ज्ञानाला भक्तीची आणि वैराग्याची जोड हवीच!!
ज्ञान. ज्ञान म्हणजे जीवाला पवित्र करणारे एकमेव साधन भगवंत गीतेमध्ये म्हणतात ज्ञानाशिवाय पवित्र करणारे दुसरी कोणतीही गोष्ट या भूतलावर विद्यमान नाही. पण ते ज्ञान म्हणजे परब्रम्ह परमेश्वराचे ज्ञान ते जसे तसे पवित्र करणारे होय. इतर जीव देवतांचे ज्ञान पवित्र करणारे नाहीत उलट या जन्म-मरणरूप बंधनात टाकणारे आहेत. मग असे हे ज्ञान ज्याला झाले तो मुक्त झालाच असे नाही. या संसार सागरातून मुक्त होण्यासाठी ज्ञानाबरोबर वैराग्याची आणि भक्तीची जोड असावी लागते. ज्याला असे वाटते की “मी नुसत्या ज्ञानाने या संसार सागरातून तरुन जाईल” तो साधक कागदाच्या नावेने समुद्र पार करण्याची इच्छा ठेवणाऱ्या अज्ञान माणसासारखा मोहग्रसित आहे.
एक डोंबारी होता तो एका खेड्या गावामध्ये गेला. डुम डुम डफडं वाजवायला सुरुवात केली. त्याला एक मुलगा होता एक मुलगी होती त्याने दोन्हीकडे दोन खांब वरून मध्ये तार टांगला त्या तारेवरती मुलगी चालायची या बांबू पासून त्या बांबूपर्यंततारेवरती चालायची. आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांनी हे पाहिले आहे. नंतर त्याच्या मोठा बांबू आणला उभा केला आणि त्याचा मुलगा बांबूवर भरभर चढून गेला वर त्याने त्या बांबू वर पोट ठेवून गोल गोल फिरला.
मग खाली आला हा सर्व डोंबाऱ्याचा खेळ पाहण्यासाठी एक चोर आलेला होता. त्या चोराने विचार केला की, 'काय गुणवान पोरगा आहे आपल्याला जर दुमाडीवर चोरी करायची असेल तर हा पोरगा खूप उपयोगी पडेल.' हा किती सहज अलगद वर चढून जातो हा मुलगा आपल्या कामाचा आहे डोंगराचा खेळ संपला त्या डोंबाऱ्याजवळ चोर गेला आणि त्याला विचारले तुझ्या मुलाची रोजंदारी काय आहे? तो म्हणाला, “काय साहेब काही मिळत नाही, हे लोक चाराणे आठाणे टाकतात पोटापुरतं आमचं भागते”
चोर म्हणाला “तसं नाही याला मी काय रोज देऊ? तो डोंबारी म्हणाला, “काय रोज द्याल तुम्ही?” चोर म्हणाला दोनशे रुपये” डोंबारी म्हणाला “नाही साहेब आमचं पोटा-पाण्याचे भागत नाही, उद्योग बंद पडतो, दोनशे रुपयात भागणर नाही. म्हणून जास्त द्याल तर ठीक” चोराने विचार केला रोजचे पाचशे रुपये देणे आपल्याला परवडेल की नाही. पण पोराच्या ठिकाणी वर चढण्याचे कसं व पाहून विचार केला.
चोर म्हणाला “ठीक आहे पाचशे रुपये रोज देतो. दिवसा याला काही काम नाहीये, दिवसभर तुम्ही तुमचे डोंबाऱ्याचे खेळ चालू द्या. फक्त संध्याकाळी सहा वाजता माझ्याकडे यायचं. याची ड्युटी माझ्याकडे फक्त रात्री असेल.” असा पाचशे रुपये रोज ठरला. मुलगा संध्याकाळी सहा वाजता चोराच्या घरी गेला. चोराने त्याला जेवण वगैरे करविले. स्वतःही जेवला. रात्रीचे अकरा वाजले तेव्हा तो मुलगा आणि चोर कामाला जाण्यासाठी निघाले.
एका सावकाराच्या इमारतीच्या मागे उभे राहिले. इमारतीला एक छोटीशी खिडकी होती ती उघडी होती. ती खिडकी दुसऱ्या मजल्यावर होती त्या चोराने ती खिडकी मुलाला दाखवली. व म्हणाला बाळा तू या इमारतीवर चढून जायचं आहे खिडकीतून मध्ये जाऊन दरवाजाची कडी उघडून द्यायची आहे. संपलं तुझं काम बाकी पुढे काय करायचे ते मी पाहून घेईल. त्या मुलाने पायजामा वर केला हाताच्या बाह्यावर केला आणि म्हणाला “वाजवा आता चला, तुम्ही डुमडून वाजवायला सुरुवात करा मी आत्ता वर चढतो.” त्या डोंबाऱ्याच्या मुलाला डुमडुम वाजवल्याशिवाय वर चढता येत नव्हतं.
जसं त्या डोंबाऱ्याच्या मुलाला वर चढण्यासाठी डुमडूम वाजवण्याची गरज आहे. तसं कैवल्य गडावर चढण्यासाठी मनुष्याला वैराग्याची आणि भक्तीची गरज आहे. नुसत्या ज्ञानाने कैवल्यगड सर करणे कोणालाही शक्य नाही. वैराग्याशिवाय भक्तीशिवाय ज्ञानाला काहीही अर्थ नाही. असे कोरडे ज्ञान देवाने आपल्याला अनंतासृष्टी दिलेले आहे. पण वैराग्य न केल्यामुळे आणि देवाची अनन्य भक्ती न केल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा प्रत्येक सृष्टीत पतन पावत आहोत.
ज्ञानाशिवाय वैराग्याला जसा काहीही अर्थ नाही, तसे वैराग्यशिवाय ज्ञानालाही काहीही अर्थ नाही. परब्रम्ह परमेश्वर अवताराने ही ज्ञान शक्ती स्वीकारल्यावर उच्चपराकोटीचे वैराग्य आम्हा जीवांना करून दाखवले. लीळाचरित्रात ते आपल्याला पाहायला मिळते. देवही खड्यागोट्यांवर मोठ्या मोठ्या पाषाणांवर निद्रा करीत आहेत भयंकर अरण्यात विचरत आहेत. घरोघरी गावोगावी फिरून पाणीपात्र करून जीवांना प्रेमाधिकार ज्ञानाधिकार घडवत आहेत. म्हणून भक्ती गुण किंवा ज्ञान वाढवण्यासाठी देवाने सांगितलेले वैराग्य करणे आवश्यक आहे.
भक्ती गुण साधण्यासाठी वेळ काढून देवाच्या नामस्मरणात मन लावावे लागते. रिकाम्या वेळात आपण टीव्ही पाहत बसतो मोबाईल पाहत बसतो किंवा घरातले कामं काढत बसतो. चित्र काढत बसतो. किंवा शेजारी जाऊन गप्पा मारत बसतो. मन रमवण्यासाठी मनोरंजनाच्या नाना साधनांचा आश्रय घेतो. पण त्या रिकाम्या वेळेत गाठी घेऊन बसावे किंवा लीळाचरित्राचे वाचन करावे देवाचे स्मरण करावे, सूत्रपाठाचे पारायण करावे श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण करावे असे आपल्याला कधीही वाटत नाही.
मग तुम्हीच सांगा की आपल्यातला भक्ती गुण कसा बरे वाढेल. श्रीकृष्णभगवंत अर्जुनाला गीतेत म्हणतात सर्व गोष्टींचा वासनांचा कामनांचा त्याग करून माझ्यातच मन लावणारा हो, पण आपल्याला वासनांचा कामनांचा इच्छांचा स्पृहांचा त्याग होत नाही. आपली वृत्ती इतकी असमाधानी झालेली आहे की आहे त्या गोष्टींमध्ये आपले भागतच नाही, यापेक्षा जास्त हवे असे नेहमी वाटतच राहते.
भक्ती गुण स्मरण वाढवण्यासाठी आपण काहीही प्रयत्न करत नाही. घरातले भांडे पुन्हा पुन्हा धुणे, घासणे पुन्हा पुन्हा घर पुसणे यातच आपला वेळ निरर्थक जात राहतो. स्वच्छतेच्या नावाखाली आपण मानसिके निरर्थक छी छी थू थू असा विचिकित्सारुप विकल्प आचरत राहतो. म्हणून असा निरर्थक वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येकाचे कर्तव्य हे आहे की जास्तीत जास्त वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात कसा जाईल याचा विचार नामधारक वासनिक स्त्रियांनी करावा.
आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला परमेश्वरासाठी कसा देता येईल असे वेळेचे नियोजन करावे. घर कामातून वेळात वेळ काढून ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा. देवाचे नामस्मरण करावे. सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला न जाता एखाद्या स्थानावर जावे. उटी उपहार करावा. तिथे एखादा छोटाशा आश्रमात शक्य असेल तर अन्नदान करावे. तिथे ज्ञानी पुरुष राहत असतील तर त्यांना ब्रह्मविद्याची जिज्ञासा करावी प्रश्न विचारावेत. त्यांच्याकडून शास्त्र ऐकून घ्यावे.
अशा वेळेच्या नियोजनाने आपण हळूहळू देवाच्या जवळ जाऊ. आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंतांनी म्हटलेलेच आहे की जो माझे नामस्मरण करतो मी त्याच्या पाठीशी त्याचे रक्षण करण्यासाठी सतत उभा असतो. नामस्मरण केल्याने देवासाठी वेळ दिल्याने आपल्या जीवनात येणारी मोठमोठे संकटे टळतात. भाल्याचा घाव काट्यावर निमाणला जातो. नामस्मरणामुळे देवतांचे विघ्न होत नाही.