15-4-2022
नीतिशतकम् - neeti-shatak subhashits
संस्कृत सुभाषित रसग्रहण
प्रजावत्सल राजा आणि धेनुरूपी शेती
मुळ भर्तृहरी संस्कृत श्लोक
छंद :- वसंततिलका
राजन् दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेनां ।
तेनाद्य वत्समिव लोकमिमं पुषाण ।
तस्मिंश्च सम्यगनिशं परिपोष्यमाने।
नानाफलं फलति कल्पलतेव भूमिः ।।
मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित
छंद :- भुजंगप्रयात
प्रजा हाच कीं वत्स भूधेनुकेचा।
नृपा तं करी सर्व सांभाळ याचा ॥
स्ववत्साचिया जाण वात्सल्ययोगें ।
अभीष्टार्थ देईल हे भूमि वेगें ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे
छंद :- वसंततिलका
भूधेनुनें जर अपेक्षिसि दूध द्यावे ।
वत्सापरीच जन पोषित तूं रहावें ॥
राजा ! प्रजा सतत तुष्ट जधीं सुखाने ।
भू देइ सर्व फल कल्पलतेप्रमाणें ।।
गद्यार्थ- हे राजा ! या भूधेनूनें (पृथ्वीरूपी गाईने) तुला दूध द्यावें असें वाटत असेल, तर तिच्या वासराप्रमाणे असलेल्या प्रजेला तू नीट पोशीत जा. अशा रीतीनें वासरूं म्हणजे प्रजा, जर नेहमीं उत्तम प्रकारें संतुष्ट असली, तर भूधेनु ही कल्पलते प्रमाणे नाना फळे देते ।।
विस्तारित अर्थ :- हे राजन्! जर या पृथ्वीरूपी गाईच्या दोहनाची इच्छा असेल, तर आज (आत्तापासूनच) या वासराप्रमाणे (असणाऱ्या शेतीनिष्ठ) प्रजेचे पालन कर. यांचे अहोरात्र व्यवस्थित पालनपोषण झाले, तर ही भूमी कल्पलतेप्रमाणे नानाविध फळांना प्रसवेल.
राजधर्माचा एक नितान्त चिंतनीय सिद्धान्तच महाराज भर्तृहरींनी येथे सांगितला आहे. भारतीय संस्कृती भूमीला, 'मात्र भूमी' मानत नाही तर 'मातृभूमी मानते. निसर्गस्थ घटकांनाही मातारूपात पाहायला लावणारी ही संस्कृती आहे. येथे भूमीला भूमाता तर गाईला गोमाता म्हटले जाते. भूमी अर्थात शेती गाईशीस संलग्न आहे. कृषिविज्ञान गोविज्ञानावर आधारित आहे. येथे भूमीचा विचार म्हणूनच गाईच्या रूपात आला आहे.
गाईकडून दूध काढायचे तर वासराला तिच्या जवळ सोडावे लागते. त्याने प्रेमाने मारलेल्या दुसणीनेच ती अमृत स्रवते. भूमातेच्या बाबतीतही हाच नियम आहे. भूमातेचे पुत्र कोण? तर कृषिवल या शेतकऱ्यांना प्रसन्न ठेवले तर त्यांची माताही प्रसन्न होणारच ना? एकदा ते प्रसन्न झाले की, मग ते अधिक परिश्रम करणार व नवनव्या प्रयोगांनी अधिकाधिक, वैविध्यपूर्ण उत्पादने घेणार. ही भूमी विविध फळ देणार.
हा सिद्धान्त जर आमच्या सध्याच्या शासनकर्त्यांना, कृषितज्ज्ञांना, योजना अधिकाऱ्यांना कळला, तर शेतकरी आत्महत्येची वेळच येणार नाही. पण, आज ना मुलाची काळजी आहे ना मातेची. आजच्या घडीला हे सुभाषित अधिक चिंतनीय आहे, अनुकरणीय आहे.