भाग 010 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 010 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 010 

विराटपर्व कथासार मराठी 

(Virat parva marathi katha mahabharat kahani)


भीमसेनाने किचकाचा वध केल्यानंतर द्रौपदी अति हर्षभरित होऊन त्या नृत्यशालेच्या रखवालदारास हाक मारून म्हणाली, "रक्षक हो, माझे पति गंधर्व यांनी हा परस्त्रीविषयीं कामातुर झालेला कचिक मारून टाकिला आहे! अहो ! तेथे जाऊन एकदा पहा!” 
द्रौपदीचे ते बोलणे ऐकून नृत्यशालेचे रक्षक खडबडून जागे झाले, त्यांनी हजारो मशाली घेतल्या, आणि मग ते धावतच त्या सभागृहात गेले, तो कीचकाचे सर्व अंग रक्तानें माखले असून तो तेथे गतप्राण होऊन पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले ! 
त्याच्या देहाची झालेली अवस्था पाहून त्यांना आश्चर्ययुक्त भीती वाटली. त्याचे हात व पाय नाहीसे झालेले पाहून तर त्यांना घाम फुटला. मग ते सर्वजण अगदी आश्चर्यचकित होऊन त्याकडे निरखून पाहू लागले; गंधर्वांनी ठार केल्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या त्या कीचकास पाहून, ते म्हणाले अरेरे, हे भयंकर कर्म तर फारच अमानुषपणे केलेले आहे ! अरे, याची मान कोठे आहे? हात कोठें आहेत? आणि पाय व मस्तक कोठें आहे ? " असे म्हणत ते भीत भीत त्याचें निरीक्षण करू लागले ! किचक मारला गेला ही बातमी विराट नगरात वाऱ्यासारखी पसरली. 

भीमसेनाकडून कीचकाच्या भावांचा वध

इतक्या वेळात कीचकाच्या भावांना ही बातमी कळून ते सर्वजण तेथे आले आणि कीचकाला गराडा घालून त्याकडे पाहून रडू लागले. स्वर्गाचा राजा इंद्र राक्षसाच्या चिंधड्या करतो त्याप्रमाणे भीमाने त्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत, आणि त्याचे सर्व अवयव छिन्नभिन्न झाले असून पाण्यातून वर काढलेल्या कासवाचे अवयव पोटामध्ये लुप्त झालेले असतात त्याप्रमाणे त्याचे हातपाय वगैरे अवयव आंतल्या आंत चिणले गेले आहेत, असे पाहून त्यांच्या अंगावर कांटा आला ! 
आणि त्या सर्वांना फार मोठें दुःख झाले. पुढे त्याचा दहनसंस्कार करण्याच्या हेतूने ते त्याला बाहेर काढण्याच्या तयारीला लागले, इतक्यांत द्रौपदी त्यांच्या दृष्टीस पडली. ती सुंदरी तेथे एका खांबास टेकून उभी होती. तिला पाहताच ते जमलेले कीचकाचे भाऊ तिचे काय करायचे याबद्दल वाटाघाट करू लागले. 
पांचा आगळे एकशत । कीचकबंधू बळसमर्थ । 
त्यांतें विराट आज्ञा करीत । 'प्रेतसंस्कार करावा.' ॥
कोणी म्हणाले, "या पापिणीस ठार करून टाका. कारण हिच्यांमुळेच कीचकाचा वध झाला! " दुसरे म्हणाले, "अरे ! हिला मारता कशाला? काही मारू नका. कीचक हिच्यावर लुब्ध झाला होता, तेव्हा त्याच्याबरोबर हिलाही जाळून टाका. कारण मृत झालेल्या किचक दादाचे मनोरथ सर्व प्रकारे पूर्ण करणे हैं आपले कर्तव्यच होय ! त्यांची इच्छा शिल्लक राहणे बरोबर नाहीं ! "
प्रेत चालविलें स्मशानीं । 
बंधू प्रवर्तले दीर्घ रूदनीं, ।
म्हणती, 'राया ! आम्हां लागुनी । 
आणिक आज्ञा दिधली पाहिजे. ॥ 

सैरंध्रीयें घेतला प्राण । तीचे करूं देह दहन, । 
पावकीं घालू हे बांधून । जेवी नारळ होळिके.' ।।
 
राजा म्हणे, ‘गंधर्व येती । त्यांतें आवरावया शक्ती ।
अंगीं असेल, तरी हे रीती । विचारुनी वर्तावें ॥ 

बंधूचिया संगती जाणा । जाणें न लगे यमसदना, । 
ऐसें कीजे विचक्षणा! । दीर्घदृष्टी विलोकें. ॥ 

ते म्हणती, ‘जी ! नरपार्थिवा ! । 
गंधर्वांचा किंतुला केवा ? । 
युद्धापातलेया मघवा । शिक्षा करूं प्रतापे ॥ 

द्रौपदी कवळूनियां हस्तकें । 
चालविली रुद्रभूमिके. । 
येरी विलापुनि, दुःखें । सर्व लोकां जाणवी ॥

मग ते विराट राजाला म्हणाले, "महाराज ! या सैरंध्रीमुळें कीचक मारला गेला, सबब आम्ही हिला त्याच्याबरोबर जाळून टाकतों. तर महाराजांनी आम्हांस याविषयी अनुज्ञा द्यावी.” तें ऐकून राजाला जरा विचार पडला. गंधर्वाच्या या कृत्याने त्याचीही झोप उडाली होती. परंतु सूतपुत्र किचकाचे भाऊ हे मोठे पराक्रमी आहेत, जर त्यांचे मन मोडणे उपयोगाचे नाही, असा मनांत विचार करून सैरंध्रीचें कीचकाबरोबर दहन करण्यास त्याने परवानगी दिली. तरी पण तो त्यांना म्हणाला कि, “ते गंधर्व फार पराक्रमी आहेत. त्यांच्याशी युद्ध करण्याचे तुमच्यात सामर्थ्य असेल तरच हा विचार करा नाहीतर तुमच्या भावासोबत तुम्हीही यमलोकी जाल.”
या वेळी कमलनयना द्रौपदी अगदी भयभीत झाली असून तिला मूर्छेनेही अर्धवट घेरले होतें. राजाची आज्ञा मिळतांच सूतांनी द्रौपदीस गांठून घट्ट धरले आणि मग त्या सुकुमारीस तिरडीवर घालून व नीट बांधून ते सर्वजण स्मशानाकडे जाऊं लागले !
राजा, याप्रमाणे त्या निष्पाप द्रौपदीला ते बळेच नेऊ लागले तेव्हा ती पतिव्रता व वास्तविक सनाथ असलेली श्रीकृष्णभगिनी रक्षणार्थ मोठ्याने आक्रोश करू लागली, 
जय, जयंत, विजयनामा, । 
जयत्सेन, जयद्वल सुकर्मा, । 
या पांचांच्याही पराक्रमा । दुजी उपमा असेना ॥

पांचही गंधर्व बळसमर्थ । 
असती याा देहाचे प्राणनाथ, ।
तयांतें जाणवावा वृत्तांत । 
भार्या तुमची नेली दुरात्मीं. ॥

बांधोनि होमिती पावका । 
हा अन्याय असावा ठाउका.' ।
ऐसें जाणवितां लोकां । पांचांतेंही जाणवलें ॥ 

मग भीमसेन राहोनि गुप्त । 
हाक मारी गगनाआंत, ।
यापासूनि भयाचा वांत । तूतें न लागे सर्वथा. ॥ 

स्वस्थ होवोनि अंतःकरणीं । 
होईल तें विलोकीं नयनीं.' ।
 येणें बोलें याज्ञसेनी । स्वस्थ चित्तें राहिली. ॥  

आडमार्गे उडोनि भिंती । भीम पातला गुप्तगती । 
कोणा न कळतां महामूर्ती । सिद्ध पुरुष पैं” जैसा. ॥

रुद्रभूमिकेचिये तळवटीं । शमीवृक्षांची महादाटीं । 
तेथून प्रकटला जगजेठी । गंधर्वरूपा अवगला ॥

तालप्रमाण विशालकर । 
हातीं प्रचंड तरुवर। 
देखोनि कीचकसहोदर । 
म्हणती, 'गंधर्व पातला !' ॥" 

शंख कैरिती दोनी हातें । पळों लागले नगरपंथें । 
भीमें धांवोनि मांगुतें । वळोनि बळें आणिले. ॥ 

बैलें ओपितां वृक्षघात । एक एक झाले प्रेत, । 
पांचा आगळे एकशत । कीचकबंधू मारिले ॥

“अहो, हे सूतपुत्र मला नेत आहेत! अहो जय, जयंत, विजय, जयत्सेन व जयद्वल ! आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्या वेगवान् गंधर्वांचा महायुद्धामध्ये प्रचंड रथघोष, भयंकर गर्जना, मेघांच्या गडगडाटासारखा तलशब्द व प्रत्यंचेचा टणत्कार ऐकूं येत असे, त्यांनी माझ्या ह्या आरोळ्यांकडे लक्ष पुरवावे. अहो, हे सूतपुत्र मला मारण्यासाठी नेत आहेत ! "
द्रौपदीचें तें दीन भाषण व ते विवळणे ऐकताच भीमसेन मागचा पुढचा विचार न करता अंथरुणावरून खडबडून उठून तिच्याकडे धावला. आता या सुतपूत्रांचा सर्वनाश केल्याशिवाय गत्यंतर नाही. असे पुटपुटून त्या महाबलिष्ठ भिमाने किचक बंधूंचा प्राण घेण्याच्या हेतूने जांभई दिली, आणि जरा आळेपिळे देऊन व वेष पालटून तो खिडकीवाटे खाली उतरून बाहेर पडला. मग त्याने पटकन् तटावरून एका वृक्षावर चढून चोहोकडे नजर फेकली, आणि गलबला कोणत्या बाजूला आहे हे पाहिल्यावर, जेथे ते कीचक गेले होते. त्या स्मशानाकडे धूम ठोकली. तटावरून उडी मारून तो नगराच्या बाहेर पडला आणि वेगाने त्या सूतपुत्रांकडे धावत गेला. गेल्यानंतर त्या वेळी त्याने आकाशात मोठ्याने ओरडून म्हटले, हे सैरंध्री, तुझें बोलणे आम्हा गंधर्वांना ऐकू येत आहे, तरी भित्रे, आता तुला सूतपुत्रांपासून बिलकूल भीति नाहीं !"
आणि चितेच्या जवळ पोहचल्यावर तेथे एक वृक्ष त्याच्या दृष्टीस पडला. तो ताडाएवढा उंच असून त्याला मोठमोठ्या खांद्या होत्या आणि त्याचा शेंडा वाळून गेला होता. राजा, हा वृक्ष पहाण्याबरोबर भीमाला वाटले की, यांना मारावयाला हे हत्यार ठीक आहे ! मग लगेच त्या परंतपानें हत्तीप्रमाणे हातांनी विळखा मारून तो ५० फुट उंचीचा वृक्ष उपटला आणि खांद्यावर टाकला; आणि तो ५० फुट लांबीचा वृक्ष फांद्या वगैरे तसाच खांद्यावर टाकून तो बलवंत भीमसेन यमराजासारखा सूतांकडे धावत गेला. त्या वेळी तो इतक्या वेगाने धावला कीं, त्याच्य मांड्याच्या वेगाने म्हणजे त्यांपासून उत्पन्न झालेल्या वावटळीने आजूबाजूचे वड, पिंपळ, प ळस वगैरे वृक्ष मोडून भूमीवर पडले आणि एकावर एक पुष्कळ वृक्ष पडून तेथे त्या ढीग बनले ! 
तो सिंहासारखा चवताळून येत असतां त्यास पाहून हा गंधर्वच आला असे सूत पूत्रांना वाटले, ते अगदी भयभीत होऊन गेले, त्यांची तोंडे उतरून गेली, ते भीतीनें लटलट कापू लागले आणि म्हणाले, "हा बलाढ्य गंधर्व संतापून मोठा थोरला वृक्ष उचलून धावून येत आहे, तेव्हा सैरंध्रीस लवकर सोडून द्या. कारण आपल्यावर हे मोठेच संकट आले आहे ! "

भीमाने वृक्ष उगारला असे पाहतांच त्यांनी द्रौपदीस तेथेच सोडून ते नगराकडे धावत सुटले . परंतु, राजेंद्रा, ते पळत आहेत असे पाहताच त्या बलाढ्य वायुपुत्र भीमसेनाने त्यांचा पाठलाग केला; आणि वज्रधारी इंद्र दानवांची कत्तल उडवितो त्याप्रमाणे त्यानें त्या वृक्षानेंच त्या एकशे पांच (१०५) सूतांना यमसमनी पाठविले ! राजा, याप्रमाणे द्रौपदीची सुटका करून त्याने तिचे सांत्वन केलें; आणि डोळे पाण्याने भरून येऊन अगदीं दीनवाण्याप्रमाणे झालेल्या त्या द्रौपदीला तो केवळ अजिंक्य असलेला महाबाहु भीमसेन म्हणाला, “भित्रे, तू निर्दोष असतांना तुला जे क्लेश देतात ते असेच ठार होत असतात ! कृष्णे, आता तुला कोणाचें भय उरलें नाही. तू लवकर नगरात जा आणि मीही दुसऱ्या वाटेने विराटाच्या पाकशालेत परत जातो ! ”
अरण्याची वृक्षतोड झाली असता त्यातील सर्व वृक्ष आडवे पडून काही बांकी रहात नाही, त्याप्रमाणे त्या एकशेपाच जणापैकी कोणीच शिल्लक राहिला नाही ! राजा, याप्रमाणे मारलेले ते एकशे पांच किचक आणि पूर्वी ठार केलेला तो सेनापति मिळून एकशे सहा कीचक भीमाने ठार केले !  
दुसरे दिवशी सकाळी हा आश्चर्यकारक प्रकार पाहून तेथे पुरुष व स्त्रिया यांची गर्दी जमली, परंतु सर्वजण इतकी विस्मय चकित होऊन गेली होती की, त्यांच्या तोंडून एक चकार शब्द निघत नव्हता !

क्रमशः 

पुढची कथा पुढिल अकराव्या भागात 

भाग 011 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/011-virat-parva-marathi-katha.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post