श्रीकृष्ण चरित्र मराठी - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता shreekrishna charitra marathi

श्रीकृष्ण चरित्र मराठी - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता shreekrishna charitra marathi

 भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग 01

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।।

   सर्वप्रथम वाचकांना हे आवर्जुन सांगावेसे वाटत की श्रीकृष्ण भगवंत हे परब्रम्ह परमेश्वराचे अवतार आहेत. विष्णु देवतेचे अवतार नाहीत. श्रीकृष्ण भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत आपला परिचय दिला आहे. ते सर्वांच्या पलिकडे असलेला जो परमेश्वर त्याचे अवतार आहेत. मी विष्णुचा अवतार आहे असे भगवंतांनी कुठेही म्हटलेले नाही. हे श्रीकृष्ण चरित्र महानुभाव पंथिय तत्त्वज्ञानाला धरूनच लिहिले गेले आहे. 

     परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्णांचा अवतार होऊन सहा हजारांहून अधिक वर्षे झाली आहेत. त्यावेळेस द्वापार युग सुरू होते. त्यावेळी मथुरा नगरीचा राजा उग्रसेन होता. तो यादव वंशाचा होता. त्याचा मोठा मुलगा कंस खूप शक्तिशाली तसेच निर्दयी स्वभावाचा होता. राक्षसी वृत्तीचा होता. तो आपल्या राज्यातील जनतेवर खूप अत्याचार करायचा. 

भारतात, आर्यवर्तामध्ये जितके अन्यायी आणि अत्याचारी राजे होते. त्या सर्वांशी त्याने मैत्री केली होती. तो जरासंधाचा जावई होता. बरेचसे राक्षस त्याचे सेवक आणि सल्लागार झाले होते. त्यामुळे क्षत्रिय वंशात जन्म नाही त्याची वृत्ती अतिशय वाईट झाली होती. जो वाईट लोकांच्या संगतीत राहातो, तो वाईट होतो. धर्मात्मा राजा उग्रसेनाचा पुत्र असूनही कंस अधर्मी आणि अन्यायी झाला होता. 

असे म्हणतात की, उग्रसेन राजाची राणी महालाच्या गच्चीवर बसून आपले केस वाळवत होती. त्याच वेळी दुर्मल्ल नावाचा दैत्य आकाशमार्गे कुठेतरी जात होता तेव्हा त्याने त्या राणीला पाहिले व तिच्या सौंदर्याने मोहित झाला. व उग्रसेनाचे रूप घेऊन तिच्याशी व्यभिचार केला. व निघून गेला नंतर ती राणी गर्भवती राहिली व कंसाचा जन्म झाला. असा कंस एका राक्षसाचा मुलगा होता म्हणून त्याची वृत्ती ही तशीच असूरी होती.

उग्रसेनाच्या भावाचे नाव देवक होते. त्या देवक यादवाची धाकटी मुलगी देवकी हिचा शुभविवाह वसुदेवाशी झाला. कंस तेव्हा युवराज होता. कंसाचे आपली चुलत बहीण देवकीवर खूप प्रेम होते. वसुदेव देवकी विवाहात कंस फारच उत्साहीत होता. आनंदात होता. वसुदेवासारख्या सुंदर सभ्य शीलवान राजकुमाराशी देवकीचा विवाह झाला याचे त्याला फार समाधान वाटले.  

विवाह झाल्यावर वसुदेव राजा देवकीबरोबर रथात बसून आपल्या घरी जाऊ लागला, तेव्हा आपल्या छोट्या बहिणीच्या प्रेमामुळे कंस स्वत:च त्या रथाचा सारथी झाला. रस्त्याने मोठ्या उत्साहात जात असता वाटेत आकाशवाणी ऐकू आली, "मूर्खा कंसा ! तू इतक्या आनंदाने जिला रथात बसवून घेऊन जात आहेस, तिच्याच आठव्या गर्भापासून होणारा पुत्र तुझा काळ ठरेल. तो तुझा नाश करील. ” 

आधीच असुरी प्रकृतीचा कंस आकाशवाणी ऐकताच अत्यंत क्रोधित झाला. व त्याने तिथेच देवकीचे केस पकडले आणि तिला मारण्यासाठी तलवार उपसली. पण वेळीच वसुदेवाने त्याचा हात धरला. वसुदेवाने कंसाला बरेच समजावले, "हे बघ भाऊ ! तु जे हे करत आहेस हे तुझ्या किर्तीला शोभणारे नाही. आणि जेव्हा मृत्यू येणार असेल, तेव्हा तो येईलच. मृत्यूच अंतिम सत्य आहे. मृत्यूशिवाय कोणीही कोणाला मारू शकत नाही. जन्माला आला तो मरतोच. आणि तू आपल्या बहिणीला मारून मोठं पाप करू नकोस. असं करणाऱ्याची लोक खुप निंदा करतात आणि असा निर्दोष जीवाला मारणारा घोर नरकात जातो.” 

पण कंस खूप निर्दयी आणि पापी होता. वसुदेवाच्या सदोपदेशाचा त्याच्या कठीण मनावर काहीही प्रभाव पडला नाही. उलट तो म्हणाला, "मी हिलाच मारून टाकतो. ही मेली की मग मला मारणारा हिचा पुत्र कसा जन्माला येईल?” वसुदेवाने पाहिले की, कंस समजावणीने ऐकत नाही. याच्यावर उपदेशाचा काहीच परिणाम होणार नाही. तेव्हा तो म्हणाला, “भल्या माणसा! तुझ्या या निष्पाप मासुम बहिणीने तर काहीही अपराध केलेला नाही आणि हिच्यापासून तुला काही धोकादेखील नाही. तुला धोका तर हिच्या मुलापासून आहे. मग हिला जेव्हा मूल होईल, तेव्हा त्याला मी तुझ्याकडे आणून पोहोचवेन. मग तू त्याचे काहीही कर"

दुराचारी कंसाने वसुदेवाचे म्हणणे ऐकले. आणि तो आपल्या राजवाड्यात परतला. वसुदेव - देवकी हे नव दाम्पत्य सुखाचा संसार करू लागले. पण दोघांना आपली अपत्ये कंसाला द्यावी लागतील हे शल्य नेहमी बोचत होते. कालांतराने देवकीला पहिला पुत्र झाला. तेव्हा जन्मताच त्या बाळाला वसुदेव राजे कंसाकडे घेऊन गेले. देवकी माता खुप रडली. पण नाईलाज होता. वसुदेवराजांच्या मनाच्या स्थीतीचे वर्णन करणे तर शक्यच नाही. कारण आपल्याच मुलाला कोणा निर्दयी पापी व्यक्तीकडे मारण्यासाठी आपल्याच हाताने पोहोचवणे, ही किती दु:खाची गोष्ट आहे. 

परंतु आपला शब्द पाळण्यासाठी वसुदेवाने हे दुःख देखील सोसले. सत्पुरुष सत्याच्या प्रतिज्ञेच्या रक्षणार्थ मोठमोठे कष्ट सहन करतात. वसुदेव मुलाला घेऊन आले हे पाहून कंसाला त्यांचा प्रामाणिकपणा आवडला. व त्याने म्हटले, “राजे, देवकीचा आठवा पुत्र माझा शत्रु आहे. हा पहिला पूत्र नाही. तुम्ही याला परत घेऊन जा.” असे म्हणून कंसाने त्या बाळाला परत केले. वसुदेवराजे बाळाला घेऊन आपल्या वाड्यात परतले. 

मग देवकीचे ते सहा पुत्र कोण होते? याविषयी एक पौराणिक कथा आलेली आहे. स्वयंभू मनवंतरा मध्ये मारिची आणि त्याची पत्नी उर्ना यांना सहा अत्यंत बलवान आणि पवित्र पुत्र होते. एकदा ब्रह्माजींना आपली कन्या सरस्वतीसोबत फिरताना पाहून ते हसले. ब्रह्माजींनी त्यांना शाप दिला की तुम्हा लोकांचा पतन होईल आणि तुम्ही राक्षसांच्या रूपात जन्म घ्याल. ते सहा पुत्र कालनेमीचे पुत्र म्हणून जन्मले. पुढच्या जन्मात ते हिरण्यकशिपूचा मुलं म्हणून जन्मले.

 त्यांना त्यांच्या मागील जन्मांचे ज्ञान होते. त्यामुळे पूर्वीच्या शापाच्या भीतीने तो तपश्चर्या करू लागला. ब्रह्मादेवतेने प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की देवता, दानव, नाग, गंधर्व, सिद्ध इत्यादी कोणीही तुम्हाला मारणार नाही. हिरण्यकश्यपू हा देवतांचा विरोधक असल्याने तुम्ही माझी (वडिलांची)  उपेक्षा केली म्हणून तो आपल्या पुत्रांवर रागावला. 

म्हणून त्याने आपल्या मुलांना शाप दिला की मी तुम्हांला सोडून देतो. तुम्ही अधोलोकात जा आणि या पृथ्वीवर तुम्हाला 'षडगर्भ' म्हणून ओळखले जाईल. तुम्ही लोक अनेक दिवस झोपेच्या प्रभावाखाली असाल. देवकीच्या पोटातून तुम्हा एकेकाचा जन्म होईल आणि तुझा पूर्वजन्मीचा पिता कालनेमी, जो आता कंस आहे, जन्म होताच तो तुमचा वध करील. अशा रीतीने हिरण्यकशिपूच्या शापामुळे ते देवकीच्या गर्भात एक एक करून येत राहिले आणि पूर्वीच्या शापाने प्रेरित होऊन कंस त्या देवकीपुत्रांचा वध करत गेला.         यावर दुसरी पौराणिक कथा अशी :- एक वेळ ब्रह्मदेव आपल्या सभेत बसले होते. सत्यलोकीच्या देवतांची घनदाट सभा बसली होती. तिथे विष्णू देवतेचा पुत्र मदन तोही ब्रह्मदेवतेच्या दर्शनाला आला होता. पुढे सरस्वती देवता गायन करत होती ते गायन ऐकण्यात ब्रह्मदेव अतिशय तल्लीन झाले होते. त्यामुळे त्यांनी दर्शनाला आलेल्या मदनाचे संबोखण केले नाही त्याच्याशी संवाद केला नाही. त्यामुळे मदनाला अतिशय राग आला. त्या रागाच्या भरात त्याने ब्रम्ह्यावर आपल्या पंच बाणांपैकी मोहन हा बाण प्रेरला. 

त्यामुळे ब्रह्मदेवतेच्या मनात सरस्वती देवते विषयी अभिलाष उत्पन्न झाला. तेव्हा जवळच मरीची महर्षीचे सहा पार्षद पुत्र तिथे उपस्थित होते. त्यांच्या ते लक्षात आले व ते ब्रह्मदेवाला हसले. त्यांचे हसणे ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. व मला अशी वासना का उत्पन्न झाली म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहिले. तर तिथे मदन बसलेला होता. मग ब्रह्मदेवाने रागानेच म्हटले तू महादेवाच्या तिसऱ्या नेत्राग्निने भस्म होशील. आणि त्या सहाही पार्शदांना शाप दिला की तुम्ही मृत्यूलोकात मनुष्यजन्म पावाल आणि जन्म होताच तुम्हाला मृत्यू येईल. ते ब्रम्ह्याचे पार्षद शापातून लवकर मुक्त होण्यासाठी नारदमुनी कंसाकडे आले व त्यांनी कंसाच्या मनात संशय निर्माण केला. देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करील हे ठीक आहे पण अनुक्रमे आठवा का व्यतिक्रमे आठवा? असं म्हणत नारदमुनींनी गोल चक्रावर आठ रेघा काढून कंसाला मोजण्यास सांगितल्या. कंस जेथून मोजत असे, त्याच्याच जवळची रेघ आठवी होत असे. असं त्याच्या मनात संशय निर्माण करून नारदमुनी निघून गेले. 

पण यामुळे कंसाला वाटू लागले की, या प्रकारे तर देवकीचा प्रत्येक पुत्र आठवाच म्हणता येईल. तो तत्काळ उठला आणि स्वतः वसुदेवाच्या घरी गेला आणि देवकीच्या मांडीवर असलेल्या मुलाला तिच्याजवळून काढून घेतले. देवकी माहितीने त्याचे पाय धरले की आठवा मुलगा तुझा काळ आहे हा निर्दोष आहे याला काही करू नकोस. पण तिच्या बोलण्याचा कंसावर काही परिणाम झाला नाही. त्या क्रुरकर्माने एका मोठ्या दगडावर ते मुल आपटले. 

देवकी मातेच्या अंतःकरणी अतिशय दुःख झाले ती धाय मोकलून रडू लागली. पण सहा पैकी एक पार्शद शापमुक्त झाला. आणि वसुदेव देवकी राज्य सोडून कुठे पळून जाऊ नयेत, त्यांना त्याने कारागृहात टाकले. तिथे त्याचे विश्वस्त सैनिक राखण ठेवले. राजा उग्रसेनाने या गोष्टीला खूप विरोध केला तेव्हा कंसाने जबरदस्तीने आपले पिता उग्रसेन यांना देखील कारागृहात टाकले. वडिलांना कैदेत टाकून त्या दुष्टाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. व मथुरेचा राजा झाला. 

पुढे देवकीला जितके पुत्र झाले ते सर्व त्या नराधमाने, दगडावर आपटून मारून टाकत असे. अशा प्रकारे त्याने देवकीचे सहा पुत्र जन्मल्याजन्मल्याच मारून टाकले. सहाही पार्शद ब्रम्हलोकी गेले. पण देवकी मातेच्या वसुदेव राजांच्या दुःखाला काही सीमा नव्हती डोळ्यादेखत सहाही निष्पाप बाळकांची हत्या झाली होती. त्या मातेचे दुःख तीच जाणे इतर कोणीही त्या दुःखाची कल्पना करू शकत नव्हते.

पुढे भगवंताचा अवतार आणि गोकुळात जाणे हे आपण पुढील भागात पाहुया 

पुढील भाग दुसरा आणि इतरही वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇

भाग 02 लिंक 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/02.html

श्रीकृष्ण चरित्र भाग 04 शकटासुर वध👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/shreekrishna-lila-marathi.html

पुतना वध लीळा 👇👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/03.html

तृणावर्त राक्षसाचा वध 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/05-shreekrishna-lila-marathi.html

महाबळ ब्राम्हणाची फजिती ही लीळा वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/06-shreekrishna-charitra-marathi.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post