भाग 003 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 003 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 003 

विराटपर्व कथासार मराठी 

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 



मागिल कथा भाग :- पांडवांनी विराट राजाकडे १ वर्ष अज्ञात वासात राहावे असे निश्चित केले. तिथे गेल्यावर कोण काय व्यापार करणार, कोणते नाव धारण करणार हेही ठरले. धौम्य ऋषिने त्यांना राजाश्रयाने कसे राहावे याचे सर्व ज्ञान सांगितले. व सर्व पांडव वाई देशात विराट राजाकडे निघाले. 

पुढील कथा 

पांडवांनी विराटनगराकडे प्रयाण केले. 

पुढे आचार्य सांगतात की, वैशंपायन जन्मेजय राजाला म्हणाला :- हे राजा जनमेजया,  या प्रमाणे १२ वर्षांचा वनवास पूर्ण करून पुनः स्वराज्य मिळावयाच्या इच्छेने पांडवांनी अज्ञातवास आरंभ केला. त्या वीरांनी तरवारी लटकावून, बाणभाते बांधून, हातांना इजा होऊ नये म्हणून दंडाभोवती चर्मबंधन गुंडाळले. व बोटांत अंगुलित्राणं घालून यमुनेकडचा मार्ग धरला. 

नंतर ते पादचारी महाबलाढ्य पांडव यमुनेच्या दक्षिण तीराकडील पर्वतांवरील व अरण्यांतील भयंकर प्रदेशांत मुक्काम करीत करीत पंचाल देशांच्या दक्षिणेकडून व दशार्ण देशांच्या उत्तरेकडून यकृल्लोम व शूरसेन या देशांतून मृगांची शिकार करीत व आम्ही पारधी आहे असे लोकांना सांगत विराटदेशांत शिरले. 

राजा, त्या काळी त्या वीरांनी दाढी वाढविली होती व वाटेच्या दगदगीने त्यांची मुखे अगदी विवर्ण झाली होती ! ह्याप्रमाणे ते धनुर्धारी पांडव विराट देशांत प्रविष्ट झाल्यावर द्रौपदी युधिष्ठिरास म्हणाली, "पहा, अद्यापि पाऊलवाटांवर अनेक प्रकारची शेतंच आपणांस दिसत आहेत, अजून मोठे मार्ग आपणांस लागत नाहीत; ह्यावरून विराटनगरी येथून अद्यापि बरीच दूर आहे ह्यांत संदेह नाही. म्हणून आपण आणखी एक रात्र येथेच मुक्काम करू ; मी चालून चालून अगदी थकून गेले आहे "


युधिष्ठिर म्हणाला:- हे भारता धनंजया, द्रौपदीला उचलून खांद्यावर घे. हे इतके वन आपण चालून गेलों म्हणजे आपण विराटनगरीत पोचून तेथेंच वसती करूं.


युधिष्ठिराच्या आज्ञेने नंतर त्या अर्जुनाने द्रौपदीस गजराजाप्रमाणे स्कंधावर वारण केले; आणि ते सर्व थोडक्याच वेळांत विराटनगराच्या समीप येऊन पोचल्यावर अर्जुनाने तिला खाली उतारलं. 

नंतर युधिष्ठिराने अर्जुनास म्हटले:- बा अर्जुना, आपण नगरांत प्रवेश करण्यापूर्वी आयुधांची संस्थापना कोठे करावी बरें? आपल्याला आपली शस्त्रास्त्रे कुठेतरी लपवावी लागतील. जर आपण शस्त्रादिकांसहवर्तमान या नगरांत प्रवेश केला, तर नागरिक लोक एकदम घाबरून जातील यात संदेह नाही. हे गांडीव धनुष्य मोठे प्रचंड असून लोकांच्या ओळखीचे आहे. या करितां असल्या आयुधांसकट आपण पुरांत प्रवेश केला, तर आपणांस लोक तेव्हांच ओळखून काढतील; आपणांवर दुर्धर प्रसंग ओढवेल ! आणि मग आपणांला पुन: बारा वर्षे वनवासांत जाण्याची पाळी येईल ! बा अर्जुना, आपणांपैकी एकाला  जरी कोणी ओळखले, तरी आपण सर्व पुनः १२ वर्षे वनवास करू अशी आपण प्रतिज्ञा केलेली तुला स्मरत असेलच !


पांडवांनी शमी वृक्षावर शस्त्रे लपवून ठेवली. 

अर्जुन म्हणे शस्त्रास्त्रे । येथे ठेवावी सुपवित्रे । 

अभिमंत्रिता महामंत्रे । दृष्टी कोणा न पडति ।। 

अर्जुन म्हणाला: हे राजा, या सभोवतालच्या दिसणार्‍या उच्च प्रदेशावर मोठा शमीवृक्ष(आपट्याचे झाड) दिसत आहे, त्यावर आपण आयुधे ठेवावी, असे मला वाटते. पहा या अवाढव्य वृक्षाच्या खांद्या चोहोकडे पसरल्या असून त्यावर कोणास चढतां येणे मोठे कठीण आहे. शिवाय या समयी येथे कोणी माणूसही आपण काय करतो आहे हे पाहण्यास नाही, हा वृक्ष अगदी एकीकडे असून याच्या सभोवती श्वापदांची व सर्पादिकांची दाट वस्ती आहे; आणि शिवाय हा वृक्ष स्मशानासमीप असल्यामुळे येथे फारसे मनुष्य फिरकण्याचा संभव नाहीं. ह्यास्तव आपण आपली आयुधे या वृक्षावर ठेवून नगरांत जाऊं व तेथ पूर्वी ठरल्याप्रमाणे आपआपली कामे करून अज्ञातवासाचे दिवस पार पाडू. 

  अर्जुनाने या प्रमाणे युधिष्ठिराला सांगितलें व आयुधें ठेवण्याच्या तयारीला ते सर्व पांडव लागले. प्रथम अर्जुनानें त्या परमप्रतापी गांडीवाची प्रत्यंचा सोडली. अहाहा ! त्या गांडीव धनुष्याचें काय वर्णन करावें! अरे, कुरुपुंगव अर्जुनाने एक रथांत बसून त्या गांडीव धनुष्याच्या बळावर देवांना, सगळ्या मनुष्यांना व सर्व समृद्ध देशांना आपल्या अधीन करून घेतलें ! नंतर, जनमेजया, ज्या धनुष्याच्या साहाय्यानें युधिष्ठिरानें कुरुक्षेत्राच रक्षण केलें, त्या धनुष्याची दोरी युधिष्ठिरानें सोडिली. पुढे भीमसेनाने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा उतरली. राजा, या धनुष्यानेच असीम पराक्रमी भीमानें संग्रामांत पांचालांचा पराजय केला व दिग्विजयाच्या प्रसंगी अनेक वीरांना एकट्याने जर्जर करून सोडिलें, या धनुष्याचा टणत्कार झाला म्हणजे जणू काय वज्रप्रहारानें पर्वतच विदीर्ण होऊन कोसळल्याचा भास होई, व या धनुष्याच्या योगानेच त्या सिंधुपति जयद्रथाचा भीमानें समाचार घेतला ! नंतर त्या अद्वितीय रूपसंपन्न, मितभाषी, आरक्तमुखकांति व महाप्रतापी माद्रीपुत्र नकुलानें ज्या धनुष्याच्या साहाय्यानें पश्चिम दिशा हस्तगत करून घेतली त्या धनुष्याची दोरी सोडिली; आणि शेवटी त्या आचारवान् सहदेवानें दक्षिण दिशा जिंकून टाकणारें तें आपलें श्रेष्ठ धनुष्य प्रत्यंचारहित केलें ! जनमेजया, ह्याप्रमाणे सर्वांनी आपआपल्या धनुष्याच्या दोरी सोडल्यावर त्यांनीं ती धनुष्ये आणि त्याप्रमाणेच आपल्या जवळ असलेल्या मोठमोठ्या देदीप्यमान तलवारी, मूल्यवान् भाते व तीक्ष्ण बाण हीं सर्व खालीं ठेविलीं !

नंतर - युधिष्ठिरानें तो सर्व आयुधे त्या शमीवृक्षावर ठेवण्याकरितां नकुलास आज्ञा केली; आणि त्या आज्ञेप्रमाणे नकुलानें त्या वृक्षावर चढून, त्याच्या ढोलींतून व फटीतून जेथें जीं आयुधे नीट राहतील असे त्यास वाटले तेथे व जेथे पर्जन्याचा वगैरे त्रास पोचणार नाही अशा व्यवस्थेनें व बळकट चामड्याच्या दोर्यांनी सुदृढ बांधून ठेवून दिली. नंतर, त्या वृक्षावर शस्त्र बांधिलें असतां त्याच्या दुर्गंधीमुळे व हिडिसपणामुळे कोणीही माणूस तिकडे सहसा फिरकणार नाही असे मनांस आणून पांडवांनी त्या वृक्षाला एक शव बांधले. आणि मग ते, "ही आमची एकशें ऐंशी वर्षांची माता असून हिचें हें शव आम्ही आपल्या कुलाचाराप्रमाणे या वृक्षास बांधून ठेविलें आहे! " असे ते लोकांस सांगत नगराकडे वळले. वाटेंत त्यांना गुराखी, धनगर वगैर जे कोणी भेटले, त्यांस त्यांनी तसेच सांगितलें; व अशा प्रकारें आपल्याविषयी कोणाच्या मनांत कांहीएक विपरीत तर्क उत्पन्न होऊं नये म्हणून दक्षता ठेवून ते पराक्रमी पांडव नगरा समीप येऊन पोचले. नंतर युधिष्ठिरानें जय, जयंत, विजय, जयत्सेन व जयवल अशीं गृह्य नांवें अनुक्रमें आपणासकट सर्वास ठेविली आणि सर्वजण पूर्वसंकेताप्रमाणें तें तेरावें अज्ञातवासाचें वर्ष पार पाडण्याकरितां त्या महान विराटनगरांत प्रविष्ट झाले.


विराट राजसभेत युधिष्ठिराचा प्रवेश.

नंतर, विराट राजा आपल्या सभेत बसलो असतां, वैदूर्यरत्नखचित सुवर्णाचे फांसे वस्त्रामध्ये गुंडाळून घेऊन प्रथम युधिष्ठिर राजा त्याच्याकडे गेला. कालमहिमा कसा विचित्र आहे तो पहा! या कुरुवंशवर्धन यशस्त्री युधिष्ठिर राजापुढे सर्व राजे नम्र होत असत; आणि याच्यापुढे जातांना, तीष्ण विषयुक्त भुजंगापुढे जाण्याप्रमाणे भय वाटत होते; तोच आज दुसऱ्यापुढे नम्रपणे जात आहे! असो; असाही प्रसंग आला तरी त्यांचे नैसर्गिक तेज नाहींसे होणार थोडंच ! बल, रूप आणि कांति याच्या योगानें तो भव्य असलेला राजा युधिष्ठिर देवतांप्रमाणे तेजस्वीच असल्यामुळें प्रस्तुत तो मेघांनी आच्छादित सूर्याप्रमाणे किंवा भस्माच्छादित अग्नीप्रमाणे दिसत होता.

 धर्मराजाचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी असल्यामुळे तो पांडुपुत्र येऊ लागला असतां, ढगांनी झांकून गेलेला चंद्रच आपल्याकडे येत आहे की काय असे विराट राजाला वाटलें. तो त्याच्याकडे पहात पहातच आपल्याजवळ असलेल्या राजे, मंत्री, द्विज, पौराणिक व इतर लोकांना विचारूं लागला की, "अहो, हा इकडे कोण येत आहे? हा एखाद्या राजाप्रमाणे दिसत असून त्याची दृष्टि या सभेकडेच आहे! हा ब्राह्मण तर नाहींच. तर हा नरश्रेष्ठ कोणी तरी राजाच असावा असे मला वाटतें. बरं, इंद्राप्रमाणे हा इतका तेजस्वी दिसत आहे म्हणून तसाच कोणी तरी असेल म्हणावे, तर याच्याजवळ सेवक, रथ, गज वगैरे कांहींच दिसत नाहीं! तरी पण, एखादा मदमत्त गज ज्याप्रमाणे निःशंकपणे कमलिनीकडे जातो, त्याप्रमाणे याची इकडे येण्याची गति व त्याच्या शरीरावर दिसत असलेली चिन्हें ह्यांवरून हा कोणीतरी मृर्धाभिषिक्त राजाच असावा असे मला वाटते" 

अशा प्रकारें तो विराटराजा अनेक तर्क करीत आहे तोवर युधिष्ठिर त्याच्याजवळ येऊन पोहोचला. 

विराट राजाने विचारले 

वदोनिया आशीर्वचन । म्हणे राया स्वस्ती कल्याण ।

भूप म्हणे तुम्ही कोठील कोण? । किमर्थ येणे या ठाया ।। 

युधिष्ठिर विराट राजाला म्हणाला :- हे राजाधिराजा, माझे सर्वस्व नष्ट झाल्यामुळे उपजीविकेच्या साधनार्थ मी ब्राह्मण तुजकडे आलो आहे. हे पुण्यवंता, तुझ्या मर्जीनुरूप वागून येथे तुझ्याजवळ रहावें अशी माझी इच्छा आहे.

राजा, हे त्याचं भाषण ऐकून, राजा विराटाने त्याचा आदर केला आणि बसावयास सांगून त्याने मोठ्या प्रेमानें त्याला विचारिलें. विराट राजा म्हणाला:- 

दिससी सूर्याहून आगळा । आंगीं ऐश्वर्याची कळा, । 

पृथ्वीचिया भूपाळा । श्रेष्ठ, आगळा भाससी ॥

बाबा रे, मी तुला अंतःकरणपूर्वक विचारितों की, कोणत्या राजाच्या देशांतून तू आला आहेस? त्याचप्रमाणे तुझे नांव काय? कोणत्या कुलांत तूं जन्म घेतला आहेस? आणि कोणती शिल्पविद्या तूं जाणतोस ? जे काय खरें खरें असेल ते मला सांग? 

धर्म अनुवादे हांसोन, । व्याघ्रपादशाखी माझें जनन, । 

अत्रिगोत्री भी ब्राह्मण । होय आश्रित धर्माचा ॥  

सभापंडित धर्मानिकट । पांडव झालिया राज्यभ्रष्ट ।

तूं परम धार्मिक, श्रेष्ठ, । ऐकोन आलों तुजपाशीं. ॥ 

चारी वेद साही शास्त्रें । परिश्रम असे अंगमात्रे । 

उपासना मंत्र तंत्रें । बुद्धी कुंठित असेना. ॥  

खेळू जाणें द्यूतखेळ । सत्यभाषण न पडे चळ । 

रत्नपरीक्षे मी कुशळ । कंक नाम पे माझे ॥ 

जाणे वस्तूंची परीक्षा । बहु काय बोलू? विचारदक्षा !! । राजा म्हणे, “मज अपेक्षा । संगतीची पै असे” ।। 

युधिष्ठिर म्हणालाः - महाराज, मी वैयाघ्रपद्य(यमाच्या कुळात जन्मलेला) विप्र असून, पूर्वी युधिष्ठिराचा सखा होतो. हे विराट राजा, द्यूतविद्या मला चांगली अवगत असून कंक या नांवाने मी प्रसिद्ध आहे.

विराट राजा म्हणतो :- तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण करण्यास मी तयार आहे. पाहिजे असल्यास या मत्स्यदेशाचं राज्यही तूंच कर सांगशील तसा मी वागेन. आधीच द्यूत खेळणारे मला नेहमच प्रिय वाटतात आणि तू तर मला देवासारखा वाटतोस. तेव्हां तूं राज्यालाही पात्र आहेस.

युधिष्ठिर म्हणाला :- हे प्रजापाळका, या द्युताची स्थिति अशी आहे की, ह्यांत कोणी हरला की तो भांडवयास उभा रहावयाचा. ह्याकरितां मला एवढीच देणगी दे की, ज्याला मी जिंकीन त्यानें माझें द्रव्य बिनतक्रार मला द्यावें.

आसन वसन मान धन । विद्येसारिखें निवेदीन । 

आतां स्वस्थ करूनियां मन । मजसंगती असावें ॥

विराट  राजा म्हणतो :- याबद्दल मी तुला इतकें सांगतों कीं, तुझ्या मर्जीविरुद्ध वागणारा जर कोणी ब्राह्मणेतर असेल, तर त्याचा मी वध करीन ; आणि ब्राह्मण असेल, तर त्याला हद्दपार करीन. या राज्यांत ज्याप्रमाणे माझी सत्ता चालते, त्याचप्रमाणे कंकाचीही चालेल, हे माझे बोलणे येथे जमलेल्या सर्वांनी ऐकून ठेवा. हे कंका, तूं माझा मित्र आहेस. मी ज्या वाहनांत बसेन, तेथे माझ्याशेजारी तू बसावें. अन्नवस्त्रादिकांची तुला काळजी नको. माझ्या घरी जे काय आहे त्यांतून तुला वाटेल ते तुझे आहे. त्याचप्रमाणे माझ्या सर्व राज्यांत अथवा माझ्या घरांत तुला कोठेही प्रतिबंध नाही. उपजीविकेच्या साधनाने रहित झाल्यामुळे वाईट स्थितीला पोहोचलेले असे कोणी लोक तुजकडे आले तर तूं त्यांना माझ्याकडे पाठवून मी त्यांना अमुक द्या' असे तू मला सांग, म्हणजे तात्काळ तुझ्या इच्छेप्रमाणे ते मी त्यांला देईन. माझ्या एथं असतांना तुला कोणापासूनही पीडा होणार नाहीं !” 

या प्रमाणे त्या नर श्रेष्ठ धर्मराजाची विराटराजाशी उत्तम प्रकारची मंत्री जडून, तो ज्ञानी धर्मराज त्याच्या एथे मोठ्या आदरसत्कारांने आनंदाने राहिला. तरी त्याने आपली वागणूक इतकी व्यवस्थित ठेविली होती की, हा धर्मराज असावा असे कोणाच्याही कधी लक्षात आलं नाहीं.

क्रमशः 

पुढची कथा पुढिल भागात 

भाग एक व दोन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

चौथा भाग 004👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-viratparvamarathikatha.html

पहिला भाग 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html

दुसरा भाग 002👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html


चौथा भाग 004👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-viratparvamarathikatha.html

भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post