प्रेरणादायी बोधकथा - पापकर्मांचे भोग - preranadai bodhakatha papkarmanche - bhog

प्रेरणादायी बोधकथा - पापकर्मांचे भोग - preranadai bodhakatha papkarmanche - bhog

 प्रेरणादायी बोधकथा - पापकर्मांचे भोग 

पापाचे संचिते देहासी दंडणा - 

धर्मबंधूंनो !! दैनंदिन जीवनात आपल्याकडून अनेक पाप कर्म कळत नकळत घडतात. पण आपण त्याचे प्रायश्चित्त रोजच्या रोज करत नाहीत आणि ते पापाचे गाठोडे वाढत जाते. आणि ते याच जन्मात किंवा पुढे कोण्या तरी जन्मात भोगवले जाते. मग आपल्याला असे वाटते की आपण तर काहीच पाप केले नाही मग आपल्याला असे दुःख का प्राप्त होत आहे? परमेश्वर आपली परीक्षा का घेत आहे? परमेश्वर कोणाचीही परीक्षा घेत नाही कुणालाही दुःख देत नाही आपण जोडलेले पापांची फळच आपल्याला भोगावे लागतात हे सांगणारी ही बोधकथा- 

एक गावात महान तपस्वी तीर्थयात्रा करीत-करीत आले होते. ते तपस्वी सदा सर्वदा ईश्वर ध्यानात मग्न असत, तीर्थयात्रा करीत असताना एका खेडेगावात एका मोठ्या वाड्यासमोर  भिक्षेकरता उभे राहिले, तो वाडा एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचा होता! त्या अधिकाऱ्याच्या स्त्रीने त्या तपस्व्यास लांबूनच पाहिले व जवळ आल्यावर मोठ्या आदराने आग्रह करून आपण पंगतीचा लाभ घ्यावा असे साधूला सुचविले. 

ते तपस्वी साधु म्हणाले, माई! माझा असा नियम आहे मी कोरडी भिक्षा घेऊन स्वहस्ते शिजवलेले अन्नच मी खात असतो, तरी मला कोरडी भिक्षा वाढा माई ती स्त्री म्हणाली बुवा, माझ्या वाड्यातच मी तुम्हाला सर्व सामुग्री देते,  आपण येथेचं स्वहस्ते अन्न शिजवून जेवण करावे. तपस्व्याने ते देखील मान्य केले ! तपस्वी अत्यंत तेजस्वी होता. 

एका बाजूला एका खोलीतचं त्याने देवपूजा नित्य ध्यान-धारणा व स्वतः च्या हाताने स्वयंपाक केला. सर्वांना त्या साधूबद्दल खूप आदर वाटला, दुपारी भोजन होताच भांडीकुंडी स्वच्छ घासून उरलेला  शिधा तेल वगैरे तो सर्व मालकिणीस परत करू लागला ती स्त्री म्हणाली राहू द्यावे तुम्हास उपयोगी नाही का पडणार..?  तपस्वी म्हणाला संग्रह करायचा नाही एक वेळेस भोजन व एक दिवसच वस्ती! हे माझे नियम आहेत. उद्या पाहाटेच ब्रह्म मुहूर्तावर पुढच्या गावी मी  जाणार आहे.

पण पुढे उलटंच झालं. कसं काय..? त्या व्यक्तीच्या  निस्पृह स्वभावाचा उलटाच परिणाम झाला. रात्रीच्यावेळी तपस्वी शांत झोपला असता, त्याच्या पायावर त्या स्त्रीचा मृदू हात पडला. तपस्वी ताडकन उठून बसला! व म्हणाला “आई, तुम्ही इथे काय करताय? ती स्त्री म्हणाली महाराज माझे जीवन मला अपत्य नसल्यामुळे मातीला मिळाले आहे. माझी इच्छा पुरी करून आपण  यात्रेला गेल्यास कोणाचे कोणाला काहीही कळणार नाही. तपस्वी म्हणाला  माई प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या हातून असे अनितिचे वर्तन अजिबात  घडणार नाही” , असे म्हणून तपस्वी उठून आपल्या रस्त्याने चालू लागला. 

साधूच्या अशा वागण्याच्या बाईला खूप राग आला पूर्ण न झाल्याने तिला अपमानित झाल्यासारखे वाटले व ती बाई आरडाओरडा करु लागली, “धावा धावा याने माझा विनयभंग केला आहे हा साधू म्हणवतो आणि असली थेरे करतो” त्या  कर्कश आवाजाने वाड्याची संपूर्ण शांतता भंग पावली. सारे खडबडून जागे झाले. आणि बाईने साधूकडे बोट करून त्याला पकडण्याचा आदेश दिला, सर्वांनी मिळून साधूला कसलाही विचार न करता 

खूप बेदम मारले व पुन्हा पोलिसांच्या ताब्यातही दिले. खटला भरला व न्यायाधीशाने साधूचा हात तोडण्याची शिक्षा दिली ही केवळ दैवगती होय. पण.. साधूने मात्र आपल्या मनाची शांतता ढळू न देता आपला पूर्वीचा नित्यनैमैत्तीक कार्यक्रम सुरूचं  ठेवला, काही दिवस उलटले! एके दिवशी प्रत्यक्ष  भगवान त्याच्यापुढे प्रकट झाले थोट्या हाताने तपस्व्याने त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारली,

भगवान आपल्या दर्शनाने मी खूप खूप कृतार्थ झालो मला काहीही नको पण.. माझ्या कोणत्या अशा पाप कर्मामुळे माझ्यावर हा प्रसंग आला व माझा  हात थोटा झाला, एवढे सांगाल काय? भगवान म्हणाले तुझा उद्धार गेल्या जन्मीच व्हायचा होता पण सत्यासत्यतेचा विचार न करता तू एका कसायाला गाय पळाल्याचा मार्ग याच हाताने दाखविलास, म्हणून तो हात थोटा होण्याचे फळ तुला भोगावे लागले, संचित केव्हाही भोगूनच संपवावे लागते, तुझं प्रायश्चित्त तुला मिळाले, आता खऱ्या अर्थाने तुझा उद्धार झालेला आहे.

बंधुनो!! पापकर्मांचे भोग अशा प्रकारे भोगवले जातात. म्हणून एक अन्य संत आपल्या सांगतात, पापाचे संचिते देहासी दंडणा ।  तुज श्रीकृष्णा बोल नाही ।। म्हणून प्रत्येक जिवाने सतत शुद्ध कर्म करीत रहावे म्हणजे भविष्यात त्याला कुठल्याही दंडाला सामोरे जावे लागणार नाही. प्रायश्चित्त हे कोणलाचं चुकत नाही, चुकलेही नाही,

पण.. हल्लीच्या काळात सद्सद्बुध्दीच्या छाताडावर पाय ठेवून कर्मे केली जातात आणि पुढील माणसाला लुबाडताना माणसाला काहीच वाटत नाही. त्यामुळे संचिताचे गाठोडे वाढतच जाते. ते कमी करण्याचा एकचं मार्ग तो म्हणजे ते भोगून संपवायचे, किंवा.. नामस्मरणाने, परमार्ग सेवेने श्रीचक्रधर प्रभुकृपेने प्राप्त करून त्या पापाचा  नाश करायचा..? हे आपणच ठरवायचे. 

देवावर बोल ठेवण्यात काही अर्थ नाही. देव न्यायी असून दयाळु आहे. इतर देवता भक्तांसाठी तो न्याय आहे आणि परमेश्वराला शरण आलेल्या अनन्यपणे भजनाऱ्या भक्तासाठी तो दयाळू आहे. आपल्या भक्तांवर दया करून कृपा करून त्यांचे सगळे कर्मभोग तो परमेश्वर नासून टाकतो. म्हणून होईल तेवढा प्रयत्न करून  परमार्गाचे दास्य करावे साधुसंतांची सेवा करावी तरच आपल्याला या कर्मबंधांपासून मुक्ती मिळेल. 

दंडवत प्रणाम

आणखीही बोधकथा खालिल लिंकवर क्लिक करून वाचा 👇



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post