श्रीकृष्ण चरित्र भाग 07 यशोदा मातेस श्रीमुखात विश्वरूप दाखवणे व नामकरण संस्कार

श्रीकृष्ण चरित्र भाग 07 यशोदा मातेस श्रीमुखात विश्वरूप दाखवणे व नामकरण संस्कार

 श्रीकृष्ण चरित्र भाग 07 

यशोदा मातेस श्रीमुखात विश्वरूप दाखवणे आणि नामकरण संस्कार 

एकदा यशोदा माता श्रीकृष्ण भगवंताला स्तनपान देत होती. तेव्हा तिच्या मनात बाळाविषयी अत्यंत वात्सल्य निर्माण झाले. निरतिशय पुत्रप्रेमाने मातेला पान्हा येतो. दूध आपोआप स्रवते. जणू तिच्यातील वात्सल्यच दूधरूपाने ओसंडते. तान्ह्या बाळकाला स्तनाग्रे ओढण्याचेहि श्रम करावे लागत नाहीत. स्नेहवशे माता बाळाला गोंजारत होती. गुणगुणत होती. 

बाळाचे दूध पिऊन झाले होते. तेव्हा माता यशोदा त्याचे मधुर हास्ययुक्त मुख कुरवाळत होती. त्याचवेळी श्रीकृष्ण देवाने जांभई दिली आणि यशोदा मातेला विश्वरूप दर्शन घडले. मातेने त्यांच्या श्रीमुखात असे पाहिले की, आकाश, पाताळ, अंतरिक्ष, पृथ्वी, ज्योतिमंडल, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, मेरु पर्वत, सप्त समुद्र, सप्त द्वीप, अष्ट कुळाचल पर्वत, गंगा यमुनादिक सर्व नद्या, चतुर्दश भवने आणि सर्व चराचर पदार्थ भरले आहेत.  ते पाहून ती आश्चर्यचकित आणि गलितगात्र झाली. आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून यशोदा थरथर कापू लागली. तिने अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपले डोळे बंद करून घेतले.

तिला बिचारीला फक्त पुत्राविषयी वात्सल्यभावच माहीत. एवढे महान तेज सहन करण्याची शक्ती तिच्यात कोठून येणार? पुढे गीता सांगताना श्रीकृष्ण भगवंतानी अर्जुनासही विश्वरूप दाखविले. पण ते पाहण्यासाठी दिव्य चक्षुंची शक्तीही त्याला अगोदर दिली मग तो पाहू शकला. आणि एवढा महान योद्धा असूनही तो गर्भगळित झाला होताच ! तिथे यशोदा माता घाबरणार नाही का? 

महानुभाव पंथिय कविवर्य गद्यराजकार हयग्रीवाचार्य म्हणतात, भयचकित तदा मानिली भूतबाधा। श्रीकृष्ण देवाच्या मुखामध्ये विश्वरूप पाहून यशोदा मातेला वाटले की याला भूतबाधा तर झाली नाही ना!! म्हणून यशोदा मातेने नंदराजांना सांगितले. पुत्राचा नामकरण विधी करावा. सर्व प्रकारचे संस्कार करावे. 

नंदराजांनी ही गोष्ट वसुदेव राजांना कळवली. वसुदेवराजांचे पुरोहित महर्षी गर्गाचार्य मोठे निष्णात ज्योतिषी होते. ते यादव वंशाचे पुरोहित होते. त्यांना वसुदेवांनी विनंती करून गोकुळात पाठविले. ते नंदाच्या घरी आले. गर्गाचार्य आलेले पाहून नंदराजांना अतिशय आनंद झाला. 

एवढा मोठा राजपुरोहित ऋषी आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या घरी आला आपले महद् भाग्य म्हणून नंदराजांनी गर्गाचार्यांनी साष्टांग नमस्कार घातले. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीनुसार गर्गाचे यथोक्त स्वागत करून स्तुती केली. आपल्यासारख्या ज्ञानी पुरुषाचे आमच्या घरी येणे हे आमच्या परम कल्याणासाठीच आहे. 

ब्रह्मवेत्ते तुम्ही थोर दोन या बाळकांचिये ।

करावे नामसंस्कार द्विज ते गुरु अर्भका ॥

आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात; म्हणून माझ्या या दोन्ही मुलांचे नामकरणादी संस्कार आपणच करावेत.” कारण ब्राह्मण जन्मानेच मनुष्यमात्राचा गुरू असतो. गर्गाचार्य ज्योतिषविद्येचे ज्ञानी जाणते असल्याने आपल्या पुत्राचे भविष्यकथन त्यांनी करावे, अशी नंदाची साहजिकच इच्छा होती. परंतु ते नंदाचे कुलगुरू नव्हते. पण म्हणून काय झाले? ब्राह्मणा हा जन्मतःच (सर्वांचेच) गुरु असतो. त्यामुळे नंदाचेहि ते गुरुच म्हणावे लागेल. 

 गर्गाचार्य म्हणाले, “नंदराजा तुझी इच्छा खूप चांगली आहे. पण मी संपूर्ण भूतलावर यदुवंशीयांचा राज पुरोहित म्हणून प्रसिद्धीस पावलो आहे. आणि मी जर का तुझ्या पुत्राचे संस्कार केले, तर सर्व लोकांना असेच वाटेल की, हा देवकीचा पुत्र आहे, कंसाचा काळ हाच आहे. कंस दुष्ट बुद्धीचा राक्षस आहे. आणि वसुदेवाबरोबरची तुझी घनिष्ठ मैत्री सर्वश्रुत आहे. 

देवकीच्या मायावी कन्येकडून जेव्हापासून कंसाने ऐकले आहे की, त्याला मारणारा, त्याचा काळ दुसरीकडे कोठेतरी जन्मला आहे, तेव्हापासून तो बीथरला आहे. तो असाच विचार करीत आहे की, देवकीमातेच्या आठव्या गर्भापासून कन्येचा जन्म झाला नसला पाहिजे. जर मी तुझ्या पुत्राचा संस्कार केला, तर तो हे बाळक वसुदेवाचाच पुत्र समजून त्याला मारील. आणि तो आपल्याकडून मोठाच घोर अन्याय होईल.” 

नंदराजे म्हणाले “आपले म्हणणेही बरोबर आहे, आपण गुपचूपपणे या एकांत गोशाळेमध्ये स्वस्तिवाचन करून या बाळंकाचा द्विजातीला योग्य असा नामसंस्कार करावा. इतरांची गोष्टच कशाला, माझ्या लोकांनाही ही गोष्ट समजणार नाही याची मी दक्षता घेईन.” 'संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे, असे गर्गाचार्यांना वाटत होतेच. नंदराजाने जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी एकांतात बसून श्रीबलराम तसेच श्रीकृष्णचंद्राचा नामकरण संस्कार केला.

पुढील भाग रिठासूर वध वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇

रिठासूर वध 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/08-rithhasur-vadh-shreekrishnacharitram.html

महाबळाला ताडन शिक्षापण 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/06-shreekrishna-charitra-marathi.html

ब्राह्मणांना विक्राळ रूप दाखवणे 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/09-shreekrishna-charitra-09-marathi.html

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post