आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 29 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 29 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

हेही वाचा 👇

कलियुगाचे गुण दोष वर्णन - कलियुगात मनुष्यांचे विहरण वर्तन कसे असते? इतर युगांपेक्षा कलियुग हिन काबरं आहे? आणि इतर युगांपेक्षा कलियुगाचे वैशिष्ट्य काय?

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 29

पशोः को? न करोति धर्मं।

प्राधीत शास्त्रोऽपि न चात्मबोधः।

किं तत् विषं भाति सुधोपमं? स्त्री ।

के शत्रवो मित्रवत् ? आत्मजाद्याः ।।२९।।

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..२९

अर्थ..

प्रश्न :- पशूंमधला अधिक पशु कोण. सर्वाधिक पशुत्व कोणामधे असते?

उत्तर :- धर्माचरण न करणारा. कर्तव्य कर्मं न करणारा. तसंच सर्व शास्त्रांचं व्यवस्थित अध्ययन करूनही. परब्रह्माचं परोक्ष ज्ञान होऊन सुद्धा अपरोक्ष ब्रह्मज्ञान ज्याला झालं नाही तो. त्याच्यात!. धर्मपालन न करता केवळ उदरं भरणासाठी जगणारा तो. त्याच्यात!

प्रश्न :- वास्तवात विष असून अमृतासारखं काय वाटतं? उत्तर :- स्त्री! आणि स्त्रीची संगत

प्रश्न :- मित्रासारखा वाटणारा पण प्रत्यक्षात शत्रु असणारा कोण? उत्तर:- पुत्रकन्यादि आत्मज, आप्तबंधु इत्यादि!

चिंतन :- माणूस व पशू यांमधला फरक अनेक प्रकारे स्पष्ट करता येतो..

बुद्ध्या विहीनाः पशुभिः समानाः । धर्मेण हीनाः पशुभिः समानाः।

माणूस हसू शकतो, पशु नाही इत्यादि. पण माणसातला पशू ओळखायचा झाला तर साधी कसोटी आहे.  जो आहार, निद्रा, भय व मैथुन या चारही बाबतीत माणुसकी सोडून वागतो.  इतकंच नव्हे तर पशूंनाही लाज आणील असं वागतो तो! नैसर्गिक/मूलभूत प्रेरणांच्याही पलिकडे जाऊन  विकृत मनानं. या चारही बाबतीतले सर्व भोग इतरांचा विचार न करता ओरबाडून घेतो तो! तोच खरा माणसातला पशू! तोच खरा पशुवृत्तीचा माणूस!

    माणूस या शब्दात स्त्री आणि पुरुष या दोघांचा समावेश होत असल्यानं माणसातल्या पशुत्वाचं मोजमाप करताना स्त्रीचा तसाच पुरुषाचाही विचार केला गेला पाहिजे! त्या दोघांना ही लक्षणं लागू ठरतात! पशूंनासुद्धा आपल्या जगण्यासाठी काही तरी कर्म करावं लागतं. प्रयत्न करावे लागतात!वाघ सिंहांनासुद्धा भक्ष्य मिळवताना बरीच उरस्फोड करावी लागते.  सावजाचा पाठलाग करावा लागतो. काही वेळा सावजाचा नादही सोडून द्यावा लागतो!

    कुणालाही सहजासहजी अन्न मिळत नाही. तीच बाब निद्राभयादींची! पण माणूस मात्र बसल्या जागी आपल्याला सर्व भोग हवे तेव्हा. हवे तसे.  हवे तितके मिळावेत अशी अपेक्षा करतो.. आळसात सर्व काळ घालवतो. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांमधे रमून आयुष्य फुकट घालवतो. तो माणसाच्या आकारातला पशूच असतो! खोट्या. अवास्तव सुखकल्पना उराशी बाळगत. मिळालेल्या किंवा स्वबुद्धीनं नव्यानं बांधलेल्या सर्व नात्यांमधून येणाऱ्या कर्तव्यकर्मांना टाळत. सर्व काही देवानं वा सरकारनं करावं अशी अपेक्षा ठेवणाराही मनुष्याच्या आकारातला पशूच होय!

    ईश्वरास्तित्व माना. न माना, धर्माधर्माचा विचार करा. न करा.. पण आजच्या काळात लोकशाही राज्यपद्धतीत नागरिक म्हणून मिळालेली विचार, उच्चार, अभिव्यक्ति, मत इत्यादि सप्त स्वातंत्र्ये उपभोगताना आपल्या सारखीच ती इतरांनाही उपलब्ध आहेत आणि इतरांनाही त्यांच्या उपभोगाचा अधिकार आहे हे लक्षात न घेता.  बेजबाबदारपणे ती स्वातंत्र्ये उपभोगणं. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं किंवा ती संकोचित, मर्यादित करणं हेही पशुत्वच आहे!

    वस्तुतः ईश्वरानुभूति मिळवण्यासाठी आवश्यक असा आचारसमूह म्हणजे धर्म त्या आचारसमूहात ऐहिक जीवनासाठी आवश्यक अशा कर्तव्यकर्मांची व्यक्तिजीवन व समाजजीवन या दोहोंच्या दृष्टीनं केलेली व्यवस्था जशी अंतर्भूत आहे तशीच पारलौकिक कल्याणासाठीची उपासना,भक्ति इत्यादीही अंतर्भूत आहे! धर्म हा प्रवृत्तिलक्षण व निवृत्तिलक्षण असा उभयविध आहे. ईश्वरानुभूतीचा अधिकार यच्चयावत सर्व स्त्रीपुरुषांना उपलब्ध आहे.. जर त्यांनी त्यासाठी आवश्यक ती पात्रता मिळवली तर! त्यासाठी आवश्यक ते धर्माचरण केलं तर!

    पण नुसतं शब्दगत धर्मशास्त्र वाचून. ते कोळून पिऊन. तदनुकूल आचार न ठेवता. मोक्षमुक्ति मिळत नाही, परब्रह्माचं ज्ञान होत नाही! पण तशी अपेक्षा ठेवणाराही सर्वात मोठा पशूच की! पुस्तकी पांडित्यातून कधीही ब्रह्मज्ञान होत नाही व जो पर्यंत ब्रह्मानुभूति होत नाही तो पर्यंत दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. अशीच स्थिति त्या वाचाळ पंडिताची होते.

    परब्रह्माचा रोकडा अनुभव न मिळता . अपरोक्षानुभूति न मिळताच दुसऱ्यांना नुसते उपदेशाचे घोट पाजणारा व  स्वतःच्या आचाराकडे दुर्लक्ष करणारा किंवा विरुद्ध आचरण करणाराही मानवी देहात प्रकटलेला पशूच म्हणायला हवा! कारण आत्मज्ञान झालेला माणूस स्वमुखानं तसं सांगत सुटत नाही. तर त्याच्या वागण्याबोलण्यातून, दृष्टीतून, दैनंदिन आचरणातून ते सहज प्रकट होतं व लोकांना आपसूकच ते कळतं! पण ते ब्रह्मज्ञान. ती भगवत्प्राप्ति सहज घडणारी गोष्ट नव्हे!

    पूर्वकर्मांचा क्रियमाणकर्मशून्य उपभोग. उपलब्ध जीवनात वाट्याला आलेल्या परिस्थितीचा, उपभोगांचा सहजस्वीकार आणि हे चालू असतानाच भगवंताची अखंड अविरत नितात भक्ति करणं.. त्याच्यावर स्वतःवरच्या प्रेमाहून अधिक प्रेम करणं. अनासक्तरीतीनं कर्तव्यकर्म करणं व सर्व प्रकारच्या लोभमोहापासून दूर राहणं या सर्वांची एकत्रित फलश्रुति म्हणजे भगवत्प्राप्ति! ज्ञानमार्ग असो वा योगमार्ग असो वा भक्तिमार्ग असो तिथे लौकिकातून विरक्ति हा अत्यावश्यक, अपरिहार्य व अनिवार्य घटक आहे.

हेही वाचा 👇

कलियुगाचे गुण दोष वर्णन - कलियुगात मनुष्यांचे विहरण वर्तन कसे असते? इतर युगांपेक्षा कलियुग हिन काबरं आहे? आणि इतर युगांपेक्षा कलियुगाचे वैशिष्ट्य काय?

    विरक्ति याचा अर्थ हताशा, निराशा, अपयश, वैताग इत्यादींमुळे संसारातून, स्वकर्तव्यापासून पळ काढणे असा नसून किंवा नुसतंच भगवीवस्त्रं परिधान करणं व अंगाला राख. भस्म फासणं. असा नसून कोणत्याही विषयात न रमणं व आशरीरधारणावधि या नारदीय भक्तिसूत्राप्रमाणे किमान आवश्यक तेवढंच देहाला पुरवून सर्व उपासना, भक्ति, ज्ञान, योग इत्यादींसाठी नितांत गरजेचा असलेला देह टिकवणं इतकाच आहे!

    जिथं हवंनकोपण संपलं, असलं तर असू दे व नसलं तर नसू दे ही वृत्ति पूर्णतः स्थिरावली ती खरी विरक्ति. अशातूनच पुढील मार्ग आक्रमिता येतो! पण अशा स्थितीतच एक मोठा धोका. विषतुल्य आपत्ति संभवते! ती म्हणजे चित्तात नकळत शिरणारा स्त्रीसंगाचा मोह! आपण अनुसरत असलेल्या ज्ञान भक्ति उपासना या मार्गामुळे. त्यात मिळत असलेल्या अल्पशा का होईना प्रगतीमुळे.

    एखादी स्त्री भाळून निकटच्या सहवासात येते व तिच्या मोहामुळे. किंवा आपल्या साधनेमुळे ती आकर्षित झाली या अहंकारामुळे.  मनुष्य पथभ्रष्ट होतो. अशावेळी ती स्त्री विषतुल्यच म्हणायला हवी.. जरी वरकरणी तिचा प्रामाणिक हेतु सेवाभावी वा आत्मकल्याणप्राप्ति असा असला तरी! त्या स्त्रीचं कदाचित अकल्याण होणार नाही पण मोहग्रस्त झालेला व पुढच्या पायरीवर पोहोचलेला आध्यात्मिक साधक मात्र सापशिडीच्या खेळातील नव्व्याण्णवाच्या घरातील सर्पमुख न ओळखल्यानं. न जाणल्यानं पुन्हा पाचावर येईल! म्हणून वरवर स्त्रीसुख छान, चांगलं, सुंदर, हवंहवंसं वाटलं तरी पारमार्थिक जीवनासाठी ते विषच आहे! पुरुषासाठी स्त्री व स्त्रीसाठी पुरुष या आध्यात्मिकदृष्टीनं एकमेकांसाठी विषच म्हणायला हवेत. जरी लौकिक जीवनात. तेही धर्ममर्यादेत. पतिपत्नी म्हणून एकमेकांना पूरक असले, संसाराला पूर्णता देणारे असले तरीही!

    अध्यात्माच्या. परमार्थाच्या वाटेवर चालताना एरव्ही संसारात पूर्वकर्मांच्या उपभोगार्थ मिळणारे सर्व आत्मज पुत्र कन्यादि आई वडिल, आप्तगण, बंधुमित्र हे मित्र वाटले तरी त्यांच्याबद्दलची आसक्ति, मोहवृत्ति ही त्यांना शत्रुत्वातच परिणत करते! संसारात ही सर्व मंडळी आपसूक. सहज मिळाली तरी ज्यानं आपलं एक विशिष्ट जीवनध्येय ठरवलंय त्याला त्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात ती मंडळी अडसर, अडथळा, विघ्न बनू शकतात ते त्यांच्याबद्दलच्या मोहामुळं!

एकदा धर्मस्थापनेसाठी अधर्मी लोकांविरुद्ध महायुद्ध करायचं, लढायचं हे निश्चित झाल्यावर कौरवपक्षाकडून लढायला समोर कोणकोण उभे राहणार आहेत याचा विचार करण्याची खरंतर अर्जुनासारख्या सर्व शास्त्रं शिकलेल्या महायोद्ध्याला गरज नव्हती! पण तरीही ती इच्छा झाली आणि  समोरच्या प्रतिपक्षातील मंडळींमधे आपलेच गुरु भाऊबंद इत्यादींना पाहून तो मोहग्रस्त झालाच!

    ते पाहिल्यावर सारथ्यकर्म करतानाही भगवंताला कधी कठोरपणे तर कधी सौम्यपणे गीता सांगावी लागली व स्वकर्तव्या पासून दूर पळणार्‍या अर्जुनाचा मोहबंध कापून काढावा लागला!. त्याची गेलेली आत्मस्मृति पुन्हा जागृत करावी लागली! त्यानंतर अर्जुनानं स्वीकारलं की नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा.. करिष्ये वचनं तव! तेव्हा. एरव्ही मित्रवत् आचरण असणारी मंडळी जेव्हा त्याच मित्रप्रेमाच्या आधारानं आपल्याला पथभ्रष्ट करतात, पदच्युत करतात, ध्येयापासून परावृत्त करतात तेव्हा. ती शत्रूच असतात! न पेक्षा कुणीच कुणाचाही शत्रु नसतो वा मित्रही नसतो!

    कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवोऽपि वा! आध्यात्मिक पारमार्थिक मार्गात कोण कसा अडथळा उभा करील व अंतिम ध्येयापासून दूर ढकलेल याचा नेम नसतो.. सतत डोळ्यात तेल घालून सावध रहावं लागतं! त्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल, मार्गदर्शक ठरेल अशी ही आचार्यांनी गुंफलेली प्रश्नोत्तररूप रत्नमाला आहे!

हेही वाचा 👇

 निळ्या अक्षरांवर क्लिक करा 👇

कलियुगाचे गुण दोष वर्णन - कलियुगात मनुष्यांचे विहरण वर्तन कसे असते? इतर युगांपेक्षा कलियुग हिन काबरं आहे? आणि इतर युगांपेक्षा कलियुगाचे वैशिष्ट्य काय?

श्री. श्रीपादजी केळकर (कल्याण)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post