे.
बामेश्वर : स्थानपोथीत आलेले हे स्थान सेलवड (सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील आहे. हे शिवमंदिर आहे. या मंदिरात सिंघणदेव यादवाच्या वेळचा शिलालेख उपलब्ध झाला असून याचे संपादन ब्रह्मानंद देशपांडे यांनी केले आहे. सिंघण यादव राज्य करीत असताना गौडवंशातील महादेव पंडित दामोधर याचा पुत्र महाश्रीकर्णिक श्रीएलणपंडित याने आपली पत्नी बामादेवी हिच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ मंदिर व बारव बांधली (ब्रह्मानंद देशपांडे, शोधमुद्रा, पृ. ६४-६५). या बामेश्वराचा उल्लेख स्थानपोथीत आला आहे.
उत्तरेश्वर: पैठण एका महादेव मंदिराची ही नोंद आहे. उत्तरेश्वर हे नाव शिवमंदिराच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी रूढ आहे. तेर (जि. उस्मानाबाद) येथील उत्तरेश्वर मंदिर पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. तर शिलाहार राजा सोमदेव याच्या शके ११०७ (सन १९८५) शिलालेखात श्रीस्थानकातील (ठाणे) श्रीउत्तरेश्वर देवळाप्रीत्यर्थ काही भूमिदान करण्यात येत आहे (तुळपुळे, ले. क्र. १५, ओ. ३३). एकूण उत्तरेश्वर हे शिवाचे नाव म्हणून रूढ असल्याचे स्पष्ट होते. स्थानपोथीतून आलेले नागनाथ हे नाव शिवमंदिराचेच आहे. अरण्यग्राम, सेवता, मिरेगाव, पैठण, शिराळा इ. ठिकाणी नागनाथ मंदिरे होती. या देवतेचे उल्लेख यादवकालीन ताम्रपट व शिलालेखांतून आले आहेत. हतनूर येथे रामचंद्र यादवाचा लेख मल्लिक बहाद्दूर याच्यावेळचा, • खारेगाव ताम्रपट विजयनगरचा, संगमदेवराय प्रथम याच्या काळातील बांदोड शिलालेख अशा लेखातून नागनाथ मंदिराचे उल्लेख येतात. हतनूर व बांदोड या ठिकाणी नागनाथांची मंदिरे आजही अस्तित्वात आहे.
सोमनाथ: स्थानपोथीत पैठण, घानदरी, पारनेर याठिकाणी सोमनाथ मंदिराची नोंद आहे. याविषयीची नोंद एकूण ८ वेळा आली आहे. शिलाहार राजा अपरादित्य दुसरा याचा शके ११०७ चा ठाणे लेख यातील नोंदीप्रमाणे सोमनाथ ही नोंद 'सौराष्ट्रीय' म्हणजे सोरटीसोमनाथविषयी आहे (तुळपुळे, ले क्र. १५, ओ. २). राजापूर येथील सोमनाथ मंदिरातच असलेल्या शिलालेखात या देवतेविषयी स्पष्ट अल्लेख आहे (तुळपुळे, ले. क्र. ७६, ओ. ३).
विज्ञानेश्वर याविषयीच नोंद स्थानपोथीत आहे तशी बांदोड शिलालेखात आहे.
वैजनाथ पैठण येथील वैजनाथ या स्थानाविषयी जशी नोंद आहे तसेच शिलाहार राजा अपरादित्य याचा परळ शिलालेख शके ११०८ यात वैजनाथदेव म्हणजे गुजरातमधील डभोईचा नाथ असून या लेखाच्या शेवटी शापवचन दिले आहे. एकूण या रूढ देवतेची नोंद स्थानपोथीसारखीच अभिलेखातही मिळते.
वनदेव : या निसर्गदेवतेची नोंद नाशिक, वेरूळ, हिवरळी, विझुंगा, भोकर इ. गावी झाली आहे. बहुतेक ठिकाणी हे गाव गावाच्या बाहेर वनामध्ये असल्याचे दिसते. ही निसर्गदेवता असून शिवलिंग स्वरूपामध्ये तिची पूजा होत असावी. याशिवाय विनायक हे नाव १३ वेळा आणि गणेश हे १६ वेळा आले आहे. चौतोंडा गणेश अशी एक नोंद आहे. चारहीकडून गणेशशिल्प असलेली चौरसशिळा असते. तिला चौतोंडा गणेश असे नोंदवले जाते. असे गणेशशिल्प बीड, मुगुट, अंबाजोगाई, धर्मापुरी अशा स्थानावर आहे.
वरील उल्लेखांशिवाय जैन मंदिराचे दोन उल्लेख आहेत. 'वैसे जैन बसति' हा उल्लेख जैन मंदिराच्या अनुषंगाने येतो.
शिवशक्ती आराधना: एकूण स्थानपोथीत आलेल्या देवदेवतांची यादी आणि याच काळात किंवा त्या आधीच्या काळातील उपलब्ध शिलालेखांतून आलेले पण अन्यत्र असलेले समान नावाचे उल्लेख बघण्याचा प्रयत्न केला आहे. यातून पुढील बाबी स्पष्ट होतात. त्यावेळच्या सामाजिक उपासनेचे मुख्य दैवत स्थूलमानाने पाहात असताना शिवपूजा विशेषत्वाने प्रचिलित असल्याचे दिसते. देवतांच्या या नामावलीत ईश्वर आणि नाथ हे शब्द जोडून तयार झालेली नावे पन्नास आहेत. उदा. अमरेश्वर, उत्तरेश्वर, कमळेश्वर, कंटकेश्वर, खोलेश्वर, कोळेश्वर, गोंदेश्वर, देवदेवेश्वर, नंदिकेश्वर, पद्मेश्वर, पानेश्वर, मुक्तेश्वर, मार्कंडेश्वर, रामेश्वर, वटेश्वर, वाकेश्वर, विश्वेश्वर, विज्ञानेश्वर, संगमेश्वर, जोगेश्वर, हरणेश्वर इत्यादी. नाथ शब्द जोडून तयार झालेली देवतांची एकूण १३ नावे. अंबीनाथ, घटसिद्धनाथ, नागनाथ, पार्वतीसोमनाथ, ब्रह्मनाथ, मल्लिनाथ, रामनाथ, वंकनाथ, वैजनाथ, सिद्धनाथ, सोमनाथ, संखनाथ इ. या दोन्ही नावांनी युक्त अशा या देवता शिवाचीच विविध नावे आहेत. या सर्व देवळांत शिवपिंडीच आहे. किंवा स्थानपोथीत आलेल्या १५३ देवतांच्यापैकी ६३ देवता शिवस्वरूपातच आहेत. त्र्यंबक, केदार, शंकर, ओम्कारमाधानता, या नावांची भर घातली म्हणजे ही संख्या ६७ होते. भैरवाचा समावेश शैवदेवतेतच होतो. (कोलते, स्थानपोथी प्रस्तावना पृ. २०-२१) वरील नोंदीवरून असे म्हणता येईलकी, तत्कालीन महाराष्ट्रामध्ये साधारणतः अकरावे ते चौदावे शतकात शिवोपासना सर्वाधिक प्रमाणात रूढ होती. तत्कालीन शिलालेखाचे अभ्यासक डॉ. शं. गो. तुळपुळे लिहितात 'महाराष्ट्रामध्ये शिवउपासना अधिक रूढ असून त्याखालोखाल देवीची उपासना रूढ होती' (तुळपुळे, प्रस्तावना पृ. ११२). स्थानापोथीत असलेल्या शक्तीदेवतांची नोंद पाहिली म्हणजे त्यांच्या विधानाला पुष्टी मिळते. शिवानंतर शक्तीची उपासना महाराष्ट्रात रूढ होती. वरील नोंदी संख्येने कमी असल्या तरी त्या प्रातिनिधिक आहेत हे लक्षात घ्याव्यात. तत्कालीन प्रतिष्ठित स्थानांना श्रीचक्रधरस्वामी भेट देतात, तेव्हा त्यांच्या प्रवासाच्या अनुषंगाने नोंदवलेली ही स्थाने आणि नावे निवडक असली तरी तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे चित्र स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. महालक्ष्मीचा उल्लेख २७ वेळा आला आहे. अन्य शक्तीदेवतांची नोंद तथा अष्टमहासिद्धी ६वेळा अशा एकूण ४५ पेक्षा जास्त नोंदी उपलब्ध आहेत. शिव व शक्तीदेवतेची उपासना या काळात प्रभावी होती.. वाढता तंत्रमार्ग व शक्तीपंथाचा प्रभाव नाथसिद्ध, शैव, कापालिक यांचे प्रस्थ वरील बाबीला सहायभूत ठरते. राजकीयदृष्ट्या हा काळ सामंतयुग व धार्मिकदृष्टया सिद्धयुगाचा होता. दोन्ही बाबी वरील देवतेंच्या उपासनेसाठी सहायभूत ठरल्या. रा. चि. ढेरे लिहितात, यावेळी बौद्ध, जैन व हिंदु या तिन्ही परंपरा शिवाला सारख्याच उत्कटतेने मानू लागल्या. शिव हे या काळचे साधारण उपास्य दैवत बनले होते (ढेरे, गुरुगोरक्षनाथ चरित्र आणि परंपरा, पृ. २०). वरील धार्मिक पार्श्वभूमीचा यापूर्वीच्या लेखात उल्लेख केला आहे.
विट्ठल उपासना : विष्णुदेवतेविषयक स्थानपोथीत एकूण चोवीसवेळा नोंद येते. तत्कालीन अभिलेखातसुद्धा वैष्णवी देवतांची नोंद शैवस्थानाच्या तुलनेत फारच कमी आहे. विट्ठलाविषयीची नोंद पंढरपूर येथील चौऱ्याशींचा (शके ११९५-९९) शिलालेखात आहे. रामचंद्र यादव स्वतःला ‘पंढरीफड प्रमुख’ यासारखी उपाधी लावून घेत. असे असले तरी विट्ठल किंबहुना वारकरी संप्रदाय यांचा प्रभाव शैव उपासनेइतका नव्हता असे म्हणावे लागते. यादवांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्रात इस्लामी आक्रमण आले त्याची प्रातिनिधिक नोंद स्थानपोथीत सापडते. पैठण येथील एकवीरेचे मंदिर मांगरोळ (मंगरूळ) येथील देवी मंदिर त्याचे रूपांतर मशिदीत झाल्याची नोंद आहे.
देवतांचे प्राचीनत्व : वरील अभ्यासावरून असे लक्षात येते की, स्थानपोथीत आलेल्या देवदेवतांची नोंद व तेथील स्थानांविषयीचे उल्लेख केवळ श्रीचक्रधर काळातील आहेत असे नाही तर अशी स्थाने व देवता काही प्रमाणात तरी प्राचीनकाळापासून अस्तित्वात होत्या. व त्यांचे महत्त्व यादव काळात सुद्धा होते. रामटेक येथील भोगराम, गुप्तराम, रामलक्ष्मण ही स्थाने वाकाटकांच्या प्रारंभीक काळाइतकी प्राचीन आहेत. बेरूळ येथील जलसेनाचे लेणे अनकेचे लेणे, इसापुवाचे लेणे, आणि वेरूळचे जयतुंगाचे लेणे ही स्थाने राष्ट्रकूटकालीन आहेत. स्थानपोथील आलेले आदित्य मंदिर तसेच आपेगावातील विज्ञानेश्वर (वंकनाथ), भोगनारायण (पैठण) ही स्थाने प्रारंभिक यादवकालीन आहेत. उत्तरेश्वर देवदेवश्वर (माहूर), वैजनाथ (सिन्नर), बामेश्वर (सिल्लोड) यासारखी मात्र श्रीचक्रधरांस्वामींच्या वेळेस विकसित झाली असावीत. एकूणच स्थानपोथीतील मंदिरस्थापत्याचा अभ्यास म्हणजे केवळ यादव काळात रूढ असलेल्या देवतांचा व वास्तूंचा अभ्यास नसून यादवपूर्व काळात निर्माण झालेल्या व यादव काळातही प्रतिष्ठा पावलेल्या देवता, मंदिरे, मठ या वास्तु यांचा अभ्यास ठरतो.
लेख - डॉ. अरुणचंद्र पाठक
---------------
आधार :
१. वि. भि. कोलते स्थानपोथी (मलकापूर १९७६).
२. शं. गो. तुळपुळे, संपा. प्राचीन मराठी कोरीव लेख (पुणे १९६३). पुणे विद्यापीठाचे प्रकाशन संबधीत
३. मु. ग. पानसे यादवकालीन महाराष्ट्र (मुंबई १९६३).
४. रा. चिं. ढेरे, लज्जागौरी (पुणे १९७८).
५. वा. वि. मिराशी, मेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेक, विदर्भ संशोधन मंडळ,
ग्रंथमाला क्र. ११ (नागपूर १९५८).
लेख.
***