भाग 011 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 011 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 011 

विराटपर्व कथासार मराठी 

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 

किचक वधानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा आश्चर्यकारक प्रकार पाहून तेथे पुरुष व स्त्रिया यांची गर्दी जमली, परंतु सर्वजण इतकी विस्मय चकित होऊन गेली होती की, त्यांच्या तोंडून एक चकार शब्द निघत नव्हता !

मग त्या विराटनगरातल्या लोकांनी सर्व सूतपुत्र मारले गेलेले पाहून राजाकडे जाऊन त्याला याबद्दल वर्दी दिली. ते म्हणाले, "राजा, सूतपुत्र सर्व केवढे बलाढ्य, परंतु त्यांनाही गंधर्वांनी ठार केले ! ज्याप्रमाणे वज्राच्या प्रहाराने पर्वताचें प्रचंड शिखर विदीर्ण होतें, त्याप्रमाणें सूतपुत्र विदीर्ण होऊन चहुकडे जमीनीवर पडलेले दिसत आहेत ! आतां ती सैरंध्रीही मुक्त झाली असून पुनः तुझ्या राजवाड्याकडे येत आहे. 

आता हिच्या येथे असण्याने तुझ्या सर्व नगराची धडगत दिसत नाही. केव्हां कसा अनर्थ होईल याचा काही नेम नाहीं ! कारण सैरंध्री मोठी रूपवती आहे आणि गंधर्वही मोठे बलाढ्य आहेत; आणि पुरुषांना विषय हा इष्ट असून सुंदर स्त्रीकडे त्यांच्या मनाचा निःसंशय स्वाभाविक ओढा असणार ! तेव्हा, राजा, केवळ हिच्यामुळे लवकरच तुझ्या या सर्व नगराचा नाश होणार नाही असा काहीतरी उपाय कर !"

त्यांचें तें भाषण ऐकून घेऊन विराट राजाने त्यांना सांगितलें कीं, "प्रथम या सूतांना नीट सरण रचून जाळा. एकच मोठी चिता चांगली पेटवून त्यांत सर्व कीचकांचे लवकर दहन करा आणि त्याचबरोबर त्या चितेत रत्ने व सुगंधी द्रव्येही घाला." मग तो भयभीत झालेला राजा सुदेष्णा राणीला म्हणाला - सैरंध्री येऊ लागली. म्हणजे तिला माझें असें म्हणणे सांग की, " हे सैरंध्री, तुझे कल्याण असो. सुंदरी, तुला वाटेल तिकडे तू निघून जा. कारण, हे सुंदरी, गंधर्व आपला नाश करतील की काय अशी राजाला भीति पडली आहे. तो स्वतःच तुला हे सांगणार होता; परंतु गंधर्व तुझें रक्षण करीत असल्यामुळे तुझ्याजवळ बोलण्याचा त्याला धीर होत नाहीं. स्त्रियांना मात्र बोलण्याला काही हरकत नसल्यामुळे राजाचें म्हणणे मी तुला सांगत आहे ! "

इकडे भीमसेनाने सूतपुत्रांचा संहार करून सोडविल्यानंतर त्या भयमुक्त झालेल्या द्रौपदीनें सचैल स्नान केले; आणि मग ती सद्गुणवती वाघापासून भय पावलेल्या हरिणबालिकेप्रमाणे भीतभीतच नगरात गेली ! राजा, तिला पाहतांच लोक गंधर्वांच्या भीतीने दाही दिशांमध्ये पळत सुटले ! आणि कित्येक दडून बसले ! राजा, पुढे पाकशाळेच्या दरवाज्याआत महागजाप्रमाणे मत्त असलेला भीमसेन बसला आहे असे द्रौपदीनें पाहिले, तेव्हा ती विस्मयपूर्वक व हळूच संज्ञेनें म्हणाली, 'ज्याने मला मुक्त केले त्या गंधर्व राजाला नमस्कार असो ! ' यावर भीमसेन तिला म्हणाला, जे पुरुष येथें पूर्वी तुझ्या मर्जीप्रमाणे वागत असत, त्यांनी तुझें हें भाषण ऐकून आता पुढे कृतकृत्यपणे खुशाल असावें !

पुढे नृत्यशाळेत अर्जुन तिच्या नजरेस पडला. तो महाबाहु विराट राजाच्या मुलींना नृत्य शिकवीत होता. द्रौपदी येतांच त्या मुली अर्जुनासह नृत्य शाळेच्या बाहेर आल्या; आणि निरपराधी असताही जिला क्लेश भोगावे लागले ती द्रोपदी येत आहे असे त्यांनी पाहिले तेव्हां त्या मुली म्हणाल्या, " सैरंध्री, तुझें नशीब थोर म्हणूनच तू सुटलीस. तू परत आलीस हे सुदैवच समजले पाहिजे; आणि तुझा अपराध नसताना तुला ज्यांनीं पीडा दिली ते सूतपुत्र नाश पावले हेही सुदैवच होय ! "


बृहन्नला म्हणालीः - सैरंध्र, तू मुक्त कशी झालीस आणि ते पापी कसे मरण पावले हे सर्व तुझ्या तोंडून अगदी जसेच्या तसे ऐकण्याची माझी इच्छा आहे !

सैरंध्रीने उत्तर दिलें: - बृहन्नले, आज तुला सैरंध्रीशी काय करावयाचे आहे? तुला आज तिची कोठे गरज आहे? कारण, हे कल्याणी, तू कन्यांच्या अंतःपुरांत सदोदीत चैनीने रहात आहेस ! सैरंध्रीला जें दुःख भोगावे लागतें ते कांही तुला प्राप्त होत नाही. यामुळे मी दुःखित झालें असतां तू आपली असे हसत हसतच मला विचारीत आहेस !

बृहन्नला ह्मणालीः – कल्याणि, बृहन्नलाही विलक्षण दुःख भोगीत आहे. तिला तिर्यग्योनि प्राप्त झाली आहे, त्यात तिची स्थिति काय आहे हे तू जाणत नाहीस. शिवाय तुझ्याबरोबर मी राहिलेली आहे आणि तुही आम्हां सर्वांबरोबर राहिलेली आहेस. तेव्हां, सुंदरी, तुला क्लेश होत असतां कोणाला बरे दुःख होणार नाहीं ! खरोखर कोणाचें मन कसे आहे हे दुसऱ्यास पूर्णपणे कळणे मुळीच शक्य नाही ; आणि म्हणूनच माझ्या मनाची काय अवस्था आहे हे तुला बरोबर समजत नाहीं !

मग त्या मुलींसह द्रौपदी राजवाड्यात शिरली आणि सुदेष्णेजवळ जाऊ लागली. तेव्हा विराटाच्या सांगण्यावरून राजकन्या सुदेष्णा तिला म्हणाली, "सैरंध्री, तुला वाटेल तिकडे तू लवकर निघून जा. हे कल्याणी, गंधर्वांपासून नाश होईल म्हणून राजा तुला फार भीत आहे. शिवाय, सुंदरी, तुही तरुण असून तुझ्यासारखी रूपवती या जगात कोणी नाहीं. पुरुष हे विषयी असतात आणि गंधर्व तर अतिशय रागीट आहेत ! आणखी कोणी जर तुझ्याकडे कुदृष्टीने पाहिले तर ते त्याचाही नाश करतील आणि अशाप्रकारे नेहमी भयावह परिस्थीती राहील. म्हणून तू आम्हा सर्वांचे हित कर आणि येथून निघून जा.” 

सैरंध्रीनें उत्तर केले :- हे महाराज्ञि, फक्त तेरा दिवसपर्यंत राजाने मजवर कृपा करावी, म्हणजे तोपर्यंत ते गंधर्व निःसंशय कृतकृत्य होतील. मग ते मला आपल्याजवळ घेऊन जातील, तुझे मनोरथ पूर्ण करतील, आणि खात्रीनें बांधवांसह विराटराजाचेही कल्याण करतील !” 

सुदेष्णा राणी विचारात पडली. व राजाकडे जाऊन द्रौपदीचे बोलणे सांगितले. राजानेही ते अनिच्छेने मान्य केले 

सर्व अनुजांसह कीचकाचा नाश झाला असे पाहून सामान्य लोकांची छाती तर अगदीं धडाडून गेली व ते आश्चर्यानें चकित झाले ! विराटनगरीत व इतरत्र सर्व देशभर लोकांत जिकडे तिकडे त्याच गोष्टीची चर्चा सुरू झाली ! ते म्हणाले, "काय हो त्या कीचकाचें अचाट सामर्थ्य ! त्याच्या त्या अद्वितीय शौर्यामुळे तो राजाचा अगदी कंठमणी बनला होता. शत्रुसैन्याचा तर तो केवळ काळच होता असं म्हटलं तरी चालेल ! पण काय, त्या दुष्ट दुरात्म्याची परस्त्रियांवर वाकडी नजर असल्यामुळे त्या अधमाला गंधर्वांच्या हस्ते अखेरीस मृत्यु मुखी पडावें लागले!" या प्रमाणे त्या महाबलाढ्य कीचकाविषयी देशोदेशी सर्व लोकांमध्ये एकच उद्गार निघू लागले.

इकडे हस्तिनापुरात त्या दुर्योधनाने पांडवांच्या , शोधार्थ पाठविलेले हजारो गुप्तहेर पुष्कळ राष्ट्रें, नगरे, गांव वगैरे धुंडाळून थकले; आणि त्यांना जे जे आढळले व त्यांनी जे जे कांही आश्चर्य पाहिले त्या सर्वाची नीट आठवण ठेवून ते आणखी पुढे शोध करता आपली कामगिरी संपवून परत हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत दाखल झाले. नंतर त्या गुप्तहेरांनी राजसभेत प्रवेश केला; आणि द्रोणाचार्य, कृपाचार्य, महात्मा भीष्म, कर्ण, दुःशासनादिक ९९ भ्राते, महारथ त्रिगर्त आदिकरून मोठमोठ्या सभासदांनी परिवेष्टित असलेल्या दुर्योधन राजाला सर्व वृत्तांत निवेदन केला.

गुप्तहेरांचा मुख्य म्हणाला - हे राजा दुर्योधना, त्या महान् अरण्यामध्ये पाचही पांडवांचा पत्ता काडण्यासाठी आम्ही एकसारखा अत्यंत प्रयत्न केला. राजा, ते अरण्य सामान्य नाही. तेथें मनुष्याचा वारा सुद्धा फिरकत नाहीं. श्वापदांच्या वास्तव्यामुळे तेथे प्रवेश करणे मोठें दुष्कर होय. त्यांत नानाप्रकारच्या वृक्षवेलींची एकच झुंबाडे व लहानमोठ्या झाड झुडपांच्या निबिड जाळ्या आहेत; यास्तव त्यातून कोणत्या मार्गानें महापराक्रमी पांडव निघून गेले याचा आम्हास थांगपत्ता लागला नाहीं.

राजा, संपूर्ण आर्यावर्तात पर्वतांचीं उंच उंच शिखरे, अनेक देश, भरवस्तीचीं नगरें, गांवें, खेडींपाडीं वगैरे सर्व ठिकाणीं त्यांचा मागमूस लागावा म्हणून आम्हीं अनेक प्रकारें शोध व टेहळणी केली, परंतु ती सर्व फुकट गेली, आम्ही जसे गेलो तसे परत आलों आहोत ! राजा, पांडवांचा आता कायमचा नाश झाला आहे यात वानवा नाही ; त्यामुळे तुझे कल्याण होवो ! 

भूपते, पांडवांचा शोध करण्याच्या कामी आम्ही आपली प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पांडव कदाचित् रथात जाणाऱ्या लोकांच्या मार्गानें गेले असतील, असा विचार करून आणून आम्ही त्या बाजूनेही फिरलो. परंतु त्यांचा मार्ग किंवा वसति स्थान यांचा आम्हाला थांग लागला नाही. राजा, कांहीं काळपर्यंत आम्ही पांडवांच्या सारथ्यांच्या पाळतीवर होतो व अखेरीस आली त्यांचा ठाव ठिकाणही काढला. 

राजा, पांडवांचे सारथी द्वारकेला निघून गेले, पण पांडव व द्रौपदी हे मात्र त्यांच्याबरोबर तिकडे गेलेले नाहीत. राजेंद्रा, ते महाव्रत पांडव व ती महासाध्वी द्रौपदी ही खचीत सर्वस्वी नष्ट झालीं, यात संदेह नाही. राजा, आम्ही तुला वंदन करतो. आम्हाला पांडवांचे गमन किंवा वास्तव्य ही मुळींच कळली नाहीत. 

तसेच त्या पाचही दिव्य पुरुषांची असामान्य कृत्यें किंवा त्या संबंधित वार्ताही विदित झाली नाही. तेव्हां आम्ही यापेक्षा त्यांच्या शोधार्थ आणखी काय करावे याची आम्हाला आज्ञा कर. राजा दुर्योधना, याशिवाय आह्माला आणखी एक शुभ व प्रिय अशी वार्ता कळली आहे, ती श्रवण कर. हे नरश्रेष्ठा, ती वार्ता ही की, मत्स्याधिपतीच्या ज्या बलाढ्य सारथ्यानें त्रिगर्तास मारलें, तो महाशूर व बलिष्ठ दुष्ट कीचक आपल्या भ्रात्यांसह रात्रीच्या समयी अदृश्य गंधर्वांच्या हस्ते मृत्युमुखी पडला. त्यामुळे राजा, आता तुला शत्रूपासून पीडा अशी उरलीच नाही. याकरितां तू कृतकृत्य होत्साता या पुढे जे कांहीं इष्ट कर्तव्य असेल तें कर.

गुप्तचरांचे बोलणे ऐकून तो कुमतीने ग्रासलेला दुर्योधन बराच वेळ विचार करीत स्तब्ध राहिला; व नंतर सभासदांस म्हणाला, " सभ्य हो, अमुक एक साधन योजले असतां उद्दिष्ट हेतु निश्चयाने सिद्धीस जातील, असे म्हणणे मोठे दुर्घट आहे. यासाठी, पांडव कोठें आहेत याबद्दल सर्वांनीच शोध करणे आवश्यक आहे. पांडवांच्या या तेराव्या वर्षाचा म्हणजे अज्ञातवासाचा बहुतेक काळ निघून गेला आहे ; अगदी थोडा काळ उरला आहे. हे दिवस जर त्यांनी अज्ञातस्थितीत पार पाडिले, तर त्यांची प्रतिज्ञा सिद्धीस जावून आपले अर्ध राज्य द्यावे लागेल. या प्रमाणे जर ते आपला पण पूर्ण करून परत आले, तर मग मदोन्मत्त हत्तीप्रमाणे किंवा उम्र विष धारण करणाऱ्या सर्पाप्रमाणे ते आपल्यावर चवताळून येतील व मग त्यापुढे आपला टिकाव लागणार नाही.  

त्यामुळे सभासद हो, अगदी हयगय न करता त्यांना हुडकून काढा. ; ते सर्वजण प्रसंग ओळखून वागणारे आहेत. ते तुम्हांस सहज ओळखितां येणार नाहीत. त्यांनी मोठीं गूढ रूपें धारण केली असतील. ते आपले मनोविकार किंवा अंगाचे तेज बाहेर पडूं न देतां वागत असतील. ह्यास्तव मोठ्या चतुराईनें त्यांना लवकर शोधून काढा, व पुन्हा एकदा वनवासात पाठवा, म्हणजे त्यांचा पूर्ण नाश होऊन आपणास निष्कंटक राज्याचा चिरकाल पर्यंत खुशाल उपभोग घेता येईल ! ”

 दुर्योधनाचे हे भाषण ऐकून कर्ण म्हणाला, राजा दुर्योधना, पांडवांना शोधण्याकरितां विश्वासू, धूर्त, दक्ष व हुषार असे दुसरे गुप्तहेर लवकर पाठविण्यात यावे. त्यांनी वेषांतर करून मनुष्यांनी भरलेल्या वधनधान्यानें समृद्ध असलेल्या अशा देशांमध्ये फिरावे. विद्वानांच्या सभा, सिद्ध व संन्याशी यांचे आश्रम, राजधान्या, विविध तीर्थे व क्षेत्रे, खाणींच्या जागा इत्यादि स्थलीं त्यांनी आपली यथाशास्त्र तर्कशक्ति चालवून पांडवांचा पत्ता काढावा. पांडव कोठेही उघडपणे राहिले असतील असे मानणे व्यर्थ होय. त्यामुळे गूढ गोष्टींचा शोध लावण्यांत तत्पर व हुषार अशा चूर्त हेरांनी आपला कावा दुसन्यास अगदी कळू न देता नदीच्या तीरावरील कुंजांतून, गावातून, सर्व शहरातून व रमणीय आश्रमांतून हिंडून किंवा पर्वतांवर अथवा गुहातून संचार करून पांडवांचा शोध लावावा ! "

या प्रमाणे कर्णाने म्हटल्यावर दुष्ट दुरात्मा दुःशासन दुर्योधनास म्हणाला, " हे मनुजाधिपा, ज्या हेरांवर आपला विश्वास आहे, त्या हेरांचें वेतन त्यांवा आधीं देऊन पुनः पांडवांचा शोध करण्यास पाठवून द्यावे. अंगराज कर्णाने आता जे काही सांगितलें, ते सर्व व्हावे, अशी माझी मनीषा आहे. त्यामुळे या व दुसऱ्या पुष्कळ हेरांनी मुख्य उद्देशावर लक्ष्य ठेवून पांडवांचा पत्ता काढण्यास वाटेल तिकडे परिभ्रमण करावें. त्यांनी देशोदेशीं संचार केला पाहिजे. 

पहा आपण इतके प्रयत्न करीत असताही अद्याप आपणास पांडवांचा ठावठिकाण किंवा बातमी लागत नाही, यावरून त्यांनी फारच गुप्तपणें वास्तव्य केले असले पाहिजे, किंवा ते समुद्राच्या पैलतीरास गेले असले पाहिजेत. कदाचित् शौर्याच्या घमेंडीने ते महान् अरण्यात राहिले असता त्यांना वनांत श्वापदांनीही खाऊन टाकलें असेल; अथवा दुर्धर संकटें कंठावी लागल्यामुळे त्यांचा कायमचा नाशही झाला असेल ! त्यामुळे राजेंद्रा, मनाची तळमळ अगदीं नाहींशी करून, तुला जे कांहीं कर्तव्य असेल ते मोठ्या उत्साहाने पुन्हा आरंभ कर.

कर्ण व दुःशासनाचे बोलणे झाल्यावर महापराक्रमी व सत्यार्थज्ञानी द्रोणाचार्य म्हणाले, "अरे, पांडवांसारख्या महावीरांना विनाश किंवा पराभव कधीही प्राप्त होणार नाही. अरे, ते शूर, विद्वान्, बुद्धिमान्, जितेंद्रिय, धर्मवेत्ते, कृतज्ञ असून धर्मराजाच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करणारे आहेत. पहा-त्या - धर्माची केवढी हो योग्यता ! त्यास धर्म, नीतिशास्त्र व अर्थशास्त्र याचें मुख्य तत्त्व यथार्थ विदित असून तो तदनुसार पूर्णपणे वागतो. त्यामुळे त्या धर्मनिष्ठ व सत्यसंघ ज्येष्ठ भ्रात्याच्या ठिकाणी पित्याप्रमाणे निष्ठा ठेवणाऱ्या त्या पांडवांवर भलताच प्रसंग कसा ओढवेल बरें ? 

तो अजातशत्रु वैभवशाली धर्मात्मा राजा युधिष्ठिर आपल्या आज्ञेत वागणाऱ्या आपल्या भ्रात्यांवर अवकृपा करील काय ! माझे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की अर्जुनादिक बंधूंच्या विनयशीलतेमुळे व धर्ममूर्ति युधिष्ठिराच्या नितीमुळे, त्या उदारबुद्धी पांडवांचा नाश झाला असेल हे मुळींच संभवत नाहीं. मला निःसंशय असे वाटते कीं, ते मोठ्या सावधगिरीने अनुकूल काळाची वाट पहात बसले असतील. यासाठी, जे काही करावयाचे ते पूर्ण विचार करून करा. आता विलंब अगदी करू नका.

 पांडवांचें वास्तव्य कोठे आहे, याचें बरोबर अनुमान काढा. अहो, पांडवांचे मानसिक धैर्य मोठें विलक्षण आहे. कसाही प्रसंग आला असता त्यांतून पार पडण्यास झटल्याशिवाय ते राहणार नाहीत. खरोखर या शूरांचा शोध लावण्याचे काम मोठे अवघड आहे. त्यांच्या ठिकाणीं तपस्तेज जागृत असल्यामुळे त्यांना जाऊन गांठू हे म्हणणे तरी असंभाव्यच होय ! अरे फार काय पण तो शुद्धात्मा, गुणवान्, सत्यशील, नीतिमान्, निर्मल, तेजस्वी व अतुलपराक्रमी धर्मराजा प्रत्यक्ष दृष्टीस प डला तरी देखील त्यास ओळखण्याविषयीं भान रहाणार नाहीं ! यासाठीं, जे कांहीं कर्तव्य असेल ते मोठ्या धूर्तपणाने करा. ब्राह्मण, सिद्ध किंवा जे दुसरे कोणी पांडवांस ओळखण्यास समर्थ असतील, त्यांनी हेर म्हणून पुन्हा देश पर्यटन करून पांडवांचा माग काढावा, शोध घ्यावा हे सर्वस्वी योग्य होय ! "

द्रोणाचार्यांचे बोलणे आटोपल्यावर शंतनु पुत्र व कौरव-पांडवांच्या पितामह भीष्म याने द्रोणाचार्यांच्या बोलण्याविषयी आपली मान्यता दर्शवून युधिष्ठिराला उद्देशून नेहमी सज्जनांना प्रिय व मान्य आणि दुर्जनांना दुर्लभ अशा निष्पक्षपाती वाणीने कौरवांचे हित व्हावे म्हणून म्हणाला. “अरे द्रोणाचार्यांनी आता जे काही म्हटले ते अगदी खरे आहे द्रोणाचार्यांना सर्व वस्तुस्थिती माहित आहे. त्यांनी पांडवांविषयी जे काही सांगितले ते अगदी सत्य आहे. पांडव हे सर्व लक्षणांनी संपन्न आहेत ते नित्य सज्जनांच्या मार्गाचे अवलंबन करतात त्यांना सर्व प्रकारची शास्त्रे व इतिहास अवगत आहेत. ते सर्वकाळ वृद्धजणांची आज्ञा पाळतात. ते सत्यरूप व्रत पार पाळण्यास नेहमी तत्पर असतात. ते निष्पाप वर्तन करून आपली प्रतिज्ञा सिद्धीस नेण्याविषयी नित्य प्रयत्न करतात. क्षत्रियांची जी कर्तव्ये आहेत ती कर्तव्य करण्यास त्यांना मनापासून आवडी आहे. ते नेहमी श्रीकृष्ण भगवंतांच्या चरणी विलीन आहेत. 

ते पांडव मोठे पराक्रमी व बलिष्ठ आहेत त्याकरता सत्पुरुषांचे व्रत सिद्धीस नेण्यास विषयी धुरंदर असलेले ते धर्मनिष्ठ व तेजोनिधी महावीर कधीही विनाश पावणार नाहीत असे माझे ठाम मत आहे. म्हणून मी सांगतो ते नीट लक्षात घ्या. नीतिमान पुरुषाच्या ठिकाणी जे काही विद्यमान असते, त्याचा अनीतिमान पुरुषाला अंत लागणे शक्य नाही. पांडवांच्या स्थितीचा विचार करून पाहता आपल्या हातून जे काही होण्यासारखे आहे, ते मी तुम्हाला सांगतो त्यावरून तुम्ही अशी गैरसमजूत करून घेऊ नका की मी तुमचा द्रोह करतो. पण माझ्या सांगण्यात जे काही ग्राह्य वाटेल त्याचा तुम्ही स्वीकार करावा हा माझा हेतू आहे. 

अरे आता मी जे काही सांगणार आहे ती माझ्यासारख्यांनी दूष्ट जनास कधीही सांगू नये, सांगायचे असल्यास सज्जनांना सांगितले पाहिजे आणि अनितीमानाला सांगणे तर कोणालाही! सांगणे सर्वथा वर्ज्य मानले आहे. म्हणून हे दुर्योधना वृद्धांची आज्ञापालन करणाऱ्या सत्याचा अनुसरून तेच अंगी बाळगणाऱ्या व सज्जनामध्ये भाषण करण्याविषयी आवडी धरणाऱ्या ज्ञानी पुरुषाने नेहमी धर्मबुद्धी जागृत ठेवून यथार्थ सत्य आणि प्रिय भाषण करावे. म्हणून मला जे युक्त वाटत आहे ते मी सांगत आहे इतरांचे जसे मत आहेत असे माझे मत नाही. म्हणून माझ्या सांगण्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नका. 

दुर्योधना! या तेराव्या म्हणजे अज्ञातवासाच्या वर्षी धर्मराजाचे जेथे वास्तव्य असेल त्या देशांमध्ये किंवा नगरामध्ये जे राजे असतील त्यांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जेथे युधिष्टिर राजा राहत असेल तेथील लोक दानशील, उदार, जितेंद्रिय, विनययुक्त प्रियभाषण करणारे, विश्वासू, निष्पाप आणि समृद्ध असतील. तिथल्या लोकांची स्वाभाविक प्रवृत्ती धर्माकडे असेल त्याठिकाणी दुसऱ्यांच्या कुणावर दोषारोप करणारे इतरांचा उत्कर्ष पाहून जळणारे आपल्याच धुंदीत राहणारे व दुसऱ्यांचे अनिष्ट चिंतणारे असे पुरुष आढळणार नाहीत.

तिथे चर्चा व वेदवाणीचा घोष अखंड राहील त्या स्थली पूर्णाहुति चालू होतील; त्या ठिकाणी नानाविध यज्ञयाग होऊन त्यात ब्राह्मणांना विपुल दक्षिणा वाटली जाईल; तेथे नित्य निःसंशयपणे पर्जन्याची उत्तम वृष्टि होईल: पृथ्वी धनधान्यादिकांनीं समृद्ध होईल; रोगराई नष्ट होऊन सर्व लोकांना उत्तम आरोग्य मिळेल. धान्याच्या ठिकाणी उत्तम गुण येतील; फळं स्वादिष्ट बनतील; पुष्पांना उत्तम सुगंध प्राप्त होईल; वायु सुखावह वाहू लागेल; लोकांमध्ये सख्य वाढेल, पाखंडाचा लोप होईल, धर्मनिष्ठा बळावेल; आणि तेथे भयाला म्हणून मुळीच जागा मिळणार नाही तेथे गाईची समृद्धि होऊन त्या कृश किंवा दुर्बळ राहणार नाहीत; त्या ठिकाणी दहीदुधाची व तुपाची रेलचेल असेल; दुभत्याला उत्तम कस व रूचि येईल; पेय पदार्थ गुणकारी होतील; भोज्य पदार्थ सुरस बनतील; आणि शब्द, स्पर्श, रस. रूप व गंध हे गुणयुक्त होऊन दृश्य पदार्थ मोठे रमणीय भासतील. 

दुर्योधना, जेथे धर्मराजाचे वास्तव्य असेल. तेथील सर्व ब्राह्मण धर्मकृत्यांत निमग्न असतील व त्यांस त्या कृत्यांचे फलही प्राप्त होईल; तेथे लोक आनंदी व निर्मल असून त्यांचे अपमान कलह होणार नाहीत व त्यांस कधीं हानिही येणार नाहीं; त्या ठिकाणच्या लोकांमध्ये देवता व अतिथि ह्यांची पूजा करण्याविषयी अत्यंत अनुराग असेल; त्यांना दानधर्म करण्याविषयी अतिशय आवड वाटेल; त्यांच्या मनास मोठा उत्साह येईल; आपापल्या धर्माप्रमाणे वागण्या मध्ये फार झटतील; त्यांना अशुभ गोष्टींची आवड उत्पन्न होणार नाही; त्यांच्या मनांत शुभ कमाविषयी अत्यंत लालसा उत्पन्न होईल; ते यज्ञ याग करण्याविषयी प्रेम वाळगितील; व त्यांचे आचरण शुद्ध होईल. त्याचप्रमाणे युधिष्ठिर राजा जेथें असेल तेथील लोक असत्य भाषण सोडून देतील; त्यांचे कल्याण होऊ लागेल; त्यांचं चित्त निर्मळ होईल व त्यांना सुखसमृद्धी प्राप्त होईल. असो; 

दुर्योधना, धर्मात्मा युधिष्ठिर अज्ञातवासामध्ये ब्राह्मणांनाही ओळखता येणार नाही, मग इतर सामान्य जनांची काय गोष्ट ! धर्मराजा कोठे आहे याचे जर तुला अनुमान करावयाचे असेल, तर मी सांगतों ती लक्षणे ध्यानांत ठेव. ज्या ठिकाणी सत्य, धैर्य, दान, परमशांति, अक्षय क्षमा विनय, ऐश्वर्य, कीर्ति, उत्कृष्ट तेज, सौजन्य, सरळपणा इत्यादि गुण अनुभवास येतील, त्या ठिकाणी तो महाबुद्धिमान् धर्मराजा गुप्तपणे राहिला आहे असे अनुमान आहे व त्या देशाकडे तु चालणे कर. माझ्या बोलण्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे. हे माझे बोलणे कधीही मिथ्या होणार नाही. बोलण्यावर विश्वास ठेवणे यातच तुझें हित आहे !"

क्रमशः 

पुढची कथा पुढिल बाराव्या भागात 

भाग 012 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post