भाग 008 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 008 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 008

विराटपर्व कथासार मराठी 

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 


द्रौपदीचा पाकशाळेत जाऊन भीमासमोर विलाप 

यानंतरें निशाकाळीं । कृष्णा पातली धर्माजवळी,। 

हृदय पिटुंनी पाणीतळीं । शोक करी आक्रोशें ॥ 

म्हणे, 'तुमचें पुरुषत्व काय झालें ? । 

नामरूपातें बुडविलें;

रंकाचेंही रकत्व आलें । भणग केलें प्रारब्धं ॥

राया द्रुपदाची आत्मजा । भगिनी होय श्रीकृष्णराजा । पांचा पांडवांची भाजा । श्रेष्ठ स्नुषा पंडूची ॥

समेत समस्तां देखत । कीचकें मारिली मातें लात, । 

आतां तुमचा पुरुषार्थ । कोणा येईल उपयोगा ॥

 खांडववनातें जाळिलें । निवाकवचातें वधिलें । 

तें अवघेंचि वांयां गेले। मज ताडितां कीचकें ! ॥

तुमचें धनुष्य आणि बाणू | वेगीं ब्राह्मणा देइजे दानू,। 

पुरुषां देखतां कुलांगनू । नीच पुरुषे गांजिली ! ॥

 दिव्या स्त्रातें साधिलें, । युद्धीं शिवातें तोषविलें । 

तें अवघेंचि वायां गेलें । मज ता डितां कीचकें ! ॥  

हेडंब - बकातें मारिलें, । कि-जटासुरातें वधिलें । 

तें अवघेंचि वायां गेलें । मज ताडितां कीचकें ! ॥ 

पौलोम, काळ्यातें वधिलें, । जयद्रथातें विटंबिलें, 

तें अवघेंचि वायां गेलें । मज ताडितां कीचकें ! ॥ 

स्वयंवरीं जिंकूनियां पण । हरिला कौरवांचा मान । 

तें अवघेंचि जालें शून्य । मज ताडितां कीचकें ! ॥

त्या सर्व सौभाग्यसंपन्न राजपत्नी द्रौपदीला कामातुर भ्रमिष्ट कीचकाने ताडन केल्यामुळे ती भामिनी त्या विराटाच्या सेनापतीचा वध करण्याची इच्छा मनात धरून आपल्या घरी गेली. मग त्या द्रुपदकन्येने यथायोग्य रीतीनें शरीरशुद्धि केली. त्या याज्ञसेनिने सर्व अंग अवयव व वस्त्रे पाण्याने स्वच्छ धुतली, आणि ती रूदन करीत या अपमानाच्या दुःखाचा शेवट कसा होईल याचे चिंतन करीत बसली. मी आता काय करू ! कोठे जाऊ ! माझे हे कार्य कसे शेवटास जाणार? असा विचार करता करता तिला मनांत भीमाचे स्मरण झाले. माझ्या मनातील मनोरथ पूर्ण करणारा आज इथे भीमसेनावांचून दुसरा कोणीही नाही ! असे ती मनांत म्हणाली. मग मोठ्या मानसिक दुःखाने ग्रस्त झालेली ती सनाथ पतिव्रता विशालाक्षी व मानी द्रौपदी रात्री आपले अंथरूण सोडून उठली आणि श्रीकृष्ण भगवंतांचे चिंतन करीत भीमसेन निजला होता त्या घराकडे त्वरेने धावत गेली. ती मनांत  म्हणाली, 'आज ते अघोर कर्म करणारा व माझा द्वेष्टा तो पापी सेनापति जिवंत असतांना माझ्या पाचही पतींना झोपच कशी येत आहे!' 

 असे म्हणून त्या मनस्विनीने बल्लवाच्या घरात प्रवेश केला. तेथे भीमसेन मृगराजाप्रमाणे घोरत पडला होता ! तिच्या रूपाने व महात्म्या भीमसेनाच्या कांतीने ती पाकशाला खुपच प्रकाशमान झाली. मुदपाकखाण्यात आल्यावर ती शुचिर्भूत द्रौपदी वनांत तीन वर्षाच्या वयाची पांढरी शुभ्र कालवड मोठ्या वृषभाजवळ उभी राहते त्याप्रमाणे भीमसेनाजवळ उभी राहिली; आणि गोमतीतीरावर वाढलेल्या मोठ्या प्रफुल्ल शालवृक्षास लता कवटाळिते त्याप्रमाणे पांचालीने त्या मध्यम पांडुपुत्राला आलिंगन दिले. सिंहिणीने बिकट अरण्यांत निजलल्या सिंहास जागे करावे त्याप्रमाणे त्या साध्वीने बाहूंनी कवटाळून त्यास जागे केले; तिने महागजास आलिंगन देणाऱ्या हत्तिणीप्रमाणे भीमसेनास मिठी दिली; आणि ती प्रशंसनीय पांचाली आपल्या वीण्याप्रमाणे मधुर आवाजाने व उत्कष्ट गंभिरस्वरानें भीमसेनास म्हणाली, "भीमसेन, उठा उठा, मेल्यासारखे व्यर्थ निजला हे काय? कारण जिवंत मनुष्याच्या भार्येचा अपमान करणारा पापी कदापि जिवंत राहू शकत नाही !"

राजकन्या पांचालीनें भीमसेनास उठविले, तेव्हा तो गाढ निद्रा सोडून, गाद्या आंथुरलेल्या त्या पलंगावर उठून बसला; आणि आपली प्रिय पट्टराणी जी द्रौपदी तिला म्हणाला, “तू कोणत्या कामासाठी इतकी घाईघाईने माझ्याजवळ आली आहेस? अगं, तुझी कांतिही रोजच्यासारखी दिसत नाही. तू कृश व फिकट दिसत आहेस ! तेव्हा जे काही सांगावयाचे असेल ते सर्व मला नीट समजावून सांग. ते सुखाचे असो किंवा दुःखाचे असो, आणि द्वेष्य असो किंवा प्रिय असो, जे असेल ते सर्व जसेच्या तसेच सांग; म्हणजे ते ऐकून पुढे काय करता येईल हे मला समजेल. कृष्णे, तू सर्व कार्यामध्ये : मजवरच विश्वास टाकीत जा. मी मोठ्या संकटांतूनही तुझी वारंवार सुटका करीन. तुझे जे इच्छित कार्य असेल ते इच्छेनुरूप लवकर सांग आणि तू इकडे आल्याचे कोणाच्या लक्ष्यात आले नाही तोच आपल्या अंथरुणावर जाऊन पड.


द्रौपदीने युधिष्ठिराची निंदा करून विलाप केला 

द्रौपदी म्हणालीः - हे भीमसेना, ज्या अबलेचा युधिष्ठिर हा पती आहे, तिला सुख कुठून असणार? हे नाथ तुम्ही आपण माझी सर्व दुःखें जाणत असतांना मला उगीच कां विचारत आहात? हे भारता, त्या वेळी कौरवांच्या सभेत तो दुष्ट दुशाःसन मला दासी म्हणून भरसभेत घेऊन मेला, ती गोष्ट मागिल १३ वर्षांपासून माझे अंतःकरण भाजून काढीत आहे. तुच विचार कर अशा प्रकारचे दुःख झाले असता मज द्रौपदीशिवाय दुसरी माझ्यासारखी कोणती राजकन्या जिवंत राहील बरे? वनवासांत गेल्यावर त्या दुष्ट जयद्रथाने स्पर्श केला, हा दुसरा प्रसंग तरी सहन करण्याचे धैर्य कोणाला आहे? आणि आता तिसऱ्याने तर मत्स्यराजासमक्ष आणि त्या जेष्ठ पांडुपुत्र युधिष्ठिराच्या डोळ्यांदेखत किचकाने हात टाकला असता माझ्यासारखी कोण जिवंत राहील? भारता, अशा पुष्कळ प्रकारच्या क्लेशांनी मी झिजत असता, हे कौंतेया, त्याचे आपणास काहीच वाटत नाही, त्यापेक्षा माझा जगून तरी काय उपयोग? हे भारता, कीचक म्हणून जो विराटराजाचा श्यालक व सेनापति आहे, त्याची बुद्धि फारच दुष्ट आहे. नरवीरा ! सैरंध्रीच्या वेषाने राजवाड्यांत राहिलेल्या मला तो दुरात्मा माझी बायको हो ! असे रोजच म्हणत असतो. तो माझ्याशी असे बोलू लागला म्हणजे त्याच्या त्या शब्दांनी माझे हृदय विदीर्ण होऊन जाते. महाराज! आपण शत्रूस जिंकणारे आहात आणि तो दुष्ट खरोखर वधण्यास योग्य आहे ! शिवाय वाईट प्रकारचा जुगार खेळणारा आपला वडील भाऊ, ज्याच्या कर्मामुळे मला हे सततचे दुःख प्राप्त झाले आहे, त्याचीही आपण चांगली कानउघडणी करा. कारण, आपले राज्य व सर्वस्व घालवून कफल्लक झाल्यावरही जुगार खेळत बसेल इतका अतिशहाणा वा अट्टल जुवेबाजावांचून या भुतलावर दुसरा कोण सांपडणार आहे बरे? 

अहो, जरी रोज सकाळसंध्याकाळ हजार हजार मोहोरांचा जुगार खेळण्याचा यांनी नित्य नेम केला असता, व आणखी पुष्कळ द्रव्य उधळले असते, तरी देखील सोनें, रुपें, गाड्या, वाहनें, शेळ्यामेळ्या आणि अश्वांचे व तांडे समुदाय या सर्वाचा काही सत्यनाश झाला नसता! अहो, एवढी ज्याची संपत्ति, त्या धर्मराजाजवळ आज द्यूतांत नागवल्यामुळे द्रव्याच्या नावाने आवळ्याएवढे पूज्य झाले आहे ! आणि आपल्या कर्माचा पश्चाताप करीत वेड्यासारखे बसण्याचा त्याला प्रसंग आला आहे ! 

अहो, ज्याच्या स्वारीबरोबर सुवर्णाने शृंगारलेले दहा हजार घोडे चालत असत, तोच आज द्यूत खेळून चरितार्थ चालवीत आहेना! इंद्रप्रस्थामध्ये महाराज युधिष्ठिराच्या येथे अमित पराक्रमी राजांचे एक हजार रथ उभे असत; त्याच्या मुदपाकखान्यांत लाखो दासी हातांत भांडी घेऊन नित्य रात्रंदिवस अतिथींना वाढीत असत ; आणि याच विलक्षण दात्याने हजारो मोहोरांचा दानधर्म केला असून, त्याच्यावर आज द्यूतामुळे मोठाच अनर्थ ओढवला आहे! या युधिष्ठिर राजाच्या सेवेला उज्ज्वल व रत्न जडीत कुंडलें धारण करणारे व मधुर भावना असणारे पुष्कळ सूत व मागध सकाळसंध्याकाळ हजर असत. तपश्चर्या व ज्ञान यांनी जे सुसंपन्न आहेत, आणि ज्यांच्या सर्व वासनांचा क्षय झालेला आहे, असे हजारों ऋषि याच्या सभेतील सभासद होते ! ग्रहमेध (घरात शांतिसाठी केला जाणारा यज्ञ) करणारे अठ्ठ्यांशीं हजार स्नातक ब्राह्मण याच्या पदरीं असायचे आणि याने त्यातील प्रत्येकाच्या सेवेला तीसतीस दासी दिल्या होत्या. 

हाय हाय ! प्रतिग्रह न करणाऱ्या दहा हजार उर्ध्वरेत्या ऋषींचे जो पोषण करीत असे, तोच हा राजा आज अशा स्थितीला येऊन पोहचला आहे ! ज्याच्या ठिकाणी दया, शोकराहित्य, संविभाग म्हणजेच आपणाजवळ जे आहे ते सर्वांना वाटून देण्याची वृत्ती वगैरे सर्व सद्गुण वसतात आहेत तोच हा युधिष्ठिर राजा नाही का? अहो, अंध, वृद्ध, अनाथ, बालक परराष्ट्रांमधील दुर्दशेस जाऊन पोचलेले दुसरे अनेक प्रकारचे लोक त्यांचा हा सर्वोच्च सत्य पराक्रमी व धैर्यशाली राजा सांभाळ करीत असे! हा अद्वितीय कनवाळू असल्यामुळे असेल ते सर्वांना वाटून द्यावे अशी त्याची नित्य. वासना असे; आणि तोच हा राजा युधिष्ठिर दुर्दैवाच्या फेऱ्यांत सांपडून मत्स्य राजाचा सेवक बनला आहे ! 

तो सभेमध्ये राजाबरोबर द्यूत खेळत असतो आणि आपणांस 'कंक' म्हणवितो ! कोण दुर्दशा ही ! इंद्रप्रस्थांत रहात असतांना सर्व राजे ज्याला खंडणी आणून देत व ज्याचा शब्द झेलीत, त्यालाच आज पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पहावे लागत आहे! १३ वर्षांपूर्वी पृथ्वीचे पालन करणारे अनेक भूपाळ राजे ज्याच्या आज्ञेत वागत होते, तोच युधिष्ठिर राजा आज विवश होऊन दुसऱ्यांचा गुलाम बनला आहे! 

असंख्य किरणे स्फारणाऱ्या सूर्याप्रमाणे ज्याने एकदा आपल्या तेजानें सर्व पृथ्वी तप्त करून सोडली होती, तोच राजा युधिष्ठिर आज या छोट्या राज्याच्या विराटाच्या सभेतील एक यः कश्चित् सभासद होऊन राहिला आहे ! हे पांडुपुत्रा, सभेमध्ये राजे व ऋषि ज्याच्या सभोवती बसत असत, तोच हा पांडुपुत्र युधिष्ठिर आज दुसऱ्याचा आश्रित होऊन बसला आहे पहा ! खरोखर हा दुसऱ्याचा सभासद होऊन बसला आहे त्याची हांजीहांजी करीत आहे असे पाहून मला अतिशय संताप येतो ! 

कारण महाज्ञानी धर्मनिष्ठ युधिष्ठिर राजा केवळ जीवितासाठी आपल्या योग्यतेस शोभणारे अयोग्य काम करू लागला आहे असे पाहून कोणाला बरे दुःख होणार नाही? वीरा, हे भारता, मयसभेमध्ये संपूर्ण पृथ्वीवरचे राजे ज्याची सेवा करीत होते, हा तोच आज दुसऱ्याच्या पायांशी बसला आहे पहा ! भीमसेन, आपण विचार करा ! हे पाहून काळीज कसे नाही करपणार ! 

अहो, अशा पुष्कळ प्रकारच्या दुःखांनी मी गांजिली जात असून अनाथाप्रमाणे शोकसागरांत गटगळ्या खात पडले असतांना, अहो भीमसेन, ते आपल्या गांवी देखील नाहीं ना ! आपल्याला याचे काहीच वाटत नाही का? 


पुढे द्रौपदीचा भीम आदि चारही पांडवांच्या दुर्दशेचे वर्णन करून विलाप करते. 

द्रौपदी म्हणते, हे वायुपूत्रा! हे भारता, मला विशेष दुःख होण्याचे कारण मी आता आपणास सांगते. हे प्राणनाथ ! मी दुःखाने पोळल्यामुळे काही कमी जास्त शब्द माझ्या तोडांतून निघत आहेत, परंतु याबद्दल आपण माझ्यावर रोष करू नये. हे भरतर्षभा, तुम्ही तरी आपल्या इभ्रतीस न शोभणारे आचाऱ्याचे हीन काम करीत आहात ; आणि मी बल्लव जातीचाच आहे म्हणून सांगता, तेव्हा हे पाहून कोणाला वाईट वाटणार नाहीं बरे? अहो, तुम्ही विराटाचे स्वयंपाकी व बल्लव आहात असे लोक समजतात. अशा प्रकारचा आपणांस सांप्रत केवळ दासपणा आला आहे, तेव्हां याहून अधिक दुःखदायक तें काय असणार आहे ? महाराज ! आपणांस आचारी व बलव म्हणविणारे तुम्ही पाकनिष्पत्ति झाल्यावर जेव्हा विराटाच्या सेवेस सादर होता, तेव्हा माझ्या काळजाला तडे पडतात ! 

जेव्हां राजा हर्षाच्या उन्मादात येऊन हत्तीबरोबर आपली झुंज लावतो, आणि अंतःपुरांतील स्त्रिया आपल्याकडे पाहून हसू लागतात, तेव्हा तर माझे मन उदास होऊन जाते ! कैकयराज कन्या सुदेष्णा पहात असताही माझ्या चेहेऱ्यावर विलक्षण उद्विग्नता दिसू लागते ! महाराज, आपण जेव्हा वाघ, रेडे व सिंह या सारख्या प्राण्यांबरोबर हौद्यांत झोंबी खेळू लागता, तेव्हा ती कैकेयी सुदेष्णा उठून त्या सर्वांशी कुजबुजू लागते, आणि त्याही सर्वजणी उभ्या राहून तिच्याशीं कुजबुज करू लागतात! मला चिंताग्रस्त पाहून ती म्हणते, 'ही मधुरस्मिता सैरंध्री, सहवासाने उत्पन्न होणाऱ्या प्रेमामुळे व काही अंशी मानसिक धर्मामुळेही हा महावीर्यशाली आचारी लढूं लागला म्हणजे दुःखित होते ! सैरंध्रीचें रूप मनोहर आहे आणि हा बल्लवही सुंदर आहे; शिवाय स्त्रियांच्या अंतःकरणाचा थांग लागत नसतो ! मला तर ही दोघे परस्परांना अनुरूपशी भासतात ! सैरंध्रीचें भाषण मोठे लाघवी असून तिचा त्याच्याशीं नित्य सहवास आहे. शिवाय या राजवाड्यामध्यें हे दोघेजण बरोबरच आलेलीं आहेत ! हे एकमेकांवर अनुरक्त तर नाही ना! 

हे भीमसेना ! अशा प्रकारची निरर्थक भाषणे करून ती मला टोचीत, चिडवत असते; आणि तिच्या बोलण्यावरून मी चिडले म्हणजे तर तिला माझा व आपला काही संबंध असावा असा बळकट संशय येत असतो ! खरोखर ती तसें बोलू लागली म्हणजे मला भारी वाईट वाटते. अहो भीमसेन ! महापराक्रमी आपणच असे दुःस्थितीला पोचल्यावर युधिष्ठिराच्या चिंतेत मग्न झालेल्या मला जीवित धारण करण्याचा हुरूप कोठून राहणार? माझी तर जगण्याचीच इच्छा मावळत चालली आहे. 

अहो, कालस्य कुटिला गतिः। काळाची गति किती विचित्र आहे पहा ! ज्याने केवळ एका रथाच्या योगाने देवांसह सर्व मानवांना जिंकलें, तो तरुण अर्जुन आज विराट राजाच्या मुलींचा नर्तक, कींन्नर बनला आहे ! ज्या पराक्रमी अर्जुनाने खांडवारण्यामध्ये अग्नीस तृप्त केले, तोच आज विहीरीत सांठवलेल्या अग्नीप्रमाणे शांत होऊन विराटाच्या अंतःपुरात राहिला आहे ! अहो, ज्या पुरुषर्षभाचा शत्रूंना सदोदीत धाक वाटायचा, तोच धनंजय सांप्रत लोकनिंदित अशा षंढवेषाने रहात आहे ! ज्याचे परिघतुल्य बाहु प्रत्यंचेच्या घर्षणाने घट्ट झालेले आहेत, तोच धनंजय आज हातांवरचे शस्त्रांचे घाव लपवत शंखांचे चुडे भरून कष्टाने दिवस कंठीत आहे ! 

अहो ! ज्याच्या प्रत्यंचेचा व तळहाताचा प्रचंड घोष ऐकून शत्रूंना कांपरे भरत असे, त्याच्याच गायनाचे आलाप आज काल स्त्रिया मोठ्या हर्षाने ऐकत असतात! ज्याच्या मस्तकावर सूर्यासारखा दैदीप्यमान मुकुट झळकत असायचा, त्याच अर्जुनाने आज केसांची वेणी घातली आहे ! अहो भीमसेन ! त्या महाधनुर्धराने वेणी घातली असून याच्या सभोवतीं मुली गराडा देऊन बसल्या आहेत असे पाहून माझे अंतःकरण तीळतीळ तुटूं लागतें ! 

अहाहा ! ज्या शुर योद्ध्याजवळ ब्रम्हास्त्रासारखी, पाशुपतास्त्रासारखी सर्व दिव्य अस्त्रे वास करितात, आणि जो सर्व विद्यांचा आधार आहे, १४ विद्या ६४ कळांनी परिपूर्ण आहे, त्या पार्थानें आज कानांमध्ये बाळ्या हो घातल्या आहेत ! ज्याप्रमाणे महार्णव मर्यादेस स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणें तेजाने झळकणारे हजारो राजे ज्याच्या केसालाही स्पर्श करू शकत नसत, तोच तरुण अर्जुन सांप्रत विराट राजाच्या मुलींचा नर्तक बनला आहे ! हायहाय ! वेष पालटून तो मुलींचा सेवक झाला आहे! 

हे भीमसेना ! खरोखर ज्याच्या रथघोषानें पर्वत, वने व सर्व स्थावर जंगम पदार्थासह ही संपूर्ण पृथ्वी कंपायमान होत असे, व ज्याच्या उत्पत्तीबरोबर कुंतीचा शोक नाहीसा झाला, तोच तुमच्या पाठचा भाऊ आज मला रडावयास लावीत असतो ! तो सोन्याची कुंडले व दुसरे अलंकार घालून नटलेला व हातांत बांगड्या भरलेला असा येऊ लागला म्हणजे माझे अंतःकरण करपून जाते ! अहो, पराक्रमात ज्याची बरोबरी करणारा संपूर्ण पृथ्वीवर कोणीही नाही, तो धनुर्धर सव्यसाची धनंजय आज मुलीसमोर गाणे गात  बसला आहे ! 

ज्याचे धैर्य, शौर्य व सत्य सर्व जगाला कबूल करावे लागत होतें, या अर्जुनाला स्त्रीच्या वेषांत पाहून माझ्या मनाला कसेसेच होऊन जाते ! ज्याप्रमाणे मदोन्मत्त गजाभोवतीं हत्तिणी जमतात, त्याप्रमाणे या देवासारख्या सुंदरास मुलींनी गराडा दिला आहे आणि त्यांच्यासह हा वाद्ये वाजवून श्रीमान् मत्स्यराजाला खुष करीत आहे असे जेव्हा माझ्या नजरेस पडते, तेव्हा तर मला दिशांचेही भान रहात नाही ! धनंजयाला हे असे संकट प्राप्त झालेले असून घातक द्यूत खेळणारा अजातशत्रु धर्मराजही तसाच दुःख सागरात मग्न झाला आहे ही गोष्ट खरोखर माता कुंतीला ठाऊक नसावी! त्याचप्रमाणे, हे भारता, गुराखी बनलेला धाकटा सहदेव गुरांच्या मागून गुराख्याच्या वेषाने चालू लागला म्हणजे माझा चेहरा पांढरा फटफटीत होऊन जातो ! भीमसेना, सहदेवाची कृत्यें एकसारखी माझ्या मनामध्ये उभी राहू लागतात मला त्या चिंतेमुळे झोपही येत नाही, मग सौख्य तर दूरच राहिलें ! हे महाबाहो, ज्याला एवढे दुःख प्राप्त झाले आहे, त्या सत्यपराक्रमी सहदेवाच्या हातून तसे कांही दुराचरण घडल्याचे मला तर ठाऊक नाहीं ! हे भरतश्रेष्ठा, तुझ्या त्या पराक्रमी व प्रिय भ्रात्याला मत्स्यराजाने गाई राखण्यास नेमले हे पाहून माझा जीव तडातडा तुटतो; आणि तो गवळ्यांचा नाईक लाल पोषाख करून लगबगीनें विराटाचे अभिनंदन करूं लागला म्हणजे तर माझ्या अंगाची लाही लाही होऊन जाते ! राजमाता कुंतीने सहदेव वीराची माझ्याजवळ नित्य स्तुति करावी की, “तो मोठा कुलीन, सुशील व सदाचरणी असून विनयसंपन्न व धार्मिक आहे, त्याचे भाषण मधुर आहे आणि तो माझा फार लाडका आहे. यासाठीं, द्रौपदि, अरण्यामध्ये तू रात्रीही ह्याला जपत जा! हा शूर व धर्म राजाच्या तंत्राने वागणारा आहे, तथापि फारच सुकुमार आहे. यास्तव, मुली, वडिलांच्या आज्ञेत वागणाऱ्या या वीराला तू स्वतः जेवायला घालीत जा.”

खरोखर पुत्रवत्सल कुंतीने रडत रडत मला असे सांगितले आणि अरण्यांत जावयास निघालेल्या त्या सहदेवाला तिने कवटाळून धरलें ! पांडवा, तोच महायोद्धा सहदेव आज गुरांमध्ये चूर झाला असून रात्रीं वासरांच्या कातड्यावरच पडत असतो हे पाहून मी कसे हो प्राण ठेवावे ! ज्याच्या ठायीं सौंदर्य, अस्त्रपटुत्व व बुद्धिमत्ता हे तीन गुण नित्य बसत आहेत, सोच नकुल आज बिराटाचा मोतद्दार बनला आहे ! कालाचा फेरा कसा आहे पहा ! ज्याने हल्ली ग्रंथिक हे नांव घेतले आहे, त्याच नकुलाला पाहताच शत्रूंच्या टोळ्या रानोमाळ उधळून पळून जात ! आणि तोच सुंदर व विनयशील नकुल सांप्रत युधिष्ठिर महाराजांसमक्ष झपाट्याने घोडे शिकविण्याचे काम करीत असतो!

तो सुंदर, तेजस्वी व थोर नकुल घोडे दाखवीत विराटाजवळ उभा आहे असे माझ्या पहाण्यात आले आहे. महाराज, अहो शत्रुमर्दक पृथापुत्र, मी सुखांत आहे असे आपण समजतो काय ? युधिष्ठिराच्या निमित्तानें अशा शेंकडों दुःखांनी मी प्रस्त झाले आहे; आणि, भारता, यांशिवाय दुसरी जीं विशेष व मोठीं दुःखे मला सोसावीं लागत आहेत, तींही आपण श्रवण करा. अहो ! आपण जिवंत असतांना नानाप्रकारची दुःखें माझें शरीर शुष्क करीत आहेत, तेव्हा याहून अधिक दुःख ते काय असणार?

पुढे द्रौपदीने स्वतःच्या कर्माला दोष देत विलाप केला. द्रौपदी म्हणते, "मला सैरंध्रीच्या वेषाने राजवाड्यात रहावे लागत असून सुदेष्णेची वेणीफणी वगैरे करावी लागत आहे, ते तरी या अट्टल जुवेबाजामुळेच ! 

अहो परंतप भीमसेन ! माझ्या स्थितीत किती भयंकर पालट झाला आहे पहा ! जी मी एकदा राजकन्या म्हणून रहात होते, तीच मी आज निवळ दासीपणास जाऊन पोचले आहे ! सर्व लोक आपल्या भाग्योदयाची मार्गप्रतीक्षा करीत असतात. कारण दुःखासही खरोखर अंत हा आहेच ! त्याचप्रमाणे द्रव्यलाभ किंवा जयापजय हे खरोखर अनित्य आहेत असा विचार करून मी पतींच्या उदयकालाची प्रतीक्षा करीत असते. सुखे किंवा दुःखे ही चक्राप्रमाणे फिरत असतात असाही आणखी विवक करून मी पतींच्या उदयाची आशा करीत दिवस काढीत आहे. ज्या कारणाने मनुष्याचा जय होत असतो, त्याच कारणाने त्याचा पराजयही घडून येतो असा मी विचार करीत असते. अहो भीमसेन! मी अगदी मृतप्राय झालें आहे हे आपण जाणत नाहीं काय? जे लोक एकदा दानधर्म करतात, त्यांनाच पुढे याचना करण्याचा प्रसंग येतो ! ज्यांनी दुसऱ्यांचा घात केलेला असतो, तेही दुसऱ्यांकडून वध पावतात ! आणि दुसऱ्यांस ज्यांनीं खाली दडपलें, त्यांस दुसरेच खालीं दडपतात असें मीं ऐकलें आहे. दैवाला कठीण किंवा अशक्य असे कांहीच नाहीं असा विचार क रून मी पुनः दैव उघडण्याची वाट पहात कालक्रमणा करीत आहे ! 

जेथें पूर्वी जल असतें तेथेच तें पुनः जात असतें. उन्हाळ्यांत सागराचें पाणी मेघरूपानें वर गेलेले असले तरी तें पुनः वृष्टिरूपानें खालीं येऊन शेवटी समुद्रासच परत येतें. अशाच रीतीनें आपल्या दुःखांचाही शेवट होईल अशी आशा धरून पुनः अभ्युदय होण्याची मी मार्गप्रतीक्षा करीत आहे. ज्याचें हक्काचें द्रव्य केवळ दैवयोगानेंच नाश पावले असतें, तो शहाणा असेल तर त्याने देवाचे आनुकूल्य संपादण्याचाच प्रयत्न करावा ! महाराज ! मी कष्टी होऊन आपणास हें जे बोलले त्याचें खरें कारण काय हें पाहिजे तर तुम्ही मला विचारा, म्हणजे तें मी येथेंच आपणांस सांगतें. अहो ! मी पांडवांची पट्टराणी आणि द्रुपदाची कन्या असून अशा हीन स्थितीस येऊन पोहचले आहे ! अशी स्थिति प्राप्त झाल्यावर मजशिवाय दुसरी कोणती स्त्री जगण्याची आशा करील बरे? अहो शत्रुमर्दक भीमसेन ! मला प्राप्त झालेल्या दुःखांनी सर्व कौरवांची, पंचालांची व पांडवांची नाचक्की झाली आहे ! भाऊ, सासरे, पुत्र वगैरे पुष्कळ नातलगं असून अशा भाग्याला चढलेल्या दुसऱ्या कोणत्या स्त्रीला मजप्रमाणे करण्याचा प्रसंग येणार आहे बरे ! खरोखर मी लहानपणी विधात्याचा मोठा अपराध केला असला पाहिजे; आणि, हे भरतर्षभा, त्याच्याच अवकृपेमुळे मला अशी दुःस्थिति प्राप्त झाली आहे. अहो पांडुपुत्र, माझी कांति तरी किती उतरून गेली आहे पहा ! 

वनवासांत परम दुःखांत असतांना त्या वेळी तेथेंती माझी इतकी दशा झाली नव्हती! हे भीमसेना, हे पृथानंदना, पूर्वी मला किती मुख होते हे तुम्हांला माहीतच आहे. जिला एके वेळीं सर्व प्रकारचे पूर्ण सौख्य होते, तीच मी सांप्रत दासीपणास येऊन पोचले आहे. यामुळे माझें चित्त कसें अगदीं बावरून जाते व मला बिलकूल चैन पडत नाही ! ज्यापेक्षां महाबलिष्ट व भीम धनुर्धर पार्थाला राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे वेष पालटून रहावे लागत आहे, त्यापेक्षा येथे दैवावांचून इतर काही कारण आहे असे मी मुळींच समजत नाहीं. अहो पृथापुत्र, प्राण्यांची पुढे काय गति व्हाव याची आहे हे मानवांस समजणे केवळ अशक्य होय. तुमची जी सांप्रत अवनति झाली आहे, ती म्हणजे पूर्वी कधी कोणाच्या ध्यानांत आली असेल असे मला मुळींच वाटत नाहीं. अहो, तुम्हीं इंद्रासारख्या वीरांनीं सदोदीत जिच्या मुखा कडे पहात असावें, त्याच मला सांप्रत दुसऱ्या कमी प्रतीच्या स्त्रियांच्या तोंडाकडे आणि स्वतः वास्तविक त्यांहून श्रेष्ठ असतांना पहावें लागत आहे ! 

अहो पांडुपुत्र! तुम्ही घट्टेकट्टे असताना मला अशी स्थिति यात्री हे मुळी तरी योग्य आहे का ? याचा आपणच विचार करून पहा ! कालदशेचा फेरा कसा विपरीत आहे पहा ! समुद्रवलयांकित पृथ्वी एकदा जिच्या आज्ञेत होती, तीच मी आज सुदेष्णेची आज्ञाधारक दासी बनले असून तिच्या धाकांत असते! एका वेळी जिच्या मागे व पुढे पुष्कळ अनुचर चालत असत, तीच मी आज सुदेष्णेच्या मागे व पुढे धावत असतें ! 

अहो कुंतीपुत्र ! हेच माझें असह्य दुःख होय. याकडे आपण लक्ष द्या. महाराज ! आपले कल्याण असो. अहो, जी एका कुंतीशिवाय दुसऱ्या कोणाची फार कशाला? आपल्या स्वतःच्या अंगाला लावा वयाचीही उटी उगाळीत नसे, तीच मी आज चंदन घाशीत असतें ! अहो कुंतीपुत्र ! हे पहा माझे हात ! हे मागें असे कधीच नव्हते ! म्हणून तिनें आपले घट्टे पडलेले दोन्ही हात त्याला दाखविले आणि म्हटलें, "महाराज, जिला कुंतीची किंवा प्रत्यक्ष आपलीही तितकी धास्ती वाटत नसे, तीच मी आज विराटाच्या समोर दासीभावानें उटी घेऊन जाते तेव्हां 'हा सम्राट विराट राजा मला काय बरें म्हणेल? ही रंगदार उटी चांगली बनली आहे असे म्हणेल कीं वाईट आहे म्हणून दोष देईल? मत्स्यराजाला दुसऱ्या कोणीं उगाळिलेले चंदन तर मुळीच आवडत नाहीं ! ' असे विचार मनांत येऊन मी भीतभीतच त्याच्या जवळ उभी राहतें !” 


अशा प्रकारे ती भामिनी भीमसेनास आपली दुःखें सांगत असतां एकाएकी भीमाकडे पाहून रडूं लागली; कंठ दाटून आल्यामुळे तिचा आवाज घोगरा झाला; ती वरचे वर हुंदके देऊं लागली; आणि भीमसेनाचे हृदयास घरे पाडीत असे म्हणाली, अहो  भीमसेन ! अशा प्रसंगी प्राणत्याग करणें हेंच कर्तव्य असतांना मी अभागिनी अद्यापि जि. वंत आहे, त्यापेक्षां, हे पांडुपुत्रा, पूर्वी मीं देवांचा कांहीं लहानसहान अपराध केलेला

 नंतर आपल्या पत्नीचे ते बारीक झालेले व घट्टे पडलेले हात तोंडाशी नेऊन तो परम वीरांतक भीमसेनही रडूं लागला. ते हात घट्ट धरून त्या वीर्यवंतानें डोळ्यांतून टिपें गाळली; आणि मग त्याने अतिशय खिन्नपणाने तिच्याशीं भाषण केलें.

क्रमशः 

पुढची कथा पुढिल नवव्या भागात 

भाग 009 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/009-virat-parva-marathi-katha.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post