महानुभाव साहित्याचे आजवरचे संशोधन स्वरूप व चिकित्सा

महानुभाव साहित्याचे आजवरचे संशोधन स्वरूप व चिकित्सा

महानुभाव साहित्याचे आजवरचे संशोधन स्वरूप व चिकित्सा 



विषयप्रवेश

महाराष्ट्रातील मान्यवर अभ्यासकांनी आजतागायत संतसाहित्यावर विविध अंगांनी संशोधन केलेले आहे. काहींनी त्यांचे स्वतंत्ररूपात संपादनही केलेले आहे. काहींनी अनेक नियतकालिकांमधून त्यावर चिकित्सात्मक लेखही लिहिलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील संप्रदायांच्या अनेक संतांच्या साहित्याचा समावेश आहे. संतसाहित्य हा आपल्या संस्कृतीचा अनमोल असा ठेवा आहे. या साहित्यातून आपल्याला अनेक प्रकारची जीवनमूल्ये प्राप्त होत असतात. मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे ऐहिक व पारमार्थिक उन्नयन करणारे आचार-विचार होत असतात. म्हणून संतसाहित्याचा अभ्यास हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे, हे निर्विवादपणे मान्य करावे लागते. त्याचबरोबर संतसाहित्याचा अभ्यास करीत असताना त्या त्या कालखंडातील धार्मिक, सामाजिक, राजकीय जीवन यांचाही चांगल्याप्रकारे अभ्यास होतो.

प्रत्येक धर्म संप्रदायातील साहित्याची वेगवेगळी वैशिष्ठ्ये असतात. महानुभाव साहित्याची देखील काही वैशिष्ठ्ये आहेत. महानुभाव साहित्य हे जरी धार्मिक प्रेरणेने निर्माण झालेले असले. तरी ते विविधतेने व वैचित्र्याने नटलेले आहे. त्यामध्ये लीळाचरित्र, श्री गोविंदप्रभुचरित्र, स्मृतिस्थळ यासारखे चरित्र ग्रंथ आहेत. रूक्मिणीस्वयंवरासारखी आख्यानक काव्ये आहेत. पूजावरासारखी स्वामींची दिनचर्या सांगणारी प्रकरणे आहेत. स्वामींच्या सूत्रांचा सूत्रपाठ आहे. तात्त्विक विषयांचे आकलन होण्यासाठी दृष्टान्तपाठ आहेत. सूत्रांवरील भाष्ये महाभाष्ये आहेत. श्रीचक्रधरोक्त सूत्रांचा अर्थ निर्णय करणारा 'लक्षण रत्नाकर' व त्यावरील बत्तीस लक्षणाची टीप यांसारखे शास्त्रीय ग्रंथ आहेत. सूत्रांची भूमिका विशद करणारे प्रकरणवश, निरूक्तशेष यांसारखे ग्रंथ आहेत. पंचवार्तिका सारखे सूत्रांचे सूत्रबद्ध व्याकरण आहे. श्रीचक्रधरस्वामींच्या भ्रमणाचा भूगोल सांगणारी स्थानपोथी आहे. साती काव्यग्रंथांवरील, त्यातील शब्दांचे अर्थस्पष्ट व्हावे म्हणून त्यावर लिहिलेले टीपग्रंथ आहेत. स्वयंवरकथा आहेत. गीताटीका, प्रमेये, गुढे स्थळवर्णने, लोकगीते; आरत्या, पदे, भारूडे, धावे, चौपद्या, स्तोत्रे इत्यादी आहेत. तसेच हे वाङ्मय ग्रंथसंख्येनेही समृद्ध आहे. महाराष्ट्र सारस्वतकार कै. वि. ल. भावे यांनी जी महानुभाव महाराष्ट्र ग्रंथावली एवं कविकाव्य सूची प्रसिद्ध

केली त्यात अनेक ग्रंथकार व त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याची माहिती दिलेली आहे. महानुभाव साहित्याची निर्मिती व संशोधनाचा प्रारंभ बाराव्या शतकाच्या अखेरच्या काळापासून महानुभाव साहित्याच्या निर्मितीला प्रारंभ झाला ही निर्मिती लहान मोठ्या स्वरूपात आजतागायत चालूच आहे. या विविध स्वरूपात असलेल्या साहित्याचे आजवर जे संशोधन झालेले आहे. त्याचे गद्य, पद्य, तत्त्वज्ञान ऐतिहासिक, भौगोलिक इत्यादी विभागात वर्गीकरण करता येईल. गद्य विभागात लीळाचरित्र, श्रीगोविंदप्रभू चरित्र, स्मृतिस्थळ इत्यादी चरित्र ग्रंथाचा समावेश करता येईल. पद्य विभागात मूर्तिप्रकाश, रूक्मिणी स्वयंवर, वच्छहरण, उद्धवगीता, शिशुपालवध, ज्ञानप्रबोध ऋद्धिपूरवर्णन, सह्याद्रीवर्णन आणि इतरही बऱ्याचशा काव्यग्रंथाचा समावेश करता येईल. भौगोलिक विभागात स्थानपोथी तीर्थमालिका इत्यादी ग्रंथाचा समावेश करता येईल. महानुभाव साहित्य संशोधनातील अडचणी

प्राचीन वा मध्ययुगीन संशोधनाच्या क्षेत्रात संशोधकांना ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्यापेक्षाही अधिक अवघड समस्यांशी महानुभाव साहित्य संशोधन क्षेत्रात संशोधकांना सामना करावा लागत असे. कारण सामान्यतः महानुभाव लोक पंथीयां व्यतिरिक्त इतर कोणालाही अपल्या पोथ्या दाखवत नव्हते. पोथ्यांची ही दुर्लभता महानुभावेतर संशोधकांना काही दशकांपूर्वी तीव्रतेने जाणवत होती. पण हळूहळू ही समस्या काही संशोधकांच्या चिकाटीमुळे व काही महानुभाव महंतांच्या सौजन्यामुळे फारशी जाणवत नाही. या पोथ्या मिळविताना महानुभाव महंतांची प्रसन्नता राखणे, निदान त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ न देण्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. ही काळजी न घेतली तर पोथ्या मिळणे कठीण होते.

पोथ्यांच्या दुर्लभतेप्रमाणेच महानुभाव साहित्य संशोधकांना आणखी एका अडचणीला तोंड द्यावे लागते. ही अडचण इतर संप्रदायांच्या साहित्य संशोधनात जाणवत नाही. ती अडचण म्हणजे सांकेतिक लिप्यांची होय. सकळ, सुंदर इत्यादी लिपींचे ज्ञान असणे ही महानुभाव साहित्य संशोधन क्षेत्रातील अपरिहार्य बाब आहे. आजही बहुतांशी पोथ्या या सकळ लिपीत असल्यामुळे किमान सकळ लिपीचा तरी अभ्यास असल्याशिवाय महानुभाव साहित्य संशोधन क्षेत्रात प्रवेश करून त्याची खोली गाठता येत नाही, याची अनेक उदाहरणे देता येतील. उपरोक्त अडचणींना तोंड देऊन काही संशोधकांनी महानुभाव साहित्याचे विपुल प्रमाणात संशोधन व संपादन केलेले आहे.

वर निर्देशिलेल्या साहित्याच्या संशोधनाचा आपण वर्गीकरणाप्रमाणे विचार करू या. गद्य साहित्य

यामध्ये प्रथम लीळाचरित्रादी चरित्रग्रंथांचा विचार करता येईल. लीळाचरित्राचे प्रथम संशोधन व संकलन पंडित म्हाइंभटांनी केलेले आहे. हे सर्वज्ञातच आहे. पुढे श्रीनागदेवाचार्यांच्या देहावसानानंतर, महानुभाव साहित्याचे संशोधन पंथीय व्यक्तींकडून तेराव्या शतकापासून चालूच आहे. परंतु महानुभावेतर संशोधकांत महानुभाव साहित्याच्या संशोधनाचा अग्रमान इतिहासाचार्य कै. वि. का. राजवाडे यांच्याकडे जातो. त्यांनी इ.स.१९१० मध्ये महानुभावीय सांकेतिकलिपी आपल्या प्रखर बुद्धीच्या बळावर आत्मसात केली आणि भारत इतिहास संशोधन मंडळाच्या इ.स. १९१० च्या अहवालातून व इ.स.१९१३ च्या वार्षिक इतिवृत्तातून त्यास प्रसिद्धी दिली. त्यानंतर श्री. पा. मा. चांदोरकर व श्री. गो. का. चांदोरकर यांनीही या संशोधनात काही काळ लक्ष घातले होते. श्री. वि. ल. भावे यांनी इ.स. १९१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र सारस्वताच्या दुसऱ्या आवृत्तीत एका स्वतंत्र प्रकरणात महानुभावपंथ व वाङ्मय याचा ओझरता परिचय दिला होता व सकळ आणि सुंदरीलिपी यांची ओळखही करून दिली होती. इ. स. १९२४ मध्ये एप्रिल महिन्यात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या रौप्य महोत्सवप्रसंगी मुख्यवक्ते म्हणून बोलतांना त्यांनी 'महाराष्ट्र भाषा सरस्वतीच्या महालातील एक अज्ञात दालन', या नावाचा निबंध वाचून महानुभाव वाङ्मयाची तोड आळख महाराष्ट्राला करून दिली होती.

महाराष्ट्र सारस्वताच्या तिसऱ्या आवृत्तीच्या पहिल्या भागात (इ.स. १९२४) श्रीचक्रधर व महानुभावपंथ आणि महानुभाव आद्यग्रंथ अशी दोन प्रकरणे लिहिली व इतर प्रकरणात कालक्रमानुसार इतर महानुभावीय ग्रंथांचा इतिहास त्यांनी नमूद केला. सारांश महानुभावपंथ व त्यांचे साहित्य यांची माहिती मिळवून ती महाराष्ट्रा समोर विस्ताराने मांडण्याचे श्रेय श्री. वि. ल. भावे यांचे आहे. या कामात त्यांना महंत श्रीदत्तलक्षराज व महंत श्रीगोपीराज ऊर्फ महात्मा हरिराज बाबा मुसाफिर यांचे साह्य मिळाले. महाराष्ट्र सारस्वतातील माहिती शिवाय श्री. भावे यांनी सन १९२४ मध्ये महानुभाव महाराष्ट्र ग्रंथावली कविकाव्यसूची प्रसिद्ध केली. यानंतर पुढे डॉ. य. खु. देश श्री वा. ना. देशपांडे, श्री. ह. ना. नेने,, श्री. नी. ब. भवाळकर, पंडित बाळकृष्णशास्त्री व श्री. कृष्णशास्त्री घुले, डॉ. वि. भि. कोलते यांनी व इतर मान्यवर संशोधकांनी महानुभाव साहित्याच्या संशोधनास प्रारंभ केला. लीळाचरित्र

गद्य साहित्याच्या संशोधन व संपादनात आपण प्रथम लीळाचरित्राचा मागोवा घेऊ या. लीळाचरित्र संशोधन करून संपादन करीत असताना विविध पोथ्या प्राप्त करणे, अधिक जुनी पोथी निवडून संहिता निश्चित करणे, पाठभेद तळ टीपेत नोंदविणे, अभ्यासपूर्ण प्रस्तावना, स्पष्टीकरणात्मक टीपा व्यक्तिसूची, स्थळसूची, शब्दकोश देणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश होतो. लीळाचरित्राच्याच काय पण इतर सर्व विषयांच्या संशोधनात बहुतांशी हीच पद्धत स्वीकारावी लागते. लीळाचरित्राचे संपादन करीत असताना पोथ्यांतील लीळांची संख्या व चरित्र अबाब या काव्यग्रंथात दिलेली लीळांची संख्या बरोबर जुळते आहे की नाही हे पाहिले पाहिजे.

लीळाचरित्राच्या संपादनाचे पहिले काम विदर्भातील ख्यातनाम संशोधक श्री. ह. ना. नेने यांनी केले. त्यांनी सन १९३६ व १९३७ मध्ये लीळाचरित्राचे एकांक, पूर्वार्धाचे खंड, उत्तरार्धाचे खंड प्रसिद्ध केले. परंतु पाच सात मूळ पोथ्यांवरून पाठ निश्चित करणे, योग्य पाठ देणे, अनुक्रमणिका, सूची, विस्तृत टीपा, उल्लेखांचे स्पष्टीकरण, विवेचक, विस्तृत प्रस्तावना, व्यक्तींची व स्थळांची माहिती, शब्दकोश, उत्तम कागद सुंदर छपाई, सुबक बांधणी इत्यादी बाबी त्यावेळी त्यांना अशक्य असल्याने करता आल्या नाहीत. तथापि लीळाचरित्राचे स्वरूप कसे आहे, याची जाणीव संशोधकांना अभ्यासकांना निश्चितपणे झाली.

लीळाचरित्राचे पुन्हा संशोधन संपादन करण्याचा प्रयत्न महानुभाव साहित्याचे संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी केला. मात्र त्यांनी लीळाचरित्राच्या संपादनासाठी श्री. नेने यांचीच लीळाचरित्राची मुद्रित संहिता वापरली. त्यामुळे त्यांच्या संपादनाला संशोधनाच्या दृष्टीतून फारसे महत्त्व प्राप्त होत नाही. तथापि लीळाचरित्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्यांनी लिहिलेल्या विस्तृत विवेचक प्रस्तावना, स्पष्टीकरणात्मक टीपा, स्वामींच्या परिभ्रमणाचा भूगोल सांगणाऱ्या स्थानपोथी ग्रंथातील उतारे, व्यक्तिनामाची सूची, स्थळनामांची सूची, देवतानामांची सूची, शब्दकोश इत्यादी गोष्टी दिल्यामुळे लीळाचरित्राच्या अभ्यासकांची उत्तम सोय झालेली आहे. डॉ. तुळपुळे यांनी लीळाचरित्राचे संपादन एकांक, पूर्वार्ध खंड १ व २, उत्तरार्ध खंड १, २ अशा एकूण पाच भागांमध्ये सन १९६४ ते सन १९६७ या दरम्यान केले.

त्यानंतर सन १९७८ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले व महानुभाव साहित्याचे गाढे पंडित व संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी संपादित केलेले लीळाचरित्र म्हणजे संशोधनाचा उत्कृष्ट नमुना होय. हे संशोधन व संपादन अनेक दृष्टींनी वैशिष्टयपूर्ण असे आहे. संशोधन व संपादनाच्या ज्या कसोट्या असतात, त्या सर्व कसोटीस उतरलेले हे लीळाचरित्राचे संपादन होय. विवेचक विस्तृत प्रस्तावना, त्यात लीळाचरित्राचे महत्त्व, ग्रंथनिर्मितीचा इतिहास चरित्राच्या विविध पाठांच्यानिर्मितीची माहिती, लीळाचरित्राचा लेखनकाल, संपादनासाठी उपयोगात आणलेली हस्तलिखिते व इतर साधनसामग्री, म्हइंभटांचे चरित्र, स्वामींच्या चरित्राचा आढावा इत्यादी माहिती परिपूर्ण आहे. मूळ संहिता संपादन करीत असताना संपादनासाठी निवडलेल्या इतर पोथ्यांचे पाठभेद व्यवस्थित नोंदविले आहेत. घटनानुषंगा ने लीळांचे व्यवस्थापन कलेले आहे. मूळ संहितेतील लीळांच्या मजकुरात कुठे अपूर्णता वाटत असली तर इतर पोथ्यातील मजकूर तिरक्या अक्षरात देऊन लीळांचा मजकूर यथायोग्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या संपादनाचे सर्वांत वैशिष्ट्य असे की, लीळाचरित्राचे जे खंडित स्वरूप होते, त्यात स्वामींच्या श्रीमुखीच्या वचनांचे व दृष्टान्ताचे पुनःस्थापन करून मूळ लीळाचरित्राच्या ग्रंथासारखी निर्मिती करण्याचा जो प्रयत्न डॉ. कोलते यांनी केलेला आहे, तो खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्यानंतर व्यक्तिसूची, स्थानसूची, दृष्टान्तसूची, सूत्रसूची शब्दकोश देऊन त्याला पूर्णत्व प्राप्त करून दिलेले आहे. त्यामुळे संशोधन व संपादनाच्या दृष्टीने लीळाचरित्रांचे हे संपादन सर्वतोपरी योग्य होय.

डॉ. कोलते यांनी लीळाचरित्राचे सर्वांग सुंदर संपादन केल्यानंतर महानुभाव मंडळ नागपूर यांनी १९९३ मध्ये श्री नरेंद्रमुनि अंकुळनेरकर संपादित लीळाचिरत्र प्रकाशित केले. परंतु या संपादनासाठी लीळाचरित्राच्या चतुर्थ शोधनांचा आचार्य श्रीमुरारिमलव्यास विद्वांस यांचा पाठ उपयोगात आणला. पण सदरहु पाठ पंथीय परंपरेत प्रचलित नसल्याने त्या संपादनाला पंथीय, पंथीयेतर अभ्यासकांनी फारसे स्वीकारले नाही. तुटपुंजी प्रस्तावना, सन विसंगती, लीळांचे अपूर्ण संदर्भ, काही लीळा गाळलेल्या तळटीपेतील काही पाठभेद गाळलेले, लेखनदोष, छापील प्रकरणवशाचा आधार वचनांच्या पुनःस्थापनासाठी केल्याने काही चुका झालेल्या आहेत. व्याकरणाच्या चुका, शब्दकोशात अकारादी क्रमाचा भंग इत्यादी संपादनातील सदोषतेमुळे सदरचे संपादन पूर्णपणे अयोग्य ठरते.

 श्रीगोविंदप्रभुचरित्र

श्रीगोविंदप्रभुचरित्र हेही प्राचीन गद्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे प्रथम संपादन डॉ. वि. भि. कोलते यांनी सन १९४४ मध्ये केले. त्यांच्या आजपर्यंत पाच आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. श्रीगोविंदप्रभूचरित्र हा खऱ्या अर्थाने मराठीतील दुसरा गद्य ग्रंथ होय. त्यामुळे लीळाचरित्रानंतर मराठी साहित्याच्या क्षेत्रात श्रीगोविदंप्रभुचरित्राचे स्थान महत्त्वाचे आहे. डॉ. कोलते यांनी प्रस्तुत ग्रंथाचे संशोधन व संपादनकरून तो मराठी अभ्यासकांच्या समोर ठेवल्यामुळे अभ्यासकांची फार मोठी सोय झालेली आहे. तसेच त्याला लिहिलेल्या प्रस्तावनेत अनेक प्रश्नोप्रश्नांची चर्चा केलेली आहे. गोविंदप्रभूंची माहिती, वेष, वर्तन, अवतारकार्यांची माहिती, संपादन सामुग्री म्हइंभटांचे चरित्र, ग्रंथातील वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते स्पष्टीकरणात्मक टीपा, शब्दकोश व्यक्तिसूची, स्थळसूची इत्यादी गोष्टींमुळे, संपादन अभ्यसनीय झालेले आहे. तथापि काही शब्दांच्या अर्थाविषयी स्पष्टीकरणे झालेली नाहीत. उदा. चाटेयाते म्हणति यतरपस्ये लीळा क्रः २, तसेच या गुंडोसि नित्रण म्हणीए नेदावे हो, इत्यादी.

प्रस्तुत ग्रंथाचे दुसरे संपादन डॉ. व. दि. कुलकर्णी यांनी इ. स. १९८० मध्ये केले. डॉ. कुलकर्णी यांनी डॉ. कोलते यांच्या श्रीगोविंदप्रभूचरित्राची संहिता अगदी जशीच्या तशीच स्वीकारलेली आहे. अर्थात त्यांनी तसे आपल्या प्रस्तुत ग्रंथाच्या निवेदनात सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. श्रीगोविंदप्रभूंचरित्राला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी १) श्रीगोविंदप्रभूचरित्राचा लेखक व लेखनकाल २) श्रीगोविंदप्रभूचे व्यक्तिदर्शन ३) श्रीगोविंदप्रभूचरित्र वाङ्मयीन दर्शन यातील मुद्यांच्या अंगाने आपली मते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उपरोक्त संपादनाबरोबरच श्रीगोविंदप्रभूचरित्रावर विविध नियतकालिकांमधून स्फुट लेखनही झालेले आहे.

प्रस्तुत ग्रंथाचे तिसरे संपादन अमरावती येथील श्रीमाधवराज पंजाबी यांनी केले. त्यांनी मात्र उपरोक्त दोन संशोधकांनी उपयोगात आणलेली संहिता न घेता स्वतंत्र ३७५ लीळांची संहिता संपादनासाठी वापरली आहे. त्यामुळे या संपादनात काही अंशी वेगळेपण जाणवते. प्रस्तावने मध्ये त्यांनी एप्रिल १९६६ मधील नवभारत मासिकामध्ये प्रा. पा. ना. कुलकर्णी यांनी घेतलेल्या या चरित्राचा लेखक कोण? या आक्षेपाचे स्पष्टीकरण केलेल आहे. चरित्रातील समाजदर्शन, वाङमयीन सौंदर्य, थोडेफार व्याकरण देऊन थोडक्यात प्रस्तावना पूर्ण केलेली आहे. एक परिशिष्ट व शब्दकोश दिलेला आहे. वेगळ्या संहितेच्या संपादनामुळे अभ्यासकांना प्रस्तुत संपादनाचा आणखी लाभ होऊ शकतो.

यानंतर श्रीचक्रधरस्वामींनी केलेल्या लीळांचे व श्रीगोविदंप्रभुनी केलेल्या लीळाचे हेतू स्पष्ट करणारे हेतुस्थळ श्रीगोपीभास्कर व महंत् श्रीन्यायंबास यांनी लिहिलेले आहे. त्यापैकी गोपीभास्कर यांनी लिहिलेले श्रीगोविंदप्रभूचरित्राचे हेतुस्थळ व लीळाचरित्राचे हेतुस्थळ अमरावती येथील ई. श्रीमाधवराज पंजाबी यांनी संपादन केलेले आहे. तथापि संशोधनाचे संपादनाचे कोणतेही संस्कार या मुद्रितावर झालेले नाही. तरी लीळा करण्यामागे अवतारी पुरुषांचा काय हेतु आहे हे या उपलब्ध साधनांवरून समजते. तसेच काही शब्दांच्या अर्थ स्पष्टीकरणावरही चांगला प्रकाश पडतो. उदा. श्रीगोविंदप्रभूचरित्रातील दोन क्रमांकाच्या लीळेतील 'यतरपस्ये' हा शब्द निस्त्राणि हा शब्द वगैरे म्हणून लीळाचरित्रातील व श्रीगोविंदप्रभूचरित्रातील वाक्यांची स्पष्टीकरणे व शब्दार्थ देण्यासाठी हेतुस्थळांचा चांगल्याप्रकारे उपयोग होऊ शकतो. परंतु आजपर्यंत तसा या ग्रंथांचा उपयोग कोणत्याही संशोधकांनी करून घेतलेला नाही. 

स्मृतिस्थळ

स्मृतिस्थळ हा ग्रंथ श्रीनागदेवाचार्यांच्या समकालीन घडलेल्या घटनांची माहिती देणारा प्राचीन मराठी भाषेतील गद्य ग्रंथ होय. या ग्रंथाचे प्रथम संपादन श्री. वा. ना. देशपांडे यांनी सन १९३९ च्या जानेवारी महिन्यात केले. प्रस्तावनेमध्ये ग्रंथ महत्त्व, स्मृतिस्थळाचे विविध पाठ, प्राचीन मराठी गद्य व स्मृतिस्थळ, स्मृतिस्थळावरील व्याकरण, स्मृतिस्थळातील ग्रंथकार, स्मृतिस्थळकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, भौगोलिक परिस्थितीचे वर्णन व महानुभावांचे तत्त्वज्ञान थोडक्यात दिलेले आहे. प्रस्तावनेतील भाषा एकेरी व उद्धटपणाची वाटते. स्मृतिस्थळातील वाक्यांच्या स्पष्टीकरणात्मक टीपा व शब्दकोश दिलेला आहे. शब्दकोशातील व स्पष्टीकरणात्मक टीकेतील काही स्पष्टीकरणे चुकलेली आहेत.

स्मृतिस्थळाचे दुसरे संपादन सन १९६९ साली डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी केले. आजपर्यंत त्याच्या दोन आवृत्या प्रसिद्ध झाल्या. त्यांनी श्री. देशपांडे यांचीच संहिता वापरली आहे. प्रस्तावनेत स्मृतिस्थळ व त्यांचे स्वरूप काळ कर्तृत्व, स्मृतिस्थळातील आशय, तत्कालीन परिस्थिती, वाङ्मयीन सौंदर्य यांची चर्चा केलेली आहे. स्पष्टीकरणात्मक टीपा व शब्दकोश देऊन संपादन पूर्ण केलेले आहे. हे संपादन अभ्यासकांच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

स्मृतिस्थळाचे तिसरे संपादन मार्च १९९९ मध्ये डॉ. रमेश आवलगावकर यांनी केले. प्रस्तावनेत स्मृतिस्थळाचा इतिहास, त्याचा लेखनकाळ, स्मृतिस्थळातील कालोल्लेख त्यातील आशय, विसंगती, व्यक्तिचित्रे, स्मृतिस्थळातील तत्त्वज्ञान, श्रीनागदेवाचार्यांचे जीवनचरित्र इ. माहिती दिलेली आहे. या स्मृतिस्थळांच्या संपादनासाठी त्यांनी उपरोक्त संपादकांची संहिता न वापरता स्वतंत्र ३६५ स्मृतींची पोथी प्राप्त करून त्याचे संपादन केलेले आहे. त्यामुळे या संपादनाला नावीन्य प्राप्त झालेले आहे. स्पष्टीकरणात्मक टीपा, शब्दकोश या सर्व बाबींमुळे सदर स्मृतिस्थळाचे संपादन अभ्यसनीय असे झालेले आहे. या व्यतिरिक्त श्रीचक्रपाणीचरित्र, अज्ञात लीळा, श्रीचक्रधर निरूपित श्रीकृष्णचरित्र तसेच सातैरूपचरित्र यासारखीही संपादने झालेली आहेत. तत्त्वज्ञानावरील संपादने

महानुभाव तत्त्वज्ञानावरील जे ग्रंथ आहेत, त्यांच्या इ. स. १९०७ मध्ये खामगाव जि. बुलढाणा येथे श्री गोपीराज राजधर पंजाबी यांनी सूत्रपाठाची पोथी सांकेतिक लिपीमध्ये शिळा प्रेसवर छापून प्रसिद्ध केली. त्याच सुमारास सोलापूर येथे बाळकृष्णदादा कानडे यांनी ओंकारदादा परांडेकर यांच्याकडून त्याच प्रकारची सांकेतिक लिपीतील प्रत तयार करवून सच्चिदानंद छापखान्यात छापविली. पण ही पुस्तके केवळ पंथीयलोकांसाठीच तयार केलेली होती. यानंतर इ. स. १९१५ मध्ये कै. राजवाडे यांनी भा. इ. स. मंडळाच्या शके १८३७ च्या इतिवृत्तात लक्षणान्वय पाठ छापला. तसेच आबासाहेब चांदोरकर यांनीही विचारपाठाचा काही भाग त्यातूनच प्रसिद्ध केला होता.

त्यानंतर सन १९३१ साली लक्षणान्वय पाठाची भाष्य, महाभाष्य प्रमेये यांचे उतारे देऊन सटीप आवृत्ती श्री नेने व भवाळकर यांनी श्रीचक्रधर सिद्धांतसूत्रे या नावाने प्रसिद्ध केली होती. पुढे १९४२ साली श्री ह. ना. नेने यांनी विस्तृत प्रस्तावना, टीपा व सूत्रसूची यांसह श्रीचक्रधरोक्त सूत्रपाठाचे संपादन केले. सूत्रांच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी प्रकरणवश, भाष्ये इत्यादी ग्रंथांची प्रमाणे दिलेली आहेत. त्यामुळे सदर संशोधन, संपादन अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी काही दृष्टान्त निरूपण केलेले आहेत. हे एकूण ११४ दृष्टान्त आहेत या दृष्टांतपाठाचे सर्वांगीण संशोधन व संपादन सन १९३७ साली श्री नेने व श्री भवाळकर यांनी केले. संपादनाच्या दृष्टीने उभय संपादकांनी खूप मेहनत घेतलेली आहे, असे दिसते. अभ्यासपूर्ण प्रस्तावना, स्पष्टीकरणात्मक टीपा, त्या टीपांमध्ये दृष्टान्तातील वाक्यांच्या स्पष्टीकरणासाठी दृष्टान्तस्थळ या ग्रंथातील उतारेही दिलेले आहेत. उदा. 'पोळलेया सुनेयाच्या' दृष्टान्तातील 'पोळले' या शब्दाचे स्पष्टीकरण ते स्थळभाष्यातून देतात. 'पोळणे ते साने जळणे ते थोर जळणाचे ते विरहीये तयासि पोळणे सुने न लाभे। विरह तो पतिचा वियोगी लाभे' इ. स्वप्नाच्या दृष्टान्ताच्या स्पष्टीकरणासाठी काव्यग्रंथातील पुरावे दिलेले आहेत. उदा. 'जैसे स्वप्नामाजि देखिजे ते स्वप्नीचि साच आपजे मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही ॥' ज्ञान प्रबोध. या संपादनात टीपांमुळे अर्थ समजण्यासाठी सुलभता झालेली आहे. दृष्टान्तावरील लापनिक, दृष्टान्तस्त्रोत्र, दृष्टान्तपाठ, त्यावरील व्याकरण, लक्षण रत्नाकर व बत्तीस लक्षणांची टीप यातील दृष्टान्तासंबंधीचे उतारे, ज्यांना दृष्टान्त निरूपिले त्या व्यक्तींची सूची इत्यादी बाबींचा संपादनासाठी उपयोग केलेला असल्यामुळे संपादन सर्वस्पर्शी झालेले आहे. अभ्यासपूर्ण झालेले आहे. मात्र श्री नेने यांनी जी दृष्टान्तपाठाची संहिता वापरली त्यामध्ये दुसऱ्या विरहणीचा दृष्टान्त नाही. ही एक अपूर्णता त्यांच्या संपादनात राहिलेली आहे.

यानंतर डॉ. शं. गो. तुळपुळे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. भगवंत देशमुख व प्रा.स. रा. गाडगीळ, प्रा. नगरकर इत्यादींनी दृष्टान्तपाठांची संपादने केली. परंतु ती संपादने संशोधनाच्या कसोटीस पूर्णपणे उतरत नाहीत. कारण श्री नेने व श्रीभवाळकर दृष्टान्तपाठाचे संपादन करताना दृष्टान्तपाठाशी व त्यातील अर्थ स्पष्टीकरणासाठी असणाऱ्या तत्संबद्ध इतर ग्रंथांची जेवढी मदत घेतली तेवढी इतरांनी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे अर्थ स्पष्टीकरणांमध्ये बऱ्याच ठिाकणी उणीवा आढळतात. दुसरे असे की, श्री नेने यांनी दृष्टान्तपाठाच्या संपादनासाठी जी संहिता उपयोगात आणली तिच संहिता पुढील संशोधकांनी वापरली, त्यामुळे त्या संहितेतील उणीवा पुढीलही संपादकांच्या संहितेत आढळतात. उदा. दुसऱ्या विरहीणीचा दृष्टान्त श्री नेने यांच्या प्रतीत नाही, तसा तो इतर संपादकांच्याही संहितेत नाही. आणखी एक उदाहरण देता येईल. डोळ्याच्या दृष्टान्ताचे. नेने यांच्या प्रतीत डोळ्याचा दृष्टान्त पुढील प्रमाणे आहे. 'डोळा डोळियाते देखे : परि आपणेयाते कहीचि न देखे : मग कव्हणे एके साधने करून डोळेनीचि डोळेयाते देखता होए परंतु दृष्टान्त तैसा आत्मा सकळाते देखे परि आपणेयाते कहीचि न देखे मग अपरोक्ष ज्ञाने करून आत्मनेचि आत्मेयाते देखता होए'. पाठाच्या इतर पोथ्या पाहिल्या असता त्यामध्ये हा दृष्टान्त पुढीलप्रमाणे आढळतो. "डोळा सकळाते देखे। परि आपणेयाते कहींचि ने देखे। मग कव्हणे एके साधने करून डोळनीचि डोळेयाते देखता होए तैसे आत्मा सकळाते देखे परि आपणेयाते कहीचि ने देखे मग अपरोक्ष ज्ञाने करून आत्मनेचि आत्मयाते देखता होए: "

म्हणून संशोधन व संपादन करीत असताना एकाच संहितेवर अवलंबून राहू नये. विविध हस्तलिखितांचा शोध घेतला पाहिजे. त्यानंतर इ. स. १९४५ मध्ये डॉ. वि. भि. कोलते यांनी महानुभावांच्या तात्त्विक ग्रंथांचे संशोधन करून 'महानुभाव तत्त्वज्ञान' या ग्रंथाचे प्रकाशन केले. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एक फार मोठी क्रांती घडली. विषयवार प्रकरणांची मांडणी केल्यामुळे हा ग्रंथ पंथीय व पंथीयेतर अभ्यासकांना फारच उपयुक्त ठरला. या ग्रंथांच्या ५ ते ६ आवृत्या निघाल्या. त्याचप्रमाणे आचार प्रकरणांवरील ग्रंथांचे संशोधन करून 'महानुभावांचा आचारधर्म हा ग्रंथ तयार केला. हाही ग्रंथ वरील प्रमाणेच अभ्यासकांना उपयुक्त ठरला.

पुढे काही वर्षांनी अमरावती येथील ई. श्रीमाधवराज पंजाबी यांनी तत्त्वज्ञान विषयांवरील बरीच संपादने केली. त्यामध्ये स्वामींच्या सूत्रांचा प्रकरणवश ग्रंथ, आचार-विचार मालिका महाभाष्ये लक्षण, आचार, विचार भाष्ये महावाक्य निर्वचन भाष्ये, महावाक्य प्रमेये, निरूक्त शेष इत्यादी तत्त्वज्ञान विषयांवरील ग्रंथाची संपादने केली. परंतु हे ग्रंथ फक्त सकळ लिपीतून लिप्यंतर करून देवनागरीत मुद्रित केलेले आहेत. त्यामुळे त्यांना इतर संपादनाचे कोणतेही संस्कार लाभलेले नाहीत. मात्र या संपादनांवरून त्या ग्रंथाचे स्वरूप कसे आहे याची अभ्यासकांना कल्पना येते..

सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या सूत्रांचे अधिक विवेचन करणाऱ्या महाभाष्य ग्रंथांचे संशोधन करून संपादन करण्याचे फार मोठे काम महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. वि. भि. कोलते यांनी केले. त्यांनी आचारबंद या महाभाष्याचे सन १९८२ मध्ये, लक्षणबंद महाभाष्याचे सन १९८५ मध्ये, तर विचारबंद महाभाष्याचे सन १९८९ मध्ये संपादन केले. विस्तृत विवेचक प्रस्तावना, ग्रंथातील सर्वच विषयांचा घेतलेला आढावा, यावरून त्यांचे महानुभाव साहित्याचे संशोधन किती सखोल होते याची कल्पना येते. स्पष्टीकरणात्मक टीपा व शब्दकोश व अभ्यासपूर्ण प्रस्तावना यामुळे भावी संशोधकांना अभ्यासाची साधने सहजपणे उपलब्ध झाली व संशोधकांनी किती चिकाटीने संशोधन केले पाहिजे याची प्रेरणाही या संपादनांपासून मिळते. त्यानंतर काही पंथीय संशोधकांनीही नंतरच्या काळात सार्थ सूत्रपाठ, विचार सूत्रार्थ प्रकाश, प्रकरणवश, दृष्टान्त प्रमेये इत्यादी तत्त्वज्ञान विषयांवरील ग्रंथांचे संपादन केलेले आहे.

काव्यग्रंथांची संपादने

गद्य व तत्त्वज्ञान विषयांवरील निर्मिती महानुभाव पंडितांनी ज्याप्रमाणे विपुल प्रमाणात केलेली आहे. त्याप्रमाणे पद्य साहित्याचीही निर्मिती विपुल प्रमाणात केलेली आहे. या पद्य साहित्यामध्ये मूर्तिप्रकाश वच्छहरण, शिशुपालवध, उद्धवगीता ज्ञानप्रबोध रूक्मिणीस्वयंवर सह्याद्रीवर्णन, ऋद्धिपूरवर्णन हे प्रमुख पद्य होत. यापैकी 'ज्ञानप्रबोध' इ. स. १९०७ साली महंत श्रीदत्तलक्षराज यांनी चित्रशाळा प्रेस पुणे येथे छापून प्रसिद्ध केला होता. तद्नंतर महाराष्ट्र सारस्वतकार श्री वि. ल. भावे यांनी सन १९२४ मध्ये वच्छहरण ग्रंथाचे संपादन केले व सन १९२७ मध्ये राजाराम कॉलेज कोल्हापूर येथील प्रा. द. सी. पंगु यांनी वच्छहरण ग्रंथाचे संपादन केले. या ग्रंथाला त्यांनी चिकित्सात्मक प्रस्तावना, शब्दकोश, स्पष्टीकरणात्मक टीपा लिहून संपादनाला पूर्णता आणली. परंतु वरील दोन काव्यग्रंथाच्या संपादनाला कोणत्याही प्रकारचे संपादन संस्कार लाभले नाही. त्यांनी फक्त मूळ संहिताच संपादित केल्या. या प्रमुख काव्यग्रंथातील ऋद्धिपूरवर्णन वगळता इतर सर्व सात काव्यग्रंथांचे संशोधन करून संपादन करण्याचा बहुमान डॉ. वि. भि. कोलते यांना मिळाला. त्यांनी या प्रमुख सातही काव्य ग्रंथांचे संपादन करताना विस्तृत विवेचक प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. काव्यग्रंथाचे लेखनकाळ अनेक पुराव्यांच्या आधारे निश्चित केलेले आहे. मूळ संहिता, इतर पोथ्यांच्या आधारे नोंदविलेले पाठभेद, काव्यातील शब्दांचे व विषयांचे स्पष्टीकरण करणारे टीपग्रंथ, त्यानंतर स्वतंत्र टीपा, शब्दकोश इत्यादी परिपूर्ण संशोधनामुळे या काव्यग्रंथाची संपादने अत्यंत उपयुक्त अशी झालेली आहेत.

प्रमुख काव्यग्रंथातील ऋद्धिपूरवर्णन या काव्यग्रंथाचे प्रथम संशोधन संपादन डॉ. य. खु. देशपांडे यांनी सन १९२९ मध्ये केले. प्रस्तावना, टीपा परिशिष्टे यामुळे हा ग्रंथ अभ्यासक व संशोधकांना उपयुक्त ठरला. त्यानंतर सन १९६७ मध्ये डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी स्वतंत्रपणे या ग्रंथाचे संपादन केले. संपादनातील प्रस्तावनेमध्ये कविचरित्र, रचनाकाळ, काव्याचे विशेष, काव्यचा आशय, संपादन सामग्री, टीपग्रंथाची चर्चा, वैशिष्ट्ये स्वतंत्र टीप ग्रंथ, स्पष्टीकरणात्मक टीपा, शब्दकोश इ. गोष्टींमुळे संपादन उपयुक्त झालेले आहे..

या व्यतिरिक्त अनेक काव्यग्रंथ बऱ्याच संशोधकानी संपादित केलेले आहेत. आत्मतीर्थ प्रकाश श्री नागिंद्राचार्य महापूजा वर्णन, विदेह प्रबोध, डोमेग्रामवर्णन, गद्यराजस्तोत्र, वसंतवर्णन, रूक्मिणीस्वयंवर, शुकदेवचरित्र, श्रीकृष्णचरित्र, श्रीदत्तात्रेयबाळक्रीडा, अभिमन्युविवाहो, महानुभावीय पद्मपुराण, उखाहरण अशा बऱ्याच काव्यग्रंथांचे संपादन झालेले आहेत. यातील काही फक्त मूळ संहिताच आहे. त्यावर संपादनाचे काणतेही संस्कार नाहीत. ऐतिहासिक व भौगोलिक संपादने ऐतिहासिक संपादनामध्ये डॉ. रमेश आवलगावकर यांनी संपादित केलेल्या 'महानुभावांची अन्वयस्थळे' यांचा समावेश करता येईल. हे अन्वयस्थळ महानुभाव वंशपरंपरा, ग्रंथनिर्मिती, वृद्धाचार इतिहास प्रकरण व विविध महंताच्या पिढींचा वृद्धाचार आम्नायांची अन्वयस्थळे इत्यादी अनेक माहितींनी परिपूर्ण आहे. त्यामुळे मध्ययुगीन काळातील महानुभावांच्या इतिहासाची बरीचशी माहिती यातून प्राप्त होते. महानुभावांच्या इतिहास संशोधनासाठी या ग्रंथाचा पुष्कळशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो.

लीळाचरित्राचा व महानुभावीय ग्रंथकारांचा परिचय देणारा दुसरा काव्यग्रंथ म्हणजे चरित्र अबाब. या काव्याचे पारायण महानुभावांच्या आश्रमात केले जाते. त्यामुळे फक्त मूळ संहिता या पूर्वी संपादित झालेल्या आहेत. तथापि यांचे यथावत संशोधन व संपादन प्रा. राजधर आराध्ये यांनी सन १९९८ मध्ये केलेले आहे. ओव्यांच्या खालीच शब्दार्थ व विस्तृत टीपा दिलेल्या आहेत त्यामुळे ग्रंथ समजण्यास सुलभ झालेला आहे. या ग्रंथातच भरवसमालिका, तीर्थमालिका, प्रसादमालिका इत्यादी काव्यांचेही संपादन करण्यात आलेले आहे.


श्रीचक्रधरस्वामींच्या परिभ्रमणाचा भूगोल ज्या ग्रंथात आलेला आहे. तो ग्रंथ म्हणजे स्थानपोथी. या ग्रंथाचे संशोधन व संपादन डॉ. वि. भि. कोलते या ग्रंथाच्या दोन आवृत्या त्यांनी संपादन केल्या. प्रस्तावना, पाठभेद, मूळ संहिता, परिशिष्टांमध्ये इतर पोथ्यांतील अधिक माहिती, स्थानसूची, देवतानामांची सूची, शब्दकोश इ. माहितींमुळे ग्रंथाचे महत्त्व लक्षात येते. व्याकरणविषयक ग्रंथ


मराठीतील पहिले व्याकरण महानुभाव पंडित भीष्माचार्य यांनी तयार केले. यांचे पहिले संपादन थोडीफार प्रस्तावना लिहून श्री मोरेश्वर सखाराम मोने यांनी सन १९२७ मध्ये केले. याचे दुसरे संपादन श्रीकृष्ण सेवा मंडळ परभणी यांनी सन १९७० मध्ये केलेले आहे. 

समारोप:

अशा प्रकारे आजपर्यंत अनेक ग्रंथांचे संशोधन संपादन झालेले आहे. अनेक नियतकालिकांमधून स्फुट लेखनही झालेले आहे, आजही होत आहे. दशकानुदशके मराठी संशोधकांनी वाटचाल करूनही महानुभाव साहित्याचे संशोधन पूर्ण झालेले नाही. अजून अनेक हस्तलिखिते गद्य-पद्य तत्त्वज्ञान स्फुटरचना, गीताटीका, प्रमेयेभाष्ये, महाभाष्ये इत्यादी विपुल प्रमाणातील साहित्य संपादन संस्काराची वाट पाहात आहेत. त्यासाठी संशोधकांनी मागील शतकातील संशोधकांपासून प्रेरणा घेऊन चिकाटीने हे काम केले पाहिजे. त्यामुळे नवीन नवीन माहिती ज्ञात होईल. अजूनही महानुभावीय मठमंदिरांत, महानुभावीय हस्तलिखित संग्रहालयात अनेक पोथ्यांमध्ये हे साहित्यधन विखुरले आहे. त्याचे संशोधन संपादन झाले पाहिजे.

महत्त्वाचे महानुभावीय ग्रंथ व ग्रंथकार यांच्याविषयीचे संशोधन प्रकल्प हाती घेण्यास वाव आहे. त्याचप्रमाणे महानुभाव ग्रंथकारांनी हाताळलेल्या वाङ्मय प्रकारांचा विवेचक अभ्यास करण्यासही वाव आहे. महानुभाव संशोधन हे एक अपरिमित विश्व आहे. त्याच्या कितीतरी दिशा आहेत, कितीतरी अंगे आहेत. या अथांग साहित्य सागरातून आजपर्यंत अनेक रत्ने सापडली आहेत त्याचा येथे थोडक्यात आढावा घेतलेला आहे. संशोधकांनी आपणखी चिकाटीने प्रयत्न केल्यास 'घेता किती घेशील दो करांनी' या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो.

आचार्य हंसराज खामनीकर


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post