002 भाग विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

002 भाग विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 002 भाग 

विराटपर्व कथासार मराठी 

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 


(भाग दुसरा) 

पहिल्या भागातील कथा एकाग्र चित्ताने ऐकणाऱ्या शिष्यगणांना आचार्य म्हणाले : -

“या प्रमाणे धर्मादिकांनीं आपसांत विचार ठरवून व प्रत्येकजण कोणकोणती कामे करणार ते एकमेकांस कळवून, नंतर त्यांनी धौम्यांचा निरोप घेतला. तेव्हां धौम्य मुनींनी नितीशास्त्र निरूपण करतात :- 

राजगृही कसे राहावे? 

“युधिष्ठिर! ब्राह्मणांविषयी, आप्तसुहृदांसंबंधाने, शत्रूवर चाल करून जातांना, युद्धादिकांमध्यें व अग्निहोत्राविषयी केव्हां काय केले पाहिजे ह्याबद्दल पांडवांस कांहीएक सांगण्याचें अगत्य नाहीं. तें सर्व पांडवांना विदितच आहे. द्रौपदीचे संरक्षण करणे ते तूं व अर्जुनानें करावे ही गोष्टही तुम्ही जाणतच आहां. अशा समयीं सामान्य लोकांचें वर्तन कसे असते, तेही तुम्हांला माहीत आहे. तथापि अप्तेष्टांनी, एखाद्यास माहीत असलेली गोष्ट पुनः प्रेमाने व कळकळीने सांगावी, हे त्यांचं कर्तव्यच होय. असें असतां धर्म, अर्थ व काम हे तिन्ही साधतात असा शाश्वत सिद्धांत आहे. 

यास्तव, राजपुत्र हो राजगृहीं कसें रहावें, ह्याबद्दल जे कांहीं मी तुम्हांस सांगत आहे, तिकडे अवधान द्या; म्हणजे तुमच्या हातून कांहीं दोष न घडतां तुम्ही या १ वर्षाच्या अडचणींतून सुखानें पार पडाल.

नाम, रूप, थोरपण । कोणा कळों न द्यावें ज्ञान । 

दीनाहूनी परम दीन । ऐसें लोकां दाखवावें ॥ 

हे धर्मा, राजगृहीं राहणें विचारी मनुष्याला सोपे नाही. म्हणून प्रस्तुत प्रसंगांत तुम्हीं मानापमानापाकडे विशेष लक्ष न ठेवतां, आपणांस कोणीही ओळखू नये या एक मुख्य हेतूवर तुमचें पूर्ण लक्ष असावें. म्हणजे हे अज्ञातवासाचे तेरावें वर्ष संपून चौदावें वर्ष लागतांच तुम्हांस चांगला काळ प्राप्त होईल.

हे युधिष्ठिरा, राजाला भेटणे झाल्यास द्वारपाळाद्वारे परवानगी मिळविल्याशिवाय त्याला भेटण्याची इच्छा करूं नये. राजगृहीं दुसऱ्यावर विश्वास टाकतांना फार दक्षता ठेविली पाहिजे. राजाच्या खासगीतील माणसांवर विश्वास ठेवू नये. 

ज्या ठिकाणी बसल्यानें आपणांस कोणी ऊठ म्हणून म्हणणार नाहीं, अशाच ठिकाण बसावें. माझ्यावर राजाची मर्जी आहे, असं मनांत आणून कोण्याही दुसऱ्याच्या पालखीत, पलंगावर, उच्चासनावर, हत्तीवर किंवा रथांत बसूं नये. ज्या ज्या स्थळी बसल्याने आपल्याविषयीं दुष्ट हेरांच्या मनांत कुतर्क उत्पन्न होतील, त्या त्या स्थळी आपण बसूं नये. 

दावुनी चातुर्य कुशळते । मूर्ख नेणिजे प्रभूतें । 

श्रेष्ठं बोलिजे न घडे तें । तेचि शब्दीं प्रतिष्ठा ॥

राजाने विचारल्यावांचून आपण त्यास काहीएक सांगू नये. आपण मुकाट्याने असावे व प्रसंगानुसार त्याची महती वर्णावी. परंतु असे करितांना मिथ्यास्तुति करू नये; कारण राजे लोक असत्य भाषण करणाऱ्यांचा द्वेष व व्यर्थ बडबड करणाऱ्यांचा अवमान करितात. 

राजस्त्रीसंवाद । राजमित्राशीं विरोध, । 

राजपुरोहितासीं विनोद, । जाणते पुरुषीं न करावा ॥ 

त्याप्रमाणेच, सुज्ञ पुरुषानें केव्हां ही राजस्त्रियांशीं, अंतःपुरांतील माणसांशी, आणि राजा ज्यांचा तिरस्कार व द्वेष करितो अशा लो कांशी मैत्री करूं नये. अगदी क्षुल्लक काम असले तरी तें राजाच्या नकळत करूं नये. जो मनुष्य या नियमांप्रमाणे वागतो, त्याची केव्हांही मानखंडना होत नाहीं. 

एखाद्या उच्च स्थानी आपण नित्य व बसत असलो, तरी तेवढ्यावर त्या स्थानी आपण बसूं नये. तेथे बसण्याविषयी राजाचे आपणाशी संभाषण होऊन तो आपल्यास अनुज्ञा देईल, तरच आपण तेथे बसावें. लाज राखण्याविषयी आपण जात्यंधाप्रमाणे वागावं. आपले बसण्याचे स्थान कोणतें हे राजाने दाखवून तेथें बसा म्हणून सांगितल्याशिवाय त्या स्थानाचा आपण स्वीकार करूं नये. 

युधिष्ठिरा, मर्यादेचे उल्लंघन करणारा पुरुष आपला पुत्र, नातू किंवा भ्राता असला तरी विजयशील राजे लोक त्यास मानत नाहीत. अग्नीप्रमाणे किंवा देवांप्रमाणे राजे लोकांशी वर्तले पाहिजे; त्यांच्यांशी अतिशय सलगी केल्यास ते अग्नीप्रमाणे जाळून टाकतील, अथवा त्यांचा उपमर्द (अपमान) केल्यास ते देवांप्रमाणे सर्वस्व हिरावून नेतील. 

राजे लोकांशी वागतांना सत्याचाच अवलंब करावा; असत्याने वागल्यास निःसंशय ते घात करतील. राजाने जशी आज्ञा केली असेल, तसेंच वागावें; त्याच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करूं नये, व त्याला गर्व किंवा क्रोध दाखवूं नये. कार्याकार्याचा विचार करितांना नेहमी राजाला प्रिय व परिणाम हितकर असेंच भाषण करावे. कदाचित् असे करण्यास हरकत आल्यास प्रिय भाषण न करितां हितकर भाषण करण्याचेच धैर्य करावे. 

कोणतीही गोष्ट निघाली असतां किंवा कोणतेही कृत्य उपस्थित झालं असतां त्यांत राजाची मर्जी राखून त्याच्या हिताकरितां झटावें. जी गोष्ट राजाला आवडणार नाही, किंवा जिच्यापासून राजाचें अहित होईल, अशी गोष्ट करण्याविषयी त्यास मुळींच सल्ला देऊं नये. मी राजाच्या मर्जीतला आहे असे मानून कोणत्याही शहाण्या पुरुषानें राजाची सेवा करूं नये, तर नेहमी सावध राहून राजास अनुकूल व हितकारक असेच कृत्य करीत जावें. 

जो पुरुष राजाला अनिष्ट अशा गोष्टी करीत नाहीं, राजाच्या शत्रूशीं बोलत नाहीं, व राजाने घालून दिलेल्या मर्यादा उल्लंघीत नाहीं, तोच पुरुष राजगृहीं सुखानं वास करितो. विवेकशील पुरुषाने राजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस बसावे. 

राजाच्या पाठीकडील बाजू हे शस्त्रधारी रक्षकांचें स्थान होय. राजा असलेले मोठें आसन सदासर्वकाळ वर्ज्य समजावें. राजाच्या हस्ते किंवा राजाच्या समक्ष आपल्यास वेतन, बक्षीस वगैरे मिळाल्यास ते अहंपणा दाखवून स्वीकारूं नये. कारण फुशारकी मिरवणे हें दरिद्री लोकांना सुद्धां खपत नाहीं. राजांचे मुखांतून अनृत भाषण निघाल्यास ते लोकांत प्रसिद्ध करूं नये; कारण जे लोक राजाचे असत्य बाहेर काढितात, त्यांचा राजाकडून द्वेष होतो. त्याप्रमाणेच, राजापुढे शहाणपणाचा दिमाखही दाखवूं नये; कारण पंडितंमन्य पुरुषाचा राजाकडून अपमान होतो. मी शूर आहे किंवा मी शहाणा आहे, अशी घमेंड बाळगून राजापुढे बाळगूं नये; 

जी गोष्ट राजाला प्रिय वाटेल, तीच करून राजाच्या कृपेने ऐश्वर्याचा उपभोग घ्यावा. राजप्रसादाने दुर्लभ ऐश्वर्य मिळाले असतां, राजाला जें प्रिय व हितकर असेल तेच घडवून आणण्याविषयी दक्ष असावें. ज्यांचा कोप झाला असता भयंकर पीडा व प्रसाद झालां असता मोठे भाग्य प्राप्त होते, त्यांचा अपराध करणे हे कोणता सुज्ञ पुरुष पसंत करील बरें ? 

राजाच्या समीप असतांना पुटपुटुणे, दांतओठ खाणे, व हातपाय चाळविणे ही कृत्यें करूं नयेत; आणि थुंकणे, अधोवायु सोडणे, व दुसऱ्याशी भाषण करणे ही कृत्ये करणे झाल्यास बेतानें इतरांच्या दृष्टोत्पत्तीस येणार नाहीत अशा प्रकारें करावीं. राजासमक्ष दुसऱ्या कोणा राजसेवकाची थट्टामस्करी चालली असतां आपण मोठ्याने किंवा बेतालपणानें हसूं नये, अथवा त्या प्रसंगी मोठ्या निग्रहाने काष्टासारखें स्वस्थही बसूं नये; तर थट्टामस्करीतील मर्म आपणास कळले आहे असे दाखवून किंचित् स्मित करावें, हे चांगलें. 

झालिया मानापमान । हर्षविषादीं न घाली मन ।

क्षमाशीळ, सुप्रसन्न । तोचि पावे महिमेतें ॥ 

जो मनुष्य लाभ झाला असतां आनंदित न होतां व अपमानानें खिन्न न होतां आपलं काम नित्य दक्षतेनें करितो, तोच राजगृही राहण्यास पात्र होतो. जो अमात्य किंवा पंडित राजाची किंवा राज पुत्राची नेहमी स्तुतिच करितो, तो राजाला नित्य प्रिय होऊन मोठी बडेजाव जोडितो. विनाकारण बंदीत पडलेला अमात्यही जर राजाची निंद करणार नाही, तर तो आपलं नष्ट ऐश्वर्य पुनः मिळवू शकतो. ज्याचा चरितार्थ राजावर अवलंबून असेल, अथवा ज्याला राजाच्या मुलखांत राहावयाचें असेल, त्याने राजाच्या समक्ष किंवा राजाच्या पाठी मागे राजाची स्तुतिच करावी. 

जो मंत्री राजाला जुलमानें राज्य करण्यास सांगतो, तो त्या पदावर फार काळ टिकत नाहीं; - लवकरच त्याच्यावर प्राण संकट येते. अमात्यांने आपल्या हिताकडे लक्ष ठेवून दुसरा कोणी पुरुष राजास सल्लामसलत देणार नाही अशाविषयी जपावें. युद्ध किंवा परराष्ट्रांतील लोकांशी संभाषण इत्यादि योग्य प्रसंगी अमात्याने राजापेक्षाही अधिक पूर्तता दाखवावी. जो पुरुष कधीही म्लान होत नाही, आणि बल व शौर्य दाखवून नित्य राजाला छायेप्रमाणे अनुसरतो, आणि नेहमी शुद्ध वर्तन ठेवून सौम्यपणानें व मनोनिग्रहाने वागतो, तोच राजगृही राहण्यास योग्य होतो. 

राजाने कांही एका कामाकरितां दुसर्‍यास हांक मारिली असतां जो आपण होऊनच 'महाराज, काय आज्ञा आहे?' असे म्हणून काम करण्याकरितां पुढें होतो, तोच राजगृही राहण्यास पात्र होतो. घरदार इत्यादिकांच्या संरक्षणाकरितां किंवा युद्धादिक करून विजय जोडण्याकरितां राजानें हुकूम फर्माविला असतां जो भयाने माघार घेत नाही, तोच राजगृही वास्तव्य करण्यास योग्य होय. 

एकदा प्रवासास प्रारंभ केला म्हणजे ज्यास घरांतील स्त्रीपुत्रादिक प्रिय वस्तूंचे स्मरण होत नाहीं, व जो नानाविध दुःखे भोगून सुखांची इच्छा करितो, तो पुरुष राजकार्यास योग्य समजावा. राजगृही राहून राजाची कृपा जोडावयाची असल्यास त्या पुरुषानें राजासारखा वेष करूं नये; व राजाच्या समीप श्रेष्ठ आसनावर बसू नये; आणि राजाशी केलेली गुप्त मसलत षट्कर्णी जाऊं देऊं नये. म्हणजे इतरांना सांगू नये. राजाने आपणास कांही अधिकारावर नेमिल्यास आपण धनादिकांना स्पर्श करूं नये. कारण लांचलुचपत घेणाऱ्या राजसेवकाला कारागृहवास किंवा कदाचित् मृत्युही प्राप्त होतो. 

वाहन, वस्त्र, अलंकार अथवा द्रव्य वगैरे अन्य जे कांहीं राजाकडून मिळेल, त्याचा स्वीकार करून अधिकाराचे काम न्यायाने चालविणारा मनुष्य राजाच्या अतिशय प्रीतीस पात्र होतो. सारांश, हे पांडुनंदनांनो, तुम्ही विराट राजाकडे असतांना मनोनिग्रह उत्तम प्रकारें करा आणि हा जो मी तुम्हांस उपदेश केला आहे, ह्यांतील मर्म ध्यानांत ठेवून आलेली आपत्ति दूर करा; व नंतर आपल्या देश पुनः जाऊन सर्व सुखे भोगा.

युधिष्ठिर म्हणाला:- “हे गुरुवर्य, आपले कल्याण असो. आपण जो उपदेश केला. तो फारच अमोलिक आहे. आमची माता कुंती किंवा महा ज्ञानी विदुर काका यांच्याशिवाय अन्याकडून असला उपदेश प्राप्त होणे खरोखरच आमच्यासाठी दुर्लभ होय. आतां आम्हांवरचा हा अज्ञातवासाचा प्रसंग निर्विघ्नपणे पार पडण्याकरितां आणि आमचें प्रस्थान क्षेमकारक व सुखावह होण्याकरितां जो कांहीं विधिविधाने करावयास पाहिजे असतील ती करावी.

पुढे कथा सांगणारे वैशपायन मुनि म्हणाले:- राजा जनमेजया, ह्याप्रमाणे युधिष्ठिराने प्रार्थना केली तेव्हां प्रस्थान समय जे विधि करावे लागतात, ते सर्व धौम्य मुनींनी केले व त्यांनी पांडवांचे अग्नि प्रज्वलित करून त्यांमध्ये समंत्रक आहुति अर्पण केल्या. नंतर पांडव सुखसौभाग्यप्राप्तीकरितां व पृथ्वीचे साम्राज्य मिळण्याकरितां त्या अग्निंना व तपोधन ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालून द्रौपदीसहवर्तमान सहाजणे तेथून निघून गेली. 

ऐसिया रचुनियां उपाया । काळ कंठू धर्मराया !' । 

मग स्मरोनी श्रीकृष्णपाया। साही जने चालली ।। 

ह्याप्रमाणे त्या वीरांनी प्रस्थान केल्यानंतर श्रेष्ठ धौम्य ऋषि पांडवांचे अग्नि घेऊन पंचाल देशास निघून गेले व इंद्रसेन प्रभृति मंडळी द्वारकेस जाऊन पांडवांच्या अश्वांचे व रथांचे संरक्षण करीत पांडवांविषयी कोणास काहीएक न सांगितले नाही. आणि यादवांमध्ये स्वस्थ राहिले.

क्रमशः 

पुढची कथा पुढिल तिसऱ्या भागात

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post