महानुभाव पंथीय इतिहास श्रृंखला
Mahanubhav panth history
पुर्वजांचा पवित्र पावन इतिहास
थोर महापात्र
श्रीबाइदेवव्यास
महानुभाव पंथाचे द्वितीय आचार्य बाईदेवव्यासाची जन्मभूमी बळेग्राम (हे गाव आता पांचाळेश्वराच्या जवळच आहे.) ! हे नागदेव उपाध्याचे सुपुत्र होत, यांना दोन चुलते होते. नागदेवापेक्षा धाकटे जानोउपाध्ये व त्यांच्यापेक्षा लहान पुरुषोत्तम उपाध्ये या दोघापैकी जानोउपाध्ये यांनी भगवान श्रीचक्रधरस्वामी उत्तरापथे गेल्यानंतर ऋद्धिपुरी जाऊन (श्रीगोविंद प्रभूंच्या सन्निधानात) आचार्यांच्या नांवे शके १२०८ मध्ये संन्यास घेतला. व काही कामा निमित्ताने ते बळेग्रामला आले. तेव्हा पुतण्या बाईदेवव्यासांना धर्मोपदेश देवून ऋद्धिपुरला श्रीनागदेवाचार्यांजवळ आणले' बाईदेवव्यासांना श्रीनागदेवाचार्यांनी १२०९ मध्ये संन्यास दिला.
यांना संन्यास दिल्यानंतर श्रीनागदेवाचार्य गंगातीरची स्थाने नमस्कार करीत करीत डोमेग्रामला आले. त्यावेळी बाईदेवव्यास त्यांच्याबरोबरच होते. ते अत्यंत भाविक पुरुष ! त्यांच्या अंतःकरणी परमेश्वर विरह खुप होता. ज्यावेळी श्रीनागदेवाचार्य डोमेग्राम मठाच्या महाद्वारात परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्रधरस्वामींच्या संबंधित स्थानांना दंडवत घालून नारायण मठांत (प्रसन्न मठ) गेले. तेव्हा त्यांना त्या मठाच्या भिंतीवरील चिऱ्यावर पूर्वी येथे अवस्थान असताना श्रीचक्रधरस्वामींनी पान खाऊन पिक टाकली होती असे दिसले, ते पाहून आचार्यांना पूर्वीच्या सन्निधानातील लीळा आठवून दुःखाचे भरते आले. घळघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी त्या पडलेल्या तांबुळाच्या कणाचा प्रसाद खाल्ला.
आणि मग बाईदेवव्यासांना त्या तांबुळाचे ज्ञान केले, आणि म्हणाले 'घेया गा बाईदेया ही देवाच्या श्रीमुखीची तांबुळाची पिक आहे. ' तेव्हा बाईदेवव्यास त्या चिऱ्यावर पडलेल्या तांबुळाची पीक चाटू लागले. चाटता चाटता त्यांचे सर्व तोंड सोलले. परंतु ते चाटन करण्याचे सोडीनात. आणि खूप दुःख करत रडू लागले. “देवा! आम्हाला का टाकून गेले?” म्हणून त्यांना अत्यंत दुःख झाले.
तेव्हा आचार्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना प्रतिबंध केले. “बाइदेया जास्त दुःख करू नका” अशी बाईदेवव्यसाची दृढ भाविकता होती, जशी भक्ति होती तसेच वैराग्यही त्याच्या अंगी बांधलेले होते.
थोर महानुभाव बाईदेवव्यास हे परमेश्वराचे चिंतन करण्यासाठी एकांकी फिरतीवर रहात असत. एकदा ते अटनाला निघाले (एकांकी फिरतीवर) तेव्हा त्यांच्यासोबत श्रीदेईभट पैठणकर, हे पैठणकर आम्नायाचे मूळ पुरुषही अटनाला जाण्यासाठी निघाले. तेव्हा आचार्यांनी त्यांना स्थान निर्देश करून सर्व स्थाने नमसकरावयास सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी सर्वत्र स्थानांचा निर्देश करून स्थाने नमस केली. आणि त्या स्थानांची माहिती एका वहीवर नोंद करून आणली. तिच पहिली स्थानपोथी होए.
असेच एकदा आठवण करत असताना त्यांना एके ठिकाणी सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक तांब्या पडलेला दिसला. ते पाहून त्यांनी दुर्लक्ष केले, त्या द्रव्याचा यत्किंचितही अभिलाष न धरता परमेश्वर साधनवंताला द्रव्य हे विषासारखे अपथ्य आहे. त्यामुळे धर्मघात होतो. अनुसरण भंगू शकते. असा विचार करून तिथून पुढे निघाले. ही गोष्ट आचार्यांनी आपल्या ज्ञानसामर्थ्याने जाणून जवळील असलेल्या शिष्यांना सांगून त्यांची खूप प्रशंसा केली.
आचार्यांच्या पश्चात आचार्यानंतर श्रीबाईदेवबासांना पंथाचे आचार्यपद देण्यात आले. ते तीन वर्षापर्यंत महानुभाव पंथाच्या आचार्यपदी विराजमान होते.
श्रीबाईदेवव्यास श्रद्धावंत, वैराग्यवंत, तसेच ते ज्ञानी पुरुष होते. अशा थोर महात्म्याचा देहांत शके १२२७ मध्ये झाला.