भाग 001
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha mahabharat kahani)
विराट पर्व
आचार्य पिठासनावर विराजमान झाले. सर्व शिष्यगणांनी आचार्यांना वंदन केले. आचार्यांनी सर्वांना बसण्याची आज्ञा दिली. कालच्या दिवशी सर्वांनी आचार्यांना विनंती केली होती की आम्हाला श्रीकृष्ण देवाचे भक्त पांडव त्यांची विराटपर्व कथा सांगावी. आचार्यांनी विनंती मान्य केली. बालगोपालांसहीत सर्व आश्रमस्थ आनंदित झाले होते. त्याच उत्सुकतेने आज सर्व सभामंडपात जमले होते. कधी कथा सुरू होते अशी उत्सुकता सर्वांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. पोथीचा दंडवत झाला
“दंडवत् होSSS”
आणि आचार्यांनी कथा सांगण्यास सुरूवात केली.
आचार्य म्हणाले, “बारा वर्षाचा वनवास संपल्यानंतर तो यमधर्मपुत्र युधिष्ठिर राजा आपल्या सर्व बंधूंना जवळ बोलावून आणले व म्हणाला :- भ्राते हो, आज बारा वर्ष आपण राज्यभ्रष्ट होऊन वनवास भोगीत आहोत. आतां हे तेरावे वर्ष आपणांस अज्ञातवासांत काढावयाचें असल्यामुळे मोठा कठीण प्रसंग आहे; तर, बा अर्जुना, ज्या स्थळी आपण वास्तव्य केले असतां व आपणांस दुसरे कोणी ओळखणार नाहीं, असें एकादें ह्या स्थळावांचून दुसरे स्थळ तुला कोणते आवडते सांग.
तेव्हां अर्जुन म्हणालाः - हे नराधिपा! त्या यमधर्माच्याच वरप्रदानाने आपण हे अज्ञातवासाचें वर्ष पार पाडूं. त्याची कृपा आपणांवर असल्यामुळे कोणीही मनुष्य आपणांस खचीत ओळखूं शकणार नाहीं. आतां, हा अज्ञातवास कोणत्या ठिकाणी करावा, ते ठरविण्यासाठी मी कित्येक सुंदर व गुप्त राष्ट्र कथन करितों, त्यांतून कोणतें पसंत पडतें तें सांगावे महाराज, कुरु देशाच्या सभवर्ती पंचाल, चैद्य , मत्स्य, शूरसेन, पटच्चर, दशार्ण, नवराष्ट्र, मल, शाल्व, युगंधर, सौराष्ट, अवंति, व विस्तीर्ण असं कुंतिराष्ट्र हे मोठे रमणीय व धान्यादिकांनी समृद्ध असे देश आहेत; तर, हे राजा, ह्या देशांपैका कोणत्या देशांत रहाणे आपणांस उचित वाढते, त्याची आज्ञ व्हावी, म्हणजे आपण तेथे राहून हे वर्ष पार पाडूं.
नंतर युधिष्ठिर म्हणाला: हे महाबाहो अर्जुना, त्या भगवान् महासमर्थ यमधर्माने जे काही सांगि तले आहे, ते सर्व मला विदित आहेच. आपण जरी आपल्या स्वतःच्या रूपाने ह्या महावर फिरलों, तरीही आपणास कोणी ओळखणार नाही. त्या भूताधिपाचे वरप्रदान काही मिथ्या व्हावयाचें नाही. सर्व कांहीं तदनुरूपच घडून येईल. तथापि आपण सर्वांनी एक विचार ठरवून कोठेतरी सुखावह, सुंदर व कल्याणकारक अशा स्थळी गुप्त रूपानें राहून निर्भयपणे हा अज्ञातवास पूर्ण करावा, है मला योग्य वाटते. बा अर्जुना, मत्स्य देशाचा अविपति विराट राजा मोठा धर्मशील व उदार असून वयोवृद्ध आहे. तो मोठा बलवान् व प्रजा पुरजनाविषयी नित्य दक्ष असून पांडवांवर त्याचें मोठं प्रेम आहे. ह्यास्तव, हे भारता! त्या भूपतीच कामे करून हे अज्ञातवासाचें वर्ष आपण विराट नगरांत घालवावें, असे माझ्या विचारास येते; तर, भ्राते हो, विराट राजाकडे गेल्यावर त्याची कोणकोणती कामे आपणांस करितां येतील ते सांगावें.
अर्जुन म्हणाला : - महाराज, विराट राजाच्या राष्ट्रांत आपल्या हातून कसें काम होईल? हे साधो! विराटनगरीत कोणते काम करून आपण आपला कालक्षेप कराल बरें ? महाराज, आपली थोरवी किती वर्णावी? आपले मन अत्यंत कोमल, उदार, विनयशील, धर्मनिष्ठ व सत्य पराक्रम करण्यास सदा उद्युक्त असे आहे. ह्याकरितां ह्या आपत्तीमध्ये आपले मन कसे स्वस्थ राहील बरे? शिवाय, हे धर्मराजा, ज्या जनाला कधीही कष्ट करण्याचें ठाऊक नाहीं, त्या जनाच्या हातून अशा ह्या घोर प्रसंगी कालानुरूप कर्तव्य कसें घडेल?
कंकनाम ठेविजे धर्मा । बल्लव अभिधान बळिया भीमा ।
घेउनी अंगनेची प्रतिमा । बृहन्नडा अर्जुन ! ॥
ग्रंथिक नाम हें नकुळातें, । तंतिपाळ हें सहदेवातें ।
सैरंध्री हें द्रौपदीतें । कृत्रिम नामें पाचारा ॥
धर्मराजाचिये घरीं । होतों निजाधिकारीं ।
ऐसें बोलोनी, विराटघरीं । विराटातें सेविजे ॥
युधिष्ठिर म्हणा लाः– कुरुनंदन हो, विराट राजाकडे गेल्यावर मी काय करीन ते सांगतों, ऐका, मी कंक नामक ब्राह्मण होऊन त्या उदारधी भूपतींच्या सभेत सभासद होईन.” ('कंक' हा शब्द यमाचा वाचक आहे. धर्म हा यमाचाच पुत्र यास्तव आत्मा वै पुत्रनामा या न्यायाने युधिष्ठिराने कंक हे नाव धारण करून काही दोष केला नाही, हे उघड होते. तसेंच, कंक अर्थ छद्मद्विज म्हणजे ढोंगी ब्राह्मण असा असल्यामुळे, कंक द्विज असे म्हणवून घेण्यानेही काहीं अनृत्याचा स्पर्श होत नाहीं.)
पुढे युधिष्ठिर म्हणाला, “मी अक्ष विद्येत(द्युतक्रिडा) निपुण असून मला द्यूत करण्याची मोठी आवड आहे. ह्यास्तव विराटसभेत वैदूर्य रत्नांचे, सुवर्णाचे व हस्तिदंताचे वर काळे तांबडे डोळे असलेले सुंदर फांसे टाकून सुंदर सोंगव्यांचे डाव मी खेळेन; आणि ह्याप्रमाणे अमात्यांसहवर्तमान व भ्रात्यांसहवर्तमान विराट राजाला मीं संतुष्ट केलें, म्हणजे मला कोणीही ओळखूं शकणार नाहीं व त्या राजालाही अधिकाधिक आनंद होत जाईल आणि यदाकदाचित् विराट राजाने मला विचारले, तर मी पूर्वी युधिष्ठिराचा जिवलग मित्र होतों असें सांगेन.
प्रिय बंधूंनो, मी विराट राजाकडे जे काय करणार तें असे आहे. बा वृकोदरा, तूं विराटाकडे काय काय करून ह्या संकटांतून मुक्त होशील तें सांग पाहूं.”
भीमसेन म्हणाला :- “हे भारता ! विराट राजाकडे गेल्यावर पौरोगव बल्लव असें नांव धारण करून त्या राजाची सेवा करावी हे मला उचित वाटते. (पौरोगेय म्हणजे वायुचा पूत्र आणि बल्लव म्ह. आचारी, पाकनिष्पत्ती करणारा) मी पाकक्रियेमध्ये कुशल असल्यामुळे, त्या राजाकडे जे कोणी पाकक्रियेत निष्णात असे लोक असतील त्यांस मी मागे टाकीन; आणि मी सिद्ध केलेल्या पदार्थ पुढे त्यांनी सिद्ध केलेले पदार्थ अगदी तुच्छ आहेत, अस मीं प्रत्ययास आणून दिले म्हणजे विराट राजाच्या मनांत माझ्याविषयी प्रेम उत्पन्न होईल. शिवाय भी लाकडांचे मोठ मोठे भारे वाहून नेईन आणि ते माझें अचाट कर्म पहून राजा मला पाकाध्यक्षाच्या जागी नेमील आणि अखेरीस ह्याप्रमाणे माझा अधिकार माझी अमानुष कर्मे इतर राजसेवकांच्या दृष्टीस पडली म्हणजे ते मला भक्ष्यभोज्यादिक पदार्थांचा राजा असेच मानितील. हे राजेश्वरा, केवळ पाक शाळेतील कामे करूनच मी स्वस्थ राहणार नाहीं. बलाढ्य हत्ती किंवा मदोन्मत्त बैल यांना आवरण्याचा प्रसंग प्राप्त झाल्यास ती संधी व्यर्थ न दवाडतां त्यांना मी आवरून धरीन, व त्याप्रमाणेच राज्यामध्यें मल्लयुद्ध वगैरे करण्यास कोणी आल्यास त्यांस मी जेर करून जिंकीन. राजा, अशा प्रकारें केवळ आपलें सामर्थ्य दाखविण्याकरितां जेव्हां जेव्हां भी युद्धास प्रवृत्त होईन, तेव्हां मी प्रतिपक्षीयांचा वध कधीही करणार नाही. त्यांस मी चीत करीन, पण त्यांचा नाश होणार नाही अशी नेहमीं दक्षता ठेवीन. हे भारता, मला कोणीं विचारल्यास मी युधिष्ठिराकडे उन्मत्त गजांना आवरण्याच्या, तुफान बैलांना वेसण घालण्याच्या, अन्नरस सिद्ध करण्याच्या व मल्लांशी झुंजण्याच्या कामावर होतों, असे सांगेन. राजा, अशा प्रकारें मी आपल्या कृत्यांनी सर्वांवर छाप ठेवून गुप्तरूपें सुखाने कालक्षेप करीन.”
युधिष्ठिर म्हणाला:- “बरें असो; विराट राजाकडे गेल्यावर अर्जुन काय करणार बरें ? अहाहा ! अर्जुनाचा पराक्रम काय हो वर्णावा ! जो विजय शाली महाबली अर्जुन पूर्वी श्रीकृष्णासमवेत असतां प्रत्यक्ष अग्नि ब्राह्मणाचें रूप घेऊन खांडववन जाळून टाकण्याच्या इच्छेने त्याजवळ गेला, आणि ज्याने त्या अग्नीच्या तृप्तीकरितां आपल्या अप्रतिम रथात आरूढ होऊन खांडववनांत जाऊन इंद्रास जिंकिलें व पन्नगांचा आणि राक्षसांचा वध करून त्या अग्नीला संतोषविले, व ज्याने आपल्या सौदर्याने सर्पराज वासुकीच्या भगिनीचें (उलुपीचे) चित्त हरण केलें. त्या महावीरावर आतां परदास्य करण्याची पाळी यावी?
तेजस्वी पदार्थांमध्ये सूर्य श्रेष्ठ होय; मनुष्यांमध्ये व ब्राह्मण वरिष्ट होय; सर्पामध्यें आशीविष मुख्य होय; दाहकांमध्ये अग्नि प्रधान होय; आयुधांमध्ये वज्र व बलिष्ठ होय; बैलांमध्ये वशिंडवाला बैल अधिक होय; जलाशयांमध्ये सागर श्रेष्ठ होय; वृष्ट करणार्या मध्यें पर्जन्य धन्य होय; नागांमध्ये धृतराष्ट्र बलिष्ठ होय; गजांमध्यें ऐरावत धन्य होय; प्रिय वस्तूंमध्ये पुत्र अधिक होय; सुहृदांमध्यें भार्या वरिष्ठ होय; त्याप्रमाणेच, बा वृकोदरा, माझा हा तरुण भाऊ अर्जुन सर्व धनुर्धार्यामध्ये वरिष्ठ होय. अरे, हा महा तेजस्वी गांडीवधन्वा श्वेताश्व अर्जुन इंद्र वासुदेव ह्यांच्या अगदी तोडीचा आहे. ह्यानें पांच वर्ष इंद्रलोकी रहून आपल्या पराक्रमाने अमानुष अस्त्र विद्या संपादिली व लोकोत्तर तेज प्राप्त करून घेऊन दिव्य अस्त्रे मिळविली! अरे, हा मला बारावा रुद्रच, तेरावा आदित्यच, नववा वसुच, किंवा दहावा ग्रहच भासतो! ह्याचे दोन्ही बाहु दीर्घ वस-मान असून त्यांवरील त्वचेवर प्रत्यंचेच्या आघातांनी बैलाच्या खांद्यावरील घट्ट्याप्रमाणे कठीण घट्टे पडले आहेत!
पर्वतांमध्ये जसा हिमालय, जलाशयांमध्यें जसा समुद्र, देवांमध्ये जसा इंद्र, वसूंमध्ये जसा अग्नि, पशूंमध्ये जसा सिंह व पक्ष्यांमध्ये जसा गरुड, तसा योद्ध्यांमध्ये हा अर्जुन आहे त्यामुळे याचे तेज लपणे फार कठीण आहे, विराटाकडे गेल्यावर हा काय बरे करणार?”
अर्जुन म्हणाला :-
ऐसें बोलतां चमत्कार। अंगिकारिल राजेश्वर ।
अर्जुन म्हणे, 'हो ! विचार । आमुचाही परियेसा ॥
वर्ष एक उर्वशीशापू । तो मी करावया उःशापू ।
अंगीं अंगिकरौनी अंगनावपू । राजयातें भेटणें ॥
नाटकशाळेचिया कुमरी । नाचवूं जाणें कळाकुसरीं ।
सारथ्यविद्या यापरी । अर्जुनसंगें लाधली ॥
पार्थ करितां शरसंधान । नेमें निश्चयें लक्ष्यभेदन ।
दृष्टी पाहतां झालें ज्ञान । त्या सद्गुरूप्रसादें ॥
“हे जेष्ठ बंधो! विराटगृही गेल्यावर मी 'षंढक' आहे म्हणून सांगेन. माझ्या बाहूंबर पडलेले हे मोठमोठे घट्टे झांकून ठेवणे कठीण आहे; परंतु ते मी बाहुभूषणांनी आच्छादित करीन, व त्यांची कांहीं छड्डा दिसल्यास ती कानांत दैदीप्यमान कुंडलें घालून त्यांच्या तेजांत नाहींशी करीन. मी दोन्ही हातांत शंखांच्या बांगड्या भरीन आणि केसांची वेणी घालून मी तृतीया प्रकृति आहे असें लोकास भासविन.
मी बृहन्नडा नाम धारण करून व स्त्रीस्वभावास अनुसरून पुनः पुनः पूर्वीच्या राजांच्या कथा सांगेन, आणि अंतःपुरांत राजाला व इतर जनांना संतुष्ट करीन. भूपते, विराट राजाच्या स्त्रियांना गायन, वादन व चित्रविचित्र नर्तनही मी शिकवीन आणि प्रजांचे सद्वर्तनाची प्रशंसा करीत कपटवेषानें मी आपले स्वरूप गुप्त ठेवीन. विराट राजाने मला विचारल्यास, युधिष्ठिराकडे मी द्रौपदीची दासी होते, असे सांगेन; आणि भस्मानें आच्छादलेल्या अग्नीप्रमाणे मी आपल्या कर्मानीं आपलें तेज आच्छादित करून विराटगृहीं सुखानें कालक्रमणा करीन !”
पुढे जनमेजयराजाला महाभारत कथा सांगणारे वैशंपायन मुनि सांगतातः - राजा जनमेजया, महाधर्मनिष्ठ नरवर अर्जुन ह्याप्रमाणे भाषण करून स्वस्थ बसला असतां, पुढें युधिष्ठिरानें नकुळास म्हटलें – “बा नकुला, विराटराजाकडे गेल्यावर तूं काय कामें करशील ते सांग पाहूं? बाळा, तूं फार कोमल, सुंदर व शूर असल्यामुळे तुला कष्ट भोगण्याची पाळी यावी हे अनुचित होय !”
नकुल म्हणाला:- “हे महीपते, मी विराट राजाकडे ग्रंथिक नांवाचा अश्वबंध (मोतद्दार) होईन. अश्वाचे संगोपन कसे करावें ह्याची मला चांगली माहिती आहे. त्याप्रमाणेच, घोड्यांना शिकवणें व त्यांना दुखणेंबाहणे झाल्यास औषधोपचार करणे यांत मी निपुण आहे. मला हे काम मनापासून आवडतें. राजा, तुझ्याप्रमाणे मलाही अश्व हे नित्य च अतिशय प्रिय वाटतात. विराटनगरामध्ये जे लोक मला विचारतील, त्यांना मी सांगेन की, धर्मराजाने माझी अश्वशाळेवर नेमणूक केली होती. हे राजा, ह्याप्रमाणे वागून मी आपलें स्वरूप गुप्त राखीन व अज्ञातवासाचा काळ पार पाडीन.”
मग पुढे युधिष्ठिर सहदेवाला म्हणाला – “बा सहदेवा ! विराट राजाकडे गेल्यावर तूं काय करून गुप्तरूपें राहणार ते सांग पाहूं.”
सहदेव म्हणाला:- “हे भूपते, मी विराट राजाकडे गोशाळेचे काम पाहीन. गाई कशा वळाव्या व त्यांची धार कशी काढावी हे मला विदित आहे. तसेच गाईची परीक्षा करण्यांत मी निपुण आहे. तंतिपाल ह्या नांवाने मी तिथे राहीन व हाती घेतलेले काम उत्तम प्रकारें करून अज्ञातवासाचे दिवस पार पाडीन. आपण माझ्या विषयी चिंता बाळगूं नका.
आपण पूर्वी मला नित्य गाईची व्यवस्था पाहण्याकरितां पाठवीत होतां, ह्यास्तव ते सर्व कौशल्य मला पूर्णपणे अवगत आहे.
हे महीपते, गाईंची लक्षणे, त्यांचे स्वभाव, त्यांच्या ठिकाण असलेलीं सुचिन्हें इत्यादि सर्व मला चांगली समजतात. राजा, ज्या बैलांच्या ठायी मंगलकारक चिन्हें असतात, ते भी तेव्हांच ओळखितो. ज्या बैलांच्या मृत्रघ्राणनाने वंध्या धेनुही गर्भिणी होऊन प्रसूत होते, असे बैल मला जाणतां येतात. राजा, अशा प्रकारे काम करून मी विराट राजास सुप्रसन्न करीन. मला ह्या कामाची मोठी आवड आहे. हे काम करीत असता मला कोणी ओळख गारही नाहीं.”
राजा युधिष्ठिर म्हणाला, “बरें असो. ही आपली प्रिय पत्नी द्रौपदी त्या विराटराजाकडे काय करणार? अहो, ही आपणांस आपल्या प्राणांहूनही अधिक प्रिय आहे. हिचे आपण मातेप्रमाणे पालन केले पाहिजे व हिला आपण ज्येष्ठ भगिनीप्रमाणे मान दिला पाहिजे. अहो, ह्या कोमलांगीला इतर स्त्रियांसारखें कामकाज कसें करितां येईल बरें? अहो, ह्या तरुण राजकन्येचे केवढं ऐश्वर्य ! ह्या महाभागा यशस्विनीला जन्मापासून पुष्पें, गंध, अलंकार व मनोहर वस्त्रे हीच काय ती माहीत ! आणि असे असतां ह्या साच्चीवर हा असा दुर्धर प्रसंग ओढवावा हे केवढे अनिष्ट आहे.”
धर्मराजाला चिंतीत झालेले पाहून द्रौपदी म्हणाली :-- “हे भारता, सैरंध्री नावाच्या स्त्रिया लोकांच्या घरी कलाकुसरीची कामें करून आपला चरितार्थ चालवीत असतात, हे सर्वप्रसिद्ध आहे. ह्या स्त्रिया आपल्या रक्षणासाठी किंवा उपजीवनासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहत नाहीत. दुसऱ्या कोणत्याही स्त्रिया सैरंधीस्त्रि यांच्या वृत्तीने वागत नाहीत, असा सर्वत्र निश्चय आहे ह्यास्तव विराट राजाकडे गेल्यावर मी सैरंध्री वर्गापैकी एक स्त्री आहे, व वेणीफणी करण्याचें काम मला उत्तम येतें असे सांगेन व तदनुरूप वर्तन ठेवीन. मला राजानं विचारल्यास मी युधिष्ठिराच्या गृही द्रौपदीची वेणीफणी करण्याच्या कामावर होते, असे सांगेन; व आपले स्वरूप गुप्त राखून अज्ञातवास पार पाडीन. मी विराट राजाची पत्नी सुदेष्णा हिची सेवा करीन व ती यशस्विनी माझं संरक्षण करील. आपण आपल्या चित्तास हा असा उद्वेग करून घेऊं नये !”
युधिष्ठिर म्हणाला:- प्रिये, किती समाधानाचें भाषण केलंस बरें ! तुझ्या त्या थोर कुळाला हे उचितच आहे ! हे साध्वि, पाप म्हणजे काय हे तुला माहीतही नाहीं. हे कल्याणि, ते दुष्ट नराधम तुला ओळखून काढून पुनः हर्षित होणार नाहीत, अशा प्रकारें दक्षतेने वाग.
पुढे युधिष्ठिर म्हणाला :- “भ्राते हो, तुम्ही काय काय करणार ते सांगितलें, व मीही प्रसंगानुरूप काय करणार ते तुम्हांस सांगितलें. आतां आपणांस बाकीची सर्व व्यवस्था लाविली पाहिजे. द्रौपदीच्या पुरोहितांनी द्रौपदीच्या दासींना बरोबर घेऊन आचारी व सारथि ह्या सहवर्तमान द्रुपद राजाच्या गृहीं जाऊन तेथे आपल्या अग्निहोत्राचें संरक्षण करावे ; आणि इंद्रसेनादिकांनी आपले मोकळे रथ घेऊन ताबडतोब द्वारकेस प्रयाण करावे ; व पांडव आम्हांला सोडून द्वैतवनांत कोठें निघून गेले तें समजत नाही, असे सगळ्यांनी सांगावे.”
पुढे अग्निहोत्र सामग्रीसीं । धौम्य जातां पांचाळदेशीं । नीती सांगे पांडवांसी । विराटसंगीं बसावया. ॥
क्रमशः
उर्वरित कथा पुढच्या भागात वाचा -
विराटपर्व कथासार मराठी भाग ००२ 👇
भाग दुसरा वाचा👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html