भाग 009 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 009 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 009 

विराटपर्व कथासार मराठी 

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 


द्रौपदीचे भीमसेनाकडून सांत्वन

किचकाकडून अपमानस्पद झालेली द्रौपदी दग्ध अंतःकरणाने रडत होती. तिचे ते रडणे पाहून आणि स्वतःच्या असहायतेबद्दल महा पराक्रमी भिमही क्षणभर रडला. आणि पुढे अतिशय त्वेषाने म्हणाला: -  पूर्वी कमळापेक्षा आरक्त वर्ण असलेल्या तुझ्या या दोन्ही हातांना हल्ली घट्टे पडले आहेत, आम्हादेखत तुझी ही अवस्था झाली म्हणून हे पांचाली माझ्या बाहुबलास व अर्जुनाच्याही गांडीवास धिःकार असो! तुझा तो अपमान पाहून विराटाच्या सभेतच त्या पापी किचकाची मी भयंकर कत्तल करणार होतो, पण भ्राता युधिष्ठिर सर्वच गोष्टी लांबणीवर टाकीत असतो, या कारणामुळे माझा नाइलाज झाला ! आणि मला शांत राहावे लागले. नाहीतर ऐश्वर्यमदाने धुंद झालेल्या त्या कीचकाचें मस्तक मी एखाद्या क्रीडा करणाऱ्या हत्तीप्रमाणे तेथेच पायाखालीं तुडविले असतें ! 

कृष्णे, जेव्हा कीचकानें तुला लाथ मारलेली मी पाहिली, तेव्हाच मी मत्स्यांची भयंकर कत्तल करण्यास अगदी तयार झालो होतो; परंतु काय करू गं ? त्या धर्मराजाने डोळ्याने खुणावून मला शांत बसण्यास बाध्य केले. ; आणि, हे भामिनि, त्याचा तसा अभिप्राय जाणून मी आपला जागच्या जागीच चडफडत स्वस्थ बसलो. छे! छे ! माझ्या हातून मागिल काळापासूनच मोठमोठ्या चुका होत आल्या आहेत. आधीं राष्ट्रातून बाहेर पडलो तेव्हाच कौरवांचा म्हणजे सुयोधन, कर्ण आणि सुबलपुत्र शकुनि यांचा वध केला नाही आणि त्या पापी दुःशासनाचेही मस्तक उडविले नाहीं ! अरेरे, माझ्या अंगाचा कसा भडका करून सोडीत आहेत ! 

तरिदेखिल, हे प्रियतमे, तू धर्मराजाचा अवमान करू नकोस. तू समजुतदार आहेस महाविचारी आहेस. आपला क्रोध १५ दिवस आवरून धर. कारण, हे कल्याणी, तुझ्या तोंडून असे निंदाव्यंजक भाषण जर का युधिष्ठिराने ऐकले, तर तो खात्रीने प्राणत्याग करील ! त्याचप्रमाणे, हे सुश्रोणि, धनंजय किंवा नकुल सहदेव यांच्या कानी अशी निंदा पडली, तर तेही प्राण ठेवणार नाहीत; आणि अशा प्रकारे ते परलोकी गेल्यावर मीही जिवंत राहू शकणार नाहीं ! 

द्रौपदी, तुलाच तेवढे दुःख झाले आहे असे नाही. पूर्वी च्यवनभार्गवाची भार्या सुकन्या ही तर वनांत आपल्या वारुळरूप झालेल्या पतीचे सांत्वन करीत त्याबरोबर राहिली होती ! अगं, नारायणी इंद्रसेना प्रख्यात रूपवती म्हणून तुझ्या कानावर कदाचित् आली असेल. ती आपल्या हजार वर्षांच्या वृद्ध पतीबरोबर वनांत राहिली होती. जनकाची मुलगी वैदेही सीता ही तर तुझ्या ऐकण्यांत आलीच असेल. ती महा अरण्यात वास्तव्य करणाऱ्या आपल्या पतीच्या मागून हिंडत असे. 

हे सुश्रोणि, त्या रामपत्नीला सीतेला रावणाने हरण करून नेल्यावर तेथे तिला फार क्लेश भोगावे लागले, तथापि तिने रामास सोडले नाही ! त्याचप्रमाणे, हे भीरु, लोपामुद्राही तरुण व सौन्दर्यसंपन्न असताही सर्व दिव्य भोग सोडून देऊन अगस्तीच्या समागमे राहिली ; आणि उदार अंतःकरणाची व पुण्यशील सावित्री तर मत्सेनपुत्र सत्यवानाबरोबर एकटी यमलोकापर्यंत गेली होती ! हे कल्याणि, मी सांगितल्या या स्त्रिया जशा रूपवती व पतिव्रता होत्या, तशीच तूही सर्व गुणांनी संपन्न आहेस. आता तुझे बाईट दिवस फारच थोड़े राहिले आहेत, फक्त एक पंधरवडा उरला आहे, तितका कसा तरी काढ, म्हणजे तेरा वर्षे पूर्ण होऊन तू सर्व राजांचीही सार्वभौमिनी होशील !

भीमसेनाच्या समजावणीवर द्रौपदी म्हणाली  - भीमसेना, दुःख सहन न झाल्यामुळे मी केवळ आर्तपणाने आपल्याजवळ असे अश्रु ढाळले. माझ्या तोंडून काही उणे-अधिक शब्द निघून गेले असले तरी मी अंतःकरणपूर्वक काही राजा युधिष्ठिराची निंदा करीत नाही. भीमसेन, आपण महाबलाढ्य आहात. झालेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही. सांप्रत जी गोष्ट येऊन बेतली आहे, तिजकडे तरी आपण योग्य लक्ष पुरवा. 

भीमसेन, ही सैरंध्री आपल्या स्वरूपाने आपणास कोपऱ्यांत बसवील की काय अशी सुदेष्णेला नेहमी भीति वाटत असते; आणि राजाचे मन हिच्यावर जाईल की काय असे मनात येऊन ती नित्य उद्विग्न असते. सुदेष्णेच्या मनातील हा अभिप्राय कीचकाला कळला असून तो स्वतःही पापदृष्टीचा आहे, यामुळे तो नराधम नित्य माझी प्रार्थना करीत असतो. प्राणनाथ, तो मजजवळ लाळ घोळू लागला तेव्हां मला त्याचा फारच संताप आला होता; परंतु तो आवरून धरून मी त्या काममोहितास म्हटले, “कीचका, संभाळ हो! मी पांच गंधर्वांची भार्या आहे; इतकेच नव्हे, तर त्यांची पट्टराणी असून मोठी लाडकी आहे; आणि ते गंधर्वही मोठे साहसी व शूर आहेत. तेव्हा जर का ते संतापले, तुला तेव्हांच ठार मारतील!” तर महाराज !  मी असे  सांगताच त्या महानीच कीचकाने प्रत्युत्तर दिले,  

“हे सैरंध्री, हे सुहा स्यवदने, मी गंधर्वांना मुळीच भीत नाही. अगं, पांच काय, पण कोट्यवधी गंधर्व रणांत एक वटून आले तरी त्यांचा देखील मी फडशा उडवीन. म्हणून तू त्या गंधर्वाची भीति सोडून दे आणि खुशाल माझ्यावर विसंबून रहा !” 

महाराज ! याप्रमाणे त्याने उत्तर केल्यावर त्या धुंद कामातुराला मी पुनः म्हटले, “अरे, तुझे बळ ते किती? तू त्या कीर्तिमान् गंधर्वांच्या पासंगासही पुरणार नाहीस. शिवाय मी कुलीन व सुशील असून नित्य पतिव्रता धर्माने वागत आले आहे. अरे, कोणाचा घात करावा अशी मला इच्छा होत नाही, म्हणूनच तू अजून जिवंत राहिला आहेस; नाहीतर केव्हाच तुझी गठडी वळली असती !” 

असे मी म्हटलें तेव्हां तो दुष्ट ही ही करून मोठ्याने हसला, खिदळला मात्र ! पुढे राणी सुदेष्णेने, "हे कल्याणी, कीचकाच्या घरून मद्य घेऊन ये !” म्हणून सांगून मोठ्या काकुळतीनं मला त्याकडे पाठविले. तिनें जरी वरपांगी प्रेमाचा आव आणला होता, तरी यापूर्वीच कीचकानें तिच्याशी खलबत केलेले होते आणि त्यामुळे भावाचे प्रिय करण्यासाठीच तिने मला त्याच्याकडे धाडले होते. मला पहाताच त्या सूत पुत्र कीचकाने पुष्कळ लाडीगोडी लाविली, आणि ती सारी जेव्हा फुकट गेली, तेव्हा तर तो संतापून बलात्कार करण्यासही प्रवृत्त झाला ! परंतु त्या दुरात्म्याचा तसा बेत दिसताच मी वेगाने तडक राजसभेकडे धावले. परंतु राजाच्या देखतही त्या सारथ्याच्या पोराने मजवर हात टाकला, मला खाली पाडून त्याने लत्ताप्रहारही केला, आणि प्रत्यक्ष विराट, कंक, राजाचे मंत्री, हत्तींवर व रथांत बसलेले लोक, व्यापारी आणि दुसरे पुष्कळ लोक केवळ पहात राहिले ! मी राजाची व कंकाची त्या वेळी पुष्कळ निर्भर्त्सनाही केली, परंतु त्याचे कोणी निवारण केले नाही किंवा त्याचे ते अन्यायाचे वर्तन राजानेही बंद केले नाही ! 

महाराज, हा जो विराटाचा कीचक नामक सारथी आहे, तो अगदी धर्मास सोडून वागणारा व क्रूर आहे. तथापि सर्व स्त्रीपुरुष त्यास मान देतात; इतकेच नव्हे, तर तो त्यांना प्रियही आहे ! हा शूर आहे तथापि गर्विष्ठ आहे. त्याचे अंतःकरण पापी असून याला कोणत्याच प्रकारची अक्कल नाही ! आणि हा परदारांसही स्पर्श करीत असतो.

 तथापि, हे महाभागा, विलक्षण असते पहा, दैव कसे की याला पुष्कळच भोग प्राप्त होतात ! दुसऱ्यास तळतळत ठेवूनही हा त्याचे द्रव्य हरण करतो, सन्मार्गाने कधीच वागत नाहीं, आणि धर्माची कधीच पर्वा करीत नाही. हा अंतःकरणाचाच पापी असल्यामुळे याच्या भावनाही पापमूलकच असतात. तेव्हां कामशरांच्या स्वाधीन होऊन पाहिजे तसे वर्तन करणाऱ्या या उच्छृंखल दुष्टाचा मी  वारंवार धिःकार केल्यामुळे, जेव्हा जेव्हा मी त्याच्या दृष्टीस पडेन तेव्हां तेव्हां जर तो मला असे मारू लागला, तर माझे प्राण निघून जातील आणि असे झाले म्हणजे धर्म पाळण्यासाठी झटणाऱ्या तुमचा महान् क्षात्रधर्मच नष्ट होईल! कारण पत्नीचे रक्षण न झाले तर क्षात्रधर्मच सुटला असे नाही का होणार? 

तुम्ही आपली अज्ञातवासाची प्रतिज्ञा पाळू म्हणाल, तर तुमची भार्या जगणार नाहीं. भार्येचें रक्षण केले असतां प्रजेचें रक्षण केल्याप्रमाणे होत असते; आणि प्रजेचें म्हणजे संततीचे रक्षण केल्यास आपण आपला आत्माच जतन करून ठेवीत असतों. कारण स्त्रीच्या उदरीं आत्माच पुत्ररूपाने उत्पन्न होतो आणि म्हणूनच तिला ज्ञाते जाया असें अन्वर्धक नांव देतात. पतीप्रमाणे स्त्रियेनेंही 'पति आपल्या उदरीं यात्रा ' अशी इच्छा बाळगून त्याला जपत असले पाहिजे. 

अशा प्रकारचा वर्णधर्म मी ब्राह्मणांच्या तोंडून ऐकिला आहे. शत्रूंचा संहार करणें याहून निराळा क्षत्रियांचा धर्म केव्हाही असू शकत नाहीं; आणि येथे तर धर्मराजाच्या समक्ष आणि, हे महाबलिष्ठ भीमसेन, आपल्याही डोळ्यांदेखत कीचकानें मला लाथ मारिली ! प्राणनाथ, त्या घोर जटासुरापासून आपणच माझे रक्षण केले; आणि भ्रात्यांसह आपणच जयद्रथालाही जिंकलें. तेव्हा, महाराज, हाजो महापातकी माझा उपमर्द करीत असतो, यालाही आपणच ठार करा. 

हे भारता, कीचकावर राजाची मर्जी असल्यामुळे तो मला छळीत असतो. यास्तव मदनाची धुंदी चढलेल्या या कीचकाला मातीच्या घड्याप्रमाणे दगडावर आपटून आपण त्याच्या ठिकऱ्या उडवा! हे भारता, मजवर अनेक अनर्थ कोसळण्यास जो कारणीभूत आहे, तो कीचक जिवंत राहून जर उद्या सकाळी सूर्य उदयाला येईल, तर मी विष कालवून पिईन, पण त्या कीचकाच्या तावडीत काही सांपडणार नाही ! भीमसेन, मला आपल्या डोळ्यांदेखत मरण येईल तर तेही श्रेयस्करच आहे !

असे बोलून द्रौपदी भीमाच्या खांद्यावर मान टाकून रडू लागली ! मग भीमसेनानेही तिला आलिंगन देऊन तिचे परोपरीनें सांत्वन केलें; आणि अतिशय आर्त झालेल्या त्या सुकुमार द्रुपदकन्येला सहेतुक व तत्त्वार्थयुक्त भाषणांनी धीर दिला. त्याने तिचे आसवांनीं भरून गेलेले तोंड आपल्या हातांनी पुसले ; आणि मनांत कीचकाचे स्मरण करून दांतओठ खात रागारागाने त्या दुःखार्त झालेल्या द्रौपदीशी तो बोलू लागला.

वायुपूत्र भीमसेन म्हणाला: - अगं भित्रे, तूं म्हणतेस त्याचप्रमाणे मी करीन. हे कल्याणी, आजच्या आज मी त्या कीचकाला त्याच्या बांधवांसह ठार करीन. हे याज्ञसेनि, ही रात्र उजाडतांच सकाळी तू त्याची गांठ घे व चेहऱ्यावर दुःखाचे किंवा शोकाचे चिन्ह बिलकूल न दाखविता तू गालांतल्या गालांत हसत त्याला भेट. आणि गोड बोलून त्याला एकांतात भेटण्याविषयी म्हण, 

अगं, ही जी विराटाने येथे नृत्यशाला बांधविली आहे, त्या नृत्यशाळेत दिवसा मुली नृत्य करीत असतात, परंतु रात्री त्या आपापल्या घरी जातात. त्या ठिकाणीं चांगला बसविलेला एक बळकट व दिव्य पलंग आहे. त्यावरच मी त्याला त्याचे पूर्वी मेलेले पितर दाखवीन ! परंतु, हे कल्याणी, तू त्याच्याबरोबर खलबत करतांना कोणीही पाहणार नाही अशी खबरदारी घे आणि अगदी गुप्तपणें हें काम कर !

याप्रमाणे एकमेकांस सांगितल्यावर त्यांनी ती राहिलेली रात्र दुःखाने अश्रु ढाळीत कशीतरी मोठ्या कष्टाने पण अगदी निमूटपणे घालविली. मग ती रात्र उजाडल्यावर कीचक सकाळीच उठून राजवाड्यात जाऊन द्रौपदीस म्हणाला, 

कीचक म्हणे, 'सकुमार वनिते ! । 

सभास्थानीं ताडिलें लाते,

सामर्थ्य नव्हेचि कवणातें | वारावया मजलागीं ॥

आतां करीन बलत्कारू । तरी मज कोण शके वारूं ? 

पश्चात्ताप पायोनि थोरू । शेखीं मातें वरसील ॥ 

सहस्र निष्क सुवर्ण रासी । तुज वोपीन प्रतिदिवसीं । 

शत शतकं दासदासी । सेवेलागीं देतसें ॥

एकशत कनकरथ, | शतकुंजर मदोन्मत्त । 

शर्त वाजी साळंकृत । चालवीन तुजपुढें. ॥

अमोल्य रत्नांचीयां रासी, । अन्न सेवीं रुचती तैसी । 

परीमळ मर्दुनी अंगासीं । अभ्यंग करीं, डोळसे ! ॥ 

नक्षत्रां ऐसिया रत्न माळा । आवडीं घालीन तुझीया गळां । 

तैसी लेववीन कटीभेखळा । माणीक मणी सुजडीत ॥ 

गंधर्व पातल्या कैवारा । छेदीन यांचिया शिरा, । 

माझिये बळाचा दरारा । देवां दैत्यां ठाऊका ॥

किचक म्हणाला, - “सैरंध्री आता तरी माझ्या सामर्थ्याची परीक्षा झाली का? अगं, राजसभेमध्ये आणि प्रत्यक्ष राजाच्या देखत मी तुला लाथ मारून खाली पाडले; पण मज बलाढ्याशीं गांठ पडल्यामुळे तुला तेथेही कोणाचाच आश्रय मिळाला नाही ! अगं, तू मला कोण समजतेस: विराट हा मत्स्यांचा केवळ नांवाचा मात्र राजा आहे. त्याला लोक उगीच राजा म्हणून म्हणतात इतकेच.

बाकी मी सेनापतिच मत्स्यांचा खरा राजा आहे ! तेव्हा तू मला बऱ्या बोलानें कबूल हो. आणि, मी तुला मारले म्हणून भिऊं नको. तू मला अनुकूळ झालीस म्हणजे मी तुझा अगदी गुलाम होऊन राहीन. सुंदरी, मी तुला ताबडतोब शंभर मोहरा देईन; इतकेच नव्हे, तर तुझ्या सेवेला शंभर दासी आणि तितकेच दासही ठेवीन, आणि खेचरी जोडलेला एक रथही तुला देईन. 

द्रौपदीने प्रत्युत्तर केलें: - पण, कीचका, माझी अट काय आहे ती आधी ऐकून घे. तुझा व माझा समागम झाल्याची गोष्ट तुझ्या जिवाच्या मित्राला किंवा भावालाही कळता  कामा नये, इतकी ती गुप्त राहिली पाहिजे. हे यशस्वी गंधर्वाच्या कानांवर जाईल की काय अशी मला भीति वाटते. तेव्हा मजजवळ आधी अशी शपथ घे म्हणजे मग मी तुझीच आहे !


कीचक म्हणाला: – सुंदरी, तू म्हणतेस त्याचप्रमाणे मी करीन. मी काममोहित झालो आहे, तथापि तुझ्या घरी दुसरे कोणी नसेल अशाच वेळी मी एकटा तुझ्या समागमार्थ तेथे येईन, म्हणजे त्या सूर्यतुल्य तेजस्वी गंधर्वांना हें मुळींच समजणार नाही !

द्रौपदी म्हणाली -

अति लगबगां धांवे वरूं, । 

तव ते म्हणे, 'केला अंगिकारू, ।

 स्वस्थ नावेक घरीं धीरू । गुज कांहीं बोलतसें ॥ 

बृहन्नळा नृत्यागारीं । दिवसा नाचवी बहुत कुमरी । 

रात्रीं आपुलाले घरीं । प्रवेशती सकळीका ॥ 

तो एकान्त असे बरवा, । तो ठाव आणिकांन ठावा । 

तेथें नेमिल्या कोळीं तुवां । शीघ्र यावें ममाज्ञा ॥

आजि मातें उपोषण, । नाहीं तांबूलभक्षण । 

केलें नाहीं जळ प्राशन । नेम जाणे सुवृत्ती ।। 

उदईक होतां सूर्यास्तू । पूर्ण होईल मनोरथू, । 

हाची दोन्हीचा संकेत । नृत्यशाळे मिळू मिळणीं ॥ 

जे कां कुंकुमतांबोलहीना । 

रुदीत, क्षुधीत, दुर्मुखी, 'मैळिणा । 

भोगीं 'वर्जिली अंगना । मन्वादिकीं निर्धारीं. ॥ 


उदईक चारी प्रहर दिवसू । धैर्ये आंवरीं मानसू, । 

यानंतरीं सुखसंतोषू । जन्मवरी भोगिसी ॥  

गंधर्व अथवा अन्य लोकांतें । प्रगट न करीं वारियातें, । तरीच येणें घडैल मातें । हें निर्धारें जाण पां ॥

द्रौपदी म्हणालीः - मत्स्यराजाने तयार करविलेले हे जे नृत्य करण्याचे गृह आहे, त्यात दिवसा मुली नृत्य करतात व रात्रीं आपापल्या घरी जातात. यास्तव तू अंधाऱ्या रात्री त्या ठिकाणी जा, म्हणजे ते गंधर्वास समजणार नाही आणि असे केले असतां निःसंशय सर्वच अनर्थ टळेल !

 द्रौपदी कीचकाशी त्या उद्देशाने बोलत होती, तथापि तो अर्धा दिवस तिला महिन्यासारखा होऊन गेला ! मग कीचक अत्यंत हर्षभरित होऊन आपल्या घरी गेला. सैरंध्रीच्या रूपाने आपला मृत्युच जवळ येऊन ठेपला आहे हे त्या मूर्खाला समजले नाहीं ! तो काममोहित झाला असून विशेष करून गंध, अलंकार व फुले यांनी नटण्यांत गर्क झाला होता. तेव्हा त्याने लवकर घाईघाईने आपले शरीर सुशोभित केले. याप्रमाणे तो शृंगार करीत होता, तथापि त्या वेळी ती विशालाक्षी द्रौपदी त्याच्या मनात सारखी घोळत असल्यामुळे तो वेळही त्याला फार मोठा वाटू लागला. 

वास्तविक त्याचे तेज कायमचेंच त्याला सोडून जाण्याची ही वेळ जवळ येऊन ठेपली होती, तथापि जाताजाता दिव्याची ज्योत मोठी होत असते तशी त्यावेळी त्याची मुखश्री विशेष टवटवीत झाली होती. त्या काममोहित झालेल्या ! कीचकाला तिचा विश्वास वाटला होता; आणि यामुळे भावी समागमाच्या मनोराज्यात दिवस केव्हा मावळला हेही त्याच्या ध्यानात आले नाहीं !

इकडे कीचकाशीं बोलणे केल्यावर द्रौपदी पाकशालेत भीमसेनाकडे गेली आणि ती कल्याणी त्या आपल्या कुरुश्रेष्ठ पतीजवळ उभी राहिली. मग ती सुंदरी त्यास म्हणाली, "हे परंतपा, आपण सांगितल्याप्रमाणे नृत्यशाळेत भेटण्याचे मी कीचकाला कबूल केले आहे. रात्री त्या शून्य नृत्यशाळेत कीचक एकटाच येईल. तेव्हा हे भुजवीर्यशालिन्, आपण त्या कीचकाचा समाचार घ्या. अहो कुंतीपुत्र, तो सारथ्याचा पोर कीचक मदोन्मत्त व मोठा गर्विष्ठ आहे; तेव्हा आपण नर्तनागारांत जाऊन त्याला गतप्राण करून टाका. हा सूतपुत्र गर्वामुळे गंधर्वासही तुच्छ लेखीत असतो. यास्तव, हे भीमसेन, माझा बंधु असलेल्या त्या श्रीकृष्णाने डोहातून कालियास बाहेर काढले, त्याप्रमाणे आपण याला या जीवलोकांतून वर पाठवून द्या. हे भारत, मी दुःखांनी गांजून गेले आहे. माझ्या आंसवांचें पारणे फेडा आणि आपला व आपल्या कुलाचा लौकिक रक्षण करो ! देव आपले रक्षण करो” 

भीमसेन म्हणाला - शाबास सुंदरी ! मला आवडती गोष्टच तू सांगत आहेस. प्रिये, मला दुसऱ्याच्या साहाय्याची अपेक्षा आहे असे का तुला वाटते? मी तर कोणाच्याच साहाय्याची इच्छा करीत नाहीं ! सुंदरी, कीचकाची व माझी गांठ घालून तू मला जो आनंद दिला आहेस, असा आनंद एक हिडिंबासुराला मी मारिले तेव्हांच फक्त मला झाला होता. मी आपले सत्य, भ्राते व धर्म यांची शपथ घेऊन सांगतो की, इंद्रानें वृत्रासुरास मारले त्या प्रमाणे मी कीचकाला ठार करीन. 

अंधाराच्या जागी अथवा प्रकाशांत म्हणजे राजरोसपणेही  त्या कीचकाच्या ठिकऱ्या उडवीन; मग त्याचा कड घेऊन जर इतर मत्स्यवीर लढूं लागले तर त्यांचाही मी निःसंशय फडशा पाडीन; आणि ही बातमी दुर्योधनास कदाचित् कळेल तर त्याच्या आधी मी त्यासही ठार करून ही वसुंधरा ताब्यांत आणीन! कुंतीपुत्र युधिष्ठिराला म्हणावे की, तूं खुशाल विराटाची सेवा करीत बैस !

यावर द्रौपदी म्हणाली :- प्राणनाथ! माझ्या निमित्तानें आपणांस जेणेकरून सत्याचा त्याग करावा लागणार नाही अशा गुप्तपणानेच आपण कीचकाला मारा !

भीमसेन म्हणाला: - अगं भित्रे, बरे. तू म्हणतेस तसेच मी करीन. हे सुकीर्तिमंते, आज त्या अंधारमय नृत्यशाळेत त्याच्या दृष्टीस न पडता मी त्याला व त्याच्या बांधवांना ठार करीन; ज्याप्रमाणे हत्ती बेलफळ पायाखालीं चिरडतो, त्याप्रमाणे त्या अलभ्य स्त्रीची इच्छा करणाऱ्या दुराम्या कीचकाचें मस्तक मी चिरडून टाकीन” 

 मग रात्रीं भीमसेन - आधीच जाऊन दडून बसला, आणि शिकारची वाट पहात छपून बसलेल्या सिंहाप्रमाणे कीचकाची मार्गप्रतीक्षा करूं लागला. मग कीचकही यथेच्छ नटूनसजून त्या ठरलेल्या वेळी पांचालीच्या समागमाच्या आशेने त्या नृत्यशाळेत येऊन पोहचला; आणि ठरलेला बेत मनांत आणीत तो लगेच त्या घरांत शिरलाही! ते घर विस्तीर्ण असून त्यांत पुर्ण काळोख पसरला होता. यामुळे कीचक आंत शिरून चांचपडत चांचपपत द्रौपदीस शोधू लागला. 

शेवटी आधीच तेथे येऊन एकांतांत बसलेला अप्रतिम वीर्यशाली भीमसेन एकदांचा त्या दुष्टाच्या हाताला लागला ! कीचकाने द्रौपदीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आंतल्या आंत क्रोधाग्नीनें धुमसत भीमसेन तेथे मंचकावर पडला होता, त्यास कीचकाचा हात लागतांच त्याला वाटले की ही सैरंध्रीच सांपडली! आधीच बिचारा मदनाने वेडावून गेला होता, आणि तशांत त्याच्या हाताला स्त्रीचे शरीर लागेल. मग काय विचारावें ! त्याचें चित्त हर्षानें उचंबळू लागले आणि तो भीमाजवळ जाऊन हसत हसत म्हणाला, "प्रिये ! बहुत प्रकारची अपार संपत्ती तुला अर्पण केली आहे ! सुंदरी, मी जे द्रव्याने व रत्नांनी भरून टाकिले आहे, जेथे शेकडो दासी वावरत आहेत, आणि रूपलावण्यसंपन्न युवतींनी जे अलंकृत झालेले आहे, असे माझे मंदिर व रतिक्रीडनें शोभायमान असलेले अंतःपुर वगैरे सर्व सोडून मी तुझ्यासाठी मोठ्या उतावळीने येथे आलो आहे. 

मी असा एकाएकी घरी गेलो असतां कुलीन स्त्रियाही  आपणांसारखा उत्तम पोषाकाचा व सुंदर पुरुष दुसरा कोणीच नाहीं' अशी माझी नित्य प्रशंसा करितात ! "

भीम म्हणालाः - तू सुदैवाने दर्शनीय आहेस व आपली आपणच प्रशंसा करीत आहेस हेही उत्तमच आहे. तू तर सुंदर आहेसच, पण हल्ली तुला माझ्या शरीराचा जो स्पर्श होत आहे, अशा प्रकारचा स्पर्श तू पूर्वी कधींही अनुभविला नाहींस ! तूं मोठा विद्वान व विशेषकरून कामशास्त्रांत निपुण असल्यामुळे तुला स्पर्शज्ञान उत्तम झालेले आहे; आणि खरोखर तुझ्यासारखा स्त्रियांस आनंदित करणारा पुरुष या जगांत दुसरा कोणीच नाहीं !

असे त्यास बोलून तो महाबलाढ्य व भीमपराक्रमी कुंतीपुत्र भीमसेन एकदम उडी मारून व्यंगात्मक हास्यपूर्वक त्याला म्हणाला, "अरे पातक्या, सिंह ज्याप्रमाणे महागजाला ओढीत असतो, त्याप्रमाणे आज तुझा हा पर्वतप्राय देह मी जमीनीवरून फरफर ओढीत आहे असे तुझ्या बहिणीच्या दृष्टीस पडेल ! तूं एकदा मेलास म्हणजे सैरंध्री निर्धास्तपणे वागूं लागेल, आणि तिचे पतिही सदोदीत आनंदांत राहतील."

असे म्हणून त्या महा बलवंताने त्याचे फुलांनी सुशोभित केलेले केस धरले. परंतु कीचक काही कमी नव्हता. भीमानें जोरानें केस धरल्याबरोबर, बलवंतांतही वरिष्ठ अशा त्या कीचकानें केस वेगाने हिसडून सोडविले; आणि भीमाचे हात पकडले. मग वसंतऋतूत हत्तिणीच्या निमित्तानें दोन गजांमध्ये भयंकर युद्ध जुंपते त्याप्रमाणे त्या दोघां नरवरांचें म्हणजे किचकाचे पुरुषश्रेष्ठ भीमसेन यांचे भयंकर बाहुयुद्ध सुरू झाले; 

आणि वानरकोटीतील श्रेष्ठ वालि व सुग्रीव हे भाऊ पूर्वी जसे एकमेकांवर खवळले होते, तसे ते दोघे एकमेकांवर खवळले असून परस्परांस जिंकण्यासाठी धडपडत होते. नंतर क्रोधरूपी विषाने भरलेल्या त्या वीरांनी आपले पंचमुखी भुजंगांप्रमाणे भासणारे हात वर उचलून नखांनी व दांतांनी परस्परांवर प्रहार चालविले. मग बलाढ्य कीचकानें भीमास जोराने प्रहार केला, परंतु तो स्थिरप्रतिज्ञ वीर युद्धांत एक पाऊलभरही मागे सरला नाहीं ! पुढें ते एकमेकांशीं भिडून जेव्हां परस्परांस ओढूं लागले, तेव्हां ते दोघेही माजलेल्या पोळांसारखे दिसूं लागले. नखें व दांत हींच ज्यांची हत्यारें आहेत अशा दोन वाघांचा सामना होतो त्याप्रमाणे त्या दोघांचा अति तुंबळ व मोठा दारुण संग्राम झाला. एक हत्ती दुसऱ्या मदोन्मत्त हत्तीवर चालून जातो त्याप्रमाणें कीचकानें त्वेषाने उडी मारून हातांनीं भीमसेनाला पकडले; आणि लगेच त्या वीर्यशाली भीमानेंही त्याचे हात धरले. परंतु बलाढ्यांतही बलाढ्य अशा त्या कीचकानें त्यास जोरानें हिसका मारला.

 याप्रमाणे त्यांचें युद्ध चाललें असतां त्या दोघां बलवंतांचे दंड एकमेकांवर घांसूं लागून, वेळू फुटूं लागले असता ताड ताड असा शब्द होतो त्याप्रमाणे भयंकर शब्द होऊं लागला. नंतर भीमसेनानें त्यास त्या नृत्यशाळेत खाली फरशीवर जोराने आदळलें; आणि प्रचंड वायु वृक्ष हालवितो त्याप्रमाणे तो त्यास गरगर फिरवू लागला. याप्रमाणे त्या बलाढ्य भीमसेनानें त्या दुर्बलास पकडले तेव्हा तो आपली पराकाष्ठा करून त्याच्यापासून सुटण्याविषयी धडपड करू लागला आणि पांडुपुत्र भीमसेनास ओढू लागला. याप्रमाणे त्यानें भीमसेनास किंचित् वांकविलें तेव्हां तो पुनः त्वेषानें सत्वर उभा राहिला. परंतु बलाढ्य कीचकानें लगेच त्यास गुडघ्यांवर खालीं पाडलें. बलवान् कीचकानें भीमाला भूमीवर पाडलें मात्र, लगेच भीमाने ताडकन् उडी मारिली आणि तो दंडधारी अंतकासारखा उभा राहिला ! 

याप्रमाणे ते दोघेही शक्तीनें उन्मत्त झालेले बलाढ्य भीमकीचक मध्यरात्रीं त्या निर्जनस्थलीं मोठ्या स्पर्धेनें एकमेकांस आकर्षीत होते, तेणेकरून ते बळकट घरही वरचेवर हादरू लागले, आणि ते संतप्त झालेले वीर एकमेकांच्या अंगावर ओरडूं लागले ! पुढें बलाढ्य भीमसेनानें कीचकाच्या छातीवर दोन्ही हातांनी चपराका लगावल्या, परंतु रागानें बेहोष झालेला कीचक आपल्या जागेवरून एक पाऊलभरही मागे हटला नाहीं ! भीमाचा वेग या जगात केवळ दुःसह असतांही कीचकानें याप्रमाणे दोन घटकांपर्यंत त्याला दाद दिली नाही ! परंतु उत्तरोत्तर भीमाच्या जोराच्या प्रहारांनीं त्याची शक्ति क्षीण होऊं लागली. 

आणि शत्रूचें बल खचत चालले आहे व त्याचें देहभानही सुटले आहे हें भीमसेनाच्या तेव्हांच लक्षांत येऊन त्या बलवंतानें झपकन् त्याची मुंडी मुरगळून छातीला लाविली; आणि तो बेशुद्ध झाला असतां त्याचें मर्दन केलें. पुनः त्या विजयश्रेष्ठ भीमसेनानें रागारागानें सुस्कारा टाकून त्याची शेंडी घट्ट धरली. याप्रमाणे महाबलिष्ठ भीमसेनानें जेव्हां त्या कीचकाला पकडलें, तेव्हां वाघानें मांस खाण्याच्या इच्छेनें मोठे सावज पकडले असता तो शोभतो तसा तो शोभूं लागला. नंतर कीचक अगदी थकून गेला आहे असें जाणून, दोरीने एखादा पशु घट्ट बांधावा त्याप्रमाणें भीमाने त्यास आपल्या हातांनी जखडून टाकले, आणि तो त्याला पुष्कळ वेळपर्यंत गरगर फिरवीत राहिला. 

याप्रमाणे भीम त्यास फिरवीत असतां तो फुटक्या नगाऱ्यासारख्या आवाजाने फारच मोठ्याने ओरडत होता, आणि अगदी भांबावून जाऊन विलक्षण धडपड करीत होत. मग द्रौपदीचा कोप शांत करण्याकरिता भीमाने दोन्ही हातांनी एकदम त्याचा गळा धरून.  जोराने दाबला; आणि नंतर, ज्याचें सर्व शरीर भग्न होऊन डोळे बाहेर आले आहेत व वस्त्रेही कोणीकडे गेली आहेत अशा त्या अधम कीचकाच्या कमरेवर गुडघा देऊन, पशूस मारतात त्याप्रमाणे दोन्ही हातांनी त्याची मुंडी मुरगळली; व मग तो मूर्च्छित होत आहे पाहून त्याने त्यास भुईवर गडबड लोळविले आणि तो आपल्याशींच म्हणाला, " दुसऱ्याच्या भार्येचा अपहार करणाऱ्या व सैरंध्रीस कांट्याप्रमाणे सलणाऱ्या या कीचकाला ठार करून मी आज भावांच्या ऋणांतून मुक्त झालो आहे ! आता माझे चित्त अगदी स्वस्थ झालें ! "

या वेळी भीमाचे नेत्रांवर क्रोधानें लाली चढली होती, आणि कीचकानें डोळे फिरविले होते ! शिवाय त्याची वस्त्रे व अलंकार अस्ताव्यस्त झालेले होत व तो तडफड करीत होता. असो; याप्रमाणे बोलून पुरुषश्रेष्ठ भीमाने त्यास गतप्राण करून सोडलें ! आणि मग पिनाकधारी शंकर पशूचे मर्दन करितो त्याप्रमाणे त्या संतप्त झालेल्या अति बलाढ्य भीमानें हातावर हात चोळून, दांत ओठ खाऊन आणि जोरानें त्याच्या छातीवर बसून त्यांचे पाय, हात, मान, मस्तक वगैरे सर्व अवयव जोराने त्याच्या पोटांतच चिणून  टाकले ! याप्रमाणे महाबलाढ्य भीमसेनानें त्याचें सर्व शरीर घुसळून त्याचा केवळ मांसाचा गोळा करून टाकला आणि मग तो द्रौपदीला दाखविला. त्या वेळीं तो अतिशय तेजःपुंज वीर वरांगना द्रौपदीला म्हणाला, 'पांचालि, ये, ह्या विषयलंपटाची कशी अवस्था केली आहे पहा ! '

असे म्हणून त्या भीमपराक्रमी भीमसेनानें त्या दुरात्म्याचे शरीर पायांनी तुडवले; आणि मग विस्तव पेटवून व कीचकाच्या गोळ्याकडे बोट दाखवून तो वीर त्या वेळीं तिला म्हणाला, सुंदरी, अगं भित्रे, सुशील व गुणवती अशा तुझा जे अभिलाष धरतील, ते सर्व हा कीचक जसा दिसत आहे अशाच रीतीनें मारले जातील!"

तें दुर्घट काम करून त्याने कृष्णेचा उत्कृष्ट मनोरथ परिपूर्ण केला; आणि याप्रमाणे कीचकाला ठार केल्यावर काही वेळाने त्याचा राग शांत झाला. नंतर द्रौपदीशी कांही मसलत करून तो त्वरेने पाकशाळेत निघून गेला. स्त्रियांमध्ये श्रेष्ठ असलेल्या द्रौपदीच्या मनात जो क्रोधाग्नि निर्माण झाला होता, तो कीचकाचा घात करविल्यावर शांत झाला ; आणि ती हर्षभरित होऊन त्या नृत्यशालेच्या रखवालदारांस हाक मारून म्हणाली, "रक्षक हो, माझे पति गंधर्व यांनी हा परस्त्रीविषयीं कामातुर झालेला कीचक मारून टाकिला आहे! अहो ! तेथे जाऊन एकदा पहा तरी” 

क्रमशः 

पुढची कथा पुढिल दहाव्या भागात 

भाग 10

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/009-virat-parva-marathi-katha_24.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post