भाग 012 विराटपर्व कथासार मराठी(Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 012 विराटपर्व कथासार मराठी(Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 012 

विराटपर्व कथासार मराठी

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 


 
विराटराज्यावर आक्रमण करण्याविषयी कौरवांची रणनिती 

मागिल भागात आपण वाचले की, भीष्माने पांडव अज्ञातवासात कुठे असु शकतात याविषयी दुर्योधनाजवळ अनेक शक्यता वर्तवल्या. त्या भीष्माच्या बोलण्याला दुर्योधनाने सहमती दर्शवली.  

त्रिगर्ताचा राजा सुशर्मा हा त्यावेळी हस्तिनापुरात हजर होता. तोही या सभेत उपस्थित होता. सर्वांचे बोलणे झाल्यावर तो स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी मोठ्याने म्हणाला, “महाराज, आजपर्यंत विराटातल्या मत्स्यांनी व शाल्वांनी आम्हाला अनेक वेळा पीडा दिली; त्याप्रमाणेच, मत्स्य देशाच्या राजाचा सेनापती कीचकाने तर कौरवाधिपति भीष्म समीप असतांना बंधूंसह मला पुनःपुनः युद्ध संकटात घातले, या गोष्टीचाही येथे अवश्य विचार व्हावा.

सुशर्मा असे बोलून क्षणभर मौन राहिला व कर्णाच्या थोबाडाकडे पाहून दुर्योधनाला पुन्हा म्हणाला, "राजा, विराटाधिपतीने अनेक वेळा मोठ्या शौर्याने माझ्या राष्ट्रास पीडा दिली आहे, कारण त्याच्या सैन्याचा नायक बलाढ्य कीचक हा होता. त्याने आपल्या क्रुरतेची दुष्किर्ती सर्वत्र पसरवलेली होती. आता तो दुष्ट, दुरात्मा, कोपिष्ट, पापकर्मी, क्रूर व घातकी कीचक गंधर्वाच्या हस्ते मृत्यु पावला आहे. त्यामुळे विराट राजाला आता कोणाचा आश्रय नसल्यामुळे त्याचा गर्व अगदीं उतरून तो अगदी नाउमेद झाला असेल, असा माझा पक्का समज आहे. म्हणून तुझ्या, सर्व कौरवांच्या व पराक्रमी कर्णाच्या विचारास येत असेल तर त्या प्रसंगी विराटावर स्वारी करावी, असे माझे मत आहे. 

प्रस्तुत काळी हे कृत्य अगदी आवश्यक आणि आपल्या सर्वांना इष्ट आहे, असे मला वाटते. याकरता विपुल धान्याने समृद्ध अशा त्या मत्स्य देशावर आपण स्वारी करू, व तेथील नानाप्रकारची रत्ने व संपत्ति लुटन आणू, आणि त्या राष्ट्रातील गावे मुलूख व हस्तगत करून वाटून घेऊ; अथवा विराटनगराला अतिशय पीडा देऊन त्यातील कामधेनू सारख्या उत्तम गाई हरण करून आणू.  

दुर्योधन राजा, त्रिगर्त, कौरव व इतर सर्व वीर मिळून विराट राजावर स्वारी करून जाणे व सैन्याचे वेगवेगळे भाग करून त्याच्या सैन्यास अडवून टाकावे; म्हणजे सहजच त्याची शक्ति कुंठित होईल व मग ते सर्व सैन्य आपल्याला शरण येईल. याप्रमाणे विराटाची दुर्दशा केल्यावर आपले वास्तव्य सुखाने होईल व आपले सैन्यही वाढेल. "

सुशर्म्याचे भाषण ऐकून कर्णाने लालची दुर्योधनास म्हटले, “हे मित्रा दुर्योधना, सुशर्म्याने जे काही सांगितले ते अगदी योग्य आहे आणि वेळेला अनुसरून आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केले तर आपले सर्वांचे हितच होईल यात संशय नाहीं. यासाठी सैन्य सज्ज करून वेगवेगळ्या टोळ्यांनिशीं विराट राजावर स्वारी करण्याकरितां निघायला पाहिजे हे मला उचित वाटते. त्यामुळे तुझ्या किंवा भीष्म, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य त्यांच्या विचारास येईल त्याप्रमाणे विराट राजावर स्वारी करण्याचा बेत करावा. असे मला वाटतें, कारण आता पांडवांजवळ द्रव्य, सेना, किंवा शौर्य यापैकी काहीएक नाही, अथवा त्याचा अरण्यातच समूळ नाश झाला असावा, किवा जे मृत्युसदनीही गेले असतील, म्हणून त्यांच्याविषयी विचार किंवा चिंता करीत बसण्यात काही अर्थ नाही. म्हणून हे राजा, आपण मोठ्या उमेदीने विराट  नगरावर चाल करूयात आणि मत्स्यदेशावर स्वारी करून तेथील बहुविध संपत्ति व धेनु हरण करून आणूयात.

राजा जनमेजया, या प्रमाणे सुतपुत्र कर्णाची सल्ला व आज्ञा पाळण्याविषयी नित्य तयार असलेल्या दुर्योधनाने आपला धाकटा भाऊ दुःशासन याला विराट राजावर स्वारी करण्याकरिता ताबडतोब सैन्य तयार ठेवण्याविषयी आज्ञा केली. तो म्हणाला, "दुःशासना, वृद्धांचे अनुमोदन घेऊन सैन्याची लवकर सिद्धता कर. आपण सर्व कौरवासहित आपल्या उद्देशानुरूप विराटनगरावर स्वारी करू. आपले आणि हे सुशर्मा तुही सैन्य एकत्र केले वाहने रथ घोडदळ आणि सर्व त्रिगर्तांसह स्वतःच्या इच्छेनुसार त्या प्रदेशावर चालून जा. 

आपल्या आधी एक दिवस त्रिगर्तराजाने तिकडे जावे नंतर दूसऱ्या दिवशी चांगल्या तयारीने आपण चढाई करू. त्रिगर्तराज सुशर्म्याने विराटनगरावर स्वारी करून गोपाळांना, गुराख्यांना द्रव्याची लालूच दाखवून गोधनादिकासह विपुल धन काढावे. ते ऐकत नसल्यास यमलोकी धाडावे. व इकडे आम्ही सैन्याच्या , दोन टोळ्या करून सुंदर व गुणवान् अशा लक्ष गाई हरण करू”

 या प्रमाणे विचार ठरल्यावर सर्व कौरवादि पराक्रमी रथी-महारथी वीर पायदळासमवेत युद्धाकरता सिद्ध होऊन ठरल्याप्रमाणे आग्नेय दिशेस गेले. त्या महाबलवान् योद्ध्यांना विराटाचा केव्हा सूड घेऊ म्हणून झाले होते; व शिवाय गाई हरण करण्याविषयीही त्यांच्या मनात अतिशय लोभ बळावला होता. सुशर्मा वद्य सप्तमी या दिवशी तिकडे गेला व त्याच्या दुसऱ्या दिवशीं सर्व कौरव एकत्र जमून तिकडे चालते झाले; आणि नंतर त्यांनीं सहस्रावधी गाई धरल्या. 

इकडे ते अतुलपराक्रमी शुरवीर पांडव विराटनगरामध्ये गुप्त वेषाने विराटराजाची ती ती कामे करीत असतां त्यांचा तो अज्ञातवासाचा काळ उत्तम प्रकारे निघून गेला. कीचकाचा वध झाल्यावर, शत्रुसैन्याचा नाश करणारा विराट राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर (कंक) हा आपल्या सैन्याचे आधिपत्य स्वीकारील अशी मोठी आशा बाळगून राहिला.

तेवढ्यात गुप्तहेरांनी बातमी आणली की त्रिगर्तराज सुशर्मा मत्स्यदेशावर आक्रमण करण्यासाठी चालून येत आहे. ती बातमी ऐकून विराटराजा खुप चिंतेत पडला. पण लवकरच सुशर्म्याने मोठ्या आवेशाने हल्ला करून विराट राजाच्या अनेक गाई बलात्काराने हरण करून चालवल्या. तेव्हा त्या गाईचा अधिपती मुख्य गोपाळ तात्काळ मोठ्या त्वरेने नगरात आला. तो कुंडलें धारण करणारा गोपाध्यक्ष मत्स्यराजाला अवलोकन करताच रथांतून खाली उतरला व त्याने विराटाधिपतीची भेट घेतली. त्या समयी तो विराट राजा कुंडलें व अंगदे धारण करणाऱ्या शूर शूर योद्ध्यांनी मंत्रिवर्गानी व त्या उदारधी पंडुपुत्रांनी परिवेष्टित असा राजसभेत अधिष्ठित होता. तेव्हा तो गोपाध्यक्ष राजासमीप जाऊन पादवंदन करून मोठ्या विनयाने म्हणाला, हे भूपते, त्रिगर्तानी बांधवांसह आम्हा सर्वांना युद्धात जिंकून व जर्जर करून एक लक्ष धेनु हरण करून चालविल्या आहेत ! त्यामुळे, राजा, तुझ्या गाईंच्या संरक्षणाकरता त्या त्रिगर्तांचा पराभव करा व आपल्या धेनु परत आणा. 

ही वार्ता ऐकताच मत्स्याधिपतीने ताबडतोब युद्धाची सिद्धता केली. तात्काळ चतुरंग सैन्य युद्धासाठीं ध्वजांसहित सज्ज होऊन राजांनी व राजपुत्रांनी दैदिप्यमान व चित्रविचित्र अशी चिलखते चढविली. विराटराजाचा प्रियतम भाऊ शतानीक याने वज्रासारखे कठीण सुवर्णकवच अंगांत घातले. शतानीकाच्या पाठचा भाऊ जो मदिराक्ष, त्याने सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे सहन करणारे व सुत्रर्णाने मढविलेले असें कवच धारण केले. शेकडों सूर्य, शेकडों चंद्र, शेंकडो बिंदु, शेकडो नेत्र इत्यादिकांनी युक्त व व्यास सहसा भेद होणे शक्य नव्हते, असे कवच स्वतः मत्स्यराजाने चढविले. 

ज्यावर शंभर सुगंधिक कमळे ओळीने मांडतां येतील असे विशाल व सुवर्णाने मढविलेले दैदिप्यमान चिलखत सूर्यदत्ताने धारण केले; आणि ज्यावर शतावधि नेत्राकृति असून याचा वर्ण शुभ्र होता व जे आंतून पोलादी होते, असे सुदृढ कवच, विराटाचा ज्येष्ठ पुत्र शंख यानें चढविलें. सारांश, शत्रूवर चाल करू इच्छिणाऱ्या त्या देवतुल्य पराक्रमी महारथ्यांनी आपआपल्या शक्तीप्रमाणे व योग्यतेप्रमाणे शतावधि कवचे धारण केली. नंतर त्यांनी आपले शोभायमान शुभ रथ सिद्ध करून त्यावर सर्व साहित्य घेतले ; व त्या रथांना सुवर्णालंकारांनी शृंगारलेले आपले अश्व जोडले. नंतर सूर्यचंद्रांसारख्या तेजस्वी व दिव्य अशा रथावर मत्स्यराजाचा विजयशाली ध्वज उभारला गेला; 

आणि नंतर दुसऱ्या क्षत्रियांनी आपआपले नानाविध आकारांचे सुवर्णमंडित ध्वज आपआपल्या रथांवर फडकाविले. नंतर विराट राजा शतानीक भ्रात्यास म्हणाला, शतानीका, कंक, बलव, तंतिपाल (गोपाल) व दामग्रंथि (अश्वपाल) हे सर्व पराक्रमी असून कदाचीत युद्ध करण्यास समर्थही आहेत, असे मला वाटते. यासाठी ध्वजपताकांनी युक्त असलेले रथ यानाही द्या. तशीच बळकट व मऊ अशी चित्रविचित्र चिलखते यांना देऊन परिधान करवावा आणि याना आयुधेही द्या. यांच्या शरीरांची ठेवण वीरांप्रमाणे असून बाहु तर अगदी गजाधिपतीच्या सोंडेप्रमाणे आहेत. हे खरोखर उत्तम योद्धे असावे अमा माझा समज आहे.

विराट राजाचें हे भाषण कानी पडतांच युद्धाला अगदी आतुर झालेल्या शतानीकाने धर्म, भीम, नकुल व सहदेव यांना रथ दिले, तेव्हा त्या पांडवांस मोठा आनंद झाला. नंतर मत्स्यराजाने त्या वीरांना सारथी नेमून दिले. मग त्या सारथ्यांनी त्यांची सर्व सिद्धता केल्यावर, विराटाने अर्पण केलेली कवचं वगैरे चढवून ते धर्मादिक पांडव युद्धास तयार झाले; आणि रथांवर आरूढ होऊन मोठ्या आनंदाने युद्धाकरता विराट राजाच्या मागोमाग बाहेर पडले. त्या वेळेला त्या कुरुवंशप्रदीप व अमोघवीर्यशाली पांडवांना पाहून जणू मत्तगजेंद्रांचीच किंवा चालणाऱ्या पर्वतांचीच स्वारी निघाली आहे काय. असा भास होत होता ! 

नंतर मत्स्य देशांतील सुशील, युद्धविशारद व युद्ध करण्यास अतिशय उत्सुक असलेले मुख्यमुख्य योद्धे, त्यांचे आठ हजार रथ, एक हजार हत्ती आणि साठ हजार घोडे बाहेर पडले. त्याप्रमाणे गाई ! सोडविण्याकरितां तयार झालेले तें विराटाचे मोठमोठी शस्त्रे घेतलेले व हत्ती, घोडे, रथ यांनी भरलेले उत्कृष्ट सैन्य अतिशय शोभू लागले.

विराट राजाचे बलाढ्य सैन्य नगरांतून बाहेर पडले ते सूर्यास्ताच्या सुमारास सुशर्म्याच्या सैन्याप्रत येऊन पोचले. आणि भयंकर युद्ध सुरू झाले. राजा, सुशर्म्याकडील वीर त्रिगर्त व विराटाकडील वीर मत्स्य हे उभयतांही महाबलाढ्य होते. दोघांनाही युद्धा विषयी अतिशय उत्साह आलेला होता व दोघांनाही अत्यंत मद चढला होता. गाई स्वाधीन करून घ्याव्या ही दोघांचीही ईच्छा होती त्यामुळे दोघेही एकमेकांवर गर्जना करून चाल करीत होते. दोन्ही सैन्यांत मदोन्मत्त हत्ती असून त्यावर भाले व अंकुश यांचे प्रहार होत होते; आणि त्या हत्तीवर त्या त्या राजांचे माहुत त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे चालवीत होते. राजा, ती दोन्ही सैन्ये एकमेकांवर तुटून पडून त्यांचे जे घोर व तुमुल युद्ध जुंपले ते पाहून अगदी अंगावर रोमांच उभे रहात होते. जणू काय ती दोन्ही दळे यमराष्ट्राची भर करण्याकरतांच लढत होती ! राजा, सूर्यास्तासमयी गज, अश्व, रथ व पायदळ यांच्या झुंडीच्या झुंडी होऊ लागल्या तो घोर संग्राम पाहून जणू देवदैत्यांचाच संग्राम चालू आहे असे भासले ! 

दोन्ही सैन्यांची भिडत झाली असतां जिकडे तिकडे धूळच धूळ झाली! धुळीचे साम्राज्य पसरले. त्या धुळीच्या लोटांनी पक्षी बेशुद्ध होऊन पटापट भूमीवर आटू लागले ! आकाशात बाणांचें छत पसरल्यामुळे सूर्य अदृश्य झाला ! जसे काय आकाशभर काजवे चमकत आहेतसे भासले ! सुवर्णपृष्ठांकित धनुष्ये एका योद्ध्याच्या हातून दुसऱ्या  योद्ध्याच्या हातांत जाऊं लागली! उजव्या व डाव्या अशा दोन्ही हातांनी बाण मारणारे ते वीरपुंगव एकमेकांवर हल्ले करीत असतां त्यांचे रथ एकमेकांशी भिडले! पायदळाची पायदळाशी टक्कर सुरू झाली सारथ्यांनीं सारथ्यांवर रथ घातले! हत्ती हत्तींची झुंज लागली! आणि ते खवळलेले वीर तरवाली, परशु, भाले, शक्ति, गदा इत्यादिकांनी एकमेकांचा प्राण घेऊं लागले. !

या प्रमाणे त्या दोन्ही सैन्यांचें निकराचें युद्ध चालू असतां दोन्ही दळांतील योद्ध्यांचे देहभान सुटले अडसरी प्रमाणे दीर्घ व पुष्ट बाहु असलेले ते वीर परस्परांवर प्रहार करूं लागले; पण कोणाकडूनहीं प्रतिपक्षांतील मुख्य वीरांचा पराभव होईना. रणामध्ये जिकडेतिकडे एकच गर्दी उमळून गेली. छिन्नभिन्न मस्तकांनी रणभूमि आच्छादित झाली ! कांहीं मस्तकांचे वरचे ओठच तुटले होते ! कांहींच्या सुंदर नासिका शोभत होत्या त्या तुटल्या! कांहींवरचा कचकलाप तुटून गेला होता ! कांहींवर अलंकार विलसत होते! कांहींच्या कर्णात कुंडलें लकाकत होती आणि कांहीं तर बुळीनें लडबडलीं होतीं ! तशींच त्या रणभूमीवर एखाद्या विशाल वृक्षांच्या खोडांप्रमाणे बाणांनी विदीर्ण झालेलीं क्षत्रियांचीं धडे येथून तेथून अस्ताव्यस्त पडलीं होतीं ! चंदनचर्चित भुजंगतुल्य बाहूंनी आणि सकुंडल महतकांनी ती भूमि छावून गेली होती; जिकडे तिकडे रक्ताचे पाट वाहत होते व त्यामुळे रणभूमीवरील धूळ उडत नाहींशी झाली होती ! राजा, अशी स्थिति होऊन दोन्ही सैन्ये मूर्च्छित झाली युद्धाची सीमा संपली ! बाणांनी त्रस्त झालेले गरुड पक्षी ध्वजांवर बसूं लागले ! बाणांच्या छतामुळे त्यांचं ऊर्ध्वगमन बंद पडले आणि सर्वच हाहाकार झाला !

राजा, अशाही स्थितीत महारथ शतानीकाने शंभर व विशालाक्षाने चारशें बीर मारून ते उभयतां वीर त्रिगर्ताच्या प्रचंड सैन्यांत घुसले व त्रिगतीच्या रथांवर रथ घालून तुंबळ संग्राम करीत असतां अखेरीस मूर्च्छित पडले ! तेव्हा ते पाहून सूर्यदत्त पुढल्या अंगानें व मदिराक्ष मागावून हे त्यांच्या मदतीसाठी निकराचें धावून गेले. त्या युद्ध प्रसंगी मोठे भयंकर युद्ध झाले व त्यांत पाचशे रथी, आठशे अश्व आणि पांच महारथी मारले गेले इतक्यांत महान योद्धा विराट राजा स्वतः नानाविध प्रकारांनी रथ चालवीत शत्रुसैन्यात घुसला आणि तो सुवर्णाच्या रथांत आरूढ झालेल्या त्रिगर्तराजावर (सुशर्म्यावर) तुटून पडला ! जणूं काय डरकाळ्या फोडणाऱ्या वृषभांप्रमाणे ते दोन्ही वीर एकमेकांशी लढूं लागले. त्या समयी युद्धदुर्मद सुशर्मा रथांचें द्वंद्वयुद्ध करण्याच्या इच्छेने मत्स्यराजावर धावून आला आणि ते दोघेही रथी एकमेकांवर तुटून पडून बाणांची अतिशय दृष्टि करूं लागले ! ते दोघेही वीर शस्त्रास्त्रांमध्ये निपुण असून बाण, खड्ग, बरछी, गदा वगैरे परस्परांवर हाणीत होते ! दोघांचे निकराचें युद्ध सुरू होते. 

तेव्हा विराट राजाने दहा बाणांनी सुशर्म्याला वेध केला व त्याच्या चारही अश्वांवर त्यानें पचिपांच बाण टाकले ! राजा, इतकें झाले तरी तो विजयशाली सुशर्मा जेरीस आला नाही ; त्याने पन्नास तीक्ष्ण बाणांनी मत्स्यराजाला वेध केला; आणि दोघांच्या युद्धाची पराकाष्ठा होऊन गेली ! जिकडे तिकडे घृळच धूळ उडाली आणि आपला कोण व परका कोण हे मुळींच कळेनासे झाले ! या प्रमाणे दर्शदिशा धुळीनें व्याप्त होऊन व शिवाय रात्रीचा निबिड अंधकार पहून कोटें काहींच दिसेनासे झाले, तेव्हां तीं उभय दळे कांही वेळपर्यंत स्वस्थ राहिली. इतक्यांत लवकरच चंद्रोदय झाला व अंधकार नष्ट होऊन चोहीकडे स्वच्छ प्रभा पडली असता त्या क्षत्रिय वीरांना पुनः वीरश्री चढली. त्यांचे पुनः युद्ध सुरू झाले व ते फिरून हातघाईवर आले. 

विराट राजाचा पराभव 

त्या वेळेला त्रिगर्ताधिपती सुशर्मा आपला रथसमुदाय बरोबर घेऊन आपल्या कनिष्ठ भ्रात्यासह मस्स्याधिपतीवर विराटावर धावून आला. नंतर से दोघेही त्रिगर्तवीर हातांत गदा घेऊन रथातून वाली उतरले व मोठ्या आवेशाने शत्रुवर चाल करून गेले. नंतर दोन्ही सैन्यांची एकच लगट झाली. ती दोन्ही सैन्ये गदा पट्टे, तलवारी, कुऱ्हाडी व पाजवलेले भाले घेऊन एकमेकांवर तुटून पडली. सुशर्म्याने विराटाचें सैन्य जर्जर केले आणि तो एकाएकी विराट राजावर धावून गेला. त्याने तात्काळ विराटाच्या दोन्ही बाजूंस व पाठीशी असलेल्या रक्षकांचा प्राण घेतला आणि विराट राजाच्या रथाचा नाश करून त्याला जिवंत पकडले व आपल्या वेगवान रथात घालून आपला मार्ग धरला ! 

भीमसेन विराट राजाला सोडवून आणतो 

या प्रमाणे विराटाची अवस्था झाली तो त्रिगर्तानी मत्स्य देशांतील विरांना भगदी 'त्राहि मां' करून सोडिले व विराटाचे सर्व भीतीनें दशदिशांस पळु लागले ! तेव्हां असे पाहून युधिष्ठिरानें अरिंदमन भीमसेनास म्हटलें, "बा बल्लवा, विराटाधिपतीवर आपल्या समोर हा असा प्रसंग येणे योग्य नाही. या एक वर्षात वाटेल ती उपभोग्य वस्तु देऊन त्याने आपला प्रतिपाळ केला आहे; म्हणून त्याच्या ऋणांतून मुक्त होणे हे आपले मुख्य कर्तव्य होय; म्हणून तू त्रिगर्ताधिप सुशर्म्यापासून विराटराजाला मुक्त कर. ज्याच्या कृपेनें व आदरबुद्धीने आपण हे अज्ञातवासाचें वर्ष सुखाने घालविले, तो महात्मा विराट शत्रुच्या हाती लागणे हे सर्वथा अनुचित आहे. 

धर्मराजाची आज्ञा श्रवण करून भीमसेन म्हणाला, " राजा, आपल्या आज्ञेनें भी विराटाला आता सोडवतो. आपण माझा पराक्रम अवलोकन करा. हा प्रचंड वृक्ष येथे उभा आहे; ही जणू काय माझी गदाच आहे. असे समजून मी उपटतों व आपणा सर्व बंधुदेखत या त्रिगर्तांवर फेकतों, म्हणजे क्षणांत सर्व शत्रु नष्ट होतील !”  असे उद्गार काढून भीमसेन त्या समीपभागी असलेल्या वृक्षाकडे मदोन्मत्त गजाप्रमाणे पाहू लागला, इतक्यात युधिष्ठिर त्याला म्हणाला, बा बल्लवा, हे अलौकिक अमानुष साहस करूं नको. त्यामुळे लोक तुला ओळखतील. म्हणून धनुष्य, शक्ति, खड्ग, किंवा कुऱ्हाड इत्यादी वांटेल से शस्त्र घेऊन मनुष्याला शोभेल असेच कृत्य कर. महाबलाढ्य नकुल सहदेव तुझ्या रथाची चक्रे राखतील आणि अशा प्रकारे तुम्ही तिघे मिळून मत्स्यराजाला त्या सुशर्म्यापासून सोडूवून आणा.

अशाप्रकारे युधिष्ठिराची आज्ञा होताच त्या महा वेगवान् भीमसेनाने प्रचंड धनुष्य हाती घेतले आणि मोठ्या त्वेषाने सजल मेघाप्रमाणे शर वृष्टि सुरू केली. तो प्रथम सुशर्म्याकडे चाल करून गेला आणि विराटास अवलोकन करून सुशर्म्यास "उभा रहा, उभा रहा! " असे म्हणाला. सुशर्म्याने ते शब्द श्रवण करून मागे पाहिले तो जणू काय आपल्या मागून प्रत्यक्ष काळ किंवा यमच येत आहे असे त्यास वाटले; आणि नंतर तेथे भयंकर युद्ध सुरु झाले. सुशर्मा आपल्या बंधुवर्गासहवर्तमान धनुष्य घेऊन मागे फिरला व त्याचे सोबत असलेले इतर रथीही तात्काळ मागे वळून भीमसेनाशी येऊन भिडले. 

नंतर भीमाने मोठ्या वेगाने चाल करून त्रिगर्तांचे अश्व, गज, व पायदळ याच्या झुंडीच्या झुंडी विराटासमोर मारून टाकल्या ते पाहून सुशर्मा मनात कचरून आपले सैन्य या महाकाय योद्ध्यासमोर किती दुर्बल आहे ह्याचा विचार करूं लागला. इतक्यांत धनुष्य सज्ज करून युद्धात घुसलेला सुशर्म्याचा दुसरा भाऊ पुढे आला व नंतर ते दोघे बंधु भीमसेनाशी निकराचें युद्ध करूं लागले. भीमसेनाचे युद्ध पाहून मत्स्य देशाच्या योद्ध्यांनी आपापले रथ पुनश्च रणभूमीकडे वळविले व ते सर्व वीर चवताळून  दिव्यास्त्र वृष्टी करू लागले तेव्हा विराटाचे पायदळ असलेले प्रचंड सैन्यही मागे वळले व विराटाचा पुत्र अत्यंत क्रुद्ध होऊन झपाट्याने लढू लागला. 

तेव्हा त्रिगर्तांचा व मत्स्यांचा जो अद्भुत संग्राम झाला, त्यांत युधिष्ठिराने एक हजार योद्धे मारले ; भीमसेनानें सात हजार योद्ध्यांना यमलोक दाखवला ; नकुलाने बाणवृष्टि करून सातशे योद्धे पाडले; आणि पराक्रमी सहदेवानें धर्मराजाच्या आज्ञेने तीनशे योद्धे ठार केले. याप्रमाणे चारही पंडु पुत्रांनी पुष्कळ शत्रुसैन्य धारातीर्थी पाडिल्यावर धर्मपुत्र युधिष्ठिर मोठ्या वेगाने सुशर्म्यावर धावून गेला व त्याने प्रखर बाणांनी त्यास ताडन केले. तेव्हां सुशर्मा फारच क्षुब्ध झाला आणि त्यानें त्वरा करून धर्मराजाला नऊ बाणांनी विंधले व त्याच्या चारही अश्वांवर त्याने चार बाण टाकिले. त्या समय भीमसेन पुढे होऊन त्याने सुशर्म्याचे चारही अश्व मारले व मोठमोठ्या प्रखर बाणांनी त्याचे पुष्ठरक्षक घायाळ केले आणि त्याचा सारथी रथावरून खाली पाडला. इतक्यांत विराट राजाचा शुर चक्ररक्षक मदिराक्ष हा रथहीन झालेल्या सुशर्म्यावर धावून जाऊन त्याने त्यास प्रहार केले. यासमयीं बलाढ्य विराटाने सुशर्म्याच्या रथावरून खाली उडी टाकिली आणि त्याचीच गदा घेऊन त्यावर चालून गेला; व तो वृद्ध असतांही तरुणाप्रमाणे संचार करू लागला. तिकडे रथहिन झालेला सुशर्मा धूम पळत सुटला, तेव्हां भीमसेन त्यास म्हणाला, " हे राजपुत्रा, पळूं नको. मागे फिर. तुझ्यासारख्याला असे पळून जाणे शोभत नाहीं. अरे, असल्या या शौर्यानें तू विराटाच्या धेनु कशा रे हरण करणार तु आपल्या सवंगड्यांना टाकून देऊन असला हा हीन मार्ग का पत्करतोस !” 

हे असे भीमसेनाचे शब्द ऐकून त्रिगर्ताधिप सुशर्मा पुनः भीमावर उसळून आला; तेव्हां त्याचा तात्काळ प्राण घ्यावा या इच्छेने भीमसेन रथांतून उडी टाकून त्याच्या पाठीस लागला ! त्या वेळी जणू काय मृगाच्या मागें सिंहच लागला आहे असें वाटु लागले ! अखेरीस भीमसेनाने सुशर्म्याला केस धरून ओढले व मोठ्या त्याने उचलून त्यास भूमीवर आपटले ! त्या समय त्या सुशर्म्याची अवस्था मोठी कठीण झाली ; तो दुःखानें विव्हल होऊन गेला व इतक्यांत भीमानें त्याच्या मस्तकावर हाणून त्याला गुडघा मारिला व तळहाताने एक चपराक भडकाविली ! तेव्हां अखेरीस त्या प्रचंड प्रहारांनी पीडित होऊन सुशर्मा मुर्छित पडला. ते पाहून त्याची सेना घाबरून गेली व भयाने चोहीकडे पळून गेली ! नंतर विराट सैन्याने गाई परत वळविल्या; 

पंडु पुत्रांनी सुशर्म्याला जिंकून त्याचे सर्व धन काढून घेतले; आणि केवळ स्वतःच्या बाहुबळावर विसंबून राहणारे ते विनयशील, जितेंद्रिय, महारथी, महात्मे पंडुपुत्र एकमेकास भेटून एकत्र उभे राहिले. तेव्हां भीमसेन म्हणाला, " त्रिगर्तात पापाचरण करणारा हा सुशर्मा माझ्या हातून जीवंत सुटावा हे कांही योग्य नाही ; परंतु राजाच्या मनांत नेहमी दया वसत असल्यामुळे माझा नाइलाज आहे !" 

असे म्हणून भीमसेनाने सुशर्म्याची मानगुटी धरली व विव्हल झालेल्या त्या त्रिगर्ताधिपतीला पक्का पेचात धरून दोरीने बांधले. सुशर्मा तडफड करत राहिला. नंतर धुळीने माखलेल्या व बेशुद्ध पडलेल्या सुशर्म्याला रथावर घालून रणांगणावर विलसत भीमसेन धर्मराजाजवळ तो आला.

 त्या त्रिर्ताधिपतीची ती दीन अवस्था पाहून धर्मराजाला त्याची दया आली व तो हसून ह्या नराधमाला सोडा ! " असे भीममेनास म्हणाला. तेव्हां भीमसेनाने सुशर्म्याला म्हटलें, हे मुढा, जर तुला जगण्याची इच्छा असेल, तर माझें म्हणणे नीट ऐकून थे. जर तू सर्वांसमोर “मी तुमचा दास आहे!' असे उघडपणे कबूल करशील तर तुला मी जीवदान देतो. कारण युद्धांत जिंकलेल्या योद्ध्याने हा विधी केला नाही तर त्यास जीवदान देण्याचे प्रयोजन नाही! भीमसेनांचे ते उद्गार ऐकुन धर्मराजाच्या मनांत शर्म्याबद्दल अधिकच कीव उत्पन्न झाली व तो भीमसेनाला सांत्वनपूर्वक म्हणाला, पहा - आमच्या म्हणण्याला मान द्यावा अशी जर तुझी मनीषा असेल, तर या नराधमाला आधी सोड! हा विराट राजाचा दास झाला आहे, तोच याला शिक्षा करील?" भीमसेनाला असे म्हणून धर्मराजा सुशर्म्यास म्हणाला, "बा सुशर्म्या तू दास नाहीस बरे ! तुला मुक्त केले आहे ; जा, तू पुन्हा असे करू नको! "

क्रमशः 

पुढची कथा पुढिल तेराव्या भागात

भाग 13👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha_28.html


आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post