गुरु भक्ती कशी असावी हे सांगणारी एक सत्यकथा
हिंदू धर्मात आणि आपल्या महानुभाव पंथात गुरुभक्तीला फार मोठे महत्त्व आहे. गुरूंचे अनुकरण करणे गुरूंची सेवा करणे गुरूंचा प्रत्यक्ष शब्दाचे अक्षरशः पालन करणे हेच प्रत्येक चांगल्या शिष्याचे कर्तव्य असते. शिष्याने ईश्वराधिष्ठित गुरुच्या सन्निधानात राहून त्यांची सेवा करून ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर करायचा असतो. मग गुरू भक्ति कशी असते? याचे उदाहरण देताना परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी त्याची भक्तजनांना एक सत्य घटना सांगतात.
सुमारे २००० वर्षांपूर्वी नाथ पंथ नावाचा संप्रदाय महाराष्ट्रात खुप प्रसिद्धीस पावला होता. त्या नाथपंथात नागार्जुन नावाचा सिद्ध (देवता उपासक) होऊन गेला. त्या नागार्जुनाच्या शिष्याचे नाव कणेरी असे होते. कणेरी हा नागार्जुनाचा आज्ञाधारक शिष्य होता. तो रोज भिक्षा मागून आणायचा व आपल्या गुरूला भोजन संपादायचा आणि मग आपण जेवायचा. असा त्या कणेरीचा नित्यक्रम होता.
एक दिवस तो कणेरी जेवणाच्या खानावळीत (उपहारगृहात) भिक्षेला गेला. खानावळ चालविणाऱ्या बाईने त्याला उडदाचे दोन वडे भिक्षेत वाढले, ते त्याने आणून आपल्या गुरुला म्हणजेच नागार्जुनाला दिले. ते वडे चांगले खरपूस व चविष्ट होते. भोजन झाल्यावर नागार्जुन कणेरीला म्हणाला “पुता! हे वडे कोठून आणलेस? फार चांगले खरपूस आणि चवीदार होते !”
गुरूला वडे फार आवडले, गुरूंनी केलेली प्रशंसा ऐकून कणेरी लगेचच त्या बाईकडे पुन्हा वड्यांची भिक्षा मागायला गेला. दरवाजात उभे राहून “गोरक्ष फोकरला.” भिक्षा शब्द ऐकून, ती बाई दुसरा पदार्थ ताटात घेऊन वाढायला आली, तो पदार्थ पाहून कणेरी म्हणाला “आई, हा पदार्थ नको. मघाशी तुम्ही मला वडे भिक्षेला वाढले तेच पुन्हा भिक्षेत घाला. आमच्या गुरूला ते वडे फार आवडले.”
हे ऐकून ती बाई हसून म्हणाली, “वा ! छान आहे तुमचा गुरू ! जगात प्रत्येकाला जे जे आवडते ते ते सदा सर्वकाळ मिळते कां?” हे ऐकून कणेरी म्हणाला, “कां नाही मिळणार आई ?” यावर बाई म्हणाली “असं का ! मग तुझे डोळे खुप छान आहेत, ते आवडले मला, तुझा एक डोळा देतोस का?” कणेरीचे डोळे फार सुंदर होते.
हे ऐकून कणेरी म्हणाला “मग काय घ्या !” म्हणून कणेरीने डाव्या हाताच्या करंगळीचे नख डोळ्यात घातले आणि डोळा काढून उजव्या हातावर ठेवला. आणि त्या बाईला म्हणाला, “घ्या आई” ते पाहून ती बाई खुप घाबरली. तिच्यासाठी हे सर्व अपेक्षित होते. ती चक्रावून गेली. लगबगीने आत गेली. दोन वडे आणून त्याच्या झोळीत घातले. व फुटलेल्या डोळ्यावर हात ठेवून कणेरी वडे घेऊन गुरुजवळ आला. रक्त बंबाळ डोळ्यावर हात ठेवून आलेल्या कणेरीला पाहून नागार्जुन म्हणाला, “शिष्योत्तमा कणेरी ! हे काय ? डोळ्यातून रक्त ओघळते आहे. तू डोळ्यावर हात का धरलास?”
यावर कणेरी म्हणाला, जी गुरूजी, मघाशी आपणाला संपादिलेला वडा आपणाला फार आवडला. आपण त्याची फार प्रशंसा केली, म्हणून ज्या बाईकडून मला वडा मिळाला होता त्या बाईकडे मी पुन्हा भिक्षेला गेलो. ती बाई मला दुसरा पदार्थ वाढीत होती. त्या पदार्थाला मी नकार देऊन मघाशी दिलेला वडा मागितला. म्हणालो, मघाशी दिलेला वडा आमच्या गुरूला फार आवडला तर ती म्हणाली, 'जगात प्रत्येकाला जे जे आवडते ते ते सदा सर्व काळ मिळते कां ?' मग मी म्हणालो, 'का नाही मिळत?' मग ती म्हणाली 'तुझे डोळे मला फार आवडले, देतोस का काढून?' मग मी माझा डोळा काढून तिला दिला. ती घाबरली आणि मला वड्याची भिक्षा घातली”
यावर नागार्जुन म्हणाला, मला! तू तिला डोळा काढून दिला मलाही तुझे डोळे आवडतात , तुझा दुसरा डोळा मला देतोस का?” यावर कनेरी म्हणाला, “का नाही गुरुजी घ्या ना!” म्हणून दुसरा डोळा काढणार तेवढ्यात नागार्जुन म्हणाला, “राहूं दे हो तो आमचाच आहे. तुमच्यापाशी राहूं द्या. मी नंतर कधीतरी मागून घेईन. आता हा डोळा आमचा आहे तू इतरांना द्यायचा नाहीस” नंतर नागार्जुन त्याच्या भक्तिवर प्रसन्न झाला सिध्दी सामर्थ्याने त्याचा पहिला काढलेला डोळा पुन्हा जसाच्या तसा करून दिला.
ही कथा निरूपण करून सर्वज्ञ म्हणाले, “अशी ही श्रेष्ठ गुरू भक्ती कणेरीची ! महात्मे हो गुरु भक्ती अशी असते गुरुचा शब्द वृथा जाऊ देत नाही. तो खरा चांगला शिष्य म्हणावा. पण गुरुही तसा धर्मवान असला पाहिजे. स्वार्थी आदरणीय प्रतारक गुरु शिष्याला नरकास जाण्यासच कारणीभूत असतात. गुरु अदृष्टार्थी, आचारवंत, संपूर्ण ज्ञानी आणि धर्मवान हवेत. आणि गुरुचा शब्दही धर्माला धरून असावा. अशा गुरुची भक्ती करणे हे देवाची भक्ती करण्यासारखे होय.