हे ७ गुण स्त्रीयांचे सात अलंकार आहेत
१. कीर्ति :- पहिला गुण आहे कीर्ती. कीर्ती गुण असलेली स्त्री सदाचारीने असते. कीर्ती म्हणजे त्या स्त्रीवर आसपासच्या लोकांचा शेजाऱ्या पाजाऱ्यांचा अत्यंत विश्वास असतो. आसपासच्या लोकांना हा विश्वास असतो की, ही स्त्री आपल्याला कधीही फसवणार नाही. अशा स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर लोक डोळे झाकून विश्वास करतात. जी स्त्री कधीही खोटे बोलत नाही अशा स्त्रीच्या हृदयात देवाचा वास असतो.
२. श्री :- श्री म्हणजे शीलवान चारित्र्यवान. स्त्रियांच्या ठिकाणी असलेली पवित्रता प्रत्येक कार्यात यशस्वी बनवते ज्या स्त्रीचे जीवन संयमी आहे सत्शील आहे, शरीराने मनाने जी स्त्री पतिव्रता आहे, अशा स्त्रीची महती पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे. स्त्रीयांचे आणि पुरुषांचे व्यक्तिमत्व चारित्र्याने घडते. उत्तम चारित्र्य असलेली व्यक्ती लवकरच मान्यता प्राप्त करते.
बाह्यतः एखादी व्यक्ती सुंदर असेल, कुशल गायक असेल, उत्तम कवी असेल, तेजस्वी असेल आणि फॅशनेबल महागडे कपडे परिधान करेल, परंतु जर तो चारित्र्यवान नसेल तर त्याला समाजात मानाचे स्थान मिळू शकत नाही. कधीच मिळत नाही. त्याचा सर्वत्र अपमान व अनादरच होतो. लोक त्याच्या तोंडासमोरच फक्त त्याच्याशी चांगले वर्तन करतात. काहींना तर तोंडावरच अपमानित व्हावे लागते. चारित्र्यहीन व्यक्ती आत्म-समाधान आणि आत्म-आनंदापासून वंचित असते. त्यामुळे स्त्रीयांचे चारित्र्य शुद्ध असले पाहिजे.
३. मधुर वाणी- मधुर गोड बोलणे. स्वतःला सुखावेल आणि इतरांनाही ऐकताना सुख वाटेल असे गोड बोलणे. मधुर वाणी हा तिसरा गुण आहे. स्त्रियांच्या ठिकाणी मधुर वाणी हा गुण असलाच पाहिजे. स्त्रियांनी कमी बोलावे पण खरे बोलावे प्रिय बोलावे, संक्षिप्त बोलावे, चांगले बोलावे, बोलताना संयम पाळावा, पुरुषाचा अहंकार दुखावला जाणार नाही, त्याचा इगो हर्ट होणार नाही असे बोलावे. आणि इतरांना हितकारक ठरेल असे वक्तव्य करावे. अशी मधुर वाणी बोलणारी स्त्री समाजात मान्यता प्राप्त करून घेते. सर्व लोक तिचा आदर करतात.
आपली वाणी कशी असावी यावर एक हिंदी कवीचा दोहा आहे - ऐसी वाणी बोलिये, मन का आपा खोय। औरन को शीतल करे, आपहुँ शीतल होय ।। बोलणे असे असावे की पुढील आला ऐकताना सुख वाटेल आणि तो आपल्या बोलण्यात हरवून जाईल पुढीलचे दुःखिस्त अंतकरण शांत होईल. आणि पुढीलाचे दुःख निवारण्यात आपण यशस्वी झालो म्हणून आपल्यालाही समाधान वाटेल म्हणून गोड बोलावे.
४. स्मृती :- स्त्रीचे व्यक्तीत्व विकासण्यासाठी स्मृती म्हणजे प्रत्येक गोष्टीची आठवण असणे हा गुण अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहतो की बऱ्याच स्त्रिया घरातील काम करता करता विसरून जातात. पण स्मृती हा गुण असलेली स्त्री घरातील सदस्यांशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट आठवण ठेवते. आणि सर्वांची काळजी घेते त्यामुळे ती सगळ्यांची आवडती बनते.
५. मेधा :- मेधा म्हणजे निर्णय क्षमता कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच मेधा हा गुण होय. ज्या स्त्रियांच्या ठिकाणी मेधा अर्थात निर्णय क्षमता असते त्या स्त्रिया समाजात मान्यता प्राप्त करतात. जसं द्रौपदीने पांडवांसोबत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. सीता देवीने रामासोबत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. असे असंख्य उदाहरण इतिहासात डोकावल्यावर आपल्याला आढळतील.
६. धैर्य :- म्हणजेच इंद्रियांवर नियंत्रण, ताबा ठेवण्याची शक्ती. असं नाही की, काही पाहिले, की लगेच विकत घेतले, पदार्थ मस्त दिसतोय, म्हणून खाल्ला. नाकाला छान वाटते म्हणून लगेच परफ्यूमचा वास घेतला. .' असं पंच ज्ञानेंद्रियांच्या पंच विषयांविषयी संयम याला धैर्य असे म्हणावे. ज्या स्त्रीच्या ठिकाणी धैर्य हा गुण असतो ती स्त्री लहान लहान गोष्टी मुळे अत्यंत उत्साहीत होत नाही. एखादी गोष्ट मिळाली तर उतावीळ होत नाही. धैर्य हा गुण जसा तसा द्रोपदीच्या ठिकाणी होता. ज्या स्त्रियांच्या ठिकाणी धैर्य असते त्यांची कीर्ती पुराणात गायली जाते.
७. क्षमा :- क्षमा स्त्रीची सुंदरता आहे, स्त्री हृदयाची सुंदरता आहे. एखाद्या अपराध्याला शिक्षा देण्याची क्षमता असूनही त्याचे भले व्हावे म्हणून क्षमा करणे हा परमेश्वराच्या ठिकाणी असलेला गुण ज्या स्त्रीच्या ठिकाणी असतो ती स्त्री घराला नंदनवन बनवून टाकते. सासू कडून एखादी चूक झाली नवऱ्याकडून एखादी चूक झाली ननदकडून चूक झाली.
शेजाऱ्या पाजाऱ्याकडून चूक झाली तर क्षमा गुण असणारी स्त्री नातेवाईकांच्या चुका दुसऱ्याजवळ सांगत नाही आणि त्यांना चूक सुधारण्याची संधी देते व मोठ्या मनाने क्षमा करते कोणाचेही मन दुखवत नाही. पुढील व्यक्तीचे दोष आठवून आठवून त्याला टोमणे मारून इतरांना दुःखी न करणे याला म्हणावे क्षमा. क्षमा हा गुण स्त्रीच्या सौंदर्याला अधिक खुलवतो.
अश्वत्थामाने द्रौपदीच्या मुलांचा वध केला. भीमानें आणि अर्जुनाने त्याला पकडले आणि आणले आणि द्रोपदीला म्हणाले: "आता हा अश्वत्थामा अपराधी तुझ्यासमोर आहे तू याचे वाटेल तेवढे वाईट करू शकते.” तेव्हा द्रोपदी म्हणाली “नाही मी असे काहीही करणार नाही. याचा डोक्यावरील मनी काढून याला सोडून द्या. माझी मुले मेल्यामुळे मला जे दुःख झाले आहे तेच दुःख हा मेल्यावर याच्या आईला होणार आहे” असे म्हणून तिने अश्वत्थाम्याला क्षमा करून जीवदान दिले. द्रौपदीच्या ठिकाणी क्षमा हा गुण होता.
हे सात हे गुण भाग्यवान स्त्रीच्या ठिकाणी उपजतच असतात आणि इतर स्त्रियांच्या ठिकाणी नामस्मरणामुळे येतात. सतत भगवंतांचे नामस्मरण केल्यामुळे भगवंतांच्या ठिकाणी असलेले अनंत गुणांपैकीचे हे सात गुण मनुष्याच्या ठिकाणी येतात. तो मनुष्य समाजात मान्यता प्राप्त करतो समाजाचे भले करतो लोकांचे भले करतो. त्याच्या चांगल्या वर्तनामुळे सर्वत्र सुखमय वातावरण होऊन जाते. तो जिथे जातो तिथे आनंद फुलवतो.
जी स्त्री सकाळी उठून आंघोळ करून खऱ्या मनाने भक्ती भावाने देवाची पूजा करते, तिचा नवरा नक्कीच श्रीमंत होतो. सर्व काम वेळेवर पूर्ण करणाऱ्या अशा स्त्रीवर लक्ष्मी अधिक प्रसन्न असते आणि अशा स्त्रियांचा पती कधीही गरीब नसतो. जी स्त्री दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाताने जाऊ देत नाही अशा स्त्रीच्या घरी दारिद्र्य कधीही येत नाही.
स्त्रियांच्या ठिकाणी अनेक चांगले गुण आहेत. विद्वानांनी आपापल्या परीने त्या गुणांचे वर्गीकरण केलेले आहे. आणखीही काही गुण स्त्रीच्या ठिकाणी असलेले-
१. स्त्रीचा पहिला गुण म्हणजे पतिव्रता धर्मावर दृढ असणे. पतीशी प्रामाणिक असणे पतीचा विश्वासघात न करणे.
२. समाजाच्या किंवा कुटुंबाच्या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धैर्य असणे.
३. वाईट गोष्टींपासून, वाईट सवयींपासून दूर राहणे. आजकाल स्त्रिया मद्यपान करतात सदाचारी स्त्री कधीही अशा अनितीरूप गोष्टींना स्पर्श देखील करत नाही.
४. इतरांमधले चांगले गुण अंगीकारणे आणि वाईट गुणांचा त्याग करणे.
५. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण न करणे आणि घरातील मंडळींच्या लहान लहान चुकांकडे दुर्लक्ष करणे.
६. लोक काहीही म्हणत असले तरी आपले काम प्रामाणिकपणे करणे.
७. संयुक्त, एकत्र कुटुंबात आपल्या आई-वडिलांप्रमाणे सासू-सासऱ्यांची सेवा करणे.
८. स्त्रीने तिच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीनुसार खर्च करावा. वायफळ खर्च करून कुटुंबाला आर्थिक संकटात न टाकणारी स्त्री कुटुंबासाठी जणूकाही लक्ष्मीच असते.
९. दिर भावजय आणि नणंद यांच्याशी समान वर्तन करणे. एकत्र कुटुंबात सर्वांशी आदराने वागणे, कोणाशीही भेदभाव न करणे.
१०. कुटुंबातील सर्व मुलांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेणे.
११. जर पती कधीही संकटात सापडला तर पत्नी/स्त्रीने त्यांना न डगमगता मदत करणे हा परम धर्म आहे.
१२. स्त्रीने आपल्या घराचे रहस्य इतर कोणत्याही स्त्रीला सांगू नये.
"अशा प्रकारे स्त्री गुणांचा सागर आहे."