संस्कृत सुवचनानि
आजची लोकोक्ती - सुजनो न याति विकृतिं।
सुजनो न याति विकृतिं परहितनिरतो विनाशकालेऽपि।
छेदेऽपि चन्दनतरु: सुरभयति मुखं कुठारस्य॥
- सज्जनप्रशंसा.
अर्थ :- सदैव दुसऱ्याचे हित इच्छिणारे सज्जन कितीही संकटेच काय तर अगदी विनाश आला तरी सत्यसंकल्पापासून ढळत नाहीत. (अहो ) चंदनाच्या झाडाला कुऱ्हाडीने तोडले तरीही ते कुर्हाडीला सुगंधितच करते.
सुजनो न याति विकृतिं। ही लोकोक्ती वरील सुभाषितापासून प्रचलित झाली असावी. वरील सुभाषितामध्ये सुभाषितकार कवीने अन्योक्ती अलंकाराचा (चंदनान्योक्ती) वापर केला आहे.
संतकवी तुलसीदासांनीही याच अर्थाचा एक दोहा रचलेला आहे.
संत असंतन्हि कै अस करनी।
जिमि कुठार चंदन आचरनी।
काटइ परसु मलय सुनु भाई।
निज गुण देइ सुगंध बसाई।
संत आणि असंत यांचे आचरण अनुक्रमे चंदन आणि कुऱ्हाड यांच्या सारखे असते. कुऱ्हाड चंदनाच्या झाडाला तोडते पण चंदन त्या कुऱ्हाडीलाही आपला गंधगुण देऊन सुवासिक करते.
अनेक संतकवींनी सज्जनप्रशंसा केलीआहे. संतसज्जनांची तुलना सदैव चंदनाशी होत आली आहे. चंदनाचे लाकूड सहाणीवर उगाळले जाते प्रसंगी उगाळून त्याचे स्वतः अस्तित्व संपतेदेखील परंतु दरवळत रहाण्याचा, आपल्या सुगंधाने इतरांना आनंद देण्याचा सद्गुण ते सोडत नाही. संत तुकोबारायांनीही आपल्या अभंगांमधून चंदन आणि इतर उदाहरणे देऊन संतसज्जनांचे गुणगान केले आहे. त्यांपैकी हा एक अभंग प्रसिद्ध आहे,
चंदनाचे हात पाय ही चंदन।
परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार ।
सर्वांगे साकर अवघी गोड ॥२॥
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून।
पाहतां अवगुण मिळेचि ना ॥३॥
सुजनो न याति विकृतिं । कितीही संकटे आली तरी हाती घेतलेले व्रत जनकल्याणाच्या व्रतापासून ढळायचे नाही. संतसज्जनांच्या ह्या अतिविशिष्ट सद्गुणाची राजर्षी भर्तृहरीनेही आपल्या नीतीशतकात अनेक श्लोकांमधून प्रशंसा केली आहे. त्यापैकी एक पाहू,
छिन्नोऽपिरोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः।
इति विमृशन्तः सन्तः सन्तप्यन्ते न विप्लुता लोके॥
- 'नीतीशतक'
तोडलेले झाड पुन्हा वाढते, चंद्रकोरही वाढून पुन्हा चंद्र पूर्ण होतो; हे समजून सज्जन, कितीही संकटे आली तरी (निराशेने) मनस्ताप करून घेत नाहीत.
रामदास पंतांनी दासबोधाच्या पहिल्या दशकातील चौथा समासात संतस्तवन करताना म्हटलेय,
संत आनंदाचें स्थळ।
संत सुखचि केवळ।
नाना संतोषाचें मूळ।
ते हे संत॥१६॥
संत विश्रांतीची विश्रांती।
संत तृप्तीची निजतृप्ती।
नातरी भक्तीची फळश्रुती।
ते हे संत॥१७॥
अशा ह्या संतांचा मनक्षोभ होत नाही. ते कोणावरही रागावत नाहीत. जगातील विषयविकारात अडकलेल्या सामान्य जनांविषयी संतांच्या मनात अपार करुणा, कीव आणि कळवळा असतो. तुकोबाराय म्हणतातच ना,
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी।
मस्तक चरणीं ठेवीतसें॥१॥
थोरींव सांडिली आपुली परिसें।
नेणे सिवों कैसें लोखंडासी॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति।
देह कष्टविती उपकारें॥
भूतांची दया हे भांडवल संतां।
आपुली ममता नाहीं देहीं॥
तुका म्हणे सुख पराविया सुखें। अमृत हें मुखें स्रवतसे॥
तुकोबाराय म्हणतात ह्या संतांची महती मी काय वर्णावी? माझी वाणी आणि मतीही त्यांचे गुणगान करिण्यासाठी कमी पडेल. परीस हा भेदभाव करत नाही की मी कोण आणि लोखंडते काय ? तो आपला मोठेपणा सोडून लोखंडाला स्पर्श करतो. त्याचे सोने करतो. हे संत महात्मे केवळ जगावर उपकार करण्याकरिता, सामान्यांना सद्गती देण्याकरिता पृथ्वीतलावर जन्म घेतात नाहीतर त्यांचे इथे येण्याचे कारणच काय? त्यांना स्वतःचा स्वार्थ असा नसतोच जगातील सर्व प्राणिमात्रांविषयीच्या करुणेच्या भांडवलाने ते समृद्ध आणि श्रिमंत असतात. इतरांच्या सुखात त्यांचे सुख असते. त्यांच्या मुखातून स्रवलेले अमृत सामान्यांनी जर मानपासून ग्रहण केले तर सामान्यही अमरपदाला पोहोचू शकतात. मग सांगा ह्या संतसज्जनांमध्ये विकृती वास करेलच कशी?
सुजनो न याति विकृतिं। रामाला अगदी राज्याभिषेक जवळ असताना माता कैकयीने राजा दशरटास सागून वनवासाला धाडले. ज्ञानेश्वर, तुकारामादी सर्व संतांना समाजात विशिष्ट दुर्जनांकडून अतिशय वाईट वागणूक मिळाली. राजा हरिश्चंद्राला राज्यत्याग करून अगदी स्मशानात डोंबाचं काम कराव लागलं. पण संकटे आली तरी हे सर्व सत्पुरूष खचले नाहीत आपल्या सद्वृत्तीपासून ढळले नाहीत वा चळले नाहीत. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात ,
चंदनाचे हात पाय ही चंदन।
परिसा नाहीं हीन कोणी अंग॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार।
सर्वांगे साकर अवघी गोड॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून।
पाहतां अवगुण मिळेचि ना॥
खरंय ना?
सुजनो न याति विकृतिं।
लेखक :- अभिजीत काळे