भाग 013
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha mahabharat kahani)
पांडवांनी विराटराजाला त्रिगर्तराज सुशर्म्याच्या तावडीतून कसे सोडवून आणले ते आपण मागील बाराव्या भागात वाचले आता पुढच्या भागात कौरवांनी विराट राजधानीवर आक्रमण केले व एकट्या अर्जुनाने विशाल अशा कौरव सेनेचा पराभव कसा केला? ती कथा पुढिलप्रमाणे:-
युधिष्ठिराचे ते भाषण श्रवण करून सुशर्म्याने लज्जित होऊन खाली मान घातली आणि भीमाच्या तावडीतून सुटल्यावर विराटराजाला अभिवंदन करून तो अपल्या देशाला चालता झाला. अशा प्रकारे सुशर्म्याला सोडून दिल्यावर ते स्वपराक्रमाने शुत्रुचा नाश करणारे विजयशील पांडव मुख्य विराट राजा रणभूमीतच रात्रभर निश्चिंतपणे राहिले. नंतर देवतुल्य पराक्रम करून दाखवणाऱ्या महारथ पांडवांची विराटराजाने आदरपूर्वक धन अर्पण करून पूजा केली. समर्थ विराट राजा म्हणाला, वीरहो. ही रत्ने जशी माझीं आहेत तशीं तुमचीही आहेत. याचा उपयोग तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे तो करा. शत्रूचा विध्वंस करणाऱ्या वीर्यशाली योद्ध्यांनो, मी तुम्हाला सालंकृत कन्या, बहुविध संपत्ति व आणखी तुमच्या मनास जे काही प्रिय वाटत असेल ते सर्वही देण्यास सिद्ध आहे. केवळ तुमच्या प्रतापाने मी आज जिवंत राहिलो आहे. ह्यास्तव तुम्ही सर्व विराट देशांचे खरेखुरे अधिपति आहात!"
विराटचे भाषण ऐकून युधिष्ठिरादिक सर्व पांडव हात जोडून त्याला म्हणाले, “राजा, तुझ्या बोलण्याचे आम्ही मोठ्या प्रेमाने अभिनंदन करितो. तू आज शत्रूपासून सुटलास एवढ्यानेच आम्ही अत्यंत संतुष्ठ आहोत.
नंतर विराट राजा अत्यंत प्रसन्न होऊन युधिष्ठिरास म्हणाला, " हे वीरा, इकडे ये ; मी तुला राज्याभिषेक करतो. तूच या मस्य देशाचा अधिपति आहेस. तुझ्या मनास जें कांहीं आवडत असेल, ते या पृथ्वीवर दुर्लभ असले तरी तें मी तुला देऊन संतुष्ट करीन. कारण तू कोणतीही वस्तु प्राप्त करून घेण्यास पात्र आहेस. हे नरश्रेष्ठा, तुला मी प्रणिपात करितों रत्ने, धेनु, सुवर्ण, मोती सिंहासन या सर्वांचा तूं अधिकारी आहेस. तुझ्या मेहरबानीमुळेच मी आज राज्य व संतति, संपत्ती कशी ह्यांचे पुनः अवलोकन करीत आहे.”
विराटाचे ते उद्गार श्रवण करून त्याला धर्मराजा पुन्हा म्हणाला, “ मत्स्येश्वरा, तुझे हे मनोहर भाषण फारच प्रशंसनीय आहे. राजा, तू नेहमीं दयायुक्त अंतःकरणाने वागून नित्य सुख भोग. तूं आता नगरात दूत पाठवून आपल्या विजयाची वार्ता आप्तसुहृदांना कळव.”
नंतर विराटानें युधिष्ठिराच्या सांगण्यावरून दुतांना हांक मारून सांगितले, दूतांनो, गगरांत जाऊन संग्रामांत माझा विजय झाला असे प्रसिद्ध करा. नगरांतील कुमारीका मुली अलंकार घालून मला सामोऱ्या येऊ द्या; आणि उत्तम उत्तम मंगलवाचें व शृंगारलेल्या गणिका वगैरे बरोबर द्या. राजा, या प्रमाणे आज्ञा होताच विराट राजाचे दूत ती आज्ञा शिरसाठ वंद्य, मान्य करून ताबडतोब रात्रींच्या रात्री मोठ्या उल्हासाने नगरास चालते झाले, व सूर्योदयाच्या सुमारास नगरासमीप पोहचून त्यांनी जयघोष करण्यास प्रारंभ केला !
सुशर्मा त्रिगर्त देशाला निघून गेल्यावर आपल्या गाई पुनः आपल्याकडे परत आल्या असे विराट राजाला वाटलें, तोपावेतो दुर्योधन सर्व कौरव सैन्यासह सह विराट नगराच्या समीप प्राप्त झाला. भीष्म, द्रोण, सुतपूत्र कर्ण, अस्त्रविद्यानिपुण कृप, द्रोणपुत्र अश्वत्थामा, सुबलपुत्र शकुनि, दुःशासन, विकर्ण, पराक्रमी चित्रसेन, दुर्मुख, दुःशल व दुसरे अनेक महारथी हे सर्व मत्स्य देशांत जाऊन त्यांनी विराट राजाच्या गौळवाड्यांची दाणादाण करून व बलात्काराने गाई हरण केल्या.
ते सभोवती सैन्याचा त्यांचा गराडा घालून साठ हजार गाई घेऊन चालले. त्यावेळेला त्या महारथ्यांनी गोपाळांना फारच मारझोड केली; व त्यामुळे ते दुःखाने अत्यंत आक्रोश करूं लागले असतां गोपांचा अधिपति अतिशय भयभीत होऊन रथात बसला व अत्यंत दीनवदन होत्साता नगरांत सत्वर प्रविष्ठ झाला. नगरांत शिरल्यावर तो लागलाच राजवाड्याकडे गेला व राजवाड्याच्या समीप येतांच रथांतून उतरून सर्व हकीकत कळविण्याकरिता आत प्रविष्ठ झाला. तेथे मत्स्य राजाचा पूत्र भूमिंजय (उत्तर) नामक मानी पुत्र त्यास भेटला. तेव्हां त्या गोपाध्यक्षानें कौरवांनीं गाई हरण करून नेल्याचें सर्व वृत्त त्या राजपुत्रास कथन केले. त्या वेळीं तो गोपाध्यक्ष म्हणाला “हे राष्ट्रवर्धना, कौरव आपल्या साठ हजार गाई हरण करून नेत आहेत; यास्तव त्या गाई जिंकून परत आणण्याकरिता लवकर सिद्ध हो. राजपुत्रा, आपल्या हितावर लक्ष देऊन तूं त्वरित बाहेर पड; कारण, विराट राजाने युद्धाकरता बाहेर जातांना येथील सर्व व्यवस्था तुझ्यावरच सोपविली आहे; आणि शिवाय तो भूपति सभादिकांमध्ये तुझी वारंवार प्रशंसा करतो व म्हणतो कीं, 'माझा पुत्र माझ्या प्रमाणेच शूर असून माझ्या कुळाची कीर्ति कायम राखील; शरसंधान करण्यामध्ये तो निष्णात असून प्रसंग पराक्रम गाजविणारा आहे. 'यास्तव, हे शूरा उत्तरा, विराट राजाचें ते भाषण सत्य होवो.
हे राजपुत्रा, विराटा इतक्या गाई कोणाकडेही नाहीत, हा तुझा लौकिक नष्ट होऊ देऊं नको. कौरवांचा पराभव करून आपल्या कामधेनु परत आण. बाणांपासून उत्पन्न झालेल्या तेजाने शत्रुसैन्य दूग्ध करून टाक. मदोन्मत्त नागाधिप ज्या प्रमाणे नागांचे कळप पळवून लावता, त्या प्रमाणे सुवर्णपुख व सन्नताग्र असे बाण मारून तूं शत्रुसैन्य पळवून लाव. हे राजपुता, तूं आज शत्रुसैन्यामध्ये धनुष्यरूप वीणा वाजव. धनुष्याची दोरी ही जणू काय तुझ्या हा वीण्याची तार होय. प्रत्यंचेच्या दोन्ही बाजूंचे पाश हे जणू काय तारा अडकविण्याच्या खुंट्या होत. धनुष्य ही जणू काय वीण्याची भोपळ्यासह दांडी आहे; आणि प्रत्यंचेपासून सुटणारे बाण हे जणू काय वीणेतून निघणारे उच्च स्वर होत !
राजपुत्रा, रजतासारखे शुत्र अस्त्र जोडुन तूं आपला रथ आज युद्धाकरतां बाहेर काढ. सुवर्णाचा सिंहध्वज आज तुझ्या स्थावर फडकू दे; आणि तुझ्या हातच्या झालेल्या शरदृष्टीने आज सूर्य आच्छादिला जातो. हे भूपते, दैत्यांना जिंकणाऱ्या प्रतापशाली इंदाप्रमाणे तुं आज कौरवसैन्य जिंकून पुनः या नगरांत प्रवेश कर. राजपुत्रा, मत्स्यराजाचा तुं पुत्र असल्यामुळे आमची सर्व भिस्त तुझ्यावरच आहे. सर्व पांडुपुत्रांना जसा विजयशाली अर्जुनाचा आधार असतो, तसा आम्ही मत्स्यदेशीयांना तुझाच सर्व आधार आहे. त्यामुळे तु शत्रुंचें निर्दालन करून मत्स्यदेशाला लौकिक वाढव !
गोपाध्यक्षाने निर्भयपणे भाषण केले तेव्हा तो भूमिजय (उत्तर) स्त्रियांमध्ये होता. नंतर तो तेथेच त्या अंत:पुरामध्ये मोठे बढाईचे भाषण करूं लागला,
उत्तर म्हणाला - अश्व चालविण्याच्या वि. येत कुशल असा जर कोणी मठा सारथी मिळेल, तर मी आज गाईच्या मागोमाग जाऊन आपल्या दृढ धनुष्याने शत्रूचा पराभव करीन. परंतु काय करावे? मला कोणी उत्तम सारथी आढळत नाहीं ! अहो, मी युद्धार्थ निघत आहे, तर मजकरितां कोणी योग्य सा रवि पाहून द्या. अहो, पूर्वी अठ्ठावीस दिवस पर्यंत किंवा वास्तविकपणे एक महिनाभर जे युद्ध झाले, त्याने माझा सारथी पडला; ह्यास्तव आता मला चांगला सारथी उरला नाहीं. जर ह्या वेळी मला दुसरा कोणी अश्वयान जाणणारा सारथी मिळेल, तर मी ताबडतोब संग्रामामध्ये जाईन; आणि मोठमोटे ध्वज ज्यामध्ये फडकत आहेत असे ते कौरवांचे चतुरंग बल मी आपल्या शस्त्रप्रतापाने जिंकून टाकून सर्व गाई परत आणीन. अहो, वज्रधारी इंद्र ज्याप्रमाणे दानवांना सळो का पळो करून टाकितो, त्या प्रमाणे मी आज दुर्योधन, भीष्म, कर्ण, कृप, द्रोण, अश्वत्थामा इत्यादि महावीरांना सळो की पळो करून टाकून क्षणांत गाईंना परत आणीन. पण काय हो करावे ! आज एथे कोणी नाही असे पाहून कौरव गोधन हरण करीत आहेत; पण मी तेथे नाहीं, यास माझा काय इलाज ! आज जर मी तेथे असतो, तर खचीत त्या कौरवांना वाटले असते की, हा प्रत्यक्ष अर्जुनच आम्हाशी युद्ध करीत आहे.
राजपुत्र उत्तराचे ते भाषण ऐकून अर्जुना आपल्या पणाचा काल समाप्त झाला आहे असे मनात ठरविले आणि सर्व पुरुषार्थी यथार्थ ज्ञान असलेल्या त्या पंडुपुत्रानें अग्नीपासून उत्पन्न झालेल्या व सत्य, सरलता इत्यादि गुणांनी युक्त अशा महासाध्वी द्रौपदीला मोठ्या प्रेमळ मनानें एकांतात म्हटले - हे सुंदरी, माझ्या सांगण्यावरून तूं उत्तराला सांग की, ही ब्रुहन्नळा अर्जुनाचा मोठा प्रबळ व प्रियकर सारथि होता. ह्याला मोठमोठ्या युद्धांतला अनुभव आहे. षास तूं आपला सारथी कर.
पुढे उत्तर वारंवार अर्जुनाचे नांव काढून आपली प्रतिष्ठा मिरवू लागला, तेव्हां द्रौपदीला ते सहन होईना. म्हणून ती या स्त्रियांतून उठून लाजत लाजत उत्तराला हळू हळू म्हणाली, "हे राजपुत्रा, तो गजेंद्रासारखा शोभणारा, प्रसन्न मुद्रा धारण करणारा, व बृहन्नला नांवाने प्रसिद्ध असणारा तरुण पुरुष पूर्वी पार्थाचा सारथि होता. हे वीरा, मी पूर्वी पांडवांबरोबर असतांना तो पुरुष धनुर्विद्येत अगदी अर्जुनतुल्य होता असे माझ्या प्रत्ययास आलेले आहे. ज्या समयीं अग्निनें खांडववन दग्ध केले, त्या समयी अर्जुनाचे सारथ्य तोच करीत होता. हे वीर शिरोमणे, ह्या सारथ्याच्या बळावरच अर्जुनाने खांडवप्रस्थामध्ये सर्व प्राण्यांचा संहार उडविला, त्यामुळे त्याच्या तोडीचा दुसरा सारथी नाहींच असे समज."
यावर उत्तर म्हणाला, 'हे सैरंध्रे , तो तरुण पुरुष अशा प्रकारचा शूर सारथी आहे, असे जर तुला माहीत आहे, तर त्याचे दृश्य स्वरूप व वास्तविक स्वरूप हीं अगदी भिन्न असले पाहिजेत. तरि तू माझा रथ चालव, माझ्याने त्यास म्हणवत नाहीं.
ते ऐकून सैरंध्री म्हणाली :- हे वीरा, हे करण्यास तुझी ही कनिष्ठ बहीण योग्य आहे. तिने सांगितल्यावर बृहन्नला तिच्या सांगण्याचा कधीही अनादर करणार नाहीं. त्यामुळे तूं तिच्याकडून सांगून बृहन्नलेला सारथ्य करण्याचें काम सांग. जर ही गोष्ट घडेल तर निश्चयाने तू कौरवांना जिंकून गाई परत आणशील.
सैरंध्रीचे भाषण ऐकून उत्तर आपल्या भगिनीस म्हणाला, ' तूं जा, व बृहन्नलेला घेऊन ये.' नंतर राजपुत्राच्या सांगण्याप्रमाणे त्याची ती बहीण त्वरने नृत्यशालेत गेली आणि तिनें बृहन्नलेच्या रूपानें गुप्त वेष धारण केलेल्या अर्जुनाची भेट घेतली. विराटकन्या उत्तरा नृत्यशाळेमध्ये बृहन्नलेकडे गेली, त्या वेळी जणू काय मेघाकडे विद्युल्लताच जात आहे. असे भासले. त्यासमयी त्या यशस्वीनीच्या कंठामध्ये सुवर्णपुष्पांच्या माळा होत्या. ज्येष्ठ भ्रात्याची इच्छा सिद्धीस न्यावी, ही तिची उकट उत्कंठा होती. सिंहाप्रमाणे तिची कटि अत्यंत कृश होती. तिच्या देहाची कांति पद्म पत्राप्रमाणे सतेज होती. तिने आपल्या अंगावर मयूरपिच्छयुक्त अलंकार घातले होते. तिचे शरीर सुंदर व सडपातळ होते. तिच्या कमरेभोवती रत्नखचित चित्रविचित्र रचना विलसन होती. तिच्या पापण्या वाकड्या होत्या. हत्तीच्या झुंडेप्रमाणे मांसल अशा तिच्या मांड्या एकमेकीस लागलेल्या होत्या. तिच्या या अनुपम देहास कोठेही नांव ठेवण्यास जागा नव्हती. इतकी ती सुंदर आणि मनोहर होती. तिचे हास्य फारच मोहक होते.
अशी ती मृगनयनी विराट राजाची कन्या आपल्या समीप प्राप्त झाली आहे असे पाहून अर्जुनास मोठा आनंद झाला. राजा. ती उत्तरा म्हणजे राजकुलांतील एक मोठे अनुपम रत्नच होते. कोणाच्याही मनामध्ये आदरबुद्धि व प्रेम उत्पन्न व्हावे अशी तिच्या अंगी पात्रता होती. ह्यास्तव, जणू काय आपल्या अग्रभागी प्रत्यक्ष इंद्रलक्ष्मीच उभी आहे असे अवलोकन करून त्या सुंदरीला अर्जुन म्हणाला, "हे रूपसंपन्ने, तुझे येणे आज कांबरे झाले आहे? आज अवेळी अशी घाईनें तूं का बरे आली आहेस? तुझ्या मुखचर्येवर आज टवटवी कां बरे नाही ? सुंदरी, सर्व कांही सविस्तर सांग.'
त्याप्रमाणे त्या राजकन्येला हसत हसत अर्जुनानें विचारले असता, सखीजनांनी परिवेष्टित अशी ती उत्तरा अर्जुनाच्या अगदी समीप गेली व मोठ्या प्रेमानें त्याला म्हणाली, बृहन्नळे आपल्या राष्ट्रांतील गाई आज कौरवांनी हरण करून चालविल्या आहेत; व त्या जिंकून पुन्हा परत आणण्यासाठी माझा धनुर्धर भ्राता जाणार आहे. त्याचा सारथी नुकताच युद्धामध्ये हत झाल्यामुळे त्यास सारथ्याची मोठी अडचण पडली आहे. त्या सारथ्याची बरोबरी करणारा दुसरा सारथी कोणीही नाही. परंतु सैरंध्रीकडून मी असे ऐकले आहे कीं, तू सारथ्यकर्मामध्ये मोठी निपुण आहेस. खरोखर तू पूर्वी अर्जुनाचे सारथ्य केलेस व तुझ्या साहाय्याने अर्जुनाने सर्व पृथ्वी जिंकली. म्हणून, हे बृहन्नले कौरवांनी जोपर्यंत आमच्या गाई फारशा दूर नेल्या नाहीत, तोंच माझ्या भ्रात्याचें तूं सारथ्य करून त्याची मोठी कामगिरी कर. आज मोठ्या प्रेमानें मी तुला हे काम सांगत आहे. त्यामुळे तू हे काम अगत्य केले पाहिजेस. जर तू ह्या माझ्या विनंतीचा अनादर करशील, तर मी प्राणत्याग करीन! "
या प्रमाणे उत्तरेचे भाषण श्रवण करतांच, तो शत्रुंना तापविणारा महापराक्रमी अर्जुन तिच्या समीप गेला; व ती विशालेक्षणा उत्तराही, हत्तीण जशी आपल्या छाव्याच्या मागून जाते तशी त्या मत्स्यवीर कुंजराच्या मागून गेली. त्या समयीं बृहन्नलेला दुरूनच पाहून उत्तर म्हणाला, " हे बृहन्नले, तुझ्या सारथ्यकर्मामुळेच अर्जुनानें खांडववनामध्ये अग्निला संतुष्ट केलें; तुझ्या सारथ्याच्या बळानेच त्याने सर्व पृथ्वी जिंकून त्यांतील संपत्ति हस्तगत करून घेतली; तुझ्याविषयीं सर्व माहिती सैरंध्रीकडून मला समजली आहे. तिनें पांडवांना पाहिले आहे.
त्यामुळे , हे बृहन्नले, कौरवांशी युद्ध करण्याच्या ह्या प्रसंगीं, तू जसें पूर्वी अर्जुनाचे सारथ्य केलेस, तसे माझें सारथ्य कर. यावर बृहन्नला उत्तरास म्हणाली :- हे राजपुत्रा, सारथ्याच्या अंगी जे शौर्य असावे लागतें, से माझ्या अंगी कोठून असेल बरे? राजपुत्रा, तुझा विजय असो. मला तू गाणे, बजावणे व नाचणे ह्यांपैकी कशाचेही एक अथवा अनेक प्रकार कर म्हणून सांगशील तर से ठीक होईल; मला सारथ्य कसे करता येईल बरे?
त्यावर उत्तर म्हणालाः - बृहन्नले, तुझ्या ठिकाणीं गायननर्तनादि कला आहेत, हे ठीक आहे; परंतु प्रस्तुत प्रसंगी तूं माझ्या रथावर त्वरित आरूढ होऊन माझे सारथ्य करावेस. शत्रुसंहारक अर्जुन सर्व कांही जाणीत असतां, नंतर त्यानें उत्तरेच्या समोर पुष्कळ विनोद प्रकार केले. त्याने चिलखत उलटें उभे धरून ते तसेच अंगावर चढविलें; व तें पाहून त्या ठिकाणी जमा झालेल्या कुमारिका मोठ्यानें हसूं लागल्या ! बृहन्नलेस काही ते चिलखत नीट घालतां येईना व तिची मोठी धांदल उडाली, असे पाहून अखेरीस उत्तरानेच ते मूल्यवान् चिलखत बृहन्मलेच्या अंगांत घातले. नंतर स्वतः राजकुमार उत्तराने सूर्यासारखें दैदीप्यमान असे श्रेष्ठ कवच आपल्या अंगात घालून व सिंहध्वज उभारून बृहन्नलेची सारथ्याच्या जागीं योजना केली; आणि तो बीर महान् महान् धनुष्ये व उत्तम उत्तम पुष्कळ बाण घेऊन युद्धार्थ बाहेर पडला.
राजा, त्या वेळी उत्तरा व तिच्या सख्या बृहन्नलेला म्हणाल्या, "हे सखि, तू युद्धामध्यें भीष्म, द्रोण आदि करून योद्ध्यांना जिंकून आमच्या बाहुल्यांसाठी चित्रविचित्र, बारीक, मृदु व सुंदर अशीं बनें घेऊन ये! " तेव्हां ते ऐकुन मेघाप्रमाणे गंभीर शब्द करून पृथापुत्र अर्जुन त्यांस म्हणाला, सख्यांनो, जर हा राजपुत्र उत्तर संग्रामामध्ये शत्रूस जिंकील, तर तुम्ही म्हणतां तसली त्यांची ती दिव्य व रुचिर व मी हरण करून आणीन ! " याप्रमाणे बोलून नानाप्रकारच्या ध्वजपताका ज्यामध्ये फडकत होत्या, अशा त्या कौरवसैन्याकडे अर्जुनाने उत्तराच्या रथाचे अश्व चालवले. त्या वेळी बृहव्वलेसहवर्तमान तो राजकुमार उत्तर उत्तम रथावर आरूढ झालेला अवलोकन करून कुमारिका, स्त्रिया व सुव्रत द्विज त्यांनी त्यांना प्रदक्षिणा केल्या व म्हटलें “हे बृहन्नले, पूर्वी खांडववन दग्ध करण्याच्या वेळी त्या ऋषभगामी अर्जुनाचे तू सारथ्य करून जशी विजयलक्ष्मी मिळावलीस, तशीच विजयलक्ष्मी तू ह्या उत्तराचें सारथ्य करीत असता तुला मिळावी ! "
तो विराटपुत्र मोठ्या उमेदीने राजधानीतून बाहेर पडल्यावर व बृहन्नला सारथ्यास म्हणाला की. " जिकडे ते कौरव गेले आहेत, तिकडे चल. विराट राजाला जिंकून त्याच्या गाई हरण करणाऱ्या म्हणून एकत्र जमलेल्या सर्व कौरवांना जिंकून त्यांपासून हा पहा मी आपल्या गाई परत आणितों. " नंतर उत्तराच्या सांगण्याप्रमाणे अर्जुनानें रथाचे ते उत्तम घोडे हाकले, तेव्हां ते सुवर्णांचे हार घातलेले घोडे जणू काय आकाश विदारीन वायुवेगाने चालू लागले. पुढे लवकरच अर्जुन व उत्तर यांना कौरवांचे ते अफाट सैन्य दृष्टीस पडले. स्मशानाच्या समीप गेल्यावर, अर्जुनाने कौरवांचे सज्ज असलेले सर्व सैन्य चोहीकडे पसरले आहे असे अवलोकन करत आणि नंतर उत्तर व अर्जुन यांनी त्या शमी वृक्षाकडे नजर फेकिली. सागरासारखी विस्तीर्ण अशी कौरवांची ती अवाढव्य सेना पाहून जणू अमित वृक्षांनीं खचून भरलेले वनच अंतरिक्षांत पसरत आहे की काय, असा भास झाला !
ते सैन्य चालत असता धूळ इतकी उडत होती की, तिनें सर्व आकाश भरून जाऊन सर्व प्राणी अंध बनले होते ! महाधनुर्धर द्रोणाचार्य, अश्वत्थामा, भीष्म, कर्ण, दुर्योधन, कृप इत्यादिक ज्यांत प्रमुख आहेत, अशा प्रकारचें तें चतुरंग बल अवलोकन करून, उत्तराच्या अंगावर रोमांच उभे राहिले व तो भयभीत होऊन अर्जुनाशीं बोलू लागला.
उत्तर म्हणाला :- हे सूता, माझी अवस्था काय झाली आहे हें तूं पाहिलेंस काय? मला या कुरुसैन्याबरोबर लढण्याची उमेद नाही. माझें सर्व शरीर रोमांचित झाले आहे. सैन्यांत ह्या मोठमोठे प्रबळ वीर असल्यामुळे हे मोठे भयंकर आहे. देवांग्याने सुद्धां यांच्याशीं टक्कर देणे मोठे कठीण आहे ! अरे, हें सैन्य किती अफाट आहे, याचा अगदी अंत नाहीं. रथ, गज, अश्व, पायदळ व ध्वजपताका यांनी हे अगदीं गजबजून गेले आहे ! ह्या सैन्याची धनुष्ये तरी किती प्रचंड आहेत ! अरे, माझ्या मनाला तर अगदी धडकी बसून गेली ! या सैन्यांत माझ्याने प्रवेश करवत नाहीं ! अरे, द्रोण, भीष्म, कृप, कर्ण, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त, बांधिक, दुर्योधन ह्या महान् महान् योद्ध्यांना अवलोकन करून माझे मन तर अगदी गांगरून जातें !
या प्रकारे त्या अनुभवशून्य उत्तराची भितीने गाळण उडाली; व तो गुप्त वेष धारण केलेल्या पराक्रमी अर्जुनाशी अगदी दीनपणाने विलाप करूं नलागला ! तो म्हणाला, माझा पिता येथे मला ठेवून आपण त्रिगर्तांबरोबर युद्ध करण्यास गेला. त्याच्याबरोबर सर्व सैन्य गेले; येथे आतां कोणीही नाही. तर अशा स्थितीत, युद्धाविषयीं अनभ्यस्त असा मी एकटा ह्या अफाट व शस्त्रास्त्रप्रवीण कौरवसैन्याशीं युद्ध करण्यास कसा समर्थ होईन ! यास्तव, हे बृहन्नले, तू हा रथ माघारी फिरव ! "
बृहन्नला म्हणाली:- अरे, तूं इतका भिऊन गेलास हे काय ! अजून शत्रूनी तर काहींच शौर्य दाखविलें नाहीं ! तुझ्या ह्या भीतीने शत्रूंचा हर्ष वाढेल ! अरे, तूं आपण होऊनच मला इकडे रथ आणण्यास सांगितलेस ना ? आणि मग हे असे कसें ! ह्यास्तव, जिकडे पुष्कळ ध्वजपताका फडकत आहेत, तिकडे तुला मी घेऊन जातों ! हे महाबाहो, आमिषावर उड्या टाकणाऱ्या गिधाडांप्रमाणें हातावर शिर घेऊन पृथ्वीकरितां लढणारे व गाई हरण करण्याविषयी उत्सुक झालेले हे कौरव पहा ! अरे, स्त्रियांमध्यें व पुरुषांमध्ये बढाई मारून युद्ध करण्यासाठीं तू येथे आलास, आणि आता तूं युद्ध न करतां माघारी जाऊं पाहतोस, तेव्हां तुला काय म्हणावें? आज गाई जिंकिल्यावांचून परत गेलास तर वीर पुरुष व स्त्रिया ह्या सर्वामध्ये तुझा एकच उपहास होईल ! अरे, आतां येथून परत जाण्यांत तुझीच विटंबना होईल असे नाहीं, तर माझीही होईल ! अरे, सैरंध्रीनें ज्या माझी सारथ्यकर्माविषयीं तुझ्यापाशी स्तुती केली, त्या मलाही आतां गाई परत मिळविल्याशिवाय माघारी जाववत नाहीं ! यास्तव आतां मला तरी कौरवांशीं युद्ध करणे भाग आहे; तूं आतां स्वस्थ रहा !
उत्तर म्हणालाः – हे बृहन्नले, या अमित कौरवांनी मत्स्य देशांतील संपत्ति खुशाल हरण करावी; अथवा नरनारीनींही खुशाल मला हसावें ! मला आता युद्धाशी कांहीएक कर्तव्य नाहीं; या गाई कौरवांनी नेल्या तरी चालतील सध्या माझ्या नगरांत कोणी नाहीं, यास्तव मी ते सोडून आल्याबद्दल माझा पिता मला रागावेल, या भीतींत मी आहे !” उत्तराने असे म्हणून भयानें रथांतून खालीं उडी टाकिली; व आपला अभिमान, गर्व व सशरधनुष्य हीं सर्व टाकून देऊन पळूं तो लागला!
बृहन्नला म्हणाली :- “उत्तरा, पळून जाणे हा क्षत्रियाचा धर्म नव्हे; शूरांना ही गोष्ट सर्वथा नापसंत आहे. भयानें पळून जाण्यापेक्षा रणभूमवर मरणे हेच श्रेयस्कर होय !”
असे म्हणून कुंतीपुत्र अर्जुनाने त्या श्रेष्ठ रथातून खालीं उडी टाकिली; व तो धावत असलेल्या त्या राजपुत्राच्या मागून धावूं लागला ! राजा, त्या समयीं त्या बृहन्नलारूपधारी अर्जुनाची ती लांब वेणी व लाल वस्त्रे हालत होतीं तीं कौरव पक्षाकडील वीरांच्या दृष्टीस पडलीं. तेव्हा तसला तो सारथि पाहून सैनिकांस मोठें हसूं आले ! त्यांना त्या विचित्र स्वरूपावरून 'हा अर्जुन आहे' असे वाटले नाहीं. तो त्वरेनें पळत असतां कौरवांनी त्यास पाहिलें व म्हटलें, “अहो, भस्माच्छादित अग्नीप्रमाणे वेषांतरानें आपले रूप गूढ ठेवणारा हा कोण असावा बरें? याचें रूप कांहींसें पुरुषाप्रमाणे व कांहीसें स्त्रीप्रमाणें आहे; ह्याचें अर्जुनाशी अगदी सादृश्य आहे, परंतु याचा क्लीबाचा वेष आहे.
कर्ण म्हणाला, दुर्योधना! अहो, तेंच हे मस्तक, तीच ग्रीवा, तेच हे परिघतुल्य बाहु, व तीच ही चालण्याची ढब ! यास्तव हा अर्जुन आहे यात दुमत नाही. देवांमध्ये ज्याप्रमाणे देवेंद्र, त्याप्रमाणे मनुष्यांमध्ये हा धनंजय एकटा शत्रूंशी युद्ध करण्यास समर्थ आहे. या अवाढव्य सेनेशीं एकटा युद्ध करण्यास अर्जुनाशिवाय कोणीही समर्थ नाहीं ! विराटनगरांत हल्ली कोणीही नाही, सर्व योद्धे दुसरीकडे लढण्यास गेले असून हा एकटा विराटाचा पुत्र मात्र आहे. हा येथे आम्हांशीं लढण्यास आला आहे, हे केवळ स्वतःच्या मूर्खपणामुळे यानें केलेलें आहे; याच्या ठिकाणीं खचीत शौर्य नाहीं ! मला वाटतें कीं, विराटनगरांत गुप्त रूपाने अज्ञातवासाचे दिवस घालवीत असलेल्या या अर्जुनाला सारथी करून तो येथें युद्धार्थ आला असावा ! आणखी मला असेही वाटतें की, तो हा विराटपुत्र आपल्याला भिऊन पळत आहे व त्याला धरण्यासाठी त्याच्या मागून हा धनंजय धावत आहे !"
शकुनी म्हणाला, “दुर्योधना हा अर्जुनच आहे. आणि हेरांकडून मिळालेल्या बातमीनुसार त्रिगर्तांना विराटानें जिंकले आहे. किचकाळयशिवाय विराट राजा युद्धात जिंकणे शक्य नाही. निश्चितच इतर चार पांडवांनी त्याला साह्य केले आहे.”
कर्णाप्रामणेच ह्याप्रमाणे सर्वही कौरव वेगवेगळे तर्क करूं लागले; आणि कपटवेषाने आपले रूप गुप्त ठेवलेल्या त्या अर्जुनाला पाहून, पुढे काय करावे ह्याबद्दल सर्वाना मोठे गुढ पडलें ! इकडे उत्तर भयभीत होऊन पळत असतां शंभर पावले मागोमाग जाऊन अर्जुनाने त्याचे केश धरून त्याला आणले; व त्याबरोबर तो विराट पुत्र मोठ्या करुणस्वराने विलाप करूं लागला ! व रडत रडत म्हणाला
उत्तर म्हणाला: - हे कल्याणि बृहन्नले, माझे ऐक; रथ लवकर मागे फिरव. हे प्राण जगल्याने पुढे वैभव मिळवितां येईल ! मी तुला शुद्ध सुवर्णाची शंभर नाणी देईन; अत्यंत तेजस्वी अशीं सुवर्णखचित आठ वैदूर्यरत्ने अर्पण करीन; आणि तसेच दहा उत्तम गज व सुवर्णमंडित रथ देईन, पण आतां मला सोड !
या प्रमाणे गयावयां करून रडणाऱ्या व अतिशय घाबरून गेलेल्या त्या उत्तराला पाहून तो वीर शिरोमणि अर्जुन हसला व त्यानें त्यास रथाजवळ ओढून आणिले; परंतु त्या समयीं उत्तर तर अगदीं मूर्छित झाला, तेव्हा अर्जुन त्यास सावध करून म्हणालाः – बा उत्तरा, शत्रूंशीं युद्ध करण्याचें सामर्थ्य तुझ्या अंग नसेल, तर तू माझें सारथ्य कर; मी शत्रूशी युद्ध करितो. भिऊं नको; मीं आपल्या बाहुबलानें तुझे रक्षण करीन ! ह्या महान् महान् वीरांनी प्रबळ व अजिंक्य झालेल्या कौरवसैन्याकडे तूं हा रथ चालव. वा राजपुत्रा, तूं क्षत्रिय असून शत्रंसमोर हा असा इतका दीन कसा झालास ? अरे, ही रथसेना जरी दुर्जय व अजिंक्य अशी असली, तरी मी या सेनेत प्रवेश करून कौरवांना जिंकीन आणि तुझ्या गाई परत आणीन ! तूं आतां माझे सारथ्य तेवढे कर, म्हणजे मी कौरवांचा समाचार घेतों !
ह्याप्रमाणे त्या विजयशाली धनंजयाने उत्तराची एक मुहूर्तपर्यंत समजून केली आणि भयाने व्याकूळ होऊन परत जाऊं पाहणाऱ्या त्या उत्तरास रथावर कसेबसे बसविलें !
क्रमशः
पुढची कथा पुढिल चौदाव्या भागात
भाग 14👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/013-virat-parva-marathi-katha.html
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html
भाग पाच 005
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html
भाग 007 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html