भाग 007
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha mahabharat kahani)
सुदेष्णा सैरंध्रीला सुरा आणण्यासाठी पाठवते.
द्रौपदीचे अशा धिक्कारण्यामुळे किचक गप्प राहिला व राणी सुदेष्णेजवळ गेला. द्रुपदराजकन्या द्रौपदीने असा धिःकार केल्यावर, अमर्याद व घोर काम वासनेने घेरलेला तो कीचक सुदेष्णेला म्हणाला "हे कैकेयि, सैरंध्री मला प्राप्त होईल असा काहीतरी उपाय कर. सुदेष्णे जेणेकरून ती गजगामिनी सैरंध्री माझी दासी होईल अशी तू युक्ति कर, नाहीतर मला वेड लागून त्याच्या भरांत मी प्राणत्यागही करीन! "
याप्रमाणे त्याने अनेक प्रकारें विनवणी केली, तेव्हा त्याचे काकुळतीचे बोलणे ऐकून विराटाच्या त्या थोर राणीला त्याची दया आली. आपण कीचकास पूर्वी दिलेली सल्ला मनात आणून आणि त्याच्या कार्याबद्दल व द्रौपदीकडे असलेल्या कामगिरीबद्दल विचार करून सुदेष्णा त्या कीचकाला म्हणाली, “पर्वणीच्या दिवशी तू सुरा व अन्न तयार करव. म्हणजे त्या ठिकाणी हिला मी तुझ्याजवळ सुरा आणण्यासाठी पाठवीन. त्या ठिकाणीं हिला पाठविल्यावर, जेथे अगदी कशाचा अडथळा नाही अशा एकांतात तू हिचें पाहिजे तसे मन वळविण्याचा प्रयत्न कर आणि सुखासमाधानाने ती वश झाली तर पहा !”
असे ती म्हणाल्यावर कीचक तेथून निघून गेला आणि त्यानें बहिणीच्या सांगण्याप्रमाणे, त्याच वेळीं, राजांनी सेवन करण्यास योग्य अशा प्रकारची उत्तम बनविलेली दारू आणविली आणि कुशल आचाऱ्यांकडून नानाप्रकारची लहानमोठी पक्वान्ने, उत्तम अन्नें व तसेच सुंदर पेय तयार करविले. याप्रमाणे सर्व सिद्धता केल्यावर त्याने त्याबद्दल हळूच सुदेष्णेस वर्दी दिली आणि त्याच वेळीं सुदेष्णेनें सैरंध्रीस कीचकाच्या घरीं पाठविले ! सुदेष्णा म्हणाली :- सैरंध्री, उठ, कीचकाच्या घरी जा, आणि मद्य घेऊन ये. हे कल्याणी, मद्य पिण्याच्या इच्छेने मी फारच व्याकूळ होत आहे.
सैरंध्री म्हणाली :- हे राजकन्ये, मी काही त्याच्या घरी जाणार नाही. कारण, राज्ञि, तो किती निर्लज्ज आहे हे तू जाणतेच. हे भामिनि, तू सर्वभोग पूर्ण सुंदर आहेस. तुझ्या घरी राहिले असले तथापि येथें मी मनसोक्त वर्तन करून आपल्या पतीशी द्रोह ( व्यभिचार ) कदापि करणार नाही ! शिवाय, हे देवि, मागे मी तुझ्या घरामध्ये पाय ठेवतांनाच याविषयी कशी प्रतिज्ञा केलेली आहे, हे तुला माहीत आहेच. हे सुकेशि, किचक तर धुंद व मदनाने चढून गेलेला आहे. तो - मला पाहताच माझी काही खोडी करील. हे कल्याणि, मी काही तिकडे जाणार नाही. शिवाय, राजपुत्री, पुष्कळ आज्ञापालक दासी तुझ्या तैनातीला आहेत, तेव्हा फार जरूरीचे असेल तर दुसऱ्या एखादीला पाठव. देवी, तुझें कल्याण असो. मला तू पाठवू नको. कारण तो खात्रीने माझा अपमान करील !
सुदेष्णेने सांगितले :- मीं तुला येथून पाठविल्यावर तो तुझ्या केसालाही कदापि धक्का लावणार नाही, समजलीस ! असे म्हणून तिने सैरंध्रीच्या हातांत एक झाकणासह सुवर्णपात्र दिले. तेव्हा ती भीत भीत व रडत रडत दैवावर हवाला ठेवून मद्य आणण्यासाठी कीचकाच्या घरी गेली. जातांना ती मनांत म्हणाली, 'ज्यापेक्षा पतीवांचून दुसऱ्या कोणालाही मी ओळखीत नाही, त्यापेक्षा त्या पुण्याईच्या जोरावर, मी तेथे गेले असता कीचक मला अटकेत न ठेवो म्हणजे झाले !”
मग त्या अबलेने मुहूर्तमात्र सूर्याची उपासना केली. तेव्हा त्या तनुमध्यमेचा सर्व अभिप्राय सूर्याने जाणला आणि लगेच तिच्या रक्षणाविषयी एका गुप्त राक्षसास आज्ञा केली. तेव्हा त्या ठिकाणीं कोणत्याही अवस्थेत तो राक्षस त्या पुण्यशीलेला सोडून दूर गेला नाही. मग बावरलेल्या मृगीप्रमाणे द्रौपदी कांपत कांपत जवळ येत आहे असे पाहून, नदीपार होऊ इच्छिणारास नाव सापडली असता तो उत्सुकतेनें उभा राहतो त्याप्रमाणे तो सूतपुत्र कीचक हर्षाने उभा राहिला !
द्रौपदीची अप्रतिष्ठा ! कीचक म्हणाला - हे सुकेशान्ते, तुझे स्वागत असो. आज मला सुदिनच उगवला ! कारण तू घराची मालकीण घरी येऊन पोहचलीस ! ठीक आहे. आता माझे मनोरथ पूर्ण कर. तुझ्यासाठीं चाकर सोन्याच्या माळा, शंखांचे चुडे, निरनिराळ्या नगरांतून आणलेल्या रत्नाची केलेलीं व सोन्याच्या कोंदणांत बसविलेली शुक्र कुंडलें, सुंदर चूडामाण, आणि रेशमी वस्त्रे आणून त्याचप्रमाणे माझी दिव्य शय्या तुझ्यासाठी तयार करून ठेविली आहे ! तेव्हा, सुंदरी, ये, आणि माझ्याबरोबर मधुमाधवीचा रस ( दारू ) प्राशन कर.
त्या कामांधाचे बोलणे ऐकून द्रौपदी म्हणाली :- मी काही स्वतः तुझ्याकडे आलेली नाही. महाराणी सुदेष्णेने सुरा आणण्यासाठी मला तुझ्याकडे पाठविले आहे. 'मला तहान लागली आहे, लवकर मला सुरा आणून दे.' असे तिने सांगितले आहे. तिचे बोलणे मध्येच थांबवत कीचक म्हणाला कल्याणी, एवढेच ना? तू राजकन्येला कबूल केले असलेस म्हणून भिऊं नको. तू जे नेणार आहेस ते पेय दुसऱ्या दासी घेऊन जातील. असे म्हणून त्या सूतपुत्राने तिचा उजवा हात धरला ! तेव्हां द्रौपदी ह्मणाली, दुष्टा, ज्यापेक्षा भी धुंद होऊन कधी मनानेही पतींचे बिलकूल अतिक्रमण केले नाही, त्यापेक्षा ते सत्याचरणच तुला पाप्याला स्ववश करून हीनदशेला नेत आहे असे मी पाहीन !
द्रौपदी याप्रमाणे डोळे वटारून त्याची निर्भर्त्सना करीत असता तिला धरण्याची इच्छा बाळगणारा तो कीचक तिच्याकडे पहात होता. मग द्रौपदीने एकदम हिसडा मारून आपला हात सोडविल, परंतु कीचकानें तिचा पदर पकडला. तो तिला मोठ्या जोराने ओढू लागला, परंतु वरचेवर सुस्कारे टाकीत त्या राजकन्या द्रौपदीने त्याला जो हिसका मारिला, त्या हिसक्यामुळे कापलेल्या वृक्षाप्रमाणे पापी कीचक आडवा पडला ! याप्रमाणे कीचकाने पकडले असता कांपत असलेली ती द्रौपदी त्याला भूमीवर आदळून तेथून जी निघाली ती जेथे युधिष्ठिर व विराट राजा बसले होते त्या सभेकडे रक्षणार्थ धावली ! परंतु ती धावत असतां कीचकाने मागून येऊन तिची वेणी धरिली आणि सर्वांदेखत तिला लाथ मारून खाली पाडले. इतक्यांत सूर्यानें तिच्याबरोबर ज्याची योजना केली होती त्या राक्षसाने अत्यंत वेगाने कीचकास दूर उडविले. तेव्हा, त्या राक्षसाच्या बलानें जर्जर होऊन कीचक छिन्नमूल वृक्षाप्रमाणे निचेष्ट पडला व आतल्या आत गुरगुरू लागला!
तेथे बसलेल्या भीमसेनाने व युधिष्ठिरानें हा व सर्व प्रकार पाहिला; आणि कीचकाने द्रौपदीची सुकेलेली अप्रतिष्ठा त्यांला सहन झाली नाही ! भीमसेनास तर त्यास ठार केव्हा करीन असे होऊन गेले. तो रागारागानें दात चावू लागला, त्याचे डोळे वटारले जाऊन त्यांवर धूर चढला, आणि घामाने भिजलेल्या भयंकर भिवया कपाळावर चढल्या ! त्या वीरांतकानें कपाळावर हात मारला आणि लगेच तो रागारागानें एकदम त्वरेने उठूही लागला ! तेव्हा आता आपण ओळखले जातो की काय अशी युधिष्ठिरास भीति पडली व लगेच त्याने अंगठ्याने त्याचा अंगठा दाबून खुणेने भीमसेनाचा निषेध केला. तथापि तेवढ्यानेही त्याच्या मनोवृत्ति न आवरून तो मत्तगजाप्रमाणे वृक्षांकडे पाहू लागला. तेव्हा युधिष्ठिरानें त्याला आवरून धरले; आणि तो त्यास अन्योक्तीनें म्हणाला, “ए सूदा, तुला लाकडे पाहिजेत म्हणून वृक्षांकडे पाहतोस की काय ? अरे, तुला लांकडांची जरूर असेल तर बाहेर जाऊन हवे तितके वृक्ष तोड़ !”
इकडे, सभाद्वारी रडत बसलेली ती द्रौपदी मनांत खिन्न झालेल्या आपल्या पतीकडे पहात अज्ञातवासाची प्रतिज्ञा शेवटास जाण्यासाठी आपले खरे स्वरूप प्रकट होऊ नये म्हणून जपत जपत पण घोर दृष्टीने जणू काय दग्ध करीतच मत्स्यपति विराटाशीं बोलू लागली.
द्रौपदी म्हणे विराटराया :
वसो आलिया तुझिया ठाया :
तुजपुढे अन्यायकर्तेया : शिक्षा कैसी न करिसी ।।
द्रौपदी म्हणाली, " हायहाय ! ज्यांचा वैरी पाच देशामध्ये टाकून सहाव्या देशांत रहात असला तथापि त्यास स्वस्थ झोप येऊ नये, त्या महाभागांच्या मज मानी भार्येला यःकश्चित् सूतपुत्राने लाथ मारली ! जे कधीही याचना करीत नाहीत, उलट धर्म मात्र करीत असतात, अशा ब्रह्मनिष्ठ व सत्यवादींची मी सन्माननीय भार्या असतांना या सूतपुत्राने मला पायाने की हो तुडविले ! अहो ! ज्यांचा दुंदुभिघोष व प्रत्यंचेचा टणत्कार. अहर्निश ऐकूं यावयाचा, त्यांच्या मानी स्त्रियेला या सारथ्याच्या पोराने पायाने डिवचलें ! जे मोठे तेजस्वी, मनोग्रही, बलवान, व अतिशय मानी आहेत, त्यांच्या या अभिमानी पत्नीला सूतपुत्राने लत्ताप्रहार केला ! माझे पति सर्व जगाचाही नाश करतील, पण हाय हाय ! आज ते धर्मबद्ध आहेत ! पण ते धर्मबद्ध असले म्हणून काय झाले? त्यांच्या भार्येला मज मानिनीला या सूतपुत्राने असा पादस्पर्श करावा काय? रक्षणाविषयी प्रार्थना करीत कोणीही आले तथापि त्यांना जे आधारभूत होतात, ते महारथी आज वेषांतराने जगांत कोठे बरें भटकत असतील? अहो ! ते बलाढ्य व अमितपराक्रमी असतांना त्यांच्या प्रिय व धर्मनिष्ठ पत्नीचा या सूतपुत्राने केलेला हा अपमान ते षंढांप्रमाणे कसा सहन करीत आहेत ! हायहाय !
दुष्ट कीचक प्रत्यक्ष भार्येची अमर्यादा करीत असतांना तिचें रक्षण करण्याचेंही ज्यांच्या मनांत येत नाही, त्यांचा पराक्रम, तेज किंवा चीड आज गेली तरी कोठें ! अरेरे, मी निरपराधी असतां माझा असा डोळ्यांदेखत अवमान झालेल में जो सहन करीत आहे, तो विराट राजा, तर धर्मदुष्टच आहे! आता मी काय करूं ! हा राजा कीचकाविषयीं तरी निदान आपल्या राजकर्तृत्वास अनुसरून वागत नाहीं खास ! राजा, हा तुझा अनायसारखा धर्म सर्भेत कांही शोभत नाहीं ! हे मत्स्यराजा, तुझ्या समक्ष यानें मला मारावें असा मी कोणताही अपराध केलेला नाहीं. निदान तुझ्या समक्ष तरी असला प्रकार होऊ नये !
अरेरे, राजा लक्षच देत नाही त्यापेक्षा कीचकाच्या या उच्छृंखलपणाकडे सभासदांनी तरी लक्ष पुरवावें ! काय? कोणीच ऐकत नाहीं ? हाय हाय ! कीचक तर धर्महीन आहेच, पण मत्स्यराजालाही बिलकूल धर्म कळत नाही आणि त्याच्या भोंवतीं बसलेल्या या सभासदांनाही धर्म म्हणजे काय याचा गंध नाही !
याप्रमाणे बोलून त्या वेळीं ती द्रौपदी डोळ्यांत पाणी आणून मत्स्याधिपति विराट राजाची निंदा करूं लागली,
विराट म्हणे स्त्रीचरित्र । न कळे प्रकट गुह्य मंत्र ।
कैसे एकांतीचे सूत्र । नेणवे आमुते ।।
तेव्हां विराट राजा म्हणाला, “तुम्हा दोघांचे भांडण आमच्या देखत झालेले नसल्यामुळे त्याची आम्हांस माहिती नाहीं. तेव्हा यातील तथ्य काय आहे हे समजल्याशिवाय आमची बुद्धि काय चालणार?”
मग द्रौपदीचें म्हणणे काय आहे हे समजून घेतल्यावर सभासद तिची एकसारखी प्रशंसा करूं लागले. तिला ते ' शाबास, शाबास ! ' असें म्हणूं लागले व कीचकाची निंदा करूं लागले.
सभेत बसलेले सर्व सभासद म्हणाले : - ही विस्तीर्णनयना चारुसर्वांगी ज्याची भार्या असेल, त्याचा विलक्षणच लाभ समजला पाहिजे. त्याला कदापि शोक करण्याचा प्रसंग यावयाचा नाही. खरोखर अशा प्रकारची विरांगना मनुष्यांत मिळणे दुर्लभ होय ! ही सर्वांगसुंदरी स्त्री कोणी तरी देवताच असावी असे आम्हांस वाटतें !
याप्रमाणे ते सभासद कृष्णेकडे पाहून तिची प्रशंसा करूं लागले. युधिष्ठिराच्या कपाळावर तर रागामुळे घाम आला. मग तो कुरुराजा आपल्या प्रिय राणीला म्हणजे राजकन्या द्रौपदीला म्हणाला, 'सैरंध्री, जा, येथे उभी राहूं नको. सुदेष्णेच्या महालांत जा. पतीला अडथळा न करणाऱ्या म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या वीरपत्नींना असेच क्लेश होत असतात, परंतु साध्वी स्त्रिया पतिसेवा करण्यांत शरीर झिजवून शेवटी पतिलोक मिळवीत असतात !
मला वाटते की, हा क्रोधाचा समय नाही असे तुझ्या पतींस वाटत आहे आणि त्यामुळेच ते सूर्यासारखे तेजस्वी गंधर्व तुझ्या रक्षणार्ध धावून येत नाहीत. सैरंध्रे, तुला काळवेळ समजत नाही आणि त्यामुळे एखाद्या निर्लज्जेसारखी तूं येथे रडत बसली आहेस. येणेकरून तूं या राजसभेत द्यूत खेळणाऱ्या मत्स्य देशच्या मुत्सद्द्यांना विघ्न मात्र करीत आहेस ! तेव्हां, सैरंध्री, जा, गंधर्व तुझें मनोगत पूर्ण करतील; आणि ज्याने तुजशी वाईट वर्तन केले त्याचा नायनाट करून तुझे दुःख दूर करतील !”
सैंरध्री म्हणालीः - त्या नेभळ्या पतींसाठी मज धर्मचारिणीला फारच दुःख सोसावे लागत आहे ! कारण ज्यांच्यातील वडीलच जुगारी बनला आहे, त्यांची कोणीही अप्रतिष्ठा करावी ! असे म्हणून द्रौपदी सुदेष्णेच्या मंदिरांत निघून गेली. त्या वेळी त्या सुंदरीचे नेत्र रक्तासारखे लाल झाले होते, केस मोकळेच सुटलेले होते, आणि फार वेळ रडत असल्यामुळे त्या वेळी तिचे तोंड मेघपटल निघून गेलेल्या आकाशांतील शशिमंडलाप्रमाणे पांढरे फटफटीत दिसत होतें. मग तिला पाहतांच सुदेष्णा म्हणाली, "हे वरांगने, तुला कोणी दुखविलें बरें ? अग, तू रडतेस कां ? हे कल्याणी, आज तुला दुःख देऊन कोणी आपल्या सुखाचें वाटोळे करून घेतले? अगं, तुझा अपराध केला तरी कोणी ?
द्रौपदीनें सांगितले - देवि, तुला सुरा आणण्यासाठीं मी गेलें असता तेथें कीचकाने माझी अप्रतिष्ठा केली, आणि त्या निर्जन एकांतांत त्यानें माझा अपमान केला तसाच तो सभेमध्ये राजाच्या देखतही केला !
सुदेष्णा म्हणाली:- हे सुकेशि, कांहीं हरकत नाही. तूं सांगत असशील तर ज्यानें काममोहित होऊन दुष्प्राप्य अशा तुझा अपमान केला त्या कीचकाला मी ठार देखील मारवीन !
परम दुःखे शोक करीत । सुदेष्णेसि जाणवि मात ।
सैरंध्रीनें उत्तर केलें:- राज्ञि, असे करावयास नको. ज्यांचा त्याने अपराध केला आहे ते दुसरेच त्याचा वध करतील. मला असेही वाटते कीं, तो आजच खात्रीने यमलोकीं जाईल !
क्रमशः
पुढची कथा पुढिल आठव्या भागात
भाग 008 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/008-virat-parva-marathi-katha.html
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html
भाग पाच 005
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html
भाग 007 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html