आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 30 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 30 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 30

विद्युच्चलं किं? धनयौवनायुः!

दानं परं किं च? सुपात्रदत्तम् !

कण्ठं गतैरप्यसुभिर्न कार्यं किं?

किं विधेयं मलिनं कृष्णार्चा!

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..३०

अर्थ..

प्रश्न :- विजेप्रमाणे चंचल, चपळ, क्षणिक असं काय आहे? उत्तर :- पैसा, तारुण्य व आयुष्य!

प्रश्न :- सर्वश्रेष्ठ दान कोणतं? उत्तर :- सत्पात्री केलेलं!

प्रश्न :- प्राण कंठाशी आले तरी काय करू नये? उत्तर :- मलिन, पापयुक्त काम!

प्रश्न :- प्राण कंठाशी आले तर करावंच असं काय आहे? उत्तर :- श्रीकृष्ण भगवंतांची उपासना!

चिंतन..

संस्थेच्या जीवनात भविष्यकाळासाठी काही नियोजन करणं शक्य असतं.. योग्यही असतं. कारण स्थापन झाल्या झाल्या कुठलीही संस्था लगेच विसर्जित होत नाही... जर तिची ध्येयधोरणं समाजहिताची असतील, समाजजीवन सुरळित, सुविहित पद्धतीनं चालावं, तळागाळातल्या लोकांची सर्व तऱ्हेनं उन्नति व्हावी अशा तऱ्हेनं कार्यप्रणाली.. घटना.. नियम बांधले गेले असतील व संस्थापक सदस्य निःस्वार्थी, प्रामाणिक, उत्साही, निरलस व कुशल संघटक, प्रसंगी पदरमोड करून काम करणारे असतील तर!

अशा वेळी पुढच्या पाच पंचवीस पन्नास वर्षाच्या कार्याचं, आर्थिक तरतुदीचं, संभाव्य धोक्यांना.. संकटांना सामोर जाण्यासाठीच्या उपाययोजनांचं नियोजन करणं शक्य असतं! पण व्यक्तीच्या जीवनाबद्दल असा कोणताही भरंवसा धरता येत नाही! आयुः क्षणलवमात्रम् असल्यानं पुढच्या क्षणाचीही निश्चिति देता येत नसल्यानं..

जीवनाचं सार्थक, कल्याण जे काही करायचं ते हाती असलेल्या वर्तमान क्षणीच करायला हवं असं सर्व संतसत्पुरुष सांगत असतात.. यह संसार ओसका पानी पलखनमें ढल जाए असं सूरदासही सांगतात. क्षणोक्षणी हाचि करावा विचार असं सांगून संत तुकाराम बजावतात की, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान! देह हे काळाचे(खाद्य) असंही आणखी एका ठिकाणी ते सांगतात! नका करू नाश आयुष्याचा असंही ते विनवतात!  संत रामदासांनीही सावधान सावधान म्हणत आयुष्याचा दहा दहा वर्षांचा हिशेब मांडत ते कसं फुकट चाललंय याचं वास्तव दर्शन घडवतात!

को विश्वासः पुनः श्वासः आगमिष्यति वा न वा? असाही एका सुभाषितात इषारा दिला गेलाय! अनादि, अनंत काळाच्या प्रवाहात आपल्या देहाचं आयुष्य शे - दीडशे वर्षे जरी गृहीत धरलं तरी ते क्षणांशच भरेल.. फार तर एका क्षणाचं भरेल! वीज जशी आकाशात क्षणात उजळून नष्ट होते तसं.. किंवा वाऱ्याच्या मंद झुळुकीनंसुद्धा अळवावरचा.. कमलपत्रावरचा मौक्तिकासारखा चमकदार दिसणारा जलबिंदू जसा क्षणात मातीमोल होऊन जातो...  तसं आपलं आयुष्य कुठल्या क्षणी काळाच्या आधीन होऊन जाईल सांगता येत नाही!

अशा क्षणभंगुर आयुष्याचं एकमेव सार्थक म्हणजे भरपूर धनसंपत्ति गोळा करणं.. येन केन प्रकारेण श्रीमंत होणं.. धनवान होणं असं बऱ्याच जणांना वाटतं! तसं त्यांचं स्वप्नही असतं!.. प्रसंगी चार मुंड्या पिरगाळून दोन इमारती सुद्धा उभाराव्यात, उसमें क्या है! असं कानिटकरांच्या "अश्रूंची झाली फुले" मधला लाल्या त्याच्या मामाचा हवाला देऊन प्राध्यापक विद्यानंदला विचारत त्या वृत्तीचं समर्थन करतो.. सामान्य जनांच्या वृत्तीचं प्रतिनिधित्व करीत! पण यांच्या लक्षात येत नाही की कोणतीही संपत्ति,धन जादूची कांडी फिरवल्या प्रमाणे एखाद्या क्षणात फुकटां फाकट गोळा करता येत नाही व विनाश्रम तर मुळीच नाही! आयुष्यातलं सर्व तारुण्य खर्ची घालावं लागतं! लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी धमक दाखवत सततोद्योगी रहावं लागतं..

उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.. हे लक्षात घेऊन! क्षणाक्षणानं तारुण्य या धनसंपत्तीच्या नादानं खर्च होत जातं.. तारुण्यातली रग स्वस्थ बसू देत नाही.. कणाकणानं देहाची हानि होत जाते व  मिळालेल्या, मिळवलेल्या धनालाही अनेक मार्गांनी फाटे फुटत जातात! धन मिळालं तरी त्याद्वारे घेतलेले अनिर्बंध भोग शरीराची हानि करतातच! भोगे रोगभयं या न्यायानं यौवन अकालीही संपुष्टात येऊ शकतं! योग्य मार्गानं मिळवलेल्या धनालाही सरकारी कर, चोरी दरोडे आप्तांच्या मागण्या  इत्यादी मुळे वाळवी लागते.. साठवलेला पैसा सरकारी धोरणांना बळी पडून क्षणात मातीमोल, कचरामोल ठरतो.

अन्यायोपार्जितं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति ।

प्राप्ते एकादशे वर्षे समूलं च विनश्यति ।।

या न्यायानं अन्यायानं मिळवलेलें, अपहृत धन जसं येतं तसंच जातं! एकंदरीत धन, यौवन आणि आयुष्य क्षणजीवीच ठरतं! पण तेच धन गरजू प्रामाणिक सत्पात्र व्यक्तींना, संस्थांना दिलं तर वाढूही शकतं व देणार्याला यशकीर्ति व अमरत्व देऊ शकतं! कुपात्री दिली जाणारी कोणतीच गोष्ट यशदायी ठरू शकत नाही! विद्यादान, द्रव्यदान वा कलादानही घेणाऱ्याची परीक्षा घेऊनच करावं अन्यथा त्याचा दुरुपयोग  होऊन समाजकंटकांकडून विघातक, राष्ट्रद्रोही कारवाया केल्या जाऊ शकतात!

अथर्वशीर्षं अशिष्याय न देयम् अशी श्रुतींची आज्ञाच आहे... भगवद्गीता भागवतही असाच उपदेश करतात! भुकेलेल्याला अन्न दिलं तर ते योग्य ठरेल पण आधीच पोट तुडुंब भरलेल्या माणसाला अन्न पुरवलं तर अन्नाची नासाडीच होणार! तीच गोष्ट पाणी वस्त्र निवारा यांच्या दानालाही लागू पडते! सत्पात्री दान हे पुण्यकर्म व कुपात्री दान हे पापकर्म हे लक्षात घेऊनच क्षणजीवी धनसंचयाचा विनियोग..

तारुण्याचा उपयोग व आयुष्याचं सार्थक करावं अशी शहाण्या सुजाण लोकांकडून अपेक्षा आहे! प्राण कंठाशी आले असता.. समोर मृत्यु दिसत असता कदापि काय करू नये व अवश्यमेव असं एकच एक काय करावं  तर सोप्या शब्दात शंकराचार्य सांगतात.. मलिन.. पापी.. दूषित चित्तानं काहीच करू नये उलट श्रीकृष्ण भगवंतांचं अर्चन वंदन पूजन करावं! अन्ते मतिः सा गतिः या न्यायानं पापात्मक चित्तानं कर्म केल्यास दुर्गति व भक्तिप्रेमयुक्त अंतःकरणानं सत्कर्म, स्वकर्तव्य,भगवत्स्मरण, भगवन्नामस्मरण केलं तर सद्गति, मुक्ति निश्चित मिळेल!

अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् ।

यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ।।

या गीतेतील भगवद्वचनाचा अर्थ हाच आहे! पण अंतकाळीसुद्धा जर चित्त अनेक विषयांनी विभ्रांत होऊन मोहजालात गुरफटलेलं असेल  व विविध कामांमधे आसक्त असेल  तर अशा मलिन चित्तातून पापकर्मच घडेल व मनुष्यजीव नरकात खितपत पडेल.. जन्मोजन्मी पापयोनींमधे पडून अधमाधम गतीला प्राप्त होतील असंही भगवान सोळाव्या अध्यायात अर्जुनाला सांगतात!

आचार्यांना जीवनाचं खरं सार्थक सत्पात्री दानात व अंतकाळी.. अंत्यक्षणीच्या शिवार्चनात, भगवत्स्मरणात वाटत असून धन यौवन   एकंदरीतच आयुष्य.. जीवन यांची क्षणभंगुरता लक्षात घेऊन लोकांनी सावध रहावं...  जन्ममरणशृंखलेतून मुक्त होऊन चिरंतन अशा सच्चिदानंदस्वरूप परब्रह्मात विलीन व्हावं असा त्यांचा उपदेश आहे!

श्री. श्रीपादजी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post