भाग 005
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha mahabharat kahani)
जीमूत नावाच्या पहेलवानाचा भीमाकडून वध.
अशा प्रकारें ते सर्व महावीर कुरुनंदन मत्स्यराजाच्या नगरांत गुप्तपणे राहिल्यावर त्यांनी काय काय केले व विराट राजा त्यांच्याकडे निरीक्षण करून विचार करतो. ती कथा पुढिलप्रमाणे :-
विराटनगरीं साहीजणें । गुप्त असतां, नेणिजे कवणें ।
राजा म्हणे, 'माझिया मनें । संशयातें पाविजे ॥
या विराटनगरात हे राहत आहेत खरं पण हे कोण आहेत हे नक्की काही कळत नाही. मला वारंवार संशय येत आहे की हे सामान्य नाहीत.
दिसती जैसे पंचादित्य । म्हणविती ‘पांडवांचे भृत्य.’।
हें तों मातें न वाटे सत्य. । राजे होती निर्धारें ॥
हे पाच मला जणु पाच सुर्य भुमीवर आलेले आहेत. असे वाटते. हे पांडवाचे सेवक आहेत असे हे म्हणतात पण ते अजिबात प्रत्ययाला येत नाही.
पांडव अथवा होत कां आन ।
एकेकाचे अंगीं ऐश्वर्याचें चिन्ह ।
या कंकाचें पाहतां ज्ञान । उणा वाटे सुरगुरु ।।
हे पांडवच आहेत का कुणी आहेत हे कळत नाही. यांच्या सर्वांच्या अंगी ऐश्वर्याचे चिन्ह आहेत. या कंकाचे ज्ञान पाहता इंद्राचा गुरू ब्रुहस्पतिही याच्या ज्ञानासमोर पाणी भरेल. एवढे याचे ज्ञान अफाट आहे.
बल्लवहस्तींचीं दिव्यान्ने । अमृतातें म्हणती उणें ।
अवलोकितां अंगवणें । वायुपुत्रासारिखा ॥
या बल्लवाच्या हातीची अन्ने इतकी दिव्य आहेत की अमृतालाही उणे आणतात. आणि याच्या आंगी वायुपुत्रासारखे बळ आहे.
घेउनि कामिनीचें सोंग | बृहन्नडा लोपवी आपुलें आंग । परि ते पुरुषार्थाची शींग । दिसे अत्यंत वाढती ।।
नारी, नर, किंवा नपुंसक । तर्कितां निर्धार नव्हे एक । क्षात्रविद्ये नरनायक । रामचंद्रासारिखा ॥
ही बृहन्नडा कामिनीचे सोंग घेऊन आपले आंग लपवते आहे, पण हा फार मोठा पुरुषार्थी पुरुष वाटतो. हा नर आहे की नारी आहे, की नपुंसक आहे हे काही कळत नाही. पण हा धनुर्विद्येत रामासारखा वाटतो.
ग्रंथिक अश्वारोहणी । तुळणे न दिसे आन कोणी ।
तंतिपाळ म्हणे, घ्राणीं । वेसण धाळूं नंदीच्या ! ॥
तसेच हा ग्रंथिक किती वेगाने घोडे पिटाळतो आणि हा तंतिपाळ मदोन्मत्त बैलांना व्यसन घालतो.
ऐसियां हातें घेतसे सेवा, । हें अनुचित वाटे माझिया जीवा; ।
पुढें कुशब्द नलगे नांवा । ऐसें केले पाहिजे. ॥
अशा या असामान्य पुरुषांच्या हातून सेवा घेणे हे अजिबात योग्य वाटत नाही, मग निदान आपले शब्द यांच्या जिव्हारी लागू नये ही सावधानता तरी बाळगावी.
दृष्टी पाहातां हे सैरंध्री । भासे शचीचिये सरी ।
सुदेष्णेचें दास्य करी । हेंही अयोग्य मज वाटे ॥
जो करील इचें अभिलाषण ।
तो पावेल तत्काळ मरण ।
या लागीं कोणी अवलोकन । पापदृष्टी न करावें ॥
या सैरंध्रीकडे पाहता असे वाटते की ही जणु स्वर्गाधिपती इंद्राची पत्नी शचिच इथे आली आहे. इतके अप्रतिम सौंदर्य हीचे आहे. हिचा जो अभिलाष करील तो तत्काळ मरण पावेल. म्हणून आपण कधीच हिच्याकडे पापदृष्टी टाकू नये.
आतां असो हा विकल्पू । प्रगट होतील आपेंआपू ।
सांडून शोधायाचा संकल्पू । कौतुक पाहूं काळाचें ॥
आता हा मनातला संशयकल्लोळ थांबवावा, हे आपोआप प्रकट होतील तेव्हा कळेलच, म्हणून यांचे पूर्वचरित्र शोधणे बंद करावे. आता सत्य काय ते काळच सांगेल.
विराट म्हणे सगुणार्थिली : उत्तरा माझी कन्या भली ।
शिष्यीन करूनि आपुली । नृत्य गायन शिकवावे ।।
पुढे विराटराजाने आपली कन्या उत्तरा हिला बृहन्नडेच्या हाती सोपवले. आणि तिला नृत्यगायन शिकवायला सांगितले.
असे भगवान श्रीकृष्णांच्या कृपाप्रसादाने त्यांनी आपल्या अज्ञातवासाचे दिवस तेथे निर्विघ्नपणे अशा प्रकारे काढले. प्रजापालक धर्मराजा विराटराजाचा सभासद होऊन राहिला होता. त्याजवर स्वतः विराटाचे, त्याच्या पुत्रांचे आणि देशांतील इतर लोकांचे चांगले प्रेम असे. फांसे खेळण्यांत निष्णात असल्यामुळे त्या योगाने त्या पांडुपुत्र युधिष्ठिरानें राजाच्या मनाचे चांगले मनोरंजन केले. पक्ष्याला दोरी बांधिली असतां त्याला जसे पाहिजे तसे हटकून फिरविता येते, तसे धर्मराजानें द्युतक्रिडेत पाहिजे ते दान घेऊन दाखविलें.
तो धर्मशील धर्मराजा खेळांत विराटाचे धन जिंकायचा आणि संधी पाहून कोणाला नकळत ते आपल्या भावांजवळ द्यायचा. भीमसेन देखील मत्स्यराजापासून मिळवलेली निरनिराळ्या प्रकारची बक्षिसी घेऊन युधिष्ठिरादिकांना देई. तसेच अर्जुन आपल्या अंतःपुरांत मिळालेली जुनी वस्त्रे इतर सर्व भावांना मोबदला घेऊन देत असे. गवळ्याचा वेष धारण केलेला सहदेवही त्याला मिळालेले दही, दूध, तूप वगैरे जिन्नस इतर पांडवांना देत असे. त्याचप्रमाणे घोड्यांच्या चाकरीनें राजा संतुष्ट होऊन नकुलाला जे काही द्रव्य देई, ते तो आपल्या भावांना देत असे.
द्रौपदी मात्र दुसऱ्याच्या नजरेस न येई अशा तऱ्हेने आपल्या पतीवर लक्ष ठेवून तपोवृत्तीने आचरण ठेवीत असे. याप्रमाणे ते सर्व महान् योद्धे पांडव परस्पर एकमेकांना मदत करून विराट राज्याच्या नगरांत रहात असता पुनः मातृगर्भात असल्याप्रमाणे वागत असत !
अंध धृतराष्ट्राच्या उन्मत्त मुलापासून ज्यांना भीति प्राप्त झालेली होती, ते पांडव द्रौपदीचे चांगल्या तऱ्हेने रक्षण करता यावे म्हणून तिच्यावर नीट लक्ष ठेवून गुप्त वेषाने तेथे राहिले.
असो; या प्रमाणे चार महिने गेल्यानंतर विराटनगरांत ब्रह्मोत्सवाचा मोठा आनंदाचा समय प्राप्त झाला. ब्रह्मलोकी ब्रह्मोत्सवाकरिता किंवा कैलासावर शिवोत्सवाकरिता मंडळी जमते, त्याप्रमाणे विराटनगरीमध्ये त्या ब्रह्मोत्सवाकरिता पंचक्रोशीतली मंडळी जमली. देशोदेशांहून सहस्रावधी मल्ल (पहिलवान) तेथे आले. त्यांची शरीरे धिप्पाड होती, त्यांचा पराक्रमही तसाच मोठा होता व म्हणून ते कालखंज दैत्याप्रमाणे भासत होते.
ते वीर्यप्रभावाने उन्मत्त झालेले होते व बळानेही मुसमुसले होते. अशा त्या बलाढ्य मल्लांचा राजाने अतिशय आदरसत्कार केला. राजाजवळ रंगसभेमध्ये (कुस्तीचे मैदा) ते मल्ल बसले असतां त्यांची माना, भुजा, बाहु व कंवरा सिंहाप्रमाणे दिसत असल्यामुळे प्रेक्षकजन त्यांच्याकडे वारंवार बघत होते. त्यांना ते अभिमानी आणि अतुलपराक्रमी असावे असे वाटत होते. त्यांपैकी एका जीमुत नावाच्या महाबलाढ्य मल्लाने इतर मल्लांना आव्हान केले. परंतु त्याच्या समोर रंगभूमीवर उभा राहण्यास कोणीच धजेना ते सर्व मल्ल खिन्न व हताश झाल्यामुळे मत्स्यराजानें नवीन ठेविलेल्या आचाऱ्यास म्हणजेच बल्लवरूपी भीमास त्याच्याबरोबर युद्ध करायला सांगितले. त्या वेळी भीमाच्या मनांत युद्ध करायचे नव्हते.
कारण आपण युद्ध करावयास लागलो असता कोणी आपणास ओळखील असे त्यास वाटले. परंतु मोठ्या कष्टानें का होईना, पण शेवटी त्यास युद्ध करण्याचाच विचार करणे भाग पडले. कारण उघड रीतीने राजाज्ञेचा भंग करणे हेही त्याला सयुक्तिक वाटेना. नंतर तो पुरुषश्रेष्ठ भीम एखाद्या निर्भय व्याघ्राप्रमाणे निश्चितपणे सावकाश पावले टाकीत टाकीत व चालता चालता विराट राजाची प्रशंसा करीत करीत मोठ्या हौद्यामध्ये उतरला.
तो कुंतीपुत्र भीम आपला काचा कसावयास लागला असता त्याला पाहून लोकांना आनंद झाला. नंतर, वृत्रासुराप्रमाणें बलवान् अशा त्या मलाला भीमाने आव्हान केले. त्या मल्लाचे नाव जीमूत असे होते व त्याच्या पराक्रमाचीही सर्वत्र ख्याति होती. त्या वेळी त्या दोघांनाही अतिशय उत्साह वाढला व ते दोघेही मोठे पराक्रमी असल्यामुळे साठ वर्षाच्या तयार व मस्त आणि प्रचंड हत्तींप्रमाणे दिसत होते. अशा स्थितींत त्या दोघां नरवीरांनी मोठ्या उल्हासानें बाहुयुद्धास सुरवात केली.
दोघेही एकमेकांवर जय मिळविण्याच्या ईर्षेनें झगडूं लागले. त्यांचे युद्ध वज्र आणि पर्वत या दोघांतील युद्धाप्रमाणेच अतिशय भयंकर असे झाले. त्या दोघांचीही शक्ति लोकोत्तर होती; ते एकमेकांवर जय मिळविण्याकरितां एकमेकांची व्यंगें शोधून काढण्याचा प्रयत्न करीत होते ; आणि उभयतांही उन्मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे गर्जना करीत होते. त्यांनी निरनिराळ्या प्रकारचे पेंच व उलटपेंच आरंभिले.
एकाने दुसऱ्याला चित्रविचित्र कवा घालून मर्मस्थळीं धरून चीत करण्याचा प्रयत्न करावा, तर दुसऱ्याने तो पेंच उकलून उलट त्यासच पुनः मर्मस्थळीं पकडावें. एकानें दुसऱ्याला दंडांचे किंवा मुठींचे ठोंसे लगवावयास जावें, तर दुसऱ्याने ते चुकवून त्यास तोंडघशी पाडावें.
एकानें दुसऱ्याला धडक द्यावी, तर दुसऱ्यानें त्या धडकेतच उलट धडक बसेल अशा रीतीनें प्रतिकार करावा. एकानें दुसऱ्यावर स्वारी भरावी, तर दुसऱ्यानें ती उखडून टाकावी. एकमेकांनी एकमेकांचे हात ओढावे, एकमेकांनी एकमेकांस उखाड द्यावी, व एकमेकांनी एकमेकांवर खडी टांग, खडी स्वारी, माण, पछाड, ढुंगणी इत्यादि पेच करून एकमेकांस जिंकण्याचा प्रयत्न करावा. याप्रमाणे, शस्त्रे वगैरे न घेतां केवळ बाहुबळावरच, या उत्सवानिमित्त जमलेल्या शूर लोकांसमक्ष हे घोर युद्ध झालें.
वृत्रासुर आणि इंद्र ह्या दोघांमधील युद्धाप्रमाणे हे भयंकर युद्ध चालले असता सर्व लोक ज्याची सरशी होई त्यास उद्देशून "शाबास, शाबास ! वाह वा, वाहवा !" वगैरे उत्तेजनपर शब्द बोलत व त्यामुळे त्यांना अतिशय हुरूप येत होता. ते दोघे युद्ध करीत असतां एकमेकांस ढकलत होते, एकमेकांस आपणाकडे ओढून घेत होते, एकमेकांस फिरवत होते, गुडघे देत, व दुसरेही अनेक प्रकार करीत. ज्यांच्या छात्या विस्तीर्ण, व भुज लांब आणि लोहदंडांप्रमाणे बळकट होते असे ते दोघेही बलाढ्य मल्ल मोठमोठ्यानें गर्जना करीत व एकमेकांची निंदा करीत.
असे युद्ध होतां होतां नवनागसहस्र बळीया असलेल्या त्या शत्रुनाशक भीमसेनानें आपली निंदा करणाऱ्या त्या जिमुत मल्लाच्या दंडाला धरून ओढून त्याला खाली पाडिलें. त्या वेळीं मोठी गर्जना करून एखाद्या हत्तीला धरून खालीं आपटणाऱ्या व्याघ्राप्रमाणे भीमसेन दिसूं लागला. नंतर त्या विजयशाली महाबाहु भीमसेनानें त्याला पुनः उचालिले आणि गरगर फिरविलें. त्या वेळी सर्व मल्लांना व मत्स्य देशांतील इतर नागरिकांना अतिशय आश्चर्य वाटलें.
राजा, नंतर भीमसेनाने त्या जीमूताला शंभर वेळ गरगर फिरविलें व तो अगदीं निचेष्ट झाला असे पाहून त्याला भूमीवर आपटलें ! राजा, त्या समयीं जीमूताचा प्राण गेला व ते पाहून पांडवांसह विराटाधिपतीला अतिशय आनंद झाला ! नंतर विराट राजाने कुबेराप्रमाणे त्या बल्लवाला विपुल धन अर्पण केले.
याप्रमाणे भीमसेनानें पुष्कळ मल्लांचा व बलिष्ठ पुरुषांचा समाचार घेतला व मत्स्य राजाचें लोकोत्तर प्रेम संपादिलें. भीमाशी लढण्यासारखा कोणीही पुरुष आढळत नाही, तेव्हां मत्स्याधिपति हा अंतःपुरांत स्त्रियांसमक्ष भीमाची सिंह, व्याघ्र व गज यांच्याशी झुंज लावू लागला.
पांडुपुत्र अर्जुनानेही नृत्यगायनाच्या योगाने अंतःपुरांतील स्त्रियांचे व विराट राजाचें प्रेम जोडिलें. अश्वविद्येतील निपुणता विराटाच्या प्रत्ययास आणून देऊन नकुल हा विराटराजाचा प्रियकर बनला व विराटराजाने त्यास मोठ्या आनंदानें पुष्कळ धन दिलें. सहदेवानें बैल शिकवून तयार केले होते ते पाहून विराटराजा फार प्रसन्न झाला व त्यासही त्यानें अमित द्रव्य अर्पिलें, अशा प्रकारे ते सर्व महारथी पांडव परक्याच्या दास्याचे क्लेश दुःख सहन करून अज्ञातवासांतले दिवस घालवीत होते. ते पाहून द्रौपदीचें मन सारखे तळमळत होते. ती एकसारखे दुःखाचे सुस्कारे टाकीत होती! पण नाइलाज होता. एक वर्षापर्यंत काहीच करता येणे शक्य नव्हते.
क्रमशः
पुढची कथा पुढिल सहाव्या भागात
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html