वासनिक धर्म प्रश्नोत्तरी -
महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता-Mahanubhavpanth-dnyansarita
वासनिक धर्म प्रश्नोत्तरी महत्वाचे ११ प्रश्न व त्यांची समर्पक उत्तरे
१) प्रश्न :- दंडवताचे अव्हेरण म्हणजे काय?
उत्तर :- दंडवताचे अव्हेरण म्हणजे बऱ्याच वेळा असे होते की समोरून कोणी साधुसंत महात्मे येताना दिसतात पण आपण दंडवत करत नाही. ही पण एक अदक्षताच आहे. बरेच वासनिक नामधारक असे दिसतात की तीर्थस्थानावर आश्रमात जातात तिथे दिसणाऱ्या साधुसंतांना दंडवत करत नाहीत. यालाच दंडवताचे असे म्हणतात.
२) प्रश्न :- दंडवताचे अव्हेरण केल्याने कोणता दोष लागतो?
उत्तर :- असे अव्हेरण केल्याने परमेश्वराला खंती येते. “माझ्या भक्ताला हा दंडवत करत नाहीत” म्हणून परमेश्वर उदास होतात. पुढे आपला प्रसव वाढत जाऊन साक्षात परमेश्वर समोर आला तरी आपल्याला दंडवत करण्याचा भाव उत्पन्न होत नाही. लीळाचरित्रात आपण सर्वांनी वाचलेच असेल. बऱ्याच लीळांमध्ये असे वर्णन येते की अमक्याला देवाने दर्शन दिले पण त्याने देवाकडे पाहिले नाही की नमस्कार केला नाही.
पैठणला देव विहरणाला जात असत, रस्त्यातील प्रत्येक मनुष्याला देवाचे दर्शन होत होते. पण काही सुसंस्कारीच लोक देवाला नमस्कार करीत होते. तात्पर्य :- देवाला पाहून त्या नमस्कार करणाऱ्या लोकांनी मागील जन्मी परमेश्वर भक्तांना साधुसंतांना दंडवत प्रणाम नमस्कार केला होता. म्हणूनच आता देवाला पाहिल्यावर देवाला नमस्कार करावा दंडवत करावा अशी बुद्धी त्यांना उत्पन्न झाली. आणि ज्यांना देवाला नमस्कार करण्याची बुद्धी उत्पन्न झाली नाही त्यांनी साधुसंतांशी दंडवताचे अव्हेरण केले होते. म्हणून आता देव दिसल्यावरही नमस्कार करावा अशी बुद्धी उत्पन्न झाली नाही.
३) प्रश्न :- नेहमी कशाचे चिंतन करावे?
उत्तर :- ब्रम्हविद्येचे नेहमी, सदैव अध्ययन, चिंतन मनन करावं. सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. संकटप्रसंगी ही नामस्मरण विसरू नये.
४) प्रश्न :- मनुष्याचे वर्तन कशाधार असावे?
उत्तर :- ब्रम्हविद्येत सांगितलेला वासनिक धर्म, चतुर्विध साधनाविषयी भावधरणे इत्यादि वासनिकाचे विधी, नित्यक नैमित्तिक प्रायश्चित्तादि विधीनुसार आचरण करावे. संसारिक कर्मे करत असतानाही सतत नामस्मरण करावे.
५) प्रश्न :- परमेश्वरभक्तासाठी आवश्यक आचरण ते कोणते?
उत्तर :- सन्निधानात ज्ञानपूर्वक, भक्तीभावाने निर्हेतूक बुद्धीने परमेश्वराची, भगवंताची पूजा, आराधना करावी. असन्निधानी स्थानाची, प्रसादाची, भिक्षु महात्मे, अधिकरणाच्या ठिकाणी भजन पूजन करावे.
६) प्रश्न :- परमेश्वर भक्त नामधारकाने, वासनिकाने घरी असताना कसे वर्तन करावे?
उत्तर :- काम्यकर्मातून.. सकामकर्मातून मन काढून घ्यावं.. त्यात वासनाबुद्धि ठेवू नये. प्रत्येक क्रिया श्रीकृष्णार्पण बुद्धीने निर्हेतुकपणे करावी. परमार्गी भजन पूजन करत असताना नव हेतू पैकी कोणताही हेतू नसावा. “हे देवाचे भक्त आहेत, यांच्या ठिकाणी भजन क्रिया करणे माझे कर्तव्य आहे. देवाने सांगितले आहे म्हणून मी हे केले पाहिजे” अशा बुद्धीने भजन पूजन करावे.
७) प्रश्न :- कर्मरहाटीत असताना नामधारकाने वासनिकाने संसार करत असताना कसे वर्तन करावे?
उत्तर :- संसारिक कर्मे करत असताना पाप कर्मांचा ओघ थांबवावा. पोट भरण्यासाठी हिंसक कर्मे करू नये. शक्यतोवर अहिंसक व्यवसाय करावा. व्यवसायात कुणाचीही मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि इतके दक्षता घेऊनही तसेच झालेच तर देवाजवळ नित्य देणे प्रायश्चित्त करावे व रोजच्या रोज स्वतःची शुद्धि करत राहावी.
८) प्रश्न :- वासनिकांच्या मनात सतत कोणता विचार असावा?
उत्तर :- ऐहिक सांसारिक सुखांमधील दोषांचं चिंतन करावं, त्यांचं अनुसंधान चित्तात ठेवून रहावं, आपल्याला सर्व एक दिवस सोडून परमेश्वराला अनन्य भावे अनुसरायचं आहे याची सतत आठवण ठेवावी. हा संसार दुःखरूप आहे. संसारात सुखापेक्षा दुःखच अधिक आहे. असं संसारातले दोष सतत पहात रहावे संसारिक सुखात मन रमू देऊ नये.
९) प्रश्न :- संसारिक वासनीकाने कोणता निश्चय करावा?
उत्तर:- आत्म्याच्या ज्ञानासंबंधी आत्मज्ञानप्राप्तीविषयी निश्चय करावा. ब्रह्मविद्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही मार्गात जाऊन ज्ञानीजणांकडून अभ्यासक्रम घ्यावा. प्रश्न विचारावेत आणि ब्रह्मविद्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. जाणून घेतलेल्या ब्रह्मविद्येप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा.
१०) प्रश्न :- ज्याला अनुसरण घेण्याची वासना आहे त्याने कोणते पथ्य पाळावे?
उत्तर :- वासनिकाने नामधारकाने राजकारणात पडू नये. राजकारणात अनेकांची मने दुखावली जातात व त्यामुळेच सर्वाभुती परमेश्वर उदास होतो. आणि नरकही निष्पन्न होतात. पुढे आपल्याला अनुसरण घडत नाही. आपल्या उपदेशी धर्मबंधूंविषयी वैतुष्ट येते. म्हणून राजकारणापासून लांब राहावे.
११) प्रश्न :- वासनिकाने गृहत्याग कसा करावा?
उत्तर :- कोणताही गाजावाजा न करता जाहिरातबाजी न करता निमूटपणे आपल्या घरातून बाहेर पडावं. व नंतर स्वगृहाबद्दल अनासक्त, विरक्त असावं / रहावं! संबंधीयांच्या सुखदुःखात आपण सुखदुखी होऊ नये याची दक्षता घ्यावी दुरूनही नातेवाईकांची आठवण करू नये. देवाला गाजा वाजा करून संन्यास घेतलेला मान्य नाही. देवानेही भरवस कोणालाही न सांगता त्याजले. आजकाल पंथात कुप्रथा पडलेली आहे संन्यास दीक्षेचा मोठा कार्यक्रम ठेवून संन्यास दिला जातो. पत्रिका छापल्या जातात. अमाप पैसा खर्च केला जातो. ज्यांना संन्यास घ्यायचा असतो त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे मागितले जातात. ही कुप्रथा आहे. पुर्विच्या काळात पंथात असल्या कुप्रथा नव्हत्या. म्हणून गाजावाजा न करताच संन्यास घेणे देवाला मान्य आहे.
आजही एका सर्वात मोठ्या आश्रमात गाजावाजा न करता, पत्रिका न छापता शांततेत स्मरण करून श्रीमद्भगवद्गीतेच्या १२व्या अध्यायात भक्त लक्षणे सांगितली आहेत म्हणून श्रीमद्भगवद्गीतेचा १२ वा अध्यायाचे पारायण करून ईश्वर आज्ञेप्रमाणे दिक्षार्थीकडून प्रायश्चित्त करवून संन्यास दिला जातो. तो खरा संन्यास होए. गाजावाजा बॅंड लावून, मिरवणूक करून, हळद लावून घेतलेला संन्यास किर्तीत प्रसिद्धीत मोडतो. ही कुप्रथा आहे, असला संन्यास देव किती स्वीकारात घेत असतील, ते देवच जाणे!
यात सांगितलेल्या गोष्टी सामान्यजनांना, सांसारिकांना सुद्धा दुःखविरहित सुखपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी निर्विवाद उपयुक्त आहेत. या सर्वच्या सर्व गोष्टी तंतोतंत पाळणं एकवेळ जमलं नाही तरी त्यातील अधिकाधिकांचा अधिकाधिक प्रमाणात आचरणात समावेश करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही जीवाला चीर शांति समाधान मिळवून देईल.
अजून लेख वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇
Click here 👉 हे ७ गुण स्त्रीयांचे सात अलंकार आहेत
चार प्रकारचे नमस्कार आणि साष्टांग दंडवताचे महत्व