भाग 014 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 014 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 014 

विराटपर्व कथासार मराठी

(Virat parva marathi katha mahabharat kahani) 


कौरवांचे अफाट सैन्य पाहून राजकुमार उत्तर भीतीने थरथरायला लागला. व नगरात पळून जावे असे त्याला वारंवार वाटू लागले पण बृहन्नला म्हणजेच अर्जुनाने त्याची समजूत काढून मोठ्या प्रयत्नाने सारथ्य कर्म करण्यास भाग पाडले. व स्वतः युद्ध करण्यासाठी सज्ज झाला. व उत्तरास म्हणाला हे राजकुमार आपला रथ शमी वृक्षाकडे घेऊन चल. तुझ्या रथात असलेली शस्त्रास्त्रे फारच तकलादू आहेत. तुझे धनुष्य ही माझा वेग सहन करू शकणार नाही. ते मोडून पडेल म्हणून त्या शमी वृक्षाकडे चल तिथे आपल्याला शस्त्रास्त्र मिळतील. 

बृहन्नलेचे बोलणे ऐकून उत्तरास आश्चर्य वाटले, पण भीतीने त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. म्हणून तो काही बोलला नाही. मुकाट्याने शमी वृक्षाच्या दिशेने रथ हाकू लागला. 

रथामध्ये उत्तरास सारथ्याच्या जागी बसवून तो क्लिबवेष धारण केलेला नरश्रेष्ठ महारथी अर्जुन रथामध्ये बसून शमी वृक्षाकडे जात आहे असे पाहून भीष्म, द्रोण आदिक महान महान् सर्व योद्धे अर्जुनाच्या भीतीने मनात उद्विग्न झाले व घाबरून गेले !  कारण तेरा वर्षपर्यंत अर्जुनाच्या अंतःकरणात धगधगणारा क्रोधाग्नि, बदल्याची भावना आवेशाने प्रकट होऊन आपल्या सर्वांना भस्म करून टाकेल यात काही शंका नाही म्हणून ते सर्व घाबरून गेले अर्जुनाचा आवेश आपल्याकडून कधीही आवरला जाणार नाही हे भीष्म द्रोण आदिक योद्ध्यांना चांगलेच ठाऊक होते. कौरववीरांची ती अवस्था पाहून व आसमंतात नानाविध उत्पात होऊ लागले ते अवलोकन करून महाधनुर्धर भारद्वाज द्रोणाचार्य हे म्हणाले,

"वीरांनो! , हे रुक्ष व चंड वारे वाहूं लागून क्षुद्र पाषाणांची वृष्टी होत आहे ! धुळीने सूर्य झाकला गेला आहे व अंधकाराने दाही दिशा भरून गेल्या ! मेघांची आकृति व वर्ण अद्भुत दिसूं लागला ! नानाविध शस्त्रे कोशांतून आपोआप बाहेर पहूं लागली ! या पहा दिशा पेटल्या व त्यामध्ये भयंकर भालु ओरडूं लागल्या. अश्वांच्या नेत्रांतून अश्रु वाहूं लागले ! व ध्वज विनाकारण हालूं लागले ! अहो भीष्म, या सर्व दुश्चिन्हांवरून काही तरी भयंकर अरिष्ट कोसळणार असे भासत आहे, म्हणून तुम्ही सर्व सज्ज व्हा ! तुम्हीं सर्वांनी आपले स्वतःचे संरक्षण करून सैन्याची रचना उत्तम प्रकारें करावी. आतां युद्धांत प्राणनाश होण्याचा संभव आहे, यास्तव सावध रहा. व गाईंचे रक्षण करा. 

अरे, हा क्लिब वेषानें रथस्थ असलेला पुरुष महापराक्रमी अर्जुनच आहे, यात शंका नाहीं. हे गंगानंदना भीष्मा ! , लंकेश रावणाच्या अशोकवनाचा विध्वंस करणारा हनूमान् ज्याच्या ध्वजावर आहे, आणि ज्याला वृक्षाचे नाव आहे, तो हा पर्वतशत्रु इंद्राचा पुत्र अंगनावेषधर किरीटी आज ज्याला जिंकून तुमच्या गाई घेऊन जाण्याच्या विचारांत आहे, त्या दुर्योधनाचे आपण सर्व मिळून संरक्षण करा. हा सव्यसाची महाबलाढ्य अर्जुन सुरासुरांशी संग्राम करण्याचा प्रसंग आला तरी मागें न हटत युद्ध करील. या शूरवीर अर्जुनाला प्रत्यक्ष देवराज इंद्राने अस्त्रविद्या शिकविल्यामुळे युद्धांविषयी हा अगदी तत्तुल्य पराक्रमी आहे आणि यास वनवासांत फार क्लेश भोगावे लागल्यामुळे हा अत्यंत कुपित झालेला असणार. कौरव हो, ह्याची बरोबरी करणारा वीर मला आपल्या सैन्यात आढळत नाहीं. द्रौपदीचा झालेला अपमान हा अजिबात विसरलेला नसेल. म्हणून त्याच्या क्रोधाग्नित आज तो आपल्या सर्वांना जाळून भस्म करील यात काही शंका नाही. हिमालय गिरीवर युद्धामध्ये किरातवेषधारी प्रत्यक्ष महादेवाला सुद्धा त्यानें संतुष्ट केले ! म्हणून सावधान व्हा"

द्रोणाचार्याचे बोलणे ऐकून गंधर्व युद्धात दुर्योधनादिक योद्ध्यांना गंधर्वांनी कैद केले तेव्हा भिऊन पलायन करणाऱ्या कर्णाला जळफळाट झाला व तो म्हणाला :- अहो द्रोणाचार्य, तुम्ही अर्जुनाचें गुणवर्णन करून नेहमीं आमच्याजवळ त्याची बढाई मारता, परंतु तो माझी किंवा दुर्योधनाची किंचित् सुद्धा बरोबरी करण्यास समर्थ नाहीं !

दुर्योधन म्हणाला, हे कर्णा, जर हा खरोखरच अर्जुन असेल, तर माझे कामच झालें ! अंगराजा, याला आपण ओळखले म्हणजे सर्व पांडव ओळखले जाऊन त्यांना पुनः बारा वर्षे वनवासांत काळ काढला पाहिजे ! बरे जर हा अर्जुनाव्यतिरिक्त दुसरा कोणी क्लिबवेषधारी मनुष्य असेल, तर मी आपल्या निशित बाणांनी त्यास रणभूमीवर मारून टाकीन ! दुर्योधनाचे बोलणे श्रवण करून भीष्म, द्रोण, कृप व अश्वत्थामा यांनी त्याच्या त्या सामर्थ्याची प्रशंसा केली ! 

इकडे शमी वृक्षाच्या समीप गेल्यावर, अर्जुनाने विराटाचा पुत्र उत्तर हा फार कोमल व संग्रामाविषयी अनभ्यस्त आहे असे मनात आणून त्यास म्हटले, "बा उत्तरा, माझ्या सांगण्यावरून या शमी वृक्षावर असलेली धनुष्ये लवकर खाली काढ. बा, तुझी ही धनुष्ये माझे बळ सहन करण्यास समर्थ नाहीत. अरे, यांना मोठा भार सोसणार नाही, इतकेच नव्हे, तर यांच्याने हत्ती सुद्धां मरणार नाही! बाबा, शत्रुमर्दनाचे काम मी करू लागल्यावर माझ्या हाताचे हिसके सुद्धा या धनुष्यांना सोसणार नाहींत ! यास्तव, हे भूमिंजया (उत्तरा) या पत्रांनी भरलेल्या शमीवर चढ. या वृक्षावरच धर्मादिक पांडवांची धनुष्ये ठेवलेली आहेत. 

उत्तरा, अर्जुनाचे महाप्रबळ गांडीव धनुष्यही या वृक्षावरच असून त्या शूर पांडवांचे शर, ध्वज व दिव्य कवचे येथेच आहेत. बा उत्तरा, अर्जुनाचे ते एकटे गांडीव धनुष्य लक्षावधी धनुष्यांची बरोबरी करते व राष्ट्राची संपत्ती वाढवील! त्याला कितीही ताण पडला तरी ते तुटणार नाही व चांगले मजबूत आणि अवाढव्य आहे! याच्यापुढे कोणतीही इतर आयुधे अगदी तुच्छ आहेत! हे धनुष्य जवळ असल्यावर शत्रुचा नाश निश्चयाने होतोच! राजपुत्रा, या दिव्य धनुष्यावर सुवर्णाचे काम केले असून ते अगदी गुळगुळीत आहे! हे धनुष्य दिसण्यात मनोहर, परंतु शत्रुस सळो की पळो करून टाकणारे आहे! त्याप्रमाणेच इतर सर्व पांडवांची धनुष्येही तशीच मोठी बळकट व सुदृढ आहेत ! "

उत्तर म्हणाला :- हे बृहन्नले, या वृक्षावर एक प्रेत बांधून ठेवले आहे आणि मी विराट देशाच्या राजपुत्राने त्या अपवित्र प्रेताला आपल्या हाताने का बरं स्पर्श करावा? मी क्षत्रियकुलांत जन्मलेला असून महान् राजपुत्र व मंत्र यज्ञवेत्ता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूला स्पर्श करणे माझ्यासारख्यास उचित नाही. हे बृहन्नले, त्या शवाला स्पर्श केल्यास मी शववाहकाप्रमाणे अशुचि होईन आणि मग तुला मुद्धां माझ्याशी संसर्ग करितां येणार नाहीं !

बृहन्नला म्हणाली:- हे उत्तरा! तुझ्याशी संसर्ग करण्यास मला कोणतीही अडचण येणार नाहीं, तू शुचिच राहशील. बाळा, भिऊ नकोस मस्यराजाच्यासारख्या थोर कुळामध्ये जन्मलेल्या राजपुत्राच्या हातून मी भलतेच कर्म करें करवीन बरें?

अर्जुनाचें हे बोलणे ऐकून उत्तर रथातून खाली उतरला व निरुपाय होऊन त्या शमी वृक्षावर चढला. नंतर शत्रुनाशक धनंजय रथात उभा राहून उत्तरास म्हणाला, बा उत्तरा, वृक्षाच्या ढोलेतून ही धनुष्ये लवकर खाली काढ; उशीर लावू नको. त्यांचे चर्माचे वेष्टनही तू लवकर काढून टाक. " नंतर राजकुमार उत्तराने महापराक्रमी पांडवांची ती महान् महान् धनुष्ये शस्त्रे आयुधे वृक्षावरून काढिली व त्यांच्या भोवताली गुंडाळलेली पाने चर्मबंधन सोडून टाकून ती आपल्याजवळ घेतली. नंतर त्याने त्या धनुष्यांची सर्व बाजूंची बंधने सोडिली, तेव्हा त्यात गांडीव धनुष्य व दुसरी चार धनुष्ये त्याच्या दृष्टीस पडली. 

सूर्याप्रमाणे देदीप्यमान् अशी ती धनुष्ये सांडीत असता, सूर्याच्या उदयकाळी जशी प्रभा फाकते, तशी प्रभा त्यातून फांकू लागली ! राजा, त्या धनुष्यांकडे पाहून उत्तरास जणू काही, सर्पच फोफावत आहेत असे वाटले व तो एकदम भयाने व्याकुळ होऊन त्याच्या सर्व अंगावर रोमांच उभे राहिले ! राजा, नंतर त्या प्रचंड व दैदीप्यमान धनुष्यांना स्पर्श करून उत्तर अर्जुनास असे बोलू लागला.

उत्तर म्हणाला :- हे बृहन्नले, ज्या धनुष्यावर सुवर्णाची शंभर सूक्ष्म चक्रे का दिलेली असून ज्याची टोकं देदीप्यमान् आहेत, असे हे उत्कृष्ट धनुष्य कोणत्या प्रख्यात वीराचे आहे? ज्याच्या पृष्ठभागावर सुवर्णाचे हत्ती काढलेले आहेत, व ज्याचा मध्यभाग व पार्श्व बाजू सुंदर आहेत, असे हे उत्तम धनुष्य कोणाचे? ज्याच्या पाठीवर शुद्ध सोन्यांचे इंद्रगोप कीटक निरनिराळे काढिलेले दिसत आहेत, असे हे उत्तम धनुष्य कोणाचे? ज्याध्यावर सुवर्णाचे तीन सूर्य काढिलेले असून त्यांचे तेज झळाळत आहे, असं हे उत्तम धनुष्य कोणाचें? आणि ज्याच्यावर कृष्णागरूचे शलभ काढिलेले असून त्यांवर सुवर्णाचे अलंकार आहेत व ज्याच्यावर जडावाचें कोंदण काम केले आहे, असे हे उत्तम धनुष्य कोणाचें? 

 तसेच, सुवर्णाची मूठ असलेले व गोचर्माच्या कोशांत ठेविलेलें असें हें अतिनिर्मल खड्ग कोणाचें ? त्याप्रमाणेच, पराक्रम गाजविणारें, निषध देशांत तयार होणारे , सुवर्णाची मूठ धारण करणारें, व अज चर्मकोशांत असलेले हे खड्ग कोणाचे ? तसेच, ज्याचा आकार व मान अगदी यथा योग्य आहे, व आकाशाप्रमाणे जें लकाकत आहे,  असें अग्नितुल्य कोशामध्ये असणारें हे खड्ग कोणाचे? आणि त्याप्रमाणेच, ज्यावर सुवर्णाची चिन्हे काढिलीं आहेत, शत्रूंचे किती ही आघात केले तरी ज्याला मुळींच धक्का बसावयाचा नाहीं, सप्रमाणे ज्याचा स्पर्श प्राणघातक होईल, शत्रूचे देह निश्चयानें विदारण करील, असें हें दिव्य खड्ग कोणाचें ? हें बृहन्नले, हे मला सांग हीं सर्व शस्त्रे पाहून मला मोठा विस्मय उत्पन्न झाला आहे, तर तू सर्व काहीं खराखरा प्रकार मला सांग.


बृहन्नला म्हणाली:- हे उत्तरा, तू मला प्रथम ज्या धनुष्याविषयी विचारलेस, ते तिन्ही लोकात प्रसिद्ध असलेले अर्जुनाचें गांडीव धनुष्य होय. हे सर्व धनुष्यांमध्ये मोठे असून सुवर्णाने मढवलेले आहे. हे एकटे लक्ष धनुष्यांची बरोबरी करून राष्ट्राचा अभ्युदय करणारे आहे. यास्तव अर्जुन हा या धनुष्यानेच देवांशी व मनुष्यांशी युद्ध करतो. राजपुत्रा, या धनुष्याला नानाप्रकारचे रंग दिले आहेत; हे अगदी गुळगुळीत आहे; यावर व्रण वगैरे मुळीच नाहीत; हे मोठे लांबलचक आहे; व ह्याची अगदीं अनादिकालापासून देव, दैत्य व गंधर्व प्रशंसा करीत आले आहेत. प्रथम एक सहस्र वर्षेपर्यंत हें ब्रह्मदेवानें धारण केले. नंतर पुढे ते प्रजापतीने पांचशे तीन वर्षेपर्यंत धारण केले. त्याच्या मागून इंद्रानें पंच्यांशी वर्षेपर्यंत हे धारण केले. नंतर सोम राजानें पांचशे वर्षेपर्यंत ते आपणापाशी ठेवले. पुढे वरुणाने शंभर वर्षेपर्यंत तें धारण केले; आणि त्यानंतर अर्जुनानें पासष्ट वर्षेपर्यंत ते बाळगलें. 

बा उत्तरा, हे मनोहर, विजयशाली आणि महादिव्य गांडीव धनुष्य वरुणापासून अर्जुनाला प्राप्त झाले आहे. राजपुत्रा उत्तरा, सुवर्णाच्या कोशांत ठेवलेलें हे श्रेष्ठ धनुष्य भीमसेनाचे आहे. यास देव व मनुष्य ह्यांच्याकडून मोठा मान मिळतो. या प्रचंड धनुष्याच्या साह्यानें कुंतिपुत्र भीममनाने संपूर्ण पूर्व दिशा जिंकली. हे विराटपुत्रा, इंदगोप की टकांनी शृंगारिलेले हे मनोहर धनुष्य युधिष्ठिराचे आहे. तसेच, ज्यावर सुवर्णीचे सूर्य झळाळत आहेत असे हें अग्नितुल्य प्रचलित असणारे धनुष्य नकुलाचे आहे. त्याप्रमाणेच, आकाशाप्रमाणे उज्ज्वल दिसणारे व ज्यावर कृष्णागरूचे शलभ काढलेले असून सुवर्णाचे अलंकार आहेत, असे हे धनुष्य सहदेवाचे आहे. तसेच हे सर्पासारखे भयंकर व तीक्ष्ण असे बाण अर्जुनाचे आहेत. हे राजपुत्रा, शत्रूशीं युद्ध चालू झाल्यावर हे शीघ्रगामी बाण कधीही संपत नाहीत. 

हे सर्व ऐकल्यावर राजकुमार उत्तर अतिशय आश्चर्यचकित झाला. 

उत्तराने विचारले - हे बृहन्नले, अशी ही सुंदर आयुधे त्या महापराक्रमी वीरशिरोमणि पांडुपुत्रांचीं आहेत ! पण मग ते पुत्र अर्जुन कुरुश्रेष्ठ युधिष्ठिर व भीम, नकुल व सहदेव है कोठे आहेत? अखिल शत्रुचा नाश करणारे ते सर्व महारथी  राज्यभ्रष्ट झाल्यापासून त्यांचे काहींच वर्तमान कळत नाही. तशीच ती महाप्रख्यात महाराणी द्रौपदी कोठे आहे? ती द्युतानंतर पांडवांच्या मागोमाग लागलीच वनांत गेली असे म्हणतात !


उत्तराच्या प्रश्नावर अर्जुनाने थोडा विचार केला अज्ञातवासाचा काळ पुर्ण झाला होता. आता प्रकट व्हायला हरकत नाही म्हणून स्मित हास्य करत म्हटले :- उत्तरा, मीच तो कुंतीपुत्र अर्जुन आहे ! विराट राजाचा जो नवीन सभासद कंक, तोच युधिष्ठिर होय. त्याच्या पाकशाळेचा अधिपति बल्लव हाच भीमसेन होय. अश्वशाळेवरील जो अधिकारी तोच नकुल होय. गोपाध्यक्ष हाच सहदेव होय आणि जियाकरितां कीचकांचा वध झाला, ती सैरंध्री दासी हीच द्रौपदी होय !” आम्ही सगळे अज्ञातवास पुर्ण करण्यासाठी तुझ्या राज्यात आलो आहोत. 

युद्धभूमीवर आल्यापासून उत्तराला एकपाठी एक धक्के बसत होते. आणि अर्जुनाचे बोलणे ऐकून आपल्यासमोर महान धनुर्धर अर्जुन आहे हे कळल्यावर तो फारच भांबावून गेला. त्याने साशंक नजरेने पाहिले. व म्हणाला - हे बृहन्नले, तुझे हे बोलणे मला अजिबात खरे वाटत नाही. अर्जुनाची दहा नावे मीं पूर्वी ऐकिली आहेत. ती जर तु मला संदर्भासहीत सांगशील, तर तुझ्या या सांगण्यावर माझा विश्वास बसेल.

अर्जुन म्हणाला - हे विराटपुत्रा, जी दहा नावे तू ऐकली आहेस, ती आता मी तुला तूं सांगतों, तू ती एकाग्र मनानें श्रवण कर.  उत्तरा, माझी ती दहा नावे- १) अर्जुन, २) फाल्गुन ३) जिष्णु, ४) किरीटी, ५) श्वेतवाहन, ६) बीभत्सु, ७) विजय, ८) कृष्ण, ९) सव्यसाची व १०) धनंजय अशी होत.

उत्तर म्हणालाः – मग अर्जुनाला ही दहा नावे का प्राप्त झाली? हे जर सांगाल तर तुमचे सर्व म्हणणे खरे समजेन. अर्जुन म्हणाला - हे उत्तरा, मी सर्व देश जिंकून त्यांतील धन हरण करून आणलें, व त्यामध्ये मी अधिष्ठित झालों, म्हणून मला धनंजय असे नांव पडले. तसेच मला विजय असे म्हणण्याचे कारण हे की, संग्रामामध्ये मोठमोठ्या बलाढ्य शत्रुवर मी चाल करून जातो व त्यांवा जिंकिल्यावांचून माघारी वळत नाहीं. मी युद्ध करीत असता माझ्या रथाला सुवर्णालंकारांनीं शृंगारलेले श्वेतवाहन (घोडे) असतात, म्हणून मला श्वेतवाहन असे नाव आहे. आणि माझा जन्म हिमालय पर्वताच्या पृष्ठभागी दिवसास उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर झाला म्हणून माझे नाव फाल्गुन असे पडले. तसाच पूर्वी मी महान् महान् दानवांशी लढत असतां इंद्राने माझ्या मस्तकावर सूर्याप्रमाणे दैदीप्यमान असा किरीट घातला म्हणून मला किरीटी असे म्हणतात

आणि मी युद्ध करीत असतां कधीही बिभत्स (निंद्य) | कर्म करीत नाहीं म्हणून देवांमध्ये व मनुष्यांमध्ये मी बीभत्सु या नावाने विख्यात झालों आहे. मी गांडीव धनुष्याचे आकर्षण करूं लागलों म्हणजे माझे दोन्ही हात एकसारखे चालतात म्हणून मला सव्यसाची म्हणतात. सर्व अंगांनी समुद्रवलयांकित असलेल्या या भूतलावर माझ्यासारखा वर्ण दुर्लभ आहे, व मी नित्य निर्मल कर्म करतों, या साठीं मी अर्जुन या नावानें प्रसिद्ध आहे. तसाच मी इंद्रपुत्र मोठा बलाढ्य व अजिंक्य असल्यामुळे माझ्या वाटेस जाण्यास कोणीही समर्थ नाहीं, म्हणून मला देवांमध्ये व मानवांमध्ये जिष्णु असे म्हणतात. त्याप्रमाणेच माझ्या पित्याने माझे कृष्ण म्हणून दहावे नाव ठेवले त्याचे कारण असे की, "माझा वर्ण उज्ज्वल श्यामल असल्यामुळे व लहानपणी मी नेहमी मातीत खेळून अंग काळे करून येत असल्यामुळे पित्याने माझे दहावे नांव काळा कृष्ण असे ठेवले. असाही या श्लोकाचा कोणी अर्थ करितात, त्यातही स्वारस्य आहे.

माझा वर्ण बालपणीं उज्ज्वल व श्यामल असा असल्यामुळे त्याच्या योगाने माझ्या पित्याचे चित्त अतिशय आकर्षित होऊन तो मला कृष्ण (चित्तरंजन करणारा) असें म्हणे !


अर्जुनाचे सर्व बोलणे ऐकून राजकुमार उत्तर गद्गद झाला. आपल्या समोर साक्षात अर्जुन उभा आहे. हे ऐकून त्याला फार आनंद झाला. नंतर त्या विराटपुत्राने आपल्या समीप असलेल्या त्या धनंजयाला अभिवंदन केले आणि म्हटले, " हे अर्जुना , मी भूमिंजय आहे व मला उत्तर असेही म्हणतात. आज तुम्हाला पाहण्याचा हा योग आला, हे मी आपले सुदैव समजतों ! हे महाबाहो लोहिताक्षा धनंजया, आपले स्वागत असो ! हे गजेंद्रशुंडातुल्यवाहुधारका, जे काही अज्ञानाने मी तुला बोललों असेन, त्याची तुम्ही क्षमा करावी. तुम्ही ज्या अर्थी पूर्वी मोठीं अचाट व दुर्घट कर्मे केली आहेत, त्या अर्थी आता मला अजिबातच भय उरले नाही व माझ्या मनात तुमच्याविषयीं अत्यंत प्रेम उत्पन्न झाले आहे !

पुढे उत्तर म्हणाला - अर्जुना या सुंदर रथावर आरूढ होऊन कौरव सैन्यात आधी कोणावर चाल करून जाण्याची आपली इच्छा आहे ते मला सांगा. म्हणजे मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो.

अर्जुन म्हणाला - हे पुरुषश्रेष्ठा, मी तु झ्यावर प्रसन्न झालो आहे; आतां तुला भय नाही. हे उत्तरा तुझ्या सर्व शत्रूची मी आतां दाण दाण उडवतो. आतां तूं स्वस्थ अस आणि या युद्धांत मी केवढं भयंकर कर्म करतो ते पहा. हे सर्व बाणभाते माझ्या स्थावर लवकर बांध; आणि सुवर्णमंडित एक खड्ग बरोबर घे.

अर्जुनाचे भाषण श्रवण करून उत्तराने फार त्वरा केली; आणि अर्जुनाची आयुधे घेऊन तो त्या शमी वृक्षावरून ताबडतोब खाली उतरला. मग अर्जन म्हणाला, हे उत्तरा, मी आता कौरवांबरोबर युद्ध करतो, व तुझ्या गाई जिंकुन परत आणतो. आता तू अगदी निर्भयपणे माझे सारथ्य कर.  रथातले हे सारथ्याचे स्थान म्हणजे केवळ तुझे नगरच आहे असे आता तू समज. नगरांत जसा तु स्वस्थ राहतोस, तसाच तू येथे स्वस्थ रहा. मी हा आता गांडीव धनुष्य ग्रहण करून यद्धार्थ सिद्ध आहे, यातवं आता माझा शत्रूकडून पराभव होणे अशक्य होय, म्हणून ते निर्भयपणे साध्य कर.

उत्तर म्हणाला - अर्जुना, मी आता या शत्रूंना भीत नाही.  युद्धांत अजिंक्य आहेस हे मी जाणतो. तू संग्रामामध्ये प्रत्यक्ष केशवाची किंवा इंद्राचीही बरोबरी करशील यात संशय नाही. परंतु तुझी ही सद्यःस्थिति पाहून मात्र माझा जीव व्याकूळ होतो व या स्थितीचा काहीच निश्चय होत नाही ! 


अर्जुन म्हणाला - बा उत्तरा, मी ज्येष्ठ भ्राता (युधिष्ठिराच्या ) आज्ञेने एक वर्ष पर्यंत हे क्लिबव्रत आचरण करीत आहे. मी खरोखरचा क्लिब नाही. मी धर्मनिष्ठ व परतंत्र आहे. माझे हे व्रत आतां समाप्त झाले आहे. यास्तवं उत्तर मी लांब नाही.


उत्तर म्हणाला - हे नरोत्तमा, माझाही तर्क तु क्लिब नसावास असाच होता ; व माझा तर्क खरा झाला हा माझ्यावर तुझा मोठा अनुग्रह होय. हे रणधुरंधरा, अशा प्रकारचे पुरुष कधीही कीच असावयाचे नाहीत हे उघड आहे. आता मला तुझे साहाय्य आहे, यास्तव मी देवांबरोबर सुद्धां युद्ध करीन. माझी सर्व भीति पळाली; मी काय करू ते सांग. शत्रुंच्या रथाचा भंग करणाऱ्या तुझ्या अश्वांचे मी आत निग्रहण करीन. मी गुरूकडून सारथ्यकर्म शिकलो आहे.

नंतर त्या वीर शिरोमणी अर्जुनाने आपल्या हातातले चुडे व कर्णातील सुवर्णमंडित कुंडले काढून खाली ठेविली. मग त्यानें भांग करून शृंगारलेले आपले काळेभोर केस शुभ्र वस्त्राने गुंडाळले नंतर अंतःकरण एकाग्र करून व  पूर्वाभिमुख होऊन त्या महाबाहूने निर्मल चित्ताने त्या! रथावर सर्व अस्त्रांचे ध्यान केले. तेव्हा त्या पांडुतनयापुढे  अश्वदेवता हात जोडून म्हणाल्या, "हे की, आम्ही सर्व उदार मनानें तुझें दास्य करण्यास सिद्ध आहो. " तेव्हां, राजा, त्या अर्जुनाने त्या गांडीवाला नमस्कार करून हस्तस्पर्श केला व म्हटले, "देवतांनो, चला यथाप्रसंगी तुमचें स्मरण व्हावे." असो; याप्रमाणे अर्जुनानें अस्त्रांचा स्वीकार केला व यसन्नमुख होऊन गांडीव धनुष्याला प्रत्यंचा चढवून तो मोठ्या वेगानें धनुष्याचा टणत्कार करूं लागला! तेव्हां एका पर्वतावर आपटून प्रचंड आघात होत आहेत की काय असे वाटू लागले ! त्या टणकाराने भूमी हादरली ; चोहीकडे सोसाट्याचे वारे सुरू झाले ; मोठा उल्कापात होऊ लागला. 

ध्वजपताका आकाशात उडाल्या. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. आणि ती सर्व स्थीती पाहून. गांडीवाचा टणत्कार गडगडाट ऐकून और सैन्य भयभीत झाले !

उत्तर म्हणालाः - हे पांडवश्रेष्ठा, तू तर येथे एकटा आहेत; तेव्हा शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या या अनेक महारथ कौरवांना युद्धामध्ये कसा जिंकशील बरे? पहा या कौरवांना किती मदत आहे तुला तर कोणाचीही मदत नाही ! तेव्हा या संग्रामामध्ये आपला कसा भाव लागेल याबद्दल माझे मन साशंक होऊन मी आपला भीतभीतच या रथावर तुझ्या अग्रभागी बसलो आहे !

अर्जुन म्हणाला - बा उत्तरा, भिऊं नको. अरे, घोषयात्रेच्या प्रसंगी मी जेव्हां महापराक्रमी गंधर्वाशी युद्ध केले, तेव्हा मला कोणी मदत करण्याला होते काय? त्याचप्रमाणे, देव दैत्यांनी गजबजून गेलेल्या त्या भयंकर खांडववनात ज्या वेळी मी युद्ध केले, त्या वेळी मला कोणी मदत केली? तसेच, देवेंद्राकरिता महाबली पौलोम व निवातकवच यांच्याशी मी युद्ध केले, तेव्हा माझ्या साहायार्थ कोण होते? अथवा द्रौपदीच्या स्वयंवरप्रसंगी जेव्हा मी सर्व राजांबरोबर संग्राम केला, तेव्हा मला कोणी मदत केली काय उत्तरा, गुरु द्रोण,  इंद्र कुबेर, यम, वरुण, अग्नि, कृप व  श्रीकृष्ण भगवंत आणि पिनाकपाणि शंकर यांची जर मी सेवा केली आहे, तर मी या कारणवश युद्ध करण्यास समर्थ होणार नाही.' अशी शंका येणेही अयुक्त होय! म्हणून भिऊ नको, निर्भय होऊन रथ चालव !

क्रमशः 

पुढची कथा पुढिल पंधराव्या भागात

भाग 15👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/015-virat-parva-marathi-katha.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post