श्रीकृष्ण चरित्र भाग 05 - तृणावर्त राक्षसाचा वध - shreekrishna lila marathi

श्रीकृष्ण चरित्र भाग 05 - तृणावर्त राक्षसाचा वध - shreekrishna lila marathi

 श्रीकृष्ण चरित्र भाग 05 तृणावर्त वध

तृणावर्त राक्षसाचा वध

पुतना आणि शकटासुराच्या मृत्यू नंतर कंस अत्यंत घाबरला. त्याला आपला मृत्यू जवळ दिसू लागला. नंतर त्याने तृणावर्त नावाच्या राक्षसाला गोकुळात पाठवण्याचा विचार केला. व तृणावर्ताला बोलवून गोकुळात जायला सांगितले. तृणावर तर राक्षस भयंकर वादळाचे रूप घेऊ शकत होता. आणि त्याच्यासमोर काहीही त्याला उडवून घेऊन जाण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते.

पौराणिक कथा :- तृणावर्त हा राक्षस त्याच्या मागील जन्मी राक्षस नव्हता. पौराणिक कथेनुसार पांडू देशात सहस्त्राक्ष नावाचा राजा राज्य करत होता. एके दिवशी तो राजा आपल्या राण्यांसह नदीवर स्नान करण्यासाठी गेला.  व त्यांच्यासोबत जलक्रीडा करू लागला. त्याची जलक्रीडा सुरू असताना महर्षी दुर्वासा तेथून जात होते.  

राजा जलक्रीडामध्ये इतका मग्न झाला होता की महर्षी दुर्वासांना नमस्कार करायला विसरला.  त्याने दुर्वासा ऋषीकडे लक्षही दिले नाही. त्यामुळे दुर्वासा ऋषीला अत्यंत राग आला आणि त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला.  राजाला आपली चूक समजली आणि त्याने दुर्वासा ऋषींची माफी मागितली. तेव्हा दुर्वासाने सांगितले की  भगवंताच्या हातून तुला मुक्ती मिळेल.  दुर्वासा ऋषींच्या शापामुळे राजा सहस्त्राक्ष या जन्मी तृणावर्त राक्षस झाला होता. 

दैत्य नामे तृणावर्त कंसाचा निजसेवक ।

वादळी रूप घेवोनी कृष्णा आकाश फेकले ॥

गोकुळी दाटली धूळ कोणा कांही न ते दिसे ।

भयान वादळी शब्दे दिशाही थर्र कापल्या ॥

एके दिवशी यशोदा माता श्रीकृष्ण भगवंताला मांडीवर घेऊन खेळवीत असता. देवाने गिरिमा सिद्धीचे कार्य अंगिकरले. आणि ते इतका जड झाले की त्यांच्या श्रीमूर्तिचा भार मातेला पेलवेना. शेवटी तिने श्रीकृष्णदेवाला जमिनीवर ठेवले. जड होणे हीही श्रीकृष्ण भगवंतांची लीळाच. कारण पुढे फार मोठे संकट येणार आहे हे देव सर्वज्ञपणे जाणत होते. 

आणि जर जड होणे ही गिरिमा सिद्धी स्वीकारली नसती तर त्याचेशिवाय यशोदा माता देवाला खाली ठेऊन दूर गेली नसती. आगामी तृणावर्त नावाच्या भयंकर वादळापासून मातेचे रक्षण व्हावे म्हणून देवाने अशी लीळा केली. त्या भाराने कासावीस होऊन तिने श्रीकृष्णदेवाला जमिनीवर बसविले. याचे तिलाही खुप आश्चर्य वाटले. यानंतर तिने परमेश्वराचे स्मरण केले आणि ती घरकामाला लागली.

थोड्या वेळाने कंसाने पाठविलेला तृणावर्त नावाचा राक्षस गोकुळात आला. व तृणावर्ताने गोकुळाच्या अवतीभोवती फार मोठे वादळ निर्माण केले. त्या वादळाने इतकी धूळ त्याने उडविली की दिवसाच काळोख झाला. सर्वांचे डोळे धुळीने भरून गेले. कोणालाही काही दिवस नव्हते. चारी दिशांना धुळीने भरलेला काळोख करून त्या राक्षसाने अंगणात बसलेल्या बाळ श्रीकृष्णदेवाला उचलले आणि आकाशात उडून गेला. 

ते भयंकर वादळ आलेले पाहून यशोदा माता अंगणात बसलेल्या श्रीकृष्ण देवाकडे धावली. पण त्या धुळीच्या वातावरणात अंगणात श्रीकृष्णाचा पत्ता नव्हता. पुत्राच्या आठवणीने ती माता अत्यंत व्याकुळ झाली. व रडत रडत जमिनीवर कोसळली. वादळ थोडे शांत झाल्यावर इतर गोपिकाही रडत असलेल्या यशोदेकडे धावल्या. श्रीकृष्ण देव न दिसल्याने त्यांनाही अत्यंत दुःख झाले त्याही रडू लागल्या, शोक करू लागल्या. 

इकडे आधी तर भगवंत थोडे हलके वजन स्वीकारून त्याच्यासोबत उडाले, परंतु वर आकाशात गेल्यावर पुन्हा गरिमा सिद्धीचे कार्य केले. आणि जडपणा स्वीकारला. त्या प्रचंड राक्षसालाही श्रीमूर्तिचे वजन पेलवेना. नंतर देवाने दोन्ही हातांनी त्या राक्षसाचा गळा दाबला. गळा दाबल्याने राक्षसाचे डोळे बाहेर आले. देवाने प्रचंड वजन स्वीकारले म्हणून त्याच्या वेग अत्यंत कमी झाला, या अद्भुत बाळकाला दूर सारून तो पळूपण शकला नाही आणि त्याला बोलता देखील येत नव्हते. 

शेवटी मरून तो गोकुळात नंदाच्या दारासमोरच जोरात दगडावर आपटून पडला. वरून पडल्यामुळे त्याच्या शरीराच्या चिंधड्या - चिंधड्या उडाल्या. भगवान श्रीकृष्ण तर त्या वेळी देखील त्याच्यावर पाय आपटून खेळतच होते. सर्व गोपिकांनी तिकडे पाहिले. सर्व गोपिका त्याला आधीपासूनच शोधत होत्या, त्या मेलेल्या राक्षसाच्या छातीवर खेळत असलेले श्रीकृष्ण देव पाहून गोपिकांना आश्चर्य वाटले. गोपांनी लगबगीने जाऊन देवाला राक्षसाच्या शरीरावरून उचलून नेऊन माता यशोदेच्या कडेवर दिले.

सर्व गोप-गोपिका अज्ञानवशात म्हणू लागले की, किती मोठे आश्चर्य आहे! या राक्षसाने मुलाला नेले होते पण आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले होते धर्मशाळा बांधल्या होत्या पानपोई लावल्या होत्या म्हणूनच आज हे बाळक सुखरूप आले. पण त्या बिचाऱ्यांना हे माहीतच नव्हते की भगवंतानेच त्याला यमसदनी धाडले आहे. असो! तरीही त्या गोपगोपिका अत्यंत भाग्यवान होत्या त्यांना देवाच्या अशा अद्भुत लीळा प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या.

महाबळ ब्राम्हणाची फजिती ही लीळा वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/06-shreekrishna-charitra-marathi.html

यशोदा मातेस श्रीमुखात विश्वरूप दाखवणे 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/07.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post