तपोनिधी श्रीलुखाइसे बाबुळगावकर!
घरी राहुनि युक्त आचार केला ।
त्यजूनि सुखा सर्वथा त्याग केला ।।
लुखाई अशी दृढ वैराग्यमूर्ती ।
पदी तिचेया वंदना सर्व भक्ती ।।
महानुभाव पंथात गेल्या ८०० वर्षात महान महान तपस्वी महात्मे तथा तपस्विनी संत महिला होऊन गेल्या. ज्यांनी परमेश्वरचरणी देह अर्पून पुरुष साधकांच्या बरोबरीने असतिपरीचे उत्कृष्ट आचरण करून त्या परब्रम्ह परमेश्वर प्राप्तीला गेल्या, आणि अशा महान तपोनिधी स्त्रीया आजही या परमार्गात आहेत.
महानुभाव पंथात होऊन गेलेल्या तपस्विनी आईंनी केलेला त्याग, ईश्वरचरणी केलेले समर्पण, ज्ञानसाधना, उच्च पराकोटीचे वैराग्य, स्वयं दास्य, तपश्चर्या, इत्यादी त्यांचे वर्तन पंथातील प्रत्येक साधकाला, अनुसरल्याला, वासनिकांना अनन्य भक्ती आचरण्यासाठी प्रेरणा देणारे आहे, म्हणूनच अशा महापात्र तपस्विनींच्या नावाचा उल्लेख “स्मृतीस्थळ” या श्रीनागदेवाचार्यांच्या चरित्र ग्रंथात विशेष रूपाने केलेला आहे, त्यातीलच एक महान विभुती म्हणजे त. लुखाइसे बाबुळगावकर!
बाबुळगावकर लुखाइसांना एकदा भटोबासांचे दर्शन झाले. लुखाईसांनी आचार्यांना काही जिज्ञासा केली. संसाराचा त्रस व या जन्म-मरण रूप संसार सागरातून सुटावं अशी उत्कट भावना त्यांच्या अंतःकरणात आधीच होती. त्या इच्छेनुसार त्यांनी केलेल्या प्रश्नाचे समर्पक उत्तर आचार्यांनी दिले. व त्यांची जिज्ञासा अधिक जागृत झाली. आणि आचार्यांविषयी आवडी संचरली. आणि चर्चेत श्रीनागदेवाचार्यांपासून पासून ब्रम्हविद्या शास्त्राचे श्रवण झाले. बोध झाला. खरा परमेश्वर कळला. देवाविषयी, मार्गाविषयी अपार आवडी संचरली.
शास्त्र निरोपणामुळे त्यांच्या ठिकाणी अत्यंतिक संसारीक ऐहिक पारलौकिक सुखांविषयी फार विरक्ती, विरमता निर्माण झाली. तिचा विवाह सुखी संपन्न कुटुंबात देखील झालेला होता, घरची परिस्थिती सधन होती. कशाचीही कमतरता नव्हती.
पण शास्त्र श्रवणामुळे लुखाईसांचे मन संसारीक गोष्टीत रमले नव्हते, तसेच त्यांची विरक्ती परमोच्च स्थानी पोहचली होती. गृहत्याग करून अनुसरावे असे उत्कटतेने वाटू लागले. पण पतीची परवानगी मिळणे अशक्य होते. म्हणून एकदा आचार्यांच्या दर्शनाला येऊन वासनिक धर्मात असताना कसे आचरण करावे हे त्यांनी जाणून घेतले. व घरीच राहून वासनिक धर्माचा आचार करू लागल्या.
विरक्त अवस्थेमुळे ती एकदा त्या आचार्यांना म्हणाल्या, “म्हशीची शिंगे म्हशीला जड होतात तसं हे नाना प्रकारचे हिऱ्या मोत्याचे, सुवर्णालंकार मला जड होत आहेत.”
विरक्तीमुळे तिने चांगले चांगले झणझणीत, स्वादिष्ट, रुचकर, चविष्ट अन्न, गोड पदार्थ खाणे सोडले, जास्तीत जास्त रूक्षान्न सेवन करू लागल्या, देहदमण, मनोदमण, इंद्रियदमण सुरू केले. भुमीशयन, वाङ्गनियम, ब्रम्हचर्य व्रत धारण केले. आकर्षक प्रकारचे रेशमी, तलमी वस्त्र नेसणे देखील सोडले, साधारण जुने वस्त्र नेसू लागल्या. गळ्यातील सर्व दागीने काढून टाकले, नावाला फक्त एक सौभाग्य अलंकार (मंगळसूत्र) ठेवला.
विषयसेवना वर्ज्य करून पतिचा त्याग केला, आणि नित्यनेमाने दररोज गंगेला जाऊन स्नान करणे, थोडावेळ बसून विजनस्थळी परमेश्वराचे ध्यान, शास्त्राचे चिंतन, तथा अनुष्ठाण करू लागल्या.
असे सर्व सुरू असताना एक दिवस त्यांनी आपल्या नश्वर पतिला विश्वासात घेतले. व आपल्या नित्यपतिला अनुसरण्याचा मनोरथ सांगितला. धर्माविषयी सविस्तर चर्चा करून त्याला आपल्या सांसारिक विरक्तीविषयी सांगितले. आणि पतीच्या दुसऱ्या विवाहाची तयारी सुरू केली. आणि उत्तम ब्राम्हण कुळातील अतिशय सुंदर देखण्या सुशील, मुलीशी विवाह करून दिला. एवढी उदारता एका स्त्रीच्या ठाई असणे हे फक्त या महानुभाव पंथाचे ज्ञान झालेल्या साधकाच्या ठाईच असु शकते. व असे करणारी ती लुखाईसा माता एकमेव महान तपस्वीनि होऊन गेली. असे दुसरे उदाहरण नाही.
पुढे लुखाईसांनी हळुहळु गृहकर्मांच्या बाबतीत स्वतःला अलिप्त केले. व नश्वर पतिच्या दुसऱ्या पत्नीला घराची मुख्य मालकीण बणवले. व जास्तीत जास्त वेळ परमेश्वर स्मरणात घालवू लागल्या. व लवकरात लवकर त्याग घडावा यासाठी प्रार्थना करू लागल्या.
मग एक दिवस मनातला विचार पक्का झाला. बुध्दीने निश्चय केला. “आज अनुसरावेच.” आणि रोजप्रमाणे आंघोळीला म्हणून गंगेवर आल्या, आणि परस्पर घरी काहीही न सांगता, कुठेही वाच्यता न करता तशाच निंबा येथे भटोबांसाजवळ आल्या. आणि भटोबासांना आपल्या संसारत्यागाचा सविस्तर वृतांत सांगितला. भटोबासांना लगेच त्यांना भीक्षा दिली म्ह. अनुसरण दिले. आचार विधी सांगितला. मग भटोबासांनी त्यांना एका तपस्विनी आईंच्या सांघात देऊन तत्काळ परमेश्वरपूरला(ऋद्धिपुरला) पाठविले.
लुखाइसा आचार्यांकडे आल्यावर तिकडे त्यांच्या गावी हाहाकार झाला. पतीला यांचा विचार माहित असल्याने सर्व नातेवाईकांना घेऊन तो लुखाइसांची चौकशी करण्यासाठी निंबा येथे आचार्यांजवळ आला. त्याने भटोबासांना विचारले, “भटो येथे लुखाइसा आली? तिला आम्हाला भेटवा” भटोबास म्हणाले, “ती इथे नाहीये, तुम्ही सर्व आश्रम पाहू शकता” आचार्यांनी असा परिहार दिल्यावर ते सर्व आपल्या गावाला निघून गेले.
लुखाइसा ऋद्धिपुरला गेल्या, आवडीपूर्वक सर्व ऋद्धिपुरातील स्थाने नमस्करली. व त्या परिसरातच अटण सुरू केले. पुढे एक ते दीड वर्षापर्यंत अतिशय कडक उत्कर्षाने वैराग्य केले, त्यामुळे कायापालट झाला, शरीर फार कृश झाले. परमेश्वर चिंतनाने, व वैराग्याने रजस्तमांचे निरसन होऊन सत्वस्थित प्रकृती झाली. कुणालाही पाहून त्यांच्याविषयी सत्वयुक्त आदर वाटून पूज्य भाव येऊ लागला.
मग साधारण दीड वर्षांनी लुखाइसा आपल्या श्रीगुरूच्या म्हणजेच भटोबासांच्या भेटीला आल्या. व आचार्याजवळच राहू लागल्या. त्यांची धर्मनिष्ठा, आणि दृढता, वैराग्य उत्कटता पाहून भटोबास अतिप्रसन्न झाले. व लुखाइसांना म्हणाले,
“लुखाइ तू आता अशीच बाबुळगावला भिक्षेला जा! तिथे भिक्षा कर आणि भिक्षा करून ये!”
गुरु आज्ञा मिळतात लुखाइसा बाबूळगावला भिक्षेला गेल्या. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे गावात शिरल्याबरोबर भिक्षा मागण्यास सुरवात केली. भिक्षा करता करता पूर्वाश्रमीचे घर समोर आले. ईश्वरआज्ञा अशी आहे की, भिक्षा मागताना ओळीत पडलेले घर उचित, निषेधविरहीत असेल डावलता येत नाही. म्हणून त्या घरासमोर उभे राहून “भिक्षाsss” शब्द उच्चारला. त्यावेळी तो पूर्वीचा नश्वर पती बाहेरच बसला होता.
त्याने लुखाइसांना ओळखले नाही. भटमार्गीची कुणी तपस्विनी आहे म्हणून न ओळखताच म्हणाला, “आई दंडवत!” त्याने केलेला दंडवत पाहून लुखाइसांना मनातल्या मनात हसू आले. पण चेहऱ्यावरील भाव स्थिर ठेवतात त्या म्हणाल्या, “नायको आम्हाला ओळखता?” ,
लुखाइसांचा आवाज ऐकून त्याने निरखून पाहिले, व त्याला ओळख पटली. व म्हणाला, “हो आई ओळखतो, आता दुसरा दंडवत!” म्हणून जवळ आला, डोक्यावरचे पागोटे काढले, आणि लुखाइसाच्या पायावर डोके ठेवून पवित्र अंतःकरणाने दर्शन घेतले. त्याचे अंतकरण गदगदून गेले होते. लुखाईसांच्या वैराग्यनिष्ठतेविषयी त्याच्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला होता. त्याने लुखाइसांना घरात येण्याविषयी विनंती केली. लुखाइसांनी ते मान्य केले नाही. मग त्याने ओसरीतच चांगले उत्तम वस्त्र बसण्यासाठी टाकले, हातात ताट व पाण्याने भरलेला तांब्या घेऊन आला, तपस्विनी लुखाइसांची पायधुळ कपाळाला लावली. व पाय धूतले आणि त्या महान तपस्वीनीचे चरणोदक प्राशन केले. येथपर्यंत तो अनुकूल झाला.
या संसारातील नश्वर पतीला, तो अहंकारी असला मानी असला तरी आपल्या पायाजवळ झुकविण्याचे सामर्थ्य महानुभाव पंथाच्या ज्ञानयुक्त तत्वज्ञानाच्या वैराग्यात आहे. हे मात्र सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे.
थोडावेळ तिथेच थांबून लुखाईसा परत भटोबासांकडे आल्या. सर्व घडलेला सर्व वृतांत भटोबासापासी येऊन सांगितला, भटोबासांना फार समाधान वाटले. भटोबास म्हणाली “तू संपूर्ण वैराग्याने आपले देह अंतर्बाह्य पवित्र आणि सत्वस्थित केले आहे म्हणून तुला पाहून त्याला अजिबात विकार उत्पन्न झाला नाही. उलट तू त्याला मातेसमान वाटली. आता तो गाव पाळता झाला.” म्हणून भटोबासांनी त्यांची स्तुती केली
अशा प्रकारे महान तपस्विनी लुखाइसांचे दृढ वैराग्य पंथातील प्रत्येक स्त्री, पुरूष साधकाला प्रेरणादायी आणि वैराग्याची हाव उत्पन्न करणारे आहे.
त्या धर्ममातेस कोटी कोटी दंडवत प्रमाण..!