भाग 004 #विराटपर्व_कथासार_मराठी (Virat_parva_marathi_katha #mahabharat_kahani)

भाग 004 #विराटपर्व_कथासार_मराठी (Virat_parva_marathi_katha #mahabharat_kahani)

 भाग 004 

#विराटपर्व_कथासार_मराठी 

(Virat_parva_marathi_katha #mahabharat_kahani) 


विराटगृहीं भीमसेनाने प्रवेश केला :

राजा युधिष्ठिराने राजसभेत प्रवेश करून विराटराजाचे मन जिंकले. व राजाचा प्रिय स्नेही म्हणून सर्वांमध्ये प्रसिद्ध झाला. पुढे त्या विराट राजाकडे द्वितीय पांडुपुत्र महाबली भीमसेन आला.

राजसभेत येतांना त्याच्या चालण्याचा झोंक मोठ्या तोऱ्याने चाललेल्या सिंहाप्रमाणे होता. त्या तेजस्वी भीमानें आपल्या हातांत पळी, कलथा आणि झगझगीत नवें नग्न खड्ग हीं हत्यारें घेतलेलीं होतीं. आपल्या तेजानें सूर्याप्रमाणे जगाला प्रकाशित करणाऱ्या त्या भीमानें आचार्याचें रूप घेतलें असल्यामुळे, अगदी त्या रूपाला साजेसं एक मळकें वस्त्र तो नेसलेला होता; आणि या थाटाने तो पर्वतराज हिमालयाप्रमाणें बलवान भीम मत्स्यराज विराटाच्या अग्रभागी येऊन उभा राहिला. तो येत असतां त्याच्याकडे पाहून आनंदित अंतःकरणानें तो राजा आपल्याजवळ असलेल्या लोकांकडे वळून म्हणाला : “अहो, हा आणखी एक पुरुष इकडेच आलेला दिसतो. तो कोण बरें असावा? याचे बाहु सिंहाप्रमाणे उन्नत असून रूप अत्यंत सुंदर आहे. त्याचप्रमाणे तो अगदी तरुण दिसत आहे. इतका सूर्याप्रमाणे तेजस्त्री पुरुष आजपर्यंत मीं कोठेही पाहिला नाही. मी आपल्या मनांत नानाप्रकारें तर्क करीत आहे, पण हा कोण असावा? आणि त्याचा इकडे येण्याचा हेतु काय असावा?  याविषयी निश्चित अशी कांहींच कल्पना बसत नाहीं. हा जवळून दृष्टीस पडल्यापासून हा कोण आहे हे समजावें अशी मला उत्कट इच्छा झाली आहे. याकरितां, अहो, कोणी तरी सत्वर पुढें होऊन, हा कोणी गंधर्वराज आहे, का इंद्र आहे, का आणखी दुसरा कोणी आहे, याची चांगली चौकशी करून त्याला काही इच्छा असल्यास ती त्याची इच्छा त्वरित पूर्ण करा. 

या प्रमाणे विराट राजाची आज्ञा होताच काही चपळ व हुशार लोक झटदिशीं धावतच धर्मानुज कुंतीपुत्राजवळ गेले आणि त्यांनी त्यास विचारिले. परंतु त्याने त्यांजपाशी काहीएक विशेष न सांगता तो विराट राजासमोर आला आणि म्हणाला : - हे राजा, मी बल्लव नामक आचारी आहे. शाकपाक वगैरे सर्व पदार्थ मी फार उत्तम तयार करतो. या करिता आपण आपल्या पदरात मला आश्रय द्यावा.


विराट राजा म्हणाला - हे बल्लवा, तुझे तेज, रूप आणि रुबाब पाहता तू आचारी असावास असे मला अजिबात वाटत नाहीये. मला तर तू इंद्राप्रमाणे तेजस्वी भासत आहेस. आता, तो तूं नसलास तर दुसरा कोणी श्रेष्ठ पुरुष आहेस हे खास !

भीमसेन म्हणतो :-  हे राजा, खरोखर मी आचारीच आहे आणि केवळ वरण, भात, भाज्या कशा कराव्या हे मी उत्तम प्रकारें जाणतो. राजा, पूर्वी राजा युधिष्ठिराने माझ्या हातच्या भाज्या वगैरे पदार्थ खाल्ले आहेत. याखेरीज दुसरा एक गुण माझ्याजवळ आहे तो हा की, मी मोठा शक्तिवान आहे. माझ्याशी मल्लयुद्धांत बरोबरी कोणाच्याने करवणार नाही. कुस्ती खेळणे मला फार आवडतें. केव्हां केव्हां मी हत्तीशी आणि सिंहाशीही सामने केलेले आहेत. तेव्हा , हे पुण्यवंता, मला तू आपल्या पदरी ठेव. मी सदोदीत तुला आवडेल अशा प्रकारें वागेन.

विराट राजा म्हणाला - बरे आहे. मी तुला आपल्या पदरी ठेविले ; इतकेच नव्हे, तर माझ्या मुदपाकासंबंधाने सर्व अधिकार तुला दिले आहेत. मात्र इतकेंच सांगतों कीं, जसें तूं आतां बोलत आहेस तसाच वाग म्हणजे झालें. कारण तूं जें जं आतां सांगितलेस तशा प्रकारचा पुरुष मी आजपर्यंत पाहिला नाहीं आणि ऐकलाही नाही. तुझ्या एकंदर स्थितीवरून तूं समुद्रवलयांकित पृथ्वीचा अधिपति होण्यासही पात्र आहेस. तथापि, प्रस्तुत तुझ्या इच्छेप्रमाणे मी केले आहे. तर आजपासून तूं मुदपाकामध्ये माझा पुरस्कर्ता हो. तिकडे पूर्वी नेमलेले जे सर्व लोक आहेत, ते इतःपर तुझ्या हाताखालचे होऊन राहतील.

 या प्रमाणे मुदपाकावर स्वयंपाक करण्यासाठी नेमणूक झाली असतां भीमसेनाला आनंद झाला आणि तोही राजाला प्रिय होऊ लागला. भीमसेनही त्याच्या बरोबरच्या लोकांच्या किंवा इतरही कोणाच्या ओळखीस आला नाहीं !


विराट राजाच्या राणीवश्यात सैरंध्रीरूपी द्रौपदीचा प्रवेश.

नंतर सुहास्यवदना द्रौपदी सैरंध्री बनून त्या नगरांत आली. तिनें आपले कृष्णवर्ण, बारीक, मृदु, लांबसडक, कुरळे आणि निर्दोष असे केस सावरून त्यास गांठ दिली होती. तिनें सैरंध्रीचा वेष घेतला असल्यामुळे, त्या वेषाला साजेल असे एक मळीण वस्त्र ती नेसली होती. एखाद्या वेड्या स्त्रीप्रमाणे ती त्या नगरांत इकडे तिकडे भटकूं व धावूं लागे. त्यामुळे ही कोणी वेडी आहे असें समजून तेथील स्त्रिया व पुरुष तिच्या मागे लागत आणि तिला विचारीत कीं, “तू कोण आहेस? व तुझा विचार काय आहे?” तेव्हां ती उत्तर देई की, “महाराज, मी सैरंध्री असून, जो माझें पोषण करील त्याचे काम करावे अशी माझी इच्छा आहे.” 

असे ती सांगायची तरी तिच्या अद्वितीय सौंदर्यावरून, तिच्या वेषावरून व तिच्या गोड वाणीवरून, ही अन्नाकरितां आलेली दासी असावी असे कोणास वाटेना. हा सर्व प्रकार चालला होता, तो तेथे नजीकच राजवाड्याच्या सज्जावर येऊन कैकेय राजाची कन्या जी विराट राजाची पट्टराणी सुदेष्णा ती तिकडे पहात उभी होती, तिच्या दृष्टीस हा सर्व प्रकार पडला. तेव्हां इतकी रूपसंपन्न असून फक्त एकच वस्त्र नेसलेली व तेही मळके आणि अन्नाकरितां दीन झालेली अशी ही कोण आहे, याची चौकशी करण्याकरितां तिने तिला हांक मारून जवळ बोलावले व विचारिले.


सुदेष्णा म्हणाली - हे कल्याणी ! तू कोण आहेस? आणि तुझी काय इच्छा आहे? 

द्रौपदी म्हणाली:- हे महाराणी मी सैरंध्री असून, जो मला आपल्या पदरी ठेवील त्याची सेवा करावी अशी माझी इच्छा आहे.

सुदेष्णा म्हणाली :- हे सुंदरी, तूं हे असे म्हणतेस खरी; पण अशा तुझ्यासारख्या दासी मी कधी पाहिल्या नाहीत. अनेक दास व दासींवर सत्ता चालविणारी तू कोणी राजपत्नी असावीस असे मला वाटते. तुझे घोटे उघडे दिसत नाहीत. तुझ्या मांड्या एकमेकींस चिकटलेल्या असून तुझी वाणी, बुद्धि व नाभि हीं तीन गंभीर दिसत आहेत; नासिका, नेत्र, कर्ण, नखें, स्तन व घांटी ही सहा स्थळं तुझ्या शरीरावर उन्नत दिसत आहेत. तुझ्या हातापायांचे तळवे, नेत्रप्रांत, ओठ, जिव्हा व नखे या पाच ठिकाणी आरक्त वर्ण असून हंसाप्रमाणे तुझे भाषण मधुर आहे. तुझे केस व स्तन उत्तम असून तुझा वर्ण श्यामल आहे; तुझे जघनप्रदेश व स्तन पुष्ट असून काश्मीरदेशातील तुरंगमीप्रमाणे तुं सर्वलक्षणसंपन्न आहेस. 

तुझ्या भ्रुकुटी वक्र असून ओठ पिकल्या तोंडल्याप्रमाणे रक्तवर्ण आहेत. उदर कृश असून कंठ शंखाप्रमाणे तीन रेषांनी युक्त आहे. तुझ्या शरीरावरील शिरा दिसत नसून तुझं मुख पूर्ण चंद्राप्रमाणे आल्हादकारक आहे. तुझे नेत्र कमल पत्राप्रमाणे विशाल असून शरदऋतूतील कमलांच्या सुगंधाप्रमाणे तुझ्या शरीराचा सुगंध येत आहे. रूपाने तर तूं कमलनिवासिनी लक्ष्मीची बरोबरी करशील अशी आहेस. या वरून, हे कल्याणि, तू दासी नाहीसच. तर खरे खरे जे काय असेल तं सांग. मग तूं कोणी यक्षिणी, गंधर्व, देवता, अप्सरा, देवकन्या, नागकन्या, नगरदेवता, विद्या घरी, इंद्राणी, वरुणपत्नी, अथवा विधात्याची भार्या किंवा आणखी ही कोणी असावी असे वाटते. हे शुभतनुधारिणी देवांमध्ये ज्या प्रमुख देवता आहेत, त्यातली तू कोण आहेस?” 

द्रौपदी म्हणते :- “हे महाराशि, खरोखर मी देवता, गंधर्वपत्नी किंवा देवपत्नी या पैकी कोणीही नाही, तर मी केवळ एक क्षुल्लक दासी आहे. हे शुभे, मला वेणी फार उत्तम घालता येते, मालती, नानाप्रकारची कमले व चंपक यांचे तऱ्हेतऱ्हेचे हार मला चांगले गुंफता येतात. श्रीकृष्णाची प्रिय राणी जी सत्यभामा, तिच्यापाशी मी कांहीं दिवस होते. आणि कुरुकुलभूषण पांडवांची भार्या जी त्रैलोक्यसुंदरी द्रौपदी, तिच्यापाशीही काही दिवस होते. त्यांच्या मनासारखी मी वागत असल्यामुळे त्यांचं मजवर चांगलं प्रेम असे. त्या मला आपल्याप्रमाणे जेवावयास घालीत आणि वारंवार चांगली चांगली वस्त्रे बक्षीस देत. त्यामुळे मीही मोठी आनंदांत असें. राजपत्नी द्रौपदी मला मालती ह्या नावाने हाक मारी. हे सुदेष्णे, आता मी तुझ्या घरी आले आहे, तर तू मला आपली दासी म्हणून ठेवावे अशी माझी विनंती आहे. 

सुदेष्णा म्हणाली: - अगं, मी तुला मोठ्या आनंदाने ठेवीन ; इतकेच नव्हे, तर मी तुला अगदी जीव की प्राण करीन. पण मला एक भीति वाटते ती ही की, तूं राजाच्या दृष्टीस पडलीस म्हणजे तुझ्यावर तो मोहित होईल व तुझ्यावर प्रेम करूं लागेल! आणि हे इतके घडल्यावांचून कधीही राहणार नाही. कारण तुझ्या रूपाकडे पाहून इतर स्त्रिया तर काय - पण प्रत्यक्ष मजसारख्या राजकुलात उत्पन्न झालेल्या स्त्रीलाही मोह पडत आहे. मग एखाद्या पुरुषाला पडेल यात काय नवल ! अगं, हे तुझ्यापुढे वृक्ष उभे आहेतना! ते वाकले आहेत त्यामुळे मला असे वाटत आहे की, ते तुझ्या सौंदर्याला पाहून तुला नम्र होत आहेत ! तेव्हा तुला पाहून कोणता पुरुष विकाररहित राहील? हे मनोहाराणी, हे सुश्रोणि, हें तुझें अमानविय दैवी रूप पाहून विराट राजाचे माझ्यावरील प्रेम नाहीसे होऊन तो तुझ्यावरच अनुरक्त होईल. हे चपले, विशालनयने, सर्वांगसुंदर, ज्याच्यावर तू आपला नेत्रकटाक्ष फेकशील त्याने तुला पाहिले नसले तरी तो काम विकाराने घायाळ होऊन जाईल; 

मग, हे चारुवदने, सर्वांगसुंदरी, ज्याच्या तू सदोदीत दृष्टीस पडणार, त्याची स्थिति कशी होईल हे काय सांगावें ? आणि असे झाले म्हणजे, आपल्या नाशाकरता आपणच मुद्दाम वृक्षावर चढणाऱ्या पुरुषाप्रमाणे किंवा आपल्या स्वतःच्या नाशाकरितांच गर्भ धारण करणाऱ्या खेकडीप्रमाणे मी आपल्या स्वतःच्या नाशाकरताच तुला ठेवून घेतले असे होईल !

द्रौपदी म्हणते :- हे महाराणी, आपण अनेक कल्पना काढितां खरय पण मी विराट राजाला किंवा इतर कोणालाही कधी प्राप्त होणे शक्य नाही. कारण माझे पांच तरुण गंधर्व पती आहेत व ते एका मोठ्या प्रख्यात गंधर्व कन्येचे पुत्र असून महापराक्रमी आहेत ; आणि ते गुप्तपणाने माझे नेहमी संरक्षण करीत असतात. दुसऱ्याची सेवा करण्याचें त्यांचं व्रत असून माझेही तेच आहे. तरी आम्हां एकमेकांमध्ये अत्यंत प्रेम आहे. मी कोणाच्या एथे सेवक राहिले असता त्याने मला पादसेवन आणि उच्चिष्ट अन्न भक्षण करण्याचा प्रसंग न आणला तर त्याच्यावर माझे, गंधर्व पति खुष असतात. परंतु इतर प्राकृत स्त्रियांप्रमाणें जर कोणी माझा अभिलाष केला, तर मात्र तो मेलाच म्हणून समजावे. बरे, मी होऊन कोणास वश होईन ही कल्पनाच कोणी करू नये. तेव्हा, हे सुदेष्णे, तू निर्भय मनानें मला ठेव.

सुदेष्णा राणी म्हणाली :- हे आनंदिने, असे आहे तर तुझ्या मर्जीप्रमाणे मी तुला ठेवून घेते. कोणाच्या पायाला किंवा उष्ट्याला कधी स्पर्श सुद्धां करण्याचा तुला प्रसंग येणार नाही असा. बंदोबस्त मी ठेवीन. 

या प्रमाणे ती सुदेष्णा द्रौपदीस बोलली असता ती महापतिव्रता द्रौपदी आनंदाने तेथे राहिली आणि गुप्तपणानें राहून तिने दिवस काढले. तिला कोणीही ओळखिलें नाहीं.


सहदेवाने विराट राजाच्या सभेत प्रवेश केला. 

मग नंतर गुराख्याचा वेष धारण करून सहदेवही राजा विराटाकडे आला. त्याचे बोलणेसुद्धा अगदी गुराख्यांप्रमाणे होते. सहदेव जो आला तो प्रथम राजवाड्याशेजारच्या गोठ्यापाशींच उभा राहिला. तेव्हा राजा गोधन पाहण्यासाठी तेथे आला होता. सहदेवाला पाहतांच राजा विराटाने त्याला बोलाविलें; आणि तो नरश्रेष्ठ माद्रीनंदन आपल्या तेजाने झळकत झळकत त्याच्या जवळ पोहोचल्यावर त्याला “तू कोण ? कोणाचा? कोठून आलास? व तुझी इच्छा काय आहे?” असे मोठ्या उत्सुकतेनें विचारिले. 

मग नंतर पुन्हा विराटराजा म्हणाला, यापूर्वी मी तुला कधींच पाहिलेले नाही, तेव्हां खरें काय असेल तें सांग." तेव्हा शत्रूंचा कर्दनकाळ असलेल्या अशा या विराटराजाला मोठ्या गंभीर आवाजाच्या त्या सहदेवानें असें सांगितलें.


सहदेव म्हणाला : - राजाधिराज, मी वैश्य असून माझें नाव तंतिपाळ असे आहे. कुरुकुलोत्पन्न पांडवांचा मी पशुपरीक्षक होतो. प्रस्तुत त्यांचा कोठे ठिकाण नसल्यामुळे मी तुजकडे राहण्याच्या इच्छेने आलो आहे. तर कृपा करून तुम्ही मला चांगला आश्रय द्यावा ही विनंती. दुसरीकडे गेलो तर ज्या कामाचे मला ज्ञान नाही, अशा इतर कामाने माझा निर्वाह व्हावयाचा नाही व तूच ठेवून घेतलेस तर माझ्यायोग्य तुझ्यापाशी काम आहे. शिवाय तुझ्याच पदरी रहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.

विराट म्हणाला - हे तंतिपाळ, तुझ्याकडे पाहता तू वैश्यकर्म करण्यास योग्य आहेस असे मला वाटत नाही. तर तूं ब्राह्मण, क्षत्रिय किंवा समुद्रवलयांकित राजा असावास असे वाटते. याकरिता तू खरा कोण आहेस ते मला सांग. त्याचप्रमाणे तुझा देश कोणता? त्या देशाचा राजा कोण आहे? कोणत्या गुणात तू प्रवीण आहेस? कशारीतीने तू आमच्याकडे राहणार? आणि वेतन काय घेशील ते सर्व सांग.


सहदेव म्हणाला :- पांडूच्या पांच मुलांमध्यें जो वडील बंधु युधिष्ठिर, त्याच्या पदरी मी होतो. त्याच्याजवळ शंभरशंभरांचा एक असे आठ लक्ष, दोनदोनशांचा एक असे एक लक्ष, आणि इतरही आणखी पुष्कळ इतके गाईचे कळप होते व त्या सर्वांवर मी पशुपरीक्षक म्हणून होतो. मला तंतिपाळ असे सर्व म्हणत. मी असेन त्याच्या सभोवती दहा योजनेपर्यंत, गाईंच्या संबधाने पूर्वी काय झाले, आतां काय होत आहे, आणि पुढे काय होईल याचे ज्ञान मला असते. या माझ्या गुणासंबंधाची खात्री त्या महात्म्या युधिष्ठिराला होती. परंतु अलीकडे कित्येक दिवस तो कोठे नाहींसा झाल्यामुळे मी तुजकडे आलो आहे. गाईची वृद्धि जलद कशानें होते, व काय केले असता त्यांना रोग उत्पन्न होणार नाही, हे जाणण्यामध्ये मी कुशल आहे. त्याचप्रमाणे, ज्यांचे मूत्र हुगल्याने वंध्या गाईलाही गर्भ राहतो असे उत्तमलक्षणी बैल कोणते ते मला ओळखता येतात.


विराट राजा प्रसन्न होऊन म्हणाला : - तंतिपाला! ठीक आहे. असे आहे तर मी तुला ठेवितों. माझ्यापाशीं गाईंचे एक लक्ष कळप आहेत व त्यांत कांहीं एकएकाच रंगाचे व कोहीं मिश्र असे आहेत. ते सर्व पशुधन आणि त्यांचे गोपाल या सर्वांना मी तुझ्या स्वाधीन करितो. तू त्याच्यावर चांगल्या रीतीने नजर ठेव. व त्यांचे चांगले संगोपन कर. 

या प्रमाणे त्या प्रजारक्षक विराटाने त्याची माहिती घेऊन त्यास नेमिल्यावर तो नरश्रेष्ठ सहदेव तेथे आनंदानें राहिला. त्याला कोणीही ओळखिले नाही.


विराटराजाच्या गृहीं अर्जुनाचा प्रवेश. 

नंतर तटावर बसलेल्या लोकांनी स्त्रियांप्रमाणे अलंकार घातलेला व स्वरूपानेही स्त्रियांप्रमाणेच दिसणारा असा एक भव्य पुरुष पाहिला. त्याच्या कानांत सुवर्णाचीं मोठाली कुंडले व हातांत शंखाचे चुडे होते. तो आपले लांब हात व सडक केस पसरून सभेमध्ये बसलेल्या विराट राजाकडे जात असतां त्याचा वेग वायूप्रमाणे भासला व त्याच्या गतीने जमीन कांपत असलेली दिसली. ऐरावताप्रमाणे ज्याचा पराक्रम आहे, व अतिशय तेजाने जो विशेष शोभायमान दिसत आहे, आणि ज्याने शत्रूचा नाश करण्याचें सामर्थ्य अंगी असून वेष पालटून ते झांकून टाकिले आहे, असा तो इंद्राचा मुलगा अर्जुन सभेमध्ये आपल्याजवळ आलेला पाहून विराटराजाने सभेमध्ये बसलेल्या सर्व लोकांना विचारिलें.

विराट राजा म्हणाला - अहो, हा मनुष्य - कोठून येत आहे? याबद्दल पूर्वी मला काहीच माहिती मिळाली नाही? यावर, त्या मनुष्याची कोणीच काही माहिती सांगत नाही असे पाहून विराट राजा पुन्हा विस्मयपूर्वक अर्जुनाला उद्देशून बोलला.

विराटराजा म्हणाला :- तू सत्त्वशील दिसत असून देवरूपी मनुष्य दिसत आहेस. तुझा श्यामवर्ण असून तू तरुण असल्यामुळे हत्तीच्या छाप्याप्रमाणे पराक्रमीही दिसत आहेस. त्याच प्रमाणे डोक्याचे केस मोकळे सोडल्यामुळे व कुंडले, हातांतील चुडे व माळा भलत्याच रीतीनें घातलेल्या असल्यामुळे, मुंदर केस असणाऱ्या व कवच, धनुष्य आणि बाण धारण केलेल्या महान् योद्ध्याप्रमाणे तू शोभत आहेस. तेव्हां माझ्या मुलाप्रमाणे अथवा माझ्या स्वतः प्रमाणेच तू रथांत बसून फिरत जा. कारण मी वृद्ध झालो असल्यामुळे सर्व राज्यकारभार इतर कोणावर तरी सोपवावा असा माझा हेतु आहे.  तेव्हां तू आपल्या सामर्थ्याने मत्स्य देशांतील सर्व लोकांचे रक्षण कर. कारण मला तर असे वाटते की, अशा प्रकारचे पुरुष षंढ असण्याचा मुळींच संभव नाही !


अर्जुन म्हणाला – राजा, मला गायनकला चांगली अवगत आहे, मी नृत्यामध्येही प्रवीण आहे, आणि वादनकला मी उत्तम जाणतो. तेव्हां तुझी कन्या जी उत्तरा, तिजकडे माझी नेमणूक व्हावी, म्हणजे मी तिला नृत्य शिकवीन. कोणत्या कारणाने माझे हे रूप असे बनले आहे हे ऐकून घेऊन तुला काय करावयाचे आहे? कारण ते सांगतांना मला मात्र महत् दु:ख होणार आहे. तेव्हां, हे राजा, मी आई  बाप नसलेला असा एखादा मुलगा अगर मुलगी, अथवा बृहन्नला आहे इतकेच तू समज.


विराट राजा म्हणाला :- हे बृहन्नले, तुझे मागणे मी कबूल करितो, व त्याप्रमाणें तू माझ्या मुलीला व तिच्या बरोबरीच्या इतर मुलींनाही नृत्य शिकीव. परंतु हें काम तुला योग्य आहे असे मला वाटत नाहीं. कारण, सयुद्रवलयांकित पृथ्वीचें राज्य करणे हेच तुला उचित आहे.

बृहन्नलेस नृत्यगायनादि सर्व कला अवगत आहेत असे जाणून विराट राजानें या योजने बद्दल आपल्या निरनिराळ्या मंत्र्यांचा विचार घेतला आणि ताबडतोब तरुण स्त्रियांकडून त्याची परीक्षाही करविली व हा कायमचाच क्लिब आहे असे ऐकल्यावरून त्याला अंतःपुरांत जाण्याची परवानगी दिली. पुढे तो बृहन्नला रूपी धनंजय विराट राजाच्या मुलीला, तिच्या मैत्रिणींना आणि तिच्या समवयस्क दासींना गायन व वादन शिकवूं लागला व त्यांचेही याच्यावर अतिशय प्रेम बसलें. या प्रमाणे वेष पालटलेला इंद्रियनिग्रही अर्जुन त्यांच्या मर्जी प्रमाणे वागत असतां अंतःपुरांतील अथवा बाहेरील कोणाच्याही ओळखीस आला नाहीं.


विराटराजाच्या गृहीं नकुलाचा प्रवेश

विराट राजा आपली अश्वशाळा पाहण्यासाठी आला. तेव्हा पांडुपुत्र नकुल अतित्वरेने त्या अश्वशाळेकडे आला. त्याला पाहून तेथील लोकांना असे भासले की, मेघापासून सुटून सूर्यमंडलच आपल्याकडे येत आहे की काय, असा त्यांना भास झाला. त्या नकुलाने तेथे असलेल्या अश्वाकडे दृष्टि फेकिली आणि त्यांच्याकडे तो शोधक बुद्धीने पाहू लागला. हे त्याचे कृत्य मत्सराज विराटाच्या लक्षांत आले. तेव्हा तो आपल्या सेवकांना म्हणाला, “अरे, हा देवतुल्य पुरुष कोठून आला आहे? याची सर्व दृष्टि माझ्या घोड्यांकडे आहे, यावरून हा कोणी मोठा अश्वपरीक्षक असावा असे मला वाटते. तर जा कोणीतरी, आणि त्या देवतुल्य पुरुषाला माझ्याकडे लवकर घेऊन या. 

इतके राजा बोलत आहे तोवर अरिदमन नकुलच त्याच्याजवळ आला. आणि त्याने त्यास विनंती केली. नकुल म्हणाला, हे राजा, तुझे कल्याण असो आणि तुझा जयजयकार होवो.

हे पृथ्वीपते ! मी चांगला विख्यात अश्ववेत्ता असून त्याच कामावर फार दिवस होतो. अनेक नगरे फिरत फिरत, अश्वपरिक्षा करत मी इथे आलो आहे, आता तुझ्याकडे रहावे असा हेतु आहे.

विराटराजा म्हणालाः - ठीक आहे. तुझ्या येण्याने मलाही आनंद झाला आहे. तू मजपाशीं रहात असलास तर मी तुला चांगले वेतन देईन आणि राहण्याला उत्तम स्थळही देईन. कारण माझ्याजवळ रथ पुष्कळ असून तू माझा अश्व सारथी होण्यासही योग्य आहे. परंतु तू पहिल्याने मला हे सांग की, तू आहेस कोण? कोठून आलास आणि मजकडे याने असे तुला कसे वाटले त्याचप्रमाणे तुझ्या अंगी काय काय कसर्वे आहेत?

नकुल म्हणाला :- हे शत्रुनाशका राजा, पांडवांपैकी सर्वात वडील जो धर्मराज, त्याच्या येथे पूर्वी मी होतो. मला अश्वज्ञान चांगले आहे. अश्वांना कसे शिकवावे हेही मला  चांगले समजते. त्यांना काही खोडी असल्यास त्या कशा नाहीशा कराव्या हे मला माहीत आहे. त्याचप्रमाणे घोड्यांच्या रोगांसंबंधी सर्व काही मी उत्तम प्रकारे जाणतो. माझ्या हातातील घोडा कधीही भित्रा निघावयाचा नाही. फार तर काय? घोडी देखील माझ्यापाशी दुर्गुणी रहात नाही. मग घोड्याची ती कथा काय? पांडुपुत्र युधिष्ठिर आणि इतर सर्व लोक मला ग्रंथिक या नांवाने हांक मारीत असत.


विराटराजा म्हणाला - बरे तर, मजपाशी काही घोडे आहेत, ते सर्व आजपासून मी तुझ्या ताब्यात देतो. त्यांच्यावर, त्यांच्या मोतदारांवर व सर्व सारथ्यांवर तू आपले वर्चस्व चालव. आता मला हे सांग की, या कामावर राहण्याकरिता मी तुला वेतन काय द्यावे? तुझ्या स्वरूपावरून तू अश्वकर्म करणारा असावास असे काही मला वाटत नाही. तूं खरोखर राज्यपदाला योग्य असाच आहेस. तुझ्या दर्शनानें मला आज युधिष्ठिराचेच दर्शन झाल्यासारखा आनंद होत आहे. पहा काय त्याची दशा झाली! जो सर्वांच्या स्तुतीसच पात्र, सेवकहीन होऊन वनांत भटकत आहे तेथे तो दिवस तरी कसे कंठीत असेल? आणि त्याला करमत तरी कसे असेल !

या प्रमाणे आनंदित झालेल्या विराटराजाने त्या थोर व गंधर्वाप्रमाणे तरुण पुरुषाला आपल्या पदरी ठेवून घेतले आणि त्याच्यावर तो चांगली प्रीति करू लागला. तोही मोठ्या बेतानें व व्यवस्थेनें राही व त्यामुळे शेवटपर्यंतही कोणाच्या ओळखीस आला नाही. राजा जनमेजया, तात्पर्य सांगावयाचें इतकेच की, त्या समुद्रवलयांकित पृथ्वीपति सत्यप्रतिज्ञ पांडवांनी मत्स्यराज विराटाच्या येथे मोठ्या दक्षतेने राहून आपले अज्ञातवासाचे दिवस मोठ्या दुःखाने काढले !

क्रमशः 

पुढची कथा पुढिल पाचव्या भागात 

भाग एक 005 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html

भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post